असमानता—देवाचा उद्देश?
याचे एका शब्दात उत्तर आहे, नाही. ते का आपण पाहू या.
सर्व मानवांना जीवन व आनंद लुटण्याच्या समान संधी मिळाव्यात असे देवाने उद्देशिले होते. मनुष्याच्या निर्मितीविषयी आपण वाचतो: “मग देव बोलला, आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशी सदृश असा मनुष्य आपण करू; समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी, ग्रामपशु, अवघी पृथ्वी आणि पृथ्वीवर रांगणारे सर्व प्राणी यांवर ते सत्ता चालवितील.” पृथ्वीवरील सृष्टी निर्माण करून झाल्यानंतर, “आपण केलेले सर्व फार चांगले आहे असे देवाने पाहिले.”—उत्पत्ति १:२६, ३१.
आजच्या असमानतेच्या दयनीय अवस्थेला देव “फार चांगले” असे म्हणेल का? मुळीच नाही, कारण “देव प्रीति आहे.” (१ योहान ४:८) “तो कोणाचा पक्षपात करीत नाही” आणि “त्याची कृति परिपूर्ण आहे; त्याचे सर्व मार्ग न्यायाचे आहेत, तो विश्वसनीय देव आहे; त्याच्या ठायी अनीति नाही; तो न्यायी व सरळ आहे,” असे त्याच्याविषयी म्हटले आहे. (अनुवाद १०:१७; ३२:४; पडताळा ईयोब ३४:१९.) तसेच, “देव पक्षपाती नाही, हे मला पक्के ठाऊक आहे; तर प्रत्येक राष्ट्रात जो त्याची भीति बाळगतो व ज्याची कृत्ये नैतिक आहेत तो त्याला मान्य आहे,” असा निष्कर्ष प्रेषित पेत्राने काढला.—प्रेषितांची कृत्ये १०:३४, ३५.
देव प्रेमळ, निःपक्षपाती, न्यायी, सरळ व धार्मिक असल्यामुळे, तो आनंद लुटण्याच्या बाबतीत मानवांना जन्मतःच असमान निर्माण करील का? लोकांमध्ये भेदभाव होऊ देणे व असमान व्यवस्थेत त्यांना ठेवणे हे त्याच्या व्यक्तिमत्त्वाच्या अगदीच विरोधात आहे. ‘सर्व मानव जन्मतःच स्वतंत्र असावेत, त्यांचा सन्मान आणि हक्क समान असला पाहिजे’ हा त्याचा उद्देश होता. पण आज अशी परिस्थिती नाही. का नाही?
असमानतेचे मूळ
देवाने मानवांना समान बनवले, याचा अर्थ सर्वच बाबतींत ते एकसारखे असले पाहिजेत असा त्याचा हेतू नव्हता. प्रत्येकातील कला, आवडीनिवडी आणि व्यक्तिमत्त्व यांच्यात फरक असू शकतो. प्रत्येकाचा हुद्दा, किंवा अधिकार यांत फरक असू शकतो. जसे की, स्त्री आणि पुरुष सर्वच बाबतींत समान नाहीत, पण स्त्रीला देवाने पुरुषाची “अनुरुप साहाय्यक” असे निर्माण केले आहे. (उत्पत्ति २:१८) पालक आणि मुलांच्या अधिकारात निश्चितच फरक आहे. परंतु इतका फरक असूनही सर्वांना—स्त्री, पुरुष आणि मुलांना—आनंदासाठी असलेल्या मूलभूत अपेक्षा पूर्ण करण्याकरता देवाने दिलेल्या उचित समान संधींचा फायदा घ्यायचा होता. त्या सर्वांना देवासमोर समान प्रतिष्ठा आणि दर्जा होता.
तसेच, मानवांआधी निर्माण केलेल्या देवाच्या आत्मिक पुत्रांना वेगवेगळ्या नेमणुका व जबाबदाऱ्या देण्यात आल्या होत्या. (उत्पत्ति ३:२४; १६:७-११; यशया ६:६; यहुदा ९) तरीपण, त्यांना जे देण्यात आले होते त्यातच ते सर्व, जीवन आणि आनंद यासाठी असलेल्या ईश्वरी तरतुदींचा समप्रमाणात आनंद लुटू शकत होते. अशाप्रकारे त्यांनी एका अद्भुत मार्गाने देवाच्या निःपक्षपातीपणाचे प्रतिबिंब उमटवले.
मात्र दुःखाची गोष्ट अशी की, एक आत्मिक पुत्र देवाच्या निःपक्ष व्यवस्थेवर समाधानी नव्हता. देवाने त्याला जे दिले होते त्याच्यापेक्षा जास्त त्याला हवे होते, त्याला मोठे, उच्च स्थान हवे होते. ही चुकीची इच्छा मनात जोपासत राहिल्यामुळे तो, ज्याच्याकडे एकंदर सर्वश्रेष्ठत्वाचे पद बाळगण्याचा पूर्ण अधिकार आहे त्या निर्माणकर्त्याच्या अर्थात यहोवाच्या विरुद्ध उभा राहिला. देवाच्या या बंडखोर आत्मिक पुत्राने, मानवांना जितके देण्यात आले होते त्याच्या अधिक देवाकडे मागण्यास प्रवृत्त केले. (उत्पत्ति ३:१-६; पडताळा यशया १४:१२-१४.) अशाप्रकारे, मानवांना उपभोग घेता यावा म्हणून जीवनाची व आनंदाची यहोवाने केलेली तरतूद यात काही ताळमेळच राहिला नाही. प्रकटीकरण २०:२ मध्ये “‘दियाबल,’ व ‘सैतान’” असे ज्याला म्हटले आहे तो मानवांमध्ये असमानतेचा दुष्ट चिथावणीखोर बनला.
परिस्थिती कधी बदलेल का?
याचे एका शब्दात उत्तर देता येते, होय!
पण तो बदल कोण आणील? काही मानवी नेत्यांनी प्रामाणिकपणे अनेक शतके प्रयत्न केले आहेत. परंतु त्यांना पूर्णपणे यश मिळाले नाही; यामुळे अनेक लोक असा निष्कर्ष काढतात, की मानवांतील असमानतेची समस्या सुटण्याची अपेक्षा करणे, हे बुद्धीला न पटणारे आहे. परंतु, देवाचा दृष्टिकोन अगदीच वेगळा आहे; यशया ५५:१०, ११ मध्ये तो म्हणतो: “पाऊस व बर्फ ही आकाशातून पडतात; आणि पृथ्वी भिजवून, तिला सफळ व हिरवीगार केल्यावाचून, पेरणाऱ्यास बीज, खाणाऱ्यास भाकरी दिल्यावाचून ती परत वर जात नाहीत; त्याप्रमाणे माझ्या मुखातून निघणारे वचन होईल; ते माझी इच्छा पूर्ण केल्यावाचून व ज्या कार्याकरिता मी ते पाठविले ते केल्यावाचून मजकडे विफल होऊन परत येणार नाही.”
जीवन आणि आनंद यांबद्दल सर्व मानवांना समान संधी देण्याचा आपला मूळ उद्देश आपण पूर्ण करणार आहोत असे यहोवा देवाने घोषित केल्यामुळे आपल्याला किती सांत्वन मिळते! सत्य देव या नात्याने जे वचन त्याने दिले आहे ते पूर्ण करण्याचे तो आपले कर्तव्य समजतो. आनंदाची गोष्ट म्हणजे असे करण्याची त्याच्याकडे इच्छाही आणि शक्तीही आहे. हे तो कसे साध्य करील?
याचे उत्तर आहे ते राज्य ज्यासाठी येशू ख्रिस्ताने आपल्या अनुयायांना प्रार्थना करायला शिकवली: “हे आमच्या स्वर्गातील पित्या, . . . तुझे राज्य येवो. जसे स्वर्गांत तसे पृथ्वीवरहि तुझ्या इच्छे प्रमाणे होवो.” (मत्तय ६:९, १०) होय, यहोवा आपल्या राज्याचा उपयोग करून “सर्व राज्यांचे [जे सध्या अस्तित्वात आहेत] चूर्ण करून त्यांस नष्ट करील व ते सर्वकाळ टिकेल.”—दानीएल २:४४.
या स्वर्गीय राज्यशासनाखाली, एक नवा मानवी समाज उदय पावेल. याबाबतीत, प्रेषित योहानाने प्रकटीकरण या बायबलच्या शेवटल्या पुस्तकात असे लिहिले: “मी नवे आकाश व नवी पृथ्वी ही पाहिली; पहिले आकाश व पहिली पृथ्वी ही निघून गेली.” (प्रकटीकरण २१:१) तेव्हा दारिद्र्य, आजारपण, अडाणीपणा, भेदभाव आणि इतर मानवी दुर्दशा ही असमानतेची कुरूपे नाहीशी होतील.a
एक शतकापेक्षा अधिक वर्षांपासून यहोवाचे साक्षीदार त्या राज्याकडे लोकांचे लक्ष वेधत आहेत. (मत्तय २४:१४) पुस्तकांद्वारे आणि व्यक्तिगत साहाय्याद्वारे त्यांनी, लोकांना बायबलमध्ये लिहून ठेवलेले देवाच्या उद्देशाचे ज्ञान प्राप्त करायला खूप मदत केली आहे. परंतु, त्यांच्या जगव्याप्त शैक्षणिक कार्याने लोकांना भवितव्यात समानता आणि आनंदाची केवळ आशाच दिलेली नाही तर सध्या देखील असमानतेच्या पीडेवर आळा घातल्यामुळे पुष्कळ लाभ मिळवून दिले आहेत. ते कसे ते आपण पाहू या.
[तळटीपा]
a देवाचे राज्य लवकरच सर्वांसाठी समानता कसे आणणार आहे याबद्दल विस्तृत माहितीकरता कृपया वॉच टावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट संस्थेद्वारे प्रकाशित सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान या पुस्तकातील १० आणि ११ अध्याय पाहा.
[५ पानांवरील संक्षिप्त आशय]
जीवन आणि आनंद यांबद्दल सर्व मानवांना समान संधी देण्याचा देवाचा उद्देश होता