वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w99 ४/१ पृ. ९-१४
  • मृत्यूनंतर जीवन—लोकांचा काय विश्‍वास आहे?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • मृत्यूनंतर जीवन—लोकांचा काय विश्‍वास आहे?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • उत्तरे अनेक, विषय एक
  • सिद्धान्ताचा उगम
  • खोट्या धर्माच्या जागतिक साम्राज्याचा विस्तार पूर्वेकडेस वाढतो
  • यहुदी धर्म, ख्रिस्ती धर्मजगत आणि मुस्लिम धर्माबद्दल काय?
  • पुनरुत्थानावरील तुमचा विश्‍वास किती भक्कम आहे?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • जीवाकरता एक चांगली आशा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
w99 ४/१ पृ. ९-१४

मृत्यूनंतर जीवन—लोकांचा काय विश्‍वास आहे?

“मनुष्य मृत झाल्यावर पुनः जिवंत होईल काय?”—ईयोब १४:१४.

१, २. एखादी प्रिय व्यक्‍ती मरण पावते तेव्हा पुष्कळ जण कसे सांत्वन मिळवतात?

न्यूयॉर्क शहराच्या एका अंत्यविधीच्या खोलीत, कॅन्सरमुळे मरण पावलेल्या एका १७ वर्षीय मुलाच्या उघड्या शवपेटीभोवती त्याचे कुटुंब आणि मित्र शांतपणे उभे होते. दुःखाने व्याकूळ झालेली त्याची आई अश्रू गाळत सारखी सारखी म्हणत होती: “टॉमी आता खूष आहे. देवाला टॉमी त्याच्याबरोबर स्वर्गात हवा होता.” असा विश्‍वास करण्यास तिला शिकवण्यात आले होते.

२ सुमारे ११,००० किलोमीटर दूरवर, भारतातील जामनगर येथे, तीन मुलांपैकी सर्वात थोरला मुलगा आपल्या मृत पित्याच्या चितेला अग्नी देतो. आगीमुळे लाकडांचा तडतड असा आवाज होतो तेव्हा ब्राम्हण एक संस्कृत श्‍लोक म्हणतो: “अमर आत्मा अंतिम सत्याशी एकरूप होवो.”

३. कोणत्या प्रश्‍नांवर लोकांनी अनेक युगांपासून खूप विचार केला आहे?

३ मृत्यूची वास्तविकता आपल्या सर्वांसमोर आहे. (रोमकर ५:१२) मृत्यूच हा सर्वांचा शेवट आहे का, असा विचार आपल्या मनात डोकावणे स्वाभाविक आहे. झाडांच्या नैसर्गिक चक्रावर विचार करताना यहोवा देवाचा एक प्राचीन विश्‍वासू सेवक ईयोब, याने असे निरीक्षले: “वृक्षांची काही तरी आशा असते; तो तोडिला तरी पुनः फुटतो; त्याला धुमारा फुटावयाचा राहात नाही.” मग मानवांबद्दल काय? “मनुष्य मृत झाल्यावर पुनः जिवंत होईल काय?” असा प्रश्‍न ईयोबाने विचारला. (ईयोब १४:७, १४) अनेक युगांपासून प्रत्येक समाजातील लोकांनी, मृत्यूनंतर जीवन आहे का? असल्यास, कोणत्या प्रकारचे जीवन? परिणामतः, लोक काय विश्‍वास करतात? व का? या प्रश्‍नांवर खूप विचार केला आहे.

उत्तरे अनेक, विषय एक

४. विविध धर्मांच्या लोकांचा मृत्यूनंतर जीवनाबद्दल काय विश्‍वास आहे?

४ मृत्यूनंतर लोक एकतर स्वर्गात जातात किंवा नरकात जातात, असा अनेक नामधारी ख्रिश्‍चनांचा विश्‍वास आहे. दुसऱ्‍या बाजूला, हिंदू लोकांचा पुनर्जन्मावर विश्‍वास आहे. मुस्लिम विश्‍वासानुसार, मृत्यूनंतर न्यायाचा एक दिवस असेल जेव्हा अल्ला, प्रत्येकाने आपले जीवन कसे व्यतीत केले ते पाहील आणि त्यानुसार त्याला जन्‍नत (स्वर्ग) अथवा डोझाक (नरक) येथे पाठवेल. काही देशात, मृतांबद्दलचा विश्‍वास म्हणजे, स्थानिक रीतीरिवाज आणि तथाकथित ख्रिस्ती विश्‍वास यांचे मोहक मिश्रण आहे. जसे की, श्रीलंकेत बौद्ध आणि कॅथलिक दोन्ही धर्माचे लोक, त्यांच्या घरात एखाद्याचा मृत्यू होतो तेव्हा आपल्या घराची दारे व खिडक्या सताड उघडी ठेवतात आणि शवपेटी अशाप्रकारे ठेवतात, की मृत व्यक्‍तीचे पाय समोरच्या दाराच्या दिशेने असतील. यामुळे मृत व्यक्‍तीच्या आत्म्याला बाहेर जाता येते, असा त्यांचा विश्‍वास आहे. पश्‍चिम आफ्रिकेतील अनेक कॅथलिक व प्रोटेस्टंट लोकांमध्ये, एखाद्याचा मृत्यू होतो तेव्हा घरातील सर्व आरसे झाकून ठेवण्याची रीत आहे जेणेकरून कोणीही मृत व्यक्‍तीचा आत्मा पाहणार नाही. आणि मग ४० दिवसांनंतर, कुटुंब आणि मित्रपरिवार आत्म्याचे स्वर्गारोहण साजरे करतात.

५. बहुतेक धर्मांचे मतैक्य असलेला प्रमुख विश्‍वास कोणता?

५ इतके भिन्‍नभिन्‍न विश्‍वास असले तरी, बहुतेक धर्मांचे एका गोष्टीवर मतैक्य आहे. मानवामध्ये असे काहीतरी आहे जे अमर असते व शरीराचा मृत्यू झाल्यानंतरही ते जिवंत राहते असा त्यांचा विश्‍वास आहे. मानवामध्ये अमर असे काहीतरी असते, याला ख्रिस्ती धर्मजगतातील शेकडो धर्म व पंथ समर्थन करतात. यहुदी धर्माचाही हा प्रमुख विश्‍वास आहे. हा विश्‍वास, पुनर्जन्म या हिंदू शिकवणीचा तर मूलभूत पायाच आहे. मुस्लिम लोक मानतात, की शरीराच्या मृत्यूनंतर रूह जिवंत राहतो. ऑस्ट्रेलियन ॲबोरजीन, आफ्रिकन जडप्राणवादी, शिंटो आणि बौद्ध देखील या एकाच विषयावर वेगवेगळ्या प्रकारे शिकवण देतात.

६. मानवामध्ये अमर आत्मा असतो याबद्दल काही विद्वानांचे काय मत आहे?

६ दुसऱ्‍या बाजूला पाहता, मृत्यूनंतर जीवनाचा अंत होतो, असा विश्‍वास करणारेही काही लोक आहेत. भावनात्मक आणि बुद्धिजीवी जीवन, शरीरापासून वेगळे असलेल्या अव्यक्‍तिक व गूढ अशा कशात तरी चालू राहते ही कल्पना त्यांना पटत नाही. अमरत्वावर विश्‍वास न ठेवणाऱ्‍यांमध्ये, प्रसिद्ध प्राचीन तत्त्वज्ञानी अरिस्टॉटल आणि एपीक्यूरस, वैद्य हिप्पोक्रेटस, स्कॉटीश तत्त्वज्ञानी डेव्हीड ह्‍यूम, अरबी विद्वान अव्हेरोईस आणि स्वातंत्र्यानंतरचे भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा समावेश होता.

७. आत्म्याच्या शिकवणीबद्दल कोणत्या महत्त्वपूर्ण प्रश्‍नांवर विचार केला पाहिजे?

७ अशाप्रकारच्या विरोधात्मक कल्पना आणि विश्‍वास आपल्यासमोर येतात तेव्हा आपण स्वतःला विचारले पाहिजे: आपल्यामध्ये खरोखरच एक अमर आत्मा आहे का? आणि जर नाही तर, ही खोटी शिकवण आजच्या बहुतेक धर्मांचा अविभाज्य भाग कशी काय बनली बरे? ही कल्पना कोठून आली? या प्रश्‍नांची सत्य आणि समाधानकारक उत्तरे आपण शोधून काढणे निकडीचे आहे कारण आपले भवितव्य त्यांच्यावर निर्भर आहे. (१ करिंथकर १५:१९) पण सर्वप्रथम आपण, आत्म्याच्या सिद्धान्ताचा उगम कोठून झाला त्याचे परीक्षण करून पाहू या.

सिद्धान्ताचा उगम

८. अमर आत्म्याच्या शिकवणीला खतपाणी घालण्यात सॉक्रेटीस आणि प्लेटो यांनी कोणती भूमिका बजावली?

८ सा.यु.पू. पाचवे शतक. ग्रीक तत्त्वज्ञानी सॉक्रेटीस आणि प्लेटो हे, अमर आत्मा असतो या विश्‍वासाला खतपाणी घालणाऱ्‍यांपैकी सर्वात पहिले होते असे म्हटले जाते. पण ते या सिद्धान्ताचे जनक नव्हते. तर, त्यांनी या शिकवणीत सुधारणा व फेरफार करून ती वेदान्तीय शिकवण बनवली जेणेकरून त्यांच्या आणि येणाऱ्‍या दिवसातील सुसंस्कृत वर्गाला ती जास्त अपीलकारक वाटेल. खरे तर त्यांच्या आधीचे प्राचीन पर्शियाचे जरथुश्‍त्री आणि इजिप्शियन देखील विश्‍वास करीत होते, की मानवामध्ये काहीतरी अमर असते. मग प्रश्‍न असा येतो, की या शिकवणीचा उगम काय आहे?

९. ईजिप्त, पर्शिया आणि ग्रीसच्या प्राचीन संस्कृतींवर कोणत्या उगमाचा प्रभाव सर्वसामान्य होता?

९ “प्राचीन जगात, ईजिप्त, पर्शिया व ग्रीस यांच्यावर कदाचित बॅबिलोनी धर्मांचा प्रभाव झाला असावा,” असे द रिलिजन ऑफ बॅबिलोनिया ॲण्ड अस्सेरीया या पुस्तकात म्हटले आहे. ते पुस्तक पुढे इजिप्शियन धार्मिक विश्‍वासांबद्दल म्हणते: “एल-अमरनाने प्रकट केल्यानुसार, ईजिप्त आणि बॅबिलोनिया यांच्यात प्राचीन काळापासून संबंध असल्यामुळे बॅबिलोनियन मताचा आणि रीतीरिवाजाचा ईजिप्शियन पंथात शिरकाव होण्याची दाट शक्यता होती.”a प्राचीन पर्शियन आणि ग्रीक संस्कृतींबद्दलही असे म्हणता येऊ शकते.

१०. मृत्यूनंतरच्या जीवनाबद्दल बॅबिलोनियन लोकांचा काय विश्‍वास होता?

१० पण मानवामध्ये काहीतरी अमर आहे असा प्राचीन बॅबिलोनियन लोकांचा विश्‍वास होता का? या मुद्द्‌यावर, अमेरिकेच्या पेन्सिल्व्हानिया विद्यापीठाचे प्राध्यापक मॉरीस जस्ट्रो जुनियर यांनी लिहिले: “[बॅबिलोनियन] लोकांनी तसेच धार्मिक नेत्यांनी देखील, जीवनाचा पूर्णपणे नाश होतो या शक्यतेचा केव्हाही विचार केला नाही. त्यांच्या मते मृत्यू हा, दुसऱ्‍या एका जीवनाकडे जाणारा मार्ग होता; आणि [सद्य जीवनात] अमरत्व नसणे म्हणजेच, मेल्यानंतर माणूस निश्‍चितच दुसऱ्‍या जीवनात जातो.” होय, जीवनाचा कोणता तरी प्रकार, कसले तरी रूप मृत्यूनंतर जिवंत राहते असा बॅबिलोनियन लोकांचा विश्‍वास होता. ते मृताला पुरताना त्याच्याबरोबर काही वस्तू पुरत असत; या आशेने, की मृतजन नंतर त्यांचा वापर करू शकतील.

११, १२. जलप्रलयानंतर, मानवामध्ये अमर आत्मा असतो या शिकवणीचा जन्म कोठे झाला?

११ मानवामध्ये काहीतरी अमर असते ही शिकवण प्राचीन बॅबिलोनमधून आली आहे हे स्पष्ट झाले आहे. पण हे इतके महत्त्वपूर्ण आहे का? होय, कारण बायबलनुसार, बाबेल किंवा बॅबिलोन शहर नोहाचा पणतू निम्रोद याने बांधले होते. नोहाच्या दिवसांतील विश्‍वव्यापी जलप्रलयानंतर सर्व लोक एकच भाषा बोलत होते व त्यांचा एकच धर्म होता. निम्रोद हा एकटाच “यहोवाच्या विरुद्ध” नव्हता तर त्याला आणि त्याच्या चेल्यांना “आपले नाव” करायचे होते. अशाप्रकारे, तेथे एक शहर स्थापून व एक बुरूज बांधून निम्रोदाने एका वेगळ्या धर्माची सुरवात केली.—उत्पत्ति १०:१, ६, ८-१०, NW; ११:१-४.

१२ लोककथेत म्हटल्याप्रमाणे निम्रोदाला ठार मारण्यात आले. त्याच्या मृत्यूनंतर बॅबिलोनियन लोकांना, त्यांच्या शहराचा संस्थापक व पहिला राजा म्हणून त्याला जास्त आदर द्यावा असे वाटले असावे. मार्डुक दैवत (मरोदख) बॅबिलोनचा संस्थापक होते असे मानले जात असल्यामुळे शिवाय अनेक बॅबिलोनी राजांना त्याचे नाव दिल्यामुळे, काही विद्वानांचे असे म्हणणे आहे, की मार्डुक दैवत, देव मानलेल्या निम्रोदाला चित्रित करते. (२ राजे २५:२७; यशया ३९:१; यिर्मया ५०:२) असे आहे तर, मनुष्यामध्ये अमर असे काही तरी असते जे मृत्यूनंतरही जिवंत राहते असा विश्‍वास, निदान निम्रोदाच्या मृत्यूच्या समयी तरी रुढ होता. काहीही असो, इतिहासाच्या पानांवरून हेच स्पष्ट होते, की जलप्रलयानंतर, मानवामध्ये अमर आत्मा असतो या शिकवणीचा जन्म बाबेल किंवा बॅबिलोनमध्येच झाला.

१३. अमर आत्म्याची शिकवण पृथ्वीच्या पाठीवर कशी पसरली आणि याचा परिणाम काय झाला?

१३ बायबल पुढे दाखवते, की देवाने बुरूज बांधणाऱ्‍या लोकांच्या भाषेत गोंधळ माजवून त्यांचे प्रयत्न उधळून लावले. त्यानंतर ते एकमेकांबरोबर संभाषण करू शकत नसल्यामुळे त्यांनी हातचे काम सोडून दिले व ते ‘सर्व पृथ्वीच्या पाठीवर पांगले.’ (उत्पत्ति ११:५-९) आपण हे लक्षात ठेवले पाहिजे, की बुरूज बांधू पाहणाऱ्‍या या लोकांच्या भाषेत फरक झाला असला तरी, त्यांच्या विचारधारेत व कल्पनांत फरक झालेला नव्हता. परिणामतः, ते जेथे कोठे गेले तेथे त्यांनी आपल्याबरोबर आपले धार्मिक विश्‍वास नेले. अशाप्रकारे, बॅबिलोनी शिकवणी—ज्यात, अमर आत्म्याची शिकवण देखील आहे—पृथ्वीच्या पाठीवर पसरल्या आणि जगाच्या प्रमुख धर्मांच्या शिकवणींचा भाग बनल्या. अशाप्रकारे, खोट्या धर्माचे एक जागतिक साम्राज्य स्थापन झाले; बायबलमध्ये याला उचितरीत्या “मोठी बाबेल, कलावंतिणीची व पृथ्वीवरील अमंगळपणाची आई,” असे म्हटले आहे.—प्रकटीकरण १७:५.

खोट्या धर्माच्या जागतिक साम्राज्याचा विस्तार पूर्वेकडेस वाढतो

१४. बॅबिलोनी धार्मिक विश्‍वासांचा भारतीय उपखंडात कसा प्रसार झाला?

१४ काही इतिहासकारांचे म्हणणे आहे, की सुमारे ३,५०० वर्षांआधी एक मोठे देशांतर घडले ज्यात वायव्य दिशेकडून गोऱ्‍या वर्णाचे आर्य लोक खैबर खिंडीतून आले; ही खिंड आता पाकिस्तान व भारतात आहे. तेथून मग ते लोक गंगा नदीच्या मैदानावर आणि मग भारतापुढेही गेले. देशांतर केलेल्या लोकांच्या धार्मिक कल्पना प्राचीन इराणी व बॅबिलोनी शिकवणुकींवर आधारित होत्या असे काही विद्वानांचे मत आहे. या धार्मिक कल्पना मग हिंदुत्वाच्या मूळ शिकवणी बनल्या.

१५. अमर आत्म्याच्या कल्पनेचा प्रभाव हिंदुत्वावर कसा झाला?

१५ भारतात अमर आत्म्याच्या कल्पनेने पुनर्जन्माच्या सिद्धान्ताचे रूप घेतले. मानवांतील दुःखाच्या आणि कष्टाच्या सार्वत्रिक समस्यांशी झगडत असलेल्या हिंदू साधुसंतांनी कर्माची शिकवण दिली, म्हणजे तुम्ही जे पेराल त्याची कापणी कराल. ही शिकवण आणि अमर आत्म्याची शिकवण यांचे मिश्रण करून त्यांनी पुनर्जन्माची शिकवण तयार केली; या शिकवणीनुसार, एखाद्याला त्याच्या जीवनातील पाप आणि पुण्याचे प्रतिफळ पुढील जीवनात मिळते असे म्हटले जाते. विश्‍वासू लोकांना मोक्ष किंवा जीवनमरणाच्या फेऱ्‍यातून सुटका मिळवून ब्रम्हाशी एकरूप व्हायचे असते. अनेक शतकांपासून हिंदुत्वाचा जसा प्रसार होत गेला तसाच पुनर्जन्माच्या शिकवणीचा देखील प्रसार होत गेला. आणि हा सिद्धान्त सध्याच्या हिंदुत्वाचा पाया बनला.

१६. मृत्यूनंतरच्या जीवनाबद्दल कोणत्या विश्‍वासाचा प्रभाव पूर्व आशियातील बहुतेक धर्मांवर व प्रथांवर झाल्याचा दिसून येतो?

१६ हिंदुत्वातून इतरही धर्म निर्माण झाले; जसे, बौद्ध, जैन व शीख. याही धर्मात पुनर्जन्माची शिकवण दिली जाते. शिवाय, बौद्ध धर्माचा प्रसार पूर्व आशिया, जसे की चीन, कोरिया, जपान आणि इतरत्र जसजसा होत गेला तसतसे त्या संपूर्ण भागातील संस्कृती आणि धर्म यांच्यावर त्याचा खोलवर प्रभाव पडला. यामुळे असे धर्म उदयास आले ज्यात अनेक विश्‍वासांचे मिश्रण, बौद्ध धर्माची काही तत्त्वे, जादुटोणा आणि पूर्वजांची उपासना यांचा समावेश असल्याचे दिसते. यांतील सर्वात प्रभावशाली ताओ, कन्फ्युशियनिसम आणि शिंटो धर्म आहेत. अशाप्रकारे, शरीराचा मृत्यू झाल्यावरही जीवन चालू राहते या विश्‍वासाचा प्रभाव तेथील लोकांच्या बहुतेक धार्मिक विचारांवर आणि प्रथांवर झालेला पाहायला मिळतो.

यहुदी धर्म, ख्रिस्ती धर्मजगत आणि मुस्लिम धर्माबद्दल काय?

१७. मृत्यूनंतरच्या जीवनाबद्दल प्राचीन यहुद्यांचा काय विश्‍वास होता?

१७ यहुदी धर्म, ख्रिस्ती धर्मजगताचे धर्म आणि मुस्लिम धर्मातील लोक मृत्यूनंतरच्या जीवनाबद्दल कोणता विश्‍वास बाळगतात? या तिन्ही धर्मांपैकी यहुदी धर्म सर्वात जुना आहे. याची मूळे, सॉक्रेटिस व प्लेटोने अमर आत्म्याच्या सिद्धान्ताचा स्वीकार करण्याच्या कित्येक वर्षांआधी म्हणजे सुमारे ४,००० वर्षांपूर्वी अब्राहामाच्या काळापर्यंत जातात. प्राचीन यहुदी, नैसर्गिक मानवी अमरत्वावर नव्हे तर मृतांच्या पुनरुत्थानावर विश्‍वास करत होते. (मत्तय २२:३१, ३२; इब्री लोकांस ११:१९) मग, अमर आत्म्याचा सिद्धान्त यहुदी धर्मात कसा काय आला? इतिहास त्याचे उत्तर देतो.

१८, १९. अमर आत्म्याचा सिद्धान्त यहुदी धर्मात कसा शिरला?

१८ सा.यु.पू. ३३२ मध्ये, सम्राट अलेक्झॅन्डरने जेरुसलेमसह मध्यपूर्वेवर विजय मिळवला. अलेक्झॅन्डरचा वारस याने हेल्लेनीकरणाची आपली मोहीम जारी ठेवली तेव्हा दोन संस्कृतींचे—ग्रीक आणि यहुदी संस्कृतींचे—मिश्रण झाले. कालांतराने, यहुदी लोक ग्रीक विचारसरणीशी सुपरिचित झाले, काही तर तत्त्वज्ञानीही बनले.

१९ सा.यु. पहिल्या शतकातला अलेक्झॅन्ड्रीयाचा फायलो एक यहुदी तत्त्वज्ञानी होता. त्याला प्लेटोबद्दल खूप आदर होता व त्याने ग्रीक तत्त्वज्ञानाद्वारे यहुदी धर्माचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला व नंतरच्या यहुदी विचारवंतांसाठी वाट मोकळी करून दिली. टॅलमूडवरसुद्धा अर्थात रब्बींच्या मौखिक नियमांवर लिहिलेल्या भाष्यावर देखील ग्रीक विचारसरणीचा प्रभाव पडला आहे. एन्सायक्लोपिडिआ जुडायका म्हणतो: “टॅलमूडच्या रब्बींचा, मृत्यूनंतरही आत्मा जिवंत राहतो यावर विश्‍वास होता.” नंतरचे यहुदी गूढ प्रकाशन जसे की कबाला, याच्याही पुढे जाऊन पुनर्जन्माची शिकवण देते. अशाप्रकारे, अमर आत्म्याच्या शिकवणीचा ग्रीक तत्त्वज्ञानातून अप्रत्यक्षपणे यहुदी धर्मात शिरकाव झाला. ही शिकवण ख्रिस्ती धर्मजगतात कशी शिरली त्याबद्दल काय म्हणता येऊ शकते?

२०, २१. (अ) प्लेटोनिक अथवा ग्रीक तत्त्वज्ञानाविषयी आरंभीच्या ख्रिश्‍चनांची काय भूमिका होती? (ब) प्लेटोच्या कल्पना ख्रिस्ती शिकवणींमध्ये कशामुळे घुसडण्यात आल्या?

२० खऱ्‍या ख्रिस्ती धर्माची सुरवात येशू ख्रिस्ताकडून झाली. मिज्युएल डी उनामुनो यांनी येशूविषयी असे लिहिले: “त्याने यहुद्यांप्रमाणे शरीराच्या पुनरुत्थानावर विश्‍वास ठेवला, [ग्रीक] प्लेटोनिक पद्धतीप्रमाणे अमर आत्म्यावर विश्‍वास केला नाही.” शेवटी ते म्हणाले: “अमर आत्म्याचा सिद्धान्त . . . गैर-ख्रिस्ती तत्त्वज्ञानी सिद्धान्त आहे.” तेव्हा, प्रेषित पौलाने पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांना “ख्रिस्ताप्रमाणे नसलेले, तर माणसांच्या संप्रदायाप्रमाणे, जगाच्या प्राथमिक शिक्षणाप्रमाणे असलेले तत्वज्ञान व पोकळ भुलथापा” यांच्याविरुद्ध कडक इशारा का दिला हे आपण समजू शकतो.—कलस्सैकर २:८.

२१ परंतु, या ‘गैर-ख्रिस्ती तत्त्वज्ञान असलेल्या सिद्धान्ताने’ ख्रिस्ती धर्मजगताला कधी आणि कसे दूषित केले? द न्यू एन्सायक्लोपिडिआ ब्रिटॅनिका म्हणतो: “सा.यु. २ ऱ्‍या शतकाच्या मध्यापासून, ग्रीक तत्त्वज्ञानाचे काही शिक्षण असलेल्या ख्रिश्‍चनांना, स्वतःच्या बौद्धिक समाधानासाठी आणि शिक्षित गैर-ख्रिश्‍चनांचे परिवर्तन करण्यासाठी ग्रीक तत्त्वज्ञानाद्वारे आपला विश्‍वास प्रकट करण्याची गरज वाटू लागली. त्यांना प्लेटोनीवाद हे तत्त्वज्ञान जास्त सोयीचे वाटले.” ख्रिस्ती धर्मजगताच्या शिकवणींवर मोठ्या प्रमाणात प्रभाव पाडणाऱ्‍या अशा दोन आरंभीच्या तत्त्वज्ञानींपैकी अलेक्झॅन्ड्रीयाचा ओरीजन आणि हिप्पोचा ऑगस्टीन हे होते. दोघेही प्लेटोच्या कल्पनांमुळे खूप प्रभावित झाले होते व या कल्पना ख्रिस्ती शिकवणींमध्ये घुसडण्यास हेच कारणीभूत होते.

२२. अमर आत्म्याची किंवा रूहची शिकवण मुस्लिम धर्मातही प्रमुख कशी राहिली?

२२ यहुदी धर्मात आणि ख्रिस्ती धर्मजगतात अमर आत्म्याची शिकवण प्लेटोच्या प्रभावामुळे देण्यात येऊ लागली; पण मुस्लिम धर्मात तर ती सुरवातीपासूनच होती. मुस्लिम धर्माचे पवित्र पुस्तक कुराण म्हणते, की मनुष्यामध्ये आत्मा (अरबी: रूह) असतो जो मृत्यूनंतरही जिवंत राहतो. या आत्म्याच्या किंवा रूहच्या कर्मगतीविषयी ते म्हणते, की तो एकतर आनंदाच्या एका स्वर्गीय उद्यानात (जन्‍नत) जाईल; अथवा धगधगत्या नरकात (डोझाक) शिक्षा भोगेल. अरबी विद्वानांनी मुस्लिम शिकवणी आणि ग्रीक तत्त्वज्ञान यांचे मिश्रण करण्याचा प्रयत्न केला नाही असे म्हणता येणार नाही. खरे तर, अरबी जगावर ॲरिस्टॉटलचा काही प्रमाणावर प्रभाव पडला होता. तथापि, अमर आत्मा किंवा रूह यांवर मुस्लिम लोकांचा विश्‍वास कायम राहिला आहे.

२३. मृत्यूनंतरच्या जीवनाविषयी कोणत्या खात्रीलायक प्रश्‍नांवर पुढील लेखात चर्चा केली जाईल?

२३ मानवामध्ये अमर असे काहीतरी असते या शिकवणीच्या आधारावर संपूर्ण जगभरातील धर्मांनी मृत्यूनंतरच्या जीवनाबद्दल भिन्‍नभिन्‍न व संभ्रमात पाडणारे विश्‍वास विकसित केले आहेत हे स्पष्ट आहे. आणि अशा विश्‍वासांचा कोट्यवधी लोकांवर खूप प्रभाव पडला आहे; नव्हे, ते त्यांचे गुलामच झाले आहेत. या सर्वांचा विचार करता, आपण स्वतःला विचारले पाहिजे: आपण मेल्यावर आपले काय होते त्याविषयीचे सत्य आपल्याला माहीत होईल का? मृत्यूनंतर जीवन आहे का? बायबल याविषयी काय म्हणते? हे आपण पुढील लेखात पाहणार आहोत.

[तळटीपा]

a एल-अमरना, ईजिप्शियन शहर अक्खेटाटोनच्या अवशेषांचे स्थळ आहे जे सा.यु.पू. १४ व्या शतकात बांधण्यात आले होते असा दावा केला जातो.

तुम्ही स्पष्ट करू शकाल?

◻ मृत्यूनंतरच्या जीवनाबद्दल बहुतेक धर्मात कोणता समान विषय आहे?

◻ अमर आत्म्याच्या शिकवणीचा जन्म प्राचीन बॅबिलोनमध्ये झाला होता याबद्दल इतिहासाचे आणि बायबलचे काय म्हणणे आहे?

◻ अमर आत्म्याच्या शिकवणीचा प्रभाव पूर्वेकडील धर्मांवर कसा पडला आहे?

◻ अमर आत्म्याची शिकवण यहुदी धर्म, ख्रिस्ती धर्मजगत आणि मुस्लिम धर्म यांत कशी शिरली?

[१२, १३ पानांवरील चित्रं]

सम्राट अलेक्झॅन्डरच्या विजयामुळे, ग्रीक आणि यहुदी संस्कृतींचे मिश्रण झाले

ऑगस्टीनने प्लेटोनिक तत्त्वज्ञान ख्रिस्ती धर्मात घुसडण्याचा प्रयत्न केला

[चित्राचे श्रेय]

अलेक्झॅन्डर: Musei Capitolini, Roma; ऑगस्टीन: From the book Great Men and Famous Women

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा