तुम्हाला तुमच्या भावाला मिळवता येईल
“तुम्ही दोघे एकांती असताना त्याचा अपराध त्याला दाखीव; त्याने तुझे ऐकले तर तू आपला भाऊ मिळविलास असे होईल.”—मत्तय १८:१५.
१, २. समस्या सोडवण्यासाठी येशूने कोणता व्यावहारिक सल्ला दिला?
येशूचे सेवाकार्य पूर्ण व्हायला आता एक वर्षही राहिले नव्हते, आणि त्याला त्याच्या शिष्यांना काही महत्त्वपूर्ण धडे द्यायचे होते. त्यांविषयी तुम्ही मत्तयाच्या १८ व्या अध्यायात वाचू शकता. एक महत्त्वाचा धडा म्हणजे लहान मुलांप्रमाणे नम्र असणे. त्यानंतर त्याने या गोष्टीवर जोर दिला, की आपण “लहानांतील एकाला” देखील अडखळवू नये आणि या ‘लहानांना’ मार्गभ्रष्ट करण्याचे आपण टाळले पाहिजे नाहीतर ते नाश पावतील. त्यानंतर येशूने दोघा ख्रिश्चनांमधील समस्या सोडवण्यासाठी मोलाचा आणि उपयोगात आणण्याजोगा सल्ला दिला.
२ तुम्हाला त्याचे शब्द आठवत असतील: “तुझ्या भावाने तुझा अपराध केला, तर त्याच्याकडे जा, तुम्ही दोघे एकांती असताना त्याचा अपराध त्याला दाखीव; त्याने तुझे ऐकले तर तू आपला भाऊ मिळविलास असे होईल. परंतु त्याने जर न ऐकले तर तू आणखी एका-दोघांस आपणाबरोबर घे; अशासाठी की, दोघा किंवा तिघा साक्षीदारांच्या तोंडून प्रत्येक शब्द शाबीत व्हावा; आणि जर त्याने त्यांचे न ऐकले तर मंडळीला कळीव आणि जर त्याने मंडळीचेहि न ऐकले तर तो तुला परराष्ट्रीय किंवा जकातदार ह्यांच्यासारखा होवो.” (मत्तय १८:१५-१७) हा सल्ला आपण केव्हा लागू करावा आणि तो लागू करताना आपली मनोवृत्ती कशी असावी?
३. दुसऱ्यांच्या चुकांकडे आपण कसे पाहिले पाहिजे?
३ आधीच्या लेखात या गोष्टीवर जोर देण्यात आला होता, की आपण सर्वच अपरिपूर्ण आहोत आणि आपल्या सर्वांकडून चुका होतात; तेव्हा क्षमाशील असण्याकरता आपल्याला प्रयत्न करण्याची गरज आहे. कोणा बांधवाने बोललेल्या एखाद्या गोष्टीमुळे किंवा त्याच्या वागण्यामुळे आपले मन दुखावले जाते तेव्हा खासकरून आपण क्षमाशील असले पाहिजे. (१ पेत्र ४:८) सहसा अशा प्रकारच्या चुका मागे टाकणे—क्षमा करणे आणि विसरून जाणेच उत्तम. असे केल्यामुळे आपण ख्रिस्ती मंडळीतील शांती कायम राखण्यासाठी हातभार लावत आहोत असा आपण विचार करू शकतो. (स्तोत्र १३३:१; नीतिसूत्रे १९:११) पण, एखाद्या प्रसंगी तुम्हाला असे वाटेल, की तुमचे मन दुखावलेल्या भावाची किंवा बहिणीशी समक्ष भेट घेऊन घडलेल्या गोष्टीची शहानिशा करावी. अशावेळी, येशूच्या वरील शब्दांतून आपल्याला मार्गदर्शन मिळते.
४. दुसऱ्यांकडून चुका होतात तेव्हा मत्तय १८:१५ येथील तत्त्व आपण कसे लागू करू शकतो?
