वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w99 १/१ पृ. ३०-३१
  • क्षमा केल्यामुळे बचावाची संधी मिळते

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • क्षमा केल्यामुळे बचावाची संधी मिळते
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • दया आणि बचाव
  • थोर योसेफ
  • आपल्याकरता धडा
  • “मी देवाच्या ठिकाणी आहे काय?”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१५
  • दुष्काळी काळात जीवन राखणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८८
  • यहोवा योसेफला विसरला नाही
    बायबलमधून शिकू या!
  • योसेफाचे भाऊ त्याचा द्वेष करतात
    बायबल कथांचं माझं पुस्तक
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
w99 १/१ पृ. ३०-३१

त्यांनी यहोवाच्या इच्छेनुसार केले

क्षमा केल्यामुळे बचावाची संधी मिळते

ईजिप्तच्या पंतप्रधानासमोर उभे राहिलेल्या याकोबाच्या दहा मुलांमध्ये एक भयानक गुपित होते. पुष्कळ वर्षांआधी त्यांनी त्यांचा सावत्र भाऊ योसेफ याला दास म्हणून विकले होते. पण आपल्या वडिलांना मात्र त्यांनी सांगितले होते की, योसेफाला एका रानटी पशुने ठार केले.—उत्पत्ति ३७:१८-३५.

आता, सुमारे २० वर्षांनंतर, फार भयंकर दुष्काळ पडल्यामुळे या दहा पुरुषांना अन्‍न विकत घ्यायला ईजिप्तला यावे लागले. पण, त्यांच्यासमोर पुष्कळ अडचणी आल्या. तोच पंतप्रधान धान्य विक्रीचे कामही पाहत होता; त्याने त्यांच्यावर हेर असल्याचा आरोप केला. त्याने त्यांच्यामधील एकाला तुरुंगात डांबून ठेवले आणि बाकीच्यांना घरी पाठवून बन्यामीन या त्यांच्यातल्या सर्वात धाकट्या भावाला आणायला सांगितले. त्यांनी बन्यामिनाला सोबत आणल्यावर या पंतप्रधानाने बन्यामिनाला अटक करण्यासाठी एक युक्‍ती योजली.—उत्पत्ति ४२:१–४४:१२.

यावर, यहुदा हा याकोबाचा पुत्र पुढे येऊन बोलला, ‘आम्ही बन्यामिनाशिवाय जर घरी गेलो, तर आमचा बाप नक्की मरेल.’ मग असे काही घडले ज्याची अपेक्षा यहुदाने किंवा त्याच्यासोबत आलेल्यांनी सुद्धा केली नव्हती. याकोबाच्या मुलांव्यतिरिक्‍त बाकीच्यांना खोलीबाहेर जायला सांगितल्यावर तो पंतप्रधान मोठ्याने रडू लागला. मग स्वतःला सावरून तो म्हणाला: “मी योसेफ आहे.”—उत्पत्ति ४४:१८–४५:३.

दया आणि बचाव

“माझा बाप अजून जिवंत आहे काय?” असे योसेफाने आपल्या सावत्र भावांना विचारले. त्यांनी काहीच उत्तर दिले नाही. साहजिकच, योसेफाच्या सावत्र भावांना काय बोलावे तेच कळेना. त्यांनी आनंदी व्हावे की घाबरून जावे? २० वर्षांआधी त्यांनीच तर त्याला दास म्हणून विकले होते. योसेफ त्यांना तुरुंगात टाकू शकत होता, धान्य न देताच घरी पाठवू शकत होता किंवा—याहूनही भयानक गोष्ट म्हणजे—त्यांना ठार मारू शकत होता! म्हणूनच, योसेफाच्या सावत्र भावांच्या “तोंडून काही उत्तर निघेना, कारण ते त्याजपुढे अतिशय घाबरले” होते.—उत्पत्ति ४५:३.

योसेफाने त्यांच्या मनातली भीती लगेच दूर केली. तो त्यांना म्हणाला, “अंमळ जवळ या.” तेव्हा ते जवळ गेले. मग तो म्हणाला, “तुमचा भाऊ योसेफ, ज्याला तुम्ही मिसर देशात विकून टाकिले तो मीच. तुम्ही मला या देशात विकून टाकिले याबद्दल आता काही दुःख करू नका; आणि संताप करून घेऊ नका, कारण तुमचे प्राण वाचवावे म्हणून देवाने मला तुमच्यापुढे पाठविले.”—उत्पत्ति ४५:४, ५.

योसेफाने त्यांच्यावर उगाच दया केली नव्हती. प्रथम त्याने त्यांच्या पश्‍चात्तापाचा पुरावा पाहिला होता. उदाहरणासाठी, आपल्या सावत्र भावांवर योसेफाने हेर असण्याचा आरोप केला, तेव्हा त्यांनी एकमेकांना असे म्हणताना त्याने ऐकले: ‘आपण आपल्या भावाच्या बाबतीत खरोखर अपराधी आहोत म्हणून हे दुःख आपणावर आले आहे.’ (उत्पत्ति ४२:२१) शिवाय, बन्यामिनाऐवजी यहुदा स्वतः दास बनायला तयार झाला होता म्हणजे धाकटा भाऊ वडिलांकडे जाऊ शकत होता.—उत्पत्ति ४४:३३, ३४.

म्हणून योसेफाने जी दया दाखवली ती योग्यच होती. त्याने हे जाणून घेतले की, असे केल्याने त्याच्या सबंध कुटुंबाचा बचाव होईल. म्हणून, योसेफाने आपल्या सावत्र भावांना आपल्या पित्याकडे अर्थात याकोबाकडे जाऊन हे सांगायला सांगितले: “तुमचा मुलगा योसेफ असे म्हणतो की, देवाने मला अवघ्या मिसर देशाचा सत्ताधीश केले आहे तर मजकडे निघून या, विलंब करू नका; तुम्ही गोशेन प्रांतात वस्ती करून राहावे; तुम्ही, तुमची मुले, नातवंडे, शेरडेमेंढरे, गुरेढोरे व तुमचे सर्व काही घेऊन माझ्यासमीप राहावे . . . तर येथे मी तुमचे संगोपन करीन.”—उत्पत्ति ४५:९-११.

थोर योसेफ

येशू ख्रिस्ताला थोर योसेफ म्हणता येईल कारण या दोन व्यक्‍तींमध्ये बरीच साम्यता आहे. योसेफाप्रमाणेच, येशूलाही त्याच्या भावांनी अर्थात अब्राहामाच्या सह पुत्रांनी वाईट वागणूक दिली होती. (पडताळा प्रेषितांची कृत्ये २:१४, २९, ३७.) तरीपण, दोघांच्या परिस्थितीत विलक्षण बदल घडला. कालांतराने, योसेफ दासापासून पंतप्रधान बनला; त्याचे हे पद फारोच्या खालोखालचे होते. त्याचप्रमाणे, यहोवाने येशूला मृतातून उठवून ‘आपल्या उजव्या हाताकडचे’ अत्युच्च स्थान दिले.—प्रेषितांची कृत्ये २:३३; फिलिप्पैकर २:९-११.

पंतप्रधान असल्यामुळे ईजिप्तला धान्य विकत घ्यायला येणाऱ्‍या सर्वांना तो धान्य देऊ शकत होता. आज, थोर योसेफाचा पृथ्वीवर एक विश्‍वासू आणि बुद्धिमान दास वर्ग आहे ज्याच्याद्वारे तो “यथाकाळी” आध्यात्मिक अन्‍न देत आहे. (मत्तय २४:४५-४७; लूक १२:४२-४४) खरोखर, येशूकडे येणारे, “ह्‍यापुढे भुकेले असे होणार नाहीत, व तान्हेलेहि होणार नाहीत . . . कारण राजासनापुढे मध्यभागी असलेला कोकरा त्यांचा मेंढपाळ होईल व तो त्यांना जीवनाच्या पाण्याच्या झऱ्‍याजवळ नेईल.”—प्रकटीकरण ७:१६, १७.

आपल्याकरता धडा

योसेफ दयेचे एक उल्लेखनीय उदाहरण आहे. न्यायाचा तंतोतंत अंमल पाहिला, तर त्याला ज्यांनी दास म्हणून विकून टाकले त्यांना शिक्षा देणे योग्य होते. याच्या अगदीच विपरीत, भावनाविवश झाल्यामुळे कदाचित त्याने त्यांच्या अपराधाकडे दुर्लक्ष केले असते. परंतु, योसेफाने असे काहीच केले नाही. उलट, त्याने आपल्या सावत्र भावांच्या पश्‍चात्तापाचे परीक्षण केले. मग, त्यांना मनापासून दुःख होत असल्याची खात्री पटल्यावर त्याने त्यांना क्षमा केली.

आपणही योसेफाचे अनुकरण करू शकतो. आपल्याविरुद्ध पाप केलेल्या व्यक्‍तीने मन बदल्याचे खरोखर प्रदर्शित केल्यावर आपण त्याला क्षमा केली पाहिजे. अर्थात, भावनांनी भारावले जाऊन आपण गंभीर अपराधाकडे कानाडोळा करू नये. दुसऱ्‍या बाजूला, मनात राग बाळगून खऱ्‍या पश्‍चात्तापाकडेही दुर्लक्ष करता कामा नये. तर मग, आपण ‘एकमेकांचे सहन करत राहू या आणि आपसात क्षमा करत राहू या.’ (कलस्सैकर ३:१३) असे केले, तर आपण आपला “क्षमाशील” देव यहोवा याचे अनुकरण करत असू.—स्तोत्र ८६:५; मीखा ७:१८, १९.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा