यहोवाच्या मेंढरांच्या काळजीकरता “मनुष्यांतील दाने”
“त्याने उच्चस्थानी आरोहण केले तेव्हा त्याने कैद्यांना कैद करून नेले व मनुष्यांतील दाने दिली.”—इफिसकर ४:८, NW.
१. एका ख्रिस्ती बहिणीने तिच्या मंडळीतील वडिलांविषयी काय म्हटले?
“आमची इतकी काळजी घेतल्याबद्दल आम्ही तुमचे खरोखरच आभारी आहोत. तुमचे स्मितहास्य, तुमचा जिव्हाळा आणि आमच्याविषयी तुम्हाला वाटणारी कळकळ किती मनापासून आहे. आमच्या बोलण्याकडे कान द्यायला आणि बायबलमधील वचनांच्या साहाय्याने आम्हाला हुरूप देण्याकरता तुम्ही नेहमी तयार असता. तुमच्याविषयी मला वाटणारी कदर कमी होऊ नये अशीच मी प्रार्थना करते.” एका ख्रिस्ती बहिणीने तिच्या मंडळीच्या वडिलांविषयी असे पत्र लिहिले. खरोखरच, काळजी वाहणाऱ्या ख्रिस्ती मेंढपाळांनी दाखवलेले प्रेम तिच्याकरता हृदयस्पर्शी होते.—१ पेत्र ५:२, ३.
२, ३. (अ) यशया ३२:१, २ यानुसार दयाशील वडील कशाप्रकारे यहोवाच्या मेंढरांची काळजी घेतात? (ब) वडिलांना केव्हा दान समजले जाऊ शकते?
२ यहोवाच्या मेंढरांची काळजी घेतली जावी म्हणून त्याने वडिलांची व्यवस्था केली आहे. (लूक १२:३२; योहान १०:१६) यहोवा त्याच्या मेंढरांवर खूप प्रेम करतो—खरे तर तो त्याच्या मेंढरांवर इतके प्रेम करतो, की त्याने येशूचे अनमोल रक्त देऊन त्यांना विकत घेतले आहे. म्हणूनच, यहोवाच्या मेंढरांसोबत वडील दयेने वागतात तेव्हा त्याला आनंद होतो. (प्रेषितांची कृत्ये २०:२८, २९) या वडिलांविषयी किंवा ‘सरदारांविषयी’ केलेल्या भविष्यसूचक वर्णनाकडे लक्ष द्या: “वाऱ्यापासून आसरा व वादळापासून निवारा असा मनुष्य होईल; रुक्ष भूमीत पाण्याचे नाले, तप्त भूमीत विशाळ खडकाची छाया असा तो होईल.” (यशया ३२:१, २) होय, त्याच्या मेंढरांचे संरक्षण करण्याकरता, त्यांना ताजेतवाने करण्याकरता आणि त्यांना सांत्वन देण्याकरता ते आहेत. दयेने कळपाची काळजी घेणारे वडील अशाप्रकारे देव त्यांच्याकडून करत असलेल्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात.
३ अशा वडिलांना बायबलमध्ये “मनुष्यांतील दाने” असे संबोधण्यात आले आहे. (इफिसकर ४:८) तुम्ही बक्षिसाचा विचार करता तेव्हा, एकतर गरज भागवेल अशा गोष्टीचा तुम्ही विचार करता किंवा बक्षीस घेणाऱ्याला आनंद होईल याचा. जेव्हा वडील आपल्या क्षमतांचा आवश्यक मदत देण्याकरता आणि कळपाच्या आनंदाकरता उपयोग करतात तेव्हा त्या वडिलांना दान असे समजले जाऊ शकते. त्यांना असे करणे कसे शक्य आहे? या प्रश्नाचे उत्तर पौलाच्या शब्दांत इफिसकर ४:७-१६ येथे आढळते, यहोवाला त्याच्या कळपाविषयी किती चिंता आहे हे या वचनांतून स्पष्ट होते.
“मनुष्यांतील दाने”—कोठून?
४. स्तोत्र ६८:१८ च्या पूर्णतेत, यहोवाने कोणत्या अर्थाने ‘उच्च स्थानी आरोहण’ केले आणि ‘मनुष्यस्वरूपातील दाने’ कोण आहेत?
४ “मनुष्यांतील दाने” ही अभिव्यक्ती पौलाने वापरली तेव्हा तो राजा दावीदाचे शब्द उद्धृत करत होता; दावीदाने यहोवाविषयी असे म्हटले: “तू उच्च स्थानी आरोहण केले आहे; तू पाडाव केलेल्यांस कैद करून नेले आहे; मनुष्यांमध्ये, बंडखोरांमध्येहि तुला नजराणे [“दाने,” NW] मिळाले आहेत, ह्यासाठी की, हे परमेशा, देवा तू तेथे वास करावा.” (स्तोत्र ६८:१८) इस्राएली लोक वाग्दत्त देशात काही काळ राहिल्यानंतर, यहोवाने लाक्षणिकरित्या सियोन पर्वतावर “आरोहण” केले आणि इस्राएलच्या राष्ट्राची जेरुसलेम ही राजधानी बनवून त्यावर दावीदाला राजा म्हणून नेमले. पण हे ‘मनुष्यस्वरूपातील दाने’ कोण होते? या देशावर विजय मिळाल्यानंतर बंदिवासात नेलेल्या लोकांपैकी हे लोक होते. या कैद्यांपैकी काही लोकांना निवासमंडपाच्या कार्यात लेवीयांना मदत करण्याकरता उपलब्ध करून देण्यात आले.—एज्रा ८:२०.
५. (अ) स्तोत्र ६८:१८ याची ख्रिस्ती मंडळीत पूर्णता होते हे पौल कसे दाखवतो? (ब) येशूने कोणत्या अर्थाने ‘उच्च स्थानी आरोहण’ केले?
५ पौल इफिसकरांना लिहिलेल्या पत्रात दाखवून देतो, की स्तोत्रकर्त्याच्या शब्दांची आणखी मोठ्या प्रमाणात पूर्णता व्हायची होती. स्तोत्र ६८:१८ या वचनाचा गोषवारा देऊन पौलाने लिहिले: “तरी आपणापैकी प्रत्येकाला ख्रिस्ताने दिलेल्या दानाच्या परिमाणाप्रमाणे अनुग्रहरूपी देणगी प्राप्त झाली आहे. म्हणून तो म्हणतो त्याने उच्चस्थानी आरोहण केले तेव्हा त्याने कैद्यांना कैद करून नेले व मनुष्यांतील दाने दिली.” (इफिसकर ४:७, ८, NW) पौल या ठिकाणी हे स्तोत्र देवाचा प्रतिनिधी म्हणून येशूला लागू करतो. येशूने विश्वासू मार्गक्रमणाद्वारे “जगाला जिंकले आहे.” (योहान १६:३३) देवाने त्याला मेलेल्यातून उठवले त्याद्वारेही त्याने मृत्यू आणि सैतान यांवर विजय मिळवला. (प्रेषितांची कृत्ये २:२४; इब्री लोकांस २:१४) सा.यु. ३३ मध्ये पुनरुत्थित येशूने “सर्वोच्च स्वर्गावर”—इतर कोणत्याही स्वर्गीय सृष्टीपेक्षा उच्च स्थानावर आरोहण केले. (इफिसकर ४:९, १०; फिलिप्पैकर २:९-११) विजेता या नात्याने येशूने “कैद्यांना” शत्रूंमधून घेतले. कसे?
६. सा.यु. ३३ च्या पेन्टेकॉस्टपासून, आरोहण झालेल्या येशूने कशाप्रकारे सैतानाचे घर लुटण्यास सुरवात केली आणि त्याने ‘कैद्यांचे’ काय केले?
६ येशूने पृथ्वीवर असताना दुरात्म्यांच्या कह्यात असलेल्या लोकांना सोडवण्याद्वारे आपण सैतानापेक्षा शक्तिमान आहोत हे दाखवून दिले. येशूने जणू सैतानाच्या घरात घुसून त्याला जखडले आणि त्याची मालमत्ता जप्त केली. (मत्तय १२:२२-२९) याची कल्पना करा, पुनरुत्थित येशूला एकदा “स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार” मिळाल्यानंतर तो सैतानाच्या अशा मालमत्तेची किती लूट करू शकणार होता! (मत्तय २८:१८) सा.यु. ३३ च्या पेन्टेकॉस्टपासून, देवाचा प्रतिनिधी या नात्याने स्वर्गात आरोहण केलेल्या येशूने ‘कैद्यांना कैद करून नेण्याद्वारे’ सैतानाचे घर लुटण्यास सुरवात केली—हे कैदी दीर्घकाळापासून पाप आणि मृत्यूच्या दास्यात आणि सैतानाच्या कह्यात होते. हे “कैदी” स्वखुशीने ‘देवाची इच्छा मनापासून पूर्ण करणाऱ्या ख्रिस्ताचे दास’ बनले. (इफिसकर ६:६) परिणामी, येशूने त्यांची सैतानापासून सुटका केली आणि यहोवाच्या वतीने त्याने त्यांना मंडळ्यांकरता “मनुष्यांतील दाने” म्हणून दिले. सैतानाच्या डोळ्यासमोर त्यांना त्याच्या हातातून काढून घेण्यात आल्यानंतर लाचार सैतानाला आलेल्या क्रोधाची कल्पना करा!
७. (अ) “मनुष्यांतील दाने” ख्रिस्ती मंडळ्यांमध्ये कोणत्या नात्याने सेवा करतात? (ब) वडील या नात्याने सेवा करणाऱ्या प्रत्येक मनुष्याला यहोवाने कोणती संधी दिली आहे?
७ आज आपल्याला मंडळ्यांमध्ये अशी “मनुष्यांतील दाने” आढळतात का? निश्चितच ही दाने आपल्याला दिसतात. वडील सेवा करताना, सुवार्तिक, मेंढपाळ आणि शिक्षक या नात्याने संपूर्ण पृथ्वीवरील देवाच्या लोकांच्या ८७,००० पेक्षा जास्त मंडळ्यांमध्ये परिश्रमपूर्वक काम करताना आपल्याला आढळतात. (इफिसकर ४:११) त्यांनी देवाच्या कळपाशी दुर्व्यवहार करावा असेच सैतानाला वाटते. पण असे करण्याकरता देवाने त्यांना ख्रिस्ताद्वारे मंडळीला दिलेले नाही. उलटपक्षी, मंडळीच्या कल्याणाकरता यहोवाने या लोकांची तरतूद केली आहे आणि त्यांच्या हाती सोपवलेल्या मेंढरांचा त्यांना हिशेब द्यावा लागेल. (इब्री लोकांस १३:१७) तुम्ही वडील या नात्याने सेवा करत असल्यास, तुमच्या बांधवांकरता स्वतःला दान किंवा आशीर्वाद असल्याचे शाबीत करण्याची सुंदर संधी यहोवाने तुम्हाला दिली आहे. चार महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडण्याद्वारे तुम्ही तसे करू शकता.
‘सुधारणेची’ आवश्यकता असते तेव्हा
८. काहीवेळा आपल्या सर्वांना कोणत्या गोष्टींत सुधारणा करण्याची गरज असते?
८ पौल म्हणतो, की “मनुष्यांतील दाने” पहिल्यांदा ‘पवित्र जनांस सिद्ध [“सुधारण्याकरता,” NW] करण्याकरता’ देण्यात आली आहेत. (इफिसकर ४:१२) “सुधारणा” असे भाषांतरित करण्यात आलेल्या ग्रीक नामाचा अर्थ, “सरळ” करणे असा होतो. अपरिपूर्ण मानव या नात्याने आपल्या सर्वांना आपल्यात वेळोवेळी सुधारणा करण्याची—आपले विचार, आपली मनोवृत्ती किंवा वर्तन देवाच्या विचारांनुसार आणि इच्छेनुसार “सरळ” करण्याची—आवश्यकता असते. आपल्यामध्ये आवश्यक त्या सुधारणा करण्याकरता आपल्याला मदत व्हावी म्हणून यहोवाने “मनुष्यांतील दाने” देण्याची प्रेमळपणे तरतूद केली आहे. ते आपल्याला कशी मदत करतात?
९. चूक केलेल्या मेंढराला सुधारण्याकरता वडील कशाप्रकारे मदत करू शकतात?
९ काही वेळा, एखादा मनुष्य ‘नकळत दोषात सापडल्यास,’ अर्थात त्याच्या हातून एखादी चूक झाल्यास त्या मेंढराकरता कदाचित वडिलांना बोलवण्यात येईल. वडील कशी मदत करू शकतात? गलतीकर ६:१ म्हणते: “तुम्ही अशाला सौम्य वृत्तीने ताळ्यावर आणा [सुधारा].” यामुळे सल्ला देतेवेळी वडील चूक केलेल्या व्यक्तीवर कटू शब्दांचा मारा करणार नाहीत. सल्ला मिळणाऱ्या व्यक्तीला त्या सल्ल्यामुळे “भीति” वाटता कामा नये, तर त्या सल्ल्यामुळे त्याची उभारणी झाली पाहिजे. (२ करिंथकर १०:९; पडताळा ईयोब ३३:७.) चूक झालेल्या या व्यक्तीला आधीच ओशाळल्यासारखे वाटत असेल त्यामुळे प्रेमळ मेंढपाळांनी त्या व्यक्तीला दडपून टाकू नये. जेव्हा प्रेमापोटी आणि प्रेमळ शब्दांत सल्ला किंवा कडक वाग्दंड दिला जातो तेव्हा चूक केलेल्या मनुष्याची विचारसरणी आणि त्याचे वर्तन सुधारण्याची शक्यता असते आणि अशाप्रकारे त्याला परत मिळवता येऊ शकते.—२ तीमथ्य ४:२.
१०. इतरांची सुधारणा करण्यात आणखीन कशाचा समावेश होतो?
१० आपल्यात सुधारणा करावी म्हणून “मनुष्यांतील दाने” देण्याद्वारे यहोवाच्या मनात हेच होते, की वडील आध्यात्मिकरीत्या हुरूप देणारे आणि त्याच्या लोकांकरता उदाहरणीय असावेत. (१ करिंथकर १६:१७, १८; फिलिप्पैकर ३:१७) चुकीचा मार्ग निवडणाऱ्यांना योग्य मार्ग दाखवणे हाच केवळ सुधारणा करण्याचा अर्थ होत नाही, तर विश्वासू जणांना योग्य मार्गात टिकून राहण्याकरता त्यांची मदत करणे याचा त्यात समावेश होतो.a आज, अनेक समस्या आहेत ज्यांमुळे मन निराश होऊ शकते त्यामुळे टिकून राहण्याकरता अनेकांना उत्तेजनाची गरज आहे. काहींना त्यांची विचारसरणी देवाच्या विचारसरणीशी जुळवता यावी म्हणून स्नेहशील मदतीची आवश्यकता आहे. उदाहरणार्थ, काही विश्वासू ख्रिश्चनांना, आपण देवाच्या सेवेत कमी पडतो किंवा आपण कशासाठीही लायक नाही असे वाटत राहते. अशाप्रकारचे ‘दुर्बळ हृदय’ असलेल्या लोकांना कदाचित वाटेल, की यहोवा त्यांच्यावर पुन्हा कधी प्रेम करणार नाही किंवा त्यांनी त्यांच्या परीने कितीही देवाची सेवा केली तरी त्या सेवेचा तो कधी स्वीकार करणार नाही. (१ थेस्सलनीकाकर ५:१४, पं.र.भा.) पण अशाप्रकारची विचारसरणी, देवाला त्याच्या सेवकांविषयी काय वाटते त्या विचारसरणीच्या एकवाक्यतेत नाही.
११. आपण कशासाठीही लायक नाही या भावनेने बेजार झालेल्यांना वडील कशाप्रकारे मदत करू शकतात?
११ वडीलजनहो, अशा लोकांना मदत करण्याकरता तुम्ही काय करू शकता? यहोवा त्याच्या प्रत्येक सेवकाची काळजी घेतो याचा शास्त्रवचनीय पुरावा त्यांना प्रेमळपणे दाखवा आणि त्यांना याची खात्री द्या, की बायबलची ही वचने त्यांना व्यक्तिगतरित्या लागू होतात. (लूक १२:६, ७, २४) त्यांना हे पाहण्यास मदत करा, की यहोवाने त्याची सेवा करण्याकरता त्यांना ‘आकर्षिले’ आहे, याचा अर्थ देवाच्या नजरेत ते निश्चितच मोलवान आहेत. (योहान ६:४४) त्यांना याची खात्री करून द्या, की ते केवळ एकटे नाहीत—यहोवाच्या अनेक विश्वासू सेवकांच्या अशाचप्रकारच्या भावना होत्या. संदेष्टा एलीया एकदा इतका निराश झाला होता, की त्याला मरावेसे वाटत होते. (१ राजे १९:१-४) पहिल्या शतकातील काही अभिषिक्त ख्रिश्चनांना त्यांच्या स्वतःच्या मनात “दोषी” असल्याचे वाटत होते. (१ योहान ३:२०) बायबल काळातील विश्वासू लोक ‘आपल्यासारख्याच स्वभावाचे’ होते हे जाणल्याने सांत्वन मिळते. (याकोब ५:१७) हताश झालेल्या लोकांसोबत तुम्ही टेहळणी बुरूज आणि सावध राहा! यांमधील उत्तेजन देणाऱ्या लेखांची उजळणीही करू शकता. अशा लोकांमध्ये पुन्हा एकदा आत्मविश्वास निर्माण करण्याचे तुमचे प्रेमळ प्रयत्न देव कधीही विसरणार नाही कारण त्याने तुम्हाला “मनुष्यांतील दाने” या नात्याने दिले आहे.—इब्री लोकांस ६:१०.
कळपाची “उभारणी करणे”
१२. “ख्रिस्ताच्या शरीराची उभारणी” या वाक्यांशातून काय सूचित होते आणि कळपाची उभारणी करण्याची गुरुकिल्ली कोणती आहे?
१२ “ख्रिस्ताच्या शरीराची उभारणी” करण्याचे हे दुसरे कारण लक्षात ठेवून “मनुष्यांतील दाने” देण्यात आली आहेत. (इफिसकर ४:१२, NW) पौल येथे लाक्षणिक भाषेत बोलतो: “उभारणी करणे” यामुळे मनात बांधकामाची कल्पना येते आणि ‘ख्रिस्ताचे शरीर’ लोकांना—अभिषिक्त ख्रिस्ती मंडळीच्या सदस्यांना सूचित होते. (१ करिंथकर १२:२७; इफिसकर ५:२३, २९, ३०) वडिलांनी त्यांच्या बांधवांना आध्यात्मिकरीत्या भक्कम होण्याकरता मदत करण्याची आवश्यकता आहे. बांधवांचा ‘नाश नव्हे, तर त्यांची उन्नती [उभारणी] करावी,’ हा त्यांचा उद्देश आहे. (२ करिंथकर १०:८) प्रीती प्रदर्शित करणे, ही कळपाची उभारणी करण्याची गुरुकिल्ली आहे कारण “प्रीती उन्नती [उभारणी] करते.”—१ करिंथकर ८:१.
१३. सहानुभाव दाखवणे म्हणजे काय आणि सहानुभाव दाखवणे वडिलांकरता महत्त्वाचे का आहे?
१३ कळपाची उभारणी करण्याकरता वडिलांना मदत करणारा प्रेमाचा एक पैलू म्हणजे सहानुभाव. सहानुभाव दाखवणे म्हणजे दुसऱ्यांच्या परिस्थितीचा अनुभव घेणे—त्यांचे विचार आणि भावना समजून घेणे, त्यांच्या मर्यादा विचारात घेणे. (१ पेत्र ३:८) सहानुभाव दाखवणे वडिलांकरता महत्त्वाचे का आहे? सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे यहोवा—ज्याने “मनुष्यांतील दाने” दिली आहेत तो—सहानुभाव दाखवणारा देव आहे. त्याच्या सेवकांना जेव्हा त्रास किंवा दुःख होते तेव्हा तो स्वतः त्याचा अनुभव घेतो. (निर्गम ३:७; यशया ६३:९) त्यांच्या मर्यादा तो जाणून आहे. (स्तोत्र १०३:१४) तर मग, वडील सहानुभाव कशाप्रकारे दाखवू शकतात?
१४. वडील कोणत्या मार्गांनी इतरांना सहानुभाव दाखवू शकतात?
१४ हताश झालेले कोणी त्यांच्याकडे आल्यास, ते त्याचे ऐकतात, त्याच्या भावना जाणून घेतात. त्यांच्या बांधवांची पार्श्वभूमी, व्यक्तिमत्त्व आणि परिस्थिती जाणून घेण्याचा ते प्रयत्न करतात. त्यानंतर, वडील उभारणीकारक शास्त्रवचनीय मदत देतात तेव्हा मेंढराला ती मदत स्वीकारण्यास सोपे जाते कारण ती मदत त्यांना खरोखरच समजून घेणाऱ्या आणि त्यांची काळजी वाहणाऱ्या मेंढपाळांकडून आलेली असते. (नीतिसूत्रे १६:२३) समभावनेमुळे वडील, इतरांच्या मर्यादा आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या भावना यांचा विचार करण्यास प्रेरित होतात. उदाहरणार्थ, काही इमानी साक्षीदारांच्या मनात वार्धक्यामुळे किंवा खालावलेल्या आरोग्यामुळे देवाची जास्त सेवा करता येणे शक्य नसल्यामुळे दोषी भावना निर्माण होईल. तर काहींना त्यांच्या सेवाकार्यात सुधारणा करण्यासाठी उत्तेजनाची आवश्यकता भासेल. (इब्री लोकांस ५:१२; ६:१) इतरांची उभारणी करणारी “मनोहर वचने” शोधण्याकरता सहानुभाव वडिलांना प्रेरित करेल. (उपदेशक १२:१०) जेव्हा यहोवाच्या मेंढरांची उभारणी केली जाते, त्यांना उत्तेजन दिले जाते तेव्हा देवाप्रती असलेले त्यांचे प्रेम जास्तीत-जास्त देवाची सेवा करण्याकरता प्रेरित करील!
ऐक्याला प्रोत्साहन देणारे लोक
१५. ‘विश्वासाचे एकत्व’ या अभिव्यक्तीवरून काय सूचित होते?
१५ “मनुष्यांतील दाने” देण्याचे तिसरे कारण म्हणजे आपण “देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या व तत्संबंधी परिपूर्ण ज्ञानाच्या एकत्वाप्रत” पोहंचावे. (इफिसकर ४:१३) ‘विश्वासाचे एकत्व’ हा वाक्यांश केवळ विश्वासातच नव्हे तर विश्वासूंमध्येही ऐक्य असल्याचे दाखवतो. देवाने “मनुष्यांतील दाने” देण्यामागचे हे आणखी एक कारण आहे की, त्याच्या लोकांमध्ये ऐक्याला प्रोत्साहन मिळावे. हे ते कसे करतात?
१६. वडिलांनी आपसात ऐक्य राखणे महत्त्वाचे का आहे?
१६ पहिली गोष्ट म्हणजे, त्यांनी आपसात ऐक्य राखले पाहिजे. जर मेंढपाळांमध्येच फुटी असतील, तर मेंढरांकडे दुर्लक्ष होईल. कळपाची काळजी घेण्याकरता देण्यात येणारा मौल्यवान समय गौण गोष्टींवर लांबलचक सभा आणि वादविवाद करण्यातच वाया जाईल. (१ तीमथ्य २:८) चर्चा करण्यात येणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर कदाचित वडील आपोआप सहमत होणार नाहीत कारण त्यांची व्यक्तिमत्त्वे एकमेकांपासून खूपच वेगळी असतील. ऐक्याचा असा अर्थ होत नाही, की त्यांची विभिन्न मते असू नयेत किंवा मनमोकळ्या चर्चेत त्यांनी त्यांची मते संतुलितपणे व्यक्त करू नयेत. कोणतेही मत आधीच न ठरवून एकमेकांचे आदराने ऐकण्याद्वारे वडील त्यांच्यातील ऐक्य कायम ठेवू शकतात. शिवाय जोपर्यंत बायबलच्या तत्त्वांचे उल्लंघन होत नाही तोपर्यंत वडीलवर्गाने घेतलेल्या शेवटच्या निर्णयाशी प्रत्येक वडिलांनी आनंदाने सहमत असले पाहिजे, त्यास समर्थन केले पाहिजे. सुनम्य आत्मा हे दाखवून देतो, की ते ‘वरून येणाऱ्या ज्ञानाद्वारे’ मार्गदर्शित आहेत, हे ज्ञान “शांतिप्रिय, सौम्य” आहे.—याकोब ३:१७, १८.
