वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w99 १०/१ पृ. ३-४
  • वेळेचा इतका अभाव—का?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • वेळेचा इतका अभाव—का?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • अमर्याद वेळ
  • भुशाप्रमाणे उडून जाणारा वेळ
  • वेळेची कमी फक्‍त आपल्यालाच नाही
  • आपल्या हाती असलेल्या वेळेचा सदुपयोग
  • यहोवा आपल्याला आपले दिवस गणण्यास शिकवतो
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००१
  • समय आणि अनंतकाळ—यांच्याविषयी आपल्याला नेमके काय माहीत आहे?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • अनंतकाळ दृष्टिपथात ठेवून —देवाबरोबर चालणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • सनातन राजाची स्तुती करा!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
w99 १०/१ पृ. ३-४

वेळेचा इतका अभाव—का?

वेळ म्हणजे नक्की काय? वेळ, काळ किंवा समय म्हणजे नेमके काय हे आपल्याला कदाचित सांगता येणार नाही, पण आपल्याला हे मात्र माहीत आहे, की आपल्याला तो नेहमी कमी पडतो. शिवाय, थोडाबहुत वेळ जो आपल्या हाती लागतो, तो देखील पाहता पाहता सरतो. किंबहुना आपण म्हणतो देखील: “वेळ कसा निघून जातो, कळतंच नाही.”

पण, ऑस्टिन डॉबसन या इंग्लिश कवीने १८७७ मध्ये वेळेविषयी काय म्हटले त्याकडे लक्ष द्या. ते म्हणाले, “कोण म्हणतो, वेळ जातो? वेळ आहे तिथंच राहतो, जातो ते तुम्हीआम्ही.” किती समर्पक आहेत हे शब्द! १९२१ साली डॉब्सन गेले. त्यांना जाऊन आता ८० वर्षे होत आली आहेत, पण काळाचे चक्र मात्र अखंड फिरत आहे.

अमर्याद वेळ

मानवाच्या निर्माणकर्त्याविषयी बायबल आपल्याला असे सांगते: “पर्वत उत्पन्‍न झाले त्यापूर्वी, तू पृथ्वी व जग ही निर्माण केली त्यापूर्वीच अनादिकालापासून अनंतकालापर्यंत तू देव आहेस.” (स्तोत्र ९०:२) तेव्हा देवाप्रमाणे काळाला देखील अंतच नाही—तो सदैव अस्तित्वात राहील!

पण देवामध्ये आणि मनुष्यामध्ये जमीनआस्मानाचे अंतर आहे. देवाचे अस्तित्व अनंतकाळापर्यंत राहते. पण आपल्या अस्तित्वाविषयी बायबलमध्ये असे सांगण्यात आले आहे: “तुझ्या क्रोधात आमचे सर्व दिवस गुदरतात; आम्ही आमचे आयुष्य चंचल ध्वनीप्रमाणे घालवितो. आमचे आयुष्य सत्तर वर्षे—आणि शक्‍ति असल्यास फार तर ऐंशी वर्षे असले, तरी त्याचा डामडौल केवळ कष्टमय व दुःखमय आहे, कारण ते लवकर सरते आणि आम्ही निघून जातो.”—स्तोत्र ९०:९, १०.

आपले आयुष्य इतके कमी का? असा प्रश्‍न येतो. कारण बायबल तर अगदी स्पष्ट सांगते, की मनुष्यांनी सर्वकाळ जिवंत राहावे, हा देवाचा त्यांच्याकरता उद्देश होता. (उत्पत्ति १:२७, २८; स्तोत्र ३७:२९) मानवांना अनंतकाळचे जीवन द्यावे हा जर देवाचा उद्देश आहे, तर मग उत्तम परिस्थितीमध्ये देखील कोणत्याही माणसाच्या वाट्याला ३०,००० दिवसांचे आयुष्यही येऊ नये, असे का? आपल्या वाट्याला इतका कमी वेळ का? हे दुर्दैव आपल्यावर का आले असावे? कोण याला जबाबदार आहे? बायबलमध्ये स्पष्ट आणि समाधानकारक उत्तर मिळते.a

भुशाप्रमाणे उडून जाणारा वेळ

पूर्वीपेक्षा आताचे जीवन फारच धावपळीचे झाले आहे हे वयस्कर लोकांच्या तोंडून आपल्याला सर्रासपणे ऐकायला मिळते. डॉ. सिबिली फ्रिच या महिला पत्रकाराने सांगितले, की मागील २०० वर्षांच्या दरम्यान आठवड्याभरातील कामाच्या तासांत विलक्षण घट झाली आहे; पूर्वी दर आठवड्याला ८० तास काम करावे लागायचे, पण आता फक्‍त ३८ तास काम करावे लागते; “आणि तरीही वेळच नाही, ही आपली तक्रार आजही चालू आहे.” त्यांनी पुढे असे म्हटले: “वेळच नाही; वेळ म्हणजे पैसा, जगण्याची एकसारखी तडफड; जीवन म्हणजे नुसतीच धावपळ.”

नवनवीन शोध लागल्यामुळे, मागील पिढीच्या तुलनेत आजच्या पिढीसमोर अनेक सुखसोयी हात जोडून उभ्या आहेत. पण त्यांच्या पदरी निराशाच पडली आहे कारण या सर्वांचा लाभ घेण्यासाठी त्यांच्याकडे तेवढा वेळच नाही. आज जगातील अनेक लोक अक्षरशः घडाळ्याच्या काट्यानुसार चालतात. एक काम कसेबसे वेळेवर संपवले न संपवले की दुसरे काम तयारच. बाबांना ऑफिसला सकाळी ७:०० वाजता निघायला पाहिजे, आईला मुलांना शाळेसाठी ८:३० च्या आतच तयार केले पाहिजे, आजोबांना डॉक्टरांनी सकाळी ९:४० ला बोलावले आहे, आणि मग सर्वांना संध्याकाळी ७:३० वाजता होणाऱ्‍या महत्त्वाच्या सभेला हजर व्हायचे आहे. वेळेच्या आत एकेक काम उरकण्याच्या गडबडीत विश्रांतीचा विचार करण्याची उसंत कोणाला आहे? या स्पर्धेच्या जगात आपले जीवन किती निरस झाले आहे अशीच आपण तक्रार करत असतो.

वेळेची कमी फक्‍त आपल्यालाच नाही

देवाचा विरोधक असलेल्या दियाबल सैतानाच्या कारस्थानामुळे मनुष्याच्या वाट्याला इतके कमी आयुष्य आले आहे; पण सैतानाचा डाव त्याच्यावरच उलटला आहे. (पडताळा गलतीकर ६:७, ८) मशिही राज्याच्या जन्माविषयी प्रकटीकरण १२:१२ या वचनात आपल्याला आशेचा एक किरण दिसतो. हे वचन म्हणते: “म्हणून स्वर्गांनो व त्यात राहणाऱ्‍यांनो, उल्लास करा; पृथ्वी व समुद्र ह्‍यांवर अनर्थ ओढवला आहे, कारण सैतान आपला काळ थोडा आहे हे ओळखून अतिशय संतप्त होऊन खाली तुम्हाकडे आला आहे.” (तिरपे वळण आमचे.)

बायबलची कालगणना आणि त्यातील भविष्यवाणींची पूर्णता यांवर विचार केल्यानंतर आपल्याला हे दिसून येईल, की आपण सैतानाच्या त्या ‘थोड्या काळाच्या’ अगदी शेवटी जगत आहोत. सैतानाचा उरला-सुरला वेळही लवकरच कायमचा संपुष्टात येणार आहे हे जाणून किती आनंद होतो! त्याला एकदा मार्गातून काढल्यानंतर मानवजातीला पुन्हा परिपूर्णतेप्रत पोहंचवले जाईल आणि त्यांनी अनंतकाळ जीवन जगावे असा यहोवाचा आरंभीचा उद्देश पूर्ण होईल. (प्रकटीकरण २१:१-४) वेळ नाही अशी तक्रार त्यापुढे कोणीही करणार नाही.

अनंतकाळचे आयुष्य—सार्वकालिक जीवन जगणे नक्की कसे असेल याची तुम्ही कल्पना करू शकता का? तुम्हाला कोणतेही काम वेळेअभावी कधी अर्ध्यावर सोडावे लागणार नाही; अर्धवट राहिलेल्या कामांची तुम्हाला कधी खंत वाटणार नाही. तुम्हाला आणखी वेळ हवा असल्यास तुमच्यासमोर उद्याचा दिवस आहे, किंवा पुढच्या आठवड्यात किंवा पुढच्या वर्षी तुम्ही ते काम करू शकता—किंबहुना असे म्हणता येईल, की तुमच्यासमोर अनंतकाळ पसरलेला आहे!

आपल्या हाती असलेल्या वेळेचा सदुपयोग

सैतानाला माहीत आहे, की लोकांना प्रभावित करण्याकरता त्याच्या हातांत आता फारसा वेळ उरला नाही. त्यामुळे तो लोकांना इतके गुंतवून ठेवतो, की देवाच्या प्रस्थापित राज्याची सुवार्ता ऐकायला त्यांच्याकडे फुरसतच नाही. म्हणून पुढील ईश्‍वरी सल्ला काळजीपूर्वक ऐकणे आपल्याकरता शहाणपणाचे आहे: “अज्ञान्यासारखे नव्हे तर ज्ञान्यासारखे सभोवार नजर ठेवून जपून चाला. वेळेचा सदुपयोग करा, कारण दिवस वाईट आहेत. म्हणून तुम्ही मुर्खासारखे होऊ नका तर प्रभूची [“यहोवाची,” NW] इच्छा काय आहे हे समजुन घ्या.”—इफिसकर ५:१५-१७.

ज्यांतून कोणताही कायमस्वरुपी लाभ मिळत नाही अशा वायफळ उद्योगांच्या मागे लागून वेळ वाया घालवण्याऐवजी सर्वात महत्त्वाच्या गोष्टींकरता वेळेचा शहाणपणाने उपयोग करणे किती महत्त्वाचे आहे! मोशेसारखी प्रवृत्ती आपण विकसित केली पाहिजे कारण त्याने देवाला अशी मनःपूर्वक विनंती केली: “आम्हाला आमचे दिवस असे गणण्यास शिकीव की, आम्हाला सुज्ञ अंतःकरण प्राप्त होईल.”—स्तोत्र ९०:१२.

आजच्या जगात प्रत्येक जण खूपच कामात आहे हे कबूल आहे. तरीसुद्धा यहोवाचे साक्षीदार तुम्हाला अशी कळकळीची विनंती करतात, की तुम्ही त्यांना तुमचा थोडासा वेळ द्यावा जेणेकरून देवाच्या राज्यात सार्वकालिक जीवन मिळावे म्हणून काय करावे हे जाणून घेण्याकरता ते तुमची मदत करू शकतील. “प्रभुची [यहोवाची] इच्छा काय आहे” हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला आठवड्यातून फक्‍त एक तास वेळ काढायचा आहे. असे केल्यामुळे पुढील शब्द तुमच्या बाबतीत खरे ठरतील: “वाईटापासून दूर राहा, बरे ते कर; म्हणजे तुझी वस्ती कायम राहील. नीतिमान पृथ्वीचे वतन पावतील, तिच्यात ते सर्वदा वास करितील.”—स्तोत्र ३७:२७, २९.

[तळटीपा]

a वॉच टावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीद्वारे प्रकाशित सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान या पुस्तकातील ६ वा अध्याय पाहा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा