वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w99 ३/१५ पृ. १०-१५
  • आपल्या शिक्षणाकडे सतत लक्ष ठेवा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • आपल्या शिक्षणाकडे सतत लक्ष ठेवा
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • मंडळीतील शिक्षक
  • विश्‍वास ठेवण्याकरता मन वळविणे
  • तुमच्या शिक्षणाकडे लक्ष ठेवणे
  • देवाच्या वचनाचे विद्यार्थी
  • शिकवणाऱ्‍यांबद्दल प्रेम आणि आदर
  • त्यांच्या गरजांप्रती प्रतिक्रियाशील
  • आवेशी असा!
  • तुमच्या “शिकवण्याच्या कलेकडे” लक्ष द्या
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००८
  • ‘स्वतःचे व ऐकणाऱ्‍यांचेही तारण’
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०००
  • प्रेमळपणे शिकवण्याद्वारे येशूचे अनुकरण करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००९
  • ख्रिस्ताच्या आज्ञा पाळायला आपण इतरांना कशी मदत करू शकतो?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२०
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
w99 ३/१५ पृ. १०-१५

आपल्या शिक्षणाकडे सतत लक्ष ठेवा

“आपणाकडे व आपल्या शिक्षणाकडे नीट [“सतत,” NW] लक्ष ठेव; त्यातच टिकून राहा कारण असे केल्याने तू स्वतःचे व तुझे ऐकणाऱ्‍यांचेहि तारण साधिशील.”—१ तीमथ्य ४:१६.

१, २. आज आवेशी शिक्षकांची इतकी तातडीची गरज का आहे?

“जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य करा; . . . जे काही मी तुम्हाला आज्ञापिले ते सर्व त्यांस पाळावयास शिकवा.” (मत्तय २८:१९, २०) या येशू ख्रिस्ताच्या आज्ञेला अनुसरून सर्व खऱ्‍या ख्रिश्‍चनांनी शिक्षक होण्याकरता प्रयत्न केला पाहिजे. प्रामाणिक अंतःकरणाच्या लोकांना, देवाविषयी जाणून घेण्यास फार उशीर होण्यापूर्वीच आवेशी शिक्षकांनी त्यांना मदत करण्याची गरज आहे. (योहान १७:३; रोमकर १३:११) प्रेषित पौलाने असे आर्जविले: “वचनाची घोषणा कर, सुवेळी अवेळी तयार राहा.” त्याकरता मंडळीत आणि मंडळीच्या बाहेर शिकवण्याची गरज आहे. प्रचाराच्या कार्यामध्ये केवळ देवाच्या राज्याची घोषणा करण्यापेक्षा पुष्कळ काही गोवलेले आहे. आस्था दाखवणाऱ्‍या लोकांना शिष्य बनवायचे असल्यास प्रभावी शिक्षणाची आवश्‍यकता आहे.

२ आपण ‘कठीण दिवसांत’ जगत आहोत. (२ तीमथ्य ३:१) जगिक तत्त्वज्ञान आणि खोट्या शिकवणी यांमुळे लोकांची मती भ्रष्ट झाली आहे. अनेक लोकांची ‘बुद्धी अंधकारमय’ झाली आहे, अनेकजण “कोडगे” झाले आहेत. (इफिसकर ४:१८, १९) काही लोकांना भावनात्मक आघात सोसावा लागला आहे. होय, आज लोक ‘मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे, गांजलेले व पांगलेले’ आहेत. (मत्तय ९:३६) तथापि, शिकवण्याच्या कलेचा उपयोग करून प्रामाणिक अतःकरणाच्या लोकांना आवश्‍यक ते बदल करता यावेत म्हणून आपण त्यांना मदत करू शकतो.

मंडळीतील शिक्षक

३. (अ) येशूने सोपवलेल्या कामामध्ये कशाचा समावेश होतो? (ब) मंडळीमध्ये शिकवण्याची प्राथमिक जबाबदारी कोणाची आहे?

३ गृह बायबल अभ्यासाच्या कार्यक्रमामुळे लाखो लोकांना व्यक्‍तिगत मार्गदर्शन मिळत आहे. पण, बाप्तिस्म्यानंतरही या लोकांना “मुळावलेले व पाया घातलेले असे” होण्याकरता मदतीची आणखी गरज असते. (इफिसकर ३:१७) मत्तय २८:१९, २० येथे येशूने आपल्याला सोपवलेले कार्य पूर्ण करत असताना आणि नवीन लोकांना यहोवाच्या संघटनेकडे मार्गदर्शित करत असताना या नवीन लोकांना मंडळीमध्ये शिक्षण प्राप्त केल्यामुळे लाभ मिळतो. इफिसकर ४:११-१३ नुसार लोकांना ‘पाळक व शिक्षक असे नेमण्यात आले; ते ह्‍यासाठी की, त्यांनी पवित्र जनांस सेवेच्या कार्याकरिता व ख्रिस्ताच्या शरीराची रचना पूर्णतेस नेण्याकरिता सिद्ध करावे.’ काही वेळा शिकवण्याच्या कलेत ‘सहनशीलतेचा, शिक्षणाने दोष दाखवण्याचा, निषेध करण्याचा आणि बोध करण्याचाही’ समावेश होतो. (२ तीमथ्य ४:२) शिक्षकांचे काम इतके महत्त्वाचे होते, की करिंथकरांना लिहिताना पौलाने प्रेषित आणि संदेष्टे यांच्या नंतर लगेचच शिक्षकांचा उल्लेख केला.—१ करिंथकर १२:२८.

४. पौलाने इब्री लोकांस १०:२४, २५ येथे केलेल्या मार्गदर्शनानुसार चालण्याकरता आपल्याला शिकवण्याच्या कलेमुळे कशी मदत होते?

४ ख्रिस्ती मंडळीत सर्वच जण वडील किंवा पर्यवेक्षक या नात्याने काम करीत नाहीत, हे जरी खरे असले तरीसुद्धा “प्रीति व सत्कर्मे” करण्याचे उत्तेजन मात्र सर्वांना देण्यात आले आहे. (इब्री लोकांस १०:२४, २५) मंडळीमध्ये असे करण्यात, उत्तम तयारी केलेल्या, मनःपूर्वक विवेचनांचा समावेश होतो ज्यामुळे इतरांची उभारणी होऊ शकते, त्यांना उत्तेजन मिळू शकते. अनुभवी राज्य प्रचारक, नवीन असलेल्या लोकांसोबत क्षेत्र सेवेत काम करताना माहीत असलेल्या गोष्टी आणि अनुभव सांगण्याद्वारे ‘सत्कर्मे करावयास’ उत्तेजन देऊ शकतात. अशा प्रसंगी आणि इतर अनौपचारिक वेळी महत्त्वपूर्ण सूचना देता येऊ शकतात. उदाहरणार्थ, अनुभवी स्त्रियांना असे उत्तेजन देण्यात आले आहे, की त्यांनी ‘सुशिक्षण द्यावे.’—तीत २:३.

विश्‍वास ठेवण्याकरता मन वळविणे

५, ६. (अ) खरा ख्रिस्ती धर्म आणि इतर खोटे धर्म यांत कोणता स्पष्ट फरक आहे? (ब) सुज्ञपणे निर्णय घेण्याकरता वडील नवीन लोकांना कशी मदत करतात?

५ खरा ख्रिस्ती धर्म आणि इतर खोटे धर्म यांतील भेद लगेच स्पष्ट दिसतो. या खोट्या धर्मांतील बहुतेक धर्म त्यांच्या सदस्यांच्या विचारसरणीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतात. येशू पृथ्वीवर होता तेव्हा धार्मिक पुढाऱ्‍यांनी जुलमी मानवी परंपरा तयार करून लोकांच्या जीवनाच्या प्रत्येक कृतीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला. (लूक ११:४६) ख्रिस्ती धर्मजगताच्या पाळकांनीही अनेक वेळा हेच केले आहे.

६ पण खरी उपासना “पवित्र सेवा” आहे आणि आपण ही सेवा आपल्या “तर्कशक्‍तीसह” सादर करतो. (रोमकर १२:१, NW) यहोवाच्या सेवकांना ‘खात्री करून देण्यात येते.’ (२ तीमथ्य ३:१४) काही वेळा, पुढाकार घेणाऱ्‍यांना मंडळीचा कारभार सुरळीतरीत्या चालावा म्हणून काही मार्गदर्शक नियम आणि कार्यपद्धती अंमलात आणव्या लागतील. पण वडिलांनी त्यांच्या सहख्रिश्‍चनांकरता निर्णय घेण्याऐवजी ते त्यांना ‘चांगले आणि वाईट ओळखण्याचे’ शिकवतात. (इब्री लोकांस ५:१४) ‘विश्‍वासाच्या वचनांद्वारे आणि सुशिक्षण देण्याद्वारे’ वडील पहिल्यांदा मंडळीचे पोषण करतात.—१ तीमथ्य ४:६.

तुमच्या शिक्षणाकडे लक्ष ठेवणे

७, ८. (अ) सर्वसामान्य क्षमता असलेल्या लोकांनाही शिक्षक या नात्याने काम करण्यास कसे शक्य होते? (ब) प्रभावी शिक्षक होण्याकरता व्यक्‍तिगत प्रयत्नांची गरज आहे हे कशावरून दिसते?

७ आपल्या सर्वांवर सोपवलेल्या शिकवण्याच्या कामगिरीवर पुन्हा विचार करू. या कार्याकरता काही खास कौशल्य, शिक्षण किंवा क्षमतांची आवश्‍यकता आहे का? या सर्व गोष्टी असल्याच पाहिजेत असे नाही. या जागतिक शिक्षणाचे बहुतेक काम सर्वसामान्य क्षमता असलेल्या सर्वसाधारण लोकांकडून पार पाडले जाते. (१ करिंथकर १:२६-२९) पौल म्हणतो: “ही आमची संपत्ति [सेवाकार्य] मातीच्या भांड्यात [अपरिपूर्ण देहांत] आहे, अशा हेतूने की, सामर्थ्याची पराकोटी देवाची आहे, आमच्यापासून होत नाही, हे समजावे.” (२ करिंथकर ४:७) संपूर्ण जगभरात राज्य प्रचारकार्यात जे यश मिळाले आहे त्यामुळे यहोवाच्या आत्म्याच्या सामर्थ्याची प्रचिती मिळते!

८ तथापि, “लाज वाटण्यास कसलेहि कारण नसलेला, देवाच्या पसंतीस उतरलेला कामकरी” होण्याकरता स्वतः खास प्रयत्न करण्याची गरज आहे. (२ तीमथ्य २:१५) पौलाने असे आर्जवले: “आपणाकडे व आपल्या शिक्षणाकडे नीट [सतत] लक्ष ठेव; त्यातच टिकून राहा; कारण असे केल्याने तू स्वतःचे व तुझे ऐकणाऱ्‍यांचेहि तारण साधिशील.” (१ तीमथ्य ४:१६) मंडळीमध्ये अथवा मंडळीच्या बाहेर एखादी व्यक्‍ती स्वतःच्या शिक्षणाकडे कसे लक्ष देऊ शकते? असे करण्याकरता विशिष्ट कौशल्ये संपादन करणे किंवा शिकवण्याच्या विशिष्ट पद्धतींत पारंगत असणे आवश्‍यक आहे का?

९. स्वाभाविक क्षमतांपेक्षा अधिक महत्त्वाचे काय आहे?

९ लोकांना शिकवण्याच्या प्रभावशाली पद्धतींवर येशूचे उल्लेखनीय प्रभुत्व होते याची डोंगरावरील प्रवचनातून खात्री पटते. त्याचे बोलणे झाल्यानंतर “लोकसमुदाय त्याच्या शिक्षणावरून थक्क झाले.” (मत्तय ७:२८) अर्थात, येशूइतक्या प्रभावीपणे आपल्यांपैकी कोणी शिकवू शकत नाही. पण प्रभावी शिक्षक होण्याकरता अस्खलित वक्‍ताच असले पाहिजे असे नाही. ईयोब १२:७ नुसार ‘पशू’ आणि ‘पक्षी’ सुद्धा मुकपणे शिकवण्याचे काम करू शकतात! आपल्यांमध्ये असलेल्या स्वाभाविक क्षमता किंवा कौशल्यांपेक्षा आपण “कशाप्रकारचे लोक” आहोत हे अधिक महत्त्वाचे आहे—आपले विद्यार्थी अनुकरण करू शकतील असे कोणते गुण किंवा कोणत्या आध्यात्मिक सवयी आपण विकसित केल्या आहेत ते अधिक महत्त्वाचे आहे.—२ पेत्र ३:११; लूक ६:४०.

देवाच्या वचनाचे विद्यार्थी

१०. देवाच्या वचनाचा विद्यार्थी या संदर्भात येशूने कशाप्रकारे एक उत्तम उदाहरण मांडले?

१० शास्त्रवचनीय सत्याच्या प्रभावशाली शिक्षकाने देवाच्या वचनाचे विद्यार्थी असले पाहिजे. (रोमकर २:२१) या संदर्भात येशू ख्रिस्ताने उल्लेखनीय उदाहरण मांडले. येशूने त्याच्या सेवाकार्याच्या दरम्यान हिब्रू शास्त्रवचनांच्या जवळजवळ निम्म्या पुस्तकांतून संदर्भ घेतला किंवा त्यांतील विचार त्याने सांगितले.a देवाच्या वचनाशी त्याचा परिचय होता हे त्याच्या वयाच्या १२ व्या वर्षीच स्पष्ट झाले कारण त्यावेळी तो “मंदिरात गुरूजनांमध्ये बसून त्यांचे भाषण ऐकताना व त्यांस प्रश्‍न करताना” आढळला होता. (लूक २:४६) सभास्थानात देवाच्या वचनाचे वाचन होत असल्यामुळे येशू मोठा झाल्यानंतर तेथे नित्यनियमाने जात असे.—लूक ४:१६.

११. एका शिक्षकाने कोणत्या चांगल्या सवयी जोपासल्या पाहिजेत?

११ तुम्ही देवाच्या वचनाचे उत्सुकतेने वाचन करता का? त्याचा सखोल अभ्यास केल्याने ‘परमेश्‍वराच्या भयाची तुम्हाला जाणीव होईल आणि देवाविषयीचे ज्ञान तुम्हाला प्राप्त होईल.’ (नीतिसूत्रे २:४, ५) म्हणून चांगल्या अभ्यासाचा नित्यक्रम बनवा. दररोज देवाच्या वचनाचा काही भाग वाचण्याचा प्रयत्न करा. (स्तोत्र १:२) टेहळणी बुरूज आणि सावध राहा! मिळताच प्रत्येक अंक वाचण्याची सवय करा. मंडळीच्या सभांमध्ये मनापासून लक्ष द्या. काळजीपूर्वक संशोधन करण्याचे शिका. ‘सर्व गोष्टींचा मुळापासून नीट शोध करण्याचे’ शिकल्यामुळे तुमच्याकडून अतिशयोक्‍ती होणार नाही आणि तुम्ही चुकीची माहितीही देणार नाही.—लूक १:३.

शिकवणाऱ्‍यांबद्दल प्रेम आणि आदर

१२. येशूची त्याच्या शिष्यांप्रती कोणती मनोवृत्ती होती?

१२ तुम्ही ज्या लोकांना मार्गदर्शन देता त्यांच्याबद्दल योग्य मनोवृत्ती बाळगणे, हा एक महत्त्वाचा गुण आहे. येशूचे ऐकणाऱ्‍या लोकांविषयी परुशांच्या मनात तिटकारा होता. “हा जो लोकसमुदाय नियमशास्त्र जाणत नाही तो शापित आहे,” असे ते म्हणायचे. (योहान ७:४९) पण येशूला त्याच्या शिष्यांप्रती गाढ प्रेम आणि आदर होता. त्याने म्हटले: “मी आतापासून तुम्हाला दास म्हणत नाही; कारण धनी काय करितो ते दासाला ठाऊक नसते; परंतु मी तुम्हाला मित्र म्हटले आहे; कारण जे काही मी आपल्या पित्यापासून ऐकून घेतले ते सर्व मी तुम्हाला कळविले आहे.” (योहान १५:१५) येशूच्या शिष्यांनी लोकांना शिकवण्याचे काम कशाप्रकारे पार पाडायचे होते हे यावरून दिसून आले.

१३. पौल ज्या लोकांना शिकवत होता त्यांच्याविषयी त्याच्या कशा भावना होत्या?

१३ उदाहरणार्थ, पौलाने त्याच्या विद्यार्थ्यांसोबत भावनाशून्य, व्यवहारापुरता नातेसंबंध ठेवला नाही. त्याने करिंथकरांना म्हटले: “तुम्हास ख्रिस्तामध्ये दहा हजार गुरू असले तरी पुष्कळ बाप नाहीत; मी तर तुम्हास ख्रिस्त येशूमध्ये सुवार्तेच्या योगाने जन्म दिला आहे.” (१ करिंथकर ४:१५) काही वेळा, लोकांना बोध करतेवेळी पौल अक्षरशः रडला. (प्रेषितांची कृत्ये २०:३१) त्याने उल्लेखनीय सहनशीलता आणि दया दाखवली. त्यामुळे तो थेस्सलनीकाकरांना असे म्हणू शकला: “आपल्या मुलाबाळांचे लालनपालन करणाऱ्‍या दाईसारखे आम्ही तुम्हामध्ये सौम्य वृत्तीचे” झालो.—१ थेस्सलनीकाकर २:७.

१४. आपल्या बायबल विद्यार्थ्याबद्दल व्यक्‍तिगत आस्था दाखवणे इतके महत्त्वाचे का आहे? स्पष्ट करा.

१४ तुम्ही येशूचे आणि पौलाचे अनुकरण करता का? आपल्यामध्ये स्वाभाविक उणिवा असल्यास त्या झाकून टाकण्याकरता आपल्या विद्यार्थ्यांप्रती असलेले प्रेम पुरेसे आहे. आपल्या विद्यार्थ्यांमध्ये आपल्याला मनापासून आस्था आहे या गोष्टीची विद्यार्थ्यांना जाणीव होते का? त्यांना जाणून घेण्याकरता आपण वेळ काढतो का? एका ख्रिस्ती बहिणीची बायबल विद्यार्थीनी आध्यात्मिकरीत्या प्रगती करत नव्हती, तेव्हा तिने तिला प्रेमळपणे विचारले: “कोणती गोष्ट तुम्हाला सतावत आहे?” त्या विद्यार्थीनीने तिचे मन मोकळे केले आणि तिला भेडसावणारी काळजी आणि चिंता यांविषयी सांगितले. त्या प्रेमळ संभाषणामुळे त्या विद्यार्थीनीच्या जीवनाला कलाटणी मिळाली. अशा बाबतींत शास्त्रवचनीय विचार आणि सांत्वनेचे शब्द आणि उत्तेजन उचित आहे. (रोमकर १५:४) पण एक सावधगिरीचा इशारा आहे: बायबल विद्यार्थी कदाचित चांगली प्रगती करत असेल, पण अद्यापही त्याच्यामध्ये गैरख्रिस्ती गुण असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशा व्यक्‍तीसोबत गैरवाजवी जवळीक करणे शहाणपणाचे होणार नाही. योग्य ख्रिस्ती मर्यादा राखण्यास हव्यात.—१ करिंथकर १५:३३.

१५. आपल्या बायबल विद्यार्थ्यांना आपण आदर कसा दाखवू शकतो?

१५ आपल्या विद्यार्थ्यांचा आदर करण्यामध्ये हे समाविष्ट आहे, की आपण त्यांच्या खासगी जीवनावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करू नये. (१ थेस्सलनीकाकर ४:११) उदाहरणार्थ, विवाहविना एका पुरुषासोबत राहणाऱ्‍या एका स्त्रीचा आपण अभ्यास घेत असू. कदाचित त्या दोघांना मुलेही झाली असतील. पण देवाचे अचूक ज्ञान मिळाल्यानंतर त्या स्त्रीची यहोवाच्या अपेक्षांनुसार आपल्या जीवनात फेरबदल करण्याची इच्छा असेल. (इब्री लोकांस १३:४) या स्त्रीने त्या मनुष्याशी विवाह करावा की त्यापासून वेगळे व्हावे? कदाचित आपल्याला ठामपणे असे वाटेल, की आध्यात्मिक गोष्टींत काहीही आस्था नसलेल्या त्या मनुष्यासोबत तिने विवाह करू नये, नाहीतर तिच्या भवितव्यातील आध्यात्मिक प्रगतीला खीळ बसेल. त्याचवेळी आपल्याला तिच्या मुलांच्या संगोपनाची काळजी वाटेल आणि तिने त्या मनुष्याशी विवाह केल्यास प्रश्‍न सुटेल असा विचारही आपल्या मनात येईल. कोणत्याही बाबतीत विद्यार्थ्याच्या जीवनात ढवळाढवळ करणे आणि अशा प्रकरणांविषयी आपली स्वतःची मते विद्यार्थ्यावर लादण्याचा प्रयत्न करणे विनयशीलतेचे आणि प्रेमळपणाचे होणार नाही. कारण ती स्त्री जो काही निर्णय घेईल त्याचे परिणामही केवळ तिलाच भोगावे लागतील. तर मग, अशा विद्यार्थीनीच्या “ज्ञानेंद्रियांना” प्रशिक्षित करणे आणि आपण काय करावे हा निर्णय तिला स्वतःला घेऊ देणे उत्तम ठरणार नाही का?—इब्री लोकांस ५:१४.

१६. वडील देवाच्या कळपाप्रती कशाप्रकारे प्रेम आणि आदर दाखवू शकतात?

१६ कळपाला प्रेमाने आणि आदराने वागवावे हे मंडळीतील वडिलांकरता फार महत्त्वाचे आहे. फिलेमोनला लिहिताना पौलाने म्हटले: “जे योग्य ते तुला आज्ञा करून सांगण्याचे जरी मला ख्रिस्ताद्वारे पूर्ण धैर्य आहे, तरी प्रीतीस्तव विनंती करून सांगणे मला बरे वाटते.” (फिलेमोन ८, ९) काही वेळा, मंडळीमध्ये निराशाजनक प्रसंग उद्‌भवतील. प्रसंगी कडक कारवाई करण्याचीही गरज पडू शकते. पौलाने तिताला आर्जवले: ‘कडकपणे [दोषी व्यक्‍तींच्या] पदरी दोष घाल, ह्‍यासाठी की, त्यांनी . . . विश्‍वासात खंबीर व्हावे.’ (तीत १:१३, १४) असे असले तरी, पर्यवेक्षकांनीही या गोष्टीची काळजी घ्यावी की जेणेकरून ते मंडळीला निष्ठुरपणे काही बोलणार नाहीत. पौलाने लिहिले: “प्रभूच्या दासाने भांडू नये, तर त्याने सर्वांबरोबर सौम्य, शिकवण्यात निपुण, सहनशील” असावे.—२ तीमथ्य २:२४; स्तोत्र १४१:३.

१७. मोशेने कोणती चूक केली आणि त्यातून वडील काय शिकू शकतात?

१७ पर्यवेक्षकांनी नेहमी या गोष्टीची आठवण असू द्यावी, की ते ‘देवाच्या कळपाशी’ व्यवहार करत आहेत. (१ पेत्र ५:२) मोशे एक नम्र व्यक्‍ती होता तरी एके प्रसंगी त्याला वरील दृष्टिकोनाचे विस्मरण झाले. इस्राएलांनी “त्याच्या आत्म्याला विरोध केला, आणि त्याने अविचाराचे शब्द तोंडातून काढिले.” (स्तोत्र १०६:३३) इस्राएलांची चूक झाली होती हे कबूल आहे, पण त्याच्या कळपाशी करण्यात आलेल्या गैरवागणुकीमुळे देवाला खूप राग आला. (गणना २०:२-१२) अशाच प्रकारच्या आव्हानांना आज तोंड देत असताना वडिलांनी शिक्षा करण्याऐवजी शिकवण्याचा आणि सूक्ष्मदृष्टी व कृपा यांसह मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करावा. पाप करणारे कोडगे या दृष्टीने आपल्या बांधवांकडे पाहण्याऐवजी त्यांचा विचार करून आणि मदतीची गरज असलेले लोक असे त्यांच्याकडे पाहिल्यास ते उत्तम प्रतिक्रिया दाखवू शकतात. वडिलांनी पौलासारखा सकारात्मक दृष्टिकोन राखण्याची गरज आहे, त्याने लिहिले: “तुम्हाविषयी प्रभूमध्ये आमचा असा भरवसा आहे की, आम्ही तुम्हास जे सांगतो ते तुम्ही करीत असता व पुढेहि करीत जाल.”—२ थेस्सलनीकाकर ३:४.

त्यांच्या गरजांप्रती प्रतिक्रियाशील

१८, १९. (अ) मर्यादित क्षमता असलेल्या बायबल विद्यार्थ्यांच्या गरजांप्रती आपण कशी प्रतिक्रिया दाखवली पाहिजे? (ब) विशिष्ट बाबी समजण्यास कठीण जातात अशा विद्यार्थ्यांना आपल्याला कशी मदत करता येईल?

१८ एक प्रभावशाली शिक्षक विद्यार्थ्यांच्या क्षमता आणि मर्यादांनुसार स्वतःच्या शिकवण्याच्या पद्धतीत बदल करायला तयार असतो. (पडताळा योहान १६:१२.) येशूने दिलेल्या रुपयांच्या दृष्टान्तातील धन्याने प्रत्येकाला “ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे” सुहक्क दिला. (मत्तय २५:१५) बायबल अभ्यास घेतेवेळी आपण याच नमुन्याचे अनुकरण करू शकतो. अर्थात, बायबलवर आधारित असलेल्या प्रकाशनाच अभ्यास शक्यतो जास्त वेळ न लावता पूर्ण करावा. पण हेही मान्य करण्यास हवे, की सगळ्याच लोकांना चांगले वाचता येत नाही किंवा सर्वांनाच नवीन कल्पना लगेच आत्मसात करता येत नाहीत. त्यामुळे प्रतिसाद देणाऱ्‍या लोकांना समजण्यास वेळ लागतो तेव्हा अभ्यास घेताना एका मुद्यावरून दुसऱ्‍या मुद्याकडे केव्हा जावे याकरता समजबुद्धीची आवश्‍यकता आहे. ठराविक वेळेत साहित्याचा भाग संपवण्यापेक्षा, शिकत असलेल्या बाबी विद्यार्थ्याला चांगल्याप्रकारे समजावण्यास मदत करणे महत्त्वाचे आहे.—मत्तय १३:५१.

१९ हीच गोष्ट अशा बायबल विद्यार्थ्यांच्या बाबतीतही खरी होऊ शकते ज्यांना विशिष्ट बाबींवर जसे की त्रैक्य आणि धार्मिक सण यांविषयी समजण्यास कठीण वाटते. अभ्यास घेतेवेळी बायबलवर आधारित असलेल्या संशोधनाचा समावेश करणे सामान्यपणे अनावश्‍यक आहे, पण त्याचा स्पष्टपणे लाभ होत असल्यास अशा संशोधन केलेल्या साहित्याचा आपण बायबल अभ्यास घेतेवेळी काही प्रसंगी उपयोग करू शकतो. योग्य विचार करून निर्णय घेण्यास हवा ज्यामुळे विद्यार्थ्याच्या प्रगतीचा वेग मंदावणार नाही.

आवेशी असा!

२०. शिकवण्यातील आवेश आणि खात्री यांत पौलाने कसे उदाहरण मांडले?

२० पौल म्हणतो: “आत्म्यात उत्सुक असा.” (रोमकर १२:११) होय, आपण गृह बायबल अभ्यास चालवत असू किंवा मंडळीमध्ये एखादा भाग सादर करत असू आपण नेहमी आवेशी आणि उत्साही असले पाहिजे. पौलाने थेस्सलनीकाकरांना म्हटले: “आमची सुवार्ता केवळ शब्दाने नव्हे, तर सामर्थ्याने, पवित्र आत्म्याने व पूर्ण निर्धाराने तुम्हाला कळविण्यात आली.” (१ थेस्सलनीकाकर १:५) पौलाने आणि त्याच्या सोबत्यांनी ‘केवळ सुवार्ताच दिली नाही, तर त्यांनी त्यांचा जीवही दिला.’—१ थेस्सलनीकाकर २:८.

२१. शिकवण्याच्या आपल्या कामातील आवेश आपण कशाप्रकारे कायम ठेवू शकतो?

२१ आपल्याला जे सांगायचे आहे ते आपल्या बायबल विद्यार्थ्यांना ऐकण्याची गरज आहे अशी पूर्ण खात्री पटल्यानंतर खरा आवेश निर्माण होतो. शिकवण्याचे कोणतेही काम एक परिपाठ आहे असे आपण समजू नये. या बाबतीत शास्ता एज्राने निश्‍चितच त्याच्या शिकवणीकडे लक्ष दिले. ‘देवाच्या नियमशास्त्राचे अध्ययन करून त्याप्रमाणे चालण्याकरता आणि इस्राएलास शिकवण्याकरता त्याने स्वतःच्या मनाची तयारी केली.’ (एज्रा ७:१०) त्याचप्रमाणे आपणही पूर्ण तयारी करावी आणि साहित्यातील महत्त्वाच्या मुद्द्‌यांवर विचार करावा. आपला विश्‍वास आणि निर्धार मजबूत करण्याकरता आपण यहोवाकडे प्रार्थना करू या. (लूक १७:५) आपल्या आवेशामुळे बायबल विद्यार्थ्याला सत्याप्रती खरे प्रेम विकसित करण्यास मदत होऊ शकते. अर्थात, आपल्या शिकवणीकडे लक्ष देण्यात विशिष्ट शिकवण्याच्या कौशल्यांचाही समावेश होईल. यांपैकी शिकवण्याच्या काही पद्धतींची पुढील लेखात चर्चा केली जाईल.

[तळटीपा]

a पाहा शास्त्रवचनांवर सूक्ष्मदृष्टी, खंड २, पृष्ठ १०७१, वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीद्वारे प्रकाशित.

तुम्हाला आठवते का?

◻ आज कौशल्यप्राप्त ख्रिस्ती शिक्षकांची का आवश्‍यकता आहे?

◻ आपण कोणत्या चांगल्या सवयींचा विकास करू शकतो?

◻ आपण ज्यांना शिकवतो त्यांच्याप्रती प्रेम आणि आदर इतका महत्त्वाचा का आहे?

◻ आपल्या बायबल विद्यार्थ्यांच्या गरजांप्रती आपण कशी प्रतिक्रिया दाखवू शकतो?

◻ इतरांना शिकवताना आवेश आणि निर्धार इतका महत्त्वाचा का आहे?

[१० पानांवरील चित्र]

चांगले शिक्षक स्वतः देवाच्या वचनाचे विद्यार्थी असतात

[१३ पानांवरील चित्र]

बायबल विद्यार्थ्यांमध्ये व्यक्‍तिगत आस्था घ्या

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा