वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w01 १/१५ पृ. २२-२७
  • देवाच्या वचनानुसार आचरण करणारे आनंदी असतात

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • देवाच्या वचनानुसार आचरण करणारे आनंदी असतात
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००१
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • पहिला दिवस—यहोवाचे उपकार विसरू नयेत
  • दुसरा दिवस—देवाच्या महत्कृत्यांविषयी सांगत राहा
  • तिसरा दिवस—यहोवाच्या वचनाचे आचरण करणारे व्हा
  • देवाच्या वचनाच्या शिक्षकांना आपली कामगिरी पूर्ण करण्याचे आवाहन
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००२
  • “आवेशी राज्य उद्‌घोषक” आनंदित मनाने एकत्र जमतात
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००३
  • देवाच्या भविष्यसूचक वचनात भविष्याची आशा!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०००
  • ईश्‍वरी मार्गानुसार चालण्याचा निर्धार
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००१
w01 १/१५ पृ. २२-२७

देवाच्या वचनानुसार आचरण करणारे आनंदी असतात

“हे अधिवेशन राज्य प्रचार कार्यासाठी आपल्याला तयार करण्याकरता यहोवाने केलेल्या तरतुदींपैकी आणखी एक तरतूद आहे,” असे यहोवाच्या साक्षीदारांच्या “देवाच्या वचनानुसार आचरण करणारे” या जिल्हा अधिवेशनाच्या सुरवातीच्या एका भाषणात वक्‍त्‌याने म्हटले. ते पुढे म्हणाले: “येथे उपस्थित असलेल्या सर्वांनी आनंदी कौटुंबिक जीवनाविषयी शिकण्यासाठी, यहोवाच्या संघटनेला सोडून न देण्याचे उत्तेजन आणि राज्य सेवेतील आपला आवेश टिकवून ठेवण्याची प्रेरणा मिळवण्यासाठी आणि आपल्याला सतत सावध राहण्याची गरज आहे हे स्वतःला आठवून देण्यासाठी तयार केले आहे.”

वर्ष २००० च्या मे महिन्याच्या शेवटापासून देवाच्या वचनानुसार आचरण करणारे आणि त्यांचे मित्रजन संपूर्ण जगभरातील विविध ठिकाणी बायबलचे शिक्षण घेण्यासाठी जमले होते. या तीन दिवसीय अधिवेशनात ते कोणकोणत्या गोष्टी शिकले?

पहिला दिवस—यहोवाचे उपकार विसरू नयेत

सुरवातीच्या भाषणात, कार्यक्रमाच्या अध्यक्षाने श्रोत्यांना अधिवेशनांमध्ये एकजुटीने यहोवाची उपासना केल्याने मिळणाऱ्‍या आशीर्वादांचा अनुभव घेण्याचे आमंत्रण दिले. उपस्थित असलेल्या सर्वांना याची हमी देण्यात आली, की या अधिवेशनाचा कार्यक्रम ऐकून त्यांचा विश्‍वास आणखी मजबूत होईल आणि यहोवाबरोबरचा त्यांचा व्यक्‍तिगत नातेसंबंध आणखी पक्का होईल.

प्रत्येक व्यक्‍तीला आनंदी राहण्यासाठी कशाची आवश्‍यकता आहे हे ‘धन्यवादित देवाला’ अर्थात आनंदी देवाला माहीत आहे. (१ तीमथ्य १:११) यहोवाच्या वचनात अर्थात बायबलमध्ये जीवनाच्या सर्वोत्तम मार्गाविषयी सांगितले आहे, या गोष्टीवर “देवाची इच्छा पूर्ण केल्याने आनंद मिळतो” या भाषणाद्वारे भर देण्यात आला. (योहान १३:१७) विविध परिस्थितींमध्ये यहोवाची इच्छा पूर्ण करत राहिल्याने त्यांच्या जीवनाला कसा अर्थ मिळाला हे सांगण्यासाठी अनेक वर्षांपासून यहोवाचे साक्षीदार असलेल्या बंधूभगिनींच्या मुलाखती घेण्यात आल्या. नंतरच्या भाषणाचा विषय होता: “यहोवाच्या चांगुलपणामुळे आनंदी व्हा.” या भाषणादरम्यान, ‘देवाचे अनुकरण करणारे’ या नात्याने ख्रिश्‍चनांनी ‘सर्व प्रकारच्या चांगुलपणाची फळे’ उत्पन्‍न केली पाहिजेत या मुद्द्‌यावर जोर देण्यात आला. (इफिसकर ५:१, ९) असे करण्याचा एक उल्लेखनीय मार्ग म्हणजे, सुवार्तेचा प्रचार करणे व शिष्य बनवणे.—स्तोत्र १४५:७.

मजबूत विश्‍वास आपल्याला अदृश्‍य देवाला ‘पाहण्यास’ कशी मदत करू शकतो हे “जो अदृश्‍य आहे त्याला पाहत असल्यासारखा धीर धरा” या भाषणादरम्यान समजावण्यात आला. आध्यात्मिक मनोवृत्तीच्या लोकांना देवाचे गुण माहीत असतात; आणि आपले आचार-विचारही समजण्याची देवाकडे क्षमता आहे, हे त्यांना माहीत असते हे वक्‍त्‌याने समजावून सांगितले. (नीतिसूत्रे ५:२१) मजबूत विश्‍वास विकसित करण्याकरता आणि आपल्या जीवनात आध्यात्मिक गोष्टींना प्रथम स्थान देण्याकरता त्यांनी कोणकोणती पावले उचलली हे या भाषणादरम्यान मुलाखत घेतलेल्या बंधूभगिनींनी सांगितले.

“सर्व अद्‌भुत गोष्टी घडवणाऱ्‍या यहोवाची स्तुती करा,” हा पहिल्या दिवसाच्या सकाळच्या कार्यक्रमातील शेवटच्या भाषणाचा विषय होता. आपण यहोवाविषयी जितके शिकत राहू तितकी आपल्याला त्याची अर्थात सर्व अद्‌भुत गोष्टी घडवणाऱ्‍याची स्तुती करण्यासाठी कारणे मिळतील, हे श्रोत्यांना समजावण्यात आले. वक्‍त्‌याने म्हटले: “देवाने निर्माण केलेली अनोखी सृष्टी आणि आज तो आपल्याकरता करत असलेल्या इतर अद्‌भुत गोष्टी यांवर आपण मनन करतो तेव्हा आपले अंतःकरण त्याची स्तुती करण्यास प्रेरित होते. गतकाळात त्याने आपल्या लोकांकरता केलेल्या चमत्कारिक गोष्टींवर आपण मनन करतो तेव्हाही आपले मन त्याची स्तुती करण्यासाठी प्रेरित होते. आणि भवितव्यात तो ज्या अद्‌भुत गोष्टी करणार आहे त्यांच्यावर आपण विचार करतो तेव्हाही आपण त्याचे आभार मानण्यासाठी जणू संधी शोधत असतो.”

दुपारच्या कार्यक्रमाचे पहिले भाषण होते: “चांगले करण्याचा कंटाळा करू नका.” या भाषणाने सर्वांना याची आठवण करून दिली, की जगाकडून येणाऱ्‍या दबावांवरून आपण अंत जवळ आल्याचे खात्रीने सांगू शकतो. (२ तीमथ्य ३:१) परंतु हार न मानता आपण “जिवाच्या तारणासाठी विश्‍वास ठेवणाऱ्‍यांपैकी” आहोत हे शाबीत करून दाखवू शकतो.—इब्री लोकांस १०:३९.

कौटुंबिक जीवनाविषयी बायबलमधून कोणता सल्ला देण्यात आला? “देवाच्या वचनाच्या आज्ञेत राहा” या अधिवेशन कार्यक्रमातील पहिल्या परिसंवादाचा पहिला विषय होता: “विवाह सोबती निवडताना.” विवाह सोबती निवडण्याचा निर्णय हा सर्वात गंभीर निर्णय आहे. म्हणूनच, ख्रिस्ती बंधूभगिनी प्रौढ होईपर्यंत विवाह करत नाहीत; शिवाय, ते “केवळ प्रभूमध्ये” विवाह करतात. (१ करिंथकर ७:३९) सर्व ख्रिस्ती कुटुंबांनी आध्यात्मिकरीत्या मजबूत व्हावे अशी यहोवाची इच्छा आहे या मुद्द्‌यावर परिसंवादाच्या दुसऱ्‍या भागात चर्चा करण्यात आली. एक कुटुंब आध्यात्मिकरीत्या मजबूत कसे होऊ शकते याबाबतही काही व्यावहारिक मार्ग सांगण्यात आले. आणि परिसंवादाच्या शेवटल्या भागाने सर्व पालकांना आठवण करून दिली की आपल्या मुलांना देवावर प्रेम करायला शिकवण्याआधी स्वतः पालकांनी देवावर प्रेम केले पाहिजे.

“अफवा आणि चुगल्यांपासून सावध राहा,” या भाषणाद्वारे अनेक मुद्दे श्रोत्यांपुढे मांडण्यात आले. जसे की, जगात अनेक आश्‍चर्यकारक गोष्टी घडत असल्या तरीसुद्धा ख्रिश्‍चनांनी सनसनाटी बातम्या ऐकल्यावर भोळेपणाने नव्हे तर सुज्ञांप्रमाणे वागावे. ख्रिश्‍चनांना सत्य काय आहे हे माहीत असल्यामुळे ते त्याविषयीच अर्थात देवाच्या राज्याच्या सुवार्तेविषयी बोलत राहतात. “‘शरीरातील काट्याचा’ त्रास सहन करणे” हे भाषण अनेकांना सांत्वनदायक व उभारणीकारक वाटले. आपल्याला एका मागून एक परीक्षांना तोंड द्यावे लागत असले तरीसुद्धा यहोवा त्याचा पवित्र आत्मा, त्याचे वचन आणि ख्रिस्ती बंधूसमाज यांद्वारे आपल्याला सर्व काही सहन करण्याची शक्‍ती देतो. याबाबतीत प्रेषित पौलाच्या व्यक्‍तिगत अनुभवातून पुष्कळ उत्तेजन मिळते.—२ करिंथकर १२:७-१०; फिलिप्पैकर ४:११, १३.

पहिल्या दिवसाच्या कार्यक्रमातील शेवटले भाषण होते: “यहोवाच्या संघटनेच्या बरोबरीने पाऊल टाकून चालणे.” (१) यहोवाकडील आध्यात्मिक प्रकाशाची वाढती समज, (२) देवाने आपल्याला सोपवलेली सेवा आणि (३) संघटनेच्या कार्यपद्धतींमध्ये समयोचित फेरफार या तीन क्षेत्रात यहोवाच्या संघटनेने आगेकूच केली आहे यावर या भाषणादरम्यान चर्चा करण्यात आली. मग वक्‍त्‌याने पूर्ण आत्मविश्‍वासाने म्हटले: “आपल्या पुढे असलेल्या भवितव्याची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत.” त्यांनी विचारले: “आपला आरंभीचा भरवसा शेवटपर्यंत दृढ धरण्यास आपल्याजवळ असलेल्या कारणाबद्दल आपल्या मनात कसलीही शंका आहे का?” (इब्री लोकांस ३:१४) उत्तर अगदी स्पष्टच होते. यानंतर मग यू कॅन बी गॉड्‌स फ्रेन्ड! नामक माहितीपत्रक प्रकाशित करण्यात आले. हे माहितीपत्रक, कमी शिक्षण झालेल्यांना यहोवाविषयी शिकवण्याकरता एक प्रभावशाली साहाय्यक ठरेल.

दुसरा दिवस—देवाच्या महत्कृत्यांविषयी सांगत राहा

अधिवेशनाच्या दुसऱ्‍या दिवशी, दैनिक वचनाची चर्चा केल्यानंतर एक परिसंवाद होता: “देवाच्या वचनाचे सेवक.” परिसंवादातील पहिल्या भागात विश्‍वभरात आज प्रचार कार्याला मिळणाऱ्‍या यशाची चर्चा करण्यात आली. हे काम सहनशीलतेने करणे एक आव्हानच आहे कारण बहुतेक लोक आज राज्याचा संदेश नाकारत आहेत. पुष्कळ वर्षांपासून प्रचारक असलेल्या अनेक बंधूभगिनींच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यावेळी त्यांनी, उदासीनता किंवा विरोध यांना सहन करण्यासाठी आपले मन व अंतःकरण खंबीर करण्याद्वारे सेवेतील आपला आनंद कसा टिकवून ठेवला ते सांगितले. परिसंवादातील दुसऱ्‍या भागात, अधिवेशनाला उपस्थित असलेल्या सर्वांना ही आठवण करून देण्यात आली की यहोवाचे साक्षीदार सर्व लोकांना औपचारिकरीत्या व अनौपचारीकरीत्या सुवार्ता सांगण्याचा प्रयत्न करतात. आणि परिसंवादातील शेवटल्या भागात, प्रत्येक ख्रिस्ती आपली व्यक्‍तिगत सेवा कशी वाढवू शकतो त्याचे विविध मार्ग समजावण्यात आले. वक्‍त्‌याने एका गोष्टीवर जोर देऊन सांगितले की, ख्रिस्ती व्यक्‍तीला आपले सेवाकार्य वाढवायचे असेल तर त्याने देवाच्या राज्याला प्रथम स्थान देणे आवश्‍यक आहे; मग, यासाठी त्याला त्रास सहन करावा लागला व आत्मत्याग करावे लागले तरीही.—मत्तय ६:१९-२१.

आपण भौतिक गोष्टींची हाव असलेल्या अभक्‍त जगात राहत असल्यामुळे “चित्तसमाधानासह ईश्‍वरी भक्‍ती आचरा” हे शीर्षक असलेले भाषण अगदी समर्पक होते. वक्‍त्‌याने १ तीमथ्य ६:६-१०, १८, १९ या वचनांच्या आधारावर दाखवून दिले की ईश्‍वरी भक्‍ती ख्रिश्‍चनांना पैशाबद्दल प्रेम न बाळगण्यास कशाप्रकारे मदत करते. कारण, पैशाबद्दलचे प्रेम एखाद्याला सत्य मार्गापासून दूर नेऊ शकते, त्यांना पुष्कळ दुःख सहन करावे लागते. त्यांनी सांगितले, की आपण आर्थिकरीत्या श्रीमंत किंवा गरीब असलो तरी, यहोवाबरोबरचा आपला नातेसंबंध आणि आपली आध्यात्मिक स्थिती यानुसारच आपण खरोखर आनंदी होऊ शकतो. “देवाच्या नावाला कलंक लागेल अशाप्रकारे आपण वागू नये” या भाषणातील मुद्द्‌यांचा श्रोतेगणातील अनेकांवर प्रभाव पडला. यहोवा आपल्या विश्‍वासू साक्षीदारांना कधी विसरत नाही ही गोष्ट या भाषणादरम्यान जोर देऊन सांगण्यात आली. “काल, आज व युगानुयुग सारखाच” असलेल्या येशू ख्रिस्ताचे अद्वितीय उदाहरण आपल्याला जीवनाच्या शर्यतीत धीराने धावत राहण्यास मदत करील.—इब्री लोकांस १३:८.

दुसऱ्‍या दिवशी सकाळच्या कार्यक्रमातील शेवटले भाषण बाप्तिस्म्याचे भाषण होते. यहोवाच्या साक्षीदारांच्या संमेलनात बाप्तिस्म्याचा प्रसंग महत्त्वाचा असतो. पाण्याने बाप्तिस्मा घेण्याद्वारे येशूच्या पदचिन्हांवर चालणाऱ्‍या समर्पण केलेल्या नवोदितांना पाहून सर्वांना आनंद झाला! (मत्तय ३:१३-१७) हे पाऊल ज्यांनी आधीच उचलले होते ते आता देवाच्या वचनाचे आचरण करत आहेत. आणि, बाप्तिस्मा घेतल्यानंतर ते सुवार्तेचे नियुक्‍त सेवक होतात. यहोवाच्या नावाचे पवित्रीकरण करण्यात आपलाही सहभाग आहे या कल्पनेने ते आनंदी होतात.—नीतिसूत्रे २७:११.

“‘चांगले आणि वाईट समजण्यासाठी’ प्रौढता लागते” या भाषणातूनही सडेतोड सल्ला देण्यात आला. चांगले आणि वाईट याबाबतीत जगाचे स्तर अगदीच अयोग्य आहेत. त्यामुळे आपण यहोवाच्या दर्जांवर अवलंबून राहिले पाहिजे. (रोमकर १२:२) देवाच्या मार्गांची अचूक समज मिळवण्याकरता आणि प्रौढतेप्रत वाढण्याकरता सर्वांना झटून प्रयत्न करण्याचे उत्तेजन देण्यात आले. मग आपल्या ज्ञानेंद्रियांच्या सरावाद्वारे आपण ‘चांगले आणि वाईट समजू’ शकतो.—इब्री लोकांस ५:११-१४.

यानंतर मग, “आपली आध्यात्मिकता वाढवण्याकरता परिश्रम घ्या” हा परिसंवाद होता. आध्यात्मिकता वाढवून ती टिकवून ठेवण्याचे महत्त्व खऱ्‍या ख्रिश्‍चनांना माहीत आहे. यासाठी त्यांना परिश्रम अर्थात वाचन, अभ्यास आणि मनन करावे लागते. (मत्तय ७:१३, १४; लूक १३:२४) आध्यात्मिक लोक “सर्व प्रकारची प्रार्थना व विनवणी” करत राहतात. (इफिसकर ६:१८) आपल्या प्रार्थनांतून आपल्या विश्‍वासाची आणि भक्‍तीची खोली, आपल्या आध्यात्मिकतेची पातळी दिसून येते. शिवाय, आपण कोणत्या गोष्टींना “श्रेष्ठ” समजतो तेही आपल्या प्रार्थनांतून दिसून येते. (फिलिप्पैकर १:१०) एक मूल आपल्या प्रेमळ पित्याच्या आज्ञेत राहते तेव्हा या दोघांत, एक प्रेमळ जवळीक निर्माण होते. यहोवा देवाबरोबर आपणही अशाप्रकारची जवळीक साधली पाहिजे यावर या भाषणाद्वारे जोर देण्यात आला. आपला धर्म खरा असला तरी आपण त्या धर्माचे फक्‍त नावापुरते सदस्य असू नये तर देवाला “पाहत असल्यासारखा” मजबूत विश्‍वास आपल्याकडे असला पाहिजे.—इब्री लोकांस ११:६, २७.

“आपली प्रगती सर्वांस दिसू द्या” हा विषय असलेल्या भाषणाद्वारे आध्यात्मिक प्रगतीचा विषय समजावण्यात आला. प्रगती करता येण्यासारख्या तीन क्षेत्रांची चर्चा करण्यात आली. (१) ज्ञान, समज आणि बुद्धी यात प्रगती करता येते (२) देवाच्या आत्म्याची फळे विकसित करण्यात प्रगती करता येते आणि (३) कौटुंबिक सदस्य या नात्याने आपल्या जबाबदाऱ्‍या पार पाडण्याच्या बाबतीत प्रगती करता येऊ शकते.

दुसऱ्‍या दिवशी शेवटचे भाषण होते: “देवाच्या वचनाच्या प्रकाशात प्रगतीशीलपणे चालणे.” या भाषणाच्या वेळी, आयझयाज प्रॉफसी—लाईट फॉर ऑल मॅनकाईन्ड १ (यशयाची भविष्यवाणी—सर्व मानवजातीकरता ज्योती १) हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले. अधिवेशनाला आलेल्यांना हे पुस्तक स्वीकारण्यास आनंद वाटला. या पुस्तकाचा हा पहिला खंड आहे. त्याच्या दोन्ही खंडांमध्ये बायबलमधील यशयाच्या पुस्तकाच्या एक एक अध्यायाची चर्चा करण्यात आली आहे. वक्‍त्‌याने म्हटले: “यशयाच्या पुस्तकात आज आपल्यासाठी एक संदेश आहे. यशयाच्या दिवसांतच यांतील अनेक भविष्यवाण्या पूर्ण झाल्या असल्या तरीसुद्धा, . . . अनेक भविष्यवाण्या आज आपल्या दिवसांत पूर्ण होत आहेत आणि काहींची पूर्णता देवाच्या वचनयुक्‍त नवीन जगात होणार आहे.”

तिसरा दिवस—यहोवाच्या वचनाचे आचरण करणारे व्हा

तिसऱ्‍या व शेवटल्या दिवसाची सुरवात दैनिक वचनाच्या चर्चेने करण्यात आली. त्यानंतर, “देवाची इच्छा पूर्ण करणाऱ्‍यांबद्दल असलेली सफन्याची अर्थपूर्ण भविष्यवाणी” हा परिसंवाद होता. या परिसंवादातील तिन्ही भाषणांतून हे दाखवण्यात आले, की स्वच्छंदी यहुदाच्या दिवसाप्रमाणे आजही जे लोक जाणूनबुजून यहोवाच्या ईशाऱ्‍याकडे दुर्लक्ष करतात त्यांचा तो नाश करील. देवाविरुद्ध पाप केल्यामुळे ते अंध लोकांप्रमाणे चालतील, त्यांना तारणाचा मार्ग दिसणार नाही. परंतु, खरे ख्रिस्ती विश्‍वासूपणे यहोवाचा शोध करतात आणि देवाच्या क्रोधाच्या दिवशी ते बचावले जातील. आणि हे विश्‍वासू लोक आताही देवाच्या आशीर्वादांचा उपभोग घेतात. बायबल सत्याची “शुद्ध वाणी” बोलण्याची संधी त्यांना मिळाली आहे. (सफन्या ३:९) वक्‍त्‌याने म्हटले: “शुद्ध वाणी बोलण्याचा अर्थ फक्‍त सत्यावर विश्‍वास ठेवणे व इतरांना ते शिकवणे इतकाच नाही तर देवाचे नियम आणि तत्त्वे यांच्या एकवाक्यतेत आपले आचरण ठेवणे देखील महत्त्वाचे आहे.”

अधिवेशनाला आलेल्या सर्वांचे लक्ष रविवारी सकाळी असलेल्या नाटकाकडे लागले होते. याचे शीर्षक होते: “आपल्या दिवसाकरता इशारेवजा उदाहरणे.” नाटकातील पात्रांनी जुन्या काळच्या लोकांप्रमाणे वेशभूषा केली होती. वचनयुक्‍त देशाच्या अगदी तोंडाशी आल्यावर इस्राएली लोक यहोवाला विसरले, मूर्तीपूजक स्त्रियांनी त्यांना भुलवले तेव्हा ते त्यांच्या मागे गेले, त्यांनी व्यभिचार व मूर्तीपूजा केली. यामुळे हजारो इस्राएली लोकांचा यहोवाने नाश केला. नाटकातील एक प्रमुख पात्र होता, यामीन. यामीनाची सुरवातीला द्विधा मनःस्थिती झाली होती. मवाबी स्त्रियांचा मोह तो आवरू शकत नव्हता आणि त्याचबरोबर यहोवाची उपासनाही तो सोडू इच्छित नव्हता. भ्रष्ट जिम्रीचा खोटा तर्क आणि फसवी विचारसरणी तसेच फीनहासचा विश्‍वास आणि श्रद्धा सर्वांस दिसून आली. यहोवावर प्रेम न करणाऱ्‍यांबरोबर संबंध ठेवल्याने कोणते वाईट परिणाम होतात याचे या नाटकातून चित्रण करण्यात आले.

नाटकाने पुढील भाषणासाठी पाया घातला. पुढील भाषणाचा विषय होता: “विसरून जाणाऱ्‍या लोकांप्रमाणे होऊ नका.” या भाषणात १ करिंथकर १०:१-१० वचनांचे परीक्षण करण्यात आले. नवीन जगात वारसा प्राप्त करण्यासाठी आपण पात्र आहोत की नाही हे पाहण्यासाठी यहोवा कधी कधी आपल्या आज्ञाधारकतेची परीक्षा घेतो, हा मुद्दा या भाषणाद्वारे स्पष्ट करण्यात आला. आपण नव्या युगाच्या अगदी उंबरठ्यावर येऊन पोहंचलो आहोत तरीसुद्धा आपल्यापैकी काही जण आपल्या शारीरिक इच्छा पूर्ण करण्यात दंग आहेत; आध्यात्मिक ध्येयांकडे त्यांचे मुळीच लक्ष नाही. त्यामुळे उपस्थित असलेल्या सर्वांना, ‘यहोवाच्या विसाव्यात’ प्रवेश करण्याची मिळालेली संधी न दवडण्याचे उत्तेजन देण्यात आले.—इब्री लोकांस ४:१.

जाहीर भाषणाचा विषय होता: “देवाच्या अद्‌भुत कार्यांकडे लक्ष का द्यावे?” यहोवाच्या अद्‌भुत कार्यांतून त्याची बुद्धी आणि आपल्या भोवती असलेल्या सृष्टीवरील त्याचा अधिकार दिसून येतो. (ईयोब ३७:१४) यहोवाने ईयोबाला सृष्टीविषयी कठीणातले कठीण प्रश्‍न विचारले. यावरून त्याला सर्वसमर्थ निर्माणकर्त्याच्या शक्‍तीची कल्पना आली. भवितव्यातही यहोवा आपल्या विश्‍वासू सेवकांसाठी ‘अद्‌भुत कार्ये’ करणार आहे. वक्‍त्‌याने शेवटी म्हटले: “भूतकाळात त्याने काय केले, वर्तमान काळात तो काय करत आहे आणि भविष्यात तो काय करणार आहे याकडे अर्थात त्याच्या अद्‌भुत कार्यांकडे आपण लक्ष दिले पाहिजे.”

टेहळणी बुरूजच्या अभ्यास लेखाचा सारांश दिल्यानंतर अधिवेशनाचे समाप्तीचे भाषण सादर करण्यात आले. “देवाच्या वचनाचे आचरण करण्याच्या बहुमानाचा आदर करा” हा या भाषणाचा विषय होता. देवाच्या वचनाचे आचरण करणे हा एक सुहक्क आहे. (याकोब १:२२) आणि हा सुहक्क अद्वितीय आहे. देवाच्या वचनाचे आपण जितके आचरण करीत राहू तितका आपला त्याच्याबद्दल आदर वाढेल. उपस्थित असलेल्या सर्वांना, या अधिवेशनातून मिळालेली चांगली प्रेरणा, देवाच्या वचनाचे आचरण करण्याच्या मनसेतून पूर्णार्थाने व्यक्‍त करण्यास उत्तेजन देण्यात आले. कारण आनंद मिळवण्याचा हाच एकमेव मार्ग आहे.

[२५ पानांवरील चौकट/चित्र]

तुम्ही देवाचे मित्र होऊ शकताa

शुक्रवारी सकाळी, यू कॅन बी गॉड्‌स फ्रेन्ड हे माहितीपत्रक प्रकाशित करण्यात आले. जगाच्या अनेक भागांमध्ये बायबलचे साध्यासोप्या मार्गाने शिक्षण देण्याची प्रचंड गरज आहे आणि ती गरज भागवण्यास हे माहितीपत्रक आपल्याला साहाय्य करील. कमी शिक्षण झालेल्या आणि फारसे वाचता येत नसलेल्यांसाठी हे माहितीपत्रक एक वरदानच ठरणार आहे.

[तळटीप]

a हे माहितीपत्रक सध्या भारतात उपलब्ध नाही

[२६ पानांवरील चौकट/चित्रे]

यशयाची भविष्यवाणी—सर्व मानवजातीकरता ज्योती

आयझायाझ प्रॉफसी—लाईट फॉर ऑल मॅनकाईंड या दोन खंडांच्या संचातील पहिला खंड मिळाल्यावर अधिवेशनाला आलेल्या सगळ्यांना खूप आनंद झाला. या प्रकाशनात, आपल्या दिवसाकरता यशयाच्या भविष्यवाणीचे व्यावहारिक महत्त्व काय आहे यावर जास्त जोर देण्यात आला आहे.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा