राज्य घोषकांचा वृत्तान्त
“सुवेळी अवेळी” प्रचार करणे
बोस्निया व हर्जेगोविना या देशात युद्धाची लाट उसळली तेव्हा हजारोंचे हालहाल झाले. त्या संकटमय काळात, यहोवाच्या साक्षीदारांनी लोकांना उत्तेजन व आशा देण्याचा हरएक प्रयत्न केला. सारायेवो येथे काही काळापर्यंत सेवा केलेल्या एका साक्षीदाराने लिहिलेल्या एका पत्रातील काही उतारे खाली दिले आहेत.
“येथील जीवन अतिशय कठीण आहे, पण लोक बायबल सत्याला चांगला प्रतिसाद देत आहेत. स्थानिक साक्षीदारांचा धीर उल्लेखनीय आहे. भौतिकरीत्या त्यांच्याकडे फार कमी आहे पण त्यांचा उत्साह अतिशय उत्तम आहे. मंडळीतील बहुतेक सर्व तरुण पूर्ण वेळेच्या सेवेत आहेत. हा आवेश पाहून नवीन प्रचारकांना उत्तेजन मिळतं आणि ते क्षेत्र सेवेत जाण्याच्या त्यांच्या पहिल्या महिन्यापासूनच ६० किंवा त्याहूनही अधिक तास खर्च करतात तेव्हा त्यात नवल नाही.
“घरोघरच्या प्रचार कार्याव्यतिरिक्त आम्ही लोकांपर्यंत पोहंचण्यासाठी विविध मार्ग शोधून काढले आहेत. जसं की, शहरातील अनेक कबरस्थानी जाऊन लोकांना बायबल प्रकाशनं दिल्यानं आम्हाला चांगलं फळ मिळालं आहे.
“शिवाय, दवाखान्यांतसुद्धा चांगली साक्ष देण्यात आली. सारायेवोच्या एका दवाखान्याच्या कार्डिओलॉजी विभागातील एका प्रमुख डॉक्टरनं, “हृदयविकाराचा झटका यावरील उपाय?” हा जानेवारी १, १९९७ चा सावध राहा! अंक घेतला. इतर डॉक्टरांनाही देता यावा म्हणून त्यांनी या अंकाच्या आणखी प्रती मागवल्या. त्यांच्या विभागातील सर्व रुग्णांना भेट देण्याची परवानगी साक्षीदारांना देण्यात आली. अशाप्रकारे, तासाभरात १०० मासिके वितरीत करण्यात आली. पुष्कळ रुग्णांनी बोलून दाखवलं, की त्यांना उत्तेजन व आशा देण्यासाठी असं पूर्वी कोणी आलं नव्हतं.
“दुसऱ्या एका प्रसंगी, पेडिआट्रिक विभागाला भेट देऊन मासिके देण्यात आली ज्यात खास मुलांसाठी लेख होते. त्या विभागाच्या प्रमुख डॉक्टरनंही बायबल कथांचं माझं पुस्तक याच्या काही प्रती हॉस्पिटलमधील वाचनालयासाठी मागवल्या. आता, आपल्या मुलांना हॉस्पिटलमध्ये रोज भेटायला येणाऱ्या माता बायबल कथा वाचतात. शिवाय त्या प्रमुख डॉक्टरच्या घरी जाण्याचीही व्यवस्था करण्यात आली.
“सारायेवोत विविध देशांचे हजारो नेटो [नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन] सैनिक आहेत. यांनाही चांगल्याप्रकारे साक्ष देण्यात आली आहे. कधीकधी आम्ही एका चिलखती गाडीपासून दुसऱ्या गाडीकडे जाऊन सर्व राष्ट्रांसाठी सुवार्ता ही पुस्तिका आणि विविध भाषांतील टेहळणी बुरूज व सावध राहा! नियतकालिकांचा उपयोग करतो. इटालियन सैन्यांच्या बराकीत आम्ही २०० पेक्षा अधिक नियतकालिकांचे वितरण केले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, पुष्कळ इटालियन सैनिक म्हणाले, की ते पूर्वी यहोवाच्या साक्षीदारांबरोबर कधीच बोलले नव्हते. आणि आता आम्ही त्यांना सारायेवोत भेटलो.
“एकदा, रस्त्याच्या बाजूला एक चिलखती गाडी उभी होती. मी माझ्या छत्रीनं कारवर ठोठवलं, तर आतून एक सैनिक आला. मी त्याला एक टेहळणी बुरूज दिलं ज्याचा ‘शांतीचे संदेशवाहक—ते कोण आहेत?’ हा विषय होता. सैनिकानं माझ्याकडे पाहिलं आणि विचारलं, ‘तुम्ही यहोवाचे साक्षीदार तर नाही ना?’ माझं होय असं उत्तर ऐकून तो म्हणाला, ‘काय आश्चर्य आहे, तुम्ही इथं पण! पृथ्वीवर असं कोणतं ठिकाण आहे का की जिथं साक्षीदार नाहीत?’”
प्रेषित पौलाने आर्जवले: “वचनाची घोषणा कर, सुवेळी अवेळी तयार राहा.” (२ तीमथ्य ४:२) संपूर्ण जगभरातील त्यांच्या सहविश्वासूंप्रमाणे सारायेवोतील यहोवाचे साक्षीदार असे करत आहेत; एका खाटेपासून दुसऱ्या खाटेपर्यंत आणि एका चिलखती गाडीपासून दुसऱ्या गाडीपर्यंत!