इस्राएलमध्ये घेतले जाणारे ईश्वरी नाव
अनेक शतकांपासून यहुदी धर्माने आपल्या अनुयायांना यहोवा या ईश्वरी नावाच्या वापरास कडकपणे मनाई केली आहे. मिशनानुसार, जो कोणी देवाचे नाव घेईल त्याला “येणाऱ्या जगात कसलाही भाग मिळणार नाही.”—सन्हेद्रिन १०:१.a
इस्राएलच्या माजी सेफारडीक प्रमुख रब्बीने १९९५ च्या जानेवारी ३० रोजी मुद्दामहून ईश्वरी नाव उच्चारले. टिक्कून नामक एक कब्बालिस्ट सुधारणूक प्रार्थना म्हणताना त्यांनी हे नाव घेतले. उपासकांच्या मते, दुष्ट शक्तींमुळे बिघडलेल्या या विश्वात देव काही प्रमाणात कदाचित पुन्हा ऐक्य घडवू शकतो म्हणून ही प्रार्थना म्हटली जाते. फेब्रुवारी ६, १९९५ च्या येडिओट आहारोनोट नामक पेपरने म्हटले: “या प्रार्थनेत इतकी शक्ती आहे, की ती फक्त एका खास पुस्तिकेतच आहे आणि ही पुस्तिका जनतेला विकली जात नाही.” या संदर्भात देवाच्या नावाचा उच्चार करणे म्हणजे विनंतीवर अधिक जोर देणे.
देवाच्या सेवकांनी यहोवा हे ईश्वरी नाव घेतले पाहिजे अशी आज्ञा बायबल देते, ही गोष्ट उल्लेखण्याजोगी आहे. (निर्गम ३:१५, नीतिसूत्रे १८:१०, यशया १२:४, सफन्या ३:९, पं.र.भा.) बायबलच्या मूळ इब्री शास्त्रवचनात हे नाव जवळजवळ ७,००० वेळा आढळते. परंतु, बायबल देवाच्या नावाचा गैरवापर करण्याविरुद्ध ताकीद देते. दहा आज्ञांतील तिसरी आज्ञा म्हणते: “यहोवा तुझा देव याचे नाव तू व्यर्थ घेऊ नको, कारण जो त्याचे नाव व्यर्थ घेतो त्याला यहोवा निर्दोष मानणार नाही.” (निर्गम २०:७, पं.र.भा.) देवाचे नाव व्यर्थ कसे काय घेतले जाऊ शकते? यहुदी प्रकाशन संस्थेच्या एका भाष्याने अशी नोंद केली, की “व्यर्थ” असे ज्याचे भाषांतर करण्यात आले आहे त्या इब्री शब्दात, ईश्वरी नावाचा “निरर्थक वापर” करणे हाच अर्थ नसून “एखाद्या अनावश्यक आशीर्वादाचे पठण” करणे समाविष्ट असू शकते.
तेव्हा आपण कब्बालिस्ट टिक्कून यांची सुधारणूक प्रार्थना कशी असल्याचे समजावे? तिचा उगम कोठून आहे? सा.यु. १२ व्या आणि १३ व्या शतकात, कब्बाला नामक एक गूढवादी यहुदी धर्म लोकप्रिय होऊ लागला. १६ व्या शतकात, आयझक लुरिया नावाच्या एका रब्बीने कब्बालिस्ट प्रार्थनेत ‘टिक्कूनीमचा’ समावेश केला. खास शक्ती असलेल्या एका गूढ मंत्रात देवाच्या नावाचा वापर केला जात असे; व ही पद्धत कब्बालिस्ट विधीचा भाग बनली. अशाप्रकारे देवाच्या नावाचा उचित वापर केला जातो असे तुम्हाला वाटते का?—अनुवाद १८:१०-१२.
तुमचे उत्तर कोणतेही असले तरी, आधुनिक इस्राएलमध्ये देवाच्या नावाचा उघडपणे उच्चार करणे म्हणजे एक असामान्य गोष्ट होती. पण स्वतः देवाने भाकीत केले होते: “त्या दिवशी तुम्ही म्हणाल, ‘यहोवाची उपकारस्तुति करा, त्याच्या नावाचा धावा करा, लोकांमध्ये त्याची कृत्ये जाहीर करा, त्याचे नाव उंचावले आहे असे सांगा. यहोवाला गा, कारण त्याने उत्तम गोष्टी केल्या आहेत, हे सर्व पृथ्वीत कळले आहे.’”—यशया १२:४, ५, पं.र.भा.
आनंदाची गोष्ट म्हणजे, २३० पेक्षा अधिक राष्ट्रांप्रमाणे इस्राएलमध्येही, यहोवाचे साक्षीदार आपल्या शेजाऱ्यांना यहोवाचे अचूक ज्ञान घेण्यास हरएक कोशीस करत आहेत. त्यांची अशी आशा आहे, की आणखी पुष्कळ लोक स्तोत्र ९१:१४ सारख्या शास्त्रवचनांचा अर्थ समजतील; तेथे म्हटले आहे: “माझ्यावर [यहोवा] त्याचे प्रेम आहे, म्हणून मी त्याला मुक्त करीन; त्याला माझ्या नावाची जाणीव आहे म्हणून मी त्याला उच्च स्थळी सुरक्षित ठेवीन.”
[तळटीपा]
a मिशना म्हणजे, तनैम (शिक्षक) म्हटल्या जाणाऱ्या रब्बींच्या स्पष्टीकरणांवर आधारित शास्त्रवचनीय नियमांची पुरवणी असलेला भाष्यांचा संग्रह. सा.यु. दुसऱ्या शतकाच्या अंताला आणि तिसऱ्या शतकाच्या आरंभाला मिशना लिखित स्वरूपात आला.
[२८ पानांवरील चित्र]
नेगेबमध्ये, यहोवाचे नाव आणि त्याचे वचन लोकांना कळवले जात आहे
[२९ पानांवरील चित्र]
ईश्वरी नाव दर्शवणारा फलक