फिलिप्प—आवेशी सुवार्तिक
अनुकरणीय विश्वास असणाऱ्या अनेक स्त्री-पुरुषांविषयी शास्त्रवचनांमध्ये सांगण्यात आले आहे. पहिल्या शतकातील ख्रिस्ती मिशनरी असलेल्या फिलिप्पाचा विचार करा. तो प्रेरित नव्हता, तरी सुद्धा देवराज्याचा संदेश फैलावण्यात त्याचा मोठ्या प्रमाणात उपयोग करून घेण्यात आला. खरे तर, फिलिप्पाला “सुवार्तिक” असे म्हणण्यात आले. (प्रेषितांची कृत्ये २१:८) फिलिप्पाचा असा उल्लेख का करण्यात आला? आणि त्याच्यापासून आपण काय शिकू शकतो?
सा.यु. ३३ च्या पेन्टेकॉस्टनंतर फिलिप्पाचा उल्लेख बायबलमध्ये आढळतो. त्यावेळी हेल्लेणी यहुद्यांची इब्री लोकांविरुद्ध कुरकूर सुरू झाली होती, कारण रोजच्या शिधा वाटणीत त्यांच्या विधवांची उपेक्षा होते असे. ही समस्या सोडवण्याकरता प्रेषितांनी ‘सात प्रतिष्ठित पुरुषांना’ नेमले. यांमध्ये फिलिप्पही होता.—प्रेषितांची कृत्ये ६:१-६.
हे सात लोक “प्रतिष्ठित” होते. पंडिता रमाबाई भाषांतर म्हणते की, ही “अब्रूची माणसे” होती. होय, या लोकांची नेमणूक करण्यात आली तेव्हा व्यावहारिक वैचारिक क्षमता असलेले आध्यात्मिक व्यक्ती म्हणून लोक त्यांना ओळखत असत. ख्रिस्ती पर्यवेक्षकांचे काम करणाऱ्यांच्या बाबतीत असेच आहे. अशा लोकांची घाईगडबडीने निवड करण्यात येत नाही. (१ तीमथ्य ५:२२) त्यांच्याविषयी “बाहेरच्या लोकांनीहि चांगली साक्ष दिलेली असावी” आणि सहख्रिश्चनांना हे माहीत असावे हे लोक समजूतदार आणि निकोप मनाचे आहेत.—१ तीमथ्य ३:२, ३, ७; फिलिप्पैकर ४:५.
यरुशलेममध्ये नेमून दिलेले काम फिलिप्पाने चांगल्याप्रकारे पार पाडले हे उघड आहे. पण, त्यानंतर लगेच ख्रिस्ताच्या अनुयायांचा फार छळ होऊ लागला आणि त्यांची पांगापांग झाली. इतरांप्रमाणे फिलिप्पानेही यरुशलेम सोडले, पण त्याचे सेवाकार्य मात्र थांबले नाही. त्यानंतर लगेचच तो नवीन क्षेत्रात—शोमरोनच्या शहरात—प्रचार करण्यात गुंतला.—प्रेषितांची कृत्ये ८:१-५.
नवीन क्षेत्र खुले
येशूने त्याच्या शिष्यांविषयी असे भाकीत केले की, ते ‘यरुशलेमेत, सर्व यहुदीयात, शोमरोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत’ प्रचार करतील. (प्रेषितांची कृत्ये १:८) शोमरोनात प्रचार करण्याद्वारे फिलिप्प येशूच्या शब्दांची पूर्णता करत होता. यहुदी लोक सामान्यपणे शोमरोनी लोकांना पाण्यात पाहत असत. पण फिलिप्पाने या लोकांविषयी मनात पूर्वग्रह बाळगला नाही आणि त्याच्या या निःपक्षपातीपणामुळे त्याला आशीर्वाद मिळाला. कारण अनेक शोमरोनी लोकांनी बाप्तिस्मा घेतला. या लोकांमध्ये पूर्वी जादुटोणा करणारा शिमोन देखील होता.—प्रेषितांची कृत्ये ८:६-१३.
त्यानंतर, यहोवाच्या दूताने फिलिप्पाला यरुशलेमेपासून गज्जाकडे जाणाऱ्या ओसाड वाटेवर जाण्यास सांगितले. तेथे रथात बसलेल्या कुशी षंढाकडे त्याचे लक्ष गेले; तो रथात बसून यशयाची भविष्यवाणी मोठ्याने वाचत होता. फिलिप्प धावतच रथाकडे गेला आणि त्याने संभाषणाला सुरवात केली. हा कुशी यहुदीय मतानुसारी होता तरी त्याला देवाविषयी आणि त्याच्या शास्त्रवचनांविषयी काही ज्ञान होते. वाचत असलेली माहिती समजण्याकरता आपल्याला मदतीची गरज आहे, असे त्याने नम्रपणे फिलिप्पाला सांगितले. त्यामुळे त्याने फिलिप्पाला रथात त्याच्यासोबत बसण्याकरता बोलावले. साक्ष दिल्यानंतर ते दोघे एका पाणवठ्याजवळ आले. तेव्हा त्या कुशीने फिलिप्पाला विचारले: “मला बाप्तिस्मा घेण्यास काय हरकत आहे?” तेव्हा फिलिप्पाने त्याला लगेच बाप्तिस्मा दिला आणि तो कुशी आपल्या वाटेने हर्ष करीत निघून गेला. अशाप्रकारे या नवीन शिष्याने त्याच्या मायदेशी सुवार्तेचा प्रचार केला.—प्रेषितांची कृत्ये ८:२६-३९.
शोमरोनी लोक आणि कुशी अधिकारी यांना दिलेल्या साक्षीवरून आपण फिलिप्पाच्या सेवाकार्याविषयी काय शिकू शकतो? राष्ट्रीयत्व, वंश किंवा सामाजिक स्थान या गोष्टींच्या आधारावर आपण केव्हाही असा निष्कर्ष काढू नये, की या लोकांना सुवार्तेमध्ये रस नसेल. उलटपक्षी, आपण “सर्वांना” देवाच्या राज्याचा संदेश सांगितला पाहिजे. (१ करिंथकर ९:१९-२३) सर्व लोकांना प्रचार करण्यास आपण तयार असल्यास या दुष्ट व्यवस्थीकरणाचा नाश होण्याआधी ‘सर्व राष्ट्रांतील लोकांना शिष्य करण्याकरता’ यहोवा आपला उपयोग करून घेऊ शकतो.—मत्तय २८:१९, २०.
फिलिप्पाचे नंतरचे विशेषाधिकार
कुशी अधिकाऱ्याला प्रचार केल्यानंतर त्याने अजोत नगरात साक्ष दिली “आणि कैसरीया येथे येईपर्यंत त्याला वाटेत जी जी गावे लागली त्यातून जाताना त्याने सुवार्ता सांगितली.” (प्रेषितांची कृत्ये ८:४०) पहिल्या शतकात या दोन शहरांमध्ये विदेशी लोकांची संख्या खूप होती. कैसरीयाच्या दक्षिणेकडे जात असताना फिलिप्पाने लोद आणि यापो यांसारख्या यहुद्यांच्या प्रमुख ठिकाणी प्रचार केला असावा. कदाचित त्याच्या या प्रचारामुळेच नंतर या ठिकाणी शिष्य तयार झाले असावेत.—प्रेषितांची कृत्ये ९:३२-४३.
फिलिप्पाविषयीचा शेवटचा उल्लेख सुमारे २० वर्षांनंतर येतो. पौल त्याच्या तिसऱ्या मिशनरी प्रवासाच्यावेळी जलप्रवास संपवून प्तलमैसास येतो. पौलासोबत प्रवास करणारा त्याचा साथीदार लूक असे म्हणतो: “मग दुसऱ्या दिवशी आम्ही निघून कैसरीयास आलो आणि सुवार्तिक फिलिप्प ह्याच्या घरी जाऊन उतरलो.” त्यावेळी फिलिप्पाला “चार अविवाहित मुली होत्या. त्या ईश्वरी संदेश देत असत.”—प्रेषितांची कृत्ये २१:८, ९.
यावरून फिलिप्प कैसरीयामध्ये कायमचे वास्तव्य करून राहिला असावा असे स्पष्ट होते. पण त्याचा मिशनरी आवेश मात्र कमी झाला नाही कारण लूकाने त्याला “सुवार्तिक” असे म्हटले. सुवार्तिक, या शब्दावरून हे सूचित होते, की काम न झालेल्या ठिकाणी सुवार्तेचा प्रचार करण्याकरता स्वतःचे घर सोडणारी व्यक्ती. देवाचा संदेश सांगणाऱ्या चार मुली फिलिप्पाला होत्या यावरून हे दिसून येते, की या मुलींनी त्यांच्या आवेशी वडिलांचे अनुकरण केले होते.
आजच्या दिवसांतील पालकांनी हे लक्षात ठेवण्यास हवे, की त्यांची मुले ही सर्वात महत्त्वाचे शिष्य आहेत. कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे अशा पालकांना काही ईश्वरशासित विशेषाधिकार गमवावे लागले तरी, फिलिप्पाप्रमाणे ते देवाची सेवा पूर्ण अंतःकरणाने करू शकतात आणि उदाहरणीय पालक होऊ शकतात.—इफिसकर ६:४.
पौलाने आणि त्याच्या साथीदाराने फिलिप्पाच्या कुटुंबाला भेट दिली तेव्हा त्यांचे आदरातिथ्य करण्याची एक चांगली संधी त्याला मिळाली. त्यावेळी त्यांना एकमेकांना किती उत्तेजन मिळाले असेल! कदाचित याच प्रसंगी लूकाने फिलिप्पाने केलेल्या कार्याची सविस्तर माहिती गोळा केली असावी आणि नंतर ती प्रेषितांची कृत्ये या पुस्तकाच्या ६ व्या आणि ८ व्या अध्यायात नमूद केली असावी.
राज्य आस्थांना बढावा देण्याकरता यहोवा देवाने फिलिप्पाचा मोठ्या प्रमाणात उपयोग करून घेतला. फिलिप्पाच्या आवेशामुळे तो नवनवीन क्षेत्रांत सुवार्तेचा प्रचार करू शकला आणि घरात आध्यात्मिक वातावरण तयार करू शकला. तुम्हालाही अशाचप्रकारचे विशेषाधिकार आणि आशीर्वाद हवे आहेत का? तर मग, सुवार्तिक फिलिप्पाने दाखवलेल्या गुणांचे अनुकरण करण्याची तुम्हाला आवश्यकता आहे.