त्यांनी यहोवाच्या इच्छेप्रमाणे केले
पौल संकटावर मात करतो
पौल संकटात सापडला आहे. तो आणि त्याच्यासोबतचे २७५ जण जहाजावर असून युरकुलोन नावाच्या भूमध्यसागराच्या सर्वात भयंकर वादळी वाऱ्यात सापडले आहेत. हे तुफान इतके भयंकर आहे, की या जहाजावरील लोकांना दिवसा सूर्याचे आणि रात्री ताऱ्यांचे दर्शन देखील होत नाही. अर्थातच, या जहाजावरील सर्व प्रवाशांना त्यांच्या जिवाची भीती वाटू लागली आहे. पण, पौलाला ईश्वरी प्रेरणेद्वारे जे स्वप्नात दिसले ते जहाजावरील लोकांना सांगण्याद्वारे तो त्यांचे सांत्वन करतो: “तुम्हापैकी कोणाच्याहि जिवाचा नाश होणार नाही, तारवाचा मात्र होईल.”—प्रेषितांची कृत्ये २७:१४, २०-२२.
या वादळाच्या १४ व्या रात्री जहाजावरील खलाशांना एक आश्चर्यचकित गोष्ट कळते—पाणी केवळ २० वावे खोल आहे.a काही अंतरानंतर ते पुन्हा मोजणी करतात. यावेळी, पाणी १५ वावे खोल असते. किनारा जवळ आहे तर! पण या सुवार्तेमध्ये एक विचारप्रवर्तक अभिप्रेत अर्थ आहे. उथळ पाण्यावरील हेलकाव्यामुळे जहाज खडकावर आदळून फुटण्याची शक्यता आहे. त्यामुळे जहाजावरील खलाशी पाण्यात नांगर टाकून शहाणपणाचे कार्य करतात. त्यांच्यापैकी काहींना समुद्रात लहान होडी सोडून स्वतःचा जीव वाचवासा वाटतो.b पण पौल त्यांना तसे करू देत नाही. तो शताधिपतीला व शिपायांना म्हणतो: “हे तारवात न राहिले तर तुमचे रक्षण व्हावयाचे नाही.” हा शताधिपती पौलाचे ऐकतो आणि त्या जहाजावरील २७६ प्रवासी दिवस उजाडण्याची वाट पाहू लागतात.—प्रेषितांची कृत्ये २७:२७-३२.
नौकाभंग
दुसऱ्या दिवशी या जहाजावरील प्रवाशांना खाडी आणि समुद्रकिनारा दिसू लागतो. त्यांच्या आशा पुन्हा पल्लवित होतात, ते नांगराचे दोर कापून शीड वाऱ्यावर सोडतात. जहाज किनाऱ्याच्या दिशेला सरकू लागते—त्यावेळी प्रवाशांना नक्कीच खूप आनंद झाला असेल.—प्रेषितांची कृत्ये २७:३९, ४०.
पण, अचानक जहाज समुद्रातून वर आलेल्या जमिनीत रुतून बसते. याशिवाय, तुफानी लाटांमुळे जहाजाच्या मागच्या बाजूच्या ठिकऱ्या उडतात. आता सर्व प्रवाशांना जहाज सोडण्याशिवाय दुसरा पर्याय राहत नाही. (प्रेषितांची कृत्ये २७:४१) पण त्यामुळे एक समस्या निर्माण होते. या जहाजावरील बहुतेक जण—पौलसुद्धा—कैदी आहेत. रोमी नियमानुसार पहारेकऱ्याने त्याच्या देखरेखीखाली असलेल्या कैद्याला पळून जाण्यास संधी दिल्यास पलायन केलेल्या कैद्याची शिक्षा पहारेकऱ्याला भोगावी लागत असे. उदाहरणार्थ, खून केलेल्या कैद्याने पलायन केल्यास त्या पाहरेकऱ्याला त्याच्या निष्काळजीपणाबद्दल मृत्युदंड भोगावा लागत असे.
या परिणामांची भीती वाटत असल्यामुळे, सर्व कैद्यांना ठार मारण्याचे शिपाई ठरवतात. पण, पौलाशी चांगले संबंध असलेला शताधिपती शिपायांना तसे करू देत नाही. पोहून समुद्र किनाऱ्यावर जाणे ज्यांना शक्य आहे त्या सर्वांना पाण्यात उडी मारण्याची तो आज्ञा देतो. पोहता न येणाऱ्या लोकांना फळ्यांच्या किंवा तारवावरील इतर कशाच्या साहाय्याने किनाऱ्यावर येण्यास सांगितले जाते. एक एक करून सर्व प्रवासी हळूहळू समुद्रकिनाऱ्यावर येतात आणि अशाप्रकारे बुडत्या जहाजातून वाचतात. कोणाच्याही जिवाचा नाश होणार नाही, हे पौलाचे शब्द खरे ठरतात!—प्रेषितांची कृत्ये २७:४२-४४.
मिलितावरील चमत्कार
या सर्व शिणलेल्या लोकांना मिलिता या बेटावर अखेरीस आश्रय मिळाला आहे. या ठिकाणचे लोक “परदेशी भाषा बोलणारे” अर्थात “बर्बर” लोक (ग्रीक, बारबारोस) आहेत.c पण या मिलिता बेटावरील लोक काही रानटी नाहीत. उलटपक्षी, पौलाचा प्रवासी सोबती असलेला लूक असा अहवाल देतो: “बर्बर लोकांनी आम्हावर विशेष उपकार केले; म्हणजे पाऊस व गारठा असल्यामुळे त्यांनी शेकोटी पेटवून आम्हा सर्वांचा पाहुणचार केला.” पौल स्वतः मिलिताच्या लोकांसोबत शेकोटीसाठी काटक्या गोळा करतो.—प्रेषितांची कृत्ये २८:१-३, तळटीप NW.
अचानक, एक साप पौलाच्या हाताला झोंबू लागतो! त्यामुळे पौल खुनी असला पाहिजे, असा त्या बेटावरील रहिवाशांचा ग्रह होतो. त्यांना कदाचित असे वाटते, की पाप करण्याकरता शरीराच्या ज्या अवयवाचा उपयोग करण्यात आला त्या अवयवावर हल्ला करण्याद्वारे देव पापी व्यक्तीला शिक्षा देतो. पण पाहा! पौल त्या सापाला विस्तवात झटकून टाकतो तेव्हा त्या बेटावरील रहिवाशांना खूप आश्चर्य वाटते. लूकाने स्वतः पाहिलेला हा अहवाल पुढे म्हणतो: “[पौल] सुजेल किंवा एकाएकी मरून पडेल ह्याची ते वाट पाहत होते.” ते लोक नंतर आपले मत बदलतात आणि पौल कोणी देव आहे असे ते मानू लागतात.—प्रेषितांची कृत्ये २८:३-६.
पौल त्यानंतरचे तीन महिने मिलिता बेटावर घालवतो. या बेटावरील पुब्ल्य नावाच्या मुख्य अधिकाऱ्याने पौलाचा पाहुणचार केला होता. ह्या काळादरम्यान पौल या अधिकाऱ्याच्या वडिलांना तसेच इतर लोकांना आजारातून बरे करतो. याशिवाय, पौल येथे सत्याचे बीज पेरतो, परिणामी मिलितावरील पाहुणचार दाखवणाऱ्या लोकांना खूप आशीर्वाद मिळतात.—प्रेषितांची कृत्ये २८:७-११.
आपल्यासाठी धडा
पौलाने त्याच्या सेवाकार्याच्या दरम्यान अनेक संकटांना तोंड दिले. (२ करिंथकर ११:२३-२७) वरील अहवालात सांगितल्याप्रमाणे सुवार्तेकरता त्याला कैदेत राहावे लागले. त्यानंतर त्याला अनपेक्षित संकटांना सामोरे जावे लागले: वादळी तुफान आणि त्यानंतर झालेला नौकाभंग. या सर्व संकटांत, सुवार्तेचा आवेशाने प्रचार करण्याच्या आपल्या ठाम निश्चयापासून पौल कधीही डळमळला नाही. आपल्या अनुभवावरून, त्याने लिहिले: “हरएक प्रसंगी अन्नतृप्त असणे व क्षुधित असणे, संपन्न असणे व विपन्न असणे, ह्याचे रहस्य मला शिकविण्यात आले आहे. मला जो सामर्थ्य देतो त्याच्याकडून मी सर्व काही करावयास शक्तिमान आहे.”—फिलिप्पैकर ४:१२, १३.
खऱ्या देवाची आवेशाने सेवा करण्याचा आपला निर्धार जीवनाच्या समस्यांमुळे कधीही डळमळीत होऊ नये! जेव्हा अनपेक्षित संकटे समोर येतात तेव्हा आपण आपला भार यहोवावर टाकावा. (स्तोत्र ५५:२२) त्यानंतर तो आपल्याला ती संकटे सहन करण्याकरता कशी मदत करतो हे पाहण्याकरता आपण धीर धरावा. तोपर्यंत आपण या विश्वासानिशी त्याची एकनिष्ठपणे सेवा करत राहू या, की त्याला आपली काळजी आहे. (१ करिंथकर १०:१३; १ पेत्र ५:७) कोणत्याही संकटात ठाम राहिल्याने आपणही पौलाप्रमाणे संकटावर मात करू शकतो.
[तळटीपा]
a वाव हे एकक, चार क्युबीटचे किंवा सुमारे सहा फुटांचे असते.
b जहाजाने समुद्राच्या किनाऱ्याजवळ नांगर टाकल्यानंतर त्यातून बाहेर येण्याकरता ही होडी वापरत. पुराव्यानुसार, हे खलाशी स्वतःचा जीव वाचवू पाहत होते, त्यांच्यामागे जहाजावर राहिलेल्या आणि जहाज चालवता न येणाऱ्या लोकांची त्यांना पर्वा नव्हती.
c विलफ्रेड फंक यांच्या वर्ड ओरिजिन्स यात असे म्हटले आहे: “ग्रीक लोकांना स्वतःच्या भाषेशिवाय इतर भाषांचा तिटकारा होता आणि त्या ‘बार-बार’ म्हटल्यासारखे वाटत असे त्यांचे म्हणणे होते त्यामुळे ती भाषा बोलणाऱ्या व्यक्तीला ते बारबारोस म्हणत.”