आधुनिक ग्रीकमध्ये नवीन बायबल
ऑगस्ट २३, १९९७ हा दिवस, “देवाच्या वचनावरील विश्वास” या ग्रीसमधील प्रांतीय अधिवेशनाकरता उपस्थित असलेल्यांकरता खास दिवस होता. दुपारच्या कार्यक्रमाच्या अंतास एक नवीन बायबल प्रकाशित करण्यात आले—आधुनिक ग्रीक भाषेतील पवित्र शास्त्रवचनांचे नवे जग भाषांतर. विस्मित श्रोत्यांनी आनंदाश्रूंनी आणि टाळ्यांचा बराच वेळ कडकडाट करून लागलीच दाद दिली!
सन १९०५ पासून यहोवाचे साक्षीदार एका ग्रीक ऑर्थडॉक्स पाळकाचे १९ व्या शतकातील बायबल भाषांतर वापरत होते. हे बायबल अनेक वर्षांपर्यंत त्यांच्या कामी आले. परंतु, यहोवाच्या साक्षीदारांना काही काळापासून असे वाटू लागले, की त्यांना अधिक अचूक व समजण्यास सोपे अशा एका बायबल भाषांतराची गरज आहे. सन १९९३ मध्ये त्यांना, ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांचे नवे जग भाषांतर हे बायबल ग्रीक भाषेत मिळाले तेव्हा आनंद झाला. आणि आता संपूर्ण बायबल आधुनिक ग्रीकमध्ये मिळाल्यामुळे तर त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला!
एका कृतज्ञ साक्षीदार भगिनीने, नवे जग भाषांतर या बायबलविषयी म्हटले, “ते एक काव्य आहे, ते यहोवाची वाणी पोहंचवणारी मंद झुळूक आहे; आमच्या मातृभाषेत आम्ही पहिल्यांदाच ते इतक्या स्पष्टपणे समजू शकतो.” काहींनी तर घरी गेल्या गेल्या हे नवीन बायबल वाचण्यास सुरवात केली. अधिवेशनाला आलेल्या एका उत्साही व्यक्तीने तर पहाटे एक वाजेपर्यंत ईयोबाचे संपूर्ण पुस्तक वाचून झाल्यावरच हे बायबल हातातून खाली ठेवले!
ग्रीक भाषेतील पवित्र शास्त्रवचनांचे नवे जग भाषांतर हे सुमारे सात वर्षांच्या परिश्रमाचे फलित आहे. एका पत्रात असे म्हटले होते: “नवे जग भाषांतर यहोवाबद्दल प्रांजळ लोकांना शिकवण्यास आम्हाला खूप साहाय्य करणार आहे ही खात्री तुम्ही बाळगू शकता.”