वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w99 ७/१५ पृ. २६-२८
  • नामिबियातील जिवंत रत्ने!

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • नामिबियातील जिवंत रत्ने!
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • उपशिर्षक
  • आध्यात्मिक खाणकामाची सुरवात
  • पूर्ण वेळेच्या सेवकांचे आगमन
  • रत्नांचे सौंदर्य खुलवणे
  • आध्यात्मिक खाणकाम करणाऱ्‍यांची गरज
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
w99 ७/१५ पृ. २६-२८

नामिबियातील जिवंत रत्ने!

नामिबिया. आफ्रिकेच्या नैर्ऋत्य तटावर १,५०० किलोमीटरचा विस्तार असलेला देश. देशाच्या किनारपट्टीवर वालुकामय टेकड्या, खडकाळ डोंगर आणि बारीक खडीचे विस्तारित प्रदेश आहेत. पण नामिबियाच्या दगडाळ समुद्रकिनाऱ्‍यांवर फक्‍त गारगोट्याच नाहीत, तर निरनिराळ्या रंगांची रत्नेही सापडतात. कधी कधी तर चक्क हिरेसुद्धा. पण या रत्नांपेक्षा मौल्यवान असे काहीतरी या देशात आहे. जिवंत रत्ने, अर्थात नामिबियात राहणाऱ्‍या विविध राष्ट्रीय गटांचे लोक.

नामिबियाचे मूळ रहिवाशी खोसियन या मुख्य भाषेच्या विविध पोटभाषांत बोलत. त्यांच्या भाषेचे वैशिष्ट्य म्हणजे यांतील क्लिक ध्वनी. आज खोसियन भाषा बोलणाऱ्‍यांमध्ये कृष्णवर्णीय दमारा, किरकोळ शरीरयष्टीचे श्‍वेतवर्णीय नामा आणि पट्टीचे शिकारी असणारे सुप्रसिद्ध बुशमन यांसारख्या जमातींचा समावेश आहे. अलीकडील शतकांत बऱ्‍याच कृष्णवर्णीय जमाती देखील नामिबियात येऊन वसल्या आहेत. या जमाती तीन मुख्य राष्ट्रीय गटांत मोडतात: ओव्हॅम्बो (नामिबियातील सर्वात मोठा वांशिक गट), हेरेरो आणि कव्हांगो. युरोपीयन लोक १९ व्या शतकापासून नामिबियात स्थायिक होऊ लागले. शिवाय, येथील वाळवंटांत हिरे सापडले त्यानंतर आणखी बरेच लोक देशांतर करून इथे स्थिरावले.

नामिबियाचे लोक मौल्यवान आहेत कारण मानवजातीच्या ज्या जगासाठी देवाने आपला पुत्र देऊन सार्वकालिक जीवनाचा मार्ग मोकळा केला, त्या जगाचा तेही एक भाग आहेत. (योहान ३:१६) कितीतरी जमातींच्या शेकडो नामिबियन लोकांनी तारणाचा संदेश स्वीकारला आहे. हे लोक जिवंत रत्नांसारखे आहेत कारण आज यहोवाच्या उपासना मंदिरात एकत्रित केले जात असलेल्या ‘सर्व राष्ट्रांतील निवडक वस्तूंपैकी’ ते आहेत.—हाग्गय २:७.

आध्यात्मिक खाणकामाची सुरवात

नामिबियातील आध्यात्मिक रत्ने शोधून काढण्याचे काम १९२८ साली सुरू करण्यात आले. त्या वर्षी वॉचटावर संस्थेच्या दक्षिण आफ्रिकेतील शाखेने या देशात विविध ठिकाणी राहणाऱ्‍या लोकांना ५०,००० बायबल आधारित पुस्तके पाठवली. ज्यांनी आस्था दाखवली त्यांना आणखी मदत देण्यासाठी, पुढच्या वर्षी दक्षिण आफ्रिकेतील एक अभिषिक्‍त ख्रिस्ती, लीनी थेरॉन या नामिबियात आल्या. चार महिने त्या एकट्याच सबंध देशभर फिरल्या आणि आफ्रिकान्स, इंग्रजी व जर्मन भाषेची ६,००० बायबल अभ्यास सहायक पुस्तके त्यांनी वितरीत केली. हे प्रयत्न व्यर्थ गेले नाहीत.

खाणीत काम करणाऱ्‍या बर्नहार्ड बाडे नावाच्या जर्मन माणसाचेच उदाहरण घ्या. तो एका शेतकऱ्‍याकडून अंडी विकत घ्यायचा. १९२९ साली, नेहमीप्रमाणे अंडी मिळाली तेव्हा प्रत्येक अंडे वॉचटावर संस्थेच्या एका पुस्तकाच्या पानात बांधलेले त्याला दिसले. बर्नहार्डने प्रत्येक पान मोठ्या उत्सुकतेने वाचले. या पुस्तकाचा लेखक कोण असावा, असा तो विचार करू लागला. मग त्याने शेवटचे पान वाचायला घेतले तेव्हा त्याला जर्मनीतल्या वॉचटावर संस्थेचा पत्ता मिळाला. बर्नहार्डने आणखी पुस्तके मागवली आणि तो सत्य स्वीकारणारा पहिला नामिबियन झाला.

पूर्ण वेळेच्या सेवकांचे आगमन

वॉचटावर बायबल गिलियड प्रशालेचे चार पदवीधर मिशनरी १९५० साली नामिबियात आले. १९५३ सालापर्यंत एकूण आठ मिशनरी आले होते. यांत डिक आणि कॉरली वॉल्ड्रन हे ऑस्ट्रेलियन जोडपेही होते; विशेष म्हणजे, आजही ते नामिबियातच विश्‍वासूपणे सेवा करत आहेत. दक्षिण आफ्रिका आणि इतर देशांतून आलेल्या आणखी बऱ्‍याच राज्य उद्‌घोषकांचा नामिबियातील आध्यात्मिक रत्ने शोधून काढण्याच्या कार्यात वाटा आहे. इतर मिशनऱ्‍यांना, तसेच सेवा प्रशिक्षण प्रशालेच्या (मिनिस्टीरियल ट्रेनिंग स्कूल) पदवीधरांनाही नामिबियात पाठवण्यात आले.

नामिबियात आध्यात्मिक वाढ होण्याचे आणखी एक कारण म्हणजे हेरेरो, क्वांगाली, क्वानयामा, नामा/दमारा आणि डाँगा यांसारख्या प्रमुख स्थानिक भाषांत बायबल आधारित छापील साहित्याचा अनुवाद आणि प्रकाशन. १९९० साली राजधानी विन्टहुक येथे पूर्णवेळेच्या स्वयंसेवी कार्यकर्त्यांसाठी आवासाची सोय असणारे प्रशस्त भाषांतर केंद्र निर्माण करण्यात आले आणि अजूनही तेथे भाषांतराचे काम चालते. नामिबियात बऱ्‍याच ठिकाणी आपल्या पतीसोबत पूर्ण वेळेचे सुवार्तिक कार्य करणाऱ्‍या कॅरन डेपिश सांगतात, की “आम्ही लोकांना त्यांच्या स्वतःच्या मातृभाषेत पुस्तकं देतो, तेव्हा त्यांना आश्‍चर्य वाटतं कारण त्या भाषेत कोणत्याही विषयांवर अगदी बोटांवर मोजण्याइतकीच पुस्तकं उपलब्ध असतात.”

रत्नांचे सौंदर्य खुलवणे

हजारो वर्षे समुद्राच्या लाटांत आणि वाळूत खेळल्यामुळे नामिबियाच्या खऱ्‍याखुऱ्‍या मौल्यवान दगडांचा खरबडीतपणा निघून जातो आणि त्यांची सुंदर रत्ने तयार होतात. पण ही नैसर्गिक प्रक्रिया जिवंत रत्नांच्या बाबतीत होत नसते. अपरिपूर्ण मानवाला स्वतःतील ‘जुन्या मनुष्याचा’ त्याग करून ख्रिस्तसदृश व्यक्‍तिमत्त्व धारण करण्यासाठी स्वतः प्रयत्न करावे लागतात. (इफिसकर ४:२०-२४) उदाहरणार्थ, नामिबियाच्या अनेक जमातींत मृत वाडवडिलांची पूजा करण्याचा रिवाज अतिशय प्रचलित आहे. जे लोक पूर्वज पूजेचे विधी पार पाडत नाहीत अशांना त्यांचे कुटुंबीय आणि शेजारपाजारचे लोक अक्षरशः छळतात. “मृतास तर काहीच कळत नाही,” हे ज्याला बायबलमधून कळून येते, त्याला फार कठीण जाते. (उपदेशक ९:५) कोणत्या प्रकारे?

एक हेरेरो साक्षीदार याचा खुलासा करून सांगतो: “सत्याला धरून राहणे हे एक आव्हानच होते. यहोवाच्या साक्षीदारांसोबत मी अभ्यास तर सुरू केला, पण शिकलेल्या गोष्टींप्रमाणे वागायला बराच वेळ लागला. मला याची खात्री करून घ्यायची होती की रूढीपरंपरांनुसार वागलो नाही तरी मला काही अपाय होणार नाही. उदाहरणार्थ, नामिबियाच्या विशिष्ट भागांतून गाडीतून जाताना मी कबरेवर दगड न ठेवता किंवा मृत व्यक्‍तीला अभिवादन म्हणून आपली हॅट न काढता पुढे निघून जायचो. हळूहळू माझी खात्री पटली की मृत वाडवडिलांची उपासना केली नाही तरीसुद्धा मला कोणताही अपाय होणार नाही. यहोवाच्या मदतीने मी माझ्या कुटुंबीयांना आणि इतर आस्थेवाईकांनाही सत्य शिकण्यात मदत करू शकलो याचा मला अतिशय आनंद वाटतो!”

आध्यात्मिक खाणकाम करणाऱ्‍यांची गरज

नामिबियात १९५० साली मिशनरी आले, त्यापूर्वी इथे फक्‍त एकच प्रचारक होता. पण त्यानंतर प्रचारकांची संख्या वाढतच गेली, ती ९९५ च्या उच्चांकापर्यंत. अर्थात बरेच कार्य अजूनही शिल्लक आहे. किंबहुना, काही ठिकाणी तर कार्य सुरू देखील केलेले नाही. आवेशी राज्य उद्‌घोषकांची जेथे अतिशय गरज आहे अशा ठिकाणी जाऊन सेवा करणे तुम्हाला शक्य आहे का? मग इकडे नामिबियात येऊन आणखी आध्यात्मिक रत्ने शोधून काढण्यात आम्हाला साहाय्य करा.—पडताळा प्रेषितांची कृत्ये १६:९.

[२६ पानांवरील नकाशा/चित्रं]

(For fully formatted text, see publication)

आफ्रिका

नामिबिया

[चित्रं]

अप्रतिम रत्नांचे माहेरघर, नामिबिया

[चित्राचे श्रेय]

नकाशे: Mountain High Maps® Copyright © 1997 Digital Wisdom, Inc.; हिरे: Courtesy Namdek Diamond Corporation

[२६ पानांवरील चित्र]

राज्याच्या सुवार्तेचा प्रचार नामिबियाच्या सर्व वांशिक गटांत केला जात आहे

[२८ पानांवरील चित्र]

राज्य उद्‌घोषकांची अधिक गरज आहे अशा ठिकाणी जाऊन सेवा करणे तुम्हाला शक्य आहे का?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा