वाचकांचे प्रश्न
मतदानाविषयी यहोवाच्या साक्षीदारांचा काय दृष्टिकोन आहे?
या बाबतीत बायबलमध्ये स्पष्ट तत्त्वे दिली आहेत आणि या तत्त्वांच्या आधारावर देवाचे सेवक उचित दृष्टिकोन बाळगू शकतात. परंतु, मतदानाच्या प्रथेविरुद्ध कोणतेही तत्त्व बायबलमध्ये नाही. जसे की, व्यवस्थापक मंडळाने, मंडळाच्या कारभारांविषयी निर्णय घेण्याआधी सर्व सदस्यांची मते घ्यायला काहीच हरकत नाही. यहोवाच्या साक्षीदारांच्या मंडळ्या बहुतेकदा सभांच्या वेळांबद्दल आणि मंडळीच्या निधीच्या वापराबद्दल, हात वर करून संमतीदर्शक मते मिळाल्यावरच निर्णय घेतात.
परंतु, राजकीय निवडणुकांच्या वेळी मतदान करण्याबद्दल काय? अर्थात, लोकशाही असलेल्या काही राष्ट्रांत लोकसंख्येतील चक्क ५० टक्के लोक निवडणुकीच्या दिवशी मत देण्यास येत नाहीत. यहोवाच्या साक्षीदारांबद्दल पाहता, ते मतदान करण्याचा इतरांचा हक्क ओळखतात आणि कोणावरही आपली मते लादत नाहीत; किंवा, राजकीय निवडणुकांविरुद्ध कसलीही मोहीम काढत नाहीत. अशा निवडणुकींमध्ये जे निवडून येतात अशा अधिकाऱ्यांचा ते आदर करतात व त्यांना सहकार्य देतात. (रोमकर १३:१-७) निवडणुकीसाठी उभे राहिलेल्या व्यक्तीला ते व्यक्तिगतरीत्या मत देतील की नाही याबाबतीत प्रत्येक यहोवाचा साक्षीदार आपल्या बायबल प्रशिक्षित विवेकानुसार आणि देव व सरकार यासंबंधी त्याला असलेल्या जबाबदारीची जाणीव ठेवून निर्णय घेतो. (मत्तय २२:२१; १ पेत्र ३:१६) हा व्यक्तिगत निर्णय घेताना साक्षीदार अनेक गोष्टी विचारात घेतात.
पहिले कारण, येशू ख्रिस्त आपल्या अनुयायांविषयी म्हणाला होता: “जसा मी जगाचा नाही तसे तेहि जगाचे नाहीत.” (योहान १७:१४) यहोवाचे साक्षीदार हे तत्त्व गांभीर्याने घेतात. ‘जगाचा भाग नसल्यामुळे’ ते जगाच्या राजकीय घडामोडींत तटस्थ राहतात.—योहान १८:३६.
दुसरे कारण, प्रेषित पौलाने त्याच्या दिवसांतील लोकांसाठी ख्रिस्ताचा प्रतिनिधी म्हणून स्वतःला “राजदूत” म्हटले. (इफिसकर ६:२०, NW; २ करिंथकर ५:२०) यहोवाच्या साक्षीदारांचा असा विश्वास आहे, की ख्रिस्त येशू आता देवाच्या स्वर्गीय राज्याचा सिंहासनाधिष्ठ राजा आहे व हे त्यांनी राजदूत या नात्याने राष्ट्रांना सांगितले पाहिजे. (मत्तय २४:१४; प्रकटीकरण ११:१५) राजदूतांनी तटस्थ राहिले पाहिजे व त्यांना ज्या राष्ट्रांत पाठवले जाते त्या राष्ट्राच्या आंतरिक बाबींमध्ये त्यांनी लक्ष घालू नये अशी त्यांच्याकडून अपेक्षा केली जाते. देवाच्या स्वर्गीय राज्याचे प्रतिनिधी या नात्याने यहोवाच्या साक्षीदारांना अशाचप्रकारे, ते ज्या राष्ट्रांत राहतात त्या राष्ट्राच्या राजकारणात लक्ष न घालणे अगत्याचे वाटते.
विचार करण्याजोगे तिसरे कारण म्हणजे, एखाद्या पदासाठी एखाद्या व्यक्तीला निवडून देण्यात जे भाग घेतात ते त्यांच्या कार्याबद्दल जबाबदार ठरतील. (पडताळा १ तीमथ्य ५:२२, द न्यू इंग्लिश बायबल.) तेव्हा ख्रिश्चनांना ही जबाबदारी घ्यायची आहे की नाही त्यावर त्यांनी काळजीपूर्वक विचार केला पाहिजे.
चौथे कारण, यहोवाचे साक्षीदार त्यांच्या ख्रिस्ती ऐक्याला खूप महत्त्व देतात. (कलस्सैकर ३:१४) धर्म जेव्हा राजनीतीत भाग घेतात तेव्हा त्यांच्या सदस्यांमध्ये नेहमी फूट पडते. येशू ख्रिस्ताचे अनुकरण करून यहोवाचे साक्षीदार राजनीतीत भाग घेण्याचे टाळतात व अशाप्रकारे आपले ख्रिस्ती ऐक्य टिकवून ठेवतात.—मत्तय १२:२५; योहान ६:१५; १८:३६, ३७.
पाचवे आणि शेवटचे कारण, राजकारणापासून स्वतःला दूर राखल्यामुळे यहोवाचे साक्षीदार सर्व प्रकारच्या राजकीय श्रद्धा बाळगणाऱ्या लोकांशी राज्याच्या महत्त्वपूर्ण संदेशाविषयी मोकळेपणाने बोलू शकतात.—इब्री लोकांस १०:३५.
वर उल्लेखलेली शास्त्रवचनीय तत्त्वे पाहता, अनेक राष्ट्रांतील यहोवाचे साक्षीदार राजनैतिक निवडणुकांमध्ये मतदान न करण्याचा व्यक्तिगत निर्णय घेतात व हा निर्णय घेण्याकरता त्यांना असलेल्या स्वातंत्र्याला त्या देशाचा कायदा पाठिंबा देतो. परंतु मते देणे कायद्याने बंधनकारक असल्यास काय? अशावेळी, प्रत्येक साक्षीदार परिस्थिती कशी हाताळायची याविषयी विचारपूर्वक, बायबल आधारित निर्णय घेण्यास जबाबदार आहे. जर एखादा मत केंद्रावर जाण्याचे ठरवतो तर तो त्याचा निर्णय आहे. तो तेथे जाऊन जे काही करतो ते त्याच्यामध्ये आणि निर्माणकर्त्यामध्ये आहे.
नोव्हेंबर १५, १९५० च्या टेहळणी बुरूज अंकात, पृष्ठ ४४५ व ४४६ वर असे म्हटले आहे: “नागरिकांनी मते दिलीच पाहिजेत अशी जेव्हा कैसर सक्ती करतो तेव्हा . . . [साक्षीदार] मतदानाला जाऊ शकतात व मतकेंद्रात प्रवेश करू शकतात. येथे त्यांना, ते कोणाला मत देणार आहेत ते मतपत्रिकेवर खूण करण्यास किंवा लिहिण्यास सांगितले जाते. मतदार आपल्या इच्छेनुसार मतपत्रिकेचे हवे ते करतो. तेव्हा देवासमक्ष त्याच्या साक्षीदारांनी त्याच्या आज्ञांच्या सुसंगतेत व त्यांच्या विश्वासानुसार कार्य करण्याची आवश्यकता आहे. मतपत्रिकेबाबत काय करायचे हे त्यांना सांगण्याची आपली जबाबदारी नाही.”
सत्यात नसलेल्या एखाद्या ख्रिस्ती स्त्रीचा पती तिला मतकेंद्रावर जाण्याची गळ घालतो तेव्हा काय? ख्रिस्ती जसे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अधीन असतात तसेच स्त्रीला देखील आपल्या पतीच्या अधीन असले पाहिजे. (इफिसकर ५:२२; १ पेत्र २:१३-१७) ती तिच्या पतीच्या आज्ञेत राहून मतकेंद्रावर जात असेल तर तो तिचा व्यक्तिगत निर्णय आहे. कोणीही तिची टीका करू नये.—पडताळा रोमकर १४:४.
ज्या राष्ट्रांत मतदान कायद्याने बंधनकारक नसते पण जे मतकेंद्रात जात नाहीत ते इतरांचा रोष ओढवून घेतात—कदाचित त्यांच्यावर हल्ला होण्याची शक्यता असते तेव्हा काय? किंवा, ज्या लोकांवर मतदान करण्यास कायद्याचे बंधन नसते त्यांना, ते मतकेंद्रावर न गेल्याबद्दल कोणत्या ना कोणत्या प्रकारे कठोर शिक्षा केली जाते तेव्हा काय? या आणि अशासारख्या परिस्थितींत, ख्रिश्चनाने स्वतःचा निर्णय घेतला पाहिजे. “प्रत्येकाने आपला स्वतःचा भार वाहिलाच पाहिजे.”—गलतीकर ६:५.
असेही काही लोक असतील जे, त्यांच्या राष्ट्रात चाललेल्या मतदानाच्या वेळी काही यहोवाच्या साक्षीदारांना मतकेंद्रावर जाताना पाहतात व काहींना पाहत नाहीत तेव्हा अडखळतात. ते कदाचित म्हणतील, ‘यहोवाच्या साक्षीदारांत एकी नाही.’ परंतु त्या लोकांनी हे ओळखले पाहिजे, की प्रत्येक व्यक्तीच्या विवेकाबाबत प्रत्येक ख्रिश्चनाला यहोवा देवासमोर स्वतःचा निर्णय घ्यावा लागतो.—रोमकर १४:१२.
विविध परिस्थितीत यहोवाचे साक्षीदार जो व्यक्तिगत निर्णय घेतात त्यावेळी, ते आपली ख्रिस्ती तटस्थता आणि भाषा स्वातंत्र्य टिकवण्याची काळजी घेतात. ते सर्व बाबतीत यहोवा देवावर अवलंबून राहतात, की त्याने त्यांना शक्ती द्यावी, बुद्धी द्यावी व कोणत्याही प्रकारे आपल्या विश्वासाची हातमिळवणी करण्याचे टाळण्यासाठी त्यांना मदत करावी. अशाप्रकारे ते, “माझा दुर्ग व माझा गड तूच आहेस; तू आपल्या नावासाठी मला हाती धरून चालीव,” या स्तोत्रकर्त्याच्या शब्दांवर भरवसा दाखवतात.—स्तोत्र ३१:३.