कुटुंबासाठी खरी मदत
“अमेरिकेत कुटुंब संकटात पडलंय हे अगदी प्रामाणिकपणे म्हणता येते. घटस्फोटांचे दर, विवाहाबाहेर झालेल्या मुलांच्या जन्मांची आकडेवारी [व] बालगुन्हेगारीची आणि विवाहसोबत्यांशी गैरवागणुकीची प्रकरणे पाहूनच असं म्हणता येतं.”
टॉम ब्रोकॉ नामक संयुक्त संस्थानाच्या टेलिव्हिजन भाष्यकाराचे हे शब्द जवळजवळ बहुतेक देशांना लागू होतात. हे संकट म्हणजे काय?
अनेक प्रकारे कुटुंब हे समाजाचे मूलभूत बांधकाम घटक आहे. कुटुंब संकटात असल्यास समाजही संकटात असतो. शिवाय, कुटुंबातूनच मुलांना भावनिक आणि आर्थिक आधार मिळतो. येथेच त्यांना जीवनाचे पहिले आणि सर्वात महत्त्वाचे धडे शिकायला मिळतात. जर कुटुंबच संकटात असेल तर मुले काय शिकतील? त्यांना सुरक्षितता कुठे मिळेल? ते मोठे होऊन कशाप्रकारचे प्रौढ बनतील?
या आणीबाणीच्या प्रसंगी कुटुंबासाठी काही मदत आहे का? होय आहे. कुटुंब ही अशी एक संस्था आहे जिची स्थापना स्वतः देवाने केली होती. (उत्पत्ति १:२७, २८) आणि त्याने आपले वचन बायबल यामध्ये कुटुंबासाठी अत्यावश्यक असे मार्गदर्शन दिले आहे. (कलस्सैकर ३:१८-२१) आपण संपूर्ण समाजाला बदलवू शकणार नाही हे मात्र खरे आहे, परंतु, बायबलचा सल्ला आपल्या स्वतःच्या कुटुंबात तरी लागू करू शकतो. ज्या लोकांनी असे केले व ज्यांना चांगले परिणाम लाभले अशा लोकांबद्दल आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो.
घटस्फोट थांबवणे
अनेक देशांत, सर्व विवाहांतील सुमारे ५० टक्के विवाह घटस्फोटामुळे संपुष्टात येतात. मानवी नातेसंबंधातील हे मोठ्या प्रमाणावरील अपयश आहे! आणि या कारणासाठी एकटे पालक झालेले, आपल्या मुलांचे संगोपन करण्याचे धाडसी काम करतात. परंतु पुष्कळजण या गोष्टीशी सहमत होतील की एखाद्या जोडप्याने आपल्या समस्या सोडवणे व एकत्र राहणे हेच सर्वात उत्तम आहे.
सॉलमन बेटांवरील एका दांपत्याचा विवाह मोडण्याच्या मार्गावर होता. एका प्रमुखाचा पुत्र असलेला तो पती अतिशय हिंसक होता; शिवाय त्याला पुष्कळ वाईट सवयी देखील होत्या. त्याच्या पत्नीला त्याच्याबरोबर राहायला इतके कठीण जात होते की तिने आत्महत्यासुद्धा करण्याचा प्रयत्न केला होता. मग पती, यहोवाच्या साक्षीदारांबरोबर बायबलचा अभ्यास करण्यास तयार झाला. त्याला समजले, की जो कोणी देवाला संतुष्ट करू इच्छितो त्याने जे चूक आहे ते फक्त माहीत करून घेणे पुरेसे नाही तर “वाइटाचा द्वेष” देखील केला पाहिजे. (स्तोत्र ९७:१०) यामध्ये, लबाडी, चोरी, हिंसा आणि अतिमद्यपान या गोष्टींचा समावेश होतो. त्याने हा सल्ला ऐकला आणि आपल्या वाईट सवयींवर तसेच आपल्या तापट स्वभावावर मात केली. त्याच्यात झालेला बदल पाहून त्याच्या पत्नीला आश्चर्य वाटले; त्यांचे वैवाहिक जीवन खूप सुधारले; हे सर्व देवाच्या वचनाच्या प्रभावामुळे शक्य झाले.
दक्षिण आफ्रिकेत, यहोवाची साक्षीदार असलेल्या एका स्त्रीला समजले की तिच्या कंपनीची मालकीण आणि तिचा पती घटस्फोट घेण्याचा विचार करीत आहेत. विवाहाविषयी देवाचा दृष्टिकोन काय आहे त्याविषयी त्या स्त्रीने आपल्या मालकिणीला सांगितले आणि तिला कौटुंबिक जीवनाचे रहस्य नामक पुस्तक दाखवले. यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेल्या या पुस्तकात, विवाहाला लागू होणारी बायबल तत्त्वे आहेत, शिवाय दांपत्यांनी समस्या कशा सोडवाव्यात त्यासाठी बायबल मदत पुरवते यावरही ते पुस्तक जोर देते. मालकिणीने आणि तिच्या पतीने ते पुस्तक वाचले आणि त्यातील बायबल सल्ला अनुसरण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला. परिणाम, घटस्फोट घेण्याचा विचार त्यांनी सोडून दिला—बायबल तत्त्वांचे अनुसरण केल्याने आणखी एक विवाह वाचला.
विविध धर्म
वैवाहिक सोबती वेगवेगळा धर्म आचरतात तेव्हा काय? वस्तुस्थिती लक्षात घेऊन बायबल ख्रिश्चनांना “केवळ प्रभूमध्ये” विवाह करण्याचा सल्ला देते. (१ करिंथकर ७:३९) परंतु, काही वेळा एखादा सोबती दुसरा धर्म आचरू लागतो. तेव्हा त्यांचा विवाह संपुष्टात आला पाहिजे का? मुळीच नाही.
बोत्सवाना येथील एक स्त्री अलीकडेच यहोवाची साक्षीदार बनली; तिच्या नवीन विश्वासामुळे तिच्यात कोणते परिवर्तन झाले याबद्दल तिला विचारण्यात आले. तिने आपल्या पतीला याचे उत्तर देण्यास सांगितले; तो असे म्हणाला: “माझी पत्नी यहोवाची साक्षीदार झाल्यापासून मी तिच्यात पुष्कळ चांगले बदल पाहिले आहेत. ती पूर्वीपेक्षा आता शांत व सुज्ञ झाली आहे. धुम्रपानाच्या सवयीवर मी अजूनतरी मात करू शकलेलो नाही पण तिच्यात मात्र मी सवय सोडण्याची प्रबळ इच्छा आणि निश्चय पाहिला. ती मुलांबरोबर, माझ्याबरोबर आणि इतरांबरोबरही अतिशय प्रेमानं, जिव्हाळ्यानं वागू लागली आहे. पूर्वीपेक्षा ती आता जास्त सहनशील झाली आहे, विशेषकरून मुलांबरोबर. मी तिला तिचा बहुतेक वेळ सेवेत घालवताना, इतरांना आपल्या जीवनात सुधार करावयास मदत करताना पाहतो. माझ्या स्वतःमध्येही सकारात्मक बदल झाला आहे. आणि हे सर्व तिच्याच चांगल्या उदाहरणामुळं झालं असं मला वाटतं.” बायबल तत्त्वांचा या विवाहावर किती उत्तम प्रभाव पडला! साक्षीदार नसलेल्या अनेक वैवाहिक सोबत्यांनी आपल्या साक्षीदार सोबत्यांची अशाप्रकारे प्रशंसा केली आहे.
पिता स्वतःवरची जबाबदारी झटकतो तेव्हा
पिता आणि मुलांमधील नातेसंबंध, मजबूत कुटुंबे तयार करण्याची गुरुकिल्ली आहे. प्रेषित पौलाने सल्ला दिला: “बापांनो, तुम्ही आपल्या मुलांना चिरडीस आणू नका, तर प्रभूच्या शिस्तीत व शिक्षणात त्यांना वाढवा.” (इफिसकर ६:४) म्हणूनच, आपली भूमिका न बजावणारे पिताच अनेक सामाजिक समस्यांना कारणीभूत आहेत असा द विल्सन क्वॉटरली मधील लेखाने त्यांच्यावर आरोप केला हे समजण्याजोगे आहे. त्यात म्हटले होते: “सन १९६० पासून १९९० पर्यंतच्या काळात, आपल्या पित्यांपासून दूर राहणाऱ्या मुलांची टक्केवारी दुप्पटीपेक्षा अधिक झाली आहे. . . . अमेरिकन समाजाला पछाडणाऱ्या सर्वात त्रासदायक समस्यांमागील प्रमुख कारण, पितृत्त्वाची जबाबदारी झटकून टाकणे हे आहे.”
याचा अर्थ असा होतो का की, ज्या मुलांना त्यांच्या पित्यांचे मार्गदर्शन मिळाले नाही अशी मुले जीवनात कधीच यशस्वी होणार नाहीत? नाही. प्राचीन काळच्या स्तोत्रकर्त्याने लिहिले: “माझ्या आईबापांनी मला सोडिले तरी परमेश्वर मला जवळ करील.” (स्तोत्र २७:१०) थायलंडमधील एका नऊ वर्षाच्या मुलाच्या बाबतीत हे खरे ठरले. बाळ असतानाच त्याची आई वारली आणि त्याच्या बापाने त्याला स्वतःच्या आईजवळ ठेवले कारण त्याला तो नको होता. कोणालाच आपली गरज नाही, आपल्यावर कोणी प्रेम करीत नाही अशी त्याची भावना झाल्यामुळे तो बंडखोर झाला व त्याला गुंड म्हणून ओळखले जाऊ लागले. तो त्याच्या आजीलाही धमकी देत असे. एकदा, यहोवाच्या साक्षीदारांच्या दोन पूर्णवेळच्या सुवार्तिकांनी पाहिले की तो नेहमी स्थानीय राज्य सभागृहाच्या बाहेर उभा राहायचा, म्हणून एकदा त्याला त्यांनी आपल्या घरी बोलवले.
त्यांनी त्याला सांगितले की देव, पित्याप्रमाणे आपल्या मुलांवर प्रेम करतो. विश्वासू मानवांसाठी देवाने पृथ्वीवर परादीसचे अभिवचन दिले आहे हेही त्यांनी त्याला सांगितले. (प्रकटीकरण २१:३, ४) हे सर्व ऐकून त्या मुलात आस्था निर्माण झाली आणि तो दररोज आणखी शिकण्यासाठी येऊ लागला. साक्षीदारांनी त्याला सांगितले, की देवाने त्याचा पिता व्हावा असे त्याला वाटत असेल तर त्याला गुंडगिरी सोडून द्यावी लागेल. पौलाने रोमकरांना जे लिहिले त्याच्या सुसंगतेत हे होते; तो म्हणाला होता: “शक्य तर सर्व माणसांबरोबर तुम्हाकडून होईल तितके शांतीने राहा.” (रोमकर १२:१८) शिवाय, त्याला आपल्या आजीबरोबरही दयेने वागण्याची गरज होती. (१ तीमथ्य ५:१, २) काही काळातच तो बायबल तत्त्वांचे आपल्या जीवनात अनुसरण करू लागला; आणि आपल्या आजीबरोबर चांगल्याप्रकारे वागू लागला. (गलतीकर ५:२२, २३) त्याच्यातील बदल पाहून शेजारी इतके प्रभावीत झाले की, आपल्याही मुलांनी यहोवाच्या साक्षीदारांबरोबर बायबलचा अभ्यास करावा असे त्यांना वाटू लागले!
शांत स्वभाव
प्रेषित पौलाने कलस्सैकरांना लिहिले: “पूर्णता करणारे बंधन अशी जी प्रीति ती ह्या सर्वांवर धारण करा. ख्रिस्ताची शांती तुमच्या अंतःकरणात राज्य करो.” (कलस्सैकर ३:१४, १५) शांत स्वभाव आणि मनःपूर्वक प्रेम कुटुंबाला नक्कीच एकत्र ठेवेल. शिवाय ते दीर्घकाळापासून कुटुंबात पडलेली दरी भरून काढू शकतात. अल्बेनियात राहणाऱ्या रुकियॉने, कौटुंबिक मतभेदामुळे आपल्या भावाबरोबर १७ वर्षांपर्यंत अबोला धरला होता. यहोवाच्या साक्षीदारांबरोबर बायबलचा अभ्यास करण्यास तिने सुरवात केली तेव्हा, देवाच्या प्रत्येक सेवकाला इतरांबरोबर शांतीत राहण्याचे आर्जवले जाते हे तिला समजले. “त्याने शांतीच्या प्राप्तीसाठी झटावे व तिचा मार्ग धरावा.”—१ पेत्र ३:११.
रुकियॉने समजून घेतले, की तिला आता तिच्या भावाबरोबर समेट करावा लागेल. तिने संपूर्ण रात्र प्रार्थना केली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्या भावाच्या घरी जायला निघाली. तिच्या छातीत धडधडत होतं. रुकियॉच्या भाचीने दार उघडले आणि आश्चर्याने विचारले: “आत्या तू?” रुकियॉने शांतपणे तिला सांगितले की तिला आपल्या भावाबरोबर समेट करायचा होता म्हणून ती त्याला भेटू इच्छिते. तिने असे का केले? कारण तिला आता समजले होते की अशी देवाची इच्छा होती. तिच्या भावालाही आनंद वाटला; त्यांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली आणि दोघांच्याही डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले; बायबल तत्त्वांचे अनुसरण केल्याने एक कुटुंब पुन्हा एकत्र आले.
वाईट संगती
द सेवन हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टीव्ह फॅमिलीझ नामक एका पुस्तकाने म्हटले, “आजचे साधारण मूल दिवसाचे सात तास टीव्ही पाहते. त्याने त्याची प्राथमिक शाळा संपेपर्यंत आठ हजारपेक्षा जास्त खून आणि एक लाख हिंसक कृत्ये पाहिलेले असतील.” यामुळे मुलावर काय परिणाम होतो? यावर “तज्ज्ञांचे” आपापसातच अजून एकमत झालेले नाही, परंतु बायबल मात्र वाईट संगतीविरुद्ध कडक सल्ला देते. उदाहरणार्थ ते म्हणते: “मूर्खांचा सोबती कष्ट पावतो.” (नीतिसूत्रे १३:२०) ते असेही म्हणते: “कुसंगतीने नीति बिघडते.” (१ करिंथकर १५:३३) वाईट संगतीविषयीची ही तत्त्वे आपण सुज्ञपणे खरी मानून चाललो तर कौटुंबिक जीवन नक्कीच सुधारेल, मग ती संगत लोकांची असो किंवा टीव्हीवरील कार्यक्रम असोत.
लक्झेमबर्ग येथील एक स्त्री यहोवाच्या साक्षीदारांबरोबर बायबलचा अभ्यास करीत होती. एके दिवशी तिने साक्षीदारांना सांगितले, की सात आणि आठ वर्षाच्या तिच्या दोन मुली संध्याकाळच्या वेळी भांडखोर आणि चिडखोर व्हायच्या. साक्षीदारांनी तिला विचारले की तिच्या मुली संध्याकाळी काय करतात. ती त्यांना म्हणाली की ती स्वयंपाकघर आवरेपर्यंत त्या टीव्हीपुढे बसलेल्या असतात. कोणते कार्यक्रम त्या पाहतात? आई म्हणाली, “कसले तरी कार्टून्स पाहतात.” साक्षीदारांनी तिला सांगितले की अशा कार्यक्रमांत बहुतेकवेळा हिंसा दाखवली जाते; तेव्हा ती म्हणाली, की आपल्या मुली काय पाहतात त्यावर ती लक्ष ठेवेल.
दुसऱ्याच दिवशी आईने सांगितले की आपल्या मुली पाहत असलेले कार्टून पाहून तिला धक्काच बसला. त्यात दाखवले जाते की अंतराळातील काल्पनिक राक्षस त्यांच्या मार्गात येणाऱ्या सगळ्यांना क्रूरपणे ठार मारतात. तिने तिच्या मुलींना सांगितले की यहोवाला हिंसा अजिबात आवडत नाही व आपण अशी क्रूरता पाहिलेलीही त्याला आवडत नाही. (स्तोत्र ११:५) यहोवाला खूष करण्याकरता टीव्ही पाहण्याऐवजी त्याच वेळेत चित्रे काढून ते रंगवण्याचे या मुलींनी ठरवले. काही दिवसातच, त्यांचा चिडकू स्वभाव बदलला आणि कुटुंबातील वातावरण सुधारले.
बायबल तत्त्वे लागू केल्याने कौटुंबिक जीवनात सुधार होतो हे दाखवणारी ही फक्त काहीच उदाहरणे आहेत. बायबलचा सल्ला सर्व प्रकारच्या परिस्थितींना लागू होतो. तो सत्य आहे आणि इतका प्रभावशाली आहे की त्याचा परिणाम चांगलाच होतो. (इब्री लोकांस ४:१२) लोक बायबलचा अभ्यास करतात आणि त्यातील सल्ल्याचे प्रामाणिकपणे अनुसरण करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा कुटुंबे मजबूत होतात, मनोवृत्ती बदलते आणि चुका टाळल्या जातात. कुटुंबातील केवळ एक व्यक्ती देवाचा सल्ला अनुसरत असली तरी त्याचा चांगला परिणाम होऊ शकतो. होय, जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात आपण देवाच्या वचनाबद्दल स्तोत्रकर्त्याप्रमाणे दृष्टिकोन बाळगला पाहिजे; त्याने लिहिले: “तुझे वचन माझ्या पावलांकरिता दिव्यासारखे व माझ्या मार्गावर प्रकाशासारखे आहे.”—स्तोत्र ११९:१०५.
[५ पानांवरील चित्र]
बायबल तत्त्वांचे अनुसरण करण्याद्वारे कौटुंबिक समस्या सोडवता आल्या