वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w99 ४/१५ पृ. २८-३०
  • वाचकांचे प्रश्‍न

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • वाचकांचे प्रश्‍न
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • मिळती जुळती माहिती
  • श्रम करून आपल्या जिवास सुख द्या
    देवाच्या प्रेमात टिकून राहा
  • या धर्मांकडे उत्तर आहे का?
    सावध राहा! माहितीपत्रक १३-२ (gbr13-2)
  • सदसद्विवेकबुद्धीला प्रतिसाद देणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००७
  • “प्रत्येकाने आपला स्वतःचा भार वाहिलाच पाहिजे”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००६
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
w99 ४/१५ पृ. २८-३०

वाचकांचे प्रश्‍न

काही यहोवाच्या साक्षीदारांना धार्मिक इमारती बांधण्याचे काम मिळाले आहे. तर अशा कार्यांबद्दल शास्त्रवचनीय दृष्टिकोन काय आहे?

हा प्रश्‍न, १ तीमथ्य ५:८ हे वचन प्रामाणिकपणे लागू करू इच्छिणाऱ्‍या ख्रिश्‍चनांपुढे येऊ शकतो; या वचनात, एखाद्याच्या घराण्याला भौतिक साहाय्य देण्याच्या महत्त्वावर जोर देण्यात आला आहे. ख्रिश्‍चनांनी हा सल्ला लागू करणे आवश्‍यक असले तरी, याचा अर्थ असा होत नाही की त्यांनी कोणत्याही प्रकारचे काम स्वीकारावे. देवाच्या इच्छेसंबंधीच्या इतर निर्देशनांकडे लक्ष देण्याची गरज आहे हे ख्रिश्‍चन जाणून आहेत. उदाहरणार्थ, एखाद्या मनुष्याला आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करायचे आहे म्हणून अनैतिकता किंवा खून करणे यांविषयी बायबल जे म्हणते त्यांचे उल्लंघन करून चालणार नाही. (पडताळा उत्पत्ति ३९:४-९; यशया २:४; योहान १७:१४, १६.) शिवाय ख्रिश्‍चनांनी, खोट्या धर्माचे जागतिक साम्राज्य अर्थात मोठी बाबेल हिच्यातून बाहेर पडण्याबद्दलच्या आज्ञेच्या सुसंगतेत कार्य करणे देखील महत्त्वाचे आहे.—प्रकटीकरण १८:४, ५.

विश्‍वभरात, देवाच्या सेवकांना नोकरीसंबंधी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. सर्व शक्यतांची यादी बनवण्याचा व ठाम नियम बनवण्याचा प्रयत्न करणे एकतर निरर्थक ठरेल व आपल्याला तसा अधिकारही नाही. (२ करिंथकर १:२४) परंतु ख्रिश्‍चनांनी व्यक्‍तिगत नोकरीविषयक निर्णय घेताना विचारात घेण्याजोगे काही मुद्दे येथे सांगितले आहेत. जुलै १५, १९८२ च्या टेहळणी बुरूज (इंग्रजी) मधील एका अंकात, देवाने दिलेल्या विवेकाचा फायदा करून घेण्यासंबंधी एक लेख आला होता ज्यात हे मुद्दे संक्षिप्तपणे मांडण्यात आले होते. एका पेटीत दोन महत्त्वाचे प्रश्‍न विचारण्यात आले होते व त्यांचे इतर मदतदायी मुद्दे देण्यात आले होते.

पहिला मुख्य प्रश्‍न आहे: एकूण प्रापंचिक कामाबद्दल बायबल नापसंती व्यक्‍त करते का? यावर विवेचन मांडताना, टेहळणी बुरूजने म्हटले, की चोरी करणे, रक्‍ताचा गैरवापर व मूर्तीपूजा यांच्याबद्दल बायबल नापसंती व्यक्‍त करते. वर उल्लेखल्याप्रमाणे ज्या कामांबद्दल देव नापसंती व्यक्‍त करतो अशा कामांना थेटपणे बढावा देणारी प्रापंचिक कामे ख्रिश्‍चनांनी करण्याचे टाळले पाहिजे.

दुसरा प्रश्‍न आहे: अशी कामे केल्याने एखादा, निंद्य चालीरीतीमध्ये साथीदार होऊ शकतो का? हे स्पष्ट आहे, की जुगारीच्या अड्ड्यावर, गर्भपाताच्या दवाखान्यात किंवा कोठ्यावर काम करणारी व्यक्‍ती एका अशास्त्रीय कामात साथीदारच होईल. त्याचे तेथील दररोजचे काम फक्‍त झाडून काढायचे किंवा फोन उचलण्याचे असले तरी, देवाचे वचन ज्याचा धिक्कार करते अशा कामांमध्ये तो हातभार लावत असेल.

नोकरीविषयक निर्णय घ्यावा लागणाऱ्‍या अनेक ख्रिश्‍चनांना असे आढळून आले आहे, की फक्‍त या प्रश्‍नांचे परीक्षण केल्याने त्यांना व्यक्‍तिगत निर्णय घेण्यास मदत मिळाली आहे.

उदाहरणार्थ, एखादा खरा उपासक एखाद्या खोट्या धार्मिक संघटनेचा थेट कर्मचारी का बनू शकत नाही आणि चर्चमध्ये किंवा चर्चसाठी का काम करू शकत नाही हे त्या दोन प्रश्‍नांवरून दिसून येईल. प्रकटीकरण १८:४ अशी आज्ञा देते: ”माझ्या लोकांनो, तुम्ही तिच्या पापांचे वाटेकरी होऊ नये . . . म्हणून तिच्यामधून निघा.” खोट्या उपासनेची शिकवण देणाऱ्‍या धर्मासाठी नियमितरीत्या काम करणारा मनुष्य मोठ्या बाबेलच्या कामांचा आणि पापांचा वाटेकरी होईल. तो तेथे माळीकाम करणारा असला, देखभाल करणारा असला, दुरुस्तीचे काम करणारा असला किंवा जमाखर्च पाहणारा असला, तरी त्याचे काम, खऱ्‍या धर्माच्या विरुद्ध असलेल्या उपासनेला बढावा देणारेच काम ठरेल. आणि, जे कोणी त्याला चर्चची शोभा वाढवताना, त्याची दुरुस्ती करताना किंवा त्याची धार्मिक कामे पार पाडताना पाहील त्यांना असेच वाटेल, की तो कर्मचारी त्या धर्माचा सदस्य आहे.

परंतु मग जो चर्चचा किंवा कोणा धार्मिक संघटनेचा नियमित कर्मचारी नाही अशाबद्दल काय? कदाचित त्याला चर्चच्या तळघरातल्या फुटलेल्या पाण्याच्या पाईपची दुरुस्ती करायला तातडीने बोलावण्यात आले असावे. हे काम, चर्चचे छप्पर बसवण्याचा किंवा इंस्यूलेट करण्याचे कॉन्ट्रॅक्ट घेऊन काम करण्यापेक्षा वेगळे नसेल का?

येथे पुन्हा, अनेक परिस्थितींचा विचार करता येईल. यास्तव, आपण टेहळणी बुरूजने सांगितलेल्या आणखी पाच मुद्द्‌यांची उजळणी करू या:

१. हे काम केवळ एक मानवी सेवा असून त्यात शास्त्रवचनीयरीत्या आक्षेपार्ह काहीच नाही असे आहे का? पोस्टमनचे उदाहरण घ्या. समजा, तो ज्या क्षेत्रात काम करतो तेथे एक चर्च किंवा गर्भपाताचा एक दवाखाना आहे तर, तेथे टपाल टाकल्याने तो एका निंद्य कामाला बढावा देत आहे असा त्याचा अर्थ होणार नाही. देवाने दिलेल्या सूर्याचा प्रकाश सर्व इमारतींच्या खिडक्यांतून आत प्रवेशतो, मग ती इमारत एक चर्च असो किंवा गर्भपात केले जातात तो दवाखाना असो. (प्रेषितांची कृत्ये १४:१६, १७) एखादा ख्रिश्‍चन पोस्टमनचे काम करत असेल तर तो म्हणेल, की मी दररोज जे काम करतो ती सर्वांसाठी असलेली एक मानवी सेवा आहे. हीच गोष्ट तातडीच्या वेळी काम करणाऱ्‍या एखाद्या ख्रिश्‍चनाच्या बाबतीतही खरी ठरू शकते—जसे की चर्चमध्ये पाणी साठू नये म्हणून बोलावण्यात आलेला प्लंबर किंवा चर्च सेवा पार पडत असताना अचानक प्रकृती बिघडलेल्या व्यक्‍तीला उपचारासाठी अम्बुलन्समध्ये नेणारा सेवक. हे काम त्याला अचानक उद्‌भवलेली एक मदतीची सेवा वाटेल.

२. जे केले जाते त्यावर एखाद्याला किती अधिकार असतो? एक ख्रिस्ती आपल्या दुकानात, मूर्तींची ऑर्डर घेणार नाही किंवा त्या विकणारही नाही, जादूचे ताईत, सिगारेट किंवा रक्‍ताचे सॉसेजेस विकणार नाही. तो मालक असल्यामुळे त्याला सर्व अधिकार आहे. दुकानात सिगारेटी किंवा मूर्ती ठेवायला लोक त्याला वारंवार सांगतील पण तो त्याच्या शास्त्रवचनीय विश्‍वासांच्या सुसंगतेत कार्य करील. दुसऱ्‍या बाजूला पाहता, एखाद्या ख्रिश्‍चनाला एका मोठ्या दुकानामध्ये कॅश रेजिस्टर सांभाळण्याचे, फरशी पुसायचे किंवा हिशेबनीसाचे काम करावे लागेल. त्या दुकानात सिगारेटी किंवा धार्मिक सणांसाठी वापरल्या जाणाऱ्‍या वस्तूंसारखी आक्षेपार्ह उत्पादने तेथे असली, तरी मालाची ऑर्डर किंवा विक्री करण्याचे काम त्याच्याकडे नसते.a (पडताळा लूक ७:८; १७:७, ८.) याचा पुढील मुद्द्‌याशी संबंध आहे.

३. त्या कामात ती व्यक्‍ती किती प्रमाणात गोवली आहे? दुकानाच्या उदाहरणाकडे पुन्हा वळू या. कॅश रजिस्टर सांभाळणाऱ्‍या किंवा दुकानातील कपाटात सामान ठेवण्याचे काम करणाऱ्‍या कर्मचाऱ्‍याला एखाद वेळी सिगारेटींचे किंवा धार्मिक वस्तूचे काम पाहावे लागत असावे; त्याच्या खरोखरच्या कामातला हा छोटासा भाग आहे. पण, त्याच दुकानात फक्‍त तंबाखूचेच काम करणाऱ्‍या कर्मचाऱ्‍यापेक्षा त्याचे काम किती वेगळे आहे! दररोज त्याला ख्रिस्ती विश्‍वासांच्या विरुद्ध असलेले काम करावे लागते. (२ करिंथकर ७:१) यावरून नोकरीसंबंधी प्रश्‍नांचा विचार करताना एखादे काम कितींदा करावे लागते किंवा एखाद्या कामाशी आपला संपर्क किती येतो यांचाही विचार का करावा हे दिसते.

४. पगार कोठून येतो किंवा कामाचे ठिकाण कोणते आहे? दोन परिस्थितींचा विचार करा. समाजात चांगली प्रतिमा ठेवण्याकरता गर्भपाताचा दवाखाना, एखाद्या मनुष्याला पगार देऊन आजूबाजूचे रस्ते साफ करवून घेईल. त्या मनुष्याचा पगार गर्भपाताच्या दवाखान्यातून येतो पण तो तेथे काम करीत नाही व दिवसभर त्याला दवाखान्यात कोणी पाहतही नाही. उलट, ते त्याला शास्त्रवचनांच्या विरुद्ध नसलेले एक सार्वजनिक काम करताना पाहतात, मग त्याला कोठूनही पगार मिळो. आता याच्या अगदीच विरोधातली एक परिस्थिती पाहा. वेश्‍याव्यवसाय कायदेशीर असलेल्या देशात, सार्वजनिक आरोग्य सेवा एका नर्सला वेश्‍यावस्तीवर काम करण्याकरता पगार देते; लैंगिकरित्या संक्रमित रोगांचा फैलाव आटोक्यात आणण्यासाठी तिला तेथे आरोग्य तपासणी करावी लागते. तिला सार्वजनिक आरोग्य सेवेकडून पगार मिळत असला तरी, तिचे काम हे पूर्णपणे वेश्‍यावस्तीतच असते, व्यभिचार सुरक्षित आणि स्वीकारयोग्य करणे हेच तिचे काम असते. अशा उदाहरणांवरून आपल्याला समजेल, की एखाद्याचा पगार कोठून येतो व कामाचे ठिकाण कोठे आहे यावर विचार करणे का महत्त्वाचे आहे.

५. काम केल्याचा परिणाम काय होईल; त्यामुळे एखाद्याचा विवेक दुखावेल का किंवा इतरांना अडखळण होईल का? आपल्या स्वतःचा आणि इतरांच्या विवेकाचाही विचार करणे जरूरीचे आहे. बहुतेक ख्रिश्‍चनांना एखादे विशिष्ट काम (त्याचे ठिकाण व पैशाचा उगमही) स्वीकारयोग्य वाटत असले तरी, एखाद्याला वाटेल, की त्या कामामुळे त्याचा विवेक सतत त्याला बोचत राहील. उत्तम उदाहरण मांडणाऱ्‍या प्रेषित पौलाने म्हटले: “सर्व बाबतीत चांगले वागण्याची आमची इच्छा असून आमचा विवेकभाव चांगला आहे अशी आमची खातरी आहे.” (इब्री लोकांस १३:१८) आपल्याला अस्वस्थ करणारे काम आपण टाळलेच पाहिजे; परंतु ज्यांचा विवेक त्यांना काम करू देतो अशांची आपण टीकाही करता कामा नये. याच्या उलट, एखाद्या ख्रिश्‍चनाला दिसेल, की एखादे विशिष्ट काम केल्याने तो बायबलचे उल्लंघन करीत नाही, पण मंडळीतल्या अनेकांना व समाजातील अनेकांना ते आवडत नाही याची त्याला जाणीव होईल. पौलाने आपल्या या शब्दांमध्ये उचित मनोवृत्ती दाखवली आहे: “आम्ही करीत असलेल्या सेवेत काही दोष दिसून येऊ नये म्हणून आम्ही कोणत्याहि प्रकारे अडखळण्यास कारण होत नाही; तर सर्व गोष्टीत देवाचे सेवक म्हणून आम्ही आपली लायकी पटवून देतो.”—२ करिंथकर ६:३, ४.

आता आपण चर्चच्या इमारतीमध्ये काम करण्याविषयी, जसे की नवीन खिडक्या बसवणे, गालिचे साफ करणे किंवा भट्टी नीट चालते की नाही हे पाहणे यांसारखी कामे करण्याविषयीच्या मुख्य प्रश्‍नाकडे वळू या. वरील मुद्दे येथे कसे लागू होतील?

अधिकाराविषयीच्या मुद्द्‌याची आठवण करा. एखाद्या चर्चचे काम घ्यायचे की नाही हे ठरवणारा तो ख्रिश्‍चन मालक किंवा मॅनेजर आहे का? तसा अधिकार असलेल्या ख्रिस्ती व्यक्‍तीला, खोट्या उपासनेला बढावा देणाऱ्‍या धर्माकडून काम स्वीकारण्याद्वारे किंवा कॉन्ट्रॅक्ट घेण्याद्वारे मोठ्या बाबेलचा वाटेकरी व्हायला आवडेल का? मग ते, स्वतःच्या दुकानात सिगारेटी किंवा मूर्ती विकायला ठेवण्यासारखेच होणार नाही का?—२ करिंथकर ६:१४-१६.

पण जर का ख्रिश्‍चन एक नोकर आहे व कोणती कामे स्वीकारयोग्य आहेत हे त्याला ठरवता येत नाही अशावेळी इतर मुद्द्‌यांचा विचार करणे आवश्‍यक आहे, जसे की कामाचे ठिकाण व त्यात तो किती प्रमाणात गोवला जाईल वगैरे. नोकरी करणाऱ्‍याला फक्‍त कधीतरी खुर्च्या नेऊन देण्याचे किंवा जुन्या खुर्च्या काढून नवीन खुर्च्या ठेवण्याचे काम करायला सांगितले जाते का किंवा अग्निशामक कर्मचारी म्हणून चर्चमध्ये लागलेली आग पसरण्याआधीच विझवण्याचे मानवी सेवेचे काम करण्यास सांगितले जाते का? पुष्कळांना हे, चर्चच्या रंगरंगोटीचे किंवा चर्च आकर्षक वाटावे म्हणून नियमितपणे बागेच्या कामांचा व्यवसाय खूप दिवसांपर्यंत करणाऱ्‍याच्या कामापासून वेगळे वाटेल. अशाप्रकारच्या नियमित किंवा प्रदीर्घ संपर्कामुळे पुष्कळ जणांची त्या ख्रिस्ती व्यक्‍तीला त्या धर्माशी जोडण्याची शक्यता आहे ज्या धर्माशी आपला काहीएक संबंध नाही असा तो दावा करतो; कदाचित हे इतरांना एक अडखळण बनू शकते.—मत्तय १३:४१; १८:६, ७.

नोकरीविषयक अनेक महत्त्वपूर्ण विचार आम्ही आपल्यापुढे मांडले आहेत. खोट्या धर्माचा समावेश असलेल्या एका विशिष्ट प्रश्‍नाच्या संदर्भात हे विचार मांडण्यात आले होते. तरीही, विविध प्रकारच्या नोकरीबाबतीतही त्यांचा तितकाच विचार करता येऊ शकतो. प्रत्येक बाबतीत, प्रार्थनापूर्वक पृथक्करण करण्याची, आणि समोरील परिस्थितीतील नेमक्या—व कदाचित त्याच परिस्थितीत आढळणाऱ्‍या—पैलूंचा विचार करणे जरूरीचे आहे. वरील नमूद केलेल्या मुद्द्‌यांनी अनेक प्रामाणिक ख्रिश्‍चनांना, जाणीवपूर्वक निर्णय घेण्यास मदत केली आहे; यावरून, यहोवासमोर सरळ आणि धार्मिकपणे चालण्याची त्यांची इच्छा असल्याचे दिसून येते.—नीतिसूत्रे ३:५, ६; यशया २:३; इब्री लोकांस १२:१२-१४.

[तळटीपा]

a दवाखान्यांमध्ये काम करणाऱ्‍या काही ख्रिश्‍चनांना अधिकाराच्या या मुद्द्‌यावर विचार करावा लागला होता. एखाद्या डॉक्टरला, एखाद्या रुग्णाला औषधे देण्याचा किंवा त्याला उपचार पद्धती सुचवण्याचा अधिकार असू शकतो. रुग्ण आक्षेप घेत नसला तरी, अधिकार असलेला एक ख्रिस्ती डॉक्टर, रक्‍त संक्रमण आणि गर्भपात यांविषयी बायबल काय म्हणते ते माहीत असूनही ते करण्यास कसे काय सांगेल बरे? या उलट, दवाखान्यात काम करणाऱ्‍या नर्सला तसा अधिकार नसेल. नेहमीची कामे करताना डॉक्टर तिला कदाचित कशासाठी तरी रक्‍ताची चाचणी करायला सांगतील किंवा गर्भपातासाठी आलेल्या रुग्णाची काळजी घ्यायला सांगतील. २ राजे ५:१७-१९ मधील उदाहरणाच्या अनुषंगाने ती कदाचित म्हणेल, की रक्‍त संक्रमण घ्यायला किंवा गर्भपात करायला सांगण्याचा तिला कसलाही अधिकार नसल्यामुळे ती केवळ मानवी सेवा म्हणून आपले काम करील. तरीदेखील तिला तिच्या विवेकाचा विचार करावा लागेल, जेणेकरून ती ‘देवाबरोबर पूर्ण सद्‌भावाने वागू’ शकेल.—प्रेषितांची कृत्ये २३:१.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा