हितकारक दळणवळण—यशस्वी विवाहाची गुरुकिल्ली
रॉबर्ट बॅरन यांनी १७७८ मध्ये, दुहेरी कार्याचे एक अटक कुलूप तयार केले; याच आधारावर आज चावीची कुलपे बनवली जातात. त्या कुलपाचे वैशिष्ट्य असे होते, की कुलपातील दोन अटक एकत्र उचलण्याकरता फक्त एकाच चावीचा वापर करावा लागत असे.
तसेच, पती व पत्नी यांनी एकतेत कार्य करण्यावरच विवाहाची यशस्विता अवलंबून आहे. एखाद्याला यशस्वी विवाहाचा मौल्यवान आनंद अनुभवायचा असेल तर त्यासाठी हितकारक दळणवळणाची आवश्यकता आहे.
हितकारक दळणवळणात काय गोवले आहे
हितकारक दळणवळणात काय गोवले आहे? दळणवळणाची व्याख्या एका शब्दकोशानुसार अशाप्रकारे करण्यात आली आहे, “बोलण्याद्वारे, लिहिण्याद्वारे किंवा हावभावाद्वारे विचार, मत किंवा माहिती कळणे किंवा कळवणे.” तेव्हा, दळणवळणात भावना व कल्पना यांची देवाणघेवाण गोवली आहे. आणि हितकारक दळणवळणात उभारणीकारक, तजेला देणाऱ्या, सद्गुणी, प्रशंसनीय व सांत्वनदायक गोष्टींचा समावेश असणे आवश्यक आहे.—इफिसकर ४:२९-३२; फिलिप्पैकर ४:८.
भरवसा, विश्वास आणि एकमेकांबद्दलचा समजूतदारपणा यांनीच हितकारक दळणवळण शक्य होते. हे गुण तेव्हा पाहायला मिळतात जेव्हा विवाह हा आजीवनाचा नातेसंबंध आहे असे समजले जाते आणि तो नातेसंबंध टिकवून ठेवायचा असतो तेव्हा प्रामाणिक दृढनिश्चय केला जातो. अशा नातेसंबंधावर विवेचन मांडताना १८ व्या शतकातील निबंधकार जोसफ ॲडीसन यांनी लिहिले: “एकमेकांचे सांत्वन व मनोरंजन व्हावे ह्या हेतूने जेव्हा दोन व्यक्ती एकमेकांना सर्व लोकांमधून पसंत करतात तेव्हा त्यांनी आपल्या जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत एकमेकांच्या चुकांच्या बाबतीत आणि परिपूर्णतांच्या बाबतीत विनोदी, मनमिळाऊ, सुज्ञ, क्षमाशील, सहनशील व आनंदी होण्याचा निश्चय केलेला असतो.” किती आनंदविणारा हा संयोग! रत्नांसारखे हे गुण तुमच्या विवाहाला सुशोभित करू शकतात कारण हितकारक दळणवळणाद्वारे हे गुण तुमच्यात येऊ शकतात.
हितकारक दळणवळणातील अडथळे
पुष्कळ लोक विवाहाकडे आशावादाच्या दृष्टीने पाहतात; त्यांना वाटते की विवाह म्हणजे केवळ मौजमजा. परंतु बहुतेकांचा हा अत्यानंद मग वाफेसारखा उडून जातो आणि आशावाद नाहीसा होतो. आत्मविश्वासाची जागा, राग, मत्सर, वैरभाव आणि तीव्र नापसंती हे घेतात. अशावेळी विवाह, “जिवंत आहोत तोपर्यंत” जीवन जगायचे म्हणून जगायचे असा होतो. यास्तव, यशस्वी विवाहासाठी आवश्यक असलेल्या हितकारक दळणवळणात सुधार करायचा असेल किंवा तो टिकवून ठेवायचा असेल तर विशिष्ट अडचणींवर मात करावी लागेल.
विशिष्ट गोष्ट सांगितल्यावर किंवा इच्छा व्यक्त केल्यावर विवाह सोबत्याची प्रतिक्रिया काय असेल ही भीती हितकारक दळणवळणातील एक खरी अडचण असू शकते. उदाहरणार्थ, आपल्याला अपंगत्व येत आहे असे सोबत्याला कळते तेव्हा पती किंवा पत्नी कदाचित आपल्याला झिडकारेल अशी भीती त्याच्या मनात येऊ शकेल. तुम्हाला घ्याव्या लागणाऱ्या एखाद्या उपचारामुळे तुमच्या दिसण्यात किंवा तुम्ही ज्याप्रकारे काम करता त्यात खूप बदल होतील हे तुम्ही तुमच्या सोबत्याला कसे काय सांगाल? अशावेळी, प्रामाणिक दळणवळण व भवितव्यासाठी विचारपूर्वक योजना यांची अधिक आवश्यकता असते. शब्दांमधून व्यक्त होणारे तुमचे प्रेम आणि तुमची दयाळू कार्ये यांतून व्यक्तिगत ओढ दिसून येईल ज्यामुळे तुमचा विवाह खरोखरच समाधानकारक ठरेल. विवाहामध्येच तुम्हाला पुढील नीतिसूत्र किती खरे आहे हे दिसून आले पाहिजे: “मित्र सर्व प्रसंगी प्रेम करितो, आणि विपत्कालासाठी तो बंधु म्हणून निर्माण झालेला असतो.”—नीतिसूत्रे १७:१७.
संताप ही हितकारक दळणवळणातील दुसरी अडचण आहे. दोन क्षमाशील व्यक्तींचा संयोग म्हणजे यशस्वी विवाह असे उचितपणे म्हटले जाते. हे वर्णन स्वतःला लागू करायचे आहे तर एक विवाहित जोडपे, “तुम्ही रागात असताना सूर्य मावळू नये,” हा प्रेषित पौलाचा व्यावहारिक सल्ला अनुसरण्याचा कसोशीने प्रयत्न करील. (इफिसकर ४:२६) राग किंवा संताप मनात बाळगण्याऐवजी हा सल्ला अनुसरण्याकरता नम्रपणे दळणवळण करणे जरूरीचे आहे. यशस्वी विवाहातील सोबती, क्रोध, भांडणतंटे यांना नेहमीच बळी पडत नाहीत व मनात राग धरत नाही. (नीतिसूत्रे ३०:३३) राग न धरणाऱ्या देवाचे ते अनुकरण करण्याचा प्रयत्न करत असतात. (यिर्मया ३:१२) होय, ते पूर्ण मनाने एकमेकांना क्षमा करतात.—मत्तय १८:३५.
मौन बाळगणे ही कोणत्याही प्रकारच्या दळणवळणासाठी एक निश्चित अडसर ठरू शकते. यामध्ये, काही न बोलणे, मोठ्याने उसासे टाकणे, रोबोट सारख्या हालचाली करणे, आणि फक्त एकच जण बोलत राहणे, हे सर्व येते. अशाप्रकारे वागणाऱ्या वैवाहिक सोबत्याच्या मनात कसलीतरी नाराजी असते. परंतु, शांत राहिल्याने व मौन बाळगल्याने नव्हे तर व्यक्तिगत भावना मोकळेपणाने व मैत्रीपूर्णरीतीने बोलून दाखवल्याने विवाहात सुधारणा होऊ शकते.
विवाहातील चांगल्या दळणवळणासाठी आणखी एक अडखळण ज्याच्यावर मात केली पाहिजे ते आहे, एखादा सोबती काय बोलतोय त्याच्याकडे योग्यरीतीने लक्ष न देणे किंवा पूर्णपणे दुर्लक्ष करणे. आपण कदाचित खूप थकलेलो असतो किंवा एकमेकांचे काळजीपूर्वक ऐकायला मानसिकरीत्या व भावनिकरीत्या तयार नसतो. अमुक गोष्ट आपण पहिल्यांदाच ऐकतोय अशी एक सोबती री ओढत असेल तर दुसऱ्या सोबत्याला वाटेल, नाही, आपण तर बरोबर बोललो होतो; अशा गैरसमजेच्या वेळी वादावादीचा उद्रेक होऊ शकतो. अशा परिस्थितीत योग्य दळणवळण नाही हे अगदी स्पष्ट दिसून येते.
हितकारक दळणवळण कसे वाढवावे
प्रेमळ, हितकारक दळणवळणासाठी वेळ काढणे किती महत्त्वाचे आहे! काही जण टीव्हीवर इतरांच्या जीवनात काय चाललंय ते तास न् तास पाहत बसतात पण स्वतःच्या जीवनाकडे पाहायला त्यांना मुळीच वेळ नसतो. हितकारक दळणवळण हवे आहे तर टीव्ही बंद करण्याचे सर्वात आवश्यक पाऊल उचलले पाहिजे.
बोलण्याचा जसा उचित समय असतो तसा शांत राहण्याचाही समय असतो. एका सुज्ञ मनुष्याने म्हटले: “सर्वांचा काही उचित काळ म्हणून असतो; . . . मौन धरण्याचा समय व बोलण्याचा समय असतो.” अर्थातच, बोलण्यासाठी उचित शब्दही आहेत. “समयोचित बोल किती उत्तम!” असे एक नीतिसूत्र म्हणते. (उपदेशक ३:१, ७; नीतिसूत्रे १५:२३) तेव्हा, मुख्य मुद्दा केव्हा बोलायचा किंवा तुमच्या मनातील गोष्ट कोणत्या उचित प्रसंगी बोलायची हे तुम्ही ठरवा. स्वतःला विचारा: ‘माझा सोबती थकला आहे की आरामात व प्रसन्न मनःस्थितीत आहे? मी ज्या विषयावर बोलणार आहे त्याने कदाचित वाद होण्याची शक्यता आहे का? या विषयावर आम्ही मागे बोललो होतो तेव्हा, माझ्या कोणत्या शब्दांचा माझ्या सोबत्याला राग आला होता?’
लोक जेव्हा, एखादी विनंती स्वीकारल्याने किंवा त्यानुसार वागल्याने त्यांना लाभ कसा होतो हे पाहतात तेव्हा त्यांची प्रतिक्रिया चांगली असते हे लक्षात ठेवणे चांगले आहे. दोन सोबत्यांमध्ये जेव्हा तणाव निर्माण होतो तेव्हा एक सोबती असे म्हणू शकतो, “कोणती तरी गोष्ट माझ्या मनाला लागत आहे; आपण ती आत्ताच सुधारू या!” अर्थातच, परिस्थितीनुसार तुम्ही वरीलप्रमाणे म्हणू शकता; पण असेही म्हणणे उचित असेल, “अगं/अहो, आपण पूर्वी ज्यावर बोललो होतो त्या गोष्टीचा आणि आपण ती कशी सुधारू शकतो यावर मी विचार करत होतो/होते.” तुमचा सोबती वरील दोन्हींपैकी कोणत्या प्रस्तावाची कदर बाळगण्याची अधिक शक्यता आहे?
होय, तुम्ही जे काही बोलता ते कसे बोलता हे महत्त्वाचे आहे. प्रेषित पौलाने लिहिले: “तुमचे बोलणे सर्वदा कृपायुक्त, मिठाने रूचकर केल्यासारखे असावे.” (कलस्सैकर ४:६) बोलताना तुमचा आवाज आणि तुम्ही जे बोलता ते कृपायुक्त असण्याचा प्रयत्न करा. नेहमी लक्षात ठेवा, की “ममतेची वचने मधाच्या पोळ्यासारखी मनाला गोड व हाडांस आरोग्य देणारी आहेत.”—नीतिसूत्रे १६:२४.
काही जोडप्यांना घरामध्ये एकत्र काम केल्यामुळे दळणवळणाची चांगली संधी मिळते. हितकारक संभाषणासाठी वेळ काढताना अशाप्रकारच्या सहकार्यामुळे देण्याची जाणीव वाढू शकते. तर काही विवाहित सोबत्यांना कामाऐवजी एखाद्या निवांत वेळी एकांतात राहणे चांगले असेल व अशी वेळ हितकारक दळणवळणासाठी खूप उपयुक्त आहे.
अनुरूप विवाहित सोबती एकमेकांबरोबर दळणवळण कसे करतात ते पाहूनही पुष्कळ काही शिकता येते. ते असे कशामुळे बनलेत? कदाचित त्यांच्या व्यक्तिगत प्रयत्नांमुळे, धीरामुळे व प्रेमळ विचारामुळे त्यांच्यात ऐक्य आहे व ते इतक्या सहजपणे एकमेकांबरोबर दळणवळण करतात. त्यांना स्वतःला पुष्कळ काही शिकावे लागले असेल यात काही शंका नाही, कारण विवाह आपोआप यशस्वी होत नसतात. तेव्हा, तुमच्या सोबत्याच्या मताचा विचार करणे, तिच्या किंवा त्याच्या गरजा समजणे व सुज्ञपणे बोलण्याद्वारे संभाव्य तणावग्रस्त परिस्थिती टाळणे किती महत्त्वाचे आहे. (नीतिसूत्रे १६:२३) तुम्ही विवाहित असाल तर जगणे सुखकारक बनवण्याचा व सहजपणे क्षमा मागता येईल असे होण्याचा प्रयत्न करा. अशाने तुमचा विवाह निश्चितच यशस्वी होईल.
यहोवा देवाची इच्छा आहे की लोकांनी सुखी असावे, त्यांचा विवाह टिकून राहावा. (उत्पत्ति २:१८, २१) पण ज्यांचा विवाह झाला आहे त्यांच्या हातात त्याची गुरूकिल्ली आहे. एकत्र मिळून कार्य करणाऱ्या दोन प्रेमळ व्यक्तींनाच हितकारक दळणवळणाच्या कौशल्यावर प्रभुत्व मिळवण्याद्वारे यशस्वी विवाहाचे दार उघडता येते.
[२२ पानांवरील चित्र]
टीव्ही बंद ठेवल्याने जास्त दळणवळण करता येते
[२३ पानांवरील चित्र]
हितकारक दळणवळण दोन हृदयांना आजीवन प्रीतीत गुंफण्यास मदत करते