ईश्वरी मार्गानुसार चालण्याचा निर्धार
देवाची सेवा करावी असे वाटणाऱ्या अनेकांकरता “ईश्वरी जीवनाचा मार्ग” या अधिवेशनात शिकण्यासारखे पुष्कळ काही होते! “मार्गदर्शनाचा, प्रोत्साहनाचा आणि शिक्षणाचा उत्तम कार्यक्रम” असे अधिवेशनाला उपस्थित राहिलेल्या एकाने या अधिवेशनाविषयी म्हटले.
दुसऱ्या एकाने असे म्हटले, की “या अधिवेशनात आवडण्यासारखं, मनन करण्यासारखं आणि शिकण्यासारखं पुष्कळ काही होतं.” आपण या अधिवेशनाच्या कार्यक्रमाचाच विचार करू या.
येशू ख्रिस्त—मार्ग, सत्य व जीवन
अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाचा हा विषय होता. (योहान १४:६) या अधिवेशनामध्ये एकत्र येण्यामागचा हेतू पहिल्या भाषणाद्वारे स्पष्ट करण्यात आला: ईश्वरी जीवनाचा मार्ग या सर्वोत्तम जीवनमार्गाविषयी आणखी शिकणे. त्याच्या लोकांना यहोवा त्याच्या मार्गाने कसे चालावे हे शिकवतो. बायबल, ‘विश्वासू आणि बुद्धिमान दास,’ आणि त्याच्या पवित्र आत्म्याद्वारे तो लोकांना शिकवतो. (मत्तय २४:४५-४७; लूक ४:१; २ तीमथ्य ३:१६) विश्वाच्या सार्वभौमत्वाकडून मार्गदर्शन प्राप्त करणे हा किती मोलाचा सुहक्क!
“ख्रिस्ताची खंडणी—तारणाकरता देवाचा मार्ग,” हे प्रमुख भाषण पहिल्या दिवसाच्या विषयाला अनुलक्षून होते. ईश्वरी जीवनाच्या मार्गानुरूप चालताना यहोवाच्या उद्देशात येशूची कोणती भूमिका आहे हे ओळखणे महत्त्वाचे आहे. वक्त्याने म्हटले: “येशू ख्रिस्ताच्या खंडणी बलिदानाविना कोणत्याही मनुष्याला मग त्याचा विश्वास आणि त्याची कामे कितीही चांगली असली तरी देवाकडून सार्वकालिक जीवन मिळाले नसते. एखाद्या मनुष्याचा विश्वास आणि कामे कितीही चांगली असली तरी देवाकडून सार्वकालिक जीवन मिळवण्याकरता येशू ख्रिस्ताचे खंडणी बलिदान हे अत्यावश्यक होते.” मग वक्त्याने योहान ३:१६ उद्धृत केले: “देवाने जगावर एवढी प्रीति केली की, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे.” ख्रिस्ताच्या खंडणी बलिदानावर विश्वास ठेवण्याकरता आपल्याला सत्याचे अचूक ज्ञान घेण्याची गरज आहे. यहोवाला समर्पण करणे, त्या समर्पणाचे द्योतक म्हणून पाण्याचा बाप्तिस्मा घेणे आणि येशूने दिलेल्या उदाहरणानुसार जगणे यांचाही यात समावेश होतो.—१ पेत्र २:२१.
“प्रीती कधी अंतर देत नाही,” या भाषणाने दुपारच्या कार्यक्रमाची सुरवात झाली. १ करिंथकर १३:४-८ या वचनांत प्रेरणा मिळेल अशा शब्दांत पौलाने प्रेमाचे वर्णन केले आहे, त्या प्रत्येक वचनाची या भाषणात चर्चा करण्यात आली. श्रोत्यांना या गोष्टीची आठवण करून देण्यात आली, की आत्मत्यागी प्रेम हे ख्रिस्ती विश्वासाचे ओळखचिन्ह आहे तसेच देवाला आपली उपासना स्वीकृत होण्यासाठी देवावर आणि शेजाऱ्यांवर प्रेम असणे अत्यावश्यक आहे.
त्यानंतर, “पालकांनो—तुमच्या मुलांमध्ये ईश्वरी मार्ग बिंबवा” हा विषय असलेला तीन भागांचा परिसंवाद होता. देवाच्या वचनाचे वाचन आणि अभ्यास करण्यात स्वतःचे उदाहरण मांडण्याद्वारे पालक त्यांच्या मुलांना देवाची सेवा करण्याकरता मदत करू शकतात. नियमित बायबल अभ्यासात कुटुंबाच्या गरजा लक्षात घेऊन चर्चा करण्याद्वारे ते त्यांच्या मुलांमध्ये सत्य बिंबवू शकतात. मंडळीच्या कामात आणि क्षेत्र सेवेत सहभागी होण्याकरता मुलांची मदत करणेही महत्त्वाचे आहे. या दुष्ट जगात देवाला भिऊन वागणारी मुले लहानाची मोठी करणे हे आव्हान असले तरी, असे केल्यामुळे फार मोठी प्रतिफळे मिळतात.
“उत्तम कामाचे पात्र होण्याकरता स्वतःला यहोवाद्वारे घडवू द्या,” हा त्यानंतरच्या परिसंवादाचा विषय होता. कुंभार ज्याप्रमाणे मातीचे भांडे घडवतो त्याप्रमाणे देव त्याची सेवा करण्याची इच्छा असणाऱ्यांना घडवतो. (रोमकर ९:२०, २१) त्याचे वचन आणि संस्था यांद्वारे सल्ला देण्याद्वारे तो असे करतो. आपण स्वतःला उपलब्ध केल्यास, संधींचा उपयोग केल्यास आणि त्याचे मार्गदर्शन स्वीकारण्यास सदैव तयार असल्यास आपल्या क्षमतांचा पूर्ण वापर करण्यास यहोवा आपल्याला मदत करेल.
त्यानंतर “मिशनरी क्षेत्रात सेवा”—हा उत्साहक कार्यक्रम झाला. सध्या संपूर्ण पृथ्वीवरील १४८ देशांत २,३९० ख्रिस्ती सेवक मिशनरी सेवेचा आनंद उपभोगत आहेत. निष्ठा आणि आवेश यांत त्यांनी एक उत्तम उदाहरण मांडले आहे आणि परदेशी क्षेत्रांत सेवा करण्याच्या सुहक्काबद्दल त्यांना खूप कदर होती. अंतरराष्ट्रीय अधिवेशनांत या कार्यक्रमाच्या वेळी अनेक मिशनऱ्यांनी मिशनरी जीवनातील आव्हाने आणि आनंद यांविषयी सांगितले.
“मरणानंतर जीवन आहे का?” हे पहिल्या दिवसाचे शेवटचे भाषण होते. हजारो वर्षांपासून मानवजात या प्रश्नाने गोंधळून गेली आहे. प्रत्येक समाजातील लोकांना या विषयाला तोंड द्यावे लागले आहे. या प्रश्नाची अनेक कल्पित उत्तरे आहेत. ही उत्तरे प्रत्येक रितीरिवाजाच्या आणि धर्माच्या लोकांपरत्वे वेगवेगळी आहेत. पण खरे उत्तर अद्यापही लोकांना समजलेले नाही.
या प्रश्नाचे खरे उत्तर लोकांना कळावे म्हणून मृत्यूनंतर आपले काय होते? (इंग्रजी) या ३२ पृष्ठांच्या रंगीत माहितीपत्रकाचे वक्त्याने अनावरण केले. जीवनाचे अमरत्व ही शिकवण कोठून आली आणि आज जगाच्या बहुतेक सर्व धर्मांमध्ये ही संकल्पना कशी प्रमुख शिकवण झाली आहे यांविषयी या माहितीपत्रकात सांगण्यात आले आहे. आपण का मरतो, मरतेवेळी आपले काय होते आणि जीव या विषयांवर बायबल काय म्हणते हे स्पष्ट आणि आकर्षक पद्धतीने या माहितीपत्रकात सांगण्यात आले आहे. मेलेल्यांकरता आणि जिवंत असलेल्यांकरता कोणती आशा आहे, यांविषयीही या माहितीपत्रकात माहिती दिलेली आहे. सत्याचा शोध घेणाऱ्यांकरता या प्रकाशनामुळे किती मदत होईल!
सभोवार नजर ठेवून जपून चाला
अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाचा किती उचित विषय! (इफिसकर ५:१५) सकाळच्या कार्यक्रमामध्ये प्रचार आणि शिष्य बनवण्याच्या कार्यावर जोर देण्यात आला. दैनिक वचनावर चर्चा केल्यानंतर “जीवनाच्या मार्गावर येण्याकरता लोकांना मदत करणे” हे भाषण झाले. हे अतिमहत्त्वाचे काम पूर्ण करत असताना, सकारात्मक मनोवृत्ती असणे, इतरांना सत्याविषयी सांगणे सुहक्क आणि कर्तव्य असल्याची जाण असणे महत्त्वाचे आहे. सा.यु. पहिल्या शतकात बहुतेक लोकांनी देवाच्या वचनाचा अव्हेर केला. पण विरोध असतानाही त्या काळी असे लोक होते ‘जे सार्वकालिक जीवनासाठी नेमलेले होते आणि ज्यांनी विश्वास ठेवला.’ (प्रेषितांची कृत्ये १३:४८, ५०; १४:१-५) आजही अशाचप्रकारची परिस्थिती आहे. आज अनेकजण सत्याचा अव्हेर करत असले तरी, अनुकूल प्रतिक्रिया दाखवणाऱ्यांना शोधण्याचे प्रयत्न आपण करत राहतो.—मत्तय १०:११-१३.
त्यानंतरच्या भाषणात इतरांपर्यंत जीवनाचा संदेश घेऊन पोहंचण्याच्या आव्हानाची चर्चा करण्यात आली. आता लोक घरी सापडणे कठीण झाल्यामुळे राज्य संदेशासह जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्याला पोहंचायचे असल्यास आपल्याला पूर्णपणे आणि हरएक प्रकारे प्रयत्न करण्याची गरज आहे. अनेक देशांत, दूरध्वनीच्या साह्याने साक्षकार्य करण्याद्वारे आणि व्यापार क्षेत्रात प्रचार करण्याद्वारे सुवार्तेच्या प्रचारकांना उत्तम परिणाम मिळत आहेत, असे केल्यामुळे ते अशा लोकांपर्यंत पोहंचत आहेत ज्यांना घरोघरच्या प्रचारकार्यात कदाचित भेटता येत नाही.
“मशीहाने आज्ञा दिलेले सर्वकाही शिष्यांना शिकवणे,” या भाषणाने आपल्या सेवाकार्यात कौशल्य संपादन करण्याच्या महत्त्वावर जोर दिला. जेव्हा आपण इतरांकडून शिकतो आणि मंडळीच्या संभांमध्ये मिळालेले उत्तम प्रशिक्षण लागू करतो तेव्हा शिकवण्याच्या कौशल्यात आपण आणखी तरबेज होतो. जसजसे आपण शिकवण्याच्या कामात कौशल्य प्राप्त करतो तसतसे लोकांना बायबल सत्याविषयी शिकवण्याच्या कामातील आपला आनंद द्विगुणीत होऊन आपल्याला समाधान लाभते.
समर्पणाचे आणि बाप्तिस्म्याचे स्पष्टीकरण देऊन सकाळचा कार्यक्रम संपला. वक्त्याने एक मुद्दा असा सांगितला, की आपण देवावर पूर्ण भरवसा ठेवल्यास आणि त्याच्या इच्छेप्रमाणे चालण्याकरता आपण प्रांजळपणे प्रयत्न केल्यास तो आपल्याला सामर्थ्य देऊन आशीर्वादित करील. बुद्धिमान मनुष्याने लिहिले: “तू आपल्या सर्व मार्गांत त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल.” (नीतिसूत्रे ३:६) बाप्तिस्म्याचा आनंदी सोहळा अधिवेशनाचे वैशिष्ट्य होते आणि त्यावरून अनेकांनी ईश्वरी जीवनाच्या मार्गावर चालण्यास सुरवात केल्याचे प्रदर्शित झाले.
जेवणाच्या सुटीनंतर, “अनंत जीवनाच्या ध्येयावर नजर ठेवून सेवा करणे” या भाषणाने दुपारच्या कार्यक्रमाची सुरवात झाली. आज्ञाधारक मानवजातीने पृथ्वीवर आपली सर्वकाळ सेवा करावी हा देवाचा उद्देश नक्की पूर्ण होईल. त्यामुळे हे किती उचित आहे, की आपले विचार, योजना आणि आशा यहोवाची चिरकालिक सेवा करण्याच्या उद्देशाला लक्षात ठेवून असाव्यात! ‘यहोवाचा दिवस’ आपल्याला नेहमी डोळ्यासमोर ठेवायचा असला तरी, त्याची सर्वकाळ सेवा करण्याचा उद्देश आपण विसरता कामा नये. (२ पेत्र ३:१२) देव येशूमार्फत सूड केव्हा घेईल याची निश्चित वेळ आपल्याला माहीत नसल्यामुळे आपण सावध राहतो आणि यहोवाची सेवा निःस्वार्थपणे करत आहोत हे शाबीत करण्याची आपल्याला दररोज संधीही मिळते.
त्यानंतरच्या दोन भाषणांमध्ये पौलाने इफिसकरांना लिहिलेल्या पत्रातील ४ थ्या अध्यायाचे परीक्षण करण्यात आले. पवित्र आत्म्याद्वारे अभिषिक्त केलेल्या आध्यात्मिकरीत्या पात्र असलेल्या ‘मनुष्यांतील देणग्यांचा’ आपल्याला आशीर्वाद लाभला आहे याविषयी देखील चर्चा करण्यात आली. हे वडील आपल्याच आध्यात्मिक लाभाकरता सल्ला आणि मार्गदर्शन पुरवतात. पौलाचे प्रेरित पत्र ख्रिश्चनांना “नवा मनुष्य धारण” करण्याचेही आर्जवते. (इफिसकर ४:८, २४) करुणा, ममता, सौम्यता, लीनता, सहनशीलता आणि प्रेम यांसारख्या गुणांचा नव्या व्यक्तिमत्वात समावेश होतो.—कलस्सैकर ३:१२-१४.
सभोवार नजर ठेवून जपून चालण्यामध्ये जगापासून निष्कलंक राहण्याचा समावेश होतो आणि हाच त्यानंतरच्या भाषणाचा विषय होता. मनोरंजनाची निवड, सामाजिक कार्य आणि भौतिक गोष्टींचा पाठलाग यांत समतोल राखण्याची गरज आहे. याकोब १:२७ येथे जगापासून निष्कलंक राहण्याच्या सल्ल्याप्रमाणे वागल्यामुळे देवाच्या नजरेत आपण पवित्र राहतो आणि आपला विवेक शुद्ध राहतो. आपले जीवन उद्देशपूर्ण होऊ शकते; आपली आध्यात्मिक प्रगती होईलच शिवाय शांती आणि प्रेमळ मित्रही आपल्याला मिळतील.
त्यानंतर तीन भागांचा परिसंवाद होता: “तरुणांनो—ईश्वरी मार्गानुसार चाला.” देवाचे आपल्यावर प्रेम आहे आणि शुद्ध उपासनेला उंचावून धरण्याच्या आपल्या प्रयत्नांची तो कदर करतो हे समजल्याने तरुण मुलांनी त्याची विश्वासूपणे सेवा करण्याकरता त्यांची समजशक्ती प्रशिक्षित केली पाहिजे. समजशक्ती वाढवण्याचा एक मार्ग म्हणजे दररोज देवाचे वचन वाचणे आणि त्यावर मनन करणे. असे करण्याद्वारे आपल्याला यहोवाचा मार्ग जाणण्यास मदत होते. (स्तोत्र ११९:९-११) आईवडील, मंडळीतील वडीलवर्ग आणि संस्थेची प्रकाशने यांद्वारे मिळणारा विचारी सल्ला स्वीकारल्यामुळे समजशक्तीचा विकास होतो. तरुण त्यांच्या समजशक्तीचा सदुपयोग करण्याद्वारे भौतिक मालमत्तेचा सतत विचार, ओंगळ भाषा आणि मनोरंजनाचा अतिरेक या गोष्टींना विरोध करू शकतात कारण या गोष्टी देवापासून पारख्या झालेल्या जगाचे लक्षण आहेत. ईश्वरी जीवनमार्गानुसार चालल्याने लहानग्यांना आणि मोठ्यांना देखील खऱ्या यशाचा आनंद अनुभवता येईल.
“निर्माणकर्ता—त्याचे व्यक्तित्व आणि त्याचे मार्ग,” हे दुसऱ्या दिवसाचे शेवटचे भाषण होते. कोट्यवधी लोकांना निर्माणकर्ता कोण आहे हे माहीत नसल्याचे वक्त्याने सांगितले आणि नंतर म्हटले: “आपल्या जीवनाला खरा अर्थ तेव्हा प्राप्त होतो जेव्हा आपण निर्माणकर्त्याविषयी, आपल्या व्यक्तिगत देवाविषयी माहिती करून घेतो; त्याचे व्यक्तित्त्व जाणून घेतो आणि त्याच्या मार्गानुसार चालतो. . . . दुसऱ्यांना निर्माणकर्त्याचा स्वीकार करण्यात आणि त्याच्या संदर्भात जीवनाचा खरा अर्थ शोधण्यात त्यांना मदत करण्याकरता जगाच्या आणि आपल्या बाबतीत असणाऱ्या वास्तविकतांचा तुम्ही उपयोग करू शकता.” त्यानंतर वक्त्याने बुद्धिमान आणि प्रेमळ निर्माणकर्त्याच्या अस्तित्वाला शाबीत करणाऱ्या पुरव्याची चर्चा केली. इज देअर ए क्रियेटर हू केअर्स अबाऊट यू? या नवीन पुस्तकाचे भाषणाच्या अखेरीस अनावरण करण्यात आले.
“हाच मार्ग आहे; याने चला”
हा अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवसाचा विषय होता. (यशया ३०:२१) कार्यक्रमाची सुरवात उद्दीपित करणाऱ्या तीन भाषणांच्या परिसंवादाने झाली. यात यहेज्केलला मिळालेल्या मंदिराच्या दृष्टान्तावर चर्चा करण्यात आली. या दृष्टान्ताचा देवाच्या लोकांकरता आज फार मोठा अर्थ होतो कारण हा दृष्टान्त आपल्या काळातील खऱ्या उपासनेशी संबंधित आहे. हा दृष्टान्त समजून घेण्याची गुरुकिल्ली म्हणजे: यहोवाचे महान आध्यात्मिक मंदिर खऱ्या उपासनेच्या त्याच्या व्यवस्थेस सूचित होते. या दृष्टान्ताच्या पैलूंविषयी चर्चा करण्यात आली, तसतसे अभिषिक्त शेष आणि अधिपत्य वर्गाचे भावी सदस्य यांच्या प्रेमळ देखरेखीखाली होणाऱ्या कामाला मदत करण्याच्या हेतूने ते स्वतः काय करत आहेत यावर प्रेक्षकांनी विचार केला.
सकाळच्या कार्यक्रमाच्या अखेरीस बायबलवर आधारित असलेले एक सुंदर नाटक दाखवण्यात आले; त्यातील कलाकारांनी प्राचीन काळच्या लोकांप्रमाणेच वेशभूषा केली होती. या नाटकाचा विषय होता: “कुटुंबांनो—दैनिक बायबल वाचन हे स्वतःच्या जीवनाचा एक भाग बनवा!” या नाटकात तीन हिब्रू लोकांचा विश्वास आणि धैर्य दाखवण्यात आले होते ज्यांनी नबुखद्नेस्सर या बॅबिलॉनच्या राजाने उभ्या केलेल्या सोन्याच्या प्रतिमेला दंडवत करण्याचे नाकारले होते. या नाटकाचा मुख्य विषय हा होता, की बायबल हे केवळ प्राचीन इतिहासाचे पुस्तक नाही, तर आजच्या तरुणांना आणि मोठ्यांना त्यातील सल्ल्याने खरोखरच लाभ मिळतो.
दुपारच्या जाहीर भाषणाचा विषय होता: “सार्वकालिक जीवनाचा एकमेव मार्ग.” पाप आणि मृत्यू मानवजातीवर कसे आले याचा सुरवातीपासूनचा इतिहास सांगितल्यावर विचाराला चालना देणाऱ्या शब्दांनी वक्त्याने भाषणाचा समारोप केला: “अधिवेशनातील या दिवसाचा विषय यशया अध्याय ३० आणि वचन २१ यावर आधारलेला आहे: ‘हाच मार्ग आहे; याने चला, अशी वाणी तुमच्या मागून कानी पडेल; मग तुम्हाला उजवीकडे जावयाचे असो किंवा डावीकडे जावयाचे असो.’ हा आवाज तुम्हाला कसा ऐकू येतो? देवाचे वचन अर्थात त्याच्या पवित्र बायबलचे ऐकण्याद्वारे आणि आपला महान मार्गदर्शक यहोवा देव बायबलद्वारे आणि त्याच्या आधुनिक ख्रिस्ती संघटनेद्वारे पुरवत असलेल्या मार्गदर्शनानुसार चालण्याद्वारे आपण तसे करू शकतो. खरोखरच, असे करणे म्हणजे ईश्वरी जीवनाचा एकमेव मार्ग होय.”
त्या आठवड्याकरता असलेल्या टेहळणी बुरूज अभ्यास लेखाच्या सारांशानंतर समारोपाच्या भाषणाची वेळ आली: “यहोवाच्या मार्गावर चालत राहा.” या भाषणात अधिवेशनाच्या संपूर्ण कार्यक्रमाची संक्षिप्तरीत्या उजळणी करण्यात आली. त्यानंतर वक्त्याने देवाच्या मार्गवर चालत राहण्याचा संकल्प सर्वांना वाचून दाखवला.
या संकल्पाचा पुढील प्रेरक शब्दांनी समारोप झाला: “आम्हाला याची पूर्ण खात्री पटली, की शास्त्रवचनीय तत्त्वे, सल्ला आणि बोध यांनुसार चालणे हा आज जगण्याचा सगळ्यात उत्तम मार्ग आहे आणि यांमुळे भवितव्याकरता चांगला पायाही रचला जातो जेणेकरून आपल्याला खऱ्या जीवनावरील पकड पक्की करता येईल. याखेरीज, आपण असा संकल्प यासाठी करतो कारण आपण पूर्ण अंतःकरणाने, मनाने, जीवाने आणि शक्तीने यहोवावर प्रेम करतो!” अधिवेशनातील सर्वांनी मोठ्याने होय, असा एकच गजर करून या संकल्पास आपली सहमती दर्शवली!
[८ पानांवरील चौकट/चित्र]
इज देअर ए क्रियेटर हू केअर्स अबाऊट यू?
अनावरण झालेल्या या नवीन पुस्तकात निर्माणकर्ता, यहोवा याच्या अस्तित्वाविषयी पटण्याजोगा पुरावा सादर करण्यात आला आहे आणि त्याच्या गुणांची चर्चा करण्यात आली आहे. पुष्कळ लौकिक शिक्षण घेतलेले पण देवावर विश्वास न ठेवणाऱ्या लोकांना लक्षात ठेवून हे पुस्तक तयार करण्यात आले आहे. या १९२-पृष्ठांच्या पुस्तकाने देवावर विश्वास असणाऱ्यांचाही विश्वास मजबूत होतो आणि त्याचे व्यक्तित्त्व आणि मार्ग यांची कदर वाढण्याकरताही मदत होते.
इज देअर ए क्रियेटर हू केअर्स अबाऊट यू? हे पुस्तक वाचकाचा देवावर विश्वास आहे, असे गृहीत धरत नाही. तर, या पुस्तकात अशा शास्त्रीय शोधांची आणि संकल्पनांची चर्चा करण्यात आली ज्यांतून निर्माणकर्त्याच्या अस्तित्वाचा पुरावा मिळतो. या पुस्तकांतील काही अध्यायांची नावे अशी आहेत: “तुमचे जीवन अर्थपूर्ण कसे होऊ शकते?,” “आपले विश्व अस्तित्वात कसे आले?—वादाचा विषय,” आणि “तुम्ही किती अद्वितीय आहात!” बायबल, ईश्वरी प्रेरणेने लिहिले गेले याची खात्री आपण का बाळगू शकतो याची चर्चा या पुस्तकाच्या बाकीच्या अध्यायांत करण्यात आली आहे. या नवीन पुस्तकात बायबलची एकंदरीत माहिती देण्यात आली आहे ज्यामुळे निर्माणकर्त्याचे व्यक्तित्व आणि मार्ग स्पष्ट होतात. या पुस्तकात, देवाने दुःखाला अनुमती का दिली याची केवळ चर्चा करण्यात आली नाही, तर तो हे दुःख कायमचे कसे काढून टाकील हेदेखील त्यात स्पष्ट करण्यात आले आहे.
[७ पानांवरील चित्रं]
अनेक लोकांचा बाप्तिस्मा झाला
[७ पानांवरील चित्रं]
यहोवाच्या साक्षीदारांच्या नियमन मंडळाचे सदस्य ए. डी. श्रोडर नवीन माहितीपत्रकाचे अनावरण करताना
[८, ९ पानांवरील चित्रं]
रोमांचक नाटकाने दररोज बायबल वाचण्याचे उत्तेजन दिले