अठराविश्वे दारिद्र्यापासून गडगंज संपत्तीपर्यंत
मॅनवेल डी झीझुस अल्मेडा यांच्याद्वारा कथित
सन १९१६ च्या ऑक्टोबरमध्ये मी जगात प्रवेश केला; मी १७ मुलांपैकी सर्वात धाकटा होतो. माझ्यापेक्षा मोठे असलेल्या माझ्या नऊ भाऊबहिणींना मी कधीच पाहिलं नाही कारण ते आजारपणामुळे व कुपोषणामुळे मरण पावले होते. बाकी आम्ही आठ जण आईबाबांबरोबर पोर्तुगाल, पोर्टोजवळ एका गावात राहात होतो.
आमचं लहानसं घर म्हणजे पुढं एक खोली आणि एक झोपायची खोली. अर्धा किलोमीटर दूर असलेल्या एका विहिरीवरून प्यायचं पाणी आणावं लागायचं. आणि आमची स्वयंपाकाची खोली अगदी जुन्या पद्धतीचं.
माझे मोठे भाऊ करतेसवरते झाल्यापासून त्यांनी मक्याच्या शेतात काम करायला सुरवात केली. त्यांनी कमवून आणलेल्या पैशात कुटुंबाचं पोट थोडंफार भरत होतं. त्यांच्यामुळे फक्त मलाच थोडीफार शाळा शिकायला मिळाली. तसं पाहायला गेलं तर आमची परिस्थिती हालाखीची होती पण कॅथलिक चर्चशी मात्र आम्ही खूप विश्वासू होतो, या आशेनं की यानं तरी आमचं जीवन सुधारेल.
मे महिन्यात, चर्च ज्याला नोवीना म्हणते तो असायचा. लागोपाठ नऊ दिवस आम्ही पहाटेच म्हणजे अजून काळोखच असायचा तेव्हा चर्चला चालत जायचो. आम्हाला देवाकडून आशीर्वाद मिळेल म्हणून आम्ही तेथे प्रार्थना करायचो. पाळक म्हणजे पवित्र मनुष्य, देवाचा प्रतिनिधी असं आम्हाला वाटायचं. पण काही दिवसांनी मात्र आमचं मत बदललं.
उत्तम गोष्टीच्या शोधात
आम्हाला चर्च कर भरायला जमलं नाही तेव्हा पाळकानं आमच्या हालाखीच्या आर्थिक अडचणीकडे पाहिलं नाही. यामुळे आम्ही निराश झालो. चर्चबद्दलचा माझा दृष्टिकोन पूर्णपणे डागाळला म्हणून मी १८ वर्षांचा होतो तेव्हा, शेतात काम करण्यापेक्षा व चर्चबरोबर हुज्जत घालत बसण्यापेक्षा जीवनात उत्तम काही आहे का याच्या शोधात मी माझं कुटुंब सोडून दूर जाण्याचं ठरवलं. १९३६ मध्ये मी पोर्तुगालची राजधानी लिसबन इथं आलो.
तेथे मी एडमिनियाला भेटलो. धर्म आपल्याला नुसता फसवतोय असं मला वाटत असलं तरी, आम्ही रुढीप्रमाणे कॅथलिक चर्चमध्ये लग्न केलं. मग, १९३९ मध्ये दुसरं महायुद्ध सुरू झालं व पोर्तुगाल मित्र राष्ट्राच्या बाजूने लढले. युद्धादरम्यान माझं १८ गोदामांचा सांभाळ करायचं काम होतं व आम्ही एका दिवसाला युद्धसामग्रीचे १२५ ट्रक पाठवत असू.
युद्धाची भीती आणि कॅथलिक चर्चचा त्यात सहभाग पाहून मी खूप अस्वस्थ झालो. मला वाटायचं, ‘देवाला खरोखरच मानवजातीची काळजी आहे का? आपण त्याची उपासना कशी करावी?’ १९५४ मध्ये काही वर्षांनंतर यहोवाचा साक्षीदार असलेले एक वृद्ध गृहस्थ माझ्या प्रश्नांबद्दल माझ्याशी बोलले. या चर्चेमुळे माझं जीवन पार बदलंल.
बायबलच्या आशेमुळे उत्साहित
जोशुवा नाव असलेल्या त्या नम्र गृहस्थाने मला सांगितलं, की जगाच्या समस्येवर एकमात्र उपाय आहे, देवाचे राज्य व केवळ राज्य शासनाद्वारेच शांती आणि सुरक्षितता मिळू शकेल. (मत्तय ६:९, १०; २४:१४) त्यांनी मला जे सांगितलं ते ऐकून मला आनंद झाला खरा पण त्यांच्या स्पष्टीकरणांचा स्वीकार करायला मी जरा मागंपुढं पाहत होतो कारण मला धर्माचा आधीच कटू अनुभव आला होता. त्यांनी मला बायबलचा अभ्यास करण्याचं आमंत्रण दिलं तेव्हा मी त्यांच्यापुढं अट ठेवली, ते माझ्याकडून पैसे मागणार नाहीत व माझ्याबरोबर राजकारणाच्या गप्पा करणार नाहीत. त्यांनी माझी अट कबूल केली व मला खात्री करून दिली की ते जे मला देत होते ते मोफत होते.—प्रकटीकरण २२:१७.
जोशुवावरील माझा भरवसा वाढायला वेळ लागला नाही. म्हणून मी त्यांना, मला लहानपणापासून हवी असलेली गोष्ट मागितली. “मला स्वतःसाठी बायबलची एक प्रत मिळेल का?” बायबल मिळाल्यावर मला, “देव स्वतः [मानवजातीबरोबर] राहील. तो त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रु पुसून टाकील; ह्यापुढे मरण नाही; शोक, रडणे व कष्ट ही नाहीत; कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या,” हे देवानं दिलेलं वचन वाचून किती आनंद झाला म्हणून सांगू!—प्रकटीकरण २१:३, ४.
दारिद्र्य आणि आजारपण यांच्या उच्चाटनाबद्दल बायबलच्या अभिवचनातून मला खासकरून जास्त दिलासा मिळाला. देव “अन्नाची विपुलता करितो” असे विश्वासू एलिहू म्हणाला. (ईयोब ३६:३१) आणि देव राज्याच्या धार्मिक शासनाखाली “मी रोगी आहे असे एकहि रहिवासी म्हणणार नाही,” असं बायबल म्हणतं. (यशया ३३:२४) यहोवा देवाला मानवजातीची किती प्रेमळ काळजी आहे! त्याच्या अभिवचनांवर माझी आस्था किती वाढली म्हणून सांगू!
सन १९५४ च्या एप्रिल १७ रोजी मी पहिल्यांदा यहोवाच्या साक्षीदारांच्या सभेला उपस्थित राहिलो. ती एक खास सभा होती—ख्रिस्ताच्या मृत्यूचा स्मारक दिन. तेव्हापासून मी सभांना नियमित होतो. लागलीच, मी शिकत असलेल्या गोष्टी इतरांना सांगू लागलो. त्या काळात पोर्तुगालमध्ये आम्हा यहोवाच्या साक्षीदारांची समुद्रकिनाऱ्याजवळ सहल निघायची आणि मग तिथं बाप्तिस्मा होत असत. जोशुवा माझ्याबरोबर बोलल्यानंतर सात महिन्यांनी मी यहोवा देवाला माझं समर्पण केलं आणि त्याचं द्योतक म्हणून समुद्रात बाप्तिस्मा घेतला.
सुरवातीला १९५४ मध्ये पोर्तुगालमध्ये फक्त शेकडो साक्षीदार होते. म्हणून प्रचार कार्यात पुढाकार घेण्याकरता आणखी बांधवांची अत्यंत आवश्यकता होती. मी जलद आध्यात्मिक प्रगती केली व काही दिवसांतच मला मंडळीमध्ये जबाबदाऱ्या देण्यात आल्या. १९५६ मध्ये मला लिसबनमधील यहोवाच्या साक्षीदारांच्या दुसऱ्या मंडळीत, मंडळी सेवक अर्थात आता ज्याला अध्यक्षीय पर्यवेक्षक म्हणतात ते नेमण्यात आले. आज या शहरात आणि उपनगरात शंभराच्या वर मंडळ्या आहेत.
आदरातिथ्य दाखवल्यामुळे फायदा
एडमिनिया आणि माझी आर्थिक परिस्थिती तशी बेताचीच होती तरीपण आमच्या ख्रिस्ती बांधवांसाठी आमचं घर नेहमी खुलं होतं. १९५५ मध्ये एक पायनियर अर्थात यहोवाच्या साक्षीदारांचा एक पूर्ण वेळेचा सुवार्तिक आपल्या घरून म्हणजे ब्राझीलहून जर्मनी येथील “विजयी राज्य” नावाच्या आंतरराष्ट्रीय संमेलनाला जात असताना पोर्तुगालला थांबला. वाहतुकीच्या समस्येमुळे तो आमच्या घरी एक महिना राहिला आणि त्याच्या भेटीचा आम्हाला किती आध्यात्मिक फायदा झाला!
त्या काळी आमच्या घरी आलेल्या पाहुण्यांपैकी, न्यूयॉर्क ब्रुकलिन येथील यहोवाच्या साक्षीदारांच्या मुख्यालयातील सदस्य जसे की, हुगो रिमर आणि त्यांचा रुममेट चार्ल्स इकर हे होते. ते आमच्याबरोबर जेवले आणि पोर्तुगीज बांधवांना भाषणे दिली. अशा लोकांकडून मिळणाऱ्या रसाळ आध्यात्मिक चिमणचाऱ्यासाठी आमची तोडं नेहमी चिमणीच्या पिल्लांसारखी उघडी असायची.
यहोवाच्या साक्षीदारांचे प्रवासी पर्यवेक्षकसुद्धा त्यांच्या भेटीच्या वेळी आमच्या घरी राहून गेले. १९५७ मध्ये आमच्या घरी भेट देणारा बांधव आमच्या आजही चांगला लक्षात आहे; त्यांचं नाव होतं अल्वरू बेरकोकिए; ते मोरोक्कोचे शाखा पर्यवेक्षक होते व त्यांना बांधवांना उत्तेजन देण्याकरता पोर्तुगालला भेट देण्यासाठी पाठवलं होतं. ते माझ्या घरात चाललेल्या पुस्तक अभ्यासाला उपस्थित राहिले व ते जोपर्यंत पोर्तुगालमध्ये आहेत तोपर्यंत त्यांनी आमच्यासोबत राहावं असा आम्ही त्यांना आग्रह केला. त्यांच्या एक महिन्याच्या त्या भेटीनं आम्हाला किती आशीर्वाद मिळाला, आम्ही आध्यात्मिकरीत्या धष्टपुष्ट झालो आणि अल्वरू माझ्या प्रिय एडमिनियाच्या हातचं स्वादिष्ट जेवण खाऊन धष्टपुष्ट झाले होते.
दारिद्र्यामुळे, जसं मी माझ्या बालपणी अनुभवलं होतं, त्यामुळे एखाद्यावर खूप खोलवर परिणाम होऊ शकतो. तरीपण मला एक गोष्ट समजली, की आपण यहोवासाठी आणि त्याच्या सेवकांसाठी जितकं देऊ तितकी अधिक बरकत तो आपल्याला देतो. आम्हाला जमेल तसं आम्ही सर्वांचा पाहुणचार करत गेलो त्यावरून माझ्या मनावर या वस्तुस्थितीचा नेहमी खोल प्रभाव पडला.
सन १९५५ मध्ये पोर्टो येथील एका अधिवेशनात, १९५८ मध्ये न्यूयॉर्क शहराच्या यांकी स्टेडियम येथे होणाऱ्या यहोवाच्या साक्षीदारांच्या आंतरराष्ट्रीय अधिवेशनाची घोषणा करण्यात आली. राष्ट्रांतील प्रत्येक राज्य सभागृहात—त्या काळी फार कमी सभागृहे होती—एक दान पेटी ठेवण्यात आली; जेणेकरून पोर्तुगीज प्रतिनिधींचा जाण्यायेण्याचा खर्च निघेल. आणि या प्रतिनिधींमध्ये आम्हा दोघा पतिपत्नीची निवड केली तेव्हा आम्हाला झालेल्या आनंदाची तुम्ही कल्पना करू शकता का? अधिवेशनासाठी आम्ही संयुक्त संस्थानात होतो तेव्हा ब्रुकलिन येथील यहोवाच्या साक्षीदारांच्या मुख्यालयाला भेट देण्याची संधी आम्हाला मिळाली म्हणून आमच्या आनंदाला सीमा राहिली नाही!
छळात टिकून राहणे
यहोवाच्या साक्षीदारांच्या पोर्तुगालमधील प्रचार कार्यावर १९६२ मध्ये बंदी घालण्यात आली; तेव्हा मिशनऱ्यांना, ज्यात एरीक ब्रिटन, डॉमनिक पिकोनी, एरीक बिवरीज आणि त्यांच्या पत्नी यांचा समावेश होता; त्यांना काढून टाकण्यात आलं. नंतर, आम्हाला राज्य सभागृहात सभा भरवण्याची परवानगी नव्हती, म्हणून आम्ही खासगी घरात त्या भरवत असू; शिवाय पोर्तुगालमध्ये मोठमोठी अधिवेशने भरवायला आम्हाला परवानगी नव्हती. म्हणून इतर राष्ट्रांतील अशा अधिवेशनांना बंधू भगिनींना उपस्थित राहता यावे म्हणून त्यांच्या ट्रान्सपोर्टेशनची सोय करण्याची माझ्यावर जबाबदारी आली.
खूप संख्येच्या साक्षीदारांची दुसऱ्या राष्ट्रांत जाण्याची सोय करणे इतके सोपे नव्हते. तरीपण, पोर्तुगीज बांधवांना मिळणारा अद्भुत आध्यात्मिक लाभाचा विचार केल्यावर हे परिश्रम व्यर्थ नव्हते. स्वीत्झर्लंड, इंग्लंड, इटली आणि फ्रान्स येथील अधिवेशनांना उपस्थित राहण्याचा त्यांच्यासाठी तो किती उभारणीकारक अनुभव होता! अशा अधिवेशनांवरून येताना त्यांना आपल्यासोबत प्रकाशनं आणण्याची देखील संधी मिळाली. त्या दिवसांमध्ये आम्ही, पोर्तुगालमध्ये धार्मिक संघटना म्हणून आमची नोंद करण्याची कितींदा विनंती केली, पण ती काही मान्य करण्यात आली नाही.
सन १९६२ च्या सुरवातीला जेव्हा मिशनऱ्यांना काढून टाकण्यात आले तेव्हा गुप्त पोलिसांनी आमचे प्रचार कार्य थांबवण्यासाठी कडक कारवाई चालू केली. आपल्या अनेक बंधुभगिनींना अटक करून त्यांना कोर्टात आणण्यात आलं. या अनेक घटनांचे अहवाल या नियतकालिकात आणि याच्या सोबतचे सावध राहा! मासिकात छापण्यात आले.a
प्रचार केल्यामुळे ज्यांना तुरुंगात टाकलं होतं त्यापैकी एक पायनियर होता ज्याला मी देवाच्या राज्याच्या सुवार्तेची साक्ष दिली होती. त्याच्याकडील सामानात माझा पत्ता पोलिसांना मिळाल्यामुळे मला बोलवण्यात आलं व माझी चौकशी सुरू झाली.
नंतर दोन पोलिस माझ्या घरी आले. त्यांनी माझे बायबल अभ्यास साहित्य आणि बायबलच्या १३ प्रती जप्त केल्या. त्यांचा त्रास चालूच राहिला; ते सात वेगवेगळ्या वेळी आमच्या घराची झडती घेण्यासाठी आले. प्रत्येक वेळी त्यांनी आमच्यावर प्रश्नांचा भडिमार केला.
कोर्टामध्ये सहसाक्षीदारांसाठी साक्ष देण्याकरता मला कितीतरी वेळा बोलावण्यात आलं. माझं इतकं काही शिक्षण झालं नव्हतं, पण यहोवानं मात्र मला अशी ‘बुद्धी दिली जिला कोणी अडविण्यास किंवा तिच्याविरुद्ध बोलण्यास कोणीही विरोधक समर्थ’ ठरले नाहीत. (लूक २१:१५) एके प्रसंगी तर न्यायाधीश माझी साक्ष ऐकून इतके चाट पडले, की त्यांनी मला माझं शिक्षण किती झालं आहे असं विचारलं. मी त्यांना जेव्हा म्हणालो की माझं फक्त चौथीपर्यंतच शिक्षण झालं आहे तेव्हा न्यायालयात बसलेल्या सर्वांना हसू आवरले नाही.
छळ जसजसा वाढत गेला तसतसे राज्य संदेशाला प्रतिसाद देणाऱ्यांची संख्या वाढत गेली. अशाप्रकारे, १९६२ मध्ये फक्त १,३०० साक्षीदार असलेल्या पोर्तुगालमध्ये १९७४ पर्यंत १३,००० साक्षीदार वाढले! त्या काळादरम्यान मे १९६७ मध्ये मला प्रवासी पर्यवेक्षक म्हणून सेवा करण्याचं आमंत्रण मिळालं. या कार्यात असताना मी यहोवाच्या साक्षीदारांच्या मंडळ्यांना आध्यात्मिकरीत्या बळकट करण्याकरता भेटी दिल्या.
गडगंज संपत्तीचा उपभोग
डिसेंबर १९७४ मध्ये मला पोर्तुगालमध्ये यहोवाच्या साक्षीदारांच्या कार्याची कायदेशीर नोंद करण्याच्या कार्यवाहीत सामील होण्याचा सुहक्क मिळाला. त्याच्या पुढील वर्षी मी आणि माझी पत्नी एस्टोरील येथील यहोवाच्या साक्षीदारांच्या बेथेल कुटुंबाचे भाग झालो. मला पोर्तुगल शाखा समितीचा एक सदस्य म्हणून देखील नेमण्यात आलं.
पोर्तुगाल आणि आमच्या शाखेच्या निगरानीखाली असलेल्या क्षेत्रांतील प्रचार कार्याची होत असलेली वृद्धी पाहून आम्हाला किती आनंद होतो! यामध्ये अंगोला, अझोर्स, केप वर्डे, मडिएरा, साओतोम आणि प्रिन्सिपे यांचा समावेश होतो. इतक्या वर्षांमध्ये या राष्ट्रांत पोर्तुगालमधून मिशनऱ्यांना पाठवण्यात आले; कारण तेथे राज्य संदेशाप्रती खूप आस्था दाखवण्यात येते. या देशांतील ८८,००० पेक्षा अधिक आणि पोर्तुगालमध्ये ४७,००० पेक्षा अधिक राज्य प्रचारक पाहून आम्हाला किती आनंद होत असेल त्याची कल्पना करा! या राष्ट्रांत स्मारकविधीची १९९८ मध्ये २,४५,००० इतकी उपस्थिती होती; १९५४ मध्ये जेव्हा मी साक्षीदार झालो होतो तेव्हाच्या २०० पेक्षा कमी असलेल्या उपस्थितीच्या तुलनेत ही संख्या खरोखरच प्रचंड आहे.
एडमिनिया आणि मी “[यहोवाच्या] अंगणातील एक दिवस हा सहस्र दिवसापेक्षा उत्तम आहे,” असे ज्याने म्हटले त्या स्तोत्रकर्त्याच्या पूर्ण सहमतात आहोत. (स्तोत्र ८४:१०) मी जेव्हा माझे पूर्वीचे ते हालाखीचे दिवस आठवतो व नंतर मला मिळत गेलेल्या आध्यात्मिक संपत्तीशी मी त्या दिवसांची तुलना करतो तेव्हा संदेष्टा यशयाप्रमाणे: “हे परमेश्वरा, तू माझा देव आहेस; मी तुझी थोरवी वर्णीन, तुझ्या नामाचे स्तवन करीन कारण तू आश्चर्यकारक कृत्ये केली आहेस; . . . तू दुर्बलास दुर्ग, लाचारास विपत्काली आश्रय . . . असा झालास,” असं मलाही वाटतं.—यशया २५:१, ४.
[तळटीपा]
a सावध राहा! मे २२, १९६४, पृष्ठे ८-१६ व टेहळणी बुरूज ऑक्टोबर १, १९६६, पृष्ठे ५८१-९२ पाहा, (इंग्रजी).
[२४ पानांवरील चित्र]
वर: १९५८ च्या न्यूयॉर्क अधिवेशनाला प्रतिनिधी पाठवण्याच्या व्यवस्थेविषयी घोषणा करताना लिसबन येथे बंधू अल्मेडा
मध्ये: पॅरिसमधील “पृथ्वीवर शांती” या आंतरराष्ट्रीय संमेलनात वडील आणि सहायक सेवकांच्या सभेचे प्रदर्शन
खाली: फ्रान्समधील एका प्रांतीय अधिवेशनाला जाण्यासाठी सज्ज असलेल्या भाड्याच्या बस
[२५ पानांवरील चित्र]
पोर्तुगाल शाखेत मॉर्निंग वर्शिप घेताना
[२५ पानांवरील चित्र]
सन १९८८ मध्ये समर्पित केलेली पोर्तुगाल शाखा
[२६ पानांवरील चित्र]
ब्रुकलिन बेथेलहून आलेल्या बंधू हूगो रिमर यांच्या भाषणाने आम्हाला प्रोत्साहन मिळाले
[२६ पानांवरील चित्र]
माझ्या पत्नीबरोबर