१७. मंडळीतील ऐक्य टिकवून ठेवण्याकरता वडील कशाप्रकारे मदत करू शकतात?
१७ मंडळीमध्येही एकतेला प्रोत्साहन देण्याकरता वडील दक्ष असतात. जेव्हा विभाजक प्रभाव—जसे की, हानीकारक गप्पागोष्टी, इतरांवर अयोग्य इराद्यांचा ठपका लावण्याची प्रवृत्ती किंवा भांडखोर प्रवृत्ती—यांमुळे शांती धोक्यात येते तेव्हा वडील लगेच मदतदायी सल्ला देतात. (फिलिप्पैकर २:२, ३) उदाहरणार्थ, वडिलांना अशा लोकांविषयी कल्पना असेल जे खूपच टीका करणारे आहेत किंवा दुसऱ्यांच्या कामात लुडबूड करणारे आहेत. (१ तीमथ्य ५:१३; १ पेत्र ४:१५) वडील अशा लोकांना याची जाणीव करून देण्याकरता मदत करतील, की त्यांचे हे वागणे देवाने त्यांना जे शिकवले आहे त्याच्या विरुद्ध आहे आणि “प्रत्येकाने आपला स्वतःचा भार वाहिलाच पाहिजे.” (गलतीकर ६:५, ७; १ थेस्सलनीकाकर ४:९-१२) शास्त्रवचनांचा उपयोग करण्याद्वारे ते स्पष्टपणे सांगतील, की यहोवा अनेक गोष्टी आपल्या व्यक्तिगत विवेकावर सोडतो आणि आपल्यांपैकी कोणीही अशा बाबतीत दुसऱ्यांचे दोष काढू नयेत. (मत्तय ७:१, २; याकोब ४:१०-१२) ऐक्याने सेवा करण्याकरता, मंडळीमध्ये विश्वासाचे आणि आदराचे वातावरण असले पाहिजे. आवश्यकता असते तेव्हा शास्त्रवचनीय सल्ला देऊन “मनुष्यांतील दाने” शांती आणि ऐक्य टिकवण्याकरता आपली मदत करतात.—रोमकर १४:१९.
कळपाचे संरक्षण करणे
१८, १९. (अ) “मनुष्यांतील दाने” आपले कोणापासून संरक्षण करतात? (ब) कोणत्या दुसऱ्या धोक्यापासून कळपाचे संरक्षण करण्याची गरज आहे आणि मेंढरांचे संरक्षण करण्याकरता वडील कशाप्रकारे कार्य करतात?
१८ यहोवाने “मनुष्यांतील दाने” देण्याचे चौथे कारण म्हणजे ‘माणसांचा धुर्तपणा, भ्रांतीच्या मार्गास नेणाऱ्या युक्त्या, प्रत्येक शिकवणरूपी वारा’ यांच्या प्रभावापासून आपले संरक्षण व्हावे. (इफिसकर ४:१४) ‘धूर्त’ याकरता असलेल्या मूळ शब्दाचा अर्थ “फासे टाकून खेळण्याच्या जुगारात फसवणे” किंवा “फासे पाडण्यात पटाईत असणे,” असा होतो. यावरून धर्मत्यागी लोक किती हुशारीने कार्य करतात याची आपल्याला आठवण होत नाही का? ख्रिश्चनांना त्यांच्या विश्वासापासून परावृत्त करण्याकरता चलाखीने वादविवाद करून ते शास्त्रवचनांचा लबाडीने उपयोग करतात. अशाप्रकारच्या ‘क्रूर लांडग्यांवर’ वडिलांनी लक्ष ठेवले पाहिजे!—प्रेषितांची कृत्ये २०:२९, ३०.
१९ यहोवाच्या कळपाचे इतर धोक्यांपासून संरक्षण करणे देखील आवश्यक आहे. प्राचीन मेंढपाळ दावीद याने निर्भयपणे भक्षक पशूंपासून त्याच्या वडिलांच्या कळपाचे संरक्षण केले. (१ शमुवेल १७:३४-३६) आज देखील असे प्रसंग उद्भवू शकतात जेव्हा काळजी घेणाऱ्या ख्रिस्ती मेंढपाळांना यहोवाच्या मेंढरांना विशेषतः दुर्बल मेंढरांना गैरवागणूक देणाऱ्या किंवा त्यांच्यावर जुलूम करणाऱ्या लोकांपासून कळपाचे संरक्षण करण्याकरता धैर्य दाखवावे लागेल. हेतूपुरस्सर धूर्तपणा, फसवणूक, कारस्थान करून दुष्टपणाबद्दल दोषी असलेल्यांना वडील मंडळीतून लवकरात लवकर काढून टाकतील.b—१ करिंथकर ५:९-१३; पडताळा स्तोत्र १०१:७.
२०. “मनुष्यांतील दाने” यांच्या देखरेखीखाली आपल्याला सुरक्षित का वाटते?
२० “मनुष्यांतील दाने” यांकरता आपण किती कृतज्ञ आहोत! त्यांच्या प्रेमळ देखरेखीमध्ये आपल्याला सुरक्षित वाटू शकते; कारण ते सौम्यपणे आपल्यामध्ये सुधारणा करतात, प्रेमळपणे आपली उभारणी करतात, आपले ऐक्य टिकवून ठेवण्यास नेहमी तयार असतात आणि धैर्याने आपले संरक्षण करतात. पण, “मनुष्यांतील दाने” असलेल्यांनी मंडळीतील त्यांच्या भूमिकेकडे कशाप्रकारे पाहिले पाहिजे? तसेच आपण त्यांची कदर करतो, हे आपण कसे दाखवू शकतो? या प्रश्नांची चर्चा पुढील लेखांत करण्यात येईल.
[तळटीपा]
a ग्रीक सेप्ट्युजिन्ट व्हर्शनमध्ये “सुधारणे” असे भाषांतरित केलेले तेच क्रियापद स्तोत्र १७[१६]:५ मध्ये वापरण्यात आले होते, ज्याठिकाणी विश्वासू दावीदाने अशी प्रार्थना केली, की त्याची पावले यहोवाच्या मार्गाला धरून राहावीत.
b उदाहरणार्थ, नोव्हेंबर १५, १९७९ च्या टेहळणी बुरूज, (इंग्रजी) अंकातील “वाचकांचे प्रश्न” पृष्ठे ३१-२ आणि जानेवारी १, १९९७ च्या टेहळणी बुरूज अंकातील “आपण वाईटाचा वीट मानू या” पृष्ठे २६-९ पाहा.
तुम्हाला आठवते का?
◻ “मनुष्यांतील दाने” कोण आहेत आणि देवाने त्यांना ख्रिस्ताद्वारे मंडळीकरता का दिले आहे?
◻ कळपाची सुधारणा करण्याची जबाबदारी वडील कशाप्रकारे पार पाडतात?
◻ वडील, त्यांच्या सहविश्वासूंची उभारणी कशाप्रकारे करू शकतात?
◻ वडील मंडळीतील ऐक्य कशाप्रकारे टिकवून ठेवू शकतात?
[१० पानांवरील चित्र]
हताश झालेल्यांना उत्तेजन देण्याकरता सहानुभावामुळे वडिलांना मदत होते
[१० पानांवरील चित्र]
वडिलांमधील ऐक्यामुळे मंडळीतील ऐक्यास चालना मिळते