मातीच्या भांड्यांतील आपली संपत्ती
“ही आमची संपत्ति मातीच्या भांड्यांत आहे, अशा हेतूने की, सामर्थ्याची पराकोटी देवाची आहे, आमच्यापासून होत नाही, हे समजावे.”—२ करिंथकर ४:७.
१. येशूच्या उदाहरणाने आपल्याला कशाप्रकारे उत्तेजन मिळण्यास हवे?
पृथ्वीवर असताना यहोवा देव येशूला घडवत होता तेव्हा येशूने मानवजातीच्या उणिवा प्रत्यक्ष अनुभवल्या. सचोटी राखण्याच्या त्याच्या उदाहरणाचे आपल्याला किती उत्तेजन मिळण्यास हवे! प्रेषित पेत्राने लिहिले: “कारण ह्याचकरिता तुम्हास पाचारण करण्यात आले आहे; कारण ख्रिस्तानेहि तुम्हांसाठी दुःख भोगले आणि तेणेकरून तुम्ही त्याच्या पावलांवर पाऊल ठेवून चालावे म्हणून त्याने तुम्हांकरिता कित्ता घालून दिला आहे.” (१ पेत्र २:२१) स्वतःला घडवू देण्यास येशूने अधीनता दर्शवल्यामुळे येशूने या जगाला जिंकले. अशाचप्रकारचा विजय त्याच्या शिष्यांनी मिळवावा असे उत्तेजनही त्याने त्यांना दिले. (प्रेषितांची कृत्ये ४:१३, ३१; ९:२७, २८; १४:३; १९:८) येशू त्यांच्यासोबत बोलला तेव्हा सुद्धा त्याने त्यांना किती मोठे उत्तेजन दिले! त्याने म्हटले: “माझ्या ठायी तुम्हाला शांति मिळावी म्हणून मी तुम्हाला ह्या गोष्टी सांगितल्या आहेत. जगात तुम्हाला क्लेश होतील, तरी धीर धरा; मी जगाला जिंकले आहे.”—योहान १६:३३.
२. आपल्याकडे जगाचा अंधार नाही, तर मग कोणता प्रकाश आहे?
२ “या युगाच्या दैवताने” आणलेले अंधत्व आणि “सुवार्तेचा प्रकाश” यांतील भेद स्पष्ट केल्यानंतर प्रेषित पेत्राने आपल्या मौल्यवान सेवाकार्याविषयी असे म्हटले: “ही आमची संपत्ति मातीच्या भांड्यात आहे, अशा हेतूने की, सामर्थ्याची पराकोटी देवाची आहे, आमच्यापासून होत नाही, हे समजावे. आम्हावर चोहोकडून संकटे आली तरी आमचा कोंडमारा झाला नाही; आम्ही घोटाळ्यात पडलो तरी निराश झालो नाही; आमचा पाठलाग झाला तरी परित्याग करण्यात आला नाही; आम्ही खाली पडलेले आहो तरी आमचा नाश झाला नाही.” (२ करिंथकर ४:४, ७-९) आपण ‘मातीचे भंगूर भांडे’ असलो तरी देवाने त्याच्या आत्म्याद्वारे आपल्याला असे घडवले आहे की आपण सैतानाच्या या जगावर पूर्णपणे मात करू शकतो.—रोमकर ८:३५-३९; १ करिंथकर १५:५७.
प्राचीन इस्राएलला घडवणे
३. यहुदी राष्ट्राला घडविण्याचे यशयाने कसे वर्णन केले आहे?
३ यहोवा लोकांनाच नव्हे, तर संपूर्ण राष्ट्रालाही घडवतो. उदाहरणार्थ, प्राचीन इस्राएल देशाने देवाला घडवू देऊ दिले तेव्हा त्या राष्ट्राची भरभराट झाली. पण अखेरीस, या देशाने कठोर होऊन देवाची अवज्ञा केली. परिणामी इस्राएल राष्ट्र घडविणाऱ्याने त्या राष्ट्राला “शाप” दिला. (यशया ४५:९, NW) सा.यु.पू. आठव्या शतकात यशया इस्राएलच्या गंभीर पापमयवृत्तीविषयी बोलला त्याने म्हटले: “हे परमेश्वरा, तू आमचा पिता आहेस; आम्ही माती आहो, तू आमचा कुंभार आहेस; आम्ही सर्व तुझ्या हातची कृति आहो. . . . आमच्या सगळ्या मनोरम वस्तु नष्ट झाल्या आहेत.” (यशया ६४:८-११) इस्राएल राष्ट्राने स्वतःला अशाप्रकारचे भांडे बनवले ज्याचा केवळ नाशच व्हायचा होता.
४. यिर्मयाला कोणता दृष्टान्त देण्यात आला?
४ एका शतकानंतर, न्यायदंडाचा दिवस जवळ आला तेव्हा, यहोवाने यिर्मयाला सांगितले, की त्याने मातीचे मडके तसेच काही वडिलांना घेऊन हिन्नोमच्या खोऱ्यात जावे. त्याने त्याला अशी आज्ञा दिली: “जी मनुष्ये तुजबरोबर असतील त्यांच्या डोळ्यांदेखत ते मातीचे मडके फोड; आणि त्यांस सांग सेनाधीश परमेश्वर म्हणतो कुंभाराच्या मडक्याचा भंग केल्यास ते नीट करिता येत नाही, तसे मी या लोकांचा व या नगराचा भंग करीन.”—यिर्मया १९:१०, ११.
५. इस्राएलवरील यहोवाचा न्यायदंड किती व्यापक होता?
५ सा.यु.पू. ६०७ मध्ये नबुखद्नेस्सरने जेरुसलेमचा त्यातील मंदिरासह नाश केला आणि वाचलेल्या यहुद्यांना बॅबिलॉनमध्ये बंदी म्हणून घेऊन गेला. पण या बंदिवासात ७० वर्षे घालवल्यानंतर, पश्चात्तापी यहुद्यांना जेरुसलेमेची आणि मंदिराची पुनर्बांधणी करण्याकरता परत येता आले. (यिर्मया २५:११) पण सा.यु. पहिल्या शतकात इस्राएल राष्ट्राने पुन्हा एकदा महान कुंभाराला त्यागले आणि इतके अवनत झाले, की त्यांच्या हातून स्वतः यहोवा देवाच्या पुत्राचा खून करण्याचा घोर गुन्हा घडला. सा.यु. ७० मध्ये देवाने रोमी जागतिक साम्राज्याद्वारे यहुदी व्यवस्थीकरणाचा नायनाट केला, त्यात जेरुसलेम आणि त्यातील मंदिरही नष्ट झाले. “पवित्र आणि सुशोभित” या अर्थाने त्यानंतर इस्राएल राष्ट्र यहोवाच्या हातून कधी घडले नाही.a
आध्यात्मिक राष्ट्र घडविणे
६, ७. (अ) आध्यात्मिक इस्राएलला घडविण्याचे पौल कसे वर्णन करतो? (ब) ‘दयेच्या पात्रांची’ एकूण संख्या किती आहे आणि ती कशाप्रकारे पूर्ण करण्यात आली?
६ येशूचा स्वीकार केलेल्या यहुद्यांना नवीन राष्ट्राचा अर्थात ‘देवाच्या इस्राएलचे’ पहिले सदस्य म्हणून घडवण्यात आले. (गलतीकर ६:१६) त्यामुळे पौलाचे हे शब्द किती उचित आहेत: “एकाच गोळ्याचे एक पात्र उत्तम कामासाठी व एक हलक्या कामासाठी करावे असा कुंभाराला मातीवर अधिकार नाही काय? आपला क्रोध दर्शवावा व आपले सामर्थ्य व्यक्त करावे असे देवाच्या मनात असताना नाशासाठी सिद्ध झालेल्या क्रोधाच्या पात्रांना मोठ्या सहनशीलतेने त्याने जर वागवून घेतले, आणि . . . आपल्याविषयी म्हणजे ज्याने पूर्वी गौरवासाठी सिद्ध केलेल्या दयेच्या पात्रांविषयी आपल्याला गौरवाची विपुलता व्यक्त करावी.”—रोमकर ९:२१-२४.
७ पुनरुत्थान झालेल्या येशूने नंतर हे स्पष्ट केले, की या ‘दयेच्या पात्रांची’ संख्या १,४४,००० इतकी असेल. (प्रकटीकरण ७:४; १४:१) स्वाभाविक इस्राएल राष्ट्राने ही संख्या न पुरवल्यामुळे यहोवाने परराष्ट्रीयांवरही दया प्रकट केली. (रोमकर ११:२५, २६) त्यामुळे नवीन ख्रिस्ती मंडळीची भरभराट झाली. तीस वर्षांच्या आतच “आकाशाखालच्या सर्व सृष्टीत” सुवार्ता ऐकवली जात होती. (कलस्सैकर १:२३) परिणामी, ठिकठिकाणी स्थापित झालेल्या स्थानिक मंडळ्यांवर योग्य देखरेख करण्याची गरज भासू लागली.
८. आरंभीच्या नियमन मंडळात कोण होते आणि या वर्गाचा विकास कसा झाला?
८ येशूने त्याच्या १२ प्रेषितांना पहिल्या नियमन मंडळासाठी तयार केले; त्यांना आणि इतरांनाही त्याने सेवाकार्याचे प्रशिक्षण दिले. (लूक ८:१; ९:१, २; १०:१, २) सा.यु. ३३ च्या पेन्टेकॉस्टमध्ये ख्रिस्ती मंडळीची स्थापना झाली आणि कालांतराने त्या मंडळीच्या नियमन मंडळात ‘यरुशलेमेतील प्रेषित आणि वडीलवर्गाचाही’ समावेश करण्यात आला. कालांतराने येशूचा सावत्र भाऊ, याकोब हा प्रेषित नव्हता, तरीदेखील त्याने अध्यक्ष म्हणून सेवा केल्याचे दिसून येते. (प्रेषितांची कृत्ये १२:१७; १५:२, ६, १३; २१:१८) इतिहासकार युसेबियस यांच्या मते, विशेषतः प्रेषितांचा छळ करण्यात आला त्यामुळे त्यांना दुसऱ्या प्रदेशात पलायन करावे लागले. नियमन मंडळाच्या रचनेत त्यानुसार योग्य तो बदल करण्यात आला.
९. येशूने कोणत्या वाईट घटनेविषयी भाकीत केले?
९ पहिल्या शतकाच्या अखेरीस, ‘वैऱ्याने अर्थात दियाबलाने,’ गव्हाप्रमाणे असणाऱ्या ‘स्वर्गीय राज्याच्या’ वारशांमध्ये ‘निदण पेरण्यास’ सुरवात केली. या वाईट परिस्थितीला ‘युगाच्या समाप्तीच्या’ वेळी होणाऱ्या कापणीपर्यंत अनुमती देण्यात येणार आहे, असे येशूने आधीच भाकीत केले होते. त्यानंतर, पुन्हा “नीतिमान लोक आपल्या पित्याच्या राज्यात सूर्यासारखे प्रकाशतील.” (मत्तय १३:२४, २५, ३७-४३) पण हे केव्हा होईल?
आजच्या देवाच्या इस्राएलला घडविणे
१०, ११. (अ) देवाच्या आधुनिक दिवसातील इस्राएलला कशाप्रकारे घडविण्यात आले? (ब) ख्रिस्ती धर्मजगतामध्ये आणि प्रांजळ बायबल विद्यार्थ्यांमध्ये समानता नसणाऱ्या कोणत्या गोष्टी आढळल्या?
१० सन १८७० मध्ये, चार्ल्स टेझ रस्सल यांनी अमेरिकेतील पिट्सबर्ग, पेन्सिल्व्हेनिया, येथे बायबल अभ्यासाचा एक गट तयार केला. सन १८७९ मध्ये त्यांनी प्रत्येक महिन्याला एक नियतकालिक छापण्यास सुरवात केली, याच नियतकालिकाला आज टेहळणी बुरूज म्हटले जाते. बायबल विद्यार्थी असे संबोधण्यात येणाऱ्या या साक्षीदारांना लवकरच हे समजून आले, की ख्रिस्ती धर्मजगताने खोट्या धर्माच्या शिकवणी स्वीकारल्या आहेत, जसे की जीवाचे अमरत्व, नरकाग्नी, मरणोत्तर प्रायश्चित भूमी, त्रैक्य आणि बालकांना बाप्तिस्मा देण्याचा प्रकार.
११ पण महत्त्वाची गोष्ट ही की, बायबलमधील सत्याविषयी प्रेम वाटणाऱ्या या लोकांनी बायबलमधील मूलभूत शिकवणी लोकांना शिकवण्यास सुरवात केली. जसे की येशूच्या खंडणीद्वारे मिळणारी मुक्तता आणि पुनरुत्थान झाल्यानंतर देवाच्या राज्यात या पृथ्वीवरील शांतिमय परादीसमध्ये सार्वकालिक जीवनाची आशा. विश्वाचा सार्वभौम राजा म्हणून यहोवा देवाचे समर्थन लवकरच करण्यात येणार आहे यावर सर्वात जास्त जोर देण्यात आला. या बायबल विद्यार्थ्यांचा असा विश्वास होता, की प्रभूच्या प्रार्थनेचे लवकरच उत्तर मिळेल: “हे आमच्या स्वर्गांतील पित्या, तुझे नाव पवित्र मानिले जावो. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गांत तसे पृथ्वीवरहि तुझ्या इच्छेप्रमाणे होवो.” (मत्तय ६:९, १०) जगभरातील शांतिप्रिय ख्रिस्ती समाजाचे भाग होण्याकरता देवाचा आत्मा त्यांना घडवत होता.
१२. बायबल विद्यार्थ्यांना महत्त्वाची तारीख कशी कळली?
१२ दानीएल अध्याय ४ आणि इतर भविष्यवाणींमधील गाढ अभ्यासाद्वारे बायबल विद्यार्थ्यांना याची खात्री पटली, की येशूची मशीही राजा या नात्याने होणारी उपस्थिती जवळ असली पाहिजे. त्यांना असे समजले, की “परराष्ट्रीयांची सद्दी” १९१४ मध्ये संपेल. (लूक २१:२४; यहेज्केल २१:२६, २७) बायबल विद्यार्थ्यांनी त्यांच्या कामाला वेग आणला आणि त्यांनी संपूर्ण अमेरिकेत बायबल वर्ग सुरू केले (या वर्गांना पुढे मंडळी असे संबोधण्यात येऊ लागले). त्या शतकाच्या सुरवातीला त्यांचे काम युरोप, ऑस्ट्रेलिया आणि आसपासच्या देशांत पसरण्यास सुरवात झाली. त्यामुळे योग्य संघटन करण्याची गरज भासू लागली.
१३. बायबल विद्यार्थ्यांना कोणता कायदेशीर दर्जा मिळाला आणि संस्थेच्या पहिल्या अध्यक्षांनी कोणती उल्लेखनीय सेवा पार पाडली?
१३ बायबल विद्यार्थ्यांना कायदेशीर मान्यता मिळावी म्हणून १८८४ साली अमेरिकेत झायन्स वॉचटावर ट्रॅक्ट सोसायटी नामक संस्था स्थापण्यात आली. या संस्थेचे मुख्य शाखा दफ्तर अमेरिकेतील पिट्सबर्ग, पेनसिल्व्हेनिया, येथे होते. या संस्थेचे मार्गदर्शक नियमन मंडळाचे सदस्य म्हणून काम पाहत होते आणि संपूर्ण जगभरात देवाच्या राज्याच्या प्रचार कार्यावर देखरेख ठेवत होते. या संस्थेचे पहिले अध्यक्ष, चार्ल्स टी. रस्सल यांनी शास्त्रवचनांवर अभ्यास (इंग्रजी) नामक सहा खंड लिहिले आणि प्रचार करण्याकरता दूरपर्यंत दौरे केले. त्यांनी बायबल शिक्षणाचा कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी जी काही संपत्ती जमा केली होती ती सर्व त्यांनी जगभरातील प्रचार कार्यात लावली. सन १९१६ मध्ये जेव्हा युरोपमध्ये पहिल्या जागतिक युद्धाने रौद्र रूप धारण केले होते तेव्हा प्रचाराचा दौरा करत असतानाच थकलेले रस्सल यांचा मृत्यू झाला. देवाच्या राज्याची साक्ष दूरपर्यंत देण्याकरता त्यांनी त्यांच्याकडचे सर्वकाही देऊ केले.
१४. जे. एफ. रदरफर्ड यांनी कोणते “सुयुद्ध” लढले? (२ तीमथ्य ४:७)
१४ जोसेफ एफ. रदरफर्ड हे त्यानंतरचे अध्यक्ष झाले. त्यापूर्वी ते काही काळ मिसोरीमध्ये न्यायाधीश म्हणून काम करत होते. त्यांनी निडरपणे बायबलमधील सत्याची वकिली केली. परिणामी ख्रिस्ती धर्मजगताचा पाळक वर्ग क्रोधित झाला आणि या वर्गाने ‘उपद्रव योजन्यात’ राजकीय पुढाऱ्यांची मदत घेतली. जून २१, १९१८ मध्ये, रदरफर्ड यांच्यासोबत इतर सात प्रमुख बायबल विद्यार्थ्यांना तुरुंगात टाकण्यात आले. त्यांच्यापैकी प्रत्येकावर एकाच वेळी अनेक आरोप लावून १० किंवा २० वर्षे तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली. बायबल विद्यार्थ्यांनी कायद्याचा आश्रय घेतला. (स्तोत्र ९४:२०; फिलिप्पैकर १:७) त्यांनी केलेले अपील मान्य झाले आणि त्या सर्वांची मार्च २६, १९१९ मध्ये सुटका झाली, त्यांच्यावरील देशद्रोहाचा आरोप खोटा ठरला आणि त्यांना सोडण्यात आले.b या अनुभवामुळे त्यांना घडण्यास मदत मिळाली आणि ते सत्याचे धैर्यवान समर्थक बनले. त्यांचे प्रयत्न हाणून पाडण्याचे मोठ्या बाबेलने पुष्कळ प्रयत्न केले, पण यहोवाच्या मदतीने या आध्यात्मिक संघर्षात विजयी होण्याकरता त्यांनी त्यांच्या परीने प्रयत्न केला. आणि हा संघर्ष आज १९९९ पर्यंत चालू आहे—मत्तय अध्याय २३ सोबत तुलना करा; योहान ८:३८-४७.
१५. सन १९३१ हे वर्ष ऐतिहासिकरीत्या महत्त्वाचे का आहे?
१५ सन १९२० आणि १९३० या दशकाच्या काळात, महान कुंभार त्याच्या अभिषिक्त इस्राएलला त्याच्या स्वतःच्या मार्गदर्शनाने घडवत होता. बायबलच्या प्रकाशात भविष्यवाणीची योग्य समज मिळत गेली ज्यामुळे यहोवाचा आणखी गौरव झाला आणि येशूच्या मशीही राज्याविषयी आणखी माहिती उजेडात आली. सन १९३१ मध्ये बायबल विद्यार्थ्यांचा आनंद पाहण्यासारखा होता कारण त्या साली त्यांनी यहोवाचे साक्षीदार, हे नवे नाव धारण केले.—यशया ४३:१०-१२; मत्तय ६:९, १०; २४:१४.
१६ आणि पृष्ठ १९ वरील पेटी. १,४४,००० ही संख्या केव्हा पूर्ण झाली आणि याचा कोणता पुरावा आहे?
१६ असे वाटले होते, की सन १९३० च्या दशकात ‘पाचारण केलेल्या, निवडलेल्या व विश्वासू” लोकांची अर्थात १,४४,००० जणांची संख्या भरली. (प्रकटीकरण १७:१४; पृष्ठ १९ वरील पेटी पाहा.) पहिल्या शतकात आणि ख्रिस्ती धर्मजगतामधील धर्मत्यागामुळे “निदण” मूळ धरत होते त्या अंधःकाराच्या युगादरम्यान किती अभिषिक्त लोकांना निवडण्यात आले, हे आपल्याला माहीत नाही. पण १९३५ मध्ये ५६,१५३ प्रचारकांपैकी एकूण ५२,४६५ प्रचारकांनी स्मारकविधीच्या चिन्हांत सहभागी होण्याद्वारे हे दाखवून दिले की त्यांना स्वर्गीय आशा आहे. पण, अद्यापही एकत्रित करावयाच्या बाकी लोकांना कोणती आशा होती?
‘पहा, मोठा लोकसुमदाय’
१७. सन १९३५ मध्ये ऐतिहासिक विकासाची कोणती घटना घडली?
१७ अमेरिकेतील वॉशिंग्टन, डी.सी., येथे मे ३० ते जून ३ १९३५ या दरम्यान एक अधिवेशन भरवण्यात आले. या अधिवेशनात बंधू रदरफर्ड यांनी “मोठा लोकसमुदाय”c या महत्त्वपूर्ण विषयावर भाषण दिले. आध्यात्मिक इस्राएलच्या १,४४,००० जणांवर शिक्का मारण्याचे काम पूर्ण होण्याच्या आसपास हा ‘कोणाला मोजता न येणारा’ समुदाय दृष्टीस पडणार होता. येशूच्या अर्थात ‘कोकऱ्याच्या रक्ताद्वारे’ सुटका प्राप्त होण्याच्या सामर्थ्यावर या लोकसमुदायाचा विश्वास असेल आणि तो, यहोवाच्या मंदिरात म्हणजे उपासनेच्या व्यवस्थेच्या संदर्भात पवित्र सेवा सादर करेल. हा लोकसमुदाय ‘मोठ्या संकटातून बाहेर पडेल’ आणि आनंदी आणि शांतिमय पृथ्वीचा वारस होईल जेथे ‘मरण असणार नाही.’ या अधिवेशनाच्या आधी अनेक वर्षे या गटाला यहोनादाब असे संबोधण्यात येत असे.—प्रकटीकरण ७:९-१७; २१:४; यिर्मया ३५:१०.
१८. सन १९३८ कोणत्या अर्थांनी महत्त्वाचे होते?
१८ या दोन वर्गांची ओळख व्हावी म्हणून १९३८ चे वर्ष महत्त्वाचे ठरले. टेहळणी बुरुज याच्या मार्च १५ आणि एप्रिल १, १९३८ या अंकात “त्याचा कळप” दोन भागांचा अभ्यास लेख प्रकाशित करण्यात आला. या लेखांत अभिषिक्त शेष आणि त्यांचे साथीदार अर्थात मोठा लोकसमुदाय यांच्या वेगवेगळ्या भूमिकांविषयी स्पष्ट शब्दांत वर्णन करण्यात आले. त्यानंतर जून १ आणि जून १५ च्या अंकात यशया ६०:१७ वर आधारित “संघटन” असे शीर्षक असलेले अभ्यासाचे लेख प्रकाशित करण्यात आले. सर्व मंडळ्यांना असे सांगण्यात आले, की स्थानिक सेवकांच्या नियुक्तीकरता त्यांनी नियमन मंडळाला तशी विनंती करावी. जेणेकरून ती एक सुधारीत, देवाने ठरवलेली, ईश्वरशासित योजना ठरेल. आणि मंडळ्यांनी तसेच केले.
१९. आणि तळटीप. ‘दुसऱ्या मेंढराना’ सुमारे ६० वर्षांपासून पाचारण देण्याचे काम चालू असल्याचे कोणत्या वास्तविक गोष्टींवरून दिसून येते?
१९ सन १९३९ यहोवाच्या साक्षीदारांचे वार्षिक पुस्तक (इंग्रजी) यातील अहवालात असे लिहिले होते: “पृथ्वीवर उरलेल्या येशू ख्रिस्ताच्या अभिषिक्त अनुयायांची संख्या खूप कमी आहे, आणि पुन्हा त्या संख्येत कधी वाढ होणार नाही. या अभिषिक्त लोकांना बायबलमध्ये देवाचे संघटन म्हणजे सियोनेचे ‘बाकीचे लोक’ असे संबोधण्यात आले आहे. (प्रकटी. १२:१७) आता प्रभू त्याच्या जवळ त्याच्या ‘दुसऱ्या मेंढरांना’ एकत्रित करत आहे आणि या मेंढरांचा ‘मोठा लोकसमुदाय’ तयार होतो. (योहान १०:१६) आता एकत्रित करण्यात येणारे लोक अभिषिक्त शेषांचे साथीदार आहेत आणि त्यांच्यासोबत एकत्र मिळून काम करतात. एक ‘मोठा लोकसमुदाय’ तयार होत नाही तोपर्यंत या ‘दुसऱ्या मेंढरांच्या’ संख्येत वाढ होत राहील.” अभिषिक्त शेषांना घडविण्यात आले जेणेकरून त्यांना मोठ्या लोकसमुदायाला एकत्र करण्याचे काम पाहणे शक्य व्हावे. आता या मोठ्या लोकसमुदायाला सुद्धा घडवायचे आहे.d
२०. सन १९४२ पासून कोणते संघटनात्मक बदल झाले आहेत?
२० जानेवारी १९४२ मध्ये जेव्हा दुसरे जागतिक युद्ध जोरात चालू होते तेव्हा जोसेफ रदरफर्ड यांचा मृत्यू झाला आणि नेथन नॉर हे अध्यक्ष बनले. संस्थेच्या या तिसऱ्या अध्यक्षांची अद्यापही आठवण होते कारण त्यांनी मंडळ्यांमध्ये ईश्वरशासित प्रशाला आणि मिशनरी लोकांच्या प्रशिक्षणाकरता गिलियड प्रशाला सुरू केली. सन १९४४ मध्ये झालेल्या संस्थेच्या वार्षिक सभेमध्ये त्यांनी घोषणा केली, की संस्थेच्या सनदेचे नविनीकरण करण्यात आले असून येथून पुढे सदस्यांना त्यांच्या आध्यात्मिकतेच्या आधारावर निवडण्यात येईल, एखादी व्यक्ती किती वर्गणी देते याच्या आधारावर नव्हे. त्यानंतर ३० वर्षांच्या काळात जगभरातील प्रचारकांची संख्या १,५६,२९९ पासून वाढून ती २१,७९,२५६ इतकी झाली. सन १९७१-७५ या काळादरम्यान संघटनेतील काम करण्याच्या पद्धतीत आणखी बदल करण्याची आवश्यकता भासू लागली. आता संपूर्ण जगभरात चालू असलेले प्रचाराचे काम केवळ एका अध्यक्षाला पाहणे अशक्य होते. त्यामुळे नियमन मंडळातील सदस्यांची संख्या वाढून ती १८ करण्यात आली आणि हे सर्व अभिषिक्त जन आळीपाळीने अध्यक्षाचे काम पाहत होते. या नियमन मंडळातील जवळजवळ निम्म्या लोकांची पृथ्वीवरील सेवा संपली आहे.
२१. राज्याच्या लहान कळपाचे सदस्यत्व कोणत्या पात्रतेवर ठरवण्यात आले आहे?
२१ लहान कळपाच्या उरलेल्या सदस्यांना कित्येक वर्षांपासून परीक्षांद्वारे घडविण्यात आले आहे. ‘आत्म्याच्या साक्षीचा’ त्यांनी स्वतः अनुभव घेतल्यामुळे त्यांना उत्तेजन मिळाले आहे. येशूने त्यांना म्हटले: “माझ्या परीक्षांमध्ये माझ्याबरोबर टिकून राहिलेले तुम्हीच आहा. जसे माझ्या पित्याने मला राज्य नेमून दिले तसे मीहि तुम्हास नेमून देतो. ह्यासाठी की, तुम्ही माझ्या राज्यात माझ्या मेजावर खावे व प्यावे, आणि राजासनांवर बसून इस्राएलाच्या बारा वंशाचा न्याय करावा.”—रोमकर ८:१६, १७; लूक १२:३२; २२:२८-३०.
२२, २३. लहान कळपाला आणि दुसऱ्या मेंढरांना कशा प्रकारे घडविण्यात येत आहे?
२२ आता पृथ्वीवर आत्म्याने अभिषिक्त असलेले लोक फार कमी आहेत त्यामुळे जगभरातील जवळजवळ सर्व मंडळ्यांची आध्यात्मिक देखरेख करण्याची जबाबदारी मोठ्या कळपातील अनुभवी, प्रौढ बांधवावर सोपण्यात आली आहे. आणि जोपर्यंत वयोवृद्ध अभिषिक्त साक्षीदारांपैकी शेवटचा सदस्य पृथ्वीवर जिवंत आहे तोपर्यंत दुसऱ्या मेंढरातील राजेशाही सरिम पृथ्वीवरील अधिपती म्हणून कारभाराची जबाबदारी पेलण्याकरता प्रशिक्षित झालेले असतील.—यहेज्केल ४४:३; यशया ३२:१.
२३ लहान कळप आणि दुसरी मेंढरे या दोन्ही गटांना घडविण्याचे काम चालू आहे जेणेकरून त्यांनी आदराची पात्रे व्हावे. (योहान १०:१४-१६) आपली आशा ‘नव्या आकाशाची’ असो अथवा ‘नव्या पृथ्वीची’ असो, आपण पूर्ण मनाने देवाच्या आमंत्रणाचा स्वीकार करावा: “जे मी उत्पन्न करितो त्याने तुम्ही सदा आनंदी व्हा व उल्लास पावा; पाहा, मी यरुशलेम उल्लासमय, तिचे लोक आनंदमय करितो.” (यशया ६५:१७, १८) दुर्बळ मनुष्य असतानाही आपण नेहमी नम्रतेने सेवा करत राहू या आणि ‘पराकोटीचे सामर्थ्य’ अर्थात देवाच्या पवित्र आत्म्याच्या शक्तीद्वारे घडविले जाऊ या!—२ करिंथकर ४:७; योहान १६:१३.
[तळटीपा]
a हे प्राचीन इस्राएल नीतिभ्रष्ट ख्रिस्ती धर्मजगताला सूचित करते, त्यावरही अशाच प्रकारचा न्यायदंड बजावला जाईल, असा इशारा देण्यात येतो.—१ पेत्र ४:१७, १८.
b मैनटन हा जज्ज रोमन कॅथलिक होता. तो बायबल विद्यार्थ्यांची जामिनीवर सुटका करण्यास तयार नव्हता. पण पुढे त्याला स्वतःला लाच घेण्याच्या आरोपाखाली तुरुंगवास भोगावा लागला.
c his footnote is missing in vernacular
d सन १९३८ मध्ये संपूर्ण जगात ७३,४२० लोक येशूच्या मृत्यूच्या स्मारक दिवशी उपस्थित होते. त्यांच्यापैकी ३९,२२५ लोकांनी म्हणजे ५३ टक्के लोकांनी स्मारकविधीच्या चिन्हांत सहभाग घेतला. सन १९९८ पर्यंत स्मारक विधीकरता उपस्थितीची संख्या वाढून ती १,३८,९६,३१२ इतकी झाली आणि त्यांच्यापैकी केवळ ८,७५६ लोकांनी स्मारकविधीच्या चिन्हात भाग घेतला, हे प्रमाण १० मंडळ्यांत १ व्यक्ती असे आहे.
तुम्हाला आठवते का?
◻ येशूने स्वतःला त्याच्या पित्याद्वारे घडवून देण्यात अधीनता दाखवण्याद्वारे आपल्यासमोर कशाप्रकारे उदाहरण मांडले?
◻ प्राचीन इस्राएलात घडविण्याचे कोणते काम झाले?
◻ आतापर्यंत ‘देवाच्या इस्राएलला’ कशाप्रकारे घडविण्यात आले आहे?
◻ ‘दुसऱ्या मेंढरांना’ घडविण्यात कोणता उद्देश आहे?
[१८ पानांवरील चौकट]
ख्रिस्ती धर्मजगताला घडविले जाते
ग्रीसच्या एथेन्स येथून पाठवलेल्या असोशिएटेड प्रेसच्या एका अहवालात ग्रीक ऑर्थोडॉक्स चर्चच्या अलीकडे नियुक्त करण्यात आलेल्या अध्यक्षाविषयी असे म्हटले: “त्यांनी शांतीचे दूत होण्यास हवे होते. पण त्यांच्या वक्तव्यावरून असे वाटते, की ते जणू लढाईची तयारी करणारे कोणी नेते आहेत.”
“अलीकडेच असम्पशन ऑफ द व्हर्जिन पवित्र दिवशी, आणि हा दिवस ग्रीसचा लष्कर दिन म्हणूनही पाळला जातो, आर्चबिशप क्रिस्टोडोसल यांनी असे म्हटले: “गरज पडल्यास आम्ही रक्तपात करण्याकरता आणि स्वतःचा जीव देण्याकरताही तयार आहोत. संपूर्ण चर्च म्हणून आम्ही शांतीकरता प्रार्थना करतो . . . पण वेळ आलीच तर आम्ही लढाईच्या पवित्र शस्त्रांवर देवाचा आशीर्वादही मागतो.”
[१९ पानांवरील चौकट]
“आणखी भर नाही!”
सन १९७० च्या गिलियड पदवीदानाच्या समारंभाच्या वेळी त्यावेळचे उप-अध्यक्ष फ्रॅडरिक फ्रान्झ यांनी पृथ्वीची आशा, दुसऱ्या मेंढरांचे भाग असणाऱ्या गिलियडच्या विद्यार्थ्यांना असे सांगितले, की त्यांच्या हातून अभिषिक्त शेष असल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तीचा कदाचित बाप्तिस्मा होईल. हे शक्य होते? त्यांनी स्पष्ट केले, की बाप्तिस्मा देणारा योहान हा दुसऱ्या मेंढरांपैकी होता आणि त्याने येशूला आणि इतर प्रेषितांना बाप्तिस्मा दिला. शेष जणांना एकत्र करण्याचे काम अद्यापही चालू आहे किंवा कसे याविषयी त्यांनी विचारले. त्यांनी म्हटले: “त्या संख्येत आणखी भर नाही! सन १९३१-३५ मध्येच पाचारण करण्याचे काम संपले आहे! या संख्येत आणखी भर पडायची नाही. पण मग, अलीकडच्या काळात स्मारकविधीच्या चिन्हांमध्ये भाग घेणारे लोक कोण आहेत? ते शेष जणांचे भाग असल्यास, ते बदली म्हणून आहेत! अभिषिक्त लोकांच्या मूळ संख्येत कोणत्याही प्रकारची भर टाकण्यात आलेली नाही, पण विश्वासातून पडलेल्या अभिषिक्त लोकांची बदली म्हणून हे तुलनात्मकरीत्या नवीन लोक स्मारकविधीच्या चिन्हांमध्ये भाग घेतात.”
[१५ पानांवरील चित्र]
सेवेच्या संपत्तीचे आपण किती मोल जाणतो!
[१६ पानांवरील चित्र]
इस्राएल राष्ट्राने स्वतःला अशाप्रकारचे भांडे बनवले ज्याचा केवळ नाशच व्हायचा होता