वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w99 ४/१ पृ. ३-७
  • सर्वांसाठी सुज्ञ संदेश असलेले पुस्तक

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • सर्वांसाठी सुज्ञ संदेश असलेले पुस्तक
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • तुम्ही नैराश्‍याचा सामना करीत आहात का?
  • तुम्हाला घरगुती समस्या आहेत का?
  • तुम्हाला तुमच्या जीवनाचे सार्थक करायचे आहे का?
  • तुम्ही सुज्ञ व्हाल का?
  • ‘ज्याला बुद्धी प्राप्त होते तो मनुष्य धन्य’
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००१
  • खरी बुद्धी मोठ्याने हाक मारत आहे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२२
  • समाधानी जीवनाकरता काही उपयुक्‍त सूचना
    समाधानी जीवन कसे मिळवता येईल?
  • ‘यहोवा बुद्धी देतो’
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
w99 ४/१ पृ. ३-७

सर्वांसाठी सुज्ञ संदेश असलेले पुस्तक

“ज्ञानाचे मोल मोत्यांहून अधिक आहे” असे प्राचीन कुलपिता ईयोबाने म्हटले. यात काहीच शंका नाही की तो, त्याच्या काळातील सर्वात धनवान लोकांपैकी एक होता. (ईयोब १:३; २८:१८; ४२:१२) होय, एखाद्याला आपल्या जीवनाचे सार्थक करण्यास मदत करण्याची गोष्ट येते तेव्हा ज्ञान भौतिक संपत्तीपेक्षा कितीतरी मौल्यवान ठरते. सुज्ञ राजा शलमोनाने म्हटले: “ज्ञान आश्रय देणारे आहे व पैसाहि आश्रय देणारा आहे; तरी ज्ञानापासून असा लाभ होतो की ज्याच्यापाशी शहाणपण असते त्याच्या जीविताचे ते रक्षण करिते.”—उपदेशक ७:१२.

पण आज अशाप्रकारचे ज्ञान आपल्याला कुठे मिळेल? लोक आपल्या व्यक्‍तिगत समस्या घेऊन सल्ला स्तंभलेखकांकडे, मानसशास्त्रज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, एवढेच नव्हे तर न्हावी आणि टॅक्सी ड्रायव्हरकडेही जातात. आणि तज्ज्ञ तर गल्लीगल्लीत बहुतेक सर्वच विषयांवर सल्ला देण्यासाठी तयार असतात—अगदी माफक फी मध्ये. पण बहुतेकवेळा या ‘ज्ञानामुळे’ अनेकांच्या पदरी निराशाच, नव्हे संकटच ओढवले आहे. मग खरे ज्ञान आपण कसे प्राप्त करू शकतो?

येशू ख्रिस्ताला मानवी गोष्टींबद्दल चांगलीच माहिती असल्यामुळे तो एकदा म्हणाला: “ज्ञान आपल्या कृत्याच्या योगे न्यायी ठरते.” (मत्तय ११:१९) आपण आता लोकांच्या जीवनातील काही सर्वसामान्य समस्या पाहू या व कोणत्या सुज्ञ शब्दांमुळे त्यांना खरोखरच मदत मिळाली व ती मदत ‘मोत्यांहून मौल्यवान’ कशी ठरली ते पाहू या. तुम्हालाही कदाचित ते “ज्ञान” मिळू शकेल व त्याचा लाभ होऊ शकेल.

तुम्ही नैराश्‍याचा सामना करीत आहात का?

“विसाव्या शतकाने जर चिंतेच्या युगाची सुरवात केली आहे तर त्याचा अंत नैराश्‍याच्या युगाच्या उदयाने होईल,” अशी टिपण लंडनच्या इंटरनॅशनल हेराल्ड ट्रिब्युनने केली. ते पुढे असेही म्हणते, की “अति नैराश्‍याच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय अभ्यासावरून, संपूर्ण जगभरात मानसिक अस्वस्थतेत कायम वाढ झाल्याचे स्पष्ट दिसते. तायवान, लेबनन व न्यूझीलंड सारख्या भिन्‍नभिन्‍न देशातील प्रत्येक पिढी या मानसिक रोगाला सहज बळी पडत आहे.” सन १९५५ नंतर जन्मलेले, त्यांच्या आजीआजोबांपेक्षा तीन पटीने जास्त अतिनैराश्‍येला बळी पडू शकतात असे म्हटले जाते.

टोमोईच्या बाबतीत असे होते. ती अतिनैराश्‍येला बळी पडली होती व बहुतेकदा बिछान्यातच असायची. तिला तिच्या दोन वर्षांच्या मुलाची काळजी घेता येत नसल्यामुळे ती आपल्या माहेरी राहायला गेली. टोमोईच्या मुलाच्या वयाची मुलगी असलेल्या शेजारच्या एका स्त्रीने तिच्याबरोबर मैत्री जमवली. टोमोईने जेव्हा तिला सांगितले की तिला किती निरुपयोगी असल्यासारखे वाटते तेव्हा त्या स्त्रीने तिला एका पुस्तकातून एक वचन दाखवले. त्यात म्हटले होते: “डोळ्याला हातास म्हणता येत नाही की, मला तुझी गरज नाही; तसेच मस्तकाला पायांना म्हणता येत नाही की, मला तुमची गरज नाही. इतकेच नव्हे तर शरीराचे जे अवयव विशेष अशक्‍त दिसतात तेहि आवश्‍यक आहेत.”a जगात प्रत्येकाला एक स्थान आहे व त्या प्रत्येकाची आवश्‍यकता असते हे समजल्यावर टोमोईच्या डोळ्यात पाणी तरारले.

हे शब्द असलेले पुस्तक तिने पाहावे असे त्या स्त्रीने टोमोईला सांगितले. टोमोईने फक्‍त होकारार्थी मान हलवली; कारण प्रत्यक्षात आजपर्यंत ती काहीच करू शकली नव्हती, एक लहानशी गोष्टही कधी पूर्ण करू शकली नव्हती. त्या स्त्रीने तिला बाजारहाट आणि दररोज स्वयंपाक करायला मदत केली. एका महिन्यानंतर, टोमोई इतर गृहिणींप्रमाणे, रोज सकाळी उठू लागली, धुणं धुवू लागली, घराची साफसफाई करू लागली, बाजारहाट व स्वयंपाक करू लागली. यासाठी तिला पुष्कळ काही सहन करावे लागले तरीपण ती म्हणते, “माझी पक्की खात्री झाली होती, की मी जर मला सापडलेल्या सुज्ञ शब्दांचे अनुसरण केले तर सर्वकाही ठीक होईल.”

टोमोईला मिळालेले ज्ञान लागू करण्याद्वारे ती तिच्या नैराश्‍यावर मात करू शकली. आज टोमोई, आपल्या समस्यांवर मात करायला ज्या शब्दांनी तिला मदत केली ते शब्द इतरांना सांगण्यास पूर्णवेळेची सेवा करते. ते सुज्ञ बोल एका प्राचीन पुस्तकात आहेत ज्यात आजच्या सर्व लोकांसाठी एक संदेश आहे.

तुम्हाला घरगुती समस्या आहेत का?

संपूर्ण जगभरात, घटस्फोटाचे प्रमाण वाढतच चालले आहे. एके काळी संयुक्‍त व घनिष्ठ कुटुंबांबद्दल डिंग मिरवणाऱ्‍या पूर्वेकडील राष्ट्रांतही घरगुती समस्या वाढत चालल्या आहेत. तेव्हा, यशस्वी ठरणारे सुज्ञ वैवाहिक मार्गदर्शन आपल्याला कोठे मिळू शकेल?

शुगो आणि मिहोकोचे उदाहरण घ्या. यांच्या विवाहात अंतहीन समस्या होत्या. क्षुल्लक क्षुल्लक गोष्टींवरून त्यांच्यात भांडण व्हायचे. शुगो तापट स्वभावाचा होता आणि जेव्हा जेव्हा तो मिहोकोची चूक दाखवयाचा तेव्हा तेव्हा ती त्याला टोमणा मारायची. मिहोकोला असेही वाटले की, ‘आमचं कशावरही एकमत होणं अगदी अशक्य आहे.’

एकदा, मिहोकोच्या घरी एक स्त्री आली आणि तिने तिला एका पुस्तकातून असे काही वाचून दाखवले: “लोकांनी जसे तुमच्याशी वागावे म्हणून तुमची इच्छा आहे तसेच तुम्ही त्यांच्याशी वागा.”b धर्मामध्ये मिहोकोला कसलाही रस नव्हता तरी, ज्या पुस्तकातून तिला ते वाचून दाखवण्यात आले होते त्या पुस्तकाचा अभ्यास करायला ती तयार झाली. तिला फक्‍त आपले कौटुंबिक जीवन सुधारण्याशी मतलब होता. यास्तव, तिला एकदा तुमचे कौटुंबिक जीवन आनंदी बनविणेc असे शीर्षक असलेल्या पुस्तकाचा जेथे अभ्यास चालतो त्या सभेला येण्याचे निमंत्रण मिळाले तेव्हा ती आणि तिचा नवरा दोघंही जायला तयार झाले.

सभेमध्ये, शुगोने पाहिले की उपस्थित असलेले लोक जे शिकत होते त्याचे अनुसरण करणारे व खूष दिसत होते. त्याने आपली पत्नी ज्या पुस्तकाचा अभ्यास करीत होती ते पडताळून पाहण्याचे ठरवले. एक वाक्य त्याला खूपच आवडले: “ज्याला लवकर क्रोध येत नाही तो महाबुद्धिवान होय; उतावळ्या स्वभावाचा माणूस मूर्खता प्रगट करितो.”d हे तत्त्व आपल्या जीवनात लागू करायला त्याला खूप वेळ लागला असला तरी, त्याच्यात होणारा तो मंद बदल आजूबाजूच्या लोकांना आणि त्याच्या पत्नीला लगेच जाणवला.

आपल्या पतीचे परिवर्तन पाहून मिहोकोनेही, ती जे शिकत होती त्याचे अनुसरण करण्यास सुरवात केली. एका तत्त्वाचा तिला खूप फायदा झाला: “तुमचे दोष काढण्यात येऊ नयेत म्हणून तुम्ही कोणाचे दोष काढू नका. कारण ज्या प्रकारे तुम्ही दोष काढाल त्या प्रकारेच तुमचे दोष काढण्यात येतील.”e म्हणून मिहोको आणि तिच्या पतीने आपल्या चांगल्या गुणांची चर्चा करण्यास आणि एकमेकांच्या चुका शोधत बसण्यापेक्षा सुधारणा कशी करता येईल त्याची चर्चा करण्याचे ठरवले. परिणाम काय झाला? मिहोको आठवून सांगते: “यामुळे मी खरोखरीच आनंदी झाले. आम्ही रोज रात्री जेवणाच्या वेळी चर्चा करतो. आमचा तीन वर्षांचा मुलगाही चर्चेत सामील होऊ लागला. यामुळे खरंच किती बरं वाटतं!”

या कुटुंबाने त्यांना मिळालेला अर्थपूर्ण सल्ला आपल्या जीवनात लागू केला तेव्हा त्यांना अशा समस्यांवर मात करता आली ज्यामुळे त्यांचा विवाह जवळजवळ मोडायलाच आला होता. त्यांच्यासाठी तो सल्ला, सुज्ञ आणि मोत्यांहून मौल्यवान ठरला नाही का?

तुम्हाला तुमच्या जीवनाचे सार्थक करायचे आहे का?

आज, अनेकांच्या जीवनाचे एकमात्र ध्येय, धनसंपत्ती गोळा करणे हेच आहे. धर्मादाय संस्थेला कोट्यवधी डॉलर देणाऱ्‍या संयुक्‍त संस्थानांतील एका धनाढ्य व्यक्‍तीने म्हटले: “काही लोकांना पैशांचं खूप आकर्षण असतं, पण कोणीही मनुष्य एकाच वेळी आपल्या पायात चप्पलांचे दोन जोड घालू शकत नाही.” ही वस्तुस्थिती समजणारे फार कमी लोक आहेत आणि याहूनही कमी लोक आहेत जे धनाच्या मागे धावण्याचे सोडून देतात.

हितोशी गरीब कुटुंबात लहानाचा मोठा झाल्यामुळे आपण खूप श्रीमंत व्हावे अशी त्याची तीव्र इच्छा होती. सावकार लोक देणेकरांना कसे नाचवतात हे पाहिल्यानंतर त्याला वाटू लागले, की: “जो जास्त पैसे कमावतो तोच जिंकतो.” हितोशीला पैशावर इतका भरवसा होता, की त्याला वाटले, आपल्याकडे पैसा असला तर आपण लोकांनाही विकत घेऊ शकतो. जास्त पैसा कमावण्याकरता त्याने नळकामाचा धंदा चालू केला. तो एक दिवसही सुटी न घेता संपूर्ण वर्षभर काम करत असे. त्याने खूप खूप प्रयत्न केले पण नंतर त्याच्या लक्षात आले, की तो त्याला काम देणाऱ्‍या कॉन्ट्रॅक्टरपेक्षा प्रभावशाली होऊ शकत नाही. तो रोज निराश होत गेला, त्याला दिवाळखोरीची भीती वाटायची.

मग एके दिवशी एक मनुष्य त्याच्या घरी आला आणि त्याने त्याला विचारले, की येशू ख्रिस्त तुझ्यासाठी मृत्यू पावला होता हे तुला माहीत आहे का? आपल्यासारख्या मनुष्यासाठी कोण स्वतःचा प्राण अर्पण करील असे हितोशीला वाटल्यामुळे त्याची जिज्ञासा वाढली व तो आणखी चर्चा करण्यासाठी तयार झाला. पुढील आठवडी तो एका भाषणाला उपस्थित राहिला व ‘डोळा निर्दोष ठेवा,’ हा सल्ला ऐकून त्याला आश्‍चर्य वाटले. वक्‍त्‌याने सांगितले, की आध्यात्मिक गोष्टींवर लक्ष केंद्रित असलेला डोळा “निर्दोष” असतो; तर, फक्‍तच शारीरिक इच्छांवर लक्ष केंद्रित असलेला व पायापुरता पाहणारा डोळा “सदोष” किंवा “हेवा करणारा” असतो. “जेथे तुझे धन आहे तेथे तुझे मनहि लागेल” हा सल्ला ऐकून तो खूप प्रभावित झाला.f धन मिळवण्यापेक्षा दुसरेही काही तरी महत्त्वपूर्ण आहे. अशा गोष्टी त्याने पूर्वी कधीही ऐकल्या नव्हत्या.

या सर्वांमुळे प्रभावित होऊन त्याने, तो जे काही शिकत होता ते लागू करण्यास सुरवात केली. पैशासाठी खटपट करण्याऐवजी तो आपल्या जीवनात आध्यात्मिक मूल्यांना प्रथम स्थान देऊ लागला. शिवाय, आपल्या कुटुंबाच्या आध्यात्मिक कल्याणासाठी तो आपला वेळ खर्च करू लागला. साहजिकच यासाठी तो कामात कमी वेळ घालवू लागला; पण त्याच्या धंद्याचा मात्र चांगला परिणाम झाला. का बरे?

त्याला मिळणारा सल्ला तो लागू करत गेला आणि त्याचा रागट स्वभाव बदलला व तो सौम्य आणि मैत्रीपूर्ण झाला. त्याला खासकरून पुढील सल्ला जास्त भावला: “क्रोध, संताप, दुष्टपण, निंदा व मुखाने शिवीगाळ करणे, ही सर्व आपणापासून दूर करा; एकमेकांशी लबाडी करू नका; कारण तुम्ही जुन्या मनुष्यास त्याच्या कृतीसह काढून टाकले आहे; आणि जो नवा मनुष्य, आपल्या निर्माणकर्त्याच्या प्रतिरूपाप्रमाणे पूर्ण ज्ञानात नवा केला जात आहे, त्याला तुम्ही धारण केले आहे.”g हा सल्ला अनुसरल्याने तो श्रीमंत झाला नाही पण त्याच्यातील “नवा मनुष्य” पाहून त्याचे ग्राहक प्रभावित झाले; तो त्यांचा भरवसा आणि विश्‍वास संपादन करू शकला. होय, त्याला प्राप्त झालेल्या सुज्ञ शब्दांमुळे त्याच्या जीवनाचे सार्थक झाले. त्याच्यासाठी ते शब्द, सुज्ञ व मोत्यांहून अधिक मौल्यवान ठरले.

तुम्ही सुज्ञ व्हाल का?

वरील उदाहरणांतील लोकांना इतके मौल्यवान वाटणारे ते ज्ञान काय आहे हे तुम्हाला माहीत आहे का? ते ज्ञान बायबलमध्ये आहे; बायबल असे पुस्तक आहे जे सर्वात जास्त वितरीत व पृथ्वीवर कोठेही सहज उपलब्ध असणारे पुस्तक आहे. कदाचित तुमच्याकडेही त्याची एक प्रत असेल किंवा तुम्ही एक प्रत मिळवू शकाल. परंतु, जसे फक्‍त स्वतःजवळ मोती बाळगल्याने व त्यांचा काही उपयोग न केल्याने फायदा होत नाही तसेच आपल्याजवळ केवळ बायबल असल्याने फायदा होणार नाही. तुम्ही ते पुस्तक उघडून त्यातील सुज्ञ व समयोचित सल्ला लागू करा आणि पाहा तुम्ही जीवनाच्या समस्या कशा यशस्वीरीत्या सोडवू शकाल.

तुम्हाला कोणी मोती दिल्यास, तुम्ही कृतज्ञ होऊन ज्याने तुम्हाला ते मोती दिले आहेत त्याचे आभार मानण्याकरता त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करणार नाही का? ज्याने बायबल दिले आहे त्याला तुम्ही ओळखता का?

बायबलमधील ज्ञानाच्या स्रोताबद्दल म्हटले आहे: “संपूर्ण शास्त्रलेख देवाने प्रेरित केला आहे, आणि तो शिक्षण . . . यांकरिता उपयोगी आहे.” (२ तीमथ्य ३:१६, NW.) ते आपल्याला असेही सांगते, की “देवाचे वचन सजीव, सक्रिय” आहे. (इब्री लोकांस ४:१२) म्हणूनच बायबलमधील सुज्ञ शब्द आजच्यासाठी समयोचित व प्रभावकारी आहेत. हा उदार दाता अर्थात यहोवा देव याच्याविषयी शिकण्यास तुम्हाला मदत करण्याकरता यहोवाच्या साक्षीदारांना आनंद वाटेल; यामुळे तुम्हालाही, आज सर्वांसाठी सुज्ञ संदेश असलेले पुस्तक अर्थात बायबलमधील ‘ज्ञानाचा’ लाभ घेता येईल.

[तळटीपा]

a हे अवतरण १ करिंथकर १२:२१, २२ मधून घेण्यात आले आहे.

b मत्तय ७:१२.

c वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीद्वारे प्रकाशित.

d नीतिसूत्रे १४:२९.

e मत्तय ७:१, २.

f मत्तय ६:२१-२३; NW तळटीप.

g कलस्सैकर ३:८-१०.

[४ पानांवरील चौकट/चित्र]

मानसिक स्थैर्य टिकवण्याकरता सुज्ञ शब्द

“हे परमेशा, तू अधर्म लक्षात आणिशील, तर हे प्रभू, तुझ्यापुढे कोण टिकाव धरील? तरी पण लोकांनी तुझे भय धरावे म्हणून तुझ्या ठायी क्षमा आहे.”—स्तोत्र १३०:३, ४.

“आनंदी मनाने मुख प्रसन्‍न होते; मनांतील खेदाने हृदय भंग पावते.”—नीतिसूत्रे १५:१३.

“फाजील धार्मिक होऊ नको; मर्यादेबाहेर शहाणपणा मिरवू नको; तू आपला नाश का करून घ्यावा?”—उपदेशक ७:१६.

“घेण्यापेक्षा देणे ह्‍यात जास्त धन्यता आहे.”—प्रेषितांची कृत्ये २०:३५.

“तुम्ही रागावा, परंतु पाप करू नका, तुम्ही रागात असताना सूर्य मावळू नये.”—इफिसकर ४:२६.

[५ पानांवरील चौकट/चित्र]

सुखी कौटुंबिक जीवनासाठी सुज्ञ शब्द

“मसलत मिळाली नाही म्हणजे बेत निष्फळ होतात. मसलत देणारे पुष्कळ असले तर ते सिद्धीस जातात.”—नीतिसूत्रे १५:२२.

“सुज्ञाचे मन ज्ञान प्राप्त करून घेते; शहाण्याचे कान ज्ञानाविषयी आतुर असतात.”—नीतिसूत्रे १८:१५.

“रुपेरी करंड्यांत सोन्याची फळे, तसे समयोचित भाषण होय.”—नीतिसूत्रे २५:११.

“एकमेकांचे सहन करा, आणि कोणाविरूद्ध कोणाचे गाऱ्‍हाणे असल्यास आपसात क्षमा करा; प्रभूने तुम्हाला क्षमा केली तशी तुम्हीहि करा; पूर्णता करणारे बंधन अशी जी प्रीति ती ह्‍या सर्वांवर धारण करा.”—कलस्सैकर ३:१३, १४.

“माझ्या प्रिय बंधूंनो, तुम्हास हे कळते तर प्रत्येक माणूस ऐकावयास तत्पर, बोलावयास धीमा, रागास मंद असावा;”—याकोब १:१९.

[६ पानांवरील चौकट/चित्र

जीवनाचे सार्थक करण्याकरता सुज्ञ शब्द

“खोट्या तागडीचा परमेश्‍वराला वीट आहे, पण खरे वजन त्याला प्रिय आहे.”—नीतिसूत्रे ११:१.

“गर्व झाला की नाश ठेवलेला; मनाचा ताठा अधःपाताचे मूळ होय.”—नीतिसूत्रे १६:१८.

“ज्या मनुष्याचे चित्त स्वाधीन नाही, तो गांवकुसू नसलेल्या पडक्या गांवासारखा आहे.”—नीतिसूत्रे २५:२८.

“मन उतावळे होऊ देऊन रागावू नको; कारण राग मूर्खांच्या हृदयांत वसतो.”—उपदेशक ७:९.

“आपले अन्‍न जलाशयावर सोड; ते बहुत दिवसांनी तुझ्या हाती येईल.”—उपदेशक ११:१.

“तुमच्या मुखातून कसलेच कुजके भाषण न निघो, पण गरजेप्रमाणे उन्‍नतीकरिता जे चांगले तेच मात्र निघो, ह्‍यासाठी की, तेणेकडून ऐकणाऱ्‍यांना कृपादान प्राप्त व्हावे.”—इफिसकर ४:२९.

[७ पानांवरील चित्र]

बायबलचा अभ्यास करणे हे ‘ज्ञानाचा’ लाभ मिळवण्याचे पहिले पाऊल आहे

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा