असमानतेचा रोग
“ही सत्ये अगदी उघड आहेत की, सर्व मानवांना समान निर्माण केले आहे, निर्माणकर्त्याने त्यांना जीवन, स्वातंत्र्य आणि आनंद अनुभवणे यांसारखे काही विशिष्ट हक्क दिले आहेत जे कोणीही त्यांच्याकडून हिरावून घेऊ शकत नाही.”—सन १७७६ मध्ये संयुक्त संस्थानाने अंगीकारलेला स्वातंत्र्याचा जाहिरनामा.
“सर्व मानव जन्मतःच स्वतंत्र आहेत व त्यांना समान अधिकार आहेत.”—सन १७८९ मध्ये फ्रान्सच्या राष्ट्रीय सभेने अंगीकारलेला व्यक्ती-स्वातंत्र्याचा व नागरिकांच्या हक्कांचा जाहीरनामा.
“सर्व मानव जन्मतःच स्वतंत्र आहेत, सन्मान व अधिकार यांबाबतीत ते समान आहेत.”—सन १९४८ मध्ये संयुक्त राष्ट्राच्या महासभेने अंगीकारलेला मानवी हक्कांचा सार्वत्रिक जाहिरनामा.
यात काहीच संशय नाही. मानवांमध्ये समानतेची इच्छा सर्वत्र आहे. पण, दुःखाची गोष्ट अशी, की मानवी समानतेची कल्पना पुन्हा पुन्हा बोलून दाखवावी लागते यावरून हेच सिद्ध होते, की समानतेची भावना आतापर्यंत मानवजातीला हुलकावणी देत आली आहे.
विसावे शतक आता संपायच्या बेतात आले असताना, परिस्थिती सुधारली आहे असे कोणी ठामपणे म्हणू शकते का? आम्ही जन्मतःच स्वतंत्र आहोत असा दावा करणारे संयुक्त संस्थानातील व फ्रान्समधील नागरिक अथवा संयुक्त राष्ट्रांतील १८५ सदस्य, खरोखरच समान अधिकार उपभोगत आहेत का?
समानतेची कल्पना ही सर्व लोकांमध्ये “उघड” असली तरी, “जीवन, स्वातंत्र्य आणि आनंद अनुभवण्याचा हक्क,” सर्व लोकांसाठी एकसमान मुळीच नाही. आफ्रिकेमध्ये एका आजारी मुलाशिवाय एका डॉक्टरला इतर २,५६९ रुग्णांनाही पाहावे लागते पण तेच युरोपमध्ये एका आजारी मुलाशिवाय एका डॉक्टरला फक्त २८९ रुग्णांना पाहावे लागते, तेव्हा कोणत्या समान जीवनाच्या हक्काची भाषा आपण करतो? किंवा, भारतामध्ये एक तृतीयांश मुलांना आणि दोन तृतीयांश मुलींना शिक्षण मिळत नाही पण जपान, जर्मनी व ग्रेट ब्रिटनमध्ये जवळजवळ प्रत्येक मुलाला शिक्षणाची हमी आहे, तेव्हा कोणत्या समान स्वातंत्र्याच्या आणि आनंद अनुभवण्याच्या हक्काची भाषा आपण करतो?
दर डोई १,३८० डॉलर उत्पन्न असलेल्या मध्य अमेरिकन राष्ट्रांतील लोक, दरडोई २४,९९० डॉलर उत्पन्न असलेल्या फ्रान्समधील लोकांप्रमाणे जीवनात “सन्मान व अधिकार” यांचा उपभोग घेत आहेत का? ५६ वर्षे वयोमर्यादा असलेली एक आफ्रिकन नवजात बालिका, ७९ वर्षे वयोमर्यादा असलेल्या एका उत्तर अमेरिकन नवजात बालिकेच्या तुलनेत कोणता समान हक्क अनुभवते?
असमानतेची अनेक रुपे आहेत, आणि सर्वच रुपे अगदी कुरूप आहेत. राहणीमानाच्या दर्जातील असमानता व आरोग्याची काळजी व शिक्षण यांसंबंधीच्या संधींमधील असमानता ही यांतील काही रुपे आहेत. काहीवेळा राजकीय, वांशिक किंवा धार्मिक भेद, लोकांना त्यांचा सन्मान व स्वातंत्र्य यांपासून वंचित ठेवण्यात निर्णायक भूमिका बजावतात. समानतेची भाषा चाललेली असली तरी, आपण वास्तविकतेत असमानतेच्या जगात जगत आहोत. “सर्वत्र फैलाव किंवा मोठ्या हालअपेष्टांचे कारण” अशी ज्याची व्याख्या केली जाते ती असमानता एखाद्या रोगाप्रमाणे मानवी समाजाच्या प्रत्येक थराला जडल्याचे दिसून येते. दारिद्र्य, आजारपण, अडाणीपणा, बेरोजगारी आणि भेदभाव, या रूपांद्वारे या रोगाचे दुखणे हृदयाला पूर्ण घायाळ करते.
“सर्व मानवांना समान निर्माण करण्यात आले आहे.” किती सुखद वाटते हे ऐकायला! पण, वास्तविकतेत याच्या अगदी उलट होत असलेले पाहून किती खिन्न होतो आपण!
[Picture Credit Line on page 3]
UN PHOTO 152113/SHELLEY ROTNER