वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w99 ५/१ पृ. २६-२७
  • वेंडाचा फलदायी प्रदेश

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • वेंडाचा फलदायी प्रदेश
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • उपशिर्षक
  • अवघड भाषा
  • आध्यात्मिक फळ
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
w99 ५/१ पृ. २६-२७

वेंडाचा फलदायी प्रदेश

मागील दहा वर्षांपासून मी आणि माझ्या पत्नीने वेंडा लोकांच्या प्रदेशात पूर्णवेळेचे सेवक म्हणून काम केले आहे. दक्षिण आफ्रिकेच्या उत्तर दिशेस असलेल्या लिंपोपो नदीच्या दक्षिणेस वेंडा लोकांचे वास्तव्य आहे. अनेक शतकांपूर्वी लिंपोपो नदी पार करून येथे येऊन वसलेल्या अनेक जातीजमातींनी त्यांचे हे राष्ट्र बनलेले आहे. काही वेंडा असाही दावा करतात, की त्यांचे पूर्वज १,००० वर्षांपूर्वीच येथे येऊन स्थिरावले होते.

खरे तर एकेकाळी हे क्षेत्र, मापुंगुब्वे राज्य म्हटल्या जाणाऱ्‍या पुरातन संस्कृतीचा हिस्सा होते. ही दक्षिण आफ्रिकेतील सर्वात मोठी शहरी वसाहत होती आणि पश्‍चिमेकडील बोट्‌स्वाना ते पूर्वेकडील मोझांबिक या क्षेत्रादरम्यान असलेल्या लिंपोपो नदीच्या प्रचंड खोऱ्‍यात ही वसाहत होती. सुमारे सा.यु ९०० पासून सा.यु १,१०० पर्यंत मापुंगुब्वे अरबी व्यापाऱ्‍यांना हस्तिदंत, गेंड्याचे शिंग, प्राण्यांची कातडी, तांबे आणि सोन्याचा देखील पुरवठा करत. सोन्याने मढवलेल्या सुंदर कोरीव मूर्ती मापुंगुब्वे नावाच्या राजेशाही घराण्याच्या स्मशानभूमीच्या टेकडीतून बाहेर काढण्यात आल्या आहेत. एक एन्सायक्लोपीडिया असे सूचित करतो: दक्षिण आफ्रिकेतील सोन्याच्या खाणकामाचे हे सर्वात जुने पुरावे म्हणता येतील.

आता मात्र येथे सोन्याचे खाणकाम होत नाही. आज वेंडाचे क्षेत्र तेथील सुपीकतेसाठी प्रसिद्ध आहे. सोटपान्सबर्ग पर्वतांच्या दक्षिणेस हिरवेगार खोरे पसरले आहे; त्याठिकाणी ॲव्हकाडो, केळी, आंबा, आणि पेरू यांसारखी फळे प्रचंड प्रमाणात उत्पन्‍न होतात. याशिवाय पेकन आणि मॅकडेमिया यांसारखी कवचफले तसेच मोठ्या प्रमाणात भाज्याही या ठिकाणी होतात. यांत पालकासारखी चव असणारी जंगली मुरोहो नावाची एक पालेभाजी देखील आहे; येथील स्थानिक लोक मोठ्या आवडीने ही पालेभाजी खातात.

वेंडा लोक शांतिप्रिय आणि आतिथ्यप्रिय लोक आहेत. घरी अनपेक्षित पाहुणा आल्यास त्याच्याकरता घरचा वडील माणूस घरच्यांना कोंबडी करायला सांगतोच. कोंबडी सहसा बूस्वा या येथील प्रमुख खाद्यपदार्थासोबत खातात. पाहुणी व्यक्‍ती जायला निघाली की घरचा मोठा माणूस तिला सोडवायला थोड्या दूरपर्यंत जातो. घरी आलेल्या व्यक्‍तीला आदर दाखवण्याची ही पारंपरिक पद्धत आहे. पाहुण्यांना शालीनतेने वाकून आणि हातावर हात ठेवून अभिवादन करण्याचे मुलांना शिकवण्यात येते. दोन वेंडा स्त्रिया पारंपरिक पद्धतीने एकमेकींना अभिवादन करत असल्याचे तुम्हाला या पृष्ठावर पाहता येईल.

अवघड भाषा

युरोपियन लोकांना वेंडा भाषेवर प्रभुत्व मिळवणे इतके सोपे नाही. एक समस्या म्हणजे बऱ्‍याच शब्दांची वर्णरचना एकच असली तरी त्यांचा उच्चार मात्र वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो. यहोवाच्या साक्षीदारांच्या वेंडा मंडळीत एकदा भाषण देताना प्रत्येक व्यक्‍तीसोबत बोलण्याचे मी श्रोत्यांना उत्तेजन देत होतो. “एकेका व्यक्‍तीला” असे म्हणण्याऐवजी मी “एकेका बोटाला” असे म्हणालो तेव्हा श्रोत्यांपैकी एक व्यक्‍ती मोठ्याने हसू लागली.

जाहीर साक्षकार्यात मी पहिल्यांदा वेंडा भाषेत बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा एका वेंडा स्त्रीने मला म्हटले: “मला इंग्रजी येत नाही.” आपण शुद्ध वेंडा भाषेत बोललो असे मला वाटले होते, पण मी इंग्रजीत बोलत असल्याचे तिला वाटले! एकदा मी एका घरी गेलो आणि एका लहान मुलाला घरातल्या मोठ्या माणसाला बोलवायला सांगितले. घरच्या मोठ्या माणसाला वेंडा भाषेत थो-हो असे म्हणतात. पण मी चुकून थोहो म्हणालो, ज्याचा अर्थ मला घरातील माकडाशी बोलायचे आहे असा झाला! अशाप्रकारच्या चुकांमुळे मी निराश व्हायचो, पण मी आणि माझ्या पत्नीने हिंमत हारली नाही आणि आता आम्हाला वेंडा भाषेत बऱ्‍यापैकी बोलता येते.

आध्यात्मिक फळ

वेंडाचे क्षेत्र आध्यात्मिकरीत्याही फलद्रूप होत असल्याचे दिसून येत आहे. मेसिना गावात तांब्याच्या खाणीत काम करण्याकरता शेजारच्या देशातून येऊन येथे स्थायिक झालेल्या लोकांमध्ये यहोवाच्या साक्षीदारांची पहिली मंडळी १९५० मध्ये स्थापण्यात आली. त्यांच्या आवेशी कार्यामुळे अनेक वेंडा लोकांना बायबलमधील सत्य समजले. दहा वर्षांनंतर वेंडा साक्षीदारांचा एक गट सिबासा नावाच्या गावात एका बांधवाच्या घरात सभा घेऊ लागला.

या क्षेत्रात आणखी वाढ व्हावी म्हणून वॉच टावर सोसायटीच्या दक्षिण आफ्रिकेतील शाखा दफ्तराने या फलदायी क्षेत्रांत पूर्णवेळेचे सुवार्तिक पाठवले. लवकरच सिबासा गटाचे एका मोठ्या मंडळीत परिवर्तन झाले. त्यावेळी ख्रिस्ती सभा शाळेच्या एका वर्गात भरवल्या जात. दक्षिणेकडे सुमारे १६० किलोमीटर अंतरावर असलेल्या पीटर्सबर्गयेथील यहोवाच्या साक्षीदारांच्या मदतीने शेजारील थोहोयानडोऊ शहरात राज्य सभागृह उभारण्यात आले.

दक्षिण आफ्रिकेच्या उत्तरेकडील प्रदेशात वेंडा-भाषिक लोकांची संख्या ५,००,००० पेक्षाही जास्त आहे. सन १९५० च्या दशकात राज्य प्रचाराचे काम सुरू झाले तेव्हा तेथे एकही वेंडा साक्षीदार नव्हता. आता वेंडा भाषिक साक्षीदारांची संख्या १५० पेक्षाही जास्त आहे. पण अद्यापही अनेक क्षेत्रात सुवार्ता पोहंचलेली नाही आणि अजून पुष्कळ काम करायचे आहे. सन १९८९ मध्ये हामुत्शा या वेंडा गावात जाण्यास आम्ही सुरवात केली. त्यावेळी केवळ एक यहोवाचा साक्षीदार तेथे राहत होता. आता त्या गावात ४० पेक्षा जास्त राज्यप्रचारक आहेत. आमचे राज्य सभागृहाचे काम चालू असल्यामुळे आम्ही खूप कामात आहोत; पिटर्सबर्ग मंडळीच्या साक्षीदारांच्या साह्‍याने आणि समृद्ध देशातील बांधवांनी केलेल्या आर्थिक अनुदानांमुळे आम्हाला राज्य सभागृहाचे काम सुरू करता आले.

आम्ही एका फार्मवर कारव्हॅनमध्ये (छोटीशी जोडगाडी) राहतो. साधे राहणीमान ठेवल्यामुळे आम्हाला स्थानिक लोकांना सुवार्ता सांगण्याकरता जास्त वेळ मिळतो. (मार्क १३:१०) परिणामी, अनेक लोकांना त्यांचे जीवन यहोवाला समर्पित करण्याकरता मदत करण्याचा विशेषाधिकार मिळाल्यामुळे आम्हाला खूप मोठा आशीर्वाद लाभला आहे. मायकल याचेच एक उदाहरण आहे. त्याने त्याच्या मित्राच्या घरी तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल हे पुस्तक पाहिले होते.a त्याने ते पुस्तक वाचण्यास सुरवात केली आणि हेच सत्य असल्याची त्याला लगेच जाणीव झाली. त्यामुळे त्याने वॉच टावर सोसायटीला आणखी साहित्याकरता लिहिले. त्याने त्याच्या पत्रात असे म्हटले, की स्थानिक अपोस्टोलिक चर्चचा सदस्य म्हणून त्याने अलीकडेच बाप्तिस्मा घेतला आहे. त्याने पुढे लिहिले: “देवाच्या राज्याकडे नेणारा हा मार्ग नाही, हे मला कळाले आहे. मला तुमच्या संस्थेचा सदस्य व्हायची इच्छा आहे, पण यासाठी काय करावे लागेल हे मला ठाऊक नाही.” त्याने स्वतःचा पत्ता दिला आणि एखाद्या यहोवाच्या साक्षीदाराने घरी येऊन त्याला मदत करावी अशी विनंतीही केली. मी मायकलचे घर शोधून काढले आणि त्याच्यासोबत बायबलचा अभ्यास सुरू केला. आज, तो बाप्तिस्माप्राप्त यहोवाचा साक्षीदार आहे आणि एकनिष्ठेने यहोवाची सेवा करत आहे.

डिसेंबर १९९७ मध्ये आम्ही थोहोयानडोऊ येथील स्पोर्ट स्टेडिअममध्ये पार पडलेल्या यहोवाच्या साक्षीदारांच्या “देवाच्या वचनावरील विश्‍वास” या प्रांतीय अधिवेशनाला उपस्थित राहिलो. ६३४ जण या अधिवेशनाला आले होते आणि १२ नवीन लोकांनी बाप्तिस्मा घेतला. वेंडा भाषेत दोन भाषणे देण्याचा सुहक्कही मला मिळाला. या फलदायी क्षेत्रात मागील दहा वर्षांत केलेल्या कामातील ही अतिशय महत्त्वपूर्ण घटना होती!—सौजन्याने.

[तळटीपा]

a वॉचटॉवर बायबल ॲन्ड ट्रॅक्ट सोसायटीद्वारे प्रकाशित.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा