हा तारणाचा दिवस आहे!
“आताच समय अनुकूल आहे; पाहा आताच तारणाचा दिवस आहे.”—२ करिंथकर ६:२.
१. देव आणि येशू ख्रिस्त यांच्यासोबत स्वीकृत स्थान मिळवायचे असल्यास कशाची आवश्यकता आहे?
यहोवाने मनुष्यजातीचा न्याय करण्यासाठी एक दिवस निश्चित केला आहे. (प्रेषितांची कृत्ये १७:३१) तो दिवस आपल्याकरता तारणाचा दिवस ठरायचा असल्यास यहोवासोबत आणि त्याचा न्यायी, येशू ख्रिस्त यांच्यासोबत आपले एक स्वीकृत स्थान असण्याची गरज आहे. (योहान ५:२२) अशाप्रकारच्या स्थानाकरता आपले वर्तन देवाच्या वचनानुरूप असण्यास हवे आणि इतरांना येशूचे खरे शिष्य बनविण्याकरता आपल्याला प्रेरित करील असा विश्वास आपल्याकडे असण्यास हवा.
२. सबंध मानवजात देवाला पारखी का झाली आहे?
२ वारशाने मिळालेल्या पापामुळे सबंध मानवजात देवाला पारखी झाली आहे. (रोमकर ५:१२; इफिसकर ४:१७, १८) म्हणून आपण ज्यांना प्रचार करतो त्या लोकांनी देवासोबत समेट घडवून आणला तरच त्यांचे तारण होईल. प्रेषित पौलाने करिंथमधील ख्रिश्चनांना लिहिले तेव्हा हे स्पष्ट केले. २ करिंथकर ५:१०–६:१० येथे पौलाने न्याय, देवासोबत समेट आणि तारण यांविषयी काय म्हटले हे पाहण्याकरता आपण या शास्त्रवचनांचे परीक्षण करू या.
“आम्ही . . . माणसांची समजूत घालतो”
३. पौल ‘माणसांची समजूत’ कशी घालत होता आणि आपणही आज तसे का करण्यास हवे?
३ पौलाने न्यायाचा संबंध प्रचारकार्यासोबत लावला, त्याने लिहिले: “आपण सर्वांना ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर खऱ्या स्वरूपाने प्रगट झाले पाहिजे, ह्यासाठी की, प्रत्येकाला, त्याने देहाने केलेल्या गोष्टींचे फळ मिळावे; मग ते बरे असो किंवा वाईट असो. म्हणून आम्ही प्रभूच्या भयाची जाणीव बाळगून माणसांची समजूत घालतो.” (२ करिंथकर ५:१०, ११) प्रेषित पौल सुवार्तेचा प्रचार करण्याद्वारे ‘माणसांची समजूत घालत होता.’ आपल्याविषयी काय? या दुष्ट व्यवस्थीकरणाच्या अखेरीस आपण आल्याने इतरांची समजूत घालण्याकरता आपण प्रयत्नांची शर्थ करण्यास हवी जेणेकरून त्यांना येशूचा अनुकूल न्याय मिळण्याकरता आणि तारणाचा उगम, यहोवा देवाची स्वीकृती मिळण्याकरता योग्य ती पावले उचलणे शक्य होईल.
४, ५. (अ) यहोवाच्या सेवेत मिळालेल्या यशाची आपण शेखी का मिरवू नये? (ब) कोणत्या अर्थाने पौलाने “देवासाठी” प्रतिष्ठा मिरवली?
४ पण देवाने आपल्या सेवाकार्यावर आशीर्वाद पाठवला असल्यास आपण त्याविषयी गर्व बाळगू नये. करिंथमध्ये काही लोक स्वतःविषयी किंवा इतरांविषयी गर्वाने फुगल्यामुळे त्या मंडळीत फुटी पडल्या होत्या. (१ करिंथकर १:१०-१३; ३:३, ४) या गोष्टीचा अप्रत्यक्ष उल्लेख करत पौलाने लिहिले: “आम्ही तुमच्याजवळ आपली प्रशंसा करीत नाही, तर तुम्हाला आमच्याविषयी अभिमान बाळगण्याची संधि मिळावी म्हणून असे लिहितो; अशा हेतूने की, जे अंतस्थ गोष्टींबद्दल नव्हे तर बाह्य गोष्टींबद्दल अभिमान बाळगतात त्यांना तुम्हाला उत्तर देता यावे. आम्ही भ्रमिष्ट झालो असलो तर ते देवासाठी, आणि आम्ही शुद्धीवर असलो तर ते तुमच्यासाठी आहो.” (२ करिंथकर ५:१२, १३) गर्विष्ठ लोकांना मंडळीच्या एकतेत आणि आध्यात्मिक कल्याणात कोणताच रस नव्हता. देवासमोर सहविश्वासूंना चांगली मनोवृत्ती विकसित करण्यात त्यांना मदत करण्याऐवजी बाह्य गोष्टींविषयी अभिमान बाळगण्याची त्यांची इच्छा होती. म्हणून पौलाने त्या मंडळीची हजेरी घेतली आणि नंतर असे म्हटले: “जो प्रतिष्ठा मिरवितो, त्याने ती प्रभूविषयी मिरवावी.”—२ करिंथकर १०:१७.
५ पौलाने स्वतः शेखी मिरवली नव्हती का? आपल्या प्रेषितपणाविषयी त्याने जे म्हटले त्यावरून काही जणांच्या मनात असा विचार आला असेल. पण त्याला “देवासाठी” अभिमान बाळगायचा होता. करिंथकरांनी यहोवाला सोडून देऊ नये यासाठी त्याने प्रेषित असलेल्या आपल्या लायकीविषयी प्रतिष्ठा मिरवली. खोटे प्रेषित करिंथकरांना चुकीच्या मार्गाला नेत असून त्यांना परत देवाकडे आणण्याकरता पौलाने असे केले होते. (२ करिंथकर ११:१६-२१; १२:११, १२, १९-२१; १३:१०) या ठिकाणी पौल त्याला मिळालेल्या यशामुळे इतरांना प्रभावित करण्याचा प्रयत्न करत नव्हता.—नीतिसूत्रे २१:४.
ख्रिस्ताची प्रीती तुम्हाला भाग पाडते का?
६. ख्रिस्ताच्या प्रीतीचा आपल्यावर कसा परिणाम होण्यास हवा?
६ खरा प्रेषित या नात्याने पौलाने इतरांना येशूच्या खंडणीविषयी शिकवले. या खंडणीमुळे पौलाचे जीवन फार प्रभावित झाले होते कारण त्याने लिहिले: “ख्रिस्ताची प्रीती आम्हाला आवरून धरते [“भाग पाडते,” NW]. आम्ही जसे समजतो की, एक सर्वांसाठी मेला तर सर्व मेले; आणि तो सर्वांसाठी याकरिता मेला की, जे जगतात त्यांनी पुढे स्वतःकरिता नव्हे तर त्यांच्यासाठी जो मेला व पुन्हा उठला त्यांच्याकरिता जगावे.” (२ करिंथकर ५:१४, १५) आपल्या सर्वांकरता येशूने स्वतःचे जीवन देऊन किती महान प्रेम प्रदर्शित केले! या प्रेमाने आपल्याला आपल्या जीवनात सतत प्रेरित करू नये का? आपल्याकरता येशूने स्वतःचे जीवन दिल्याने आपण त्याचे कृतज्ञ आहोत; म्हणूनच, यहोवाने त्याच्या प्रिय पुत्राद्वारे पुरवलेल्या तारणाची सुवार्ता सांगण्याच्या कार्यात मोठ्या आवेशाने भाग घेण्यास आपण प्रेरित झाले पाहिजे. (योहान ३:१६; पडताळा स्तोत्र ९६:२.) “ख्रिस्ताची प्रीती” तुम्हाला देवाच्या राज्यप्रचाराच्या आणि शिष्य बनविण्याच्या कामात आवेशाने सहभागी होण्यास भाग पाडते का?—मत्तय २८:१९, २०.
७. ‘एखाद्याला देहदृष्ट्या न ओळखणे’ म्हणजे काय?
७ ख्रिस्ताने अभिषिक्त लोकांकरता जे काही केले त्याविषयी कृतज्ञता व्यक्त होईल, अशा पद्धतीने जीवन व्यतीत करून ते ‘यापुढे स्वतःकरता नव्हे तर ख्रिस्ताकरता जगतात.’ पौलाने म्हटले: “तर मग आतापासून आम्ही कोणाला देहदृष्ट्या ओळखीत नाही; आणि जरी आम्ही ख्रिस्ताला देहदृष्ट्या ओळखले होते तरी आता ह्यापुढे त्याला तसे ओळखीत नाही.” (२ करिंथकर ५:१६) यहुदी आणि विदेशी किंवा गरीब आणि श्रीमंत यात भेद करून ख्रिश्चनांनी लोकांकडे देहदृष्टीने पाहू नये. अभिषिक्त लोक ‘कोणाला देहदृष्ट्या ओळखीत नाहीत,’ कारण समविश्वासूंसोबत असणारा त्यांचा आध्यात्मिक नातेसंबंध हा अधिक मोलाचा आहे. ज्यांनी ‘ख्रिस्ताला देहदृष्ट्या ओळखले’ ते केवळ असे लोक नव्हते ज्यांनी येशूला तो पृथ्वीवर असताना स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले होते. आणि मशीहावर विश्वास ठेवणारे काहीजण ख्रिस्ताकडे एकेकाळी केवळ एक मानव या नात्याने पाहत असले, तरीसुद्धा यापुढे त्यांना तसे करायचे नव्हते. त्याने स्वतःचे शरीर खंडणी म्हणून दिले आणि जीवनदायक आत्म्याच्या स्वरूपात त्याला पुनरुत्थित करण्यात आले. स्वर्गीय जीवनाकरता उठविण्यात येणाऱ्या इतरांनी येशूला देहदृष्ट्या कधीही पाहिले नाही, ते स्वर्गीय जीवनाकरता त्यांच्या शारीरिक देहांचा त्याग करतात.—१ करिंथकर १५:४५, ५०; २ करिंथकर ५:१-५.
८. कोणत्या अर्थाने काही लोक “ख्रिस्ताच्या ठायी” आहेत?
८ अभिषिक्त लोकांना पौल पुढे असे म्हणतो: “जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी असेल तर तो नवी उत्पत्ती आहे; जुने ते होऊन गेले; पाहा, ते नवे झाले आहे.” (२ करिंथकर ५:१७) “ख्रिस्ताच्या ठायी” असणे म्हणजे त्याच्यासोबत ऐक्याचा अनुभव घेणे. (योहान १७:२१) ख्रिस्ताच्या ठायी असणाऱ्या या व्यक्तीला यहोवाने आपल्या पुत्राकडे आकर्षित करून पवित्र आत्म्याने नव्याने जन्माला घातले; तेव्हापासून ही व्यक्ती ख्रिस्तासोबत ऐक्यात आली. देवाच्या आत्म्याने जन्मलेला पुत्र या नात्याने ती व्यक्ती “नवी उत्पत्ती” ठरली जिला स्वर्गीय राज्यात ख्रिस्तासोबत राज्य करण्याची आशा आहे. (योहान ३:३-८; ६:४४; गलतीकर ४:६, ७) अशाप्रकारच्या अभिषिक्त ख्रिश्चनांना सेवेचा फार मोठा विशेषाधिकार देण्यात आला आहे.
“देवाबरोबर समेट केलेले असे . . . व्हा”
९. मानवजातीचा स्वतःसोबत समेट घडवून आणण्याकरता देवाने काय केले आहे?
९ या ‘नव्या उत्पत्तीवर’ यहोवाची खरोखरच किती कृपादृष्टी आहे! पौल म्हणतो: “ही सगळी देवाची करणी आहे; त्याने स्वतःबरोबर आपला समेट ख्रिस्ताच्या द्वारे केला आणि समेटाची सेवा आम्हाला दिली; म्हणजे जगातील लोकांची पातके त्याच्याकडे न मोजता, देव ख्रिस्तामध्ये स्वतःबरोबर जगाचा समेट करीत होता, आणि त्याने आपल्याकडे समेटाचे वचन सोपवून दिले.” (२ करिंथकर ५:१८, १९) आदामाने पाप केल्यापासून मानवजात देवाला पारखी झाली आहे. पण यहोवाने प्रेमळपणे पुढाकार घेऊन येशूच्या समर्पणाद्वारे समेट घडवून आण्याचा मार्ग खुला केला.—रोमकर ५:६-१२.
१०. समेट घडवून आणण्याचे कार्य यहोवाने कोणावर सोपवले आहे आणि त्यांनी हे कार्य पार पाडण्यासाठी काय केले आहे?
१० समेट घडवून आणण्याचे कार्य यहोवाने अभिषिक्त लोकांना दिले आहे, त्यामुळे पौल असे म्हणू शकला: “देव आम्हाला विनवीत असल्यासारखे आम्ही ख्रिस्ताच्या वतीने वकिली करितो; देवाबरोबर समेट केलेले असे तुम्ही व्हा, अशी आम्ही ख्रिस्ताच्या वतीने विनंती करितो.” (२ करिंथकर ५:२०) प्राचीन काळी खासकरून युद्धाच्या काळादरम्यान शांती प्रस्थापित करण्यासाठी राजदूतांना पाठवण्यात येत असे. (लूक १४:३१, ३२) मानवजातीचे पापमय जग देवाला पारखे झाल्यामुळे लोकांना त्याच्या समेटाच्या अटींविषयी सांगण्याकरता त्याने त्याच्या अभिषिक्त राजदूतांना पाठवले आहे. ख्रिस्ताचे प्रतिनिधी म्हणून अभिषिक्त लोक अशी विनंती करतात: “देवाबरोबर समेट केलेले असे तुम्ही व्हा.” देवासोबत शांतीसंबंध स्थापण्यासाठी आणि ख्रिस्ताद्वारे त्याने शक्य केलेल्या तारणाचा स्वीकार करण्याकरता ही विनंती दयेने केलेला आर्जवच आहे.
११. खंडणीवर विश्वास ठेवण्याद्वारे अखेरीस देवासमोर कोणाला नीतिमत्त्वाचे स्थान प्राप्त होईल?
११ खंडणी बलिदानावर विश्वास ठेवणारे सर्वजण देवासोबत समेट करू शकतात. (योहान ३:३६) पौल म्हणतो: “ज्याला [येशूला] पाप ठाऊक नव्हते त्याला त्याने [यहोवाने] तुमच्याआमच्याकरिता पाप असे केले; ह्यासाठी की, आपण त्याच्या ठायी देवाचे नीतिमत्त्व असे व्हावे.” (२ करिंथकर ५:२१) वारशाने मिळालेल्या पापमय प्रवृत्तींपासून मुक्त झालेल्या आदामाच्या सर्व संततीकरता परिपूर्ण मनुष्य येशू हा पापार्पण होता. येशूद्वारे ते “देवाचे नीतिमत्त्व” असे होतात. हे नीतिमत्त्व किंवा देवासमोरील नीतिमत्त्वाचे स्थान पहिल्यांदा येशूच्या १,४४,००० सहवारशांना मिळते. त्याच्या हजार वर्षाच्या कारकीर्दीत परिपूर्ण मनुष्य म्हणून नीतिमत्त्वाचे स्थान सनातन पिता, येशू ख्रिस्त याच्या पृथ्वीवरील पुत्रांना प्राप्त होईल. देवाला विश्वासू असल्याचे त्यांना शाबीत करता यावे आणि सार्वकालिक जीवनाचे बक्षीस त्यांना प्राप्त व्हावे म्हणून तो त्यांना परिपूर्णतेच्या नीतिमान स्थानापर्यंत नेईल.—यशया ९:६; प्रकटीकरण १४:१; २०:४-६, ११-१५.
‘अनुकूल समय’
१२. यहोवाच्या राजदूतांद्वारे आणि उपराजदूतांद्वारे कोणते महत्त्वाचे सेवाकार्य पार पाडले जात आहे?
१२ आपले तारण व्हावे असे आपल्याला वाटत असल्यास आपल्याला पौलाच्या पुढील शब्दांप्रमाणे वागले पाहिजे: “आम्ही त्याच्यासह [यहोवासह] कार्य करिता करिता विनंती करितो की, तुम्ही देवाच्या कृपेचा स्वीकार व्यर्थ होऊ देऊ नये; कारण तो म्हणतो: ‘अनुकूलसमयी मी तुझे ऐकले, व तारणाच्या दिवशी मी तुला साहाय्य केले;’ पाहा, आताच समय अनुकूल आहे; पाहा आताच तारणाचा दिवस आहे.” (२ करिंथकर ६:१, २) यहोवाचे अभिषिक्त राजदूत आणि उपराजदूत अर्थात “दुसरी मेंढरे” आपल्या स्वर्गीय पित्याच्या अपात्र कृपेचा स्वीकार व्यर्थ होऊ देत नाहीत. (योहान १०:१६) त्यांच्या सद्वर्तनाद्वारे आणि या ‘अनुकूल समयात’ आवेशाने सेवाकार्य करण्याद्वारे ते ईश्वरी कृपापसंती प्राप्त करतात आणि हा “तारणाचा दिवस आहे” असे पृथ्वीवरील लोकांना सांगतात.
१३. यशया ४९:८ या वचनाचा सारांश काय आहे आणि याची पहिल्यांदा पूर्णता कशी झाली?
१३ यशया ४९:८ येथील शब्द पौल उद्धृत करतो: “परमेश्वर म्हणतो, प्रसादसमयी मी तुझे ऐकले, उद्धारदिनी मी तुला साहाय्य केले; देशाचा उत्कर्ष व्हावा, उजाड झालेल्या वतनांची पुनः वाटणी व्हावी म्हणून मी तुझे रक्षण करितो व लोकांच्या कराराप्रीत्यर्थ तुला नेमितो.” इस्राएल लोकांची बॅबिलॉनच्या बंदिवासातून सुटका झाली आणि नंतर ते त्यांच्या उजाड झालेल्या मायदेशी परतले तेव्हा या भविष्यवाणीची पहिल्यांदा पूर्णता झाली.—यशया ४९:३, ९.
१४. यशया ४९:८ येशूच्या बाबतीत कसे पूर्ण झाले?
१४ यशयाच्या भविष्यवाणीच्या पुढील पूर्णतेत, यहोवा त्याचा “सेवक” येशू याला ‘राष्ट्रांचा प्रकाश म्हणून नेमतो जेणेकरून देवाकडून होणारे तारण पृथ्वीच्या दिगंतापर्यंत नेले जावे.’ (यशया ४९:६, ८; पडताळा यशया ४२:१-४, ६, ७; मत्तय १२:१८-२१.) ‘प्रसादसमय’ आणि ‘अनुकूल समय,’ येशू पृथ्वीवर होता त्या काळास स्पष्टपणे लागू होतो. त्याने देवाला प्रार्थना केली आणि देवाने त्याचे “ऐकले.” येशूकरता तो “तारणाचा दिवस” असल्याचे शाबीत झाले कारण त्याने पूर्ण सचोटी राखली आणि “तो आपल्या आज्ञेत राहणाऱ्या सर्वांच्या युगानुयुगीच्या तारणाचा कर्ता झाला.”—इब्री लोकांस ५:७, ९; योहान १२:२७, २८.
१५. देवाच्या अपात्री कृपेस आपण पात्र आहोत हे शाबीत करण्यासाठी आध्यात्मिक इस्राएलांनी केव्हापासून प्रयत्न केला आहे आणि कोणत्या उद्देशास्तव?
१५ यशया ४९:८ हे वचन पौल अभिषिक्त ख्रिश्चनांना लागू करत त्यांना अशी विनंती करतो, की देव पुरवत असलेल्या ‘अनुकूल समयी’ आणि ‘तारणाच्या दिवशी’ त्याच्या इच्छेप्रमाणे करण्यात उणे पडून त्यांनी “देवाच्या कृपेचा स्वीकार व्यर्थ होऊ देऊ नये.” पौल पुढे म्हणतो: “पाहा, आताच समय अनुकूल आहे; पाहा आताच तारणाचा दिवस आहे.” (२ करिंथकर ६:२) आत्मिक इस्राएलांकरता ‘अनुकूल समय’ “तारणाचा दिवस” ठरावा म्हणून सा.यु. ३३ पेन्टेकॉस्टपासून आपण देवाच्या अपात्री कृपेस पात्र आहोत हे त्यांना शाबीत करावे लागले आहे.
‘देवाचे सेवक म्हणून आपली लायकी पटवून देणे’
१६. पौलाने कोणत्या कठीण परिस्थितींत देवाचा सेवक असल्याची आपली लायकी पटवून दिली?
१६ करिंथ मंडळीतील काही लोक देवाच्या अपात्री कृपेस आपण पात्र आहोत हे शाबीत करत नव्हते. पौलाने “कोणत्याही प्रकारे अडखळण्यास कारण” न होण्याचे टाळलेले असतानाही प्रेषित म्हणून असलेला पौलाचा अधिकार काढून घेण्यासाठी त्यांनी पौलाची निंदानालस्ती केली. त्याने निश्चितच “फार धीराने, संकटात, विपत्तीत, पेचप्रसंगात, फटके खाण्यात, बंदिवासात, दंग्याधोप्यांत, काबाडकष्टात, जागरणात, उपवासात,” आपण देवाचे सेवक असल्याची लायकी पटवून दिली. (२ करिंथकर ६:३-५) पुढे पौल असे सांगतो, की त्याचे विरोधी देवाचे सेवक होते, पण त्यांच्या तुलनेत तो “अधिक प्रमाणात” देवाचा सेवक होता कारण त्याने त्यांच्यापेक्षा अधिक छळ, तुरुंगवास, मार आणि उपासमार सहन केली होती.—२ करिंथकर ११:२३-२७.
१७. (अ) देवाचे सेवक असल्याची आपली लायकी आपण कोणते गुण दाखवण्याद्वारे प्रदर्शित करू शकतो? (ब) ‘नीतिमत्त्वाची शस्त्रास्त्रे’ कोणती आहेत?
१७ पौल आणि त्याच्या सहकर्म्यांप्रमाणे आपणही देवाचे सेवक असल्याची लायकी पटवून देऊ शकतो. कसे? ‘शुद्धतेद्वारे,’ किंवा पावित्र्याद्वारे आणि बायबलच्या अचूक ज्ञानाच्या एकवाक्यतेत कार्य करण्याद्वारे. अन्यायाला किंवा रागाला धीराने, “सहनशीलतेने” सहन करण्याद्वारे आणि इतरांना मदत करण्यात ‘ममता’ दाखवण्याद्वारे आपण देवाचे सेवक असल्याची लायकी पटवून देऊ शकतो. याशिवाय, देवाच्या आत्म्याच्या मार्गदर्शनाचा स्वीकार करण्याद्वारे, ‘निष्कपट प्रीती’ दाखवण्याद्वारे, खरे ते बोलण्याद्वारे आणि आपले सेवाकार्य पूर्ण करण्याकरता त्याच्यावर अवलंबून राहण्याद्वारे आपण देवाचे सेवक असल्याची लायकी पटवून देऊ शकतो. मनोरंजक गोष्ट अशी, की पौलाने त्याच्या सेवकपणाचा दर्जा “उजव्या व डाव्या हातातील नीतिमत्त्वाच्या शस्त्रास्त्रांनी” देखील शाबीत केला. प्राचीन काळी, सामान्यपणे उजव्या हाताने तलवार चालवली जात असे, तर डाव्या हातात ढाल असे. खोट्या शिक्षकांच्या विरोधात युद्ध लढतेवेळी पौलाने कुटीलता, फसवणूक, कपट यांसारख्या पापमय शारीरिक शस्त्रांचा उपयोग केला नाही. (२ करिंथकर ६:६, ७; ११:१२-१४; नीतिसूत्रे ३:३२) खऱ्या उपासनेच्या वाढीसाठी त्याने नीतिमत्त्वाच्या ‘शस्त्रास्त्रांचा’ किंवा माध्यमांचा उपयोग केला. त्यामुळे आपणही तसेच करण्यास हवे.
१८. देवाचे सेवक असल्यास आपण कसे वागू?
१८ देवाचे सेवक असल्यास आपणही पौलाप्रमाणे आणि त्याच्या सहकर्म्यांप्रमाणे वागू. आपला आदर किंवा अनादर केला जातो तेव्हा आपण ख्रिश्चनांप्रमाणे वागू. आपल्याविषयी पसरविण्यात येणाऱ्या अफवा ऐकून आपण आपले प्रचारकार्य थांबवणार नाही किंवा आपली वाहवा केली जाते तेव्हा गर्वाने फुगणार नाही. सत्य बोलण्याद्वारे ईश्वरी कार्य करत असल्याची आपली ओळख पटली जावो. आपल्याशी शत्रुत्व बाळगणाऱ्या लोकांकडून आपला भयंकर छळ होतो तेव्हा आपण यहोवावर भरवसा ठेवू. आणि लावलेल्या शिस्तीचा मोठ्या कृतज्ञतेने आपण स्वीकार करू.—२ करिंथकर ६:८, ९.
१९. आध्यात्मिकरीत्या ‘अनेकांना सधन करणे’ कसे शक्य आहे?
१९ समेट घडवून आणणाऱ्या सेवाकार्यावरील चर्चेच्या अखेरीस पौल स्वतःविषयी आणि त्याच्या सहकर्म्यांविषयी म्हणाला, की आपण “दुःखी मानलेले तरी सर्वदा आनंद करणारे; दरिद्री मानलेले तरी पुष्कळांना सधन करणारे; कफल्लक असे मानलेले तरी सर्ववस्तुसंपन्न” आहोत. (२ करिंथकर ६:१०) या सेवकांना त्यांच्यावरील पीडांमुळे दुःख होणे साहजिक असले तरी, त्यांना एक प्रकारचा आंतरिक आनंद वाटत होता. भौतिकरीत्या ते गरीब होते, पण त्यांनी अनेकांना आध्यात्मिकरीत्या ‘सधन बनवले.’ खरे तर ते “सर्ववस्तुसंपन्न” होते कारण त्यांच्या विश्वासामुळे ते आध्यात्मिकरित्या संपन्न तर झालेच शिवाय देवाचे स्वर्गीय पुत्र होण्याची आशाही त्यांना मिळाली. याशिवाय ख्रिस्ती सेवक या नात्याने त्यांचे जीवन समृद्ध आणि आनंदी झाले. (प्रेषितांची कृत्ये २०:३६) त्यांच्याप्रमाणे आपणही, समेट घडवून आणण्याच्या सेवाकार्यात भाग घेण्याद्वारे ‘अनेकांना सधन करू शकतो,’ तेही आता—या तारणाच्या दिवशी!
यहोवाकडून होणाऱ्या तारणावर भरवसा
२०. (अ) पौलाची कोणती प्रांजळ इच्छा होती आणि वेळ मर्यादित का होता? (ब) आपण तारणाच्या दिवसात जगत आहोत, हे कशावरून स्पष्ट होते?
२० पौलाने सा.यु. ५५ च्या आसपास करिंथमधील ख्रिश्चनांना दुसरे पत्र लिहिले तेव्हा यहुदी व्यवस्थीकरणाचा अंत होण्यास केवळ १५ वर्षे बाकी होती. यहुद्यांनी आणि विदेशी लोकांनी ख्रिस्ताद्वारे देवासोबत समेट घडवून आणावा, अशी प्रेषित पौलाची प्रांजळ इच्छा होती. तो तारणाचा दिवस होता आणि वेळही फार कमी होता. आपणही १९१४ पासून तशाच प्रकारच्या व्यवस्थीकरणाच्या अंताच्या काळात आहोत. जगाच्या पाठीवर सर्वत्र देवाच्या राज्याचा प्रचार चालल्यामुळे हा तारणाचा दिवस आहे हे स्पष्ट होते.
२१. (अ) सन १९९९ या वर्षाकरता कोणते वार्षिक वचन निवडले आहे? (ब) तारणाच्या या दिवसात आपण काय करत राहिले पाहिजे?
२१ येशू ख्रिस्ताद्वारे देवाने केलेल्या तारणाच्या व्यवस्थेविषयी सर्व राष्ट्रांतील लोकांना ऐकण्याची गरज आहे. उशीर करण्याची ही वेळ नाही. पौलाने लिहिले: “पाहा आताच तारणाचा दिवस आहे.” २ करिंथकर ६:२ हे वचन यहोवाच्या साक्षीदारांचे १९९९ वर्षाचे वार्षिक वचन असेल. जेरुसलेम आणि त्या शहरातील मंदिराचा जो नाश झाला त्यापेक्षाही कितीतरी भंयकर नाशाला आपल्याला सामोरे जावे लागणार असल्यामुळे हे वार्षिक वचन किती उचित आहे! संपूर्ण व्यवस्थीकरणाचा नाश अगदी जवळ आहे आणि नाशात पृथ्वीवरील प्रत्येकजण गोवलेला आहे. उद्या नव्हे, तर आता पावले उचण्याची वेळ आहे. यहोवा आपले तारण करील असा आपला विश्वास असल्यास, आपले त्याच्यावर प्रेम असल्यास आणि सार्वकालिक जीवनाचे मोल जाणत असल्यास आपण देवाच्या कृपेचा स्वीकार व्यर्थ होऊ देणार नाही. यहोवाचा सन्मान करण्याची प्रामाणिक इच्छा असल्यामुळे आपल्या बोलण्याद्वारे आणि वागण्याद्वारे पुढील शब्दांचा अर्थ आपल्याला खरोखरच कळाला आहे हे आपण दाखवू: “पाहा, आताच तारणाचा दिवस आहे.”
तुम्ही कसे उत्तर द्याल?
◻ देवासोबत समेट करणे इतके महत्त्वाचे का आहे?
◻ समेट घडवून आणण्याच्या सेवाकार्यात सहभागी असणारे राजदूत आणि उपराजदूत कोण आहे?
◻ देवाचे सेवक असल्याची आपली लायकी आपण कशी पटवून देऊ शकतो?
◻ यहोवाच्या साक्षीदारांच्या १९९९ सालच्या वार्षिक वचनाचा तुमच्याकरता काय अर्थ होतो?
[१७ पानांवरील चित्रं]
लोकांचा देवासोबत समेट घडवून आणण्याकरता पौलाप्रमाणे तुम्ही देखील मोठ्या आवेशाने प्रचार करण्यात आणि त्यांना मदत करण्यात भाग घेता का?
अमेरिका
फ्रान्स
आयव्हरी कोस्ट
[१८ पानांवरील चित्रं]
या तारणाच्या दिवसात, देवासोबत स्वतःचा समेट घडवून आणणाऱ्या लाखो लोकांमध्ये तुम्हीही आहात का?