वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w99 ८/१ पृ. २६-३१
  • यहोवाचे मार्गदर्शन आनंदाने स्वीकारणे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यहोवाचे मार्गदर्शन आनंदाने स्वीकारणे
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • जीवनाचा दृष्टिकोन सुधारणे
  • पायनियर या नात्याने अमूल्य प्रशिक्षण
  • विदेशी सेवेसाठी स्वेच्छा
  • वॉश्‍गिंटन आणि गिलियड
  • मुख्यालयात
  • गिलियडला नियमित प्रशिक्षक म्हणून
  • विद्यार्थ्यांबरोबर काम करताना
  • माझं लक्ष भविष्याकडे
  • यशस्वी विद्यार्थी, यशस्वी मिशनरी
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • गिलियड प्रशाला आपला १०० वा वर्ग पाठवते
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
w99 ८/१ पृ. २६-३१

यहोवाचे मार्गदर्शन आनंदाने स्वीकारणे

युलिसीझ व्ही. ग्लास यांच्याद्वारे कथित

तो काहीतरी वेगळाच प्रसंग होता. पदवीधर वर्गात फक्‍त १२७ विद्यार्थी होते. पण श्रोतृगणात १,२६,३८७ आवेशी जण होते जे अनेक राष्ट्रांतून आले होते. जुलै १९, १९५३ रोजी, न्यूयॉर्क शहराच्या याँकी स्टेडियममध्ये भरलेला तो वॉचटावर बायबल स्कूल ऑफ गिलियडच्या २१ वा वर्गाचा पदवीदान समारंभ होता. पण ही माझ्या जीवनात इतकी महत्त्वाची घटना का होती? मी सुरवातीपासून सांगतो.

प्रकटीकरण १२:१-५ मध्ये वर्णन केलेल्या मशीही राज्याचा जन्म होण्याच्या दोन वर्ष आधी म्हणजे, फेब्रुवारी १७, १९१२ रोजी, विनसिन्स, इंडियाना, अमेरिका येथे माझा जन्म झाला. माझा जन्म व्हायच्या आधीच्या साली आईबाबांनी शास्त्रवचनांचा अभ्यास (इंग्रजी) नावाच्या खंडांतून बायबलचा अभ्यास करण्यास सुरवात केली होती. दर रविवारी सकाळी, बाबा त्यांतील एका पुस्तकातून सर्व कुटुंबाला वाचून दाखवायचे आणि मग त्यावर आम्ही चर्चा करायचो.

आई जे शिकत होती त्यानुसार तिनं आमच्या बालमनाला आकार दिला. आई खूप चांगली होती—खूप दयाळू, मदतीला नेहमी पुढं! आम्ही तसे चारच भावंडं, पण शेजारपाजारच्या सर्व मुलांवर आईची माया होती. ती आमच्याबरोबर वेळ घालवायची. आम्हाला बायबलमधल्या गोष्टी सांगायला, आमच्याबरोबर गाणी गायला तिला खूप आवडायचं.

पूर्ण वेळेची सेवा करणाऱ्‍या बऱ्‍याच जणांना ती आमच्या घरी बोलवायची, त्यांचा पाहुणचार करायची. त्यांचे आदरातिथ्य करायची. ते आमच्या घरी एखाददोन दिवस राहात, बहुतेकदा आमच्याच घरात सभा आणि भाषणं व्हायची. त्यांपैकी जे उदाहरणं देऊन बोलायचे, आम्हाला गोष्टी सांगायचे ते आम्हाला जास्त आवडायचे. १९१९ मध्ये, पहिलं महायुद्ध संपून एकच वर्ष झालं होतं तेव्हा एकदा आमच्या घरी आलेल्या बांधवानं खासकरून आम्हा मुलांसाठीच बोलायचं ठरवलं. त्यांनी आमच्याबरोबर अर्पण—आता ज्याला आपण समर्पण असे उचितपणे म्हणतो—याविषयाची चर्चा केली व त्याचा आपल्या जीवनावर प्रभाव कसा होतो ते समजण्यास आम्हाला मदत केली. त्या रात्री झोपायच्या आधी मी माझ्या स्वर्गीय पित्याला प्रार्थना केली की मला आमरण तुझी सेवा करायची आहे.

पण १९२२ नंतर जीवनात दुसऱ्‍या काही गोष्टींत लक्ष घातल्यामुळे माझा निश्‍चय बाजूला राहिला. आम्ही कोणत्याही एका ठिकाणी स्थायिक नव्हतो; त्यामुळे यहोवाच्या लोकांच्या मंडळीशी आमचा संपर्क तुटला. बाबा रेल्वेत कामाला असल्यामुळे घरी कधी नसायचे. आमचा बायबलचा अभ्यास अनियमित झाला. मला कमर्शियल आर्टिस्ट व्हायचं होतं म्हणून त्याप्रमाणे मी शाळेत कोर्स घेऊ लागलो आणि एका चांगल्या विद्यापीठात जाण्याची तयारी करू लागलो.

जीवनाचा दृष्टिकोन सुधारणे

सन १९३० च्या मध्यात, जग विश्‍वव्यापी युद्धाकडे वाटचाल करत होते. आम्ही ओहायोच्या क्लिवलंड येथे राहत होतो, तेव्हा आमच्या घरी यहोवाचे साक्षीदार आले. आम्ही लहान असताना जे काही शिकलो होतो त्याचा आम्ही गंभीरपणे विचार केला. माझा मोठा भाऊ, रस्सल विशेषतः गंभीर स्वभावाचा होता; त्यानेच पहिल्याने बाप्तिस्मा घेतला. मी तसा जरा उनाडच होतो; पण मग फेब्रुवारी ३, १९३६ रोजी माझाही बाप्तिस्मा झाला. यहोवाला केलेल्या समर्पणाचा काय अर्थ होतो ते मला अधिक स्पष्टपणे समजत गेलं आणि मी यहोवाचे मार्गदर्शन स्वीकारण्यास शिकू लागलो. त्याच वर्षी माझ्या दोन बहिणी कॅथरीन आणि गरट्रूड यांचाही बाप्तिस्मा झाला. आम्ही सर्व पूर्ण वेळेचे सेवक अर्थात पायनियर झालो.

पण याचा अर्थ असा नाही की आम्ही दुसरा कशाचाच विचार करत नव्हतो. माझ्या वहिणीनं मला एका अतिशय देखण्या मुलीविषयी म्हणजे ॲनविषयी सांगितलं तेव्हा मी माझे कान लगेच टवकारले; माझ्या वहिणीनं सांगितलं, की सत्य मिळाल्याच्या आनंदात ॲन जणू “हवेतच उडत” होती; ती आमच्या घरी होणाऱ्‍या सभेला येणार होती. ॲन तेव्हा एका विधी कार्यालयात सेक्रेटरी म्हणून काम करत होती व एक वर्षाच्या आत तिनं बाप्तिस्माही घेतला. माझा तसा लग्न करायचा विचार नव्हता, पण ॲन सत्यात चांगलीच स्थिर झाल्याचे दिसत होते. तिला यहोवाच्या सेवेत पूर्ण वेळ खर्च करायची इच्छा होती. “मी करू शकेन का?” असं म्हणणाऱ्‍यांपैकी ती नव्हती. उलट “मी हे काम चांगल्याप्रकारे कसं करू शकेन?” असं ती म्हणायची. आणि तिच्या बोलण्याप्रमाणे ती वागायची. तिचा हा गुण मला खूपच आवडला. शिवाय ती खूप देखणी होती, अजूनही आहे म्हणा! ती माझी पत्नी व काही काळातच पायनियर सेवेतील माझी पार्टनर झाली.

पायनियर या नात्याने अमूल्य प्रशिक्षण

चांगल्या आणि वाईट परिस्थितीत, आहे त्यात समाधानी कसं राहायचं हे आम्ही पायनियर या नात्याने शिकलो. (फिलिप्पैकर ४:११-१३) दिवस मावळतीला झुकला होता तेव्हा एकदा आमच्याकडे खायला काही नव्हतं. आणि आमच्या हातात फक्‍त पाच सेंट होते. आम्ही मटणाच्या दुकानात गेलो आणि खाटीकाला म्हटलं, “पाच सेंटचा बेलोग्ना द्याल का?” दुकानदारानं आमच्याकडे पाहिलं आणि चार स्लाईस कापून दिल्या. या चार स्लाईस नक्कीच पाच पेक्षा जास्त सेंटच्या होत्या. आम्ही घरी येऊन त्या खाल्या आणि आमचं पोट भरलं.

सेवा करताना आम्हाला होणारा कडक विरोध काही नवा नव्हता. न्यूयॉर्क मधील सायराकूझ जवळील एका गावात आम्ही रस्त्यावर हस्तपत्रिका वाटत होतो; एका खास सभेसाठी लोकांचं लक्ष वेधण्याकरता आम्ही गळ्यात पोस्टर अडकवले होते. दोन धिप्पाड माणसं माझ्याजवळ आली, त्यांनी मला धरलं आणि धक्काबुक्की केली. त्यांच्यातील एक पोलिस अधिकारी होता पण त्याने गणवेष घातला नव्हता; मी त्याला बॅच दाखवण्याची विनंती केली पण तो ऐकतच नव्हता. तेवढ्यात ब्रुकलिन बेथेलचे ग्रान्ट सूटर आमच्याजवळ आले आणि म्हणाले, की चला आपण पोलिस स्टेशनला जाऊन सोक्षमोक्ष लावू या. मग त्यांनी ब्रुकलिनमधील संस्थेच्या कार्यालयाला फोन केला; चाचणीवजा प्रकरणासाठी आधार मिळावा म्हणून त्यांनी आम्हाला त्याचदिवशी परत गळ्यात पोस्टर अडकवून हस्तपत्रिका वाटायला सांगितलं. आम्ही अपेक्षा केल्याप्रमाणे त्यांनी आम्हाला अटक केली. खोट्या आरोपाखाली आम्हाला अटक केल्याबद्दल आम्ही त्यांच्याविरुद्ध दावा दाखल करू असं त्यांना सांगितलं तेव्हा त्यांनी आम्हाला सोडून दिलं.

दुसऱ्‍या दिवशी पाळकाच्या बोलण्यावरून गुंडांची एक टोळी संमेलनाच्या ठिकाणी आली; आणि पोलिस नेमके तेव्हाच गायब. त्यांनी आपल्या हातातल्या बेसबॉलच्या बॅटी लाकडी फरशीवर जोरजोरात आपटल्या, बाकावर बसलेल्या काही श्रोत्यांना उचलून खाली फेकलं आणि हातात अमेरिकन ध्वज घेऊन व्यासपीठावर गेले आणि ओरडू लागले, “वंदन करा! वंदन करा!” त्यानंतर मग “बियर बॅरल पोल्का” गाणं गाऊ लागले. त्यांनी आमची सभा होऊच दिली नाही. “तुम्ही जगाचे नाही. मी तुम्हाला जगातून निवडले आहे, म्हणून जग तुमचा द्वेष करिते,” या येशूच्या बोलण्याचा आम्ही प्रत्यक्षात अनुभव घेत होतो.—योहान १५:१९.

त्या सभेत वॉच टावर संस्थेचे तेव्हाचे अध्यक्ष बंधू जे. एफ. रदरफोर्ड यांच्या भाषणाचे ध्वनीमुद्रण आम्ही ऐकवणार होतो. मी आणि ॲन काही दिवस त्या शहरात राहिलो आणि लोकांच्या घरी गेलो व त्यांना सांगितले, की ते घरबसल्या हे भाषण ऐकू शकतील. फक्‍त काही लोकांनीच हे स्वीकारलं.

विदेशी सेवेसाठी स्वेच्छा

कालांतराने, सेवेची अनेक दारे आमच्यासमोर उघडली. माझा भाऊ रसल आणि त्याची पत्नी डॉर्थी यांना १९४३ मध्ये गिलियड प्रशालेच्या पहिल्या वर्गाला उपस्थित राहण्याचे आमंत्रण मिळाले व त्यानंतर त्यांना क्यूबाला मिशनरी म्हणून पाठवण्यात आले. माझी बहीण कॅथरीन गिलियडच्या चौथ्या वर्गात होती. तिलाही क्यूबाची नेमणूक देण्यात आली. त्यानंतर तिला डॉमिनिकन प्रजासत्ताक आणि मग प्वेर्टोरिको येथे पाठवण्यात आले. आणि आमचं काय?

आम्ही गिलियड प्रशालेविषयी व संस्था मिशनऱ्‍यांना इतर देशांना पाठवू इच्छित आहे हे ऐकलं तेव्हा आपण जावं असं आम्हाला वाटलं. सुरवातीला आम्ही स्वतःहूनच मेक्सिकोला जायचं ठरवलं. पण नंतर विचार केला, की नको आपण थांबू या व गिलियड प्रशालेला उपस्थित राहिल्यानंतर संस्थेला आपल्याला नेमू द्यावे. यहोवा या व्यवस्थेचा उपयोग करत होता हे आम्ही समजून घेतले.

आम्हाला गिलियडच्या चौथ्या वर्गाचे आमंत्रण मिळाले. पण वर्ग सुरू व्हायच्या आधी वॉच टावर संस्थेचे तेव्हाचे अध्यक्ष, बंधू एन. एच. नॉर यांना, ॲनला लहानपणी झालेल्या पोलिओची व त्यामुळे तिला आलेल्या असमर्थतेची जाणीव झाली. ते याविषयी माझ्याबरोबर बोलले आणि आम्हाला दुसऱ्‍या देशात न पाठवणे हे आमच्यासाठी चांगलं आहे असा त्यांनी आम्हाला सल्ला दिला.

दोन वर्षांनंतर, मी संमेलनाच्या तयारीत गुंतलो असताना बंधू नॉर यांनी मला पुन्हा पाहिलं आणि विचारलं, की अजूनही आमची गिलियड प्रशालेला उपस्थित राहण्याची इच्छा आहे का? त्यांनी मला सांगितलं, की आम्हाला विदेशी नेमण्यात येणार नाही तर आमच्यासाठी दुसरं काम होतं. यास्तव, फेब्रुवारी २६, १९४७ रोजी जेव्हा नवव्या वर्गाची नोंद झाली तेव्हा त्यात आमचीही नावं होती.

गिलियडचे ते दिवस आमच्या स्मरणात अजूनही ताजे आहेत. तेथे मिळालेला आध्यात्मिक आहार अतिशय पौष्टिक होता. तेथे ज्यांच्याबरोबर ओळखी झाल्या त्याचे रुपांतर आजीवन मैत्रीत झाले. पण प्रशालेशी माझा संबंध इथेच संपुष्टात आला नाही.

वॉश्‍गिंटन आणि गिलियड

गिलियड प्रशाला तशी अद्यापही नवीनच होती. या प्रशालेची उद्दिष्टे कोणती आहेत याविषयी अमेरिकन सरकारला इतकी माहिती नसल्यामुळे त्यांनी खूप प्रश्‍न विचारले. वॉश्‍गिंटन, डी. सी. मध्ये संस्थेला एक प्रतिनिधी हवा होता. गिलियडमधून पदवीधर झाल्यानंतर आम्हाला येथेच काही महिन्यांसाठी पाठवले होते. इतर देशांतून गिलियडसाठी आमंत्रित केलेल्यांना विझा मिळण्यासाठी मदत करण्याचं आणि मिशनरी कार्यासाठी बाहेरदेशी त्यांना पाठवता यावे म्हणून कायदेशीर कागदपत्रं मिळवण्याचं माझं काम होतं. काही अधिकारी चांगले आणि सहकार्य देणारे होते. पण काही साक्षीदारांच्या अगदी विरोधात होते. कट्टर राजकीय मताच्या काहींना वाटत होते, की त्यांना जे लोक आवडत नव्हते अशांबरोबर आमचा संबंध होता.

एकदा मी एका मनुष्याच्या कार्यालयात गेलो होतो; आपण ध्वजवंदन करीत नाही किंवा युद्धात भाग घेत नाही त्यासाठी त्यानं आपली कडाडून टीका केली. त्याची बडबड करून झाल्यावर मी त्याला म्हणालो: “तुम्हाला हे माहीत असलं पाहिजे आणि तसं तुम्हाला माहीत आहेच, की यहोवाच्या साक्षीदारांचं जगातील कोणाबरोबरही युद्ध होत नाही. जगाच्या कसल्याही घडोमोडीत आम्ही भाग घेत नाही. ना युद्धात, ना राजकारणात. आम्ही पूर्णपणे तटस्थ आहोत. तुम्हाला ज्या समस्या आहेत ना, त्यांच्यावर आम्ही केव्हाच मात केली आहे; आमच्या संघटनेत एकी आहे, . . . आता तुमचं काय म्हणणं आहे? पुन्हा मागे फिरून आम्ही तुमच्या मार्गाने चालू लागायचे का?” यावर तो काहीच बोलला नाही.

सरकारी कचेरीतल्या कामांसाठी मी आठवड्यांतून दोन दिवस बाजूला ठेवले होते. याशिवाय आम्ही खास पायनियर म्हणूनही कार्य करत होतो. तेव्हा आम्हाला प्रत्येक महिन्याला १७५ तास (नंतर ते १४० झाले) सेवेत घालवावे लागायचे म्हणून आम्ही रात्री उशिरापर्यंत सेवेत असायचो. आमचा खूप छान वेळ जायचा. अख्ख्या कुटुंबांबरोबर आमचे पुष्कळ अभ्यास होते. त्यांनी चांगली प्रगतीही केली. मुलं न होऊ देण्याचं ॲन आणि मी ठरवलं होतं, पण आम्हाला फक्‍त आध्यात्मिक मुलंच नव्हे तर नातवंडं आणि पतवंडं सुद्धा आहेत. त्यांना पाहून मन सुखावतं!

नंतर, १९४८ सालच्या शेवटी शेवटी मला दुसरी एक नेमणूक मिळाली. बंधू नॉर मला म्हणाले, की रजिस्ट्रार आणि गिलियड प्रशालेतील प्रशिक्षक असलेले बंधू श्रोडर यांना दुसरे महत्त्वाचे काम असल्यामुळे मीच गरज पडेल तेव्हा गिलियड वर्गाला शिकवावे. हे ऐकून माझी पाचावर धारण बसली; मी तसाच ॲनबरोबर डिसेंबर १८ रोजी न्यूयॉर्कमधील दक्षिण लॅन्सिंग येथील गिलियडला आलो. सुरवातीला आम्ही काही आठवड्यांसाठी गिलियडमध्ये असायचो व मग वॉश्‍गिंटनला पुन्हा जायचो. पण कालांतराने वॉश्‍गिंटनपेक्षा मी गिलियडमध्येच जास्त वेळ राहू लागलो.

याच काळात, जसं मी तुम्हाला आधी सांगितलं, गिलियडच्या २१ व्या वर्गाचा पदवीदान समारंभ न्यूयॉर्कमधील याँकी स्टेडियममध्ये पार पडला. प्रशिक्षक या नात्याने मला पदवीदानाच्या कार्यक्रमात भाग मिळाला.

मुख्यालयात

फेब्रुवारी १२, १९५५ रोजी आमची नवीन नेमणूक सुरू झाली. आम्ही यहोवाच्या दृश्‍य संघटनेच्या मुख्यालयातील बेथेल परिवाराचे सदस्य बनलो. इथं आमच्यासाठी काय काम होतं? तसं पाहायला गेलं तर जे काम दिलं जाईल ते करण्याची तयारी ठेवायची होती, इतरांच्या सहकार्याने कामे करायची होती. अर्थातच, अशाप्रकारच्या कामाचा आम्हाला अनुभव होता, एवढेच की आता आम्ही जरा मोठ्या गटाचे—बेथेल परिवाराच्या मुख्यालयाचे भाग झालो होतो. यहोवाच्या मार्गदर्शनाची ही प्रचिती आहे असे समजून आम्ही ही नवी नेमणूक हसत हसत स्वीकारली.

माझं काम असं होतं ज्यामुळे प्रसार माध्यमाशी माझा जास्त संबंध असायचा. सनसनाटी बातमी छापण्यासाठी व पूर्वग्रहीत उगमांकडून माहिती मिळवण्यासाठी प्रेसने यहोवाच्या साक्षीदारांबद्दल भलतंसलतं बरच काही लिहिलं होतं. आम्ही ते सुधरवण्याचा प्रयत्न केला.

आम्हाला भरपूर काम असलं पाहिजे असं बंधू नॉर यांना वाटत असल्यामुळे मला दुसरीही कामं करावी लागत. यांपैकी काही कामांसाठी कमर्शियल आर्टिस्ट म्हणून मला मिळालेले प्रशिक्षण कामी पडले. दुसरी कामं, संस्थेचे रेडिओ स्टेशन डब्ल्यूबीबीआर (WBBR) इथं असायची. संस्थेने तयार केलेल्या चलचित्रांसंबंधी कामं होती. तसा गिलियड कोर्समधील एक विषय ईश्‍वरशासित इतिहास हा होता; पण, यहोवाच्या बहुतेक लोकांना आणि बाहेरच्या लोकांनाही आधुनिक दिवसांतील ईश्‍वरशासित संघटनेच्या इतिहासाचा सविस्तर परिचय करून देण्याचे विविध प्रकल्प हाती घेण्यात आले. गिलियड प्रशिक्षणात, भाषणे देण्यासंबंधीचे प्रशिक्षण दिले जायचे; आणि मंडळीतील बांधवांना भाषणे देण्याबद्दलच्या मूलभूत गोष्टी उपलब्ध करून देण्यासाठी पुष्कळ काम करावे लागणार होते. थोडक्यात सांगायचे तर, करण्यासारखी भरपूर कामं होती.

गिलियडला नियमित प्रशिक्षक म्हणून

सन १९६१ मध्ये, प्रवासी पर्यवेक्षक आणि शाखा मंडळाच्या येऊ घातलेल्या ट्रेनिंगमुळे गिलियड प्रशाला वॉच टावर संस्थेचं प्रमुख कार्यालय जिथं होतं म्हणजे ब्रुकलिनला हालवण्यात आली. आता पुन्हा मी वर्गात आलो होतो—या वेळेस बदली प्रशिक्षक म्हणून नव्हे तर प्रशालेचा नियमित प्रशिक्षक म्हणून. किती मोठा बहुमान! गिलियड प्रशाला ही यहोवाकडील एक देन आहे, त्याच्या संपूर्ण दृश्‍य संघटनेला लाभ पोहंचवणारी एक देन आहे असा माझा पक्का विश्‍वास झाला आहे.

ब्रुकलिनला आल्यामुळे, गिलियड प्रशालेच्या विद्यार्थ्यांना असे अनेक फायदे मिळाले जे आधीच्या वर्गांतल्या विद्यार्थ्यांना कधीच अनुभवायला मिळाले नव्हते. तिथं, बऱ्‍याच पाहुण्यांची भाषणं व्हायची, नियमन मंडळाचा अगदी जवळून सहवास लाभायचा आणि मुख्यालयातील त्या मोठ्या बेथेल परिवाराशी संगती करता येत होती. शिवाय विद्यार्थ्यांना, कार्यालयीन कामकाजांविषयी, बेथेल गृहांतील कार्यांचे आणि फॅक्ट्रीतील इतर कामांचे प्रशिक्षणही मिळाले.

इतक्या वर्षांमध्ये अनेक विद्यार्थी येऊन गेले, प्रशिक्षकही अनेक होते. प्रशालेची ठिकाणंही पुष्कळ वेळा बदलली. पण आता ते न्यूयॉर्कमधील पॅटरसन येथे एका रम्य ठिकाणी आहे.

विद्यार्थ्यांबरोबर काम करताना

या वर्गांना शिकवताना किती आनंद होतो! इथं असे तरुण लोक असतात ज्यांना या जुन्या व्यवस्थीकरणात काही करण्याची आवड नसते. ते आपले कुटुंब, आपले मित्र, आपले घर आणि आपली भाषा बोलणाऱ्‍या लोकांना सोडून आलेले असतात. वातावरण, खाणंपिणं, सगळं काही त्यांच्यासाठी नवीन असतं. आपल्याला कोणत्या देशात पाठवलं जाणार आहे हेही त्यांना माहीत नसतं, पण आपल्याला मिशनरी व्हायचं हा एकच ध्यास त्यांना असतो. अशा लोकांना आपण प्रेरित करायची गरज नसते.

मी वर्गात जायचो तेव्हा, माझा नेहमी हाच प्रयत्न असायचा की विद्यार्थी अगदी तणावमुक्‍त असावेत. कारण तणावात किंवा अस्वस्थ असताना कोणीही चांगल्याप्रकारे शिकू शकत नाही. खरं आहे की मी शिक्षक होतो, पण विद्यार्थ्यांच्या भावनांची मला जाणीव होती. मीही एकदा विद्यार्थी म्हणून त्या बाकांवर बसलो होतो. तसं विद्यार्थी हिरहिरीनं अभ्यास करायचे व गिलियडमधून पुष्कळ काही शिकायचे देखील पण त्याचवेळी त्यांनी आनंदी असलं पाहिजे असं मला वाटायचं.

त्यांना नेमणुका मिळाल्यावर, यशस्वी होण्याकरता त्यांना काही गोष्टींची आवश्‍यकता होती हे मला माहीत होतं. त्यांचा विश्‍वास दृढ हवा होता. शिवाय, त्यांनी नम्र, खूप नम्र असणं आवश्‍यक होतं. वेगवेगळ्या लोकांशी आणि परिस्थितींशी जुळवून घ्यायला, मोठ्या मनानं क्षमा करायला त्यांनी शिकलं पाहिजे. त्यांनी आपल्यात आत्म्याची फळं उत्पन्‍न केली पाहिजेत. शिवाय त्यांचं लोकांवर प्रेम असलं पाहिजे, जे काम करायला त्यांना पाठवण्यात आलं आहे त्यावर त्यांनी प्रेम केलं पाहिजे. याच गोष्टी मी गिलियडमध्ये विद्यार्थ्यांना नेहमी सांगायचा प्रयत्न करायचो.

मी आजपर्यंत किती विद्यार्थ्यांना शिकवलं आहे हे मला खरं सांगतो आठवत नाही. पण त्यांच्याबद्दल मला कसं वाटतं ते मात्र मला माहीत आहे. पाच महिने त्यांच्याबरोबर वर्गात राहिल्यानंतर नकळत त्यांच्याविषयी जिव्हाळा वाटू लागायचा. पदवीदानाच्या दिवशी त्यांना व्यासपीठावर जाऊन आपल्या पदव्या घेताना पाहायचो तेव्हा, मला माहीत असायचं की त्यांनी आपला कोर्स यशस्वीरीतीने पूर्ण केला आहे; पण त्याच वेळेस ही जाणीवही असायची, की आता लवकरच ते आपल्याला सोडून जाणार. असं वाटायचं जणू आपल्याच कुटुंबातलं कोणीतरी दूर चाललंय. या कार्यासाठी स्वतःला स्वेच्छेने वाहून घेणाऱ्‍या या तरुण मुलामुलींबद्दल कोणाला प्रेम वाटणार नाही?

अनेक वर्षांनंतर ते भेट द्यायला येतात तेव्हा सेवेत त्यांना मिळणाऱ्‍या आनंदाविषयी ते मला सांगतात; त्यांना ज्या कामाचं प्रशिक्षण मिळालं आहे ते काम ते अजूनही करत आहेत हे मला माहीत आहे. तेव्हा माझ्या भावना कशा असतील? खरं सांगतो, याच्यासारखा दुसरा आनंद नाही.

माझं लक्ष भविष्याकडे

आता माझी दृष्टी क्षीण झाली आहे व यामुळे किती त्रास होतो हे मी अनुभवतोय. गिलियड वर्गात शिकवणे आता मला जमत नाही. सुरवातीला वाईट वाटलं, पण मी माझ्या संपूर्ण जीवनात विविध परिस्थितींशी स्वतःला जुळवून घेण्यास शिकलो आहे. मी नेहमी प्रेषित पौल आणि त्याच्या ‘शरीरातला काटा’ यांचा विचार करत असतो. यातून सुटका मिळण्याकरता पौलाने तीनदा प्रार्थना केली पण प्रभूने त्याला सांगितले: “माझी कृपा तुला पुरे आहे; कारण अशक्‍तपणातच शक्‍ति पूर्णतेस येते.” (२ करिंथकर १२:७-१०) पौल तसाच जगू लागला. त्याला जर ते शक्य झाले तर मग मीही प्रयत्न करायला नको का? मी आता वर्ग चालवत नसलो तरी, प्रशालेशेजारीच माझं कार्यालय असल्यामुळे मी विद्यार्थ्यांना दररोज येताना जाताना पाहू शकतो, याचाच मला आनंद आहे. केव्हा केव्हा मी त्यांच्याशी बोलू शकतो आणि त्यांचा उत्तम आत्मा पाहून मला खूप समाधान वाटते.

भविष्यात आपल्यासाठी काय राखून आहे त्यावर विचार केल्यानं मन किती सुखावतं! भविष्यासाठी आता पाया घातला जात आहे. गिलियडचा त्यात सिंहाचा वाटा राहिला आहे. मोठ्या संकटानंतर प्रकटीकरण २०:१२ मध्ये म्हटल्याप्रमाणे पुस्तके उघडली जातील तेव्हा हजार वर्षांपर्यंत यहोवाच्या मार्गांचे आणखी विस्तृत प्रशिक्षण देण्यात येईल. (यशया ११:९) पण इतक्यावरच सर्व संपणार नाही. खरं तर ती सुरवात असेल. चिरकालादरम्यान, यहोवाबद्दल शिकण्याजोगे पुष्कळ असेल व त्याचे उद्देश जसजसे प्रकट होत राहतील तसतसे पुष्कळ कामही असेल. यहोवाने केलेली सर्व अद्‌भुत अभिवचने तो पूर्ण करील याची मला पूर्ण खात्री आहे व तेव्हा तो देईल ते मार्गदर्शन स्वीकारण्यासाठी मी तिथं राहू इच्छितो.

[२६ पानांवरील चित्र]

न्यूयॉर्कच्या याँकी स्टेडियम येथे १९५३ मध्ये गिलियड पदवीदान समारंभ

[२६ पानांवरील चित्र]

गरट्रूड, मी, कॅथरीन आणि रस्सल

[२६ पानांवरील चित्र]

अधिवेशन आयोजनेत एन. एच. नॉर (डावीकडून पहिले) आणि एम. जी. हेन्शल यांच्याबरोबर काम करताना

[२६ पानांवरील चित्र]

डब्ल्यूबीबीआर (WBBR) प्रसारण स्टुडिओत

[२९ पानांवरील चित्र]

गिलियड वर्गात

[३१ पानांवरील चित्र]

अलीकडेच ॲनबरोबर

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा