आध्यात्मिक कमतरता ओळखून तिच्यावर मात करणे—कसे
ग्रीक दंतकथेनुसार, अकिलीझ हा, ट्रॉय शहराविरुद्धच्या लढाईतील अर्थात ट्रोजन युद्धांतील ग्रीक योद्धांपैकी सर्वात शूरवीर होता. दंतकथा म्हणते, की अकिलीझ बाळ होता तेव्हा त्याच्या आईने त्याला स्टीक्स नदीत बुडवून काढले होते; यामुळे, त्याच्या आईने त्याला जिथे धरले होते ती त्याची टाच—ज्याला अकिलीझ हील असेही म्हटले जाते ती टाच सोडून बाकी सर्व शरीरावर कोणतीही इजा होत नसे. पण ट्रॉयचा राजा प्रीअम याचा पुत्र पॅरीस याने अगदी त्याच टाचेवर बाण मारला ज्यामुळे अकिलीझ मरण पावला.
ख्रिस्ती जन ख्रिस्ताचे सैनिक आहेत, ते आध्यात्मिक युद्ध लढत आहेत. (२ तीमथ्य २:३) प्रेषित पौल स्पष्टीकरण देतो: “आपले झगडणे रक्तमांसाबरोबर नव्हे, तर सत्तांबरोबर, अधिकाऱ्याबरोबर, सध्याच्या काळोखातील जगाच्या अधिपतींबरोबर, आकाशातल्या दुरात्म्यांबरोबर आहे.” होय, दियाबल सैतान आणि त्याचे दूत यांच्याशिवाय आपले कोणीही शत्रू नाहीत.—इफिसकर ६:१२.
“परमेश्वर रणवीर आहे” असे ज्याला म्हटले आहे त्या यहोवा देवाकडून आपल्याला मिळणाऱ्या साहाय्याविना हे युद्ध एकांगी असते. (निर्गम १५:३) आपल्या क्रूर शत्रूंपासून आपले संरक्षण करण्याकरता आपल्याला आध्यात्मिक शस्त्रसामग्री देण्यात आली आहे. म्हणूनच प्रेषित पौल आर्जवतो: “सैतानाच्या डावपेचांपुढे तुम्हाला टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्रसामग्री धारण करा.”—इफिसकर ६:११.
यात काही संशय नाही, की यहोवा देवाकडून आलेली ही शस्त्रसामग्री उत्तम दर्जाची आहे, कोणत्याही प्रकारचा आध्यात्मिक हल्ला झेलणारी आहे. पौलाने दिलेल्या यादीकडे जरा लक्ष द्या: सत्याचा कमरपट्टा, नीतिमत्त्वाचे उरस्त्राण, सुवार्तेची पादत्राणे, विश्वासाची ढाल, तारणाचे शिरस्त्राण आणि आत्म्याची तरवार. याहूनही उत्तम अजून काय असेल? अशाप्रकारची शस्त्रसामग्री परिधान केल्यावर एखादा ख्रिस्ती सैनिक भयंकरातल्या भयंकर अडचणींतूनही विजयी होऊ शकतो.—इफिसकर ६:१३-१७.
यहोवाकडून येणारी आध्यात्मिक शस्त्रसामग्री उत्तम दर्जाची असली तरी व तिच्याद्वारे आपल्याला संरक्षण मिळत असले तरी, आपण तिला गृहीत धरता कामा नये. अजिंक्य वाटत असलेल्या अकिलीझची आठवण करा; त्याच्या त्या टाचेप्रमाणे आपल्यामध्येही कदाचित एखादी कमतरता, एखादे आध्यात्मिक वर्मस्थान असण्याची शक्यता आहे का? आपण कधी अचानक पकडलो गेलोच तर ते घातक ठरू शकते.
तुमच्या आध्यात्मिक शस्त्रसामग्रीचे परीक्षण करा
बर्फावर स्केटींग करणारा व दोन वेळा सुवर्णपदक मिळवलेला एक खेळाडू अगदी ठणठणीत होता, पण एकदा सराव करताना अचानक खाली कोसळला आणि मरण पावला. त्यानंतर काही दिवसांतच द न्यूयॉर्क टाईम्स बातमीपत्रकात ही विचारप्रवर्तक बातमी आली: “दर वर्षी हृदयाचा झटका येणाऱ्या ६,००,००० अमेरिकन लोकांपैकी निम्म्या लोकांना आधी कसलीही लक्षणे दिसली नव्हती.” तेव्हा, आपल्याला कसे वाटते फक्त त्यावरून आपली तब्येत ठरवता येत नाही.
हीच गोष्ट आपल्या आध्यात्मिक आरोग्याच्या बाबतीतही खरी आहे. बायबलचा सल्ला आहे: “आपण उभे आहो असे ज्याला वाटते त्याने पडू नये म्हणून संभाळावे.” (१ करिंथकर १०:१२) आपली आध्यात्मिक शस्त्रसामग्री सर्वात उत्तम असली तरी कमतरता निर्माण होऊ शकतात. याचे कारण आपला जन्मच पापात झाला आहे व आपली पापमय व अपरिपूर्ण प्रवृत्ती, देवाची इच्छा पूर्ण करण्याच्या आपल्या निर्धारावर सहजपणे प्राबल्य मिळवू शकते. (स्तोत्र ५१:५) आपले हेतू कितीही चांगले असले तरी, आपले कपटी अंतःकरण, खोटे तर्क किंवा सबबी रचण्याद्वारे आपली फसवणूक करू शकते ज्यामुळे आपण अगदी सहजपणे आपल्या कमतरतांकडे डोळेझाक करू व सर्वकाही चांगले चालले आहे असे समजून स्वतःची फसवणूक करून घेऊ.—यिर्मया १७:९; रोमकर ७:२१-२३.
याशिवाय, आपण अशा जगात जगत आहोत जेथे बरोबर काय आणि चूक काय त्याबद्दल लोक गोंधळून गेले आहेत व त्यांनी त्याचा विर्पयास केला आहे. एखाद्या मनुष्याला कसे वाटते त्यावरून एखादी गोष्ट बरोबर आहे की चूक हे ठरवले जाते. अशाप्रकारच्या विचारसरणीला जाहिराती, लोकप्रिय मनोरंजन आणि प्रसारमाध्यम यांद्वारे बढावा दिला जातो. तेव्हा हे स्पष्टच आहे, की आपण सावध नसलो तर आपलीही तशीच विचारसरणी होऊ शकते आणि आपली आध्यात्मिक शस्त्रसामग्री क्षीण होऊ शकते.
अशा घातक परिस्थितीत पडण्यापेक्षा आपण बायबलच्या या सल्ल्याकडे कान द्यावा: “तुम्ही विश्वासात आहा किंवा नाही ह्याविषयी आपली परीक्षा करा; आपली प्रतीति पाहा.” (२ करिंथकर १३:५) असे केल्यावर आपण आपल्यात निर्माण झालेल्या उणिवा ओळखू शकू व आपल्या शत्रूंना त्या दिसून त्यांनी हल्ला करण्याआधीच आपण त्यांची दुरुस्ती करू शकू. पण, हे परीक्षण आपण कसे करू शकतो? आत्म-परीक्षण करताना कोणत्या काही लक्षणांबाबत आपण दक्ष असले पाहिजे?
लक्षणे ओळखणे
आध्यात्मिक कमतरता दर्शवणारे एक सामान्य लक्षण म्हणजे, आपल्या व्यक्तिगत अभ्यासाच्या सवयीत ढिले पडणे. काहींना वाटेल, की आपण खूप अभ्यास केला पाहिजे पण त्यांच्याच्याने ते होतच नसते. आजच्या धावपळीच्या जगात एखाद्याची सहजपणे अशी वाईट अवस्था होऊ शकते. परंतु याहूनही वाईट म्हणजे, काही लोक तर चक्क असे कारण देतात की, आमची स्थिती इतकी काही वाईट नाही कारण आम्ही आम्हाला जमेल तेव्हा बायबल आधारित प्रकाशने वाचतच असतो व केव्हातरी ख्रिस्ती सभांनाही जातोच.
अशाप्रकारचा तर्क फसवा असू शकतो. आपल्याला निवांत बसून जेवायला वेळ नाही म्हणून काम करता करता वेळ मिळेल तेव्हा तोंडात काही टाकत राहणाऱ्या माणसासारखीच ही गत झाली. अशाने तो उपाशी राहणार नाही पण आज ना उद्या त्याच्या तब्येतीवर त्याचा विपरित परिणाम नक्कीच होईल. तसेच, पौष्टिक आध्यात्मिक अन्न सतत न घेतल्याने आपल्या आध्यात्मिक शस्त्रसामग्रीत कमतरता निर्माण होऊ शकतात. आपल्यावर जगीक विचारांचा व मनोवृत्तींचा सतत भडिमार होत असल्यामुळे आपण सैतानाच्या प्राणघातक हल्ल्यांना सहज बळी पडू शकतो.
आध्यात्मिक कमतरतेचे आणखी एक लक्षण म्हणजे, आपल्या आध्यात्मिक युद्धात निकडीची जाणीव हरवून बसणे. शांती समयात सैनिकाला कोणतीही चिंता नसते, त्याला युद्धाची भीती नसते. यामुळे सज्ज राहण्याची निकड त्याला जाणवणार नाही. त्याला अचानक बोलावण्यात आल्यास तो निश्चितच तयार नसेल. आध्यात्मिकतेबद्दलही असेच आहे. आपल्यामधली निकडीची जाणीव आपण कमी होऊ दिल्यास, आपल्यावर येणाऱ्या हल्ल्यांचा प्रतिकार करण्यासाठी आपण तयार नसू.
आपली अशी अवस्था झाली आहे हे आपण कसे म्हणू शकतो? आपण स्वतःला असे काही प्रश्न विचारून पाहू शकतो ज्यामुळे खरी परिस्थिती दिसून येईल: मी फिरायला जायला जितका उत्सुक असतो तितकाच सेवेत भाग घेण्यास असतो का? बाजारहाट करायला किंवा टीव्ही पाहायला जसा मी वेळ खर्च करायला तयार असतो तसा सभांची तयारी करण्यासाठी तयार असतो का? मी ख्रिस्ती बनलो तेव्हा जगीक गोष्टी किंवा संधी सोडून दिल्याचा मला पस्तावा होतो का? इतरजण जे तथाकथित आरामदायक जीवन जगत आहेत ते पाहून मला वाईट वाटते का? हे विचार-प्रवर्तक प्रश्न आहेत, पण ते आपल्या आध्यात्मिक शस्त्रसामग्रीत कोणतीही कमतरता ओळखण्यास मदत करतील.
आपली संरक्षणात्मक शस्त्रसामग्री आध्यात्मिक असल्यामुळे, आपल्या जीवनात देवाच्या आत्म्याचा सतत प्रवाह राहणे अतिशय महत्त्वाचे आहे. आपल्या सर्व कार्यात देवाच्या आत्म्याची फळे किती प्रमाणात दिसून येतात यावरून हे दिसून येते. तुम्हाला आवडत नाही असे कोणी काही बोलले किंवा काही केले तर तुम्ही लागलीच चिडता का? तुम्हाला सल्ला स्वीकारायला जड जाते का, किंवा इतरजण नेहमी तुमची टीका करत असतात असे तुम्हाला वाटते का? इतरांना मिळणारे आशीर्वाद किंवा त्यांचे यश पाहून तुमचा जळफळाट होतो का? इतरांबरोबर खासकरून तुमच्याच वयाच्या लोकांबरोबर तुमचे पटत नाही का? अशाप्रकारे स्वतःचे प्रामाणिकपणे परीक्षण केल्यास आपल्याला दिसून येईल, की आपले जीवन देवाच्या आत्म्याच्या फळांनी बहरले आहे की शरीराची कामे नकळत डोकावू लागली आहेत.—गलतीकर ५:२२-२६; इफिसकर ४:२२-२७.
आध्यात्मिक कमतरतेवर मात करण्यासाठी सकारात्मक पावले
आध्यात्मिक कमतरता ओळखणे एक गोष्ट आहे, पण त्यांचा सामना करणे व सुधारणा करण्यासाठी पावले उचलणे ही अगदी वेगळी बाब आहे. दुःखाची गोष्ट म्हणजे, पुष्कळ जण सबबी सांगतात, मनाची समजूत घालायचा प्रयत्न करतात, समस्येला क्षुल्लक समजतात, किंवा समस्या असल्याचे कबूल करत नाहीत. हे, अर्धवट शस्त्रसामग्री परिधान करून लढाईला जाण्याइतके घातक आहे! अशाने, सैतान आपल्यावर सहजपणे हल्ला चढवू शकेल. कोणतीही कमतरता आपल्या लक्षात आल्या आल्या आपण ती सुधरवण्याकरता सकारात्मक पावले उचलली पाहिजेत. आपण काय करू शकतो?—रोमकर ८:१३; याकोब १:२२-२५.
आपण आध्यात्मिक युद्धात—ज्यात एखाद्या ख्रिश्चनाच्या मनावर आणि अंतःकरणावर नियंत्रण केले जाते अशा युद्धात सामील असल्यामुळे आपण आपल्या अवयवांचे होईल तितके संरक्षण केले पाहिजे. आपल्या आध्यात्मिक शस्त्रसामग्रीत आपल्या अंतःकरणाचे संरक्षण करणारे “नीतिमत्त्वाचे उरस्त्राण” आणि आपल्या मनाचे संरक्षण करणारे “तारणाचे शिरस्त्राण” आहे हे आठवा. या साधनांचा प्रभावशालीपणे उपयोग करण्यास शिकणे हा यश आणि अपयश यांतील फरक होऊ शकतो.—इफिसकर ६:१४-१७; नीतिसूत्रे ४:२३; रोमकर १२:२.
“नीतिमत्त्वाचे उरस्त्राण” उचितरीत्या परिधान करण्याकरता, नीतिमत्त्वाबद्दल आपल्याला आवड आहे व अधार्मिकतेचा आपल्याला वीट आहे याविषयी स्वतःचे नेहमी परीक्षण करणे आवश्यक आहे. (स्तोत्र ४५:७; ९७:१०; आमोस ५:१५) जगाप्रमाणे आपलेही दर्जे खालावलेले आहेत का? एकेकाळी धक्केदायक किंवा आक्षेपार्ह वाटणाऱ्या खऱ्या जीवनातल्या किंवा टीव्ही अथवा सिनेमात, पुस्तके आणि पत्रिकांमध्ये दाखवल्या जाणाऱ्या गोष्टी आता आपल्याला पाहायला मजा वाटते का? स्वातंत्र्य आणि जगीक अनुभव म्हणून ज्याचे जगामध्ये कौतुक केले जाते तो वास्तविकतेत लैंगिक स्वैराचार आणि फसवे रूप धारण केलेला मीपणा असेल हे समजण्यास धार्मिकतेवरील प्रेम आपल्याला मदत करील.—रोमकर १३:१३, १४; तीत २:१२.
“तारणाचे शिरस्त्राण” घालण्यामध्ये, भवितव्यातील अद्भुत आशीर्वाद मनात स्पष्टपणे ठेवणे, जगाची आकर्षकता आणि मोहकता पाहून भरकटत न जाणे हे समाविष्ट आहे. (इब्री लोकांस १२:२, ३; १ योहान २:१६) असा दृष्टिकोन बाळगल्यास, आपण भौतिक प्राप्ती किंवा व्यक्तिगत फायदा यांच्याऐवजी आध्यात्मिक गोष्टींना प्रथम स्थान देऊ. (मत्तय ६:३३) अशाप्रकारे, ही शस्त्रसामग्री नीट धारण केली आहे की नाही याची खात्री करण्यासाठी आपण प्रांजळपणे स्वतःला विचारले पाहिजे: जीवनात मी कशाच्या मागे लागलो आहे? माझी विशिष्ट आध्यात्मिक ध्येय आहेत का? ते साध्य करण्याकरता मी काय करत आहे? आपण शेष अभिषिक्त ख्रिश्चनांपैकी असलो किंवा ‘मोठ्या लोकसमुदायातील’ असलो तरी पौलाचे अनुकरण केले पाहिजे ज्याने म्हटले, “मी अद्यापि ते आपल्या कह्यात घेतले असे मानीत नाही; तर मागील गोष्टींकडे दुर्लक्ष करून व पुढील गोष्टींकडे लक्ष लावून, . . . बक्षिस मिळवण्यासाठी मर्यादेवरील खुणेकडे मी धावतो.”—प्रकटीकरण ७:९; फिलिप्पैकर ३:१३, १४.
आपल्या आध्यात्मिक शस्त्रसामग्रीचे पौलाचे वर्णन समाप्त होताना तो असा सल्ला देतो: “सर्व प्रकारची प्रार्थना व विनवणी करा, सर्व प्रसंगी आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना करा, आणि ह्या कामी पूर्ण तत्परतेने व सर्व पवित्र जनांसाठी विनवणी करीत जागृत राहा.” (इफिसकर ६:१८) यावरून, कोणत्याही आध्यात्मिक कमतरतेवर मात करण्याकरता किंवा ती टाळण्याकरता दोन सकारात्मक पावले आहेत: देवाबरोबर चांगला नातेसंबंध प्रस्थापित करणे आणि सहख्रिश्चनांबरोबर घनिष्ट नातेसंबंध विकसित करणे.
‘सर्व प्रकारच्या’ प्रार्थनांद्वारे (अर्थात, आपल्या पापांची कबुली, क्षमायाचना, मार्गदर्शनाकरता विनंती, आशीर्वादांकरता उपकार, पूर्ण मनापासून स्तुती) आणि “सर्व प्रसंगी” (अर्थात, जाहीरपणे, खाजगीत, व्यक्तिगतपणे, तत्क्षणी) यहोवाकडे जाण्याची आपली सवय असल्यास आपण यहोवाच्या समीप जातो. याच्यासारखे संरक्षण आपल्याला दुसरीकडे कोठेही मिळणार नाही.—रोमकर ८:३१; याकोब ४:७, ८.
दुसऱ्या बाजूला पाहता, आपल्याला “सर्व पवित्र जनांसाठी” अर्थात आपल्या सहख्रिश्चनांसाठी प्रार्थना करण्यास आर्जवण्यात आले आहे. आपण कदाचित आपल्या प्रार्थनांमध्ये, छळात किंवा दुसऱ्या संकटात असलेल्या आपल्या दूर देशांतल्या बांधवांची आठवण करू. पण आपण दररोज ज्यांच्याबरोबर काम करतो किंवा सहवास करतो अशा ख्रिश्चनांबद्दल काय? त्यांच्यासाठीही प्रार्थना करणे उचित ठरेल कारण स्वतः येशूनेही आपल्या शिष्यांसाठी प्रार्थना केली. (योहान १७:९; याकोब ५:१६) अशाप्रकारच्या प्रार्थना आपल्याला एकमेकांच्या समीप आणतात आणि “त्या दुष्टापासून” येणाऱ्या हल्ल्यांचा प्रतिकार करण्यास शक्ती देतात.—२ थेस्सलनीकाकर ३:१-३.
शेवटी, प्रेषित पेत्राचे हे प्रेमळ आर्जवणे लक्षात ठेवा: “सर्वांचा शेवट जवळ आला आहे; म्हणून मर्यादेने राहा, व प्रार्थना करण्यासाठी सावध असा; मुख्यतः एकमेकांवर एकनिष्ठेने प्रीति करा; कारण प्रीति पापांची रास झाकून टाकते.” (१ पेत्र ४:७, ८) इतरांच्या आणि आपल्या स्वतःच्या मानवी अपरिपूर्णतांना आपल्या अंतःकरणात व मनात शिरू देऊन अडखळण होऊ देणे अगदी सोपे आहे. ही मानवी अपरिपूर्णता सैतानाला चांगल्याप्रकारे माहीत आहे. फूट पाडून कब्जा करणे हा त्याच्या धूर्त डावपेचांपैकी एक आहे. यास्तव, आपण लागलीच अशा पापांवर एकमेकांसाठी असलेल्या प्रीतीचे पांघरूण घातले पाहिजे व “सैतानाला वाव” देता कामा नये.—इफिसकर ४:२५-२७.
आता आध्यात्मिकरीत्या दृढ राहा
तुमचे केस विस्कटले आहेत किंवा तुमच्या गळ्यांतला हार वाकडा झाला आहे हे तुमच्या लक्षात आल्यावर तुम्ही काय कराल? होता होईल तितक्या लवकर ते नीट करण्याचा तुम्ही प्रयत्न कराल. हे सर्व इतके काही महत्त्वाचे नाही असे समजून फार क्वचित लोक त्याकडे दुर्लक्ष करतील. पण आपल्या आध्यात्मिक कमतरतेबाबत आपण लागलीच कार्यहालचाल करू या. शारीरिक दोषांमुळे लोक आपल्याकडे विचित्रपणे पाहतील; पण आध्यात्मिक कमतरता सुधारल्या गेल्या नाहीत तर यहोवा असंतुष्ट होऊ शकतो.—१ शमुवेल १६:७.
आपल्यातील आध्यात्मिक कमतरता दूर करण्याकरता व स्वतःला आध्यात्मिकरीत्या सुदृढ करण्याकरता यहोवाने प्रेमळपणे आपल्याला हवी ती मदत देऊ केली आहे. आपण काय केले पाहिजे यांबद्दल तो ख्रिस्ती सभा, बायबल प्रकाशने, प्रौढ आणि काळजी घेणारे सहख्रिश्चन यांच्याद्वारे आपल्याला सतत स्मरणिका व उपदेश देत असतो. हे सर्व स्वीकारून त्यांचा अवलंब करणे आपल्यावर आहे. यासाठी प्रयत्न आणि आत्म-शिस्तीची गरज आहे. पण प्रेषित पौलाचे प्रामाणिक मत काय आहे ते पाहा: “म्हणून मीहि तसाच धावतो, म्हणजे अनिश्चितपणे धावत नाही. तसेच मुष्टियुद्धहि करितो, म्हणजे वाऱ्यावर मुष्टिप्रहार करीत नाही; तर मी आपले शरीर कुदलतो व त्याला दास करून ठेवतो; असे न केल्यास मी दुसऱ्यास घोषणा केल्यावर कदाचित मी स्वतः पसंतीस न उतरलेला असा ठरेन.”—१ करिंथकर ९:२६, २७.
नेहमी जागृत राहा व केव्हाही अकिलीझ हील म्हणजे आध्यात्मिक वर्मस्थान स्वतःमध्ये निर्माण होऊ देऊ नका. तर, आपल्यातील आध्यात्मिक कमतरता ओळखण्यासाठी व त्यावर मात करण्यासाठी आवश्यक ती पावले नम्रपणे व धैर्याने उचलण्याचा आपण प्रयत्न करू या.
[१९ पानांवरील संक्षिप्त आशय]
”तुम्ही विश्वासात आहां किंवा नाही ह्याविषयी आपली परीक्षा करा; आपली प्रतीति पाहा.”—२ करिंथकर १३:५.
[२१ पानांवरील संक्षिप्त आशय]
”प्रार्थना करण्यासाठी सावध असा; मुख्यतः एकमेकांवर एकनिष्ठेने प्रीति करा; कारण प्रीति पापांची रास झाकून टाकते.”—१ पेत्र ४:७, ८.
[२० पानांवरील चौकट/चित्र]
स्वतःला विचारा. . .
◆ बाजारहाट करायला किंवा टीव्ही पाहायला जशी मी वेळ खर्च करायला तयार असते तशी सभांची तयारी करण्यासाठी तयार असते का?
◆ इतरांचं आरामदायक जीवन पाहून मला वाईट वाटतं का?
◆ मला आवडत नाही असं कोणी बोलल्यास किंवा केल्यास मी लागलीच चिडते का?
◆ मला सल्ला स्वीकारायला जड जातं का, की इतरजण नेहमी माझी टीका करतात असं मला वाटतं?
◆ इतरांबरोबर माझं पटत नाही का?
◆ जगाप्रमाणे माझेही दर्जे खालावले आहेत का?
◆ माझी विशिष्ट आध्यात्मिक ध्येय आहेत का?
◆ आध्यात्मिक ध्येय साध्य करण्याकरता मी काय करत आहे?
[Picture Credit Lines on page 18]
अकिलीझ: From the book Great Men and Famous Women; रोमी सैनिक आणि पृष्ठ २१: Historic Costume in Pictures/Dover Publications, Inc., New York