वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w99 १०/१५ पृ. २८-३१
  • देवाच्या वचनाच्या रसिकांसाठी विक्रम

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • देवाच्या वचनाच्या रसिकांसाठी विक्रम
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • नवीन भाषांतराची आवश्‍यकता का?
  • अनोखी वैशिष्ट्ये
  • देवाचे नाव जसेच्या तसे
  • इंग्रजी न जाणणाऱ्‍या लोकांपर्यंत पोहंचणे
  • जगभरातल्या कोट्यवधी लोकांचे आवडते नवे जग भाषांतर
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००१
  • देवाच्या वचनाचं सोपं आणि समजेल असं भाषांतर
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१५
  • संवाद साधणारा देव—यहोवा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१५
  • आम्ही न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन हे भाषांतर का काढले?
    यहोवाच्या इच्छेनुसार आज कोण कार्य करत आहेत?
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
w99 १०/१५ पृ. २८-३१

देवाच्या वचनाच्या रसिकांसाठी विक्रम

देव वचनाच्या सर्व रसिकांसाठी १९९८ मध्ये एक उल्लेखनीय विक्रम गाठण्यात आला. त्यावर्षी, “पवित्र शास्त्रवचनांचे नवे जग भाषांतर” (इंग्रजी) याची दहा कोट्यवी प्रत छापण्यात आली; अशाप्रकारे ते या शतकातील सर्वाधिक खप असलेले बायबल ठरले आहे!

या बायबलचे प्रकाशन झाले तेव्हा अनेकांनी त्याची कडाडून टीका केली होती, या गोष्टीचा आपण विचार केल्यास हा विक्रम इतका उल्लेखनीय का होता हे आपल्याला समजेल. आणि तरीसुद्धा हे भाषांतर फक्‍त टिकूनच राहिले नाही तर त्याची भरभराट झाली आहे आणि ते कोट्यवधी लोकांच्या घरात—अंतःकरणात—पृथ्वीच्या सर्व टोकांपर्यंत पोहंचले देखील! या अनोख्या भाषांतराचा उगम कोठून झाला? त्यामागे कोण आहे? आणि त्याचा वापर केल्याने तुम्हाला फायदा कसा मिळू शकतो?

नवीन भाषांतराची आवश्‍यकता का?

शंभरपेक्षा अधिक वर्षांपासून, यहोवाच्या साक्षीदारांचे प्रतिनिधीत्व करणारे कायदेशीर माध्यम अर्थात वॉच टावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीने बायबलचे वितरण केले आहे. पण मग, यहोवाच्या साक्षीदारांना देवाच्या वचनाची आणखी एक आवृत्ती तयार करण्याची गरज का भासली? साकी कुबो आणि वॉल्टर स्पेक्ट यांचे इतक्या आवृत्ती (इंग्रजी) नावाचे पुस्तक म्हणते: “कोणत्याही बायबल अनुवादाला शेवटला अनुवाद असे म्हणता येणार नाही. बायबलबद्दलचे ज्ञान जसजसे वाढत जाते व भाषा जसजशी बदलत जाते तसतसे भाषांतरांमध्येसुद्धा बदल करावे लागतात.”

बायबलचे मूळ लिखाण ज्या भाषांमध्ये झाले होते त्या इब्री, ग्रीक व अरॅमीक भाषांबद्दल या शतकात बरेच ज्ञान प्राप्त झाले आहे. शिवाय, पूर्वीच्या पिढीचे बायबल भाषांतरकार वापरत असलेल्या बायबल हस्तलिखितांपेक्षा जुनी व अधिक अचूक हस्तलिखिते देखील सापडली आहेत. म्हणूनच पूर्वीपेक्षा आता देवाच्या वचनाचे भाषांतर अधिक अचूकरीत्या करता येते. यास्तव, आधुनिक भाषांत बायबलचे भाषांतर करण्याची कामगिरी हाती घेण्यासाठी नवीन जग बायबल भाषांतर समितीची स्थापना करण्यात आली हे योग्य होते.

सन १९५० मध्ये, ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांचे नवे जग भाषांतर याची इंग्रजी आवृत्ती प्रकाशित करण्यात आली. त्याचे शीर्षकच एकदम निराळे, साहसी होते; बायबलचे “जुना” आणि “नवीन” करार असे दोन भाग आहेत याचा त्याने साफ नकार केला. पुढील दशकात, इब्री शास्त्रवचनांच्या भागांचे टप्प्याटप्प्यांनी प्रकाशन करण्यात आले. सन १९६१ मध्ये संपूर्ण बायबलचा एकच खंड इंग्रजी भाषेत प्रकाशित करण्यात आला.

या उल्लेखनीय बायबलचे भाषांतर कोणी केले? सप्टेंबर १५, १९५० च्या टेहळणी बुरूजने (इंग्रजी) म्हटले: “भाषांतर समितीच्या सदस्यांनी . . . आपली नावे गुप्त राहावीत व जिवंत असताना किंवा मृत्यूपश्‍चातही आपले नाव प्रकाशित होऊ नये अशी इच्छा व्यक्‍त केली आहे. जिवंत, खऱ्‍या देवाचे नाव उंचावले जावे हा भाषांतराचा उद्देश आहे.” काही टीकाकारांनी असा आरोप लावला की हे भाषांतर कुशल नसलेल्या लोकांनी केलेले असल्यामुळे ते इतके दर्जेदार नाही; पण, सर्वांचेच असे अवाजवी मत नाही. ॲलन एस. डथी असे लिहितात: “एखाद्या बायबल भाषांतराचे अनुवादक किंवा प्रकाशक कोण आहेत हे समजल्यावर सदर भाषांतर चांगले आहे की वाईट हे ठरवता येते का? तसे काही नाही. प्रत्येक भाषांतराची वैशिष्ट्ये पारखल्याशिवाय ते भाषांतर चांगले आहे की वाईट हे कळणे शक्य नाही.”a

अनोखी वैशिष्ट्ये

कोट्यवधी लोकांनी हेच केले आहे व त्यांना कळून चुकले आहे, की नवे जग भाषांतर (इंग्रजी) फक्‍त वाचनीय नव्हे, तर बारीकसारीक तपशीलांमध्येही अचूक आहे. हे भाषांतर करण्यासाठी भाषांतरकारांनी, मूळ इब्री, अरॅमीक व ग्रीक भाषांतल्या सर्वात उत्तम हस्तलिखितांचा वापर केला.b यामध्ये, प्राचीन हस्तलिखितांचे होता होईल तितके शब्दशः भाषांतर करूनही भाषा साधीसोपीच असेल यासाठी खूप काळजी घेण्यात आली होती. हा अनुवाद प्राचीन भाषांशी अगदी मिळताजुळता व अचूक आहे अशी काही विद्वानांनी प्रशंसा केली आहे. उदाहरणार्थ, जानेवारी १९६३ च्या ॲन्डोवर न्यूटन क्वॉटर्लीने असे म्हटले: “नवीन कराराचे भाषांतर, यहोवाच्या साक्षीदारांमध्येही विद्वान असल्याचा पुरावा आहे; ते बायबलच्या भाषांतरासंबंधाने उठणाऱ्‍या समस्यांना सुजाणपणे हाताळण्यास पात्र आहेत.”

भाषांतरकारांनी, बायबल समजेची नवीन माहिती उजेडात आणली. पूर्वी अस्पष्ट असलेली बायबल वचने आता एकदमच स्पष्ट झाली. उदाहरणार्थ, मत्तय ५:३ मधील “आत्म्याने दीन असलेले धन्य” (किंग जेम्स व्हर्शन) या क्लिष्ट वचनाचे भाषांतर, आपल्या आध्यात्मिक गरजेची जाणीव असलेले धन्य असा अर्थ देणाऱ्‍या शब्दांत करण्यात आले; आता हे वचन अर्थपूर्ण वाटू लागले. तसेच, नवे जग भाषांतर यात मुख्य शब्दांचा अनुवाद अशाप्रकारे करण्यात आला आहे ज्यामुळे मृतांच्या अवस्थेविषयी कसलाही गोंधळ होत नाही. यामुळे, वाचकांना लगेच समजते, की मनुष्य मरतो तेव्हा त्याच्यातील एक भाग अमर राहतो ही धार्मिक सिद्धान्तांची शिकवण चुकीची आहे.

देवाचे नाव जसेच्या तसे

नवे जग भाषांतर याचे एक उल्लेखनीय वैशिष्ट्य म्हणजे त्यात जेहोवा (मराठीत यहोवा) हे देवाचे नाव जसेच्या तसे वापरण्यात आले आहे. इब्री बायबलच्या प्राचीन प्रतींमध्ये, ईश्‍वरी नाव “योध,” “ही,” “वाव,” “ही” या चार इब्री व्यंजनांच्या रूपात दर्शवले आहे. हे वैशिष्ट्यपूर्ण नाव तथाकथित नवीन करारातच जवळजवळ ७,००० वेळा आढळते. (निर्गम ३:१५, NW; स्तोत्र ८३:१८, NW) स्पष्टतः, आपल्या उपासकांना आपले नाव आणि आपला उद्देश माहीत असावा हा निर्माणकर्त्याचा उद्देश होता.

पण, यहुदी लोकांनी अंधविश्‍वासामुळे ईश्‍वरी नावाचा वापर करणे सोडून दिले. येशूच्या प्रेषितांच्या मृत्यूनंतर, ग्रीक शास्त्रवचनांचे नकलाकार देवाच्या व्यक्‍तिगत नावाऐवजी कायरिओस (प्रभू) किंवा थिऑस (देव) हे ग्रीक शब्द वापरू लागले. दुःखाची गोष्ट म्हणजे आधुनिक भाषांतरकारांनी हाच अनादरकारक कित्ता गिरवला; बहुतेक बायबलमधून त्यांनी देवाचे नाव काढून टाकले, एवढेच काय तर देवाला नाव आहे ही गोष्टच मुळात त्यांनी लपवून ठेवली. उदाहरणार्थ, योहान १७:६ मधील येशूचे शब्द असे आहेत: “त्यांना मी तुझे नाव प्रगट केले.” परंतु टूडेज इंग्लिश व्हर्शन या वचनाचा अनुवाद असा करते: “मी तुला प्रगट केले आहे.”

ईश्‍वरी नावाचा नेमका उच्चार कोणाला माहीत नाही म्हणूनच ते गाळण्यात आले आहे, असे कारण काही विद्वान देण्याचा प्रयत्न करतात. परंतु, जेरमाया, आयझाया आणि जिझस (मराठीत यिर्मया, यशया, येशू) यासारखी ओळखीची नावेसुद्धा नेहमी अशाप्रकारे अनुवादित केली जातात जी मूळ इब्री उच्चाराशी मुळीच जुळत नाहीत. इंग्रजीमध्ये जेहोवा हे ईश्‍वरी नावाचे रूप उचित आहे व अनेक लोकांना ते नाव माहीत आहे त्यामुळे या संदर्भात घेतल्या जाणाऱ्‍या आक्षेपांमध्ये काही तथ्य नाही.

नवीन जग बायबल भाषांतर समितीने इब्री आणि ग्रीक शास्त्रवचनांमध्ये जेहोवा हे नाव वापरण्याचे धाडस केले. यापूर्वीसुद्धा, मध्य अमेरिका, दक्षिण पॅसिफिक आणि पूर्वेकडील लोकांसाठी मिशनऱ्‍यांनी केलेल्या भाषांतरांत यहोवाचे नाव वापरले होते. परंतु, देवाच्या नावाचा वापर फक्‍त अभ्यासाच्या दृष्टीनेच आस्थेचा नाही. देवाला एक व्यक्‍ती म्हणून जाणून घ्यायचे असेल तर त्याचे नाव माहीत होणे महत्त्वाचे आहे. (निर्गम ३४:६, ७, NW) नवे जग भाषांतराने कोट्यवधी वाचकांना देवाचे नाव वापरण्याचे उत्तेजन दिले आहे!

इंग्रजी न जाणणाऱ्‍या लोकांपर्यंत पोहंचणे

नवे जग भाषांतर, १९६३ व १९८९ दरम्यान, पूर्ण किंवा त्याचे काही भाग आणखी दहा भाषांत उपलब्ध झाले. परंतु, भाषांतराचे काम परिश्रमाचे होते; काही भाषांमध्ये भाषांतर करायला तर २० किंवा त्याहूनही अधिक वर्षे लागली. सन १९८९ साली, यहोवाच्या साक्षीदारांच्या जागतिक मुख्यालयात भाषांतर सेवा विभागाची स्थापना झाली. नियमन मंडळाच्या लिखाण समितीच्या मार्गदर्शनाखाली, या विभागाने बायबल भाषांतराची गती वाढवण्याचे काम हाती घेतले. भाषांतराची एक पद्धत काढण्यात आली; या पद्धतीत बायबलमधील शब्दांच्या अभ्यासाला संगणक तंत्रज्ञानाची जोड होती. ही पद्धत कशी चालते?

लिखाण समितीने एखाद्या नवीन भाषेत बायबलचे भाषांतर करण्याची परवानगी दिल्यावर, काही समर्पित ख्रिश्‍चनांना भाषांतराचा गट म्हणून नियुक्‍त करण्यात येते. एकाने सर्व काम करण्यापेक्षा संघाने मिळून केलेले काम माफक असू शकते. (पडताळा नीतिसूत्रे ११:१४.) सहसा, संघातील प्रत्येक सदस्याला संस्थेच्या प्रकाशनांचे भाषांतर करण्याचा अनुभव असतो. संघाला मग बायबल भाषांतराच्या तत्त्वांचे आणि खास बनवलेल्या संगणक कार्यक्रमांचे उत्तम प्रशिक्षण दिले जाते. संगणक भाषांतर करत नाही; परंतु तो एखाद्या संघाला महत्त्वपूर्ण माहिती देऊ शकतो व त्यांनी घेतलेल्या निर्णयांची नोंद ठेवायला मदत करतो.

बायबलचे भाषांतर करण्यात दोन टप्पे आहेत. पहिल्या टप्प्यात, भाषांतरकारांना इंग्रजी भाषेतील नवे जग भाषांतरमध्ये वापरण्यात आलेल्या शब्दांची व वाक्यांशांची एक यादी दिली जाते. एकमेकांशी संबंधित असलेल्या इंग्रजी शब्दांची यादी केली जाते व त्यामुळे या शब्दांच्या अर्थांमध्ये अगदी किंचित फरक आहे याची भाषांतरकारांना जाणीव करून दिली जाते. ते ज्या भाषेत बायबलचा अनुवाद करतात त्या भाषेतील समानार्थी शब्दांची यादी करतात. परंतु कधीकधी भाषांतरकाराला एखाद्या वचनाचे भाषांतर करायला कठीण जाते. संगणकातील रिसर्च सिस्टममुळे भाषांतरकाराला ग्रीक आणि इब्री वाक्यांशाची माहिती मिळते शिवाय वॉच टावर प्रकाशने देखील पाहता येतात.

भाषांतराच्या दुसऱ्‍या टप्प्यात, सदर भाषेतील निवडलेले शब्द आपोआप बायबल वचनांमध्ये घातले जातात. यामुळे भाषांतर बऱ्‍याच प्रमाणात अचूक व सुसंगत होते. पण, संगणकातील “शोध आणि बदल” (सर्च ॲण्ड रिप्लेस) पद्धत वापरल्याने भाषांतर वाचताही येणार नाही. अगदी सहजसोपे भाषांतर होण्यासाठी पुष्कळ फेरबदल करावे लागतात आणि वचनांमधले शब्दही बदलावे लागतात.

ही भाषांतराची पद्धत खरोखरच प्रभावशाली ठरली आहे याचा उल्लेख करावासा वाटतो. एका गटाने तर संपूर्ण इब्री शास्त्रवचनांचे केवळ दोन वर्षांत अनुवाद केला. याची तुलना संगणकाच्या साहाय्याविना भाषांतर केलेल्या गटाशी केली तर आपल्याला कळेल की हे काम करायला त्यांना तब्बल १६ वर्षे लागली! सन १९८९ पासून आतापर्यंत आणखी १८ भाषांमध्ये ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचने छापण्यात आले आहेत. नवे जग भाषांतर आता पूर्ण किंवा त्याचे निवडक भाग ३४ भाषांमध्ये उपलब्ध आहे. याचा अर्थ, ८० टक्के यहोवाच्या साक्षीदारांकडे त्यांच्या मातृभाषेत निदान ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचने तरी आहेत.

संयुक्‍त बायबल संस्था असा अहवाल देते, की जगातील ६,५०० भाषांपैकी केवळ २,२१२ भाषांत बायबलचे काही भाग उपलब्ध आहेत.c यास्तव, सुमारे १०० भाषांतरकार इब्री शास्त्रवचनांचे ११ भाषांत आणि ग्रीक शास्त्रवचनांचे ८ भाषांत नवे जग भाषांतर तयार करण्याचा प्रयत्न करीत आहेत. “सर्व माणसांचे तारण व्हावे व त्यांनी सत्याच्या परिपूर्ण ज्ञानाप्रत पोहंचावे” अशी देवाची इच्छा आहे. (१ तीमथ्य २:४) याबाबतीत नवे जग भाषांतराचा नक्कीच सिंहाचा वाटा असणार आहे.

आम्हाला म्हणूनच आनंद होतो, की या भाषांतराने १० कोटींपेक्षा अधिक प्रती छापून विक्रम केला आणि भवितव्यात आणखी कोट्यवधी प्रती छापल्या जातील अशी आमची सदिच्छा आहे. तुम्ही या भाषांतराचे स्वतःहून परीक्षण करावे असे आम्ही तुम्हाला उत्तेजन देतो. तुम्हाला त्यातील विविध वैशिष्ट्ये आवडतील: सुवाच्य अक्षर, मथळे, परिचित वचने शोधून काढण्यासाठी एक सूची, तपशीलवार नकाशे आणि मनोवेधक परिशिष्ट. या सर्वांहून महत्त्वाचे म्हणजे, हे बायबल तुम्हाला तुमच्या मातृभाषेत देवाचे बोल अगदी अचूकरीत्या कळवते या भरवशाने तुम्ही ते वाचू शकता.

[तळटीपा]

a मनोरंजक गोष्ट म्हणजे, न्यू अमेरिकन स्टॅन्डर्ड बायबलच्या १९७१ संदर्भ आवृत्तीच्या वेष्टनावरही असे म्हटले होते: “संदर्भासाठी किंवा शिफारशीसाठी आम्ही कोणत्याही विद्वानाचे नाव दिलेले नाही कारण देवाच्या वचनाच्या गुणवत्तेवर आमचा संपूर्ण भरवसा आहे.”

b वेस्टकॉट आणि हॉर्ट यांचे द न्यू टेस्टमेंट इन द ओरीजिनल ग्रीक, हे मूळ ग्रीक हस्तलिखितांसाठी वापरले होते. आर. किटल यांचे बिब्लिया हिब्रायका हे इब्री शास्त्रवचनांसाठी मूळ हस्तलिखित म्हणून वापरले होते.

c पुष्कळ लोकांना दोन भाषा येत असल्यामुळे, असे समजले जाते, की पृथ्वीवरील लोकसंख्येच्या ९० टक्क्यांपेक्षा अधिक लोकांना वाचता येतात इतक्या भाषांत पूर्ण अथवा बायबलचे काही भाग अनुवादित केले आहेत.

[२९ पानांवरील संक्षिप्त आशय]

“नवीन कराराचे भाषांतर, यहोवाच्या साक्षीदारांमध्येही विद्वान असल्याचा पुरावा आहे; ते बायबलच्या भाषांतर संबंधाने उठणाऱ्‍या समस्यांना सुजाणपणे हाताळण्यास पात्र आहेत.”—ॲन्डोवर न्यूटन क्वॉटर्ली, जानेवारी १९६३

[३० पानांवरील संक्षिप्त आशय]

“बायबलबद्दलचे ज्ञान जसजसे वाढत जाते व भाषा जसजशी बदलत जाते तसतसे भाषांतरांमध्येसुद्धा बदल करावे लागतात”

[३१ पानांवरील चौकट/चित्र]

विद्वान नवे जग भाषांतराची प्रशंसा करतात

ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांचे नवे जग भाषांतर याविषयी, ॲन अमेरिकन ट्रान्सलेशन बायबल आवृत्तीच्या ग्रीक ‘नवीन कराराचे’ अनुवादक, एडगर जे. गुडस्पीड यांनी डिसेंबर ८, १९५० रोजी लिहिलेल्या पत्रात असे म्हटले: “तुम्हा लोकांच्या मिशनरी कार्यात आणि जगव्याप्त प्रमाणाबद्दल मला आस्था आहे; शिवाय, हे तुमचे भाषांतर मला फारच आवडले कारण ते सहज, स्पष्ट आणि सजीव आहे. हे भाषांतर करण्यासाठी तुम्ही सखोल अभ्यास केला हे मला स्पष्ट दिसते.”

इब्री आणि ग्रीक भाषेचे विद्वान अलेक्झॅन्डर थॉम्पसन असे लिहितात: “हे भाषांतर नक्कीच निपुण, बुद्धीमान विद्वानांचे आहे; त्यांनी इंग्रजी भाषेतून ग्रीक हस्तलिखितांचा होता होईल तितका अचूक अर्थ देण्याचा प्रयत्न केला आहे.”—द डिफरेनशियटर, एप्रिल १९५२, पृष्ठे ५२-७.

इस्राएलमधील इब्री भाषेचे विद्वान, प्राध्यापक बेनजॅमीन केदार १९८९ मध्ये असे म्हणाले: “इब्री बायबल आणि भाषांतरे यांच्यासंबंधाने भाषाविषयक संशोधनात मी सहसा नवे जग भाषांतराच्या इंग्रजी आवृत्तीचा संदर्भ घेतो. असे करताना, मला ही पक्की खात्री झाली आहे की या भाषांतरातून, हस्तलिखितांची होता होईल तितकी अचूक समज प्राप्त करण्याचा प्रांजळ प्रयत्न करण्यात आल्याचे दिसून येते.”

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा