ख्रिसमसच्या प्रथा खरोखरच ख्रिस्ती प्रथा आहेत का?
नाताळ अथवा ख्रिसमस! तुम्ही, तुमचे कुटुंब किंवा तुमच्या मित्रपरिवारातील कोणी हा सण साजरा करतात का? या प्रसंगाचे धार्मिक महत्त्व लक्षात घेऊन तुम्ही तो साजरा करता का, की तुमच्यासाठी हा केवळ नवे कपडे, भेटवस्तू खरेदी करण्याचा, मौजमजा करण्याचा प्रसंग आहे? हा येशूच्या जन्माचे स्मरण करण्याचा प्रसंग आहे का, की मौजमजेखातर ख्रिस्ती तत्त्वे विसरून जाण्याचा प्रसंग?
या प्रश्नांची उत्तरे पाहण्याआधी प्रथम हे लक्षात घ्या, की जगभरात निरनिराळ्या देशांत निरनिराळ्या प्रकारे ख्रिसमस साजरा केला जातो. उदाहरणार्थ, मेक्सिको आणि लॅटिन अमेरिकेच्या काही देशांमध्ये ख्रिसमस साजरा करण्याची केवळ पद्धतच वेगळी नाही तर या सणाचे नावही वेगळे आहे. एका एन्सायक्लोपिडियानुसार, “जुन्या इंग्रजीतील ख्रिस्टस मास (ख्रिस्ताचा मास) यावरून ख्रिसमस शब्द रुढ झाला.” पण, लॅटिन अमेरिकेच्या या देशांत ला नवीदाद किंवा नेटिव्हिटी ही संज्ञा ख्रिस्ताचा जन्म या अर्थी वापरली जाते. मेक्सिकोमध्ये ख्रिसमसच्या वेळी कोणकोणत्या प्रथा पाळल्या जातात ते आता आपण पाहू या. या माहितीमुळे ख्रिसमसविषयी तुम्हाला तुमचे मत बनवता येईल.
पोसादा, “तीन बुद्धिमान पुरुष” आणि नेसीमिएन्तो
मेक्सिकोमध्ये डिसेंबर १६ पासून पोसादा नामक उत्सवांची सुरवात होते. मेक्सिकोस फिस्ट्स ऑफ लाईफ पुस्तक म्हणते: “पोसादा नामक उत्सव ख्रिसमसच्या नऊ दिवसांआधी सुरू होतात आणि ख्रिस्मस ईव्हला (ख्रिसमसच्या आदल्या रात्री) संपतात. बेथलेहेममध्ये योसेफ आणि मरीया आश्रयासाठी भटकत होते त्या घटनेच्या स्मरणार्थ हे उत्सव साजरे केले जातात. या प्रसंगी, ख्रिस्ताच्या जन्माआधी घडलेल्या घटनांचे अभिनय करण्याकरता कुटुंबे आणि मित्र-परिवार एकत्र येतात.”
तसेच, मरीया आणि योसेफाच्या प्रतिमा घेऊन लोक घरोघरी जातात आणि गीत गाऊन घरमालकाला आसरा म्हणजेच पोसादा मागतात. घरातले लोकही गीत गाऊन त्यांना उत्तर देतात आणि मग या पाहुण्यांना घरात येण्याची परवानगी दिली जाते. मग, सुरू होते पार्टी. या पार्टीत काहीजणांच्या डोळ्याला पट्टी बांधली जाते आणि हातात काठी दिली जाते. आणि मग, हे लोक आळीपाळीने दोरीवर लटकलेले सुशोभित मडके फोडण्याचा प्रयत्न करतात. मडके फोडल्यावर त्यातली कॅन्डी, फळे इत्यादी जमलेले सर्वजण गोळा करतात. यानंतर खाणेपिणे, नाचगाणे चालते. अशा आठ पोसादा पार्ट्या डिसेंबर १६ ते डिसेंबर २३ पर्यंत होतात. मग, नॉकेबवेना (ख्रिसमसची आदली रात्र) उत्सव साजरा केला जातो. त्या रात्रीच्या खास मेजवानीला कुटुंबातले सर्वजण एकत्र येण्याचा प्रयत्न करतात.
तीन चार दिवसांनी नूतन वर्ष दिन उजाडतो. हा दिवस देखील मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. मग, जानेवारी ५ तारखेला संध्याकाळी द ट्रिस रियस मेगोस (“तीन बुद्धिमान पुरुष”) मुलांसाठी खेळणी आणतात. त्यानंतर जानेवारी ६ ला रोस्का दे रियस (अंगठीच्या आकाराचा केक) सर्वांना वाटला जातो. केक खात असताना कोणालातरी केकच्या तुकड्यात एक छोटीशी बाहुली सापडते. ही बाहुली बाळ येशूला चित्रित करते. ज्या कोणाला ती सापडते तो स्व-खर्चाने फेब्रुवारी २ तारखेला एक शेवटची पार्टी देतो. (काही ठिकाणी तीन बाहुल्या असतात. त्या ‘तीन बुद्धिमान पुरुषांना’ चित्रित करतात.) अशाप्रकारे ख्रिसमसच्या निमित्ताने पार्ट्यांमागून पार्ट्या चालत असतात.
या काळात नेसीमिएन्तो (बाळ येशूच्या जन्माचे दृश्य) ठिकठिकाणी आढळते. पण, यात नेमके काय केले जाते? सार्वजनिक ठिकाणी, चर्चेसमधून, घराघरातून मातीचे, कागद-लगद्याचे किंवा चिनी-मातीचे लहान-मोठे पुतळे बनवले जातात. हे पुतळे गव्हाणीतील नवजात बालकासमोर गुडघे टेकलेल्या योसेफ आणि मरीयेचे असतात. या दृश्यात बऱ्याचदा, मेंढपाळ आणि रेयस मेगोस (“बुद्धिमान पुरुष”) दाखवले जातात. तसेच, त्यात तबेला आणि काही जनावरेसुद्धा दाखवली असतात. पण, नवजात बालक हे त्या देखाव्यांचे खास आकर्षण असते. स्पॅनिश भाषेत त्या नवजात बाळाला एल नीनो डायओस म्हणजे बाळ देव असे म्हणतात. ख्रिसमसच्या आदल्या रात्री या नवजात बाळाला तिथे ठेवले जाते.
या प्रथांचा उगम
जगभरात ख्रिसमस या नावाने माहीत असलेल्या सणाविषयी दी एन्सायक्लोपीडिया अमेरिकाना म्हणते: “आजकाल ख्रिसमसच्या वेळी पाळल्या जाणाऱ्या बहुतेक प्रथा ख्रिसमसच्या मूळ प्रथा नाहीत. खरं म्हणजे, ख्रिस्ती चर्चेसने ख्रिस्त पूर्व काळातील आणि गैर ख्रिस्ती धर्मांतून उसन्या घेतलेल्या त्या प्रथा आहेत. ख्रिसमसप्रसंगी ज्या प्रथा पाळल्या जातात त्या सॅटर्नेलिया नावाच्या एका रोमी उत्सवातूनच आल्या आहेत. डिसेंबर महिन्याच्या मध्यात हा उत्सव साजरा करताना रोमी लोक एकमेकांना भेटवस्तू देऊन आनंदोत्सव साजरा करत असत. आणि याच उत्सवांतून ख्रिसमसच्या वेळी मोठमोठ्या मेजवाण्या देणे, एकमेकांना भेटवस्तू देणे आणि मेणबत्त्या लावण्याच्या वहिवाटीचा उगम झाला.”
लॅटिन अमेरिकेत येशूच्या जन्माशी निगडित मूळ प्रथांसोबतच इतर चालीरीती देखील पाळल्या जातात. मग, ‘या अतिरिक्त प्रथा कोठून आल्या’ असा प्रश्न तुम्हाला पडेल. बायबलचे पालन करणाऱ्या अनेकांना माहीत आहे, की यांपैकी काही चालीरिती ॲझेटिक लोकांच्या धर्म विधींमधून घेतल्या आहेत. मेक्सिको शहराच्या एल युनिव्हर्सल वृत्तपत्राने सदर विषयावर टिपणी केली: “कॅथलिक धर्माचे बरेच मिशनरी ॲझेटिक लोकांचे धर्मांतर करू इच्छित होते. आणि त्यांच्या लक्षात आले ॲझेटिक नावाच्या इंडियन जमातीचे आणि कॅथलिक लोकांचे सण एकाच वेळी येतात. याचा फायदा घेऊन त्यांनी ॲझेटिक इंडियनांचे ख्रिस्ती धर्मांतर घडवून आणण्याचा प्रयत्न केला. त्यांनी ॲझेटिक देवीदेवतांच्या जयंतीऐवजी ख्रिस्ती सण साजरा करायला सुरवात केली. आणि इंडियन रितीरिवाजांशी युरोपियन रितीरिवाजांची सांगड घातली. अशाप्रकारे, दोन्ही संस्कृतींचे, रुढी-परंपरांचे मिश्रण घडून आले. म्हणूनच, अनेक ख्रिस्ती सणांना मेक्सिकन नावे दिलेली आहेत.”
यावर दी एन्सायक्लोपिडिया अमेरिकाना खुलासा करते: “ख्रिसमस साजरा होऊ लागला त्याच्या काही काळानंतरच येशूच्या जन्माशी निगडित घटनांची नाटके करण्याची चाल रूढ झाली. . . . असे म्हटले जाते की, चर्चमधील क्रेशचे [येशू बाळाच्या जन्माचे दृश्य] देखावे प्रथम सेंट फ्रान्सिसने सुरू केले होते.” येशूच्या जन्मासंबंधित या नाटकांचे मेक्सिकोच्या वसाहत काळात अनेक चर्चेसमधून प्रयोग केले जायचे. इंडियनांना येशूच्या जन्मासंबंधित घटना शिकवण्याच्या हेतूने सेंट फ्रान्सिसचे अनुयायी ही नाटके करत असत. नंतरच्या काळात पोसादा उत्सव अधिक लोकप्रिय झाले. या पोसादांचा हेतू कोणता का असेना आज ज्या पद्धतीने ते साजरे केले जातात त्यावरून त्यांच्या खऱ्या स्वरूपाची माहिती मिळते. या उत्सवप्रसंगी तुम्ही मेक्सिकोत असाल तर एल युनिव्हर्सल वृत्तपत्राने या विषयावर जे काही म्हटले ते चांगल्याप्रकारे तुम्हाला समजेल. सदर वृत्तपत्राने म्हटले: “पूर्वीचे पोसादा आम्हाला याची आठवण करून द्यायचे, की कशाप्रकारे बाळ देवाला (येशूला) जन्म देण्यासाठी येशूचे आईवडील आश्रयाच्या शोधात भटकत होते. पण, आजकालच्या पोसादांमध्ये पोकळपणा आढळतो. लोक दारूच्या नशेत झिंगलेले असतात, थिल्लरपणा करतात, आधाशासारखे खातात आणि अधिकाधिक अपराध करतात.”
नेसीमिएन्तोची कल्पना वसाहत काळात चर्चेसमधील नाटकांच्या प्रयोगांतून उदयास आली. काहींना ती फार आकर्षक वाटते. पण, प्रश्न आहे, की ती बायबलला अनुसरून आहे का? हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण ते तथाकथित तीन बुद्धिमान पुरुष जे वास्तवात फलज्योतिषी होते—येशूला भेटायला आले तेव्हा येशू आणि त्याचे आईवडील तबेल्यात राहात नव्हते. येशूचा जन्म होऊन बराच काळ लोटला होता. आणि त्यांचे कुटुंब आता एका घरात राहत होते. ही मनोरंजक माहिती, देवाच्या प्रेरणेने लिहिलेल्या बायबलमधील मत्तय २:१, ११ या वचनांत दिलेली आहे. तसेच, येशूला भेटायला किती फलज्योतिषी आले होते हे बायबल सांगत नाही हे देखील तुमच्या लक्षात येईल.a
लॅटिन अमेरिकेत त्या तीन बुद्धिमान पुरुषांऐवजी सॅन्टा क्लॉसची कल्पना रूढ झाली. जगभरात अनेक देशांत केले जाते त्याप्रमाणे या ठिकाणीही आईवडील घरांत मुलांसाठी खेळणी लपवून ठेवतात. मग, जानेवारी ६ तारखेला सकाळी, जणू त्या तीन बुद्धिमान पुरुषांनी ती खेळणी आपल्यासाठी आणली आहेत असे समजून मुले ती खेळणी शोधून काढतात. प्रामाणिक अंतःकरणाच्या लोकांना ही एक काल्पनिक कथा वाटत असली तर खेळणी विकणाऱ्यांसाठी हा भरपूर पैसा कमावण्याचा समय असतो. या धंद्यामुळे तर काही चांगलेच श्रीमंत झाले आहेत. पण, तीन बुद्धिमान पुरुषांच्या या कहाणीवर आता बऱ्याच लोकांना आणि इतकेच नाही तर लहान मुलांना देखील विश्वास राहिला नाही याचे काहींना वाईट वाटते. पण, निव्वळ रुढी-परंपरेसाठी आणि व्यापार-धंद्यासाठी टिकवून ठेवलेल्या या दंतकथेबद्दल आणखी कोणती अपेक्षा करता येईल?
खरे म्हणजे सुरवातीच्या ख्रिश्चनांनी ख्रिसमस अथवा येशूचा जन्म दिवस कधीच साजरा केला नाही. एक एन्सायक्लोपिडिया म्हणतो: “पहिल्या शतकातील ख्रिस्ती चर्च थोर व्यक्तींचा जन्मदिन (जयंती) न पाळता मृत्यूदिन (पुण्यतिथी) पाळत असे. त्यामुळे हा सण त्यांनी कधीच साजरा केला नाही.” बायबलमध्ये जन्म दिवस साजरा करण्याचा संबंध देवाच्या खऱ्या उपासकांशी नव्हे तर मूर्तीपूजक धर्मांशी जोडलेला आहे.—मत्तय १४:६-१०.
पण, याचा अर्थ आपण देवाचा पुत्र येशू याच्या जन्मासंबंधित घटनांचा अभ्यास करून ती आठवणीत ठेवू नयेत असा होत नाही. या घटनांविषयी बायबलमध्ये दिलेल्या खऱ्या माहितीमुळे देवाच्या अपेक्षा पूर्ण करू इच्छिणाऱ्या लोकांना त्याची गहन समज आणि बोध प्राप्त होतो.
येशूच्या जन्माविषयी बायबल काय म्हणते?
बायबलमधील मत्तय आणि लूकच्या शुभवर्तमानात येशूच्या जन्मासंबंधी विश्वासहार्य माहिती दिलेली आहे. त्यात म्हटले आहे, की एकदा गॅब्रिएल देवदूत गालीलातील नासरेथ गावात मरीया नावाच्या एका कुमारीला जाऊन भेटतो. तो तिला काय संदेश देतो? तो म्हणतो: “पाहा, तू गरोदर राहशील व तुला पुत्र होईल. त्याचे नाव येशू ठेव. तो थोर होईल व त्याला परात्पराचा पुत्र म्हणतील; आणि प्रभु देव त्याला त्याचा पूर्वज दावीद ह्याचे राजासन देईल; आणि तो याकोबाच्या घराण्यावर ‘युगानुयुग राज्य करील,’ व त्याच्या राज्याचा अंत होणार नाही.”—लूक १:३१-३३.
हे ऐकून मरीयेला धक्काच बसला. कारण तिचे अजून लग्न झाले नव्हते. योसेफ नावाच्या एका मनुष्याबरोबर तिची फक्त मागणी झाली होती. त्यामुळे ती देवदूताला म्हणते: “हे कसे होईल? कारण मला पुरूष ठाऊक नाही.” त्यावर देवदूताने तिला उत्तर दिले, “पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि परात्पराचे सामर्थ्य तुझ्यावर छाया करील; ह्या कारणाने ज्याचा जन्म होईल त्याला पवित्र, देवाचा पुत्र, असे म्हणतील.” ही देवाचीच इच्छा आहे हे ओळखून मरीया म्हणते: “पाहा मी प्रभूची दासी; आपण सांगितल्याप्रमाणे मला होवो.”—लूक १:३४-३८.
मरीयेला दिवस गेले आहेत हे ऐकून योसेफ तिला सोडून देण्याचा विचार करत असतो. पण, या चमत्कारिक जन्माविषयी स्वर्गदूत योसेफाला सांगतो तेव्हा देवाच्या पुत्राचे पालनपोषण करण्याची जबाबदारी उचलण्यास योसेफ लगेच तयार होतो.—मत्तय १:१८-२५.
मग, कैसर औगुस्त याने काढलेल्या हुकुमामुळे योसेफ आणि मरीयेला नावनिशी करण्यासाठी गालीलातील नासरेथ गावाहून आपल्या जन्म-गावी म्हणजे यहुदियातील बेथलेहेमला जावे लागते. याबद्दलचा बायबलमधील अहवाल सांगतो “ते तेथे असताना असे झाले की, तिचे दिवस पूर्ण भरले; आणि तिला तिचा प्रथमपुत्र झाला; त्याला तिने बाळंत्याने गुंडाळून गव्हाणीत ठेविले, कारण त्यांना उतारशाळेत जागा नव्हती.”—लूक २:१-७.
त्यानंतर काय होते त्याचे लूक २:८-१४ मध्ये वर्णन केले आहे: “त्याच परिसरात मेंढपाळ रानात राहून रात्रीच्या वेळी आपले कळप राखीत होते. तेव्हा प्रभूचा दूत त्यांच्याजवळ उभा राहिला, प्रभूचे तेज त्यांच्याभोवती प्रकाशले आणि त्यांना मोठी भीति वाटली. तेव्हा देवदूत त्यांना म्हणाला भिऊ नका, कारण पाहा, जो मोठा आनंद सर्व लोकांस होणार आहे, त्याची सुवार्ता मी तुम्हास सांगतो; ती ही की, तुमच्यासाठी आज दावीदाच्या गावात तारणारा जन्मला आहे; तो ख्रिस्त प्रभु आहे; आणि तुम्हास खूण ही की, बाळंत्याने गुंडाळलेले व गव्हाणीत ठेवलेले एक बाळक तुम्हास आढळेल. इतक्यात स्वर्गातील सैन्यांचा समुदाय त्या देवदूताजवळ अकस्मात प्रगट झाला आणि देवदूत देवाची स्तुति करीत म्हणाले, ऊर्ध्वलोकी देवाला गौरव, आणि पृथ्वीवर ज्यांच्यावर त्याचा प्रसाद झाला आहे त्या मनुष्यात शांति.”
फलज्योतिषी
मत्तयाचा अहवाल म्हणतो, की यहुद्यांचा राजा कुठे जन्मला आहे हे शोधत पूर्वेकडून फलज्योतिषी यरूशलेमेत आले. येशूच्या जन्माविषयी जाणून घेण्यास हेरोद राजा खूप उत्सुक होता. पण, त्यामागचा त्याचा हेतू वेगळाच होता. “त्यांना [फलज्योतिषींना] बेथलेहेमास पाठविताना” त्याने “म्हटले, तुम्ही जाऊन त्या बाळकाविषयी बारकाईने विचारपूस करा, व तुम्हाला शोध लागल्यावर मला कळवा म्हणजे मीहि येऊन त्याला नमन करीन.” अहवाल सांगतो की फलज्योतिषी त्या बालकाला भेटल्यावर त्यांनी “आपल्या द्रव्याच्या थैल्या सोडून ‘सोने, ऊद व गंधरस’ ही दाने त्याला अर्पिली.” त्यांना “हेरोदाकडे परत जाऊ नका, अशी स्वप्नात सूचना मिळाल्यामुळे” ते हेरोदाकडे जात नाहीत. देव एका देवदूतामार्फत योसेफाला हेरोदाच्या दुष्ट हेतूंची कल्पना देतो तेव्हा योसेफ आणि मरीया बालकास घेऊन लगेच मिसर देशास निघून जातात. नंतर, त्या नवीन राजाला अर्थात येशूला ठार करण्याच्या उद्देशाने हेरोद राजा बेथलहेम आणि आसपासच्या सर्व प्रदेशातील मुलांना जिवे मारण्याचा हुकूम देतो. कोणत्या मुलांना? दोन वर्षे व त्याहून कमी वयाच्या मुलांना.—मत्तय २:१-१६.
या घटनांवरून आपण काय शिकतो?
येशूला भेटायला गेलेले हे फलज्योतिषी—मग ते किती का असेनात—खऱ्या देवाची उपासना करणारे नव्हते. ला नूवा बिब्लिया लातिनोअमेरीका (१९८९ आवृत्ती) यातील तळटीप म्हणते: ‘हे जादूगार (मागी लोक) खरं तर राजे नव्हते. ते ज्योतिषी आणि मूर्तिपूजक धर्मगुरू होते.’ ते ग्रहताऱ्यांचे उपासक होते आणि याच ज्ञानाच्या आधारावर ते आले होते. येशूच्या जन्माविषयीचा तो तारा देवाकडून असता तर त्या ताऱ्याने त्यांना बरोबर त्याच ठिकाणी जाण्यास मार्गदर्शित केले असते जिथे येशू होता. पण, या ताऱ्याने तसे केले नाही. उलट, आधी यरुशलेमेत हेरोदाच्या राजवाड्याकडे त्यांना मार्गदर्शित केले. पण, बालकाचा जीव वाचवण्याच्या उद्देशाने त्यांचा बेत बदलण्यास देवाने हस्तक्षेप केला.
ख्रिसमसच्या वेळी या घटनांभोवती दंतकथांचे आणि कल्पनांचे वलय असल्यामुळे सगळ्यात महत्त्वपूर्ण गोष्टीकडे दुर्लक्ष होते. ती म्हणजे, मरीयेला आणि मेंढपाळांना सांगितल्याप्रमाणे एक महान, वैभवी राजा बनण्यासाठी त्या बाळाचा जन्म झाला होता. तेव्हा, येशू आतापर्यंत बाळ नाही किंवा बालकही नाही. तर देवाच्या राज्याचा तो राजा आहे. आता लवकरच हे राज्य देवाविरुद्ध उठणाऱ्या सर्व राज्यांना धुळीस मिळवील आणि मानवजातीच्या सर्व समस्या सोडवील. प्रभुच्या प्रार्थनेत ज्या राज्याविषयी आपण बोलतो तेच हे राज्य.—दानीएल २:४४; मत्तय ६:९, १०.
देवदूतांनी मेंढपाळांना जाहीरपणे जे काही सांगितले त्यावरून आपण हे शिकतो, की सुसंदेश ऐकण्याची इच्छा असणाऱ्या सर्वांसाठी तारण प्राप्त करण्याची संधी आहे. देवाचा अनुग्रह प्राप्त करणाऱ्यांना देव “शांति” देतो. येशू ख्रिस्ताच्या राज्यात संबंध जगभरात शांती असेल अशी आशा आपण बाळगू शकतो. पण, त्या शांतीचा अनुभव घेण्यासाठी लोकांनी देवाच्या इच्छेनुसार जीवन व्यतीत केले पाहिजे. ख्रिसमसचे वातावरण यासाठी उत्तेजन देते का? किंवा ख्रिसमसप्रसंगी देवाच्या आज्ञांचे पालन करण्याची इच्छा दिसून येते का? बायबलनुसार जीवन व्यतीत करणाऱ्या अनेक प्रामाणिक अंतःकरणाच्या लोकांना याचे उत्तर स्पष्ट आहे.—लूक २:१०, ११, १४.
[तळटीप]
a दुर्लक्ष करून चालणार नाही अशी आणखीन एक गोष्ट, म्हणजे देव स्वतः एका बालकाच्या रुपात पृथ्वीवर आला या कल्पनेतून मेक्सिकन नेसीमिएन्तोमध्ये त्या बालकास “बाळ देव” म्हटले आहे. पण, बायबल स्पष्टपणे म्हणते, की येशू देवाचा पुत्र आहे आणि त्याचा पृथ्वीवर जन्म झाला. तसेच, येशू सर्वसमर्थ देव यहोवा नव्हता किंवा यहोवाच्या बरोबरीचा देखील नव्हता. बायबलमधील लूक १:३५; योहान ३:१६; ५:३७; १४:१, ६, ९,२८; १७:१, ३; २०:१७ या शास्त्रवचनांत दिलेले याचे प्रमाण पडताळून पाहा.
[४ पानांवरील चौकट]
काही जण चकीत होतील
ख्रिसमसवर अनेक वर्षे संशोधन केल्यानंतर लेखक टॉम फ्लिन यांनी द ट्रबल विथ ख्रिसमस या पुस्तकात शेवटी म्हटले:
“ख्रिसमसशी निगडित असंख्य प्रथांचा उगम ख्रिस्त पूर्व काळातील मूर्तिपूजक धर्मांतून झाला आहे. यांपैकी काही प्रथा निरनिराळ्या समाजांशी, लैंगिक प्रथांशी किंवा ज्योतिष-विद्येशी संबंधित आहेत. सध्याच्या शिकल्या-सवरलेल्या लोकांना या प्रथांच्या उगमाची अचूक माहिती मिळाल्यास या सर्व रुढी-परंपरा ते कदाचित झुगारून देतील.”—पृष्ठ १९.
या गोष्टीला पुष्टी देणारा भरघोस पुरावा देऊन फ्लिन मुख्य मुद्यावर येतात: “ख्रिसमसची सगळ्यात विलक्षण गोष्ट म्हणजे ख्रिसमस एक ख्रिस्ती सण मानला जात असला तरी त्यात ख्रिस्तीत्वाचा लवलेशही राहिलेला नाही. त्यामुळे ख्रिस्त पूर्व काळातील आणि ख्रिस्त-नंतर काळातील चालीरिती वगळल्यास लक्षात येते, की ख्रिस्ती धर्माच्या सुरवातीच्या काळातील एकही प्रथा राहिलेली नाही.”—पृष्ठ १५५.
[७ पानांवरील चित्र]
येशूच्या जन्माची घोषणा झाली त्याच वेळी भविष्यात तो देवाचा नियुक्त राजा म्हणून राज्य करील हे भविष्य वर्तवण्यात आले होते