राज्य घोषकांचा वृतान्त
खऱ्या देवाच्या शोधाचे प्रतिफळ
सायुपू. दहाव्या शतकात यहुदाच्या द्वी-वंशीय राज्यावर खोट्या धर्माचा अंमल होता. पण मूर्तीपूजेने भरलेल्या या राज्यात देवाप्रती योग्य मनोवृत्ती असलेला मनुष्य राहात होता. यहोशाफाट हे त्या मनुष्याचे नाव. संदेष्टा येहू याने त्याच्याविषयी असे म्हटले: “तुझ्या ठायी चांगले गुण सापडले आहेत . . . देवाला शोधायला [तू] आपले मन लावले आहे.” (२ इतिहास १९:३, पं.र.भा.) त्याचप्रमाणे आजही, या “कठीण काळात” लाखो लोकांनी खरा देव, यहोवा याचा शोध घेण्याकरता ‘स्वतःचे मन तयार केले आहे.’ (२ तीमथ्य ३:१-५) पश्चिम आफ्रिकेतील टोगो येथील उदाहरणावरून हे स्पष्ट होते.
काझीमीर हा कॅथलिक शाळेचा विद्यार्थी होता आणि त्याने वयाच्या नवव्या वर्षी पहिले कम्युनिअन घेतले. पण चौदाव्या वर्षांपर्यंत त्याने चर्चला जाण्याचे सोडून दिले. त्यामुळे त्याच्या मनात एक प्रकारची भिती निर्माण झाली कारण त्याला असे वाटू लागले, की मासला जाण्याचे सोडून दिल्याने त्याला नरकाग्नीत किंवा किमान मृतात्म्यांच्या पापक्षालनाच्या ठिकाणी तर नक्कीच जावे लागेल.
एकदा शाळेत काझीमीरची भेट काही युवकांसोबत झाली; ही मुले बायबलचा अभ्यास करण्याकरता आठवड्यातून एकदा एकत्र जमत. त्यानेही बायबल वाचण्यास सुरवात केली. एकदा, प्रकटीकरणाच्या पुस्तकात वर्णन केलेल्या समुद्रातून बाहेर येणाऱ्या भयानक श्वापदाविषयी त्याने वाचले. (प्रकटीकरण १३:१, २) या श्वापदाविषयी त्याने जेव्हा बायबल अभ्यास घेणाऱ्याला विचारले तेव्हा त्याला सांगण्यात आले, की हे श्वापद खरे असून ते वास्तविकपणे समुद्रातून बाहेर येईल. हे ऐकल्यानंतर काझीमीरच्या पोटात भितीने गोळाच आला कारण त्याचे घर अटलांटिक समुद्राच्या किनाऱ्यापासून फार जवळ होते. हे श्वापद समुद्रातून बाहेर पडल्यानंतर सर्वात पहिल्यांदा मलाच ठार मारणार, अशी काझीमीरची पूर्ण खात्री पटली.
या श्वापदापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी काझीमीरने उत्तरेकडील वाळवंटात जाण्याचे ठरवले आणि त्याकरता त्याने पैसे जमा करण्यास सुरवातही केली. त्याने त्याच्या वर्गातील एकाला त्याविषयी सांगितले. हा त्याचा मित्र यहोवाचा साक्षीदार होतो. त्याने काझीमीरला सांगितले, हे श्वापद खरोखरचे श्वापद नसून ते कोणत्याही समुद्रातून बाहेर येणार नाही. या घटनेनंतर काझीमीरला राज्य सभागृहामध्ये होणाऱ्या सभांकरता आमंत्रण मिळाले. त्याला त्या सभा खूप आवडल्या आणि तो त्या सभांना नियमितरीत्या उपस्थित राहू लागला. तो बायबल अभ्यास करायलाही तयार झाला.
जसजशी काझीमीरने त्याच्या बायबल अभ्यासामध्ये प्रगती केली तसतसा त्याच्या घरचा विरोध वाढतच गेला. त्याच्या घरचे लोक त्यांच्या पूर्वजांची उपासना करत आणि अर्पण करण्यात आलेले मांस रक्त पूर्णपणे न काढता खात. अशाप्रकारचे मांस खाण्यास काझीमीरने त्याच्या घरच्यांना विनयशीलपणे नाही म्हटले तेव्हा त्याला धमकावण्यात आले आणि घरातून निघून जाण्याचेही सांगण्यात आले. काझीमीर शांत राहिला आणि घरच्यांच्या धमक्याही थांबल्या. पण सुमारे तीन महिने त्याच्या घरात अशाच प्रकारचे मांस खाण्याकरता देण्यात येत होते. काझीमीरला खायला पुरेसे जेवणही मिळत नव्हते, तरी पण त्याने यात आणि इतर संकटात तग धरला.
काझीमीरने आपली आध्यात्मिक प्रगती चालू ठेवली आणि पुढे समर्पण करून बाप्तिस्मा घेतला. त्यानंतर त्याला सेवा-सेवक म्हणून नेमण्यात आले आणि टोगा येथील सेवा प्रशिक्षण प्रशालेच्या चौथ्या वर्गालाही तो उपस्थित राहिला. सध्या तो शाखा दफ्तरात स्वयंसेवक म्हणून मोठ्या आनंदाने काम करत आहे.
दावीद राजाचे पुढील शब्द अनेक वेळा किती खरे असल्याचे दिसून आले आहेत: “तू त्याचा [यहोवाचा] शोध करशील तर तो तुला सापडेल.”—१ इतिहास २८:९ पं.र.भा.
[८ पानांवरील चित्रं]
काझीमीर (उजवीकडे) शाखा दफ्तरामध्ये स्वयंसेवक म्हणून मोठ्या आनंदाने काम करताना