सत्याने देवाची उपासना करणे
देवाने आपली सेवा स्वीकारावी, असे आपल्याला वाटत असल्यास आपली सेवा सत्यावर आधारलेली असणे गरजेचे आहे. (योहान ४:२३) बायबलमध्ये खऱ्या उपासकांची ओळख ‘जिवंत देवाच्या मंडळीचे मालक, स्तंभ आणि पाया’ अशी करून देण्यात आली आहे. (१ तीमथ्य ३:१५) देवाची मंडळी ज्या लोकांची मिळून बनली आहे ते देवाच्या वचनाच्या सत्यावर केवळ विश्वासच ठेवत नाहीत, तर त्यानुसार चालतात आणि त्याचे समर्थन करतात. त्याचप्रमाणे त्या वचनाची संपूर्ण पृथ्वीवर घोषणा करतात.—मत्तय २४:१४; रोमकर १०:९-१५.
आपल्या बायबलच्या शैक्षणिक कार्याबद्दल यहोवाचे साक्षीदार सर्वज्ञात आहेत. हे कार्य सध्या २०० पेक्षा अधिक देशांमध्ये केले जात आहे. ते बायबलचा अभ्यास करतात आणि तेच सत्य आहे असे लोकांना शिकवतात. असे करताना बायबलमध्ये ते कोणत्याही मानवी तत्त्वज्ञानाची सरमिसळ करत नाहीत. बायबल आधारित त्यांच्या शिकवणींशी तुम्ही परिचित आहात का? यहोवाच्या साक्षीदारांविषयी चुकीच्या समजुती पसरविल्या जात असल्यामुळे अनेक लोक त्यांचे ऐकायला सहजासहजी तयार होत नाहीत. साक्षीदार ज्याचा प्रचार करतात ते सत्य आहे किंवा नाही याचा निर्णय स्वतः घेण्याचे प्रामाणिक अंतःकरणाच्या लोकांना आवाहन देण्यात येते. अशाप्रकारचा महत्त्वपूर्ण निर्णय कोणत्याही अफवेवर आधारलेला नसावा. यहोवाच्या साक्षीदारांच्या शिकवणींचे स्वतः परीक्षण केल्यामुळे अनेकांना खूपच फायदा झाला आहे.
सत्याच्या ज्ञानाने भय नाहीसे होते
उदाहरणार्थ, एउखेनियाचा विचार करा. ती एका कट्टर कॅथलिक घरात लहानाची मोठी झाली. पोपचा एक अधिकारी सन १९७९ मध्ये मेक्सिकोला भेट देण्याकरता आला तेव्हा संयोजन करणाऱ्यांमध्ये तिचे वडील देखील होते. आपल्या मित्रपरिवाराकडे जात असताना एउखेनियाला यहोवाचे साक्षीदार भेटले. त्यांच्या मदतीने ती, बायबल काय सांगते याचा काळजीपूर्वक अभ्यास करू लागली. ती म्हणते: “पहिल्या पहिल्यांदा, माझ्या मनात भयानं घर करायला सुरवात केली. मला सत्य मिळालं होतं! माझे आधीचे बहुतेक धार्मिक विश्वास चुकीचे होते हा त्याचा स्पष्ट अर्थ होता. माझ्या घरातील लोक, माझे मित्र ज्यांवर माझं अतिशय प्रेम होतं—त्यांचे सर्व धार्मिक विश्वास चुकीचे होते. मला अगदी अस्वस्थ वाटू लागलं. मी शिकलेल्या नवीन गोष्टी माझ्या घरच्यांना कळल्या तर ते काय म्हणतील हा विचार मला खाऊ लागला. कालांतराने आणि यहोवाच्या मदतीने माझ्या मनावरील हे दडपण कमी होऊ लागलं. धर्मशास्त्राचा प्राध्यापक असलेल्या आमच्या एका स्नेह्याला सर्वकाही सांगण्याचं मी ठरवलं. सत्याचा शोध घेण्याची माझी मनसा मी त्याच्याकडे व्यक्त केली. माझं ऐकल्यानंतर त्यानं म्हटलं, ‘तुला सत्य जाणून घ्यायचं असल्यास, तू सरळ यहोवाच्या साक्षीदारांकडे जा.’”
घरचे आपल्याला अंतरणार तर नाहीत ना, या भीतीने एउखेनियाची गाळण उडाली होती. परंतु यहोवाच्या साक्षीदारांनी तिला आध्यात्मिक मदत देण्याचे कायम ठेवले. ती म्हणते: “सत्याकरता ठाम भूमिका घ्यावी म्हणून मला पक्क करण्यात आलं होतं. माझा संघर्ष योग्य त्या गोष्टीसाठी आहे हे मी पुरतं ओळखलं होतं. यहोवाच्या साक्षीदारांनी मला आपल्यात सामावून घेतलं हे फार महत्त्वाचं होतं. ख्रिस्ती मंडळीमध्ये मी रूळले. देवाच्या संघटनेच्या निकट गेल्यामुळे घरच्यांच्या आधाराविना सत्याकरता भूमिका घेण्याचं भय केव्हाच नाहीसं झालं होतं.”
दुसऱ्या एका उदाहरणाचा विचार करा. सब्रिना एका धार्मिक घरात वाढली. तिच्या घरात नियमितरित्या बायबल चर्चा करण्याचा परिपाठच होता. खरं तर, त्यांनी त्यांच्या कुटुंबाला जणू एक आगळा ‘धर्मच’ बनवलं होतं. विविध धर्मांच्या लोकांशी संगती करून त्यांना त्यांच्या चुका दाखवून देण्याची तिला सवयच जडली होती. बायबल अभ्यास करण्याचे एका यहोवाच्या साक्षीदाराने तिला विचारले तेव्हा ती लगेच तयार झाली. यहोवाच्या साक्षीदारांचे धार्मिक विश्वास खोटे असल्याचे दाखवून देणे हा त्यामागचा तिचा मुख्य हेतू होता. ती म्हणते: “एका वर्षापेक्षा अधिक काळ अभ्यास केल्यानंतर ‘माझं सत्य’ हरवतं की काय अशी भीती मला वाटू लागली. ज्या अनेक धर्मांशी माझा संबंध आला त्या धर्मांतील चुका मला चुटकीसरशी उघड करता आल्या होत्या, पण यहोवाच्या साक्षीदारांच्या बाबतीत मी हतबल झाले.”
सब्रिनाने यहोवाच्या साक्षीदारांसोबत बायबल अभ्यास करण्याचे थांबवले ते भयामुळेच. पण त्यामुळे तिला आध्यात्मिकरीत्या अगदी रिते वाटू लागले. बायबलचा अभ्यास पुन्हा सुरू करण्याचे तिने ठरवले आणि कालांतराने नव्याने मिळालेल्या सत्याचा तिने स्वीकार केला. साब्रीनाने इतकी प्रगती केली, की शिकत असलेल्या गोष्टी आपण इतरांना केव्हा सांगू असे तिला वाटू लागले. यहोवाच्या साक्षीदारांसोबत घरोघरच्या सेवाकार्यात आपल्याला सहभागी होता यावे अशी तिने विनंतीही केली. सब्रिना म्हणते: “यहोवाच्या साक्षीदारांसोबत प्रचार करण्याची मान्यता मिळण्यापूर्वी मला विचारण्यात आलं: ‘यहोवाची साक्षीदार व्हावं असं तुला खरोखरच वाटतं का?’ ‘नाही!’ मी म्हटलं. माझ्या मनातील भयानं पुन्हा एकदा उचल खाल्ली होती.” अखेरीस, सर्व सभांना उपस्थित होत राहिल्याने तसेच देवाच्या लोकांचे आणि ते ज्याप्रकारे बायबल तत्त्वे लागू करतात त्याचे परीक्षण केल्याने सब्रिना या निष्कर्षाप्रत पोहंचली, की हेच तर सत्य आहे. तिने बाप्तिस्मा घेतला आणि आता पूर्ण-वेळेची सुवार्तिका म्हणून काम करत आहे.
इतका फरक तो का?
काहीजण कदाचित असे विचारतील, ‘यहोवाच्या साक्षीदारांच्या आणि इतर धर्मांच्या शिकवणींत इतका फरक का?’ यहोवाच्या साक्षीदारांच्या धार्मिक विश्वासांचा थोडक्यात अभ्यास केल्यानंतर तुम्हाला कळून येईल, की ते प्रामाणिक ख्रिस्ती आणि बायबलचे कर्तव्यदक्ष विद्यार्थी आहेत. त्यांच्या मूलभूत धार्मिक विश्वासांविषयी सारांश रूपात वर देण्यात आलेली माहिती तुम्ही स्वतःच्या बायबलमध्ये पाहण्याचे आम्ही तुम्हाला उत्तेजन देतो.
यहोवाच्या साक्षीदारांचा विश्वास आणि बायबलमधील शिकवणींना ते कशाप्रकारे जडून राहतात याच्या सूक्ष्म परीक्षणाद्वारे मिळणाऱ्या सत्याच्या स्वातंत्र्याने तुम्ही आशीर्वादित होऊ शकता. (योहान १७:१७) सत्याचे भय बाळगण्याचे कोणतेही कारण नाही. येशूचे अभिवचन लक्षात ठेवा: “तुम्हाला सत्य समजेल व सत्य तुम्हाला बंधमुक्त करील.”—योहान ८:३२.
[६ पानांवरील चौकट]
यहोवाच्या साक्षीदारांचे काही मूलभूत धार्मिक विश्वास
◯ यहोवा सर्वसमर्थ देव आहे. बायबलच्या मूळ हस्तलिखितांमध्ये त्याच्या व्यक्तिगत नावाचा उल्लेख ७००० पेक्षा अधिक वेळा आढळतो.—स्तोत्र ८३:१८.
◯ येशू ख्रिस्त देवाचा पुत्र असून मानवजातीकरता स्वतःचे जीवन देण्यासाठी तो पृथ्वीवर आला. (योहान ३:१६, १७) शुभवर्तमानातील येशू ख्रिस्ताच्या शिकवणींनुसार यहोवाचे साक्षीदार चालतात.
◯ यहोवाचे साक्षीदार हे नाव यशया ४३:१० या वचनावर आधारित आहे, हे वचन म्हणते: “परमेश्वराचे [“यहोवाचे,” NW] असे म्हणणे आहे की, . . . तुम्ही माझे साक्षी आहा.”
◯ “आमच्या स्वर्गातील पित्या” या प्रार्थनेतील राज्य स्वर्गीय सरकार असून ते यातना आणि या जगातील दुःख काढून टाकील आणि बायबलमध्ये अभिवचन दिल्यानुसार या पृथ्वीचे रूपांतर परादीसमध्ये करील.—यशया ९:६, ७; दानीएल २:४४; मत्तय ६:९, १०; प्रकटीकरण २१:३, ४.
◯ देवाच्या इच्छेप्रमाणे चालणाऱ्या प्रत्येकाला देवाच्या राज्यात अविरतपणे आनंदाचा उपभोग घेण्याची संधी आहे.—योहान १७:३; १ योहान २:१७.
◯ ख्रिश्चनांनी आपल्या वर्तणुकीत बायबलनुसार योग्य तो बदल केलाच पाहिजे. प्रामाणिक राहण्याचा, शुद्ध, नैतिक जीवन जगण्याचा आणि शेजाऱ्यांवर प्रेम करण्याचा त्यांनी खास प्रयत्न केला पाहिजे.—मत्तय २२:३९; योहान १३:३५; १ करिंथकर ६:९, १०.
[५ पानांवरील चित्र]
यहोवाचे साक्षीदार २०० पेक्षा अधिक देशांमध्ये बायबल सत्याचा प्रचार करतात