समय आणि अनंतकाळ—यांच्याविषयी आपल्याला नेमके काय माहीत आहे?
“समय हा मानवाने अनुभवलेला सगळ्यात गूढ प्रकार आहे असे वाटते,” असे एक विश्वकोश म्हणतो. होय, अगदी साध्या आणि सोप्या शब्दांत समयाची व्याख्या करणे जवळजवळ अशक्य आहे. वेळ, “लोटते,” “वेळ निघून जाते,” “वेळ उडून जाते,” व आपण स्वतः देखील “काळाच्या ओघात” पुढे जातो, असे आपण कदाचित म्हणू. पण, आपण नक्की कशाबद्दल बोलत असतो हे आपल्याला माहीत नसते.
“दोन घटनांमधील अंतर,” अशी समयाची व्याख्या केली जाते. पण, आपल्या अनुभवावरून असे दिसते, की समयाचा घटनांशी काहीच संबंध नसतो; काही घडो अगर न घडो, समय मात्र पुढे जातच राहतो. एक तत्त्ववेत्ता दावा करतो, की वेळ नावाची काही चीजच अस्तित्वात नाही; ती केवळ एक कल्पना आहे. पण, ज्यावर आपला इतका सगळा अनुभव आधारला आहे ती फक्तच आपली कल्पना असू शकते का?
बायबलचा दृष्टिकोन
बायबल समयाची कोणतीही व्याख्या देत नाही, समयाचे पूर्ण आकलन होणे कदाचित मानवी बुद्धिपलीकडचे आहे असे ते सुचवते. आपल्या समजबुद्धी पलीकडे असलेल्या अंतराळाच्या अनंत विस्तारासारखे ते आहे. तर मग, स्पष्टच आहे, की समयाची पूर्ण समज केवळ देवालाच होऊ शकते; याचे कारण, केवळ तोच “अनादिकालापासून अनंतकालापर्यंत” आहे.—स्तोत्र ९०:२.
बायबलमध्ये समयाची व्याख्या दिलेली नसली तरी, समय एक वास्तविकता आहे असे ते म्हणते. उदाहरणार्थ, देवाने सुरवातीला “ज्योति” अर्थात सूर्य, चंद्र आणि तारे निर्माण केल्याचे बायबल सांगते; या ज्योति, ‘ऋतु, दिवस व वर्षे दर्शवणाऱ्या’ समय सूचक होत्या. बायबलमध्ये लिहून ठेवलेल्या अनेक घटना कालौघात एका निश्चित समयी घडल्या आहेत. (उत्पत्ति १:१४; ५:३-३२; ७:११, १२; ११:१०-३२; निर्गम १२:४०, ४१) देवाकडील चिरकालिक आशीर्वाद—अनंत काळ जगण्याची प्रत्याशा—प्राप्त करण्यास लायक ठरावे म्हणून आपण वेळेचा सदुपयोग करावा या संदर्भातही बायबल वेळेचा उल्लेख करते.—इफिसकर ५:१५, १६.
सार्वकालिक जीवन—तर्कशुद्ध वाटते का?
समयाचा नेमका अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करण्यात अनेकांची निराशा होत असल्यामुळे अनेकांसाठी सार्वकालिक जीवनाची किंवा अनंत काळ जगण्याची कल्पना एक न उलगडणारे कोडे आहे. याचे एक कारण हे असू शकते की, समयाच्या बाबतीत आपल्याला जो काही अनुभव आला आहे त्याचा संबंध नेहमी जन्म, वाढ, वृद्धापकाळ आणि मृत्यू यांच्याशी राहिला आहे. परिणामस्वरूप, आपल्या दृष्टिकोनात, काळाचा प्रवाह आणि वृद्ध होण्याची क्रिया या दोन गोष्टी एकसारख्याच झाल्या आहेत. या शिवाय दुसऱ्या कोणत्याही दृष्टिकोनातून विचार करणे म्हणजे समयाच्या सर्वसामान्य कल्पनेचे उल्लंघन करण्यासारखे आहे असे अनेकांना वाटते. ‘वृद्ध होण्याच्या बाबतीत इतर सर्व जीवधारी प्राण्यांपेक्षा मनुष्यानंच का वेगळं असावं?’ असा प्रश्न कदाचित त्यांना पडेल.
अशाप्रकारे तर्क केल्यामुळे, पुष्कळ बाबतीत मानव बाकीच्या सृष्टीपासून वेगळा आहे या वस्तुस्थितीकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते. जसे की, मानवांमध्ये जी बौद्धिक क्षमता आहे ती प्राण्यांमध्ये नाही. यावर लोकांची मते भिन्न असली तरीही, प्राण्यांमधील नैसर्गिक प्रवृत्ती त्यांना जे काही करण्यास प्रवृत्त करते त्याच्यापलीकडे ते आणखीन काहीच करू शकत नाहीत. त्यांच्यामध्ये कलात्मक देणगी नाही किंवा मानवांकडे जशी प्रेम व कृतज्ञता व्यक्त करण्याची क्षमता असते तशी त्यांच्यामध्ये नसते. जीवन आणखीन अर्थपूर्ण करणारे इतके सगळे गुण व क्षमता जर मानवांना दिल्या आहेत तर मग त्यांचे आयुष्यच का बरे इतके क्षणभंगूर?
दुसरीकडे पाहता, ज्यांना विचार करण्याची क्षमता नाही अशी काही झाडे, हजारो वर्षे जगतात पण बुद्धिमान मनुष्य मात्र जास्तीतजास्त ७० ते ८० वर्षांपर्यंत जगू शकतो, हे विचित्र वाटत नाही का? सृजनशील किंवा कलात्मक क्षमता नसलेले कासवही २०० पेक्षा अधिक वर्ष जगू शकतात पण हे सर्व गुण संपन्न असलेले मानव मात्र त्यांच्या आयुष्याच्या निम्म्यापेक्षाही कमी वर्षे जगतात, हा विरोधाभास वाटत नाही का?
समय आणि अनंत काळ यांचे मानवाला पूर्णपणे आकलन होऊ शकत नसले तरी, बायबलमध्ये सार्वकालिक जीवनाची आशा ही एक साधार आशा आहे. बायबलमध्ये “सार्वकालिक जीवन” ही अभिव्यक्ती जवळजवळ ४० वेळा आढळते. पण, मानवांनी अनंत काळ जगावे असा जर देवाचा उद्देश आहे तर मग तो उद्देश अद्याप पूर्ण का झालेला नाही? पुढील लेखात या प्रश्नाचा विचार केला जाईल.