वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w99 ४/१५ पृ. १५-१७
  • तुम्ही कृतज्ञता दाखवता का?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तुम्ही कृतज्ञता दाखवता का?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • स्वतः यहोवा कदर व्यक्‍त करतो
  • खोल कदर बाळगणारा—येशू
  • टीका करण्याचा सैतानाचा स्वभाव
  • देव आणि ख्रिस्ताचे अनुकरण करा
  • “कृतज्ञ असा”
    आमची राज्य सेवा—२००८
  • यहोवा कृतज्ञ देव आहे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००७
  • “कृतज्ञ असा”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००३
  • तुमच्या जीवनात सगळ्यात महत्त्वाची व्यक्‍ती कोण आहे?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०११
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
w99 ४/१५ पृ. १५-१७

तुम्ही कृतज्ञता दाखवता का?

पश्‍चिम आफ्रिकेत एका मिशनरी गृहात टेडी नावाचा एक कुत्रा होता. त्याच्यापुढे कोणी मटणाचा तुकडा टाकल्यास तो त्यास गट्टकन गिळत असे. उष्णप्रदेशातील त्या उन्हात उभं राहून, आपल्याकडे पुन्हा कधी अन्‍न फेकले जाईल त्याची वाट पाहायचा. खाऊन झाल्यावर तो आपली पाठ वळवून तेथून निघून जायचा.

टेडीने केव्हाही त्याला मिळणाऱ्‍या अन्‍नाबद्दल थोडीसुद्धा कृतज्ञता व्यक्‍त केली नाही आणि कोणी त्याच्याकडून तशी अपेक्षाही केली नाही. कारण शेवटी तो एक कुत्रा होता.

कृतज्ञतेसंबंधी, प्राण्यांपेक्षा आपण बहुधा सहमानवांकडून जरा जास्तच अपेक्षा करतो. बहुतेकवेळा आपली निराशा होते. पुष्कळजण जीवनामध्ये हाती लागतील त्या गोष्टी घेऊन आणखी मिळण्याची अपेक्षा करत असतात. ह्‍यातही नवल करण्यासारखे काही नाही. शेवटल्या दिवसांतील लोक, उपकार न स्मरणारी होतील असे बायबलने भाकीत केले होते.—२ तीमथ्य ३:१, २.

परंतु, देवाच्या सेवकांचा स्वभाव वेगळा आहे. सहविश्‍वासूंना उपदेश दिलेल्या प्रेषित पौलाच्या सल्ल्याकडे ते लक्ष देतात: “तुम्ही कृतज्ञ असा.”—कलस्सैकर ३:१५.

स्वतः यहोवा कदर व्यक्‍त करतो

कदर दाखवण्याच्या बाबतीत यहोवा देवाचे परिपूर्ण उदाहरण आहे. तो आपल्या विश्‍वासू सेवकांना कसे लेखतो ते पाहा. पौलाने ईश्‍वरप्रेरणेने इब्री ख्रिश्‍चनांना असे लिहिले: “तुमचे कार्य व तुम्ही पवित्र जनांची केलेली व करीत असलेली सेवा आणि तुम्ही देवावर दाखविलेली प्रीति, ही विसरून जाण्यास तो अन्यायी नाही.”—इब्री लोकांस ६:१०.

यहोवा आपल्या विश्‍वासू सेवकांची कदर करतो याची कैक उदाहरणे आहेत. त्याने अब्राहामला आशीर्वाद दिला; त्याच्या पोटच्या संततीची वृद्धी केली ज्यामुळे ती “आकाशातील ताऱ्‍यांइतकी, समुद्रतीरीच्या वाळूइतकी” झाली. (उत्पत्ति २२:१७) परिक्षेत ईयोब विश्‍वासू राहिल्याबद्दल यहोवाने त्याची कदर बाळगली आणि ईयोबाला त्याने गमावलेली अमाप संपत्ती पुन्हा मिळवून दिली, नव्हे ती “दुप्पट” केली. (ईयोब ४२:१०) हजारो वर्षांपासून यहोवा मानवजातीबरोबर ज्याप्रकारे व्यवहार करत आला आहे त्यावरून “परमेश्‍वराचे नेत्र अखिल पृथ्वीचे निरीक्षण करीत असतात, जे कोणी सात्विक चित्ताने त्याच्याशी वर्ततात त्यांचे साहाय्य करण्यात तो आपले सामर्थ्यं प्रगट करितो” हे वाक्य सत्य ठरले आहे.—२ इतिहास १६:९.

देवाची इच्छा पूर्ण करणाऱ्‍यांबद्दल कदर आणि त्यांना प्रतिफळ देण्याची त्याची इच्छा, हे त्याच्या व्यक्‍तिमत्त्वाचे प्रमुख गुण आहेत. हे मान्य करणे ख्रिस्ती विश्‍वासासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. पौलाने लिहिले: “विश्‍वासावाचून त्याला संतोषविणे अशक्य आहे; कारण देवाजवळ जाणाऱ्‍याने असा विश्‍वास ठेवला पाहिजे की, . . . त्याचा शोध झटून करणाऱ्‍यांना तो प्रतिफळ देणारा आहे.”—इब्री लोकांस ११:६.

पण यहोवा जर कडक आणि टीका करणारा असता तर आपण सर्वच दोषी ठरलो असतो. स्तोत्रकर्त्याने फार पूर्वी असे म्हटले होते: “हे परमेशा, तू अधर्म लक्षात आणिशील, तर हे प्रभू, तुझ्यापुढे कोण टिकाव धरील?” (स्तोत्र १३०:३) यहोवा नेहमी कदर बाळगतो आणि कोणाची टीका करत नाही. त्याची सेवा करणाऱ्‍यांची तो काळजी घेतो. तो त्यांची प्रशंसा करतो.

खोल कदर बाळगणारा—येशू

आपल्या स्वर्गीय पित्याच्या गुणांची हुबेहूब नक्कल करणाऱ्‍या येशू ख्रिस्ताने, इतरांनी विश्‍वासामध्ये केलेल्या गोष्टींबद्दल कदर दाखवली. जेरुसलेमच्या मंदिरात एकदा काय घडले त्याचा विचार करा: “मग [येशूने] दृष्टि वर करून धनवानांना आपली दाने मंदिराच्या भांडारांत टाकतांना पाहिले. त्याने एका दरिद्री विधवेलाहि तेथे दोन टोल्या टाकतांना पाहिले; तेव्हा तो म्हणाला, मी तुम्हाला खरे सांगतो, ह्‍या दरिद्री विधवेने सर्वांपेक्षा अधिक टाकले आहे. कारण त्या सर्वांनी आपल्या समृद्धीतून दानांत टाकले; हिने तर आपल्या कमताईतून आपली सर्व उपजीविका टाकली आहे.”—लूक २१:१-४.

पैशांच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास, खासकरून धनिकांच्या देणगीशी तुलना केल्यास ती देणगी अल्प होती. तेथे उपस्थित असलेल्या बहुतेकांचे लक्ष कदाचित तिच्याकडे गेलेही नसावे. मात्र येशूचे लक्ष तिच्याकडे गेले. त्याने तिची परिस्थिती समजून घेतली. येशूने तिला पाहिले आणि तिची प्रशंसा केली.

दुसरे उदाहरण आहे एका श्रीमंत स्त्रीचे, मरियेचे. एके भोजनप्रसंगी, या स्त्रीने त्याच्या पायांवर आणि डोक्यावर खूप महागडे सुवासिक तेल ओतले. हे तेल विकून मिळालेला पैसा गोरगरिबांमध्ये वाटता आला असता अशी काहींनी टीका केली. येशूने कशी प्रतिक्रिया दाखवली? तो म्हणाला: “हिच्या वाटेस जाऊ नका, हिला त्रास का देता? हिने माझ्यासाठी एक सत्कृत्य केले आहे. मी तुम्हाला खचित सांगतो की, सर्व जगात जेथे जेथे सुवार्तेची घोषणा करण्यात येईल तेथे तेथे हिने जे केले आहे तेहि हिच्या स्मरणार्थ सांगण्यात येईल.”—मार्क १४:३-६, ९; योहान १२:३.

या महागड्या तेलाचा दुसरीकडे चांगला वापर झाला असता असे म्हणून त्याने दुःख व्यक्‍त करत टीका केली नाही. त्याने मरियेच्या प्रेमाच्या व विश्‍वासाच्या उदार प्रदर्शनाची कदर केली. ही घटना, तिच्या उत्तम कार्याची आठवण म्हणून बायबलमध्ये लिहून ठेवण्यात आली आहे. हे आणि इतर अहवाल दाखवतात, की येशू खोल कदर दाखवणारा मनुष्य होता.

तुम्ही देवाचे सेवक आहात तर, शुद्ध उपासनेला बढावा देण्याकरता तुम्ही करत असलेल्या प्रयत्नांची यहोवा देव आणि येशू ख्रिस्त फार कदर बाळगतात याची तुम्ही खात्री बाळगू शकता. हे माहीत असल्यामुळे आपण त्यांच्या अधिक निकट जातो व स्वतःही कृतज्ञ असण्याद्वारे त्यांचे अनुकरण करण्यास प्रवृत्त होतो.

टीका करण्याचा सैतानाचा स्वभाव

आता आपण दियाबल सैतानाच्या उदाहरणाचा विचार करू या; तो केव्हाही कदर दाखवत नाही. सैतानाने कदर न दाखवल्यामुळेच तर त्याने देवाविरुद्ध बंड करण्यात पुढाकार घेतला.

सैतानाने स्वतःमध्ये असमाधानाची टीकात्मक वृत्ती जोपासली आणि इतरांच्या मनातही तो ती पेरत गेला. एदेन बागेत घडलेल्या घटनांचा विचार करा. यहोवाने पहिला पुरुष व पहिली स्त्री निर्माण केली, त्यांना परादीसमय बागेत ठेवले आणि त्यांना सांगितले: “बागेतील वाटेल त्या झाडाचे फळ यथेच्छ खा.” पण फक्‍त एकच अट होती. देव म्हणाला: “बऱ्‍यावाइटाचे ज्ञान करून देणाऱ्‍या झाडाचे फळ खाऊ नको; कारण ज्या दिवशी त्याचे फळ तू खाशील त्या दिवशी तू खास मरशील.”—उत्पत्ति २:१६, १७.

पण सैतानाने यहोवाच्या विश्‍वासार्हतेला ललकारले. काही अंशी त्याला हव्वेला कृतघ्न बनवायचे होते, जेणेकरून ती त्याच्याप्रमाणे यहोवाविरुद्ध बंड करील. सैतानाने तिला विचारले: “तुम्ही बागेतल्या कोणत्याहि झाडाचे फळ खाऊ नये असे देवाने तुम्हास सांगितले हे खरे काय?” (उत्पत्ति ३:१) त्यावरून त्याला असे म्हणायचे होते, की देव हव्वेपासून खूप मौल्यवान असे काहीतरी लपवत होता, ज्यामुळे तिचे डोळे उघडले असते व ती देवासारखी झाली असती. यहोवा देवाने हव्वेवर जितक्या आशीर्वादांचा वर्षाव केला होता त्याबद्दल कृतज्ञता दाखवण्याऐवजी, जे मना केले होते त्याची तिने हाव धरली.—उत्पत्ति ३:५, ६.

पुढे याचे नाशकारक परिणाम तर आपल्या सर्वांना चांगले माहीतच आहेत. ती “अवघ्या जीवधारी जनांची माता” असल्यामुळे तिला हव्वा असे नाव देण्यात आले, पण ती तर मरणाच्या पंथास लागलेल्या मानवजातीची माता बनली. ज्याद्वारे मरण आले असा पापाचा वारसा सर्व मानवजातीला आदामापासून मिळाला आहे.—उत्पत्ति ३:२०; रोमकर ५:१२.

देव आणि ख्रिस्ताचे अनुकरण करा

सैतान आणि येशू यांच्यातला फरक पाहा. सैतानाला “आमच्या बंधूंना दोष देणारा आमच्या देवासमोर रात्रंदिवस त्यांच्यावर दोषारोप करणारा,” असे म्हटले आहे. (प्रकटीकरण १२:१०) येशू ‘देवाजवळ जाणाऱ्‍यांना पूर्णपणे तारण्यास समर्थही आहे; कारण त्यांच्यासाठी मध्यस्थी करण्यास तो सर्वदा जिवंत आहे.’—इब्री लोकांस ७:२५.

सैतान देवाच्या सेवकांची निंदा करतो. येशू त्यांची कदर करतो आणि त्यांच्या वतीने विनंती करतो. ख्रिस्ताचे अनुकरण करणारे या नात्याने ख्रिश्‍चनांनी एकमेकांमधील चांगले गुण शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे, एकमेकांची प्रशंसा केली पाहिजे आणि कदर बाळगली पाहिजे. असे करून, ते प्रशंसा करण्यात ज्याचे उत्तम उदाहरण आहे त्या यहोवा देवाला कृतज्ञता व्यक्‍त करतात.—१ करिंथकर ११:१.

[१७ पानांवरील चित्र]

येशूने मरियेच्या उत्तम कार्याबद्दल तिची प्रशंसा केली

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा