तारण यहोवाच्या हातून होते
“देव आम्हाला संकटांतून मुक्त करणारा देव आहे.”—स्तोत्र ६८:२०.
१, २. (अ) यहोवा तारणाचा उगम आहे असे आपण का म्हणू शकतो? (ब) नीतिसूत्रे २१:३१ हे वचन तुम्ही कसे स्पष्ट कराल?
यहोवा त्याच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांचा त्राता अर्थात तारणकर्ता आहे. (यशया ४३:११) इस्राएलचा प्रसिद्ध राजा, दावीद याने या गोष्टीचा प्रत्यक्ष अनुभव घेतला होता त्यामुळे त्याने मनःपूर्वक असे गायिले: “तारण परमेश्वराच्या [“यहोवाच्या,” NW] हातून होते.” (स्तोत्र ३:८) संदेष्टा योना माशाच्या पोटात होता तेव्हा कळकळीने केलेल्या प्रार्थनेत त्याने हेच म्हटले.—योना २:९.
२ दावीदाचा पुत्र शलमोन यालाही हे माहीत होते, की यहोवा हा तारणाचा उगम आहे कारण त्याने म्हटले: “लढाईच्या दिवसासाठी घोडा तयार करण्यात येतो, परंतु तारण यहोवाकडूनच होत आहे.” (नीतिसूत्रे २१:३१) प्राचीन मध्यपूर्व काळात नांगर ओढण्याकरता बैलांचा, ओझी वाहण्याकरता गाढवांचा, प्रवासाकरता खेचरांचा तर लढाईकरता घोड्यांचा उपयोग करण्यात येत असे. पण इस्राएलांनी वाग्दत्त देशात प्रवेश करण्याआधी देवाने त्या लोकांच्या राजाला अशी आज्ञा दिली की त्याने, “फार घोडे बाळगू नयेत.” (अनुवाद १७:१६) यहोवा त्याच्या लोकांना वाचवणार होता त्यामुळे घोडदळांची त्यांना गरज भासणार नव्हती.
३. कोणत्या प्रश्नांचा आपण विचार करण्यास हवा?
३ सार्वभौम प्रभू यहोवा “संकटांतून मुक्त करणारा देव आहे.” (स्तोत्र ६८:२०) या विचारामुळे किती दिलासा मिळतो! पण यहोवाने लोकांना ‘संकटांतून सोडवले आहे?’ आणि त्याने कशाप्रकारच्या लोकांना तारले आहे?
यहोवा प्रामाणिक लोकांना वाचवतो
४. यहोवा भक्तिमान लोकांना वाचवतो हे आपल्याला कसे कळते?
४ देवाचे समर्पित सेवक या नात्याने सद्वर्तन राखण्याचा खरोखरच प्रयत्न करणाऱ्या सर्व लोकांना प्रेषित पेत्राच्या पुढील शब्दांतून सांत्वन मिळू शकते: “भक्तिमान लोकांस परीक्षेतून कसे सोडवावे व अनीतिमान लोकांस शिक्षा भोगीत न्यायाच्या दिवसासाठी कसे राखून ठेवावे हे प्रभूला कळते.” हा मुद्दा शाबीत करताना पेत्राने म्हटले की देवाने, “प्राचीन जगाचीहि गय केली नाही, तर अभक्तांच्या जगावर जलप्रलय आणिला, आणि नीतिमत्त्वाचा उपदेशक नोहा ह्याचे सात जणांसह रक्षण केले.”—२ पेत्र २:५, ९.
५. नोहाने कोणत्या परिस्थितींत “नीतिमत्त्वाचा उपदेशक” म्हणून सेवा केली?
५ कल्पना करा, की तुम्ही नोहाच्या दिवसांत आहात. भौतिक शरीरे धारण केलेले पिशाच पृथ्वीवर आहेत. या अवज्ञाकारी देवदूतांची संतती लोकांना क्रूरपणे वागवत असल्यामुळे पृथ्वी ‘जाचजुलमांनी भरली आहे.’ (उत्पत्ति ६:१-१२) पण यामुळे घाबरून जाऊन नोहा यहोवाची सेवा करण्याचे सोडून देत नाही. उलट तो “नीतिमत्त्वाचा उपदेशक” आहे. तो आणि त्याचे कुटुंब मिळून एक तारू बांधतात; आपल्या जीवनकाळातच दुष्टाईचा नाश होईल यावर ते मुळीच शंका घेत नाहीत. नोहाचा विश्वास त्या जगाला दोषी ठरवतो. (इब्री लोकांस ११:७) आजची परिस्थिती नोहाच्या काळाप्रमाणेच आहे; यावरून सध्याच्या दुष्ट व्यवस्थीकरणाचा हा शेवटला काळ आहे हे सिद्ध होते. (मत्तय २४:३७-३९; २ तीमथ्य ३:१-५) यहोवाकडून तारण होण्याची वाट पाहत असताना तुम्ही त्याच्या लोकांसोबत सेवा करता; पण असे करत असताना नोहाप्रमाणेच तुम्ही देखील नीतिमत्त्वाचे उपदेशक या नात्याने विश्वासू राहाल का?
६. दुसरे पेत्र २:७, ८ हे वचन कसे दाखवून देते, की यहोवा प्रामाणिक लोकांना वाचवतो?
६ यहोवा प्रामाणिक लोकांना वाचवतो याचा पेत्र आणखी एक पुरावा देतो. प्रेषित पेत्र म्हणतो: “[देवाने] अधर्मी लोकांच्या कामातूर वर्तनाने विटलेला नीतिमान लोट ह्याची सुटका केली; तो माणूस त्यांच्यामध्ये राहत होता; तेव्हा त्याची स्वैराचाराची कृत्ये पाहून व त्याविषयी ऐकून त्याचा नीतिमान जीव दिवसेंदिवस कासावीस होत होता.” (२ पेत्र २:७, ८; उत्पत्ति १९:१-२९) या शेवटल्या दिवसांत लैंगिक अनैतिकता हेच लाखो लोकांचे जीवन बनले आहे. लोटाप्रमाणे आपल्यालाही या अनेक लोकांचे ‘कामातूर वर्तन पाहून वीट येतो’ का? तुम्हाला तसा वीट येत असल्यास आणि तुम्ही नीतिमानाने जगत असल्यास या दुष्ट व्यवस्थीकरणाचा नाश होईल तेव्हा यहोवा तुम्हालाही वाचवेल.
जुलूम करणाऱ्यांपासून यहोवा त्याच्या लोकांना वाचवतो
७. इजिप्तमध्ये यहोवाने इस्राएलांसोबत केलेल्या व्यवहारातून कसे शाबीत होते, की जुलूम करणाऱ्यांपासून देव त्याच्या लोकांची सुटका करतो?
७ हे जुने व्यवस्थीकरण हयात आहे तोपर्यंत यहोवाच्या सेवकांना छळाला आणि जुलमाला तोंड द्यावे लागेल. पण ते या गोष्टीची खात्री बाळगू शकतात, की यहोवा त्यांची सुटका करील कारण भूतकाळात जुलूम करणाऱ्यांपासून त्याने त्याच्या लोकांना वाचवले आहे. असे समजा, की मोशेच्या काळात इजिप्शियन लोकांकडून ज्या इस्राएलांवर जुलूम होत आहे त्यांपैकी तुम्ही एक आहात. (निर्गम १:१-१४; ६:८) देव इजिप्तवर एकानंतर एक पीडा आणतो. (निर्गम ८:५–१०:२९) दहाव्या मरणप्राय पीडेद्वारे देव इजिप्तमधले पहिले फळ मारून टाकतो तेव्हा फारो इस्राएलांना देश सोडून जाण्याची परवानगी तर देतो, पण त्यानंतर लगेच सैन्य जमा करून इस्राएलांचा पाठलाग करतो. परंतु, इस्राएलांचा पिच्छा करत असताना फारोचा आणि त्याच्या लोकांचा लाल समुद्रात नाश होतो. (निर्गम १४:२३-२८) तुम्ही मोशे आणि सर्व इस्राएलांसोबत हे गीत गाता: “परमेश्वर रणवीर आहे; याव्हे हे त्याचे नाव. फारोचे रथ व त्याची सेना ही त्याने समुद्रात टाकून दिली आहेत; त्याचे निवडक सरदार तांबड्या समुद्रात बुडाले आहेत. गहिऱ्या जलांनी त्यांना गडप केले आहे; ते दगडाप्रमाणे समुद्राच्या तळाशी गेले आहेत.” (निर्गम १५:३-५) या शेवटल्या काळात जे लोक देवाच्या लोकांचा छळ करतात त्यांचा अशाचप्रकारे नाश होईल.
८, ९. जुलूम करणाऱ्यांपासून यहोवा आपल्या लोकांना वाचवतो हे सिद्ध करण्यासाठी बायबलमधील शास्ते या पुस्तकातले एक उदाहरण द्या.
८ वाग्दत्त देशात पोहंचल्यानंतर कित्येक वर्षे शास्ते इस्राएलांना न्याय देत असत. या लोकांना काही वेळा विदेशी लोकांच्या जुलमाला तोंड द्यावे लागले, पण देवाने विश्वासू शास्त्यांद्वारे त्यांची सुटका केली. ‘जुलूम करणाऱ्यांमुळे तसेच गांजणाऱ्यांमुळे आपण अशाचप्रकारे कण्हत असलो,’ तरी यहोवाचे विश्वासू सेवक या नात्याने तो आपल्याला जरूर वाचवील. (शास्ते २:१६-१८; ३:९, १५) खरे तर, याचे आणि देवाने नेमलेला शास्ता, येशू ख्रिस्त याच्याद्वारे मिळणाऱ्या याहीपेक्षा मोठ्या तारणाचे आश्वासन बायबलमधील शास्ते या पुस्तकात आपल्याला देण्यात आले आहे.
९ आता आपण शास्ता बाराक याच्या काळात जाऊ या. खोट्या उपासनेमुळे आणि देवाच्या नापसंतीमुळे इस्राएलांना कनानी राजा याबीन याच्या जुलमी अंमलाखाली २० वर्षे काढावी लागली आहेत. सीसरा हा कनानच्या बलाढ्य सैन्याचा सेनापती आहे. पण, इस्राएल राष्ट्र सुमारे चाळीस लाखांचे असले तरी ‘त्यातील चाळीस हजारांमधील एकाजवळही ढाल किंवा भाला असल्याचे दिसत नाही.’ (शास्ते ५:६-८) पश्चात्ताप होऊन इस्राएल लोक मदतीकरता यहोवाचा धावा करतात. संदेष्टी दबोरा हिच्याद्वारे देव बाराकला ताबोर डोंगरावर १०,००० लोकांना जमा करायला लावतो आणि यहोवा त्यांच्या शत्रुसैन्याला उंच ताबोरच्या खोऱ्यात घेऊन येतो. यामुळे खोरे निनादून जाते आणि कीशोन नदीच्या कोरड्या पात्रात सीसराचे प्रचंड सैन्य आणि ९०० युद्धरथ जमा होतात. पण तितक्यात मुसळधार पावसामुळे कीशोन नदी दुथडी भरून वाहू लागते. बाराक आणि त्याचे लोक वादळाचा फायदा घेऊन ताबोरच्या खोऱ्यात उतरतात. देवाच्या क्रोधाग्नीमुळे झालेला अनर्थ ते प्रत्यक्ष पाहतात. बाराकचे लोक घाबरलेल्या, पळून जाणाऱ्या कनानी लोकांना एकानंतर एक मारत जातात आणि त्यांपैकी एकही जण वाचत नाही. देवाच्या विरुद्ध लढण्याची हिम्मत करणाऱ्या विरोधकांकरता किती मोठा इशारा!—शास्ते ४:३-१६; ५:१९-२२.
१०. जुलूम करणाऱ्यांपासून देव आपल्या लोकांना वाचवतो याविषयी आपण खात्री का बाळगू शकतो?
१० देवाचे भय बाळगणाऱ्या इस्राएलांना यहोवाने जसे त्यांच्या संकटसमयी वाचवले त्याचप्रमाणे तो आजही जुलूम करणाऱ्या लोकांपासून आपल्या लोकांना वाचवील. (यशया ४३:३; यिर्मया १४:८) देवाने दावीदाला ‘त्याच्या शत्रूंच्या हातातून सोडवले.’ (२ शमुवेल २२:१-३) त्यामुळे यहोवाचे लोक म्हणून आपल्यावर जुलूम होत असला किंवा आपला छळ होत असला, तरी आपण धैर्यशील असले पाहिजे कारण त्याचा मशीही राजा आपली या जुलमापासून सुटका करील. होय, “दरिद्र्यांचे जीव तो तारील. जुलूम व जबरदस्ती ह्यांपासून त्यांचे जीव तो मुक्त करील.” (स्तोत्र ७२:१३, १४) होय, हा मुक्तिसमय खरोखर जवळ आहे.
देवावर भरवसा ठेवणाऱ्यांना तो वाचवतो
११. यहोवावर विसंबून राहण्याचे कोणते उदाहरण तरुण दावीदाने मांडले?
११ यहोवाने आपले तारण करावे, असे आपल्याला वाटत असल्यास आपण धैर्यानिशी त्याच्यावर भरवसा ठेवला पाहिजे. महाकाय गल्याथासोबत दावीद लढायला गेला तेव्हा तो धैर्यानिशी यहोवावर विसंबून राहिला. त्या धिप्पाड पलिष्ट्यासमोर तरुण दावीद उभा असल्याची कल्पना करा; दावीद म्हणतो: “तू तरवार, भाला व बरची घेऊन मजवर चढून आला आहेस; पण इस्राएली सैन्यांच्या देवाला तू तुच्छ लेखिले आहेस; त्या सेनाधीश परमेश्वराच्या नामाने मी तुजकडे आलो आहे. आज परमेश्वर तुला माझ्या हाती देईल; मी तुझा वध करीन, व तुझे शीर धडापासून वेगळे करीन. मी आज पलिष्टी सैनिकांची प्रेते आकाशातील पक्ष्यांस व वनपशूंस देईन; तेव्हा इस्राएलांमध्ये देव आहे असे अखिल पृथ्वीस विदित होईल, आणि या सगळ्या समुदायास कळून येईल की परमेश्वर तरवारीने व भाल्याने विजयी होतो असे नाही; कारण हे युद्ध परमेश्वराचे आहे.” आणि तसेच झाले, गल्याथ मरतो आणि पलिष्टी सैन्याची दाणादाण उडते. यावरून स्पष्ट होते, की यहोवाने त्याच्या लोकांना वाचवले.—१ शमुवेल १७:४५-५४.
१२. एलाजार या दावीदाच्या महावीराचे उदाहरण लक्षात ठेवणे लाभाचे असेल असे तुम्हाला का वाटते?
१२ छळ करणाऱ्यांना आपण तोंड देतो तेव्हा आपल्याला ‘दृढ होण्याची’ आणि देवावर पूर्ण भरवसा ठेवण्याची गरज आहे. (यशया ४६:८-१३; नीतिसूत्रे ३:५, ६) पस-दम्मीम या ठिकाणी काय झाले ते पाहा. इस्राएल लोक पलिष्टी सैन्यांपुढून पळून गेले आहेत. पण दावीदाच्या खास तीन महाविरांपैकी असणारा एलाजार भयामुळे मुळीच डळमळत नाही. जवाच्या शेतामध्ये उभा राहून तो एकटाच पलिष्ट्यांना तलवारीने मारतो. अशाप्रकारे, ‘यहोवा त्या दिवशी इस्राएलांना मोठा विजय देतो.’ (१ इतिहास ११:१२-१४; २ शमुवेल २३:९, १०) लष्करी सैन्याला सामोरे जाऊन आपण एकट्याने त्यांचा पराजय करावा अशी अपेक्षा कोणी आपल्याकडून करत नाही. पण शत्रू आपल्यावर दबाव आणतात तेव्हा कदाचित आपण एकटे असू. अशावेळी संकटांतून मुक्त करणाऱ्या यहोवावर आपण प्रार्थनापूर्वक विसंबून राहू का? छळ करणाऱ्यांपुढे आपल्याकडून आपल्या सहविश्वासू लोकांचा विश्वासघात होऊ नये म्हणून आपण देवाची मदत मागणार का?
सचोटी राखणाऱ्यांना यहोवा वाचवतो
१३. इस्राएलच्या दहा वंशांच्या राज्यात देवाप्रती सचोटी कायम ठेवणे इतके कठीण का होते?
१३ यहोवाकडून होणाऱ्या तारणाचा अनुभव घेण्याकरता काहीही झाले तरी आपण आपली सचोटी कायम ठेवली पाहिजे. प्राचीन काळातील देवाच्या लोकांना विविध परीक्षांना तोंड द्यावे लागले. इस्राएलच्या दहा वंशाच्या राज्यात तुम्ही राहात असता, तर तुम्हाला कोणकोणत्या गोष्टींना तोंड द्यावे लागले असते याचा विचार करा. रहबामच्या कठोरतेमुळे दहा वंशांनी त्याला पाठबळ देण्याचे सोडले आणि इस्राएलच्या उत्तरीय राज्याची स्थापना केली होती. (२ इतिहास १०:१६, १७; ११:१३, १४) इस्राएलच्या अनेक राजांमध्ये येहू हा सर्वात चांगला होता, पण तोही ‘देवाच्या धर्मशास्त्राप्रमाणे पूर्ण मनाने चालला नाही.’ (२ राजे १०:३०, ३१) परंतु, दहा वंशांच्या राज्यातील काही लोकांनी आपली सचोटी सोडली नव्हती. (१ राजे १९:१८) त्यांनी देवावर विश्वास ठेवला आणि तो त्यांच्या पाठीशी राहिला. तुमच्या विश्वासाची परीक्षा होते अगदी तेव्हा देखील तुम्ही यहोवाप्रती असलेली तुमची सचोटी कायम ठेवता का?
१४. हिज्किया राजाच्या काळात यहोवाने लोकांचे कसे तारण केले आणि कोणत्या कारणास्तव बॅबिलोनच्या लोकांनी यहुदावर विजय मिळवला?
१४ देवाच्या नियमशास्त्राची सर्वत्र उपेक्षा होत असल्यामुळे इस्राएलच्या या राज्यावर संकट कोसळले. सा.यु.पू. ७४० मध्ये जेव्हा अश्शुरी लोकांनी या राज्यावर विजय मिळवला तेव्हा तेथील दहा वंशांतील लोकांनी यहुदाच्या दोन वंशांच्या राज्याकडे पलायन केले कारण तेथे ते यहोवाच्या मंदिरात त्याची उपासना करू शकत होते. दावीदाच्या वंशातून आलेल्या यहुदाच्या १९ राजांपैकी चार राजे—आसा, यहोशाफाट, हिज्किया आणि योशीया—ईश्वरनिष्ठेत उल्लेखणीय होते. हिज्किया या सचोटी राखणाऱ्या राजाच्या काळात अश्शुरी लोकांनी मोठ्या सैन्यानिशी यहुदावर चढाई केली. हिज्कियाच्या विनवणीला उत्तर देत देवाने केवळ एका देवदूताद्वारे १,८५,००० अश्शुरी सैनिकांना एका रात्रीत ठार मारले आणि अशाप्रकारे त्याच्या उपासकांना तारले! (यशया ३७:३६-३८) पण त्यानंतर, या लोकांनी देवाच्या नियमशास्त्राचे पालन करण्याचे सोडून दिले आणि देवाच्या संदेष्ट्यांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केले; त्यामुळे बॅबिलोनच्या लोकांनी यहुदावर विजय मिळवला आणि सा.यु.पू .६०७ मध्ये जेरुसलेम या त्याच्या राजधानीचा आणि मंदिराचा नाश केला.
१५. बॅबिलोनमधील यहुदी लोकांना सहनशक्तीची गरज का होती आणि अखेरीस यहोवाने त्या लोकांची कशी सुटका केली?
१५ यहुदी बंदिवानांना बॅबिलोनच्या बंदिवासात ७० वर्षांच्या दुःखद काळात देवाप्रती सचोटी राखण्याकरता सहनशक्तीची गरज होती. (स्तोत्र १३७:१-६) त्यांच्यापैकी संदेष्टा दानीएल सचोटी राखण्यात उल्लेखणीय होता. (दानीएल १:१-७; ९:१-३) पारसाचा राजा कोरेश याने सा.यु.पू. ५३७ मध्ये यहुद्यांना परत जाण्याची आणि मंदिराची पुर्नउभारणी करण्याची परवानगी दिली तेव्हा दानीएलाला झालेल्या आनंदाची कल्पना करा! (एज्रा १:१-४) दानीएल आणि त्याच्यासोबतच्या लोकांनी कित्येक वर्षे धीर धरला, पण अखेरीस त्यांनी बॅबिलोनचा पाडाव आणि यहोवाच्या लोकांची सुटका पाहिली. यामुळे “मोठी बाबेल,” अर्थात खोट्या धर्माच्या जागतिक साम्राज्याचा नाश होण्याची वाट पाहत असताना आपल्याला धीर धरण्यास मदत झाली पाहिजे.—प्रकटीकरण १८:१-५.
यहोवा नेहमीच त्याच्या लोकांना वाचवतो
१६. एस्तेर राणीच्या काळात देवाने कशाप्रकारे लोकांचे तारण केले?
१६ यहोवाचे लोक त्याचे नाव धारण करत असल्यामुळे तो नेहमीच त्यांना वाचवतो. (१ शमुवेल १२:२२; यशया ४३:१०-१२) यासाठी एस्तेर राणीच्या काळाचा—सा.यु.पू. पाचव्या शतकाचा विचार करा. अहश्वेरोश (झेरेस्स पहिला) राजाने हामानाला पंतप्रधान म्हणून नेमले आहे. मर्दखय नावाचा एक यहुदी त्याला नमून मुजरा करत नसल्यामुळे हामान रागाने पेटून उठतो आणि मर्दखयला आणि त्याच्यासह पर्शियन साम्राज्यातल्या सर्व यहुद्यांना खलास करून टाकण्याचा कट रचतो. यहुदी लोक कायद्याचे उल्लंघन करतात असे चित्र त्यांच्याबद्दल तो उभे करतो, राजाला पैशाचे आमिष दाखवतो; तसेच यहुद्यांचा नायनाट करणाऱ्या जाहीरनाम्यावर मोहर करण्यासाठी त्याला राजाची मुद्रा देखील दिली जाते. आपण यहुदी वंशातले आहोत ही गोष्ट एस्तेर मोठ्या धैर्याने राजाला सांगते आणि हामानाचा कटही उघड करते. आता मर्दखयला फाशी देण्यासाठी जो खांब हामानाने उभा केला आहे त्यावर तो स्वतःच लटकत आहे. मर्दखयला पंतप्रधान म्हणून नेमले जाते आणि त्याबरोबरच यहुद्यांना त्यांचे स्वतःचे संरक्षण करण्यास अनुमती देण्याचा हक्कही त्याला दिला जातो. अशाप्रकारे, यहुद्यांना आपल्या शत्रूवर मोठा विजय मिळतो. (एस्तेर ३:१–९:१९) या घटनेवरून, आज यहोवाच्या आज्ञेत राहणाऱ्या लोकांना तो संकटांतून मुक्त करतो हा आपला विश्वास आणखीनच मजबूत होतो.
१७. यहुदीयात राहणाऱ्या पहिल्या शतकातील यहुद्यांची सुटका आज्ञाधारकतेमुळे कशी झाली?
१७ देव लोकांना वाचवतो याचे आणखी एक कारण म्हणजे ते त्याचे आणि त्याच्या पुत्राचे ऐकतात. पहिल्या शतकातील येशूच्या यहुदी शिष्यांपैकी तुम्ही असल्याची कल्पना करा. तो त्यांना म्हणतो: “यरुशलेमेस सैन्यांचा वेढा पडत आहे असे पाहाल तेव्हा ती ओसाड पडण्याची वेळ जवळ आली आहे असे समजा. त्या वेळेस जे यहूदीयात असतील त्यांनी डोंगरात पळून जावे.” (लूक २१:२०-२२) अनेक वर्षे उलटून जातात आणि तुम्ही विचार करता, की येशूचे हे शब्द केव्हा पूर्ण होतील. मग सा.यु. ६६ मध्ये एक यहुदी बंड पुकारण्यात येते. सेस्टीअस गॅलस याच्या नेतृत्वाखाली रोमी सैन्य जेरुसलेमला वेढा घालते आणि मंदिराच्या तटांपर्यंत मजल मारते. पण अचानक कोणतेही स्पष्ट कारण नसताना रोमी सैन्य निघून जाते. आता यहुदी ख्रिस्ती काय करणार होते? एक्लिसियासटिकल हिस्ट्री (पुस्तक ३, पाठ ६, ३) या आपल्या पुस्तकात युसीबियस म्हणतो, की त्यांनी जेरुसलेम आणि यहुदीयातून पलायन केले. येशूच्या भविष्यसूचक इशाऱ्याचे पालन केल्यामुळे त्यांचा जीव वाचला होता. येशूच्या “सर्वस्वावर” नेमलेल्या ‘विश्वासू कारभाऱ्यापासून’ मिळणाऱ्या शास्त्रवचनीय मार्गदर्शनाचा स्वीकार करण्यास तुम्ही तितकेच तत्पर आहात का?—लूक १२:४२-४४.
सार्वकालिक जीवनाकरता तारण
१८, १९. (अ) येशूच्या मृत्यूमुळे कोणते तारण साध्य होते आणि कोणाकरता? (ब) प्रेषित पौलाने काय करण्याचा पक्का निर्धार केला?
१८ येशूच्या इशाऱ्याकडे कान दिल्यामुळे यहुदीयामधील ख्रिश्चन वाचले होते. पण येशूच्या मृत्यूमुळे ‘सर्व माणसांचे’ तारण शक्य होते. (१ तीमथ्य ४:१०) आदामाने पाप केल्यामुळे त्याने स्वतःचे जीवन तर गमावलेच शिवाय संपूर्ण मानवजातीला देखील पापाच्या आणि मृत्यूच्या दास्यत्वात विकले तेव्हा खंडणी बलिदानाची आवश्यकता निर्माण झाली. (रोमकर ५:१२-१९) मोशेच्या नियमशास्त्राखाली केलेल्या पशूंच्या अर्पणामुळे पापाचे पूर्णपणे क्षालन होत नव्हते. (इब्री लोकांस १०:१-४) येशूचा कोणताही मानवी पिता नसल्यामुळे, शिवाय देवाच्या पवित्र आत्म्याने येशूचा जन्म होईपर्यंत मरीयेवर “छाया” केल्यामुळे पापाच्या किंवा अपरिपूर्णतेच्या कोणत्याही वारशापासून मुक्त असा त्याचा जन्म झाला. (लूक १:३५; योहान १:२९; १ पेत्र १:१८, १९) परिपूर्ण सचोटी रक्षक म्हणून येशू मरण पावला तेव्हा त्याने मानवजातीला विकत घेण्याकरता आणि मुक्त करण्याकरता स्वतःचे परिपूर्ण जीवन दिले. (इब्री लोकांस २:१४, १५) अशाप्रकारे ख्रिस्ताने “सर्वांसाठी मुक्तीचे मोल म्हणून स्वतःला दिले.” (१ तीमथ्य २:५, ६) तारणाच्या या तरतुदीचा सर्वांनाच फायदा मिळणार नाही, पण पूर्ण विश्वासानिशी या तरतुदीचा स्वीकार करणाऱ्यांना तो त्याचे फायदे लागू करतो.
१९ आपल्या खंडणी बलिदानाचे मूल्य स्वर्गात देवाला सादर करण्याद्वारे येशूने आदामाच्या संततीला परत विकत घेतले. (इब्री लोकांस ९:२४) अशाप्रकारे स्वर्गीय जीवनाकरता पुनरुत्थित होणाऱ्या आपल्या १,४४,००० अभिषिक्त अनुयायांची मिळून बनलेली वधू येशूला मिळाली. (इफिसकर ५:२५-२७; प्रकटीकरण १४:३, ४; २१:९) आपल्या बलिदानाचा स्वीकार करणाऱ्यांचा आणि पृथ्वीवर सार्वकालिक जीवन मिळणाऱ्यांचा तो “सनातन पिता” देखील बनतो. (१ योहान २:१, २; यशया ९:६, ७) किती ही प्रेमळ तरतूद! या व्यवस्थेची पौलाने कदर बाळगली हे त्याने करिंथमधल्या ख्रिश्चनांना लिहिलेल्या त्याच्या पत्रावरून दिसून येते आणि पुढील लेखात हेच दाखवण्यात येईल. खरे तर, सार्वकालिक जीवन मिळवण्यास तारले जाण्यासाठी यहोवाने केलेल्या महान तरतुदीचा लोकांना फायदा व्हावा म्हणून त्यांना मदत करण्याकरता पौलाने पक्का निर्धार केला होता.
तुम्ही कसे उत्तर द्याल?
◻ देव त्याच्या प्रामाणिक लोकांना वाचवतो यासाठी कोणता शास्त्रवचनीय पुरावा आहे?
◻ यहोवावर भरवसा ठेवणाऱ्या आणि सचोटी राखणाऱ्या लोकांना तो वाचवतो हे आपल्याला कसे कळते?
◻ सार्वकालिक जीवन मिळवण्यासाठी तारले जाण्यासाठी देवाने कोणती तरतूद केली?
[१२ पानांवरील चित्र]
“संकटातून मुक्त करणारा देव” यहोवा याच्यावर दावीदाने पूर्ण भरवसा ठेवला. तुम्हीही तसाच भरवसा ठेवता का?
[१५ पानांवरील चित्र]
एस्तेरच्या काळात यहोवाने केले त्याप्रमाणे तो नेहमीच आपल्या लोकांना वाचवतो