परदेशात सेवा करायला तुम्हाला आवडेल का?
“मिशनरीकार्य करावं हे माझं स्वप्नच होतं. लग्नाआधी मी अमेरिकेत टेक्सास इथं सेवा करीत होतो. या क्षेत्रात सुवार्ता प्रचारकांची खूप गरज होती. लग्नानंतर आम्ही दोघं इथंच सेवा करीत राहिलो. आम्हाला मूल झाल्यावर मात्र मी विचार केला, ‘आता काही आपल्याला जमणार नाही.’ पण यहोवा मोठ्या अद्भूतरितीने आपली स्वप्नं पुरी करतो; आणि ती स्वप्नं त्याची इच्छा पूर्ण करण्याच्या संबंधात असतात, तेव्हा तर खासकरून.”—जेस्सी, सध्या एक्वाडोर येथे पत्नी व तीन मुलांसह सेवा करीत आहेत.
“गिलियड मिशनरी स्कूलच्या प्रशिक्षणाशिवाय मी अशाप्रकारचं कार्य करू शकेन हे मला स्वप्नातही कधी वाटलं नव्हतं. पण ज्यांच्यासोबत मी अभ्यास केला त्यांपैकी एखाद्या व्यक्तीला जेव्हा मी सभेत भाषण देताना किंवा प्रचार कार्यात बोलताना पाहायचे तेव्हा मला खूप खूप आनंद व्हायचा आणि हे आनंददायक काम करण्याची सुसंधी दिल्याबद्दल मी यहोवाचे आभार मानायचे.”—कॅरन, एक अविवाहित बहीण जिने आठ वर्षे दक्षिण अमेरिकेत पायनियर सेवा केली.
“अमेरिकेत १३ वर्षं पूर्णवेळ प्रचार कार्य केल्यानंतर, दुसरं एखादं आव्हानात्मक कार्य हाती घ्यावं असं मला व माझ्या पत्नीला वाटू लागलं. आज आम्ही पूर्वी कधी नव्हतो इतके समाधानी आहोत; हे जीवन विलक्षण आनंददायक आहे.”—टॉम, पत्नी लिन्डा यांच्यासह ॲमेझॉन क्षेत्रात पायनियर कार्य करतात.
वरील कृतज्ञतेचे उद्गार अशा लोकांनी काढलेले आहेत, ज्यांना काही वैयक्तिक कारणांमुळे वॉचटावर बायबल गिलियड प्रशालेतून मिशनरी कार्याचे प्रशिक्षण घेणे शक्य झाले नाही. तरीसुद्धा, त्यांनी परदेशात सेवा करण्याचे आव्हान पेलले आणि या कार्यातून मिळणारा आनंद पुरेपूर उपभोगला. हे त्यांना कसे शक्य झाले? तुम्हाला अशाप्रकारचे कार्य करता येईल का?
योग्य हेतू बाळगणे आवश्यक
परदेशात राहून यशस्वी सेवाकार्य करण्याकरता केवळ कठीण कामगिरी पूर्ण करण्याचा उत्साह असून चालत नाही. जे लोक अनेक वर्षे या कार्यात टिकून राहिले आहेत त्यांनी योग्य हेतू बाळगून हे कार्य हाती घेतले. प्रेषित पौलाप्रमाणे ते स्वतःला केवळ देवाचेच नव्हे तर लोकांचेही ऋणी समजतात. (रोमकर १:१४) अर्थात, प्रचार करण्याची देवाने दिलेली आज्ञा ते स्वतःच्या क्षेत्रात राहूनही पूर्ण करू शकत होते. (मत्तय २४:१४) पण आपण देवाचे ऋणी आहोत याची त्यांना जाणीव होती आणि त्यामुळे ज्या लोकांना सुवार्ता ऐकण्याची क्वचितच संधी मिळते अशा लोकांना मदत करण्याच्या इच्छेने प्रवृत्त होऊन त्यांनी हे कार्य स्वीकारले आहे.
परदेशात सेवा करण्यामागचा आणखी एक हेतू म्हणजे आपल्या क्षेत्रापेक्षा अधिक फलदायी असणाऱ्या क्षेत्रात सेवा करणे. आणि असा हेतू असण्यात काही गैर नाही. मासे पकडणाऱ्या एखाद्याला दुसऱ्या मच्छिमाराला भरपूर मासे मिळत आहेत असे दिसल्यास, त्यालाही तळ्याच्या त्या ठिकाणाजवळ जाऊन मासे पकडावेसे वाटणे साहजिक नाही का? त्याचप्रकारे, इतर देशांमध्ये होणाऱ्या अभूतपूर्व वाढीचे उत्साहवर्धक अहवाल ऐकल्यावर बरेच जण जिथे “माशांचा मोठा घोळका” आहे अशा क्षेत्रात जाऊन कार्य करायला प्रवृत्त होतात.—लूक ५:४-१०.
विचारपूर्वक निर्णय घ्या
बऱ्याच देशांमध्ये परदेशातून आलेल्या धार्मिक सेवकांना उदरनिर्वाहाकरता काम करण्याची परवानगी नसते. त्यामुळे, दुसऱ्या देशात जाऊन सेवा करू इच्छिणाऱ्यांनी आर्थिक दृष्ट्या समर्थ असले पाहिजे. आर्थिक समस्येवर कशाप्रकारे मात करता येईल? काहींनी आपले घर विकून किंवा ते भाड्याने देऊन परदेशात सेवा करण्यासाठी पुरेसा निधी प्राप्त केला. काहींनी आपला धंदा विकला. काहींनी बचत करून हा निधी मिळवला. तर काहीजण एखाददोन वर्षे दुसऱ्या देशात सेवा करतात, मग स्वतःच्या देशात परत जाऊन काम करतात आणि पुरेसा पैसा मिळवल्यानंतर पुन्हा त्या देशात जाऊन सेवा करतात.
एखाद्या विकसनशील देशात जाऊन सेवा करण्याचा एक फायदा आहे. सहसा श्रीमंत देशांच्या तुलनेत या देशांतले राहणीमान परवडण्यासारखे असते. यामुळे थोड्याशाच निवृत्ती वेतनावरही आरामशीर खर्च भागतो, असा काहींना अनुभव आला आहे. अर्थात, आपण कशाप्रकारचे राहणीमान निवडतो यावरही बरेच काही अवलंबून आहे. विकसनशील देशांतही, अगदीच ऐषोआरामात राहायचे म्हटले तर बराच पैसा मोजावा लागेल.
तेव्हा दुसऱ्या देशात जाण्याआधीच सर्व खर्चाचा अंदाज करून पाहणे जरूरीचे आहे. पण फक्त आर्थिक बाबींचाच विचार करून चालणार नाही. इतरही काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. दक्षिण अमेरिकेत सेवा केलेल्या काहींचे मनोगत खाली दिले आहे; त्यांवरून आपल्याला कल्पना येईल की कोणकोणत्या महत्त्वाच्या गोष्टींचा विचार करावा लागेल.
सर्वात मोठे आव्हान
फिनलंडचे मार्कू सांगतात, “स्पॅनिश भाषा शिकायला मला खूप कठीण गेलं. आपल्याला तर इथली भाषा येत नाही, तेव्हा आपल्याला इतक्यातच सेवा सेवक म्हणून नेमलं जाणार नाही असे समजून मी निश्चिंत होतो. पण दोन महिनेही अजून झाले नव्हते आणि मला पुस्तक अभ्यास घ्यायला सांगण्यात आलं. मला तर धक्काच बसला! भाषा येत नसल्यामुळे कित्येकदा अर्थाचे अनर्थ व्हायचे, सर्वांसमोर कधीकधी लाजिरवाणं व्हायचं. खासकरून नावांचा तर सारखाच घोटाळा व्हायचा. एकदा ब्रदर सांचो ऐवजी मी ‘ब्रदर चांचो (डुक्कर)’ म्हणालो; आणि एकदा सिस्टर सालामेया ऐवजी ‘मालासेया (दुष्ट)’ म्हणालो, तो प्रसंग तर मी कधीच विसरणार नाही. पण एवढं मात्र खरं, की सर्वांनी आम्हाला समजून घेतलं.” मार्कू यांनी, पत्नी सिलीन यांच्यासोबत त्या देशात आठ वर्षे विभागीय पर्यवेक्षक म्हणून कार्य केले.
जेस्सी नावाच्या ज्या बंधूंचा याआधी उल्लेख करण्यात आला होता त्यांच्या पत्नी क्रिस सांगतात: “आम्ही इथं येऊन तीन महिने झाल्यानंतर झालेली सर्किट व्हिजिट मला आठवते. सर्किट ओव्हरसियर आपल्या भाषणात अतिशय हृदयस्पर्शी उदाहरणं देऊन काही मुद्दे सांगताहेत इतकं मला कळत होतं, पण नेमकं काय सांगण्याचा ते प्रयत्न करताहेत हे मला समजत नव्हतं. तिथेच सर्वांसमोर मी रडू लागले. आणि हळूहळू नव्हे, चांगली ढसाढसा रडले. सभा संपल्यावर, मी सर्किट ओव्हसियरना माझ्या तोडक्या फोडक्या भाषेत समजावण्याचा प्रयत्न केला की मी का रडत होते. ते माझ्याशी अतिशय प्रेमाने वागले आणि सर्वजण मला नेहमी जे सांगायचे तेच तेही म्हणाले, ‘तेन पासिएनसिया, एरमाना’ (‘हिंमत हारू नका, सिस्टर’). दोनतीन वर्षांनी आमची पुन्हा भेट झाली, तेव्हा आम्ही चक्क ४५ मिनिटं बोललो. एकमेकांशी आपण बोलू शकतो याचा आम्हाला खूप खूप आनंद झाला.”
एका बंधूंच्या मते, “अभ्यासाशिवाय पर्याय नाही. जितक्या मेहनतीने आपण भाषेचा अभ्यास करू तितकेच लोकांशी सुसंवाद साधण्यात आपण अधिकाधिक निपुण होऊ.”
प्रयत्न केल्याने निश्चितच अनेक लाभ होतात, या गोष्टीला सगळ्यांनी दुजोरा दिला. नवी भाषा शिकण्यासाठी खटाटोप करताना नम्रता, सबूरी आणि चिकाटी यांसारखे सद्गुण शिकायला मिळतात. आणि एकदा का भाषेवर प्रभुत्त्व मिळवले, की मग इतरांना सुवार्ता सांगण्याच्या असंख्य सुसंधींचे दालन खुले होते. उदाहरणार्थ, स्पॅनिश भाषा शिकणारा जगातील जवळजवळ ४० कोटी लोकांच्या भाषेत संवाद साधण्यास समर्थ होतो. ज्यांना काही कारणास्तव नंतर आपल्या देशात परतावे लागले अशा लोकांना सुद्धा ही भाषा शिकल्याचा फायदा झाला, कारण त्यांच्या देशातल्या स्पॅनिश भाषिकांना ते मदत करू शकले.
घरची आठवण?
डेबोरा आपले पती गॅरी यांच्यासह ॲमेझॉन क्षेत्रात सेवा करीत होत्या, त्या सांगतात, “१९८९ साली आम्ही एक्वाडोरला आलो, तेव्हा मला घरची खूप आठवण यायची. पण मी मंडळीतल्या भाऊबहिणींसोबतच आपली सुखदुःख वाटून घ्यायला शिकले. मग तीच मला आपली माणसं वाटू लागली.”
सुरवातीला कॅरेन नावाच्या एका बहिणीचा उल्लेख करण्यात आला होता. ती सांगते: “घरची आठवण येऊ नये म्हणून मी दररोज सेवेला जायचे. त्यामुळे घरची आठवण काढायला वेळच मिळायचा नाही. शिवाय मी इथं, परक्या देशात राहून कार्य करते आहे याचा माझ्या आईबाबांना अभिमान वाटतो, हेही मी नेहमी आठवणीत ठेवले. आई मला धैर्य द्यायला नेहमी म्हणायची, ‘माझ्यापेक्षा यहोवाच तुझी चांगली काळजी घेऊ शकतो.’”
जपानची एक बहीण, माकीको हसत सांगते की, “पूर्ण दिवस प्रचार कार्य करून घरी आल्यावर मी जाम थकलेली असते. घरची आठवण वगैरे येण्याआधीच मला झोप लागते. त्यामुळे, कधीकधी घरची आठवण येऊन वाईट वाटत असलं तरी फार वेळ असं वाटत नाही.”
मुलांचे काय?
तुम्हाला मुले असल्यास त्यांच्याबद्दल, उदाहरणार्थ त्यांच्या शिक्षणाबद्दलही विचार करणे जरूरीचे आहे. काहींनी घरीच मुलांना शिकवणी देण्याचा निर्णय घेतला आहे, तर काहींनी त्या त्या क्षेत्रातल्या शाळांत आपल्या मुलांना घातले.
ॲल नावाचे बंधू आपली पत्नी, दोन मुले व आई यांच्यासोबत दक्षिण अमेरिकेत राहायला गेले. ते म्हणतात: “मुलांना तिथल्या शाळेत घातल्यामुळे त्यांना फार कमी वेळात भाषा शिकता आली. अवघ्या तीन महिन्यात ती अगदी अस्खलित बोलू लागली होती.” माईक आणि कॅरी यांनी मात्र पत्रव्यवहारांतून शिक्षण देणाऱ्या एका चांगल्या शाळेत आपल्या दोन किशोरवयीन मुलांचे नाव घातले. पण ते सांगतात: “शिक्षणाची ही पद्धत वेगळी असल्यामुळे, आपल्याला मुलांवर अवलंबून राहता येणार नाही याची आम्हाला जाणीव होती. ते वेळच्या वेळी आपला नेमलेला अभ्यास पूर्ण करतात की नाही याची आम्हाला खात्री करावी लागायची.”
ऑस्ट्रेलियाचे डेव्हिड आणि जानीता यांनीही आपल्या दोन मुलांबद्दल सांगितले. “आम्हाला आमच्या मुलांना दाखवायचं होतं की लोक कशा परिस्थितीत जगतात. कधीकधी आपल्याला वाटतं की आपण ज्या परिस्थितीत लहानाचे मोठे झालो तीच परिस्थिती सगळीकडे असेल, पण हे खरे नाही. शिवाय, ईश्वरशासित तत्त्व आणि सिद्धान्त कशाप्रकारे कोणत्याही देशात आणि कोणत्याही संस्कृतीत सारखेच असतात हे देखील त्यांना पाहायला मिळाले आहे.”
केन आपल्या लहानपणचा अनुभव सांगतात, “आम्ही १९६९ साली इंग्लंड सोडून आलो तेव्हा मी फक्त चार वर्षांचा होतो. मला तर असे वाटले होते की आम्ही गवताचे छप्पर असलेल्या मातीच्या झोपडीत राहू पण माझी निराशा झाली, तरीसुद्धा मला वाटतं की आमचं बालपण खूपच मजेत गेलं. उलट ज्या मुलांना आमच्यासारखी संधी मिळाली नाही अशा मुलांबद्दल मला वाईट वाटायचं! मिशनरी आणि खास पायनियर म्हणून सेवा करणाऱ्या अनेक बांधवांचा सहवास लाभल्यामुळे मी नऊ वर्षांच्या वयातच सहायक पायनियरिंग करू लागलो.” आज केन प्रवासी पर्यवेक्षक म्हणून सेवा करतात.
जेस्सी यांची मुलगी गॅब्रिएला म्हणते, “आता एक्वाडोरच आमचा देश झाला आहे. माझ्या आईवडिलांनी इथं येण्याचा निर्णय घेतला याचा मला खूप आनंद वाटतो.”
पण सर्वच मुलांना नवीन देशात रुळता आलं नाही; बऱ्याच वेगवेगळ्या कारणांमुळे काही कुटुंबांना आपल्या देशात परतावे लागले. त्यामुळे दुसऱ्या एखाद्या देशात कायमचे जाण्याआधी थोडे दिवस तिथे राहायला जाणे चांगले असते. असे केल्यामुळे तिथली परिस्थिती प्रत्यक्ष पाहून त्यानुसार निर्णय घेता येतात.
दुसऱ्या देशातील सेवेतून मिळणारे आशीर्वाद
दुसऱ्या देशात जाऊन सेवा करण्यासाठी बऱ्याच आव्हानांना तोंड द्यावे लागते आणि बरेच त्याग करावे लागतात. पण ज्यांनी असे केले आहे त्यांना कधी आपल्या निर्णयाचा पस्तावा झाला का? त्यांनाच विचारू.
जेस्सी: “अंबाटो शहरात आता आम्हाला दहा वर्षं झाली आहेत; या दरम्यान इथल्या २ मंडळ्यांत वाढ होऊन आता ११ मंडळ्या झाल्या आहेत आणि ही वाढ पाहून आम्हाला खूप आनंद वाटतो. त्यांपैकी पाच मंडळ्या सुरू करण्यात योगदान देण्याची सुसंधी आम्हाला मिळाली, शिवाय दोन राज्य सभागृहांच्या बांधकामात हातभार लावण्याचीही आम्हाला संधी मिळाली. तसेच दर वर्षी निदान दोन बायबल विद्यार्थ्यांना बाप्तिस्मा घेण्यात मदत करण्याचा आनंदही आम्हाला उपभोगता आला. मला एकाच गोष्टीची खंत आहे—आम्ही दहा वर्षांआधीच इथं का आलो नाही.”
लिंडा: “लोक ज्या उत्साहानं सुवार्ता स्वीकारतात आणि आमच्या कष्टांबद्दलही जी कृतज्ञता बाळगतात ते पाहून आम्हाला खूप समाधान मिळतं. आमच्यासोबत बायबलचा अभ्यास करणाऱ्या अल्फॉनसोचेच उदाहरण घ्या. जंगलात एका लहानशा गावात तो राहतो. आपल्या भागातही जाहीर भाषणाच्या सभा घेता आल्या तर किती बरं होईल असं त्याला सारखं वाटायचं. अलीकडेच तो आपल्या नवीन बांधलेल्या लाकडाच्या घरात राहायला गेला होता. त्याच्या गावात अशी पक्की घरं दोन तीनच असतील. यहोवा देवाच्या सभा चालवण्याइतके दुसरे चांगले ठिकाण गावात नाही हे पाहून तो पुन्हा आपल्या गवताच्या झोपडीत राहायला गेला आणि आपलं नवीन घर त्यानं राज्य सभागृह म्हणून वापरण्यासाठी बांधवांच्या सुपूर्द केलं.”
जिम: “अमेरिकेत असताना आम्ही सेवेत लोकांशी बोलण्यासाठी जो वेळ द्यायचो त्यापेक्षा दहापट जास्त वेळ आम्ही इथं देऊ शकतो. शिवाय, इथं जीवन फार धकाधकीचं नाही. अभ्यासासाठी, क्षेत्र सेवेसाठी निश्चितच आम्हाला जास्त वेळ मिळतो.”
सॅन्ड्रा: “बायबलचं सत्य समजल्यानंतर लोक आपल्या जीवनात जे बदल करतात, सुधारणा करतात ते पाहून मला खूप समाधान मिळतं. अमाडा नावाच्या एका ६९ वर्षांच्या बाईबरोबर मी अभ्यास करायचे. तिचं लहानसं दुकान होतं आणि बऱ्याच वर्षांपासून ती दुधात पाणी मिसळून विकत होती. शिवाय, कमी दूध देऊन ती गिऱ्हाइकांना फसवायची. पण सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान या पुस्तकातून १३ व्या अध्यायात ‘प्रामाणिकपणा आनंदात परिणीत होतो’ या शीर्षकाखालच्या माहितीचा अभ्यास केल्यानंतर मात्र अमाडानं गिऱ्हाइकांची फसवणूक बंद केली. त्यानंतर काही काळातच तिचा बाप्तिस्मा झाला. तेव्हा मला किती आनंद झाला असेल!”
कॅरेन: “मला इथं येण्याआधी कधीच यहोवावर इतकं विसंबून राहण्याची किंवा त्याची इतकी सेवा करण्याची संधी मिळाली नव्हती. यहोवा देवासोबतचं माझं नातं खूप घनिष्ट आणि बळकट झालं आहे.”
तुमच्याबद्दल काय?
गेल्या अनेक वर्षांत हजारो यहोवाचे साक्षीदार आपला देश सोडून दुसऱ्या देशात सेवा करायला गेले आहेत. काहीजण एखाद दोन वर्षांसाठी तर काहीजण कायमचे. ते आपला अनुभव, आध्यात्मिक प्रौढता आणि आर्थिक साधनसंपत्ती दुसऱ्या देशात राज्याच्या कार्यात वाढ करण्यासाठी खर्च करू इच्छितात. काही भागांत उदरनिर्वाहाकरता काम मिळणे कठीण असल्यामुळे त्या ठिकाणचे राज्य प्रचारक सेवा करू शकत नाहीत, अशा ठिकाणीही काही बांधव स्वेच्छेने जाऊन सेवा करतात. काही असे प्रदेश आहेत, जेथे पोचणे अतिशय कठीण आहे; बरेच बांधव अशा दूरदूरच्या परिसरांत जाता यावे म्हणून मोटारी घेतात. दुसरे काही बांधव शहरांत राहण्याचे निवडतात आणि जिथे फार कमी वडील आहेत अशा मोठमोठ्या मंडळ्यांना आध्यात्मिक मदत करतात. पण हे सर्व बांधव खात्रीपूर्वक सांगतात की त्यांनी जे काही त्याग केले त्यांच्या तुलनेत त्यांना कितीतरी पटीने आध्यात्मिक आशीर्वाद लाभले आहेत.
दुसऱ्या देशात जाऊन सेवा करण्याची सुवर्ण संधी तुम्हालाही मिळवता येईल का? तुमची परिस्थिती अनुकूल असल्यास, याबाबतीत विचार करायला काय हरकत आहे? पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या देशात तुम्ही सेवा करू इच्छिता तिथल्या शाखा दप्तराला लिहून कळवा. त्यांच्याकडून तुम्हाला जी खास माहिती मिळेल तिच्या आधारावर तुम्ही आपली इच्छा यशस्वीरित्या पूर्ण करू शकाल. शिवाय, १९८८ सालच्या टेहळणी बुरूज ऑगस्ट १५ च्या अंकात (इंग्रजी) “आपला देश व आपले नातलग सोडून चल” या लेखातही तुम्हाला बऱ्याच उपयुक्त सूचना सापडतील. चांगली योजना केल्याने आणि यहोवाच्या आशीर्वादाने कदाचित तुम्ही देखील दुसऱ्या देशात सेवा करण्याचा आनंद उपभोगणाऱ्यांपैकी होऊ शकाल.
[२४पानांवरील चित्र]
कच्च्या रस्त्यावरून श्वार इंडियन लोकांच्या सुदूर परिसराकडे निघालेले टॉम आणि लिंडा
[२५ पानांवरील चित्र]
एक्वाडोरची राजधानी क्विटो, येथे अनेक बांधव सेवा करत आहेत
[२५ पानांवरील चित्र]
अँडीज पर्वतांच्या प्रदेशात सुवार्ता प्रचार करताना माकीको
[२६ पानांवरील चित्र]
हिल्बिग कुटुंबीय मागच्या पाच वर्षांपासून एक्वाडोरमध्ये सेवा करत आहेत