वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w99 ३/१५ पृ. २१-२३
  • चिंतेला आपल्यावर कब्जा मिळवू देऊ नका

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • चिंतेला आपल्यावर कब्जा मिळवू देऊ नका
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • मर्यादा ठरवणे
  • फारोच्या समोर मोशे
  • तुमचे विचार नियंत्रणात ठेवणे
  • मदत उपलब्ध
  • ‘देवाची आशा धरा’
  • यहोवावर आपल्या सर्व चिंता टाका
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
  • आपली सर्व चिंता यहोवावर टाका
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१६
  • चिंता
    सावध राहा!—२०१६
  • यहोवाचे मार्ग जाणून घेणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००५
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
w99 ३/१५ पृ. २१-२३

चिंतेला आपल्यावर कब्जा मिळवू देऊ नका

“उद्याची चिंता करू नका, कारण उद्याची चिंता उद्याला; ज्या दिवसाचे दुःख त्या दिवसाला पुरे.” (मत्तय ६:३४) येशूने दिलेला हा सल्ला आजच्या धावपळीच्या आणि ओढाताणीच्या जगात जगत असलेल्या आपल्या सर्वांकरता निश्‍चितपणे व्यावहारिक आहे.

पण वास्तविकरीत्या, आपल्या समस्या, आपले निर्णय, आपली कर्तव्ये आणि आपल्या जबाबदाऱ्‍या यांविषयी चिंता न करणे आपल्याला शक्य आहे का? कोट्यवधी लोकांना निराश, उदास आणि भाराक्रांत असल्याचे वाटते. त्यामुळेच चिंताहारक आणि शामक औषधांच्या उद्योगांत कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते.

मर्यादा ठरवणे

आपली कर्तव्ये, आपल्या नेमणुका, आपले निर्णय आणि आपल्या समस्या यांकरता आपल्याला योजना आणि तयारी करण्याची गरज आहे. मग या गोष्टी आपल्याला लगेच किंवा आरामशीर करायच्या झाल्या तरीही योजना आणि तयारी आवश्‍यक आहे. कोणतेही मोठे काम हाती घेण्यापूर्वी “बसून व खर्चाचा अंदाज करून” त्यानंतर कामास सुरवात करण्याचे बायबल आपल्याला आर्जवते. (लूक १४:२८-३०) त्याकरता आपल्यापुढे असणारे पर्याय पाहणे, परिणामांचे परीक्षण करणे आणि वेळ, शक्‍ती आणि पैसा यांस्वरूपात काय किंमत मोजावी लागेल हे ठरवणे आवश्‍यक आहे.

पुढे काय होईल याचा काळजीपूर्वक विचार एखाद्याने करायला पाहिजे हे खरे असले तरी, प्रत्येक संभावनेचा विचार करणे शक्य नाही आणि तसे केल्याने आपल्या पदरी निराशाच पडेल. उदाहरणार्थ, कुटुंबाच्या सुरक्षिततेकरता, घराला आग लागल्यास काय करता येईल याचा तुम्ही विचार कराल. त्याकरता तुम्ही आगीची सूचना देणारे यंत्र आणि अग्निशामक साहित्य विकत घेऊन घरात लावाल. आग लागल्यास घरातून वेगवेगळ्या ठिकाणांहून घराच्या बाहेर पडण्याची तुम्ही योजना आणि तालीम कराल. पण शहाणपणाची, व्यावहारिक पूर्वविचाराची मर्यादा ओलांडून फाजील अनावश्‍यक चिंता सुरू झाली असे केव्हा म्हणता येईल? गृहीत धरलेल्या परिस्थितींविषयी तुम्ही एकसारखा विचार करण्यास सुरवात करता तेव्हा अनावश्‍यक चिंता वाटू लागते आणि या गृहीत धरलेल्या परिस्थिती कदाचित निव्वळ कल्पनाशक्‍तीच्या आधारावर असतील. अस्वस्थ करणारे विचार तुमच्यावर कब्जा करतील, या अस्वस्थ करणाऱ्‍या विचारांमुळे आपण कोणत्यातरी गोष्टीकडे दुर्लक्ष केले आहे किंवा कुटुंबाच्या सुरक्षिततेकरता आपण पुरेशी उपाययोजना केलेली नाही असे तुम्हाला वाटेल. स्वतः ओढवून घेतलेल्या या मानसिक पीडेमुळे तुमच्या मनावर इतका भार येईल, की तुमची झोप पार उडून जाईल.

फारोच्या समोर मोशे

यहोवा देवाने मोशेवर एक अवघड काम सोपवले होते. त्याला पहिल्यांदा, इस्राएलांपुढे जाऊन त्यांना पटवून द्यायचे होते, की इजिप्तमधून त्यांची सुटका करण्याकरता यहोवा देवाने त्याला नियुक्‍त केले आहे. दुसरे काम म्हणजे, मोशेला फारोसमोर जायचे होते आणि इस्राएलांना मुक्‍त करण्याची त्याला विनंती करायची होती. अखेरीस, मोशेला लाखो लोकांच्या प्रचंड लोकसमुदायाला रानातून अशा देशात न्यायचे होते ज्या देशातील लोक शत्रुभाव बाळगणारे होते. (निर्गम ३:१-१०) हे कठीण काम होते, पण या जबाबदारीची मोशे अनावश्‍यक चिंता करत बसला का?

मोशेला अनेक गोष्टींची चिंता होती हे खरे आहे. त्याने यहोवाला विचारले: “मला तुमच्या पूर्वजांच्या देवाने तुम्हाकडे पाठविले आहे, असे मी इस्राएलवंशजांकडे जाऊन त्यांस सांगितले असता त्याचे नाव काय असे मला ते विचारतील, तेव्हा मी त्यांना काय सांगू?” यहोवाने त्याला त्याच्या प्रश्‍नाचे उत्तर दिले. (निर्गम ३:१३, १४) फारोने आपल्यावर विश्‍वास ठेवला नाही तर काय होईल, याची देखील मोशेला चिंता होती. पुन्हा एकदा यहोवाने संदेष्टा मोशे याला उत्तर दिले. त्याची एक अखेरची समस्या होती—मोशेने हे मान्य केले, की तो “मुखाचा जड व जिभेचाहि जड आहे.” यावर कोणता उपाय शोधण्यासारखा होता? यहोवाने अहरोनाला मोशेचा प्रवक्‍ता बनवले.—निर्गम ४:१-५, १०-१६.

प्रश्‍नांची उत्तरे मिळाल्यानंतर सज्ज होऊन आणि यहोवावरील पूर्ण विश्‍वासानिशी जे सांगितले होते त्याप्रमाणे करण्यास मोशे निघाला. फारोसमोर गेल्यानंतर काय होईल या विचाराने घाबरून, स्वतःला मानसिक पीडा करून घेण्याऐवजी त्याने यहोवाने ‘सांगितल्याप्रमाणे केले.’ (निर्गम ७:६) या चिंतेमुळे तो दबून गेला असता, तर त्यामुळे त्याचे काम पूर्ण करण्याकरता लागणारा विश्‍वास आणि धैर्य कमकुवत झाले असते.

मोशेने संतुलितरीत्या पार पाडलेले काम उदाहरणीय आहे आणि यालाच पौलाने “संयमनाचा आत्मा” किंवा “मर्यादशीलता” असे म्हटले. (२ तीमथ्य १:७; तीत २:२-६) मोशेने संयमनाचा आत्मा दाखवला नसता, तर त्याला सोपवण्यात आलेले प्रचंड काम पाहूनच तो गळून गेला असता आणि त्यामुळे कदाचित त्याने हे काम स्वीकारले देखील नसते.

तुमचे विचार नियंत्रणात ठेवणे

तुमच्या दररोजच्या जीवनात तुमच्या विश्‍वासाची परीक्षा होते किंवा त्याची कसोटी लागते तेव्हा तुम्ही कशाप्रकारे प्रतिक्रिया दाखवता? आपल्यापुढे येणाऱ्‍या आव्हानांना आणि अडथळ्यांना पाहून तुम्ही घाबरून जाता का? किंवा एका संतुलित दृष्टिकोनातून तुम्ही त्यांकडे पाहता? जसे की काहीजण म्हणतात, ‘पूल समोर आल्यावर तो पार करा.’ कदाचित तो पूल पार करण्याची आवश्‍यकताही पडणार नाही! मग जे कधी घडणारच नाही त्याविषयी उगाच मनात भीती का बाळगावी? बायबल म्हणते: “मनुष्याचे मन चिंतेने दबून जाते.” (नीतिसूत्रे १२:२५) परिणामी तुमच्याकडून इतकी दिरंगाई होईल, की अखेरीस निर्णय घेईपर्यंत फार उशीर झालेला असेल.

अनावश्‍यक चिंतेमुळे संभवणारा गंभीर परिणाम म्हणजे आध्यात्मिक हानी. येशू ख्रिस्ताने हे दाखवून दिले, की द्रव्याची फसवी शक्‍ती आणि “संसाराची चिंता” यांमुळे ‘राज्याच्या वचनाविषयी’ वाटणारी कदर पूर्णपणे नाहीशी होऊ शकते. (मत्तय १३:१९, २२) ज्याप्रमाणे काट्यांमुळे बीज रूजत नाही आणि फळ देत नाही त्याप्रमाणे अनियंत्रित चिंता आध्यात्मिक प्रगती आणि देवाच्या स्तुतीची फळे आणण्यास अडथळा आणू शकते. स्वतः ओढवून घेतलेल्या, विनाशकारी मानसिक पीडेने काही जणांना यहोवाला समर्पण करण्यापासून रोखले आहे. त्यांना काळजी वाटते, ‘माझ्या समर्पणानुरूप मी जगलो नाही तर काय होईल?’

प्रेषित पौलाने आपल्याला सांगितले, की आपल्या आध्यात्मिक संघर्षात “प्रत्येक कल्पना अंकित करून तिला ख्रिस्तापुढे मान वाकविण्यास” लावण्याचा आपण प्रयत्न करतो. (२ करिंथकर १०:५) आपल्याला शारीरिक, भावनात्मक आणि आध्यात्मिकरीत्या निराश आणि कमकुवत करण्याकरता आपल्या चिंतांचा फायदा घेण्यात आपला प्रमुख शत्रू असलेल्या दियाबल सैतानाला आनंदच होईल. अविचारीपणाच्या सापळ्यात पकडण्याकरता शंकांचा उपयोग करण्यात तो तरबेज आहे. म्हणूनच पौलाने ख्रिश्‍चनांना असा इशारा दिला, की त्यांनी ‘सैतानाला वाव देऊ नये.’ (इफिसकर ४:२७) “ह्‍या युगाचे दैवत” असल्यामुळे सैतानाने यशस्वीरीत्या ‘विश्‍वास न ठेवणाऱ्‍या लोकांची मने आंधळी केली आहेत.’ (२ करिंथकर ४:४) आपल्या मनावर त्याला कधीही ताबा मिळवू देऊ नये!

मदत उपलब्ध

एखाद्या मुलाला काही समस्या असल्यास ते त्याच्या प्रेमळ वडिलांकडे जाते आणि त्यांच्याकडून मार्गदर्शन आणि सांत्वन प्राप्त करते. त्याचप्रमाणे, आपल्याला समस्या असल्यास आपण आपल्या स्वर्गीय पित्याकडे जाऊ शकतो. खरे तर, यहोवा आपल्याला आमंत्रण देतो, की आपण आपला भार आणि आपल्या चिंता त्याच्यावर टाकाव्यात. (स्तोत्र ५५:२२) वडिलांनी समजूत घातल्यावर मूल त्याच्या समस्यांविषयी चिंता करत बसत नाही, त्याप्रमाणे आपला भार यहोवावर टाकल्यानंतर आपण त्यानंतर चिंता करत बसू नये.—याकोब १:६.

आपण आपल्या चिंता यहोवावर कशा टाकू शकतो? फिलिप्पैकर ४:६, ७ उत्तर देते: “कशाविषयीहि चिंताक्रांत होऊ नका तर सर्व गोष्टींविषयी प्रार्थना व विनंती करून आभारप्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा; म्हणजे सर्व बुद्धिसामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांति तुमची अंतःकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठायी राखील.” होय, नियमितपणे केलेल्या आपल्या प्रार्थनांच्या आणि विनवण्यांच्या प्रतिक्रियेत यहोवा आपल्याला आंतरिक शांती देऊ शकतो ज्यामुळे अनावश्‍यक चिंतांमुळे आपली मानसिक शांती भंग पावत नाही.—यिर्मया १७:७, ८; मत्तय ६:२५-३४.

आपल्या प्रार्थनांच्या एकवाक्यतेत कार्य करण्याकरता आपण शारीरिकरीत्या किंवा मानसिकरीत्या फटकून राहू नये. (नीतिसूत्रे १८:१) समस्या सोडवण्याकरता त्यांच्याशी संबंधित असलेल्या बायबलमधील तत्त्वांचा आणि मार्गदर्शनांचा आपण विचार करावा आणि अशाप्रकारे स्वतःच्या बुद्धीवर अवलंबून राहण्याचे टाळावे. (नीतिसूत्रे ३:५, ६) योग्य तो निर्णय घेण्याकरता आणि समस्या हाताळण्याकरता सर्वांनी मग ते लहान असोत अथवा मोठे असोत बायबल आणि वॉच टावर प्रकाशनांमध्ये असलेल्या विपुल माहितीचा लाभ घ्यावा. याशिवाय, ख्रिस्ती मंडळीमध्ये आपल्यासोबत बोलण्यास नेहमी तयार असलेले अनुभवी वडील आणि इतर परिपक्व ख्रिस्ती आपल्याला लाभले आहेत. (नीतिसूत्रे ११:१४; १५:२२) जे आपल्या समस्येत भावनात्मकरीत्या गुंतलेले नाहीत आणि जे समस्या सोडवण्याकरता देवाच्या मार्गदर्शनाचा उपयोग करतात अशा ख्रिस्ती लोकांमुळे समस्येकडे एक दुसऱ्‍या दृष्टिकोनातून पाहण्यास मदत होते. ते आपल्याकरता कोणताही निर्णय घेत नाहीत, पण त्यांच्याकडून आपल्याला पुष्कळ उत्तेजन आणि आधार मिळू शकतो.

‘देवाची आशा धरा’

आपल्याकडे आधीच दररोजच्या कितीतरी वास्तविक समस्या आहेत आणि त्यांना तोंड देतादेता आपल्याला खूप मानसिक त्रास होतो या गोष्टीचा कोणी अस्वीकार करणार नाही, तेव्हा आणखी काल्पनिक समस्यांची त्यांत का म्हणून भर घालायची? काय होईल याची चिंता वाटून आपल्याला बेचैन किंवा अस्वस्थ वाटत असल्यास आपण यहोवाला प्रार्थना आणि विनवणी करू या. मार्गदर्शन, बुद्धी, संयम यांकरता देवाच्या वचनाकडे आणि त्याच्या संघटनेकडे पाहा. आपल्यावर कोणतीही परिस्थिती आली, तरी ती समस्या हाताळण्याकरता आपल्याला मदत उपलब्ध आहे.

भाराक्रांत आणि क्षोभित झालेला स्तोत्रकर्ता एका गीतात असे म्हणतो: “हे माझ्या जिवा, तू का खिन्‍न झालास? तू आतल्या आत का तळमळत आहेस? देवाची आशा धर; तो माझा देव मला दर्शन देऊन माझा उद्धार करितो, म्हणून मी त्याचे पुनरपि गुणगान गाईन.” (स्तोत्र ४२:११) आपणही असेच म्हणू या.

होय, जे होण्याची शक्यता असते त्याकरता योजना करता येण्यासारखी आहे, पण जे अनपेक्षित असते ते यहोवाच्या हाती सोपवून द्या. “त्याच्यावर तुम्ही आपली सर्व चिंता टाका कारण तो तुमची काळजी घेतो.”—१ पेत्र ५:७.

[२३ पानांवरील चित्र]

दावीदाप्रमाणे तुम्ही तुमची सर्व काळजी आणि चिंता यहोवावर टाकता का?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा