जीवनाच्या सर्वोत्तम मार्गात एकत्रित
जगाच्या लोकसंख्येत दिवसेंदिवस अशीच वाढ होत गेली, तर लवकरच या पृथ्वीवरील लोकसंख्येचा आकडा सहाशे कोटीच्या घरात जाईल. आपण सर्व एकाच मनुष्यापासून आलो असलो, तरी बहुतेक लोक हे स्वीकारण्यास तयार नाहीत, की ते जागतिक कुटुंबाचे सदस्य असून बुद्धिमान आणि प्रेमळ निर्माणकर्त्याला त्यांना जाब द्यावा लागेल. राष्ट्रांतील, जातीजातीमधील आणि संस्कृतींमधील फाटाफूट आणि झगडे यांमुळे ही दुःखद परिस्थिती स्पष्ट दिसून येते.
सध्याच्या जागतिक परिस्थितींचा विचार करता, संपूर्ण पृथ्वीवरील लोक एक होतील ही अशक्य कोटीतील गोष्ट वाटते. द कोलंबिया हिस्ट्री ऑफ द वर्ल्ड हे पुस्तक म्हणते: “एकोप्याने कसे राहावे, हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न सोडवण्यासाठी आजच्या लोकांना एकही विचार पुढे मांडता येत नाही.”
पृथ्वीवरील सर्व लोकांत ऐक्य साधण्याकरता कोणत्याही नवीन कल्पनेची गरज नाही. कारण पवित्र शास्त्रवचनांमध्ये ऐक्याने राहण्याचा मार्ग दाखवण्यात आला आहे. हा मार्ग, पृथ्वी आणि त्यावरील अवघे जीवन ज्याने निर्माण केले आहे त्याच्या उपासनेच्या केंद्राभोवती गुंफलेला आहे. विचार, उद्देश आणि जीवनशैली यांत देवाच्या लोकांचे आधीपासूनच ऐक्य आहे. २३३ राष्ट्रांतील पंचावन्न लाखांपेक्षा अधिक असलेल्या या सर्व लोकांचे असे ठाम मत आहे, की ईश्वरी जीवनाचा मार्ग हाच सर्वोत्तम आहे. स्तोत्रकर्त्याप्रमाणे ते प्रार्थना करतात: “हे परमेश्वरा, तुझा मार्ग मला दाखीव; मी तुझ्या सत्यमार्गाने चालेन; तुझ्या नावाचे भय धरण्यास माझे चित्त एकाग्र कर.”—स्तोत्र ८६:११.
संदेष्टा यशाया याने खऱ्या उपासनेतील लोकांच्या ऐक्याविषयी फार आधीच भाकीत केले होते: “शेवटल्या दिवसांत असे होईल की परमेश्वराच्या मंदिराचा डोंगर पर्वताच्या माथ्यावर स्थापण्यात येईल, आणि सर्व डोंगरांहून तो उंच होईल; त्याकडे सर्व राष्ट्रांतील लोक लोटतील. देशादेशांतील लोकांच्या झुंडी जातील व म्हणतील, चला, आपण परमेश्वराच्या पर्वतावर याकोबाच्या देवाच्या मंदिराकडे चढून जाऊ; तो आम्हास आपले मार्ग शिकवो, म्हणजे आम्ही त्याच्या पथांनी चालू.”—यशया २:२, ३.
यहोवाच्या साक्षीदारांचे ऐक्य अनन्य साधारण आहे. जगभरात त्यांच्या ८७,००० पेक्षा जास्त मंडळ्या असून त्यांना प्रत्येक आठवडी सगळीकडे सारखेच आध्यात्मिक अन्न मिळते. (मत्तय २४:४५-४७) पण यहोवाच्या साक्षीदारांनी, सन १९९८ च्या मध्यापासून ते १९९९ च्या सुरवातीपर्यंत त्यांचे ऐक्य एका वेगळ्याच प्रकारे दाखवले आहे—जगभरात झालेल्या “ईश्वरी जीवनाचा मार्ग” या अधिवेशनांना एकत्र येण्याद्वारे. तेरा देशांत झालेल्या या आंतरराष्ट्रीय अधिवेशनांकरता विविध प्रदेशांतून अनेक प्रतिनिधी आले होते. इतरत्र झालेली अधिवेशने प्रांतीय होती. पण या अधिवेशनांमध्ये जी आध्यात्मिक मेजवानी देण्यात आली ती सर्व ठिकाणी सारखीच होती.
प्रेक्षागृहांत आणि स्टेडिअम्समध्ये यहोवाकडून शिकण्याकरता नीटनीटके कपडे घातलेले प्रतिनिधी आनंदाने येताना पाहणे किती सुखावह होते! अमेरिकेतील मिशिगन येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय अधिवेशनाला उपस्थित राहिलेल्या एका महिला प्रतिनिधीचे उल्लेखनीय मत होते. तिने म्हटले: “झेक प्रजासत्ताक, बार्बाडोस, नायजेरिया, हंगेरी, इंग्लंड, हॉलंड, इथियोपिया, केनिया आणि जगभरातून आलेल्या इतर अनेक देशांतून आलेल्या बांधवांचे स्वागत करताना पाहणे किती आनंदाचे होते! बांधवांमधील ऐक्य पाहण्याचा हा सुंदर अनुभव होता; एकमेकांविषयी आणि महान यहोवा देवाविषयी असलेल्या प्रेमामुळे मला अश्रू आवरत नव्हते.” जगभरातील कोट्यवधी लोकांना आवडलेल्या या अधिवेशन कार्यक्रमाची उजळणी पुढील लेखात केली जाईल.
[Picture Credit Line on page 3]
Mountain High Maps® Copyright © 1997 Digital Wisdom, Inc.