वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w99 २/१ पृ. ९-१३
  • महान कुंभार आणि त्याची कलाकृती

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • महान कुंभार आणि त्याची कलाकृती
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • कुंभार त्याच्या कामाचा विस्तार करतो
  • तुम्ही कोणत्या प्रकारचे पात्र व्हाल?
  • परीक्षांना तोंड देण्याकरता घडविले जाणे
  • आपल्या मुलांना घडविणे
  • सर्वांचे घडविले जाणे
  • यहोवाची शिस्त स्वीकारून तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाला आकार द्या
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१३
  • महान कुंभाराला तुम्हाला आकार देऊ द्या
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१६
  • मातीच्या भांड्यांतील आपली संपत्ती
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • नवीन खास संमेलन दिवस कार्यक्रम
    आमची राज्य सेवा—२००७
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
w99 २/१ पृ. ९-१३

महान कुंभार आणि त्याची कलाकृती

‘प्रत्येक चांगल्या कामासाठी तयार केलेले मानाचे पात्र व्हा.’—२ तीमथ्य २:२१.

१, २. (अ) स्त्री आणि पुरुष देवाच्या कलाकृतीचा उत्तम नमुना कसा होता? (ब) महान कुंभाराने कोणत्या उद्देशास्तव आदाम आणि हव्वेची निर्मिती केली?

यहोवा महान कुंभार आहे. आपला पहिला पिता, आदाम त्याच्या कलाकृतीचा उत्कृष्ट नमुना होता. बायबल आपल्याला सांगते: “मग परमेश्‍वर देवाने जमिनीतील मातीचा मनुष्य घडिला व त्याच्या नाकपुड्यांत जीवनाचा श्‍वास फुंकिला; तेव्हा मनुष्य जीवधारी प्राणी,” अर्थात “श्‍वास घेणारा” असा बनला. (उत्पत्ति २:७, NW तळटीप) या पहिल्या मनुष्याला देवाच्या स्वरूपात बनवण्यात आले होते आणि तो एक परिपूर्ण मनुष्य होता. मनुष्याला अशाप्रकारे बनविण्याद्वारे या गोष्टीचे प्रमाण मिळाले, की देव बुद्धिमान आहे आणि खरी धार्मिकता आणि न्याय त्याला आवडतो.

२ देवाने आदामाची एक फासळी काढून त्याच्याकरता पूरक आणि मदतनीस, अर्थात एक स्त्री बनवली. आजच्या स्त्रियांच्या तुलनेत हव्वा इतकी सुंदर होती, की तिच्याकडे बोट दाखवायला जागा नव्हती. (उत्पत्ति २:२१-२३) पहिल्या मानवी जोडप्याला अशाप्रकारच्या परिपूर्ण शरीराने बनवण्यात आले होते आणि त्यांना अशाप्रकारची क्षमता देण्यात आली होती, की देवाने दिलेले काम पूर्ण करणे त्यांना सहज शक्य होते. देवाच्या आज्ञेचे पालन करता यावे म्हणून त्यांना तसे सामर्थ्यही देण्यात आले होते; उत्त्पति १:२८ येथे त्यांना आज्ञा दिली होती: “फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका व ती सत्तेखाली आणा; समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी व पृथ्वीवर संचार करणारे सर्व प्राणी यांवर सत्ता चालवा.” संपूर्ण पृथ्वीवर पसरलेला हा सुंदर बगीचा अशा कोट्यवधी लोकांनी भरायचा होता जे आनंदात आणि ‘प्रीतीच्या बंधनात’ राहू शकतील.—कलस्सैकर ३:१४.

३. आपले पहिले पालक अवमानाचे पात्र कसे झाले आणि त्याचा परिणाम काय झाला?

३ खेदाची गोष्ट ही, की आपल्या पहिल्या पालकांनी हेतूपुरस्सर त्यांचा महान कुंभार, सार्वभौम निर्माणकर्ता याच्या विरोधात बंड केले. त्यांनी जे केले त्याचे वर्णन यशया २९:१५, १६ येथे करण्यात आले आहे: “जे परमेश्‍वरापासून आपले मनसुबे लपवितात, आपला कारभार अंधारात चालवितात आणि आम्हाला कोण पाहतो, आमचे कोणाला कळते, असे म्हणतात, त्यांस धिक्कार असो; . . . माती कुंभाराशी समान असे गणतील काय? तू मला केले नाही असे कर्त्याला कर्म म्हणेल का? तुला अक्कल नाही असे घडलेली वस्तु घडणाऱ्‍यास म्हणेल काय?” स्वतःच्या मनाप्रमाणे वागल्यामुळे त्यांच्यावर संकट कोसळले—कायमस्वरूपी मृत्यूची शिक्षा. याशिवाय, त्यांच्यापासून येणारी संपूर्ण मानवजात जन्मताच पापी आणि मर्त्य ठरली. (रोमकर ५:१२, १८) आणि अशाप्रकारे महान कुंभाराची सुंदर कलाकृती बिघडली.

४. आपण कोणत्या मानाच्या उद्देशास्तव सेवा करू शकतो?

४ पण, पापी आदामाचे वंशज या नात्याने, सध्याची आपली अपरिपूर्ण स्थिती असतानाही आपण यहोवाची स्तुती करू शकतो, जसे स्तोत्र १३९:१४ मध्ये लिहिले आहे: “भयप्रद व अद्‌भुत रीतीने माझी घडण झाली आहे, म्हणून मी तुझे उपकारस्मरण करितो; तुझी कृत्ये अद्‌भुत आहेत हे माझा जीव पूर्णपणे जाणून आहे.” पण महान कुंभाराची पहिलीच कलाकृती इतकी बिघडली ही किती खेदाची गोष्ट!

कुंभार त्याच्या कामाचा विस्तार करतो

५. महान कुंभाराच्या कलाकृतीचे काम कोठपर्यंत चालेल?

५ पण आनंदाची गोष्ट म्हणजे कुंभार म्हणून आपल्या निर्माणकर्त्याचे काम आपल्या पहिल्या पालकांपुरतेच मर्यादित राहणार नव्हते. प्रेषित पौल आपल्याला सांगतो: “हे मानवा, देवाला उलटून बोलणारा तू कोण? घडलेली वस्तु आपल्या घडविणाऱ्‍याला, तू मला असे का केले, असे म्हणेल काय? किंवा एकाच गोळ्याचे एक पात्र उत्तम [मानाच्या] कामासाठी व एक हलक्या [अवमानाच्या] कामासाठी करावे असा कुंभाराला मातीवर अधिकार नाही काय?”—रोमकर ९:२०, २१.

६, ७. (अ) आज अनेक लोक अवमानाकरता घडवून घेण्याचे कसे निवडतात? (ब) धार्मिक लोक मानाच्या उपयोगासाठी स्वतःला कसे घडवून घेतात?

६ होय, महान कुंभाराने बनवलेली काही भांडी मानाच्या कामासाठी तर काही अवमानाच्या कामासाठी घडवण्यात येतील. हे जग अधिकाधिक अधार्मिकतेच्या दलदलीत फसत चालले आहे आणि ज्या लोकांना अशा जगासोबत राहायला आवडते ते नाशासाठी स्वतःला घडवून घेतात. येशू ख्रिस्त न्यायदंड बजावण्याकरता येईल तेव्हा अवमानाचे पात्र असलेल्या शेरड्यांसमान या हट्टी लोकांना मत्तय २५:४६ मध्ये सांगितल्यानुसार ‘सार्वकालिक शिक्षा भोगावी लागेल.’ पण ‘मानाच्या’ कामासाठी घडवण्यात आलेल्या मेंढरासमान “धार्मिक” लोकांना “सार्वकालिक जीवन” मिळेल.

७ देवाने आपल्याला घडवावे म्हणून हे धार्मिक लोक नम्रपणे स्वतःला देवाच्या हाती सोपवून देतील. त्यांनी ईश्‍वरी जीवनावर चालण्यास सुरवात केली आहे. त्यांनी १ तीमथ्य ६:१७-१९ येथे देण्यात आलेला सल्ला स्वीकारला आहे: ‘तू चंचल धनावर आशा ठेवू नको, तर जो जिवंत देव आपल्या उपभोगासाठी सर्व काही विपुल देतो त्याच्यावर आशा ठेव.’ त्यांनी ‘चांगले ते करण्याचा, सत्कर्माविषयी धनवान असण्याचा; परोपकारी व दानशूर असण्याचा; जे खरे जीवन ते बळकट धरण्यास पुढील काळी चांगला आधार होईल, असा साठा स्वतःसाठी करण्याचा’ प्रयत्न केला आहे. हे लोक, ईश्‍वरी सत्यानुसार स्वतःला घडवून घेतात आणि येशू ख्रिस्ताद्वारे यहोवाने केलेल्या तरतुदीवर अढळ विश्‍वास ठेवतात; येशूने “सर्वांसाठी मुक्‍तीचे मोल म्हणून स्वतःला दिले,” जेणेकरून आदामाच्या पापामुळे जे काही गेले होते ते पुन्हा प्राप्त व्हावे. (१ तीमथ्य २:६) तर मग, आपण पौलाचा पुढील सल्ला मानण्यास किती तयार असले पाहिजे, की ‘जो नवा मनुष्य, आपल्या निर्माणकर्त्याच्या प्रतिरूपाप्रमाणे पूर्ण ज्ञानात नवा [घडवला] जात आहे, त्याला [आपण] धारण करावे’!—कलस्सैकर ३:१०.

तुम्ही कोणत्या प्रकारचे पात्र व्हाल?

८. (अ) एखादी व्यक्‍ती कोणत्याप्रकारचे पात्र बनेल हे कशावरून ठरते? (ब) कोणत्या दोन घटकांमुळे एखाद्या मनुष्याची घडण होते?

८ एखादी व्यक्‍ती कोणत्या प्रकारचे पात्र होईल, हे कोणत्या गोष्टीवरून ठरवले जाते? त्याच्या मनोवृत्तीवरून आणि वर्तनावरून. पहिल्यांदा, इच्छा आणि मानसिक कल यांमुळे एखाद्या व्यक्‍तीची मनोवृत्ती आणि वर्तन घडविले जाते. बुद्धिमान राजा शलमोनाने म्हटले: “मनुष्याचे मन मार्ग योजिते, पण परमेश्‍वर त्याच्या पावलांस मार्ग दाखवितो.” (नीतिसूत्रे १६:९) आपण जे पाहतो आणि ऐकतो तसेच आपली संगत आणि आपला अनुभव या गोष्टींमुळे आपली मनोवृत्ती आणि वर्तन घडविले जाते. त्यामुळे पुढील सल्ला ऐकणे आपल्याकरता खूप महत्त्वाचे आहे: “सुज्ञांची सोबत धर म्हणजे सुज्ञ होशील; मूर्खांचा सोबती कष्ट पावतो.” (नीतिसूत्रे १३:२०) २ पेत्र १:१६ येथे आपल्याला इशारा देण्यात आला आहे, की ‘चातुर्याने कल्पिलेल्या कथांपासून’ किंवा नॉक्स रोमन कॅथलिक आवृत्तीमध्ये सांगण्यात आल्याप्रमाणे “मानवांनी तयार केलेल्या दंतकथांपासून” आपण दूर राहिले पाहिजे. धर्मत्यागी ख्रिस्तीधर्मजगताच्या कितीतरी शिकवणींमध्ये आणि सणांमध्ये अशाचप्रकारच्या दंतकथांचा समावेश होतो.

९. महान कुंभाराने आपल्याला घडवावे म्हणून आपण कशाप्रकारे अनुकूल प्रतिक्रिया दाखवू शकतो?

९ त्यामुळे आपल्या इच्छेनुसार देव आपल्याला घडवू शकतो. दावीदाची पुढील प्रार्थना आपण यहोवासमोर पुन्हा नम्रपणे म्हणू शकतो: “हे देवा, माझी झडती घेऊन माझे हृदय जाण; मला कसोटीस लावून माझे मनोगत जाण. माझ्या ठायी दुष्टपणाकडे काही प्रवृत्ति असेल तर पाहा; आणि मला सनातन मार्गाने चालीव.” (स्तोत्र १३९:२३, २४) राज्याच्या सुवार्तेचा प्रचार यहोवा करवून घेत आहे. आपण या सुवार्तेचे आणि देवाच्या मार्गदर्शनाचे मूल्य जाणून ते स्वीकारले आहे. देव त्याच्या संघटनेद्वारे आपल्याला सुवार्तेच्या प्रचाराविषयी कित्येक जबाबदाऱ्‍या देतो; तर मग आपण या जबाबदाऱ्‍या पार पाडू आणि त्यांची कदर करू.—फिलिप्पैकर १:९-११.

१०. आध्यात्मिक कार्यक्रमांनुसार चालण्याकरता आपण कशाप्रकारे खास प्रयत्न केला पाहिजे?

१० हे खूप महत्त्वाचे आहे, की आपण देवाच्या वचनाकडे सदैव लक्ष द्यावे, प्रत्येक दिवशी बायबल वाचण्याची सवय करावी आणि आपल्या कुटुंबाशी आणि मित्रपरिवाराशी बायबलविषयी आणि यहोवाच्या सेवेविषयी चर्चा करावी. यहोवाच्या साक्षीदारांच्या प्रत्येक बेथेल कुटुंबात आणि मिशनरी गृहात सकाळी नाष्टा करण्याआधी प्रातः उपासनेत दैनंदिन वचनावर चर्चा करण्यात येते. एका आठवड्यात बायबलच्या काही भागाचे तर दुसऱ्‍या आठवड्यात इयरबुकचे वाचन होते. तुमच्या कुटुंबाला अशाचप्रकारची योजना करता येणे शक्य आहे का? ख्रिस्ती मंडळी, सभा यांतील सहवास आणि विशेषतः साप्ताहिक टेहळणी बुरूज अभ्यासामध्ये भाग घेतल्याने आपल्याला किती लाभ मिळतात!

परीक्षांना तोंड देण्याकरता घडविले जाणे

११, १२. (अ) आपल्या दररोजच्या जीवनात येणाऱ्‍या परीक्षांच्या संदर्भात आपण याकोबाचा सल्ला कसा लागू करू शकतो? (ब) आपण सचोटी राखावी याकरता ईयोबाचे उदाहरण आपल्याला कसे उत्तेजन देते?

११ देव आपल्या दररोजच्या जीवनात अशा काही परिस्थिती होऊ देतो त्यांपैकी काहींमुळे कदाचित आपल्याला त्रास होईल. आपण या परिस्थितींकडे कोणत्या दृष्टीने पाहण्यास हवे? याकोब ४:८ येथे सल्ला देण्यात आल्याप्रमाणे, आपण कधीही निराश न होता देवाच्या निकट जाऊ या, पूर्ण मनाने त्याच्यावर भरवसा ठेवू या, या विश्‍वासानिशी, की आपण ‘त्याच्याजवळ गेल्यास, तोही आपल्या जवळ येईल.’ होय, हे खरे आहे की आपल्याला संकटांना आणि परीक्षांना तोंड द्यावे लागेल. पण ही संकटे आपल्यावर येऊ दिली जातात तेव्हा आपल्याला घडविण्यास मदत होऊन शेवटी त्याचा चांगला परिणाम व्हावा. याकोब १:२, ३ आपल्याला याची खात्री पुरवते: “माझ्या बंधूंनो, नाना प्रकारच्या परीक्षांना तुम्हाला तोंड द्यावे लागते तेव्हा तुम्ही आनंदच माना. तुम्हास ठाऊक आहे की, तुमच्या विश्‍वासाची पारख उतरल्याने धीर उत्पन्‍न होतो.”

१२ याकोब असेही म्हणतो: “कोणाची परीक्षा होत असता, देवाने मला मोहात घातले, असे त्याने म्हणू नये; कारण देवाला वाईट गोष्टींचा मोह होत नाही आणि तो स्वतः कोणाला मोहात पाडीत नाही; तर प्रत्येक माणूस आपल्या वासनेने ओढला जातो व भुलविला जातो तेव्हा मोहात पडतो.” (याकोब १:१३, १४) आपल्यावर पुष्कळ आणि नानाप्रकारच्या परीक्षा येऊ शकतात, पण ईयोबाप्रमाणे या सर्व परीक्षा आपल्याला घडविण्याचे काम करतात. याकोब ५:११ येथे बायबल आपल्याला किती उत्तम आश्‍वासन देते: “पाहा, ज्यांनी सहन केले त्यांना आपण धन्य म्हणतो, तुम्ही ईयोबाच्या धीराविषयी ऐकले आहे, आणि त्याच्याविषयीचा प्रभूचा जो हेतु होता तो तुम्ही पाहिला आहे ह्‍यावरून प्रभु फार कनवाळू व दयाळू आहे हे तुम्हास दिसून आले.” यास्तव, महान कुंभाराच्या हाती असलेल्या पात्रांप्रमाणे आपण परीक्षेच्या काळात सचोटी कायम ठेवू या आणि ईयोबाप्रमाणे या गोष्टीवर पूर्ण विश्‍वास ठेवू या, की या परीक्षांचा शेवट गोडच होईल!—ईयोब २:३, ९, १०; २७:५; ३१:१-६; ४२:१२-१५.

आपल्या मुलांना घडविणे

१३, १४. (अ) पालकांनी त्यांच्या मुलांना घडविण्यास केव्हा सुरवात करावी आणि कोणत्या हेतूने? (ब) आनंदी शेवट झालेली कोणती उदाहरणे तुम्ही सांगू शकता?

१३ पालक त्यांच्या मुलांना अगदी कोवळ्या वयापासूनच घडवू शकतात आणि असे केले, तर आपली मुले मोठी होऊन सचोटी राखण्याच्या बाबतीत किती उत्तम उदाहरण मांडू शकतात! (२ तीमथ्य ३:१४, १५) फार मोठी परीक्षा झाली तरी ही मुले त्यांची सचोटी सोडत नाहीत. काही वर्षांपूर्वी, एका आफ्रिकी देशात आपल्या बांधवांचा फार छळ केला जात होता, पण एक भरवसालायक कुटुंब त्यांच्या घराच्या पाठीमागे टेहळणी बुरूज छापण्याचे काम भूमिगतपणे करत होते. तरुणांचा शोध घेऊन त्यांना सैन्यात भरती करण्याच्या हेतूने एके दिवशी सैनिक घरांची झडती घेत होते. या घरातील दोन तरुणांना लपण्याकरता पुष्कळ वेळ होता, पण ह्‍या सैनिकांनी घराची झडती घेतलीच तर त्यांना प्रिंटीग प्रेस लगेच दिसली असती. त्यामुळे या कुटुंबाच्या सर्व सदस्यांना हालहाल करून ठार मारण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. त्यांना काय करता येऊ शकत होते? योहान १५:१३ या वचनाचा उल्लेख करत त्या दोन तरुणांनी मोठी हिंमत दाखवली, त्यात म्हटले आहे: “आपल्या मित्रांकरिता आपला प्राण द्यावा ह्‍यापेक्षा कोणाची प्रीति मोठी नाही.” आत लपण्याऐवजी बिनधास्तपणे बाहेरच्या दिवानखान्यात बसण्याचे ठरवले. सैनिकांची नजर त्यांच्यावर लगेच पडेल. आणि सैन्यात भरती होण्यास नकार दिल्यामुळे त्यांना निश्‍चितच क्रूरपणे छळले जाईल किंवा ठार मारले जाईल. पण, त्यांना पकडल्यानंतर सैनिक निश्‍चितच त्यांच्या घराची झडती घेणार नाहीत. प्रिंटीग प्रेस आणि घरातील बाकी लोक मात्र त्यामुळे वाचतील. आणि कोणी अपेक्षा केली नसेल असेच घडले. त्या घराची झडती न घेता सैनिक पुढील घरांची झडती घेऊन निघून गेले! मानाकरता घडविण्यात आलेली ही पात्रे, प्रिटींग प्रेससोबत बचावली. आणि अशाप्रकारे वेळेवर आध्यात्मिक अन्‍न प्रकाशित करणे त्यांना शक्य झाले. या दोन तरुणांपैकी एक मुलगा आणि त्याची बहीण आज बेथेलमध्ये काम करत आहे; आणि दुसरा मुलगा अद्यापही त्या जुन्या प्रिंटीग प्रेसवर काम करत आहे.

१४ प्रार्थना कशी करावी, हे देखील मुलांना शिकवले जाऊ शकते; आणि देव त्यांच्या प्रार्थनांची उत्तरे देतोही. याचे एक उत्तम उदाहरण र्‌वांडामध्ये पाहायला मिळते. तेथे लोक एकमेकांची कत्तल करत होते. सैनिकांनी सहा वर्षांच्या एका चिमुकलीला आणि तिच्या आईवडिलांना अटक केली आणि त्यांच्यावर हातगोळा टाकून त्यांना मारण्याच्या बेतात ते होते; त्याचवेळी या मुलीने मोठ्याने व कळकळीने प्रार्थना केली की यापुढेही यहोवाची सेवा करण्याकरता त्यांना सोडून द्यावे. तिची प्रार्थना ऐकून त्यांची हत्या करणारे लोक स्तंभित झाले आणि त्यांनी त्यांना असे म्हटले: “या चिमुरडीमुळे आम्ही तुम्हाला सोडतो.”—१ पेत्र ३:१२.

१५. कोणत्या भ्रष्ट प्रभावांविषयी पौलाने इशारा दिला?

१५ आपण ज्या कठीण परिस्थितींविषयी पाहिले, तितक्या प्रकारची कठीण परिस्थिती आपल्या तरुणांवर कदाचित येणारही नाही, पण शाळेत आणि भ्रष्ट समाजात जगत असताना त्यांना अनेक परीक्षांना सामोरे जावे लागते. कारण कित्येक ठिकाणी ओंगळ भाषा, अश्‍लील साहित्य, हिणकस मनोरंजन आणि वाईट कामे करण्याकरता समवयस्कांकडून येणारा दबाब वाढत आहे. अशाप्रकारच्या प्रभावांविषयी प्रेषित पौलाने वारंवार इशारा दिला आहे.—१ करिंथकर ५:६; १५:३३, ३४; इफिसकर ५:३-७.

१६. एखादी व्यक्‍ती मानाच्या उपयोगाचे पात्र कशी होऊ शकते?

१६ काही पात्र ‘मानाच्या’ तर काही पात्र ‘अवमानाच्या’ उद्देशाकरता आहेत हे सांगितल्यानंतर पौल पुढे म्हणतो: “म्हणून जर कोणी त्यापासून [अवमानाच्या पात्रांपासून] दूर राहून स्वतःला शुद्ध करील, तर तो पवित्र केलेले, स्वामीला उपयोगी पडणारे, प्रत्येक चांगल्या कामास तयार केलेले, असे मानाचे पात्र होईल.” तर मग, आपण आपल्या मुलांना संगतीविषयी सावध राहण्याचा सल्ला देऊ या. या मुलांनी ‘तरुणपणाच्या वासनापासून दूर पळावे आणि शुद्ध मनाने प्रभूचा धावा करणाऱ्‍याबरोबर नीतिमत्त्व, विश्‍वास, प्रीती, शांती या गोष्टींच्या मागे लागावे.’ (२ तीमथ्य २:२०-२२) “एकमेकांची उन्‍नति” करण्याच्या कौटुंबिक कार्यक्रमामुळे मुलांना घडविण्यात मोलाची मदत होऊ शकते. (१ थेस्सलनीकाकर ५:११; नीतिसूत्रे २२:६) दररोज बायबल वाचल्यामुळे आणि अभ्यासाकरता संस्थेचे उचित पुस्तक वापरल्यामुळे खूप मदत होऊ शकते.

सर्वांचे घडविले जाणे

१७. शासन मिळाल्याने आपली घडण कशी होईल आणि त्याचा कोणता आनंदी परिणाम होईल?

१७ आपल्याला घडविण्याकरता यहोवा त्याच्या वचनाद्वारे आणि संघटनेद्वारे सल्ला पुरवतो. देवाच्या या सल्ल्याला कधीही झिडकारू नये. मिळालेल्या सल्ल्यावर योग्य विचार करा आणि यहोवा जेव्हा आपल्याला मानाच्या पात्राकरता घडवत असतो तेव्हा त्याला पूर्ण सहकार्य द्या. नीतिसूत्रे ३:११, १२ असा सल्ला देते: “माझ्या मुला, परमेश्‍वराचे शिक्षण तुच्छ मानू नको आणि त्याच्या शासनाला कंटाळू नको; कारण जसा बाप आपल्या आवडत्या मुलाला, तसा परमेश्‍वर ज्याच्यावर प्रीति करितो त्याला शासन करितो.” इब्री लोकांस १२:६-११ येथे घरातील वडील जसा सल्ला देतात त्याप्रमाणे सल्ला देण्यात आला आहे: “ज्यावर परमेश्‍वर प्रीति करितो, त्याला तो शिक्षा करतो . . . कोणतीहि शिक्षा तत्काली आनंदाची वाटत नाही, उलट खेदाची वाटते; तरी ज्यांना तिच्याकडून वळण लागले आहे त्यांना ती पुढे नीतिमत्व हे शांतिकारक फळ देते.” अशा प्रकारची शिक्षा विशेषतः देवाच्या प्रेरित वचनावर आधारलेली असावी.—२ तीमथ्य ३:१६, १७.

१८. पश्‍चात्ताप करण्याविषयी आपण लूकाच्या १५ व्या अध्यायातून काय शिकतो?

१८ यहोवा दयाळू देखील आहे. (निर्गम ३४:६) एखाद्याने गंभीर पाप केले, पण नंतर पश्‍चात्ताप व्यक्‍त केल्यास यहोवा त्या मनुष्याला क्षमा करतो. इतकेच काय, तर आज ‘उधळ्या पुत्राप्रमाणे’ असणाऱ्‍या लोकांना घडवून मानाचे पात्र बनवणे शक्य आहे. (लूक १५:२२-२४, ३२) कदाचित आपली पातके उधळ्या पुत्राच्या पातकांइतकी गंभीर नसतीलही. पण जेव्हा आपण शास्त्रवचनीय सल्ला नम्रपणे स्वीकारतो तेव्हा प्रत्येकवेळी आपल्याला मानाचे पात्र घडविण्याचे काम चालू असते.

१९. यहोवाच्या हातांतील मानाची पात्रे या नात्याने आपण त्याची सेवा निरंतर कशी करू शकतो?

१९ यहोवाने आपल्याला घडवावे अशी आपली इच्छा असल्याचे आपण सत्य शिकले तेव्हा दाखवले. या जगाची वहिवाट आपण सोडली, नवीन मनुष्यत्व धारण करण्यास सुरवात केली आणि समर्पित आणि बाप्तिस्माप्राप्त ख्रिस्ती बनलो. इफिसकर ४:२०-२४ येथे देण्यात आलेला सल्ला आपण पाळला, ‘तुमच्या पूर्वीच्या आचरणासंबंधी कपटाच्या वासनांनी युक्‍त असा जुना मनुष्य तुम्ही त्यागावा, आणि सत्यापासून निर्माण होणारे नीतिमत्व व पवित्रता ह्‍यांनी युक्‍त असा देवसदृश निर्माण केलेला नवा मनुष्य धारण करावा.’ तर मग, आपण नेहमी महान कुंभार, यहोवाद्वारे घडविले जाण्याकरता स्वतःला लवचिक बनवावे आणि मानाचे पात्र होऊन त्याची निरंतर सेवा करत राहावी!

उजळणी

◻ महान कुंभाराचा आपल्या पृथ्वीविषयी कोणता उद्देश आहे?

◻ मानाच्या उपयोगाकरता तुम्ही स्वतःला कशाप्रकारे घडवू देऊ शकता?

◻ आपल्या मुलांना कोणत्या प्रकारे घडविले जाऊ शकते?

◻ शासनाकडे आपण कोणत्या दृष्टीने पाहण्यास हवे?

[१० पानांवरील चित्र]

मानाच्या उपयोगाकरता तुम्ही स्वतःला घडवू द्याल का की घडवू देणार नाही?

[१२ पानांवरील चित्र]

अगदी लहानपणापासूनच मुलांना घडविता येऊ शकते

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा