वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w99 ३/१५ पृ. १५-२०
  • सूक्ष्मदृष्टीने आणि मन वळविण्याच्या कलेसह शिकवा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • सूक्ष्मदृष्टीने आणि मन वळविण्याच्या कलेसह शिकवा
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • चांगले ऐकणारे असा
  • साधेपणाचे मूल्य
  • प्रश्‍नांचा प्रभावशाली उपयोग
  • हृदयस्पर्शी दृष्टान्त
  • शास्त्रवचनांचे कौशल्यपूर्ण वाचन
  • थोर शिक्षकाचे अनुकरण करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००२
  • शिकवण्यासाठी उदाहरणं वापरा
    वाचन करण्यात व शिकवण्यात निपुण व्हा
  • “दाखल्यावाचून तो त्यांच्याबरोबर काही बोलला नाही”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००२
  • उचित उदाहरणे
    ईश्‍वरशासित सेवा प्रशाला मार्गदर्शक पुस्तक
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
w99 ३/१५ पृ. १५-२०

सूक्ष्मदृष्टीने आणि मन वळविण्याच्या कलेसह शिकवा

“ज्ञान्याच्या हृदयापासून त्याच्या मुखास शिक्षण [“सूक्ष्मदृष्टी,” NW] मिळते; ते त्याच्या वाणीत ज्ञानाची [“मन वळविण्याच्या कलेची,” NW] भर घालते.”—नीतिसूत्रे १६:२३.

१. देवाचे वचन शिकवण्यात केवळ माहिती देण्यापेक्षा अधिक काही का गोवलेले आहे?

देवाच्या वचनाचे शिक्षक या नात्याने आपला हाच उद्देश आहे, की आपण आपल्या बायबल विद्यार्थ्यांच्या ज्ञानातच भर घालू नये, तर त्याच्या अंतःकरणाचा ठाव देखील घ्यावा. (इफिसकर १:१८) म्हणून शिकवण्यात केवळ माहिती देण्यापेक्षाही अधिक काही गोवलेले आहे. नीतिसूत्रे १६:२३ म्हणते: “ज्ञानाच्या हृदयापासून त्याच्या मुखास शिक्षण [सूक्ष्मदृष्टी] मिळते; ते त्याच्या वाणीत ज्ञानाची [मन वळविण्याच्या कलेची] भर घालते.”

२. (अ) मन वळवणे म्हणजे काय? (ब) सर्व ख्रिश्‍चनांना मन वळविणारे शिक्षक होणे कसे शक्य आहे?

२ प्रेषित पौलाने हे तत्त्व त्याच्या शैक्षणिक कार्यात निश्‍चितपणे उपयोगात आणले. करिंथमध्ये असताना “तो दर शब्बाथ दिवशी सभास्थानात वादविवाद करून यहूद्यांची व हेल्लेण्यांची खात्री करून देत असे [त्यांचे मन वळवत असे].” (प्रेषितांची कृत्ये १८:४) एका विश्‍वसनीय संदर्भानुसार या ठिकाणी “मन वळवणे” असे भाषांतर केलेल्या मूळ ग्रीक शब्दाचा अर्थ “युक्‍तिवादाद्वारे किंवा नैतिक विचारांद्वारे मनःपरिवर्तन करणे,” असा होतो. खात्री पटविणाऱ्‍या अशा युक्‍तिवादांमुळे पौलाला लोकांची विचारसरणी बदलता आली. लोकांची मने वळविण्यात तो इतका पटाईत होता, की त्याच्या शत्रूंना त्याचे भय वाटत असे. (प्रेषितांची कृत्ये १९:२४-२७) पण, पौलाची शिकवण म्हणजे मानवी क्षमतेचे प्रदर्शन नव्हते. त्याने करिंथकरांना म्हटले: “तुमचा विश्‍वास मनुष्याच्या बुद्धीमत्तेवर उभारलेला नसावा तर देवाच्या सामर्थ्यावर उभारलेला दिसावा म्हणून माझे भाषण व माझी घोषणा ज्ञानयुक्‍त अशा मन वळविणाऱ्‍या शब्दांची नव्हती तर आत्मा व सामर्थ्य ह्‍यांची निदर्शक होती.” (१ करिंथकर २:४, ५) यहोवा देवाच्या आत्म्याची मदतीमुळे सर्व ख्रिश्‍चनांना मन वळविणारे शिक्षक होता येईल. पण कसे? त्याकरता आपण शिकवण्याच्या काही प्रभावी पद्धतींविषयी पाहू.

चांगले ऐकणारे असा

३. दुसऱ्‍यांना शिकवतेवेळी सूक्ष्मदृष्टीची गरज का आहे आणि आपण बायबल विद्यार्थ्यांच्या मनाचा ठाव कसा घेऊ शकतो?

३ शिकवण्याची पहिली पद्धत म्हणजे बोलणे नव्हे, तर ऐकणे. नीतिसूत्रे १६:२३ येथे सांगितल्याप्रमाणे मन वळविण्याकरता आपल्याकडे सूक्ष्मदृष्टी असली पाहिजे. येशूने ज्या लोकांना शिकवले त्यांच्याविषयी त्याच्याकडे निश्‍चितच सूक्ष्मदृष्टी होती. योहान २:२५ म्हणते: “मनुष्यात काय आहे हे त्याला स्वतःला ठाऊक होते.” पण आपण ज्यांना शिकवतो त्यांच्या मनात काय आहे हे आपल्याला कसे जाणून घेता येईल? एक मार्ग म्हणजे, त्यांचे चांगल्याप्रकारे ऐकून घेणे. याकोब १:१९ म्हणते: “प्रत्येक माणूस ऐकावयास तत्पर, बोलावयास धीमा . . . असावा.” हे खरे आहे, की सर्वच लोक त्यांचे विचार लगेच बोलून दाखवत नाहीत. आपल्या बायबल विद्यार्थ्यांना याची खात्री पटली, की आपल्याला त्यांच्यात खरोखरच आस्था आहे तेव्हा कदाचित त्यांच्या मनातील भावना ते आपल्याकडे बोलतील. सहानुभूतिदर्शक प्रश्‍न विचारल्याने बहुतेक वेळा विद्यार्थ्यांच्या मनाचा ठाव घेण्यास आणि त्यांच्या आंतरिक भावना ‘बाहेर काढण्यास’ मदत होते.—नीतिसूत्रे २०:५.

४. ख्रिस्ती वडिलांनी चांगले ऐकणारे का असले पाहिजे?

४ ख्रिस्ती वडिलांनी चांगले ऐकणारे असावे हे खास करून महत्त्वाचे आहे. तेव्हाच त्यांना “प्रत्येकाला कसकसे उत्तर द्यावयाचे ते” खऱ्‍या अर्थाने समजेल. (कलस्सैकर ४:६) नीतिसूत्रे १८:१३ असा इशारा देते: “ऐकून घेण्यापूर्वी जो उत्तर देतो त्याचे ते करणे मूर्खपणाचे व लज्जास्पद ठरते.” एक बहीण काही सभांना न आलेली पाहून दोघा बांधवांनी तिला मदत करण्याच्या हेतूने तिला जगीक प्रवृत्तींविषयी उपदेश दिला. पण ती बहीण मात्र अतिशय दुखावली गेली; कारण ती सभांना का येऊ शकली नाही, हे त्या वडिलांनी तिला विचारलेच नाही. अलीकडेच तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती आणि ती नुकतीच आजारातून बरी होत होती. तेव्हा सल्ला देण्याआधी ऐकून घेणे किती महत्त्वाचे आहे!

५. बांधवांमध्ये निर्माण झालेले मतभेद वडिलांना कशाप्रकारे हाताळता येतील?

५ वडील शिकवतात तेव्हा बहुतेकवेळा त्यांना इतरांना सल्ला द्यावा लागतो. त्यावेळी सुद्धा त्यांनी चांगल्याप्रकारे ऐकले पाहिजे. विशेषतः जेव्हा सहख्रिश्‍चनांमध्ये मतभेद होतात तेव्हा ऐकणे फार गरजेचे ठरते. केवळ ऐकण्याद्वारे मंडळीचे वडील स्वर्गीय पित्याचे अनुकरण करू शकतात, कारण “तो तोंडदेखला न्याय करीत नाही.” (१ पेत्र १:१७) अशा प्रकरणांत भावनांचा प्रभाव अतिशय जोरदार असू शकतो. आणि नीतिसूत्रे १८:१७ येथे देण्यात आलेला सल्लाही वडील लक्षात ठेवतात: “जो आपला दावा प्रथम मांडितो त्याचा पक्ष खरा भासतो, पण त्याचा शेजारी येऊन त्याला कसाला लावितो.” प्रभावी शिक्षक दोन्ही पक्षांचे ऐकून घेईल. प्रार्थना करण्याद्वारे, तप्त वातावरण शांत करण्याचे प्रयत्न वडील करतील. (याकोब ३:१८) भावनांचा उद्रेक झाल्यास, एकमेकांच्या विरोधात उठलेल्या बांधवांनी एक दुसऱ्‍यावर आरोप-प्रत्यारोप करण्याऐवजी प्रत्येकाने आपली बाजू मला ऐकवावी असे वडील त्यांना सांगू शकतात. उचित प्रश्‍न विचारण्याद्वारे वडिलांना निर्माण झालेल्या समस्येची चांगली कल्पना येऊ शकते. बहुतेक वेळा एक दुसऱ्‍यांमध्ये सुसंवाद नसल्यामुळे मतभेद निर्माण होतात. पण, बायबलमधील काही तत्त्वांचे उल्लंघन झाले असल्यास प्रेमळ शिक्षक दोन्ही पक्षांची बाजू ऐकून सूक्ष्मदृष्टीसह मार्गदर्शन करू शकतो.

साधेपणाचे मूल्य

६. साधेपणाने शिकवण्याच्या बाबतीत पौलाने आणि येशूने कशाप्रकारे उदाहरण मांडले?

६ शिकवण्याच्या पद्धतीतील आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, साध्यासोप्या भाषेत बोलणे. सत्याची “रुंदी, लांबी, उंची व खोली” यांविषयी बायबल विद्यार्थ्याने पूर्णपणे परिचित व्हावे असे आपल्याला वाटेल हे खरे आहे. (इफिसकर ३:१८) बायबलमधील तत्त्वांचे पैलू चित्तवेधक आहेत आणि बहुतेक ते समजावून सांगणे इतके सोपे नसते. (रोमकर ११:३३) तरीसुद्धा, जेव्हा पौलाने ग्रीक लोकांना प्रचार केला तेव्हा त्याने ‘वधस्तंभावर खिळलेल्या ख्रिस्ताच्या’ निखालस संदेशावर जोर दिला. (१ करिंथकर २:१, २) त्याप्रमाणे, येशूनेही स्पष्ट आणि अपीलकारक पद्धतीने प्रचार केला. त्याने डोंगरावरील त्याच्या प्रवचनात सोपे शब्द वापरले. या सोप्या शब्दांतूनही त्याने अतिशय गहन सत्य सांगितले.—मत्तय, अध्याय ५-७.

७. आपण बायबल अभ्यास साध्यासोप्या भाषेत कसा घेऊ शकतो?

७ त्याचप्रमाणे आपणही बायबल अभ्यास घेतेवेळी साध्यासोप्या भाषेत शिकवू शकतो. कसे? “श्रेष्ठ” गोष्टींवर जोर देण्याद्वारे. (फिलिप्पैकर १:१०) क्लिष्ट विषय येतात तेव्हा, आपण स्पष्टपणे बोलण्याचा प्रयत्न केला पाहिजे. प्रकाशनातील प्रत्येक शास्त्रवचन वाचून त्यावर चर्चा करण्याऐवजी आपण प्रमुख शास्त्रवचनांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. याकरता आपल्याला चांगली तयारी करण्याची आवश्‍यकता आहे. असंख्य मुद्द्‌यांचा भडिमार करून बायबल विद्यार्थ्याला गोंधळून टाकण्याचे आपण टाळले पाहिजे तसेच कमी महत्त्वाच्या गोष्टींवर चर्चा करून मुख्य विषयापासून दूर न होण्याचीही आपण काळजी घेतली पाहिजे. चाललेल्या अभ्यासाच्या अध्यायाशी संबंधित नसलेला एखादा प्रश्‍न बायबल विद्यार्थ्याने विचारल्यास, या प्रश्‍नाचे उत्तर आपण अध्याय संपल्यानंतर पाहू असे विद्यार्थ्याला वाईट न वाटू देता सांगू शकतो.

प्रश्‍नांचा प्रभावशाली उपयोग

८. येशूने प्रश्‍नांचा प्रभावशाली उपयोग कसा केला?

८ शिकवण्याच्या आणखी एका उपयोगी पद्धतीमध्ये प्रभावीपणे प्रश्‍न विचारण्याचा समावेश होतो. येशूने लोकांना शिकवताना त्यांना अनेक वेळा प्रश्‍न विचारले. उदाहरणार्थ त्याने पेत्राला विचारले: “शिमोना, तुला काय वाटते? पृथ्वीवरील राजे जकात किंवा पट्टी कोणापासून घेतात? स्वतःच्या मुलांपासून की परक्यांपासून? परक्यांपासून, असे त्याने म्हटल्यावर येशू त्याला म्हणाला, तर मुले मोकळी आहेत.” (मत्तय १७:२४-२६) मंदिरात ज्या देवाची उपासना केली जात होती त्याचा एकुलता एक पुत्र असल्यामुळे येशूला खरे तर कर देण्याची काहीही आवश्‍यकता नव्हती. पण येशूने ते सत्य, प्रश्‍नांचा प्रभावीपणे उपयोग करून स्पष्ट केले. अशाप्रकारे येशूने पेत्राला आधीच माहीत असलेल्या गोष्टींचा उपयोग केला ज्यामुळे पेत्र योग्य निष्कर्षाप्रत पोहंचू शकला.

९. बायबल अभ्यासाच्या वेळी आपल्याला प्रश्‍नांचा कशाप्रकारे उपयोग करता येईल?

९ बायबल अभ्यास घेतेवेळी आपण प्रश्‍नांचा प्रभावशाली उपयोग करू शकतो. विद्यार्थ्याने चुकीचे उत्तर दिल्यास, खरे उत्तर सांगण्याचा सहसा मोह होतो, पण असे केल्यास ते उत्तर विद्यार्थ्याच्या लक्षात कितपत राहील? विद्यार्थ्याला प्रश्‍न विचारण्याद्वारे योग्य निर्णय घेण्याकरता त्याची मदत करणे केव्हाही चांगले. उदाहरणार्थ, आपण ईश्‍वरी नावाचा उपयोग का करावा हे समजण्यास त्याला कठीण जात असल्यास तुम्ही त्याला असे विचारू शकता, ‘तुमचे नाव तुमच्याकरता महत्त्वाचे आहे का? . . . का बरे? . . . तुमच्या नावाचा उच्चार करण्यास कोणी नकार दिल्यास तुम्हाला कसे वाटेल? . . . तर मग आपण देवाच्या व्यक्‍तिगत नावाचा उपयोग करावा, अशी तो आपल्याकडून जी अपेक्षा करतो ती योग्य नाही का?’

१०. भावनात्मकरीत्या आघात झालेल्यांना मदत करण्याकरता वडील प्रश्‍नांचा कशाप्रकारे उपयोग करू शकतात?

१० कळपाला मेंढपाळकत्वाची भेट देताना वडील देखील प्रश्‍नांचा चांगल्याप्रकारे उपयोग करू शकतात. मंडळीतील अनेक जण भावनात्मकरीत्या खचलेले आहेत, सैतानाच्या जगाकडून अनेकांची भावनात्मक कुचंबना झाली आहे आणि आपण अशुद्ध आणि अप्रिय आहोत तअसे त्यांना वाटते. अशा व्यक्‍तीला समजावण्याकरता वडिलांना अशा प्रकारे प्रयत्न करता येईल: “तुम्ही स्वतःला अशुद्ध मानत असला, तरी यहोवाला तुमच्याविषयी कसे वाटते? जर आपल्या प्रेमळ स्वर्गीय पित्याने तुमच्याकरता त्याच्या पुत्राच्या बलिदानाद्वारे खंडणी दिली, तर मग त्याचे तुमच्यावर प्रेम आहे असा त्याचा अर्थ होत नाही का?’—योहान ३:१६.

११. उत्तराची अपेक्षा नसलेले प्रश्‍न म्हणजे काय आणि जाहीरपणे बोलताना त्यांचा कशाप्रकारे उपयोग करता येईल?

११ शिकवण्याची आणखी एक उपयोगी पद्धत म्हणजे उत्तराची अपेक्षा नसलेले प्रश्‍न विचारणे. ऐकणाऱ्‍यांकडून या प्रश्‍नांची उत्तरे बोलून दाखवण्याची अपेक्षा केली जात नाही, पण अशा प्रश्‍नांमुळे योग्य निर्णयाप्रत पोहंचण्यास मदत मात्र होते. ऐकणाऱ्‍यांनी खोलवर विचार करावा म्हणून प्राचीन काळातील संदेष्ट्यांनी बहुतेक वेळा उत्तराची अपेक्षा नसलेल्या प्रश्‍नांचा उपयोग केला. (यिर्मया १८:१४, १५) येशूने उत्तराची अपेक्षा नसलेल्या प्रश्‍नांचा प्रभावीपणे वापर केला. (मत्तय ११:७-११) असे प्रश्‍न विशेषतः जाहीरपणे बोलतेवेळी फार प्रभावी ठरतात. यहोवाला आनंदित करण्याकरता आपल्याला पूर्ण जिवाभावाने सेवा केली पाहिजे असे श्रोत्यांना स्पष्टपणे सांगण्याऐवजी, असे विचारल्यामुळे अधिक प्रभाव पडेल, ‘आपली सेवा आपण खरोखरच जिवाभावाने केली नाही तर यहोवा आनंदित होईल का?’

१२. दृष्टिकोनात्मक प्रश्‍न विचारण्याचे महत्त्व काय आहे?

१२ बायबल विद्यार्थी जे शिकत आहे त्यावर त्याचा खरोखरच विश्‍वास आहे किंवा नाही हे जाणून घेण्याकरता दृष्टिकोनात्मक प्रश्‍न उपयोगी पडतात. (मत्तय १६:१३-१६) विद्यार्थी अगदी अचूक उत्तर देईल, की जारकर्म करणे चूक आहे. पण त्याच्या उत्तरानंतर असे प्रश्‍न का विचारू नयेत, नैतिकतेविषयी असणाऱ्‍या देवाच्या दर्जाविषयी तुम्हाला स्वतःला काय वाटते? हा दर्जा खूपच बंधनकारक आहे असे तुम्हाला वाटते का? देवाच्या दर्जांनुरूप चालल्यामुळे किंवा न चालल्यामुळे काही फरक पडतो का?

हृदयस्पर्शी दृष्टान्त

१३, १४. (अ) एखादी गोष्ट दृष्टान्तात सांगणे म्हणजे काय? (ब) चांगले दृष्टान्त प्रभावी का असतात?

१३ ऐकणाऱ्‍यांच्या आणि बायबल विद्यार्थ्यांच्या हृदयाला स्पर्श करण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे दृष्टान्ताचा प्रभावी वापर. “दृष्टान्त” असे भाषांतर केलेल्या मूळ ग्रीक शब्दप्रयोगाचा अर्थ “बाजूला ठेवणे किंवा सोबत ठेवणे.” तुम्ही दृष्टान्तरूपात सांगता तेव्हा तुम्ही ‘एखाद्या गोष्टीच्या बाजूला तिच्यासारखी असणारी दुसरी गोष्ट ठेवता.’ उदाहरणार्थ, येशूने विचारले: “आपण देवाच्या राज्यास कशाची उपमा द्यावी अथवा कोणत्या दाखल्यात ते मांडावे?” त्यांना उत्तर देताना येशूने लोकांना माहीत असलेल्या मोहरीच्या दाण्याचा उल्लेख केला.—मार्क ४:३०-३२.

१४ देवाच्या संदेष्ट्यांनी अनेक प्रभावी दृष्टान्तांचा उपयोग केला. इस्राएलांना शिक्षा करण्यासाठी यहोवाने ज्यांचा उपयोग केला त्या अश्‍शुरी लोकांनी स्वैराचारी क्रुरता अवलंबली तेव्हा यशयाने त्यांची आढ्यता दृष्टान्ताच्या स्वरूपात उघड केली: “कुऱ्‍हाडीने तोडणाऱ्‍यापुढे कुऱ्‍हाड घमेंड करील काय? करवत, आपणास, आपणास चालविणाऱ्‍यापुढे, आढ्यता मिरवील काय?” (यशया १०:१५) त्याचप्रमाणे येशूनेही लोकांना शिकवताना दृष्टान्ताचा बऱ्‍याचदा वापर केला. त्याच्याविषयी असे म्हटले जाते की, “दाखल्यावाचून तो त्यांच्याबरोबर बोलत नसे.” (मार्क ४:३४) चांगले दृष्टान्त प्रभावी असतात कारण ते लोकांच्या बुद्धीलाच नव्हे, तर भावनांनाही स्पर्श करतात. परिचित असलेल्या गोष्टींशी तुलना करण्याद्वारे ऐकणाऱ्‍यांना नवीन माहिती आत्मसात करण्यास सोपे जाते.

१५, १६. दृष्टान्त कशामुळे प्रभावी होतील? उदाहरणे द्या.

१५ थेटपणे हृदयाला स्पर्श करणाऱ्‍या दृष्टान्ताचा आपण कसा उपयोग करू शकतो? सर्वप्रथम, सांगायची गोष्ट दृष्टान्ताशी माफकपणे जुळली पाहिजे. जर ही तुलना जुळली नाही, तर श्रोत्यांना माहिती मिळण्याऐवजी दृष्टान्तामुळे त्यांचे लक्ष विकर्षित होईल. चांगला हेतू मनात बाळगून एका वक्‍त्‌याने अभिषिक्‍त शेषांची येशू ख्रिस्ताप्रती असलेली अधीनता दाखवण्यासाठी एका ईमानी कुत्र्याशी त्यांची तुलना केली. अशाप्रकारची अपमानास्पद तुलना खरोखरच योग्य आहे का? बायबलमध्ये हाच विचार अपीलकरक आणि सन्माननीय पद्धतीने सांगण्यात आला आहे. त्यामध्ये येशूच्या १,४४,००० अभिषिक्‍त अनुयायांची तुलना ‘नवऱ्‍यासाठी शृंगारलेल्या नवरीसोबत’ केली आहे.—प्रकटीकरण २१:२.

१६ लोकांच्या जीवनाशी संबंध असलेल्या दृष्टान्तांचा उपयोग केला जातो तेव्हा ते फार प्रभावी ठरतात. नाथानाने कत्तल करण्यात आलेल्या मेंढराचा दृष्टान्त दावीद राजाला सांगितला तेव्हा त्या दृष्टान्ताने दावीदाच्या हृदयाला स्पर्श केला कारण त्याच्या तारुण्यात त्याने मेंढपाळाचे काम केल्यामुळे मेंढरांवर त्याचे खूप प्रेम होते. (१ शमुवेल १६:११-१३; २ शमुवेल १२:१-७) या दृष्टान्तात बैलाचा उपयोग केला असता तर तो दृष्टान्त इतका प्रभावी झाला नसता. त्याप्रमाणे शास्त्रीय अविष्कार किंवा अज्ञात ऐतिहासिक घटना यांचा दृष्टान्तात उपयोग केल्यास आपल्या श्रोत्यांवर तितका प्रभाव पडणार नाही. येशूने दररोजच्या जीवनातील दृष्टान्त वापरले. त्याने अगदी सामान्य गोष्टींचा दृष्टान्तांत उपयोग केला, जसे की दिवा, आकाशातील पक्षी, रानातील फुले. (मत्तय ६:२६, २८; लूक ७:३२) त्यामुळे येशू दृष्टान्तांतून ज्या गोष्टी सांगत होता त्या लोकांना समजायला सोप्या होत्या.

१७. (अ) आपले दृष्टान्त कशावर आधारलेले असावेत? (ब) आपल्या प्रकाशनांत वापरलेले दृष्टान्त कशाप्रकारे आपल्या विद्यार्थ्यांच्या परिस्थितींनुरूप जुळवता येतील?

१७ आपल्या सेवाकार्यात, सोपे आणि तरीही प्रभावी दृष्टान्त वापरण्याच्या अनेक संधी आपल्याला आहेत. सभोवतालच्या गोष्टींवर लक्ष असू द्या. (प्रेषितांची कृत्ये १७:२२, २३) एखादा दृष्टान्त श्रोत्यांच्या मुलांवर, घरावर, नोकरीवर किंवा छंदावर आधारलेला असू शकतो. किंवा आपल्या अभ्यासाच्या साहित्यात दिलेला दृष्टान्त आणखी चांगल्याप्रकारे समजावून सांगण्याकरता विद्यार्थ्याविषयी आपल्याला असलेल्या माहितीचा उपयोग आपल्याला करता येईल. उदाहरणार्थ, सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान या पुस्तकातील ८ व्या अध्यायाच्या १४ व्या परिच्छेदामध्ये एका प्रभावी दृष्टान्ताचा उपयोग करण्यात आला आहे. यामध्ये एका प्रेमळ पालकाचा उल्लेख केलेला आहे ज्याची त्याच्या शेजाऱ्‍याकडून निंदा केली जाते. बायबल विद्यार्थी हा स्वतः एक पालक असल्यास हा दृष्टान्त आपल्याला त्याच्या परिस्थितीला आणखी जुळवून कसा घेता येईल याकरता आपण थोडा विचार करू शकतो.

शास्त्रवचनांचे कौशल्यपूर्ण वाचन

१८. अस्खलित वाचक होण्याकरता आपण खास प्रयत्न करण्याची का गरज आहे?

१८ पौलाने तीमथ्याला आर्जवले: “वाचन, बोध व शिक्षण ह्‍याकडे लक्ष ठेव.” (१ तीमथ्य ४:१३) बायबल आपल्या शिकवणीचा आधार असल्यामुळे ते अस्खलितपणे वाचता येणे लाभाचे आहे. देवाच्या लोकांना मोशेचे नियमशास्त्र वाचून दाखवण्याचा विशेषाधिकार लेवींना होता. नियमशास्त्राचे वाचन करताना ते अडखळत होते का किंवा अगदी रटाळपणे वाचत होते? नाही, बायबल नहेम्या ८:८ येथे म्हणते: “त्यांनी तो ग्रंथ, तो देवाच्या शास्त्राचा ग्रंथ, स्पष्टीकरणासह वाचून दाखविला; वाचले तेवढे लोकांस चांगले समजले.”

१९. शास्त्रवचनांच्या वाचनात आपण कशाप्रकारे सुधारणा करू शकतो?

१९ काही ख्रिस्ती पुरुष अस्खलित वक्‍ते आहेत, पण वाचन करण्याची बाब येते तेव्हा मात्र ते तेथे उणे पडतात. त्यांनी सुधारणा कशी करता येईल? सराव करण्याद्वारे. होय, जोपर्यंत अस्खलितपणे वाचता येत नाही तोपर्यंत पुन्हापुन्हा मोठ्याने वाचण्याद्वारे ते सुधारणा करू शकतात. बायबलच्या ध्वनिफीत तुमच्या भाषेत उपलब्ध असल्यास अर्थ स्पष्ट होण्यासाठी विशिष्ट शब्दांवर दिलेला जोर, आवाजातील उतार-चढाव तसे नावे आणि अनोळखी शब्दांचे उच्चारण कसे केले आहे याकडे लक्ष दिल्याने निश्‍चित लाभ होईल.a सराव केल्यामुळे, महेर-शालाल-हाश-बज यासारखी नावेही अगदी सहजपणे वाचता येऊ शकतात.—यशया ८:१.

२०. ‘आपल्या शिक्षणाकडे आपण’ कसे लक्ष देऊ शकतो?

२० यहोवाचे लोक या नात्याने, शिक्षक म्हणून आपला वापर होणे हा किती मोठा विशेषाधिकार! त्यामुळे आपल्यांपैकी प्रत्येकाने या जबाबदारीकडे गांभीर्याने पाहावे. ‘आपणाकडे व आपल्या शिक्षणाकडे नीट लक्ष ठेवावे.’ (१ तीमथ्य ४:१६) चांगले ऐकणारे होण्याद्वारे, सोप्या भाषेत बोलण्याद्वारे, सूक्ष्मदृष्टिकोनात्मक प्रश्‍न विचारण्याद्वारे, प्रभावी दृष्टान्तांचा उपयोग करण्याद्वारे आणि शास्त्रवचनांचे कौशल्यपूर्ण वाचन करण्याद्वारे आपण उत्तम शिक्षक होऊ शकतो. यहोवा त्याच्या संघटनेद्वारे देत असलेल्या प्रशिक्षणाचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा कारण त्यामुळे “सुशिक्षितांची जिव्हा” मिळण्यास आपल्याला मदत होईल. (यशया ५०:४) आपल्या सेवाकार्याकरता पुरवण्यात आलेल्या साधनांचा अर्थात माहितीपत्रके, ध्वनिफीत, चित्रफीत यांचा पूर्ण लाभ घेण्याद्वारे सूक्ष्मदृष्टी आणि मन वळविण्याच्या कलेसह आपल्याला शिकवता येईल.

[तळटीप]

a Footnote is missing from the vernacular

तुम्हाला आठवते का?

◻ शिकवण्याच्या आपल्या कामात चांगल्या प्रकारे ऐकल्यामुळे कशी मदत होऊ शकते?

◻ साध्यासोप्या भाषेत शिकवण्याच्या बाबतीत आपण पौलाचे आणि येशूचे अनुकरण कसे करू शकतो?

◻ इतरांना शिकवताना आपल्याला कोणत्या प्रकारचे प्रश्‍न विचारता येतील?

◻ कोणत्या प्रकारचे दृष्टान्त अगदी प्रभावी असतात?

◻ जाहीरपणे वाचन करण्यातील आपल्या कौशल्यात आपण कशी सुधारणा करू शकतो?

[१६ पानांवरील चित्र]

सूक्ष्मदृष्टी प्राप्त करण्याकरता चांगला शिक्षक ऐकून घेतो

[१८ पानांवरील चित्र]

येशूने दररोजच्या जीवनातील दृष्टान्त वापरले

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा