वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w99 ४/१५ पृ. २३-२७
  • कॉलिजियंट्‌स—बायबल अभ्यासामुळे ते वेगळे बनले

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • कॉलिजियंट्‌स—बायबल अभ्यासामुळे ते वेगळे बनले
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • पूर्व-नियोजनाचा वादविषय
  • कॉलिजियंट्‌सचा जन्म आणि वाढ
  • विद्यार्थ्यांचे विश्‍वास
  • साप्ताहिक सभा
  • राष्ट्रीय संमेलने
  • त्यांच्या नाहीसे होण्याचे कारण
  • देवाने आपले नशीब आधीच ठरवले आहे का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • ख्रिस्ती सभांबद्दल कदर बाळगणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • तुमचे हार्दिक स्वागत आहे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००९
  • पवित्र सभांविषयी आदर दाखवणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००६
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
w99 ४/१५ पृ. २३-२७

कॉलिजियंट्‌स—बायबल अभ्यासामुळे ते वेगळे बनले

तुम्ही कॉलिजियंट्‌सबद्दल ऐकले आहे का?

हा १७ व्या शतकातला चिमुकला डच धार्मिक गट त्या काळच्या स्थापित चर्चेसपासून वेगळा होता. तो कसा आणि आपण त्यांच्याकडून काय शिकू शकतो? त्यासाठी आपण त्यांच्या काळात जाऊ या.

याकोबुस अर्मिनियस (किंवा याकोप हार्मनसन) १५८७ साली ॲमस्टरडॅमच्या शहरात आला. त्याला नोकरी लागायला उशीर लागला नाही, कारण त्याचा बायोडाटा प्रभावशाली होता. वयाच्या २१ व्या वर्षी तो हॉलंड्‌स लिडन युनिव्हर्सिटीतून पदवीधर झाला. त्यानंतर, त्याने सहा वर्ष स्वीत्झर्लंडला राहून, प्रोटेस्टंट सुधारक जॉन कॅल्विन याचा उत्तराधिकारी टेओडोर डी बीझे याच्या प्रशिक्षणाखाली वेदान्ताचा अभ्यास केला. म्हणूनच तर, ॲमस्टरडॅममधील प्रोटेस्टंट लोकांनी अगदी खुषीखुषी २७ वर्षीय अर्मिनियसला त्यांचा पाळक म्हणून नियुक्‍त केले! परंतु, काही वर्षांनंतर अनेक चर्च सदस्य त्यांच्या निर्णयावर पस्तावले. का बरे?

पूर्व-नियोजनाचा वादविषय

अर्मिनियस त्यांचा पाळक झाल्या झाल्या, ॲमस्टरडॅमच्या प्रोटेस्टंट लोकांमध्ये पूर्व-नियोजनाच्या सिद्धान्तावरून तणाव निर्माण झाला. हा सिद्धान्त कॅल्विनवादाचा मूलभूत भाग होता, पण काही चर्च सदस्यांना वाटले, की काहींसाठी तारण व काहींसाठी शिक्षा पूर्व-नियोजित करणारा देव कठोर व अन्यायी आहे. बीझेचा विद्यार्थी असल्यामुळे अर्मिनियस विरोधी मताच्या लोकांची सुधारणूक करील असे कॅल्विनवाद्यांना वाटले. पण त्याऐवजी, अर्मिनियसने विरोधी मत असलेल्यांची कड घेतली यामुळे कॅल्विनवाद्यांची त्रेधा उडाली. सन १५९३ पर्यंत हे प्रकरण इतके चिघळले, की शहरात दोन प्रोटेस्टंट गट तयार झाले—सिद्धान्त स्वीकारणारे व सिद्धान्त नाकारणारे अर्थात मवाळ लोक.

काही वर्षांतच, या स्थानिक वादामुळे संपूर्ण राष्ट्रातील प्रोटेस्टंट लोकांमध्ये फूटी निर्माण झाल्या. सरतेशेवटी, नोव्हेंबर १६१८ मध्ये, या वादाचा सोक्षमोक्ष लावण्याची पाळी आली. सैन्य आणि जन मत यांचा पाठिंबा असलेल्या कॅल्विनवाद्यांनी विरोधी मताच्या लोकांना (तेव्हा त्यांना निषेध करणारे म्हटले जाईa), डोरड्रेक्टचे प्रोटेस्टंट सायनॉड या राष्ट्रीय न्यायसभेला हजर राहण्यास फर्मावले. सभेच्या शेवटी, सर्व निषेध करणाऱ्‍या सेवकांपुढे एक निवड ठेवण्यात आली: पुन्हा कधी प्रचार करणार नाही अशा एका प्रतिज्ञापत्रावर सही करा किंवा देश सोडा. बहुतेकांनी बंदिवास निवडला. कट्टर कॅल्विनवाद्यांनी सोडून गेलेल्या निषेध करणाऱ्‍या पाळकांच्या जागा घेतल्या. कॅल्विनवादाचा विजय झाला होता—निदान न्यायसभेला तसेच वाटले होते.

कॉलिजियंट्‌सचा जन्म आणि वाढ

इतर ठिकाणांप्रमाणे, लायडन जवळील वॉरमन्ड गावातील निषेध करणाऱ्‍यांच्या मंडळीतला पाळक त्यापुढे पाळक राहिला नाही. परंतु, इतर ठिकाणी घडले त्याप्रमाणे त्या मंडळीने न्यायसभेने नियुक्‍त केलेला पाळक स्वीकारला नाही. शिवाय, एक निषेध करणारा सेवक १६२० मध्ये, त्या मंडळीची काळजी घेण्याकरता आपला जीव धोक्यात घालून वॉरमन्डला परतला तेव्हा मंडळीच्या काही सदस्यांनी त्याला नाकारलेही. या सदस्यांनी कोणत्याही पाळकाच्या साहाय्याविना गुप्ततेत धार्मिक सभा भरवल्या होत्या. नंतर, या सभांना कॉलेज अर्थात महाविद्यालय आणि त्यांना उपस्थित राहणाऱ्‍यांना कॉलिजियंट अर्थात विद्यार्थी असे संबोधले जाऊ लागले.

धार्मिक तत्त्वांमुळे नव्हे तर परिस्थितीमुळे हे कॉलिजियंट्‌स बनले असले, तरी ही परिस्थिती लवकरच बदलली. मंडळीचा एक सदस्य खिसबर्ट वॉन डर कोड याचे म्हणणे होते, की पाळकांची देखरेख नसल्याने, स्थापित चर्चेसपेक्षा हा गट बायबलचे आणि प्रारंभिक ख्रिश्‍चनांच्या मार्गाचे अधिक जवळून अनुकरण करत होता. ज्यांना एखादा व्यवसाय शिकायची इच्छा नव्हती अशा लोकांना काम देण्याकरता, प्रेषितांच्या मृत्यूनंतर पाळक वर्गाची स्थापना करण्यात आली होती, असे तो म्हणाला.

सन १६२१ मध्ये, वॉन डर कोड आणि त्याच्या विचारांचे समर्थन करणाऱ्‍या सदस्यांनी आपल्या सभा शेजारच्या राइन्सबर्ग गावात हलवल्या.b काही वर्षांनंतर म्हणजे धार्मिक छळाने सहिष्णुतेपुढे हात टेकले तेव्हा कॉलिजियंट्‌सच्या सभांची किर्ती संपूर्ण देशभरात पसरली व इतिहासकार झेखफ्रिट ढिल्व्हरबर्ख यांच्या शब्दांत सांगायचे तर, त्यामुळे “विविध जातीच्या पक्ष्यांना आकर्षित केले.” त्यांच्यात निषेध करणारे, मेनोनाईट्‌स, सोसिनियन्स आणि वेदान्ती देखील होते. काही शेतकरी होते. इतर कवी, छापण्याचे काम करणारे, वैद्य व व्यापारी होते. तत्त्ववेत्ता स्पीनोझा (बेनेडिक्टस डी स्पीनोझा) आणि शाळामास्तर योहान ऑमॉस कमिनियस (किंवा, यॉन कोमेन्स्की) त्याचप्रमाणे प्रसिद्ध चित्रकार रेम्ब्रॅन्ड वॉन राईन यांनीही या चळवळीला पाठबळ दिले. या धार्मिक लोकांनी आपल्याबरोबर आणलेल्या विविध विचारांचा विद्यार्थ्यांच्या विश्‍वासांच्या विकासावर प्रभाव पडला.

सन १६४० नंतर हा कार्यकारी गट झपाट्याने वाढत गेला. रॉटरडॅम, ॲमस्टरडॅम, लेवॉर्डन आणि इतर शहरात महाविद्यालये निघाली. इतिहासाचे प्राध्यापक ॲन्ड्रू सी. फिक्स यांच्या निरीक्षणाप्रमाणे, १६५० व १७०० या वर्षांदरम्यान, “या विद्यार्थ्यांची . . . वाढ होऊन ते हॉलंडच्या सतराव्या शतकातील सर्वात महत्त्वपूर्ण व प्रभावशाली धार्मिक गट बनले.”

विद्यार्थ्यांचे विश्‍वास

बुद्धिवाद, सहिष्णुता आणि भाषण स्वातंत्र्य हे विद्यार्थी चळवळीचे विशेष गुण असल्यामुळे, प्रत्येक विद्यार्थ्याला वेगवेगळे विश्‍वास बाळगण्याचे स्वातंत्र्य होते. तरीपण त्यांच्यात काही सामान्य विश्‍वास होते ज्यांमुळे ते संघटित राहिले. जसे की, सर्व विद्यार्थी व्यक्‍तिगत बायबल अभ्यासाला महत्त्वाचे समजत होते. प्रत्येक सदस्याने “दुसऱ्‍याकडून देवाबद्दलची माहिती मिळवू नये तर स्वतःहून परीक्षण केले पाहिजे,” असे एका विद्यार्थ्याने लिहिले. ते तसे करायचेही. १९ व्या शतकातील चर्चचे इतिहासकार याकोबस सी. वॉन स्ले यांच्या मते, त्या काळच्या इतर धार्मिक गटांपेक्षा विद्यार्थ्यांनाच बायबलचे जास्त ज्ञान होते. बायबलचा कौशल्यपूर्ण वापर करण्याची क्षमता पाहून त्यांचे विरोधक देखील विद्यार्थ्यांची प्रशंसा करीत असत.

परंतु, विद्यार्थ्यांनी बायबलचा जितका अधिक अभ्यास केला तितकीच अधिक मते तयार झाली जी स्थापित चर्चेसच्या विश्‍वासांपासून खूप भिन्‍न होती. १७ व्या शतकापासून २० व्या शतकापर्यंतची काही सूत्रे त्यांच्या काही विश्‍वासांचे वर्णन देतात.

प्रारंभिक चर्च. विद्यार्थी आणि वेदान्ती आदाम बोरेल यांनी १६४४ मध्ये लिहिले, की कॉन्स्टंटाईन सम्राटाच्या काळात प्रारंभिक चर्च राजकारणात सामील झाले तेव्हा चर्चने ख्रिस्ताबरोबरचा आपला आध्यात्मिक करार मोडला व पवित्र आत्म्याची प्रेरणा गमावली. ते पुढे असेही म्हणाले, की यामुळे खोट्या शिकवणींत वाढ झाली व त्यांच्या काळातही त्या अस्तित्वात होत्या.

धर्मसुधारणा. १६ व्या शतकात लुथर, कॅल्विन आणि इतरांनी घडवून आणलेल्या धर्मसुधारणेमुळे चर्चमध्ये फारशी सुधारणा झाली नव्हती. उलट, झगडे आणि द्वेष यांना कारणीभूत ठरून या सुधारणेने धार्मिक स्थिती आणखीनच बिघडवली, असे प्रमुख विद्यार्थी आणि वैद्य असलेल्या खेलेनस आब्राहाम्सझोन (१६२२-१७०६) यांनी म्हटले. खऱ्‍या सुधारणेने हृदयाचे परिवर्तन केले पाहिजे; धर्मसुधारणेला ते जमले नाही.

चर्च आणि पाळकवर्ग. स्थापित चर्च भ्रष्ट, जगीक आहेत व त्यांच्यात ईश्‍वरी अधिकार नाही. धर्माला गांभिर्याने घेणाऱ्‍याने, चर्चच्या पापांचा वाटेकरी न होण्याकरता चर्च सोडून द्यावे हेच सर्वात उत्तम आहे. पाळकवर्ग शास्त्रवचनांच्या विरोधात आहे व “ख्रिस्ती मंडळीच्या आध्यात्मिक कल्याणाला धोकादायक आहे,” असे विद्यार्थ्यांचे म्हणणे होते.

राज्य आणि परादीस. ख्रिस्ताचे राज्य एखाद्याच्या अंतःकरणात वसलेले आध्यात्मिक राज्य नव्हे, असे ॲमस्टरडॅम महाविद्यालयाच्या संस्थापकांपैकी एक, डॅनिएल डे ब्रेन (१५९४-१६६४) यांनी लिहिले. रॉटरडॅमचा विद्यार्थी, शिक्षक जेकब ऑस्टन्स यांनी म्हटले, की “कुलपित्यांनी पृथ्वीवरील अभिवचनांची वाट पाहिली.” तसेच, विद्यार्थी देखील पृथ्वीचे रूपांतर परादीसमध्ये होईल त्या काळाची वाट पाहत होते.

त्रैक्य. सोसिनियन विश्‍वासांचा प्रभाव झालेल्या काही प्रमुख विद्यार्थ्यांनी त्रैक्याची शिकवण नाकारली.c उदाहरणार्थ, डॅनिएल झ्वीकर (१६२१-७८) यांनी लिहिले, की तर्काच्या विरुद्ध असलेला कोणताही सिद्धान्त जसे की त्रैक्याचा सिद्धान्त “अशक्य व खोटा” आहे. रेनीर रोलेओ नामक विद्यार्थ्याने भाषांतर केलेली बायबल आवृत्ती सन १६९४ मध्ये प्रकाशित करण्यात आली. त्यात, योहान १:१ च्या शेवटल्या भागाचे भाषांतर कर्मठ अनुवादानुसार, “आणि शब्द देव होता” असे नव्हे तर “आणि शब्द एक देव होता,” असे होते.d

साप्ताहिक सभा

विश्‍वासांच्या बाबतीत विद्यार्थ्यांचे एकमत नसले तरी, वेगवेगळ्या शहरांतील त्यांची महाविद्यालये जवळजवळ एकाच प्रकारे चालवली जात असत. इतिहासकार वॉन स्ली यांचा अहवाल असे म्हणतो, की विद्यार्थी चळवळीच्या आरंभीच्या दिवसांत सभांची क्वचितच पूर्वतयारी केली जात असे. विद्यार्थ्यांना वाटले, की ‘संदेश देण्याच्या’ गरजेविषयी प्रेषित पौलाच्या शब्दांनुसार सर्व पुरुष सदस्य मुक्‍तपणे विद्यालयात भाषण देऊ शकत होते. (१ करिंथकर १४:१, ३, २६) यामुळे, सभा बहुतेकदा रात्री उशिरापर्यंत चालत असत व उपस्थित असलेल्यांपैकी काही “गाढ झोपी” जात.

नंतर नंतर सभा अधिक पद्धतशीर होऊ लागल्या. विद्यार्थी फक्‍त रविवारच्या दिवशीच नव्हे तर आठवड्यांतील इतर संध्याकाळीही एकत्र येऊ लागले. वक्‍ता आणि मंडळीतील सर्वांना त्या वर्षातील सर्व सभांची पूर्वतयारी करता यावी म्हणून एक कार्यक्रम छापण्यात येऊ लागला ज्यात, विचारविनिमयाची बायबल वचने आणि वक्‍त्‌याच्या नावाची आद्याक्षरे होती. गीत आणि प्रार्थनेने सभेची सुरवात झाल्यावर एक वक्‍ता बायबल वचनांचे स्पष्टीकरण देत असे. त्याचे बोलून झाल्यावर, चर्चा केलेल्या विषयावर स्वतःचे मत व्यक्‍त करण्यास तो श्रोत्यांना सांगायचा. मग, दुसरा वक्‍ता त्याच वचनांना कसे लागू करता येईल ते दाखवायचा. आणि मग प्रार्थना आणि गीताने सभा समाप्त व्हायची.

फ्रिसलंड प्रांतातील हार्लिंगन शहरातील विद्यार्थ्यांकडे त्यांच्या सभा अगदी वेळेवर संपवण्याकरता एक अनोखी पद्धत होती. जो वक्‍ता त्याला नेमून दिलेल्या वेळेपेक्षा जास्त बोलत असे त्याला दंड म्हणून एक लहानशी किंमत द्यावी लागत असे.

राष्ट्रीय संमेलने

विद्यार्थ्यांना मोठ्या सभा भरवण्याचीही गरज भासली. म्हणून, राष्ट्रांतील सर्व ठिकाणांहून विद्यार्थी प्रवास करून राइन्सबर्ग येथे वर्षांतून दोनदा (वसंत ऋतूत आणि उन्हाळ्यात) जमत असत; सन १६४० पासून असे एकत्र येणे सुरू झाले. या मेळाव्यांमुळे त्यांना, “दूरवरच्या आपल्या बांधवांच्या कल्पना, विचार, विश्‍वास आणि कार्य यांच्याशी परिचित होण्याची” संधी मिळाली, असे इतिहासकार फिक्स यांनी लिहिले.

काही विद्यार्थी, गावकऱ्‍यांच्या खोल्यांमध्ये भाड्याने राहत तर इतरजण विद्यार्थ्यांच्या मालकीच्या ३० खोल्यांच्या हवेलीत, ख्रोट होस, किंवा मोठे घर, यात राहत असत. तेथे ६० ते ७० लोकांसाठी सामुहिक भोजन दिले जाई. भोजनानंतर पाहुणे हवेलीच्या बागेत ‘निसर्ग पाहायला, गप्पा मारायला किंवा मनन करायला’ शतपावलासाठी जाऊ शकत होते.

सर्वच विद्यार्थ्यांना बाप्तिस्म्याची गरज वाटत नसली तरी, बहुतेकांना वाटत होती. म्हणून, बाप्तिस्मा हा मोठ्या मेळाव्यातील एक पैलू झाला. इतिहासकार वॉन स्ले म्हणतात, की बाप्तिस्म्याचा हा समारंभ शनिवारी सकाळी व्हायचा. गीत आणि प्रार्थनेनंतर, बाप्तिस्म्याची आवश्‍यकता का आहे यावर एक भाषण व्हायचे. मग वक्‍ता, ज्यांना बाप्तिस्मा घ्यायचा आहे अशा प्रौढांना, “येशू ख्रिस्त हा जिवंत देवाचा पुत्र आहे असा मी विश्‍वास करतो,” ही विश्‍वासाची कबुली देण्याकरता आमंत्रण देत असे. प्रार्थनेने भाषणाची समाप्ती झाल्यावर उपस्थित असलेले सर्वजण बाप्तिस्म्याच्या टाकीजवळ जात आणि टाकीत गुडघ्यांवर उभ्या राहिलेल्या स्त्री-पुरुषांना पाहत; गुडघ्यांवर उभे राहिलेल्या या लोकांच्या खांद्यांपर्यंत पाणी पोहंचत असे. मग बाप्तिस्मा देणारा हळूच नव्याने विश्‍वास स्वीकारणाऱ्‍याचे डोके पाण्याच्या आत बुडवायचा. या समारंभानंतर सर्वजण पुढील भाषणासाठी आपापल्या जागेवर जाऊन बसत.

शनिवारी संध्याकाळी ५:०० वाजता, बायबलमधील लहानशा उताऱ्‍याचे वाचन, गीत आणि प्रार्थनेने खऱ्‍या सभेची सुरवात व्हायची. वक्‍ते नेहमी तयार असतील याची खात्री करण्यासाठी रॉटरडॅम, लायडन, ॲमस्टरडॅम आणि नॉर्थ हॉलंडची महाविद्यालये आळीपाळीने संमेलनासाठी वक्‍ते पाठवायचे. रविवारची सकाळ प्रभू भोजन साजरी करण्यासाठी राखून ठेवली जायची. भाषण, प्रार्थना आणि गीत झाल्यावर पहिल्यांदा पुरुष मंडळी आणि मग स्त्रिया भाकर आणि द्राक्षारस घेत असत. रविवारी दुपारी आणखी भाषणे व्हायची व सोमवारी सकाळी सर्वजण समाप्तीच्या भाषणासाठी एकत्र यायचे. या अधिवेशनात दिली जाणारी बहुतेक भाषणे व्यावहारिक स्वरूपाची, स्पष्टीकरणाऐवजी अंमल करण्यावर जास्त भर देणारी होती, असे वॉन स्ली म्हणतात.

राइन्सबर्ग गावातील लोकांना हे मेळावे आपल्या गावात भरवायला खूप आनंद होत असे. १८ व्या शतकातील एका निरीक्षकाने लिहिले, की संमेलनासाठी झुंडीने येणारे हे अनोळखी लोक खाण्यापिण्यावर बराच पैसा खर्च करून गावाचा बराच फायदा करून देत असत. शिवाय, प्रत्येक अधिवेशनानंतर विद्यार्थी राइन्सबर्गमधील गरिबांना पैशाची देणगी देत असत. म्हणूनच १७८७ मध्ये जेव्हा अशा प्रकारच्या सभा थांबवण्यात आल्या तेव्हा या गावाला त्याची झळ बसली. त्यानंतर, विद्यार्थी चळवळ हळूहळू संपुष्टात आली. कारण काय होते?

त्यांच्या नाहीसे होण्याचे कारण

धर्मामध्ये तर्काची काय भूमिका आहे याविषयी १७ व्या शतकाच्या अंतास एक वाद निर्माण झाला. काही विद्यार्थ्यांना वाटले, की ईश्‍वरीय प्रकटनापेक्षा मानवी तर्काला प्राधान्य दिले जावे; परंतु इतरांना हे पटले नाही. कालांतराने, या वादामुळे संपूर्ण विद्यार्थी चळवळीत फूट निर्माण झाली. दोन्ही गटांतील प्रमुख समर्थकांचा मृत्यू झाल्यावरच विद्यार्थ्यांमध्ये पुन्हा ऐक्य घडले. तरीपण, या फुटीनंतर विद्यार्थी चळवळ “पहिल्यासारखी राहिली नाही,” असे इतिहासकार फिक्स म्हणतात.

विद्यार्थी चळवळीच्या ऱ्‍हासाला, १८ व्या शतकातील प्रोटेस्टंट चर्चमधील वाढती सहिष्णुता देखील कारणीभूत होती. तर्क आणि सहिष्णुता यांविषयी असलेल्या विद्यार्थ्यांची तत्त्वे समाजात मोठ्या प्रमाणावर स्वीकारली जाऊ लागली तसे “विद्यार्थीवादाची एकेकाळची एकटी ज्योत विझून प्रबोधनाचा उज्ज्वल उदय झाला.” १८ व्या शतकाच्या अंतापर्यंत, बहुतेक विद्यार्थी मेनोनाईट्‌स व इतर धार्मिक गटांत सामील झाले होते.

विद्यार्थ्यांनी त्यांच्या चळवळीत वैचारिक एकता साध्य करण्याचा हेतू बाळगला नसल्यामुळे जितके विद्यार्थी तितकेच विविध विचार होते. त्यांनी हे जाणले व म्हणूनच प्रेषित पौलाने ख्रिश्‍चनांना आर्जवल्याप्रमाणे आपापसांत ‘एकमत’ असल्याचा दावा त्यांनी केला नाही. (१ करिंथकर १:१०) परंतु, त्याचबरोबर विद्यार्थी त्या काळाची आतुरतेने वाट पाहत होते जेव्हा मूलभूत ख्रिस्ती विश्‍वास, जसे की वैचारिक एकता, एक वास्तविकता बनेल.

विद्यार्थ्यांच्या दिवसांत खऱ्‍या ज्ञानाची अद्यापही वृद्धी झाली नव्हती ही वस्तुस्थिती लक्षात घेता, आजचे बहुतेक धर्म नोंद घेऊ शकतील असे उदाहरण त्यांनी मांडले. (पडताळा दानीएल १२:४.) बायबल अभ्यासाच्या आवश्‍यकतेवर त्यांचे जोर देणे प्रेषित पौलाच्या सल्ल्याच्या एकवाक्यतेत होते: “सर्व गोष्टींची पारख करा.” (१ थेस्सलनीकाकर ५:२१) व्यक्‍तिगत बायबल अभ्यासाद्वारे याकोबुस अर्मिनियस आणि इतरांना समजले, की काही जुने धार्मिक सिद्धान्त व प्रथा बायबलवर मुळीच आधारित नव्हत्या. त्यांना हे समजल्यावर, त्यांनी स्थापित धर्मापासून स्वतःला वेगळे करण्याचे धैर्य दाखवले. तुम्हीही असेच केले असते का?

[तळटीपा]

a सन १६१० मध्ये, विरोधी मताच्या लोकांनी डच शासकांना एक औपचारिक निषेध पत्र (विरोध करण्याची कारणे दर्शवणारे एक पत्र) पाठवले. तेव्हापासून त्यांना निषेध करणारे असे नाव पडले.

b या ठिकाणामुळे विद्यार्थ्यांना राइन्सबर्गर्स असेही संबोधले जाई.

c सावध राहा! (इंग्रजी) नोव्हेंबर २२, १९८८, पृष्ठ १९ वरील “सोसिनियन्स—त्यांनी त्रैक्य का नाकारले?” हा लेख पाहा.

d हेट निऊवे टेस्टमेंट वॅन ओन्झे हेर जिझस ख्रायस्टस, उईट हेट ग्रीक्श वेरटाल्ड डोर रेनीर रोलेओ, एम.डी. (रेनीर रोलेओ, एम.डी. यांनी ग्रीकमधून अनुवाद केलेले, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा नवा करार)

[२४ पानांवरील चित्र]

रेम्ब्रॅन्ड वॉन राईन

[२६ पानांवरील चित्र]

विद्यार्थ्यांची प्रथम सुरवात झाली ते वॉरमन्ड गाव आणि बाप्तिस्मे होत ती डी व्लीट नदी

[२३ पानांवरील चित्राचे श्रेय]

पार्श्‍वभूमी: Courtesy of the American Bible Society Library, New York

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा