“लबानोनवरील गंधसरूसारखा उंच”
लबानोनच्या सुंदर पर्वतांवर, आर्झ आराब नावाचे वृक्ष वाढतात; त्यांचा अर्थ होतो “प्रभुचे गंधसरू.” एकेकाळी सबंध पर्वताला झाकून टाकलेल्या त्या हिरव्यागार दिमाखदार वृक्षांचा उल्लेख बायबलमध्ये सुमारे ७० वेळा केला आहे—इतर कोणत्याही झाडाचा इतक्यांदा उल्लेख नाही.
शास्त्रवचनांमध्ये, लबानोनच्या या डौलदार गंधसरूंचे वर्णन “उमदा” आणि “विशाल” या शब्दांनी करण्यात आले आहे. (गीतरत्न ५:१५; यहेज्केल १७:२३, सुबोध) या गंधसरूचा आकार आणि लाकडाच्या टिकाऊपणामुळे घरे, जहाजे बांधायला शिवाय फर्निचर बनवायलाही त्यांचा पूर्वीपासून सर्रास वापर होत आला आहे. त्याच्या लाकडाचा सुगंध आणि उबदार लालसर रंगही अत्यंत आकर्षक आहे आणि त्यात राळेचे प्रमाण अधिक असल्यामुळे ते कुजत नाही आणि त्याला कीडही लागत नाही. हे वृक्ष इतके उंच आणि भव्य असतात की त्यांची उंची १२० फूट तर व्यास ४० फुटांचा असतो आणि त्यांची मुळे खोलवर रुजलेली आणि मजबूत असतात. म्हणूनच, काही आधुनिक अरण्याधिकाऱ्यांनी त्यांचे वर्णन “वनस्पती दुनियेचे सरताज” असे केले आहे!
यहेज्केल या बायबल लेखकाने मशीहाची तुलना गंधसरूच्या डहाळीशी केली ज्याची पेरणी खुद्द देवाने केली. (यहेज्केल १७:२२) खरे म्हणजे, “गंधसरू” यासाठी असलेला ग्रीक शब्द “दृढ केले जाणे” या मूळ अर्थातून येतो. आज, मशीहा, येशू ख्रिस्ताच्या अनुयायांनी अशाचप्रकारे उंच, लवचीक गंधसरूप्रमाणे “विश्वासात स्थिर . . . खंबीर” असण्याची गरज आहे. (१ करिंथकर १६:१३) हे कसे शक्य आहे? गैरख्रिस्ती प्रभावांचा खंबीरपणे प्रतिकार करून आणि निष्ठा व ईश्वरी भक्तीच्या मार्गावर टिकून हे शक्य होते. जे लोक असे करतात त्यांचे बायबलमध्ये ‘लबानोनवरील गंधसरूसारखा उंच वाढणारा नीतिमान’ असे वर्णन केले आहे.—स्तोत्र ९२:१२, द न्यू इंग्लिश बायबल.