४ येशूने सल्ला दिला, की “तुम्ही दोघे एकांती असताना त्याचा अपराध त्याला दाखीव.” (तिरपे वळण आमचे.) असे करणे शहाणपणाचे आहे. जर्मन भाषांतरांपैकी काही भाषांतरांत असे म्हटले आहे, की “चार डोळ्यांसमोर” अर्थात त्याच्या आणि तुमच्या डोळ्यांसमोर त्याचा अपराध त्याला दाखव. [१] तुम्ही समस्येविषयी एकांतात चर्चा करता तेव्हा ती सोडवायला अधिक सोपे जाते. एखाद्या बांधवाने अपमानास्पद किंवा कठोर असे काही कृत्य केले असल्यास किंवा तसे तो बोलला असल्यास त्याची चूक तो तुमच्यासोबत एकटा असताना कदाचित लगेच स्वीकारील. त्या घटनेविषयी इतर लोक ऐकत असल्यास तो बांधव मानवी स्वभावानुसार त्याच्या हातून झालेली चूक मान्य करणार नाही किंवा स्वतःचीच वकिली करेल. पण, तुम्ही त्या समस्येची चर्चा “चार डोळ्यांसमोर” करता तेव्हा तुम्हाला कदाचित हे दिसून येईल, की त्या भावाने पाप किंवा हेतुपुरस्सर चूक केली नाही, तर तो केवळ एक गैरसमज होता. ही गोष्ट तुम्हा दोघांना समजली की मग समस्या तुम्हाला सहज सोडवता येईल; क्षुल्लक गोष्टीचा बाऊ करून आपसांतील नातेसंबंध आणखी बिघडवण्याचे तुम्ही टाळू शकाल. त्यामुळे मत्तय १८:१५ येथील तत्त्व दररोजच्या जीवनातील लहानसहान रुसव्याफुगव्यांच्या बाबतीतही लागू होते.
येशूच्या म्हणण्याचा काय अर्थ होता?
५, ६. संदर्भाचा विचार करता मत्तय १८:१५ येथे कोणत्या प्रकारच्या अपराधांविषयी सांगण्यात आले आहे आणि त्यावरून काय दिसून येते?
५ खरे सांगायचे झाल्यास, येशूचा सल्ला अधिक गंभीर विषयांकरता लागू होतो. येशूने म्हटले: “तुझ्या भावाने तुझा अपराध केला तर.” तसे पाहिल्यास “अपराध” ही कोणतीही चूक किंवा एखादा दोष असू शकतो. (ईयोब २:१०; नीतिसूत्रे २१:४; याकोब ४:१७) पण संदर्भ पाहिल्यानंतर आपल्याला दिसून येते, की येशू गंभीर विषयाच्या बाबतीत बोलत होता. हा अपराध इतका गंभीर होता, की शेवटी संबंधित भावाला “परराष्ट्रीय किंवा जकातदार” ह्यांच्यामध्ये गणण्यात येत होते. या वाक्यांशाचा काय अर्थ होतो?
६ येशूचे हे शब्द ऐकणाऱ्या त्याच्या शिष्यांना हे माहीत होते, की त्यांच्या देशवासीयांनी परराष्ट्रीयांसोबत कोणत्याही प्रकारचा व्यवहार ठेवायचा नव्हता. (योहान ४:९; १८:२८; प्रेषितांची कृत्ये १०:२८) आणि जकादारांशी तर ते खासकरून संबंध टाळायचे कारण हे लोक जन्माने यहुदी असले तरीही आपल्याच लोकांची पिळवणूक करण्यात माहीर होते. त्यामुळे स्पष्टपणे सांगायचे झाल्यास मत्तय १८:१५-१७ येथील संदर्भ हा गंभीर पातकांविषयी आहे; क्षमा करून विसरून जाता येतात अशा साधारण व्यक्तिगत समस्यांविषयी येशू तेथे बोलत नव्हता.—मत्तय १८:२१, २२.a
७, ८. (अ) कोणत्या प्रकारच्या अपराधांच्या बाबतीत वडिलांनी हस्तक्षेप करावा? (ब) मत्तय १८:१५-१७ या वचनांच्या एकवाक्यतेत कोणत्या प्रकारचे अपराध दोघा भावांनी आपसांतच मिटवावे?
७ नियमशास्त्रानुसार अशीही काही पातके होती ज्यांच्याबाबतीत केवळ ज्याच्याविरुद्ध अपराध झाला आहे त्याने क्षमा करणे पुरेसे नव्हते. ईशनिंदा, धर्मत्याग, मूर्तिपूजा आणि जारकर्म, व्यभिचार आणि समलैंगिकता यांसारखी लैंगिक पातके वडिलांना (किंवा याजकांना) कळविण्यात यायची आणि त्यांच्याद्वारेच ती हाताळली जायची. हीच गोष्ट ख्रिस्ती मंडळीच्या बाबतीत खरी आहे. (लेवीय ५:१; २०:१०-१३; गणना ५:३०; ३५:१२; अनुवाद १७:९; १९:१६-१९; नीतिसूत्रे २९:२४) पण याची नोंद घ्या, की येथे ज्याप्रकारच्या अपराधांचा येशूने उल्लेख केला आहे त्यांविषयी फक्त संबंधित दोघाच बांधवानी चर्चा केली पाहिजे. उदाहरणार्थ, रागाने किंवा द्वेषाने एका भावाने दुसऱ्या भावाची बदनामी करणे. विशिष्ट माल वापरण्याचा आणि ठराविक काळात काम संपवण्याचा करार करून तो पूर्ण न करणे. ठरवलेल्या हप्त्यांनुसार किंवा ठराविक तारखेला पैसे परत करण्याचे कबूल करून ते न करणे. आपल्या मालकाकडून प्रशिक्षण घेतल्यानंतर विशिष्ट मुदतीपर्यंत किंवा विशिष्ट परिसरात आपण कोणत्याही परिस्थितीत (दुसरी नोकरी धरली तरीसुद्धा) त्याच्यासोबत स्पर्धा करणार नाही किंवा त्याच्या ग्राहकांना आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न करणार नाही असा खात्रीपूर्वक शब्द दिल्यानंतर त्यानुसार न वागणे.b या उदाहरणांप्रमाणे एखादा बांधव आपला शब्द पाळत नाही आणि त्याविषयी त्याला पश्चात्तापही होत नाही, तेव्हा निश्चितच ती एक गंभीर बाब ठरते. (प्रकटीकरण २१:८) पण अशाप्रकारच्या समस्या संबंधित दोघा बांधवांनाच सोडवता येण्यासारख्या आहेत.
८ अशी समस्या सोडवण्यासाठी तुम्ही कोणते पाऊल उचलाल? येशूच्या शब्दांमध्ये आपल्याला तीन पावले उचलण्याचे सांगण्यात आले आहे. आपण त्या प्रत्येकाचा विचार करू या. येशूच्या मार्गदर्शनाला कायदेशीर पद्धत समजण्याऐवजी त्याच्या शब्दांतील गर्भितार्थाकडे लक्ष द्या आणि असे करताना तुमच्या प्रेमळ उद्देशाचे कधीही विस्मरण होऊ देऊ नका.
भावाला मिळवण्याचे खास प्रयत्न करा
९. मत्तय १८:१५ हे वचन लागू करताना आपण कोणती गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे?
९ येशू असे म्हणून सुरवात करतो: “तुझ्या भावाने तुझा अपराध केला, तर त्याच्याकडे जा, तुम्ही दोघे एकांती असताना त्याचा अपराध त्याला दाखीव; त्याने तुझे ऐकले तर तू आपला भाऊ मिळविलास असे होईल.” केवळ संशयाच्या आधारावर हे पाऊल उचलू नये हे स्पष्टच आहे. तुमच्याकडे पुरावा किंवा विशिष्ट माहिती असली पाहिजे जिच्या आधारावर तुम्ही तुमच्या भावाला हे दाखवण्यात मदत करू शकता, की त्याच्याकडून चुक घडली आहे आणि त्याला सुधारणे आवश्यकता आहे. समस्या खूप वाढण्याआधी किंवा त्या भावामध्ये चुकीच्या मनोवृत्तीने मूळ पकडण्याआधी लवकरात लवकर पाऊल उचलणे नेहमी चांगले असते. आणि हे देखील विसरू नका, की या गोष्टी तुमच्या मनात बराच काळ घोळत राहिल्यास त्यामुळे तुमच्यावर त्याचा दुष्परिणाम होऊ शकतो. ही चर्चा केवळ तुम्हा दोघांमध्ये असल्यामुळे दुसऱ्यांकडून सहानुभूती मिळवण्यासाठी किंवा स्वतःची प्रतिमा इतरांपुढे चांगली राखण्यासाठी त्या गोष्टीची चर्चा आधीच इतरांसोबत करू नका. (नीतिसूत्रे १२:२५; १७:९) का? कारण तो तुमचा उद्देश नाही.
१०. आपल्या भावाला मिळवायला कशाने मदत होईल?
१० तुमचा उद्देश त्या भावाला शिक्षा व्हावी, त्याचा अपमान करावा किंवा त्याची बदनामी करावी हा नसून, त्याला मिळवावे हा असला पाहिजे. त्याने खरोखरच काही चुकीचे केले असल्यास यहोवासोबतचा त्याचा नातेसंबंध धोक्यात आहे. तो तुमचा ख्रिस्ती बांधव राहावा असे तुम्हाला निश्चितच वाटते. हे लक्षात घेऊन, त्याच्यासोबत एकान्तात चर्चा करताना शांत मनोवृत्तीने बोला, कठोर शब्दांत किंवा आरोप करण्याच्या अविर्भावात बोलू नका; या सूचनांचा अवलंब केल्यास तुमच्या चर्चेचा चांगला परिणाम होईल. प्रेमळ उद्देश बाळगून केलेल्या या चर्चेमध्ये हे लक्षात असू द्या, की तुम्ही दोघेही अपरिपूर्ण, पापी व्यक्ती आहात. (रोमकर ३:२३, २४) त्याच्याविषयी तुम्ही इतरत्र कोठे चहाडी केली नाही आणि तुम्हाला त्याची खरोखरच मदत करायची आहे हे त्याला कळून आल्यावर समस्या सुटायला इतका वेळ लागणार नाही. प्रेमळपणे आणि स्पष्टपणे चर्चा करणे केव्हाही शहाणपणाचे ठरेल कारण त्या चर्चेतून कदाचित तुम्हा दोघांना याची जाणीव होईल, की तुम्हा दोघांकडून काही प्रमाणात चूक झाली होती किंवा काहीतरी गैरसमज झाला होता.—नीतिसूत्रे २५:९, १०; २६:२०; याकोब ३:५, ६.
११. अपराधी व्यक्ती आपले ऐकत नसली तरीही, आपण काय करू शकतो?
११ कोणती चूक झाली आणि ती का इतकी गंभीर आहे हे दाखवून देण्यास तुम्ही त्याला मदत केल्यानंतर तो कदाचित पश्चात्ताप करायला प्रवृत्त होईल. पण साहजिकच, गर्व याच्या आड येऊ शकतो. (नीतिसूत्रे १६:१८; १७:१९) तेव्हा, त्याने लगेच आपली चूक मान्य केली नाही आणि पश्चात्ताप केला नाही, तरी पुढचे पाऊल उचलण्यापूर्वी तुम्ही थोडे थांबू शकता. येशूने असे म्हटले नाही, की ‘फक्त एकदा जाऊन त्याचा अपराध त्याला दाखीव.’ ही समस्या तुम्हाला हाताळता येण्यासारखी असल्यामुळे गलतीकर ६:१ येथील मनोवृत्ती बाळगून पुन्हा त्या भावाला भेटा आणि “चार डोळ्यांसमोर” झालेल्या गोष्टीची पुन्हा चर्चा करा. यावेळी कदाचित तुमच्या प्रयत्नांना यश येईल. (पडताळा यहूदा २२, २३) पण, तुम्हाला या गोष्टीची खात्री पटली आहे की त्या भावाच्या हातून पाप घडले आणि तरी तो ते मानण्यास तयार नाही अशावेळी काय करावे?
प्रौढ व्यक्तींची मदत घ्या
१२, १३. (अ) चुका हाताळताना कोणते दुसरे पाऊल उचलण्याचे येशूने सांगितले? (ब) हे पाऊल उचलताना कोणती खबरदारी घेणे योग्य आहे?
१२ तुमच्या हातून एखादे गंभीर पाप घडल्यास तुम्हाला सुधारण्याकरता इतरांनी केवळ एक दोन वेळा प्रयत्न करून सोडून द्यावे असे तुम्हाला वाटेल का? निश्चितच नाही. त्याचप्रमाणे, येशूने हे दाखवून दिले, की तुमच्या भावाला मिळवण्याकरता, देवाच्या स्वीकारहार्य उपासनेत तुमच्यासोबत आणि इतरांसोबत त्याचे ऐक्य कायम राहण्याकरता पहिले पाऊल उचलल्यानंतर तुम्ही तुमचे प्रयत्न थांबवू नयेत. येशूने दुसऱ्या पावलाविषयी सांगितले: “परंतु त्याने जर न ऐकले तर तू आणखी एका-दोघांस आपणाबरोबर घे; अशासाठी की, दोघा किंवा तिघा साक्षीदारांच्या तोंडून प्रत्येक शब्द शाबीत व्हावा.”
१३ त्याने म्हटले “दोघा किंवा तिघां” जणांना सोबत घ्या. त्याने असे म्हटले नाही, की पहिले पाऊल उचलल्यानंतर तुम्ही संबंधित समस्येविषयी बऱ्याच जणांशी बोलण्यास, प्रवासी पर्यवेक्षकांना भेटण्यास किंवा त्या समस्येविषयी इतर बांधवांना पत्र लिहून कळवण्यास मोकळे आहात. घडलेल्या पातकाची तुम्हाला खात्री पटली असेल, पण ते अद्याप पूर्णपणे शाबीत झालेले नाही. तेव्हा चुकीची माहिती पसरवू नका नाहीतर तुम्ही त्याची बदनामी केल्यासारखे होईल. (नीतिसूत्रे १६:२८; १८:८) पण येशूने असे म्हटले, की तुम्ही एका-दोघांना सोबत घेऊन जा. का? आणि ते कोण असावेत?
१४. दुसरे पाऊल उचलताना आपल्याला सोबत कोणाला घेता येईल?
१४ तुम्ही त्या भावाला मिळवण्याचा प्रयत्न करत आहात; त्याला हे पटवून देऊन, की त्याच्या हातून पाप घडले आणि त्याने त्याबद्दल पश्चात्ताप करावा ज्यामुळे तुमच्यासोबत आणि देवासोबत त्याचा शांतिमय संबंध कायम राहावा. ते साध्य करण्यासाठी घडलेल्या अपराधाकरता ‘एक-दोन’ साक्षीदार असल्यास त्यांना सोबत नेणे उत्तम राहील. तो अपराध घडला तेव्हा ते कदाचित तेथे उपस्थित असतील किंवा व्यापारामध्ये जे काही झाले (किंवा झाले नाही) याची त्यांच्याकडे साधार माहिती असेल. असे साक्षीदार नसल्यास तुम्ही संबंधित क्षेत्रातील अनुभवी बांधवांना सोबत नेऊ शकता त्यामुळे जे काही घडले ते खरोखरच चुकीचे होते किंवा नव्हते याची ते शहानिशा करू शकतील. याशिवाय, नंतर आवश्यकता भासल्यास, चर्चेदरम्यान कोण काय बोलले, कोणत्या गोष्टी त्या बांधवासमोर मांडण्यात आल्या आणि त्याला मिळवण्यासाठी कोणत्याप्रकारे, कितपत प्रयत्न केला गेला या सर्व गोष्टींचे ते साक्षीदर असतील. (गणना ३५:३०; अनुवाद १७:६) त्यामुळे ते तटस्थ मंडळी किंवा पंच नाहीत; तर त्यांच्या उपस्थितीमुळे तुमच्या आणि त्यांच्याही भावाला मिळवण्याकरता मदत होते.
१५. दुसरे पाऊल उचलताना आपण ख्रिस्ती वडिलांना सोबत घेतले तर त्यामुळे कशी मदत होईल?
१५ ज्यांना तुम्ही सोबत नेता ते एक-दोघे मंडळीतील वडीलच असले पाहिजेत असे नाही. पण मंडळीत वडील असलेल्या प्रौढ व्यक्तींना बोलावल्यास त्यांच्या आध्यात्मिक पात्रतेमुळे त्यांना तुम्हाला मदत करता येईल. वडील हे “वाऱ्यापासून आसरा व वादळापासून निवारा, . . . रुक्ष भूमीत पाण्याचे नाले, तप्त भूमीत विशाळ खडकाची छाया” असे असतात. (यशया ३२:१, २) तर्क करण्याचा तसेच आपल्या बांधवांना आणि बहिणींना सुधारणुकीचा सल्ला देण्याचा त्यांना अनुभव असतो. अपराधी व्यक्ती या ‘मनुष्यांतील देणग्यांवर’ पूर्णपणे विश्वास ठेवू शकतो.c (इफिसकर ४:८, ११, १२) अशा प्रौढ व्यक्तींच्या समक्ष चर्चा केल्यामुळे आणि त्यांच्यासोबत प्रार्थनेमध्ये सहभागी झाल्यामुळे एक निराळे वातावरण तयार होईल आणि सोडवायला कठीण वाटणारी समस्या कदाचित लवकर सुटेल.—पडताळा याकोब ५:१४, १५.
त्याला मिळवण्याचा अखेरचा प्रयत्न
१६. अपराधी व्यक्ती संबंधाने कोणते तिसरे पाऊल उचलावे असे येशूने सांगितले?
१६ दुसरे पाऊल उचलूनही समस्या सुटली नाही तर तिसरे पाऊल उचलतेवेळी मंडळीच्या पर्यवेक्षकांची निश्चितच मदत घेतली जाते. “जर त्याने [एकाचे किंवा दोघांचे] न ऐकले तर मंडळीला कळीव आणि जर त्याने मंडळीचेहि न ऐकले तर तो तुला परराष्ट्रीय किंवा जकातदार ह्यांच्यासारखा होवो.” याचा काय अर्थ होतो?
१७, १८. (अ) ‘मंडळीला कळवावे’ हे समजण्याकरता आपल्याला कोणत्या उदाहरणाने मदत होते? (ब) आज हे पाऊल आपण कसे उचलतो?
१७ येशूच्या या शब्दांचा असा अर्थ होत नाही, की त्या भावाने केलेला अपराध मंडळीच्या नेहमीच्या सभांमध्ये किंवा एखादी खास सभा घेऊन जाहीर करण्यात यावा. ही समस्या हाताळण्याकरता योग्य पद्धत कोणती ते आपल्याला देवाच्या वचनातूनच दिसून येते. प्राचीन इस्राएलमध्ये कोणी बंडखोर, खादाड किंवा मद्यपी असल्यास त्याला काय करण्यात यायचे ते पाहा: “एखाद्या मनुष्याला हट्टी आणि अनावर मुलगा असला आणि आपल्या आईबापांची आज्ञा जुमानीत नसला, आणि त्याला शासन केले तरी त्यांचे ऐकत नसला, तर त्याच्या आईबापांनी त्याला धरून बाहेर काढून गावाच्या वेशीत चावडीवर गावच्या वडिलवर्गासमोर न्यावे. आणि त्यांनी गावच्या वडिलवर्गाला सांगावे, हा आमचा मुलगा हट्टी व अनावर आहे; हा आमचे ऐकत नाही. हा खादाड व मद्यपी आहे. मग त्याच्या गावच्या सर्व पुरुषांनी त्याला दगडमार करून त्याला ठार मारावे.” (तिरपे वळण आमचे.)—अनुवाद २१:१८-२१.
१८ त्या मनुष्याची पातके संपूर्ण राष्ट्राला किंवा त्या व्यक्तीच्या वंशातील लोकांना ऐकवली जात नव्हती आणि त्यांच्याद्वारे त्याच्या पातकांचा न्याय करण्यात येत नव्हता. त्याऐवजी मंडळीचे प्रतिनिधित्व करणारा ‘वडीलवर्ग’ संबंधित बाब हाताळत असे. (पडताळा अनुवाद १९:१६, १७, ‘त्या समयीचे याजक व न्यायाधीश’ यांनी हाताळलेले एक प्रकरण.) त्याचप्रमाणे आजही, तिसरे पाऊल उचलण्याची आवश्यकता भासते तेव्हा मंडळीचे प्रतिनिधित्व करणारे वडील संबंधित बाब हाताळतात. त्यांचाही तोच हेतू असतो; शक्य असल्यास पूर्ण प्रयत्नानिशी आपल्या ख्रिस्ती भावाला मिळवणे. तसे करण्याकरता ते निष्पक्ष राहतात, मनात आधीच निर्णय घेत नाहीत, पक्षपात करत नाहीत.
१९. समस्या हाताळण्यासाठी ज्या वडिलांची मदत घेतली जाते त्यांनी कोणता प्रयत्न करावा?
१९ ते सर्व वास्तविकता चांगल्याप्रकारे पडताळून पाहतात आणि पाप खरोखरच घडले आहे का (किंवा अद्यापही घडत आहे का) हे ठरवण्याकरता साक्षीदारांचे म्हणणे लक्ष देऊन ऐकतात. त्यांची हीच इच्छा असते, की मंडळीमध्ये नीतिभ्रष्टता नसावी आणि तिच्यात जगाच्या आत्म्याचा शिरकाव होऊ नये. (१ करिंथकर २:१२; ५:७) त्यांच्या शास्त्रवचनीय पात्रतेनुरूप ते ‘उलट बोलणाऱ्यांस त्यांच्या सुशिक्षणाने बोध करतील व उलट बोलणाऱ्यांना कुंठित करतील.’ (तीत १:९) यहोवाच्या संदेष्ट्याने इस्राएलांविषयी सांगितले त्यांच्याप्रमाणे अपराधी व्यक्ती होणार नाही अशी आपण आशा करू शकतो: “मी हाक मारिली तरी तुम्ही उत्तर दिले नाही; मी बोललो तरी तुम्ही ऐकले नाही; माझ्या दृष्टीने जे वाईट ते तुम्ही केले, जे मला नापसंत ते तुम्ही पसंत केले.”—यशया ६५:१२.
२०. अपराधी व्यक्ती ऐकण्यास आणि पश्चात्ताप करण्यास तयार नसल्यास येशूने काय करण्यास सांगितले?
२० पण काही बाबतींत अपराध्यामध्ये वरील प्रकारची मनोवृत्ती दिसून येते. तसे असल्यास येशूने स्पष्ट सल्ला दिला: “तो तुला परराष्ट्रीय किंवा जकातदार ह्यांच्यासारखा होवो.” अशा व्यक्तीशी निर्दयपणे वागावे किंवा त्याला काही अपाय करावा असे प्रभू येशूने सांगितले नाही. पण अपश्चात्तापी पातक्याला मंडळीतून काढून टाकावे म्हणजेच त्याला बहिष्कृत करावे हे पौलाने अगदी स्पष्टपणे सांगितले होते. (१ करिंथकर ५:११-१३) असे केल्याने शेवटी अपराधी व्यक्तीला परत मिळवण्याचा हेतू कदाचित साध्य होईल.
२१. मंडळीतून बाहेर काढलेल्या व्यक्तीविषयी कोणती संभावना बाळगता येते?
२१ येशूने दिलेल्या उधळ्या पुत्राच्या दृष्टान्तातून अपराधी व्यक्तीला परत मिळवण्याची शक्यता दिसून येते. उधळ्या पुत्राने घर सोडून बाहेर त्याच्या मित्रमंडळीमध्ये काही काळ मजा केल्यानंतर तो ‘शुद्धीवर आला.’ (लूक १५:११-१८) पौलाने तीमथ्याला सांगितले, की काही अपराधी कालांतराने पश्चात्ताप करतील आणि ‘सैतानाच्या पाशातून सुटून शुद्धीवर येतील.’ (२ तीमथ्य २:२४-२६) आपल्याला अशी निश्चित आशा करता येईल, की अपश्चात्तापी पातक्याला मंडळीतून काढल्यानंतर त्याला—देवाच्या स्वीकृतीचा आणि निष्ठावान ख्रिस्ती लोकांच्या प्रेमळ सहवासाचा अभाव—जाणवेल आणि त्यानंतर तो शुद्धीवर येईल.
२२. बहिष्कृत भावालाही कसे परत मिळवता येईल?
२२ परराष्ट्रीय आणि जकातदार कधीच जीवनात सुधारणा करू शकत नाहीत असा येशूने कधीही विचार केला नाही. कारण मत्तय लेवीय जो एक जकातदार होता, त्याने नंतर पश्चात्ताप केला आणि प्रामाणिकपणे ‘येशूच्या मागे गेला’ आणि त्याची प्रेषित म्हणून देखील निवड करण्यात आली. (मार्क २:१५; लूक १५:१) त्यामुळे अपराधी मनुष्य ‘मंडळीचे ऐकत नसला’ आणि त्यामुळे त्याला मंडळीतून बहिष्कृत करण्यात आले तरी आपण या गोष्टीची वाट पाहू शकतो, की तो कालांतराने पश्चात्ताप व्यक्त करील आणि योग्य मार्गावर पुन्हा येईल. जेव्हा तो असे करतो तेव्हा तो मंडळीचा पुन्हा सदस्य होतो आणि त्यामुळे खऱ्या उपासनेमध्ये आपला भाऊ परत आला याचा आपल्याला आनंद झाल्याशिवाय राहणार नाही.
[तळटीपा]
a मॅक्लिनटॉक आणि स्ट्राँग यांचा सायक्लोपीडिया असे म्हणतो: “नवीन करारामध्ये ज्यांचा उल्लेख जकातदार असे करण्यात आले आहे त्यांना विश्वासघातकी किंवा धर्मत्यागी, अधार्मिक लोकांशी असलेल्या नेहमीच्या सहवासामुळे बाटलेले आणि जुलमी रोमी अधिकाऱ्यांचे हस्तक समजले जाई. पातक्यांमध्ये त्यांची गणना होत असे . . . त्यांना लोक चार हात दूरच ठेवत, सभ्य लोक त्यांच्याशी संबंध ठेवत नसत. या जकातदारांचे मित्र आणि सोबती कोण, तर त्यांच्याप्रमाणेच जातिभ्रष्ट झालेले लोक.”
b व्यापारामध्ये किंवा आर्थिक बाबतींत काही प्रमाणात फसवणूक, लबाडी किंवा दगलबाजी केल्यास अशा सर्व प्रकरणांचा येशूने उल्लेख केलेल्या अपराधांमध्ये समावेश करता येईल. मत्तय १८:१५-१७ येथील सल्ला दिल्यानंतर येशूने आपल्या मालकाचे कर्ज न फेडू शकलेल्या दासांचा (नोकरांचा) दृष्टान्त दिला, यावरून हे स्पष्ट होते.
c एका बायबल विद्वानाने असे म्हटले: “अपराधी व्यक्ती एका व्यक्तीची विशेषतः ज्याच्यासोबत त्याचे मतभेद आहेत त्याच्यापेक्षा दोघांनी किंवा तिघांनी (विशेषतः ते आदराच्या पात्र असल्यास) निदर्शनास आणून दिलेल्या गोष्टीची नोंद घेईल.”
तुम्हाला आठवते का?
◻ मत्तय १८:१५-१७ येथील तत्त्व प्राथमिकरीत्या कोणत्या प्रकारच्या पातकाला लागू होते?
◻ आपल्याला पहिले पाऊल उचलायचे असल्यास आपण काय लक्षात ठेवले पाहिजे?
◻ दुसरे पाऊल उचलताना आपल्याला कोणाची मदत होईल?
◻ तिसरे पाऊल उचलताना कोणाचा समावेश होतो आणि बहिष्कृत भावालाही आपल्याला कसे मिळवता येईल?
[१८ पानांवरील चित्र]
यहुदी लोक जकातदारांना टाळत. मत्तयाने त्याचा मार्ग सोडला आणि येशूचा अनुयायी बनला
[२० पानांवरील चित्र]
बहुतेक वेळा आपण “चार डोळ्यांसमोर” समस्या सोडवू शकतो