त्यांनी यहोवाच्या इच्छेप्रमाणे केले
येशू मुलांसोबत वेळ घालवतो
येशूचे साडेतीन वर्षांचे सेवाकार्य संपण्याच्या बेतात आहे. तो आता लवकरच जेरुसलेममध्ये जाणार आहे आणि तेथे त्याला वेदनामय मृत्यूला सामोरे जावे लागणार आहे. पुढे काय होणार, याची त्याला चांगली कल्पना आहे कारण त्याने त्याच्या शिष्यांना असे म्हटले: “मनुष्याचा पुत्र माणसांच्या हाती दिला जाणार आहे; ते त्याला जिवे मारतील.”—मार्क ९:३१.
त्यामुळे प्रत्येक दिवसाचा, प्रत्येक तासाचा आणि प्रत्येक क्षणाचा कशाप्रकारे जास्तीत-जास्त उपयोग करता येईल, हा विचार येशूच्या मनात नक्कीच असेल. त्याच्या शिष्यांकडे अद्यापही लक्ष देण्याची गरज होती. त्यांना अजूनही नम्रतेच्या बाबतीत कडक सल्ला देण्याची आवश्यकता होती तसेच अडखळण होण्याचा धोका अद्यापही त्यांना होता. (मार्क ९:३५-३७, ४२-४८) विवाह, घटस्फोट आणि सडेपण यांबाबतीतही त्यांना मार्गदर्शन देण्याची आवश्यकता होती. (मत्तय १९:३-१२) आपण लवकरच मरणार आहोत, हे माहीत असल्यामुळे येशू त्याच्या शिष्यांशी थोडक्यात आणि वेळेचे गांभीर्य जाणूनच बोलत होता. वेळ इतका अनमोल असूनही येशूने काय केले हे पाहिल्यानंतर आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही.
येशू मुलांना बोलावतो
बायबलमधील अहवाल म्हणतो: “त्याने बाळकांस स्पर्श करावा म्हणून लोकांनी त्यांना त्याच्याकडे आणिले.” येशूच्या शिष्यांनी हे पाहिले तेव्हा त्यांनी त्यांस रोखले. येशू अतिमहत्त्वाची व्यक्ती आहे किंवा मुलांसाठी त्याच्याकडे वेळ नाही, असा त्याच्या शिष्यांनी कदाचित विचार केला असावा. पण येशूने त्याच्या शिष्यांना दटावले तेव्हा त्यांना नक्कीच आश्चर्य वाटले असेल! येशूने त्यांना म्हटले: “बाळकांस माझ्याजवळ येऊ द्या; त्यांना मनाई करू नका, कारण देवाचे राज्य त्यांच्यासारख्यांचेच आहे.” त्यानंतर येशूने म्हटले: “मी तुम्हाला खचित सांगतो, जो कोणी बाळकासारखा होऊन देवाच्या राज्याचा स्वीकार करणार नाही त्याचा प्रवेश त्यात मुळीच होणार नाही.”—मार्क १०:१३-१५.
येशूने मुलांमध्ये उत्कृष्ट गुण पाहिले. बहुतेक मुले चौकस आणि विश्वासू असतात. त्यांच्या पालकांचे म्हणणे ते ऐकतात आणि इतर मुलांच्यासमोर त्यांच्या पालकांची बाजू घेतात. देवाच्या राज्यात प्रवेश करण्याची इच्छा असणाऱ्या सर्वांनी या मुलांच्या ग्रहणक्षम स्वभावाचे अनुकरण करण्यास हवे. म्हणूनच येशूने म्हटले, “देवाचे राज्य त्यांच्यासारख्यांचेच आहे.”—पडताळा मत्तय १८:१-५.
केवळ दृष्टान्त देता यावा म्हणून येशूने या मुलांचा उपयोग केला नाही. बायबलमधून हे स्पष्ट होते, की त्याला मुलांसोबत राहायला खरोखरच आवडत होते. मार्कचा अहवाल दाखवून देतो, की येशूने “त्यांना कवटाळून व त्यांच्यावर हात ठेवून त्यांना आशीर्वाद दिला.” (मार्क १०:१६) केवळ मार्कच्या अहवालात दिसून येते, की येशूने ‘मुलांना कवटाळले.’a येशूने केवळ “स्पर्श” करावा म्हणून लोकांनी त्यांच्या मुलांना त्याच्याकडे आणले होते, पण येशूने या बालकांना चक्क कवटाळले.
येशूने मुलांवर ‘हात ठेवला’ तो कोणत्या अर्थाने? बाप्तिस्म्यासारख्या एखाद्या धार्मिक विधीला हे सूचित होत नाही. काही प्रसंगी हात ठेवणे याचा अर्थ नियुक्त करणे असा होतो, तर काही वेळा आशीर्वाद देत असल्याचे दाखवण्यासाठीही हा शब्दप्रयोग वापरला जातो. (उत्पत्ति ४८:१४; प्रेषितांची कृत्ये ६:६) म्हणून येशू येथे मुलांना केवळ आशीर्वाद देत असावा.
पण, मार्क “आशीर्वाद” (काटिऊलोजिओ) यासाठी जोरदार शब्दाचा उपयोग करतो. यावरून दिसून येते, की येशूने मुलांना मनापासून, कोमलतेने आणि प्रेमळपणे आशीर्वाद दिला. मुलांमुळे खूप वेळ वाया जातो आणि ती डोक्याला ताप आहेत असे त्याला मुळीच वाटले नाही.
आपल्याकरता धडा
येशू मुलांसोबत आणि मोठ्यांसोबत कधीही धाकदपटशाने वागला नाही किंवा त्याने त्यांना कधीही कमी लेखले नाही. एक पुस्तक त्याच्याविषयी म्हणते: “तो त्यांच्यासोबत अगदी खेळीमेळीने वागला असावा.” म्हणूनच, कोणत्याही वयाच्या व्यक्तीला त्याच्या सहवासात संकोच वाटत नसे. येशूच्या उदाहरणाचा विचार केल्यानंतर, आपण स्वतःला असे विचारू शकतो, ‘माझ्याशी बोलायला लोकांना नकोसे वाटते का?’ ‘इतरांची विचारपूस करायला माझ्याजवळ वेळच नसतो का?’ लोकांमध्ये खरी आस्था घेऊ लागल्याने आपणही येशूप्रमाणे होता होईल तितकी त्यांना मदत करायला प्रेरित होऊ. आपल्याला त्यांच्याविषयी खरी कळकळ आहे, हे लोकांना समजल्यानंतर त्यांना आपल्या सहवासात राहायला आवडेल.—नीतिसूत्रे ११:२५.
मार्कचा अहवाल हे दाखवून देतो, की येशूला मुलांसोबत राहायला आवडायचे. त्यांच्या खेळाचे निरीक्षण करण्यासाठी त्याने कदाचित वेळ काढला असावा कारण त्यांच्या एका खेळाचा त्याने दृष्टान्त म्हणून उपयोग केला. (मत्तय ११:१६- १९) येशूने ज्या मुलांना आशीर्वाद दिला त्यांतली काही मुले इतकी लहान असावीत, की कदाचित त्यांना येशू कोण आहे, तो काय शिकवत आहे हे समजले देखील नसावे. पण त्यामुळे त्याला असे वाटले नाही, की त्याचा वेळ वाया जात आहे. त्याला मुले आवडायची त्यामुळेच त्याने त्यांच्यासोबत वेळ घालवला. येशूला त्याच्या सेवाकार्यात भेटलेली मुले त्याने दाखवलेल्या जिव्हाळ्यामुळे नंतर शिष्य बनली असावीत.
येशूने त्याच्या जीवनाच्या शेवटल्या खडतर आठवड्यात मुलांसोबत वेळ घालवला, तर आपल्यालाही ओढगस्तीच्या कामात मुलांकरता वेळ काढता येण्यासारखा आहे. अनाथ मुलामुलींकडे आपण विशेष लक्ष देण्यास हवे. मुलांकडे लक्ष दिले जाते तेव्हा ती बहरतात आणि यहोवाची हीच इच्छा आहे, की आपण त्यांच्यावर प्रेम करावे आणि त्यांच्या मदतीकरता होता होईल तितके करावे.—स्तोत्र १०:१४.
[तळटीपा]
a एक भाषांतर असे म्हणते की त्याने “मुलांना कवेत उचलून घेतले.”