वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w98 ९/१ पृ. ४-७
  • तुमचा विवेक विश्‍वसनीय आहे का?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तुमचा विवेक विश्‍वसनीय आहे का?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • विवेक प्रशिक्षित करणे
  • देवाच्या विचारपद्धतीशी जुळवून घेणे
  • विवेक प्रशिक्षित करण्यात एक सहायक
  • “ख्रिस्ताचे मन” धारण करणे
  • प्रशिक्षित विवेकाचा फायदा उचलणे
  • तुम्हाला चांगला विवेक कसा बाळगता येईल?
    देवाच्या प्रेमात टिकून राहा
  • सदसद्विवेकबुद्धीच्या आवाजाकडे कान द्या
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००७
  • देवाच्या नियमांना व तत्त्वांना तुमच्या विवेकाला प्रशिक्षित करू द्या
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१८
  • तुमचा विवेक भरवशालायक आहे का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१५
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
w98 ९/१ पृ. ४-७

तुमचा विवेक विश्‍वसनीय आहे का?

सामान्य परिस्थितीत, होकायंत्र हे एक भरवशालायक उपकरण असते. पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रामुळे त्याचा काटा नेहमीच उत्तर दिशेला स्थिर होत असतो. म्हणून जमिनीवरच्या कोणत्याही खुणा नसताना प्रवासी दिशा मिळण्यासाठी होकायंत्रावर अवलंबून राहू शकतात. पण होकायंत्राच्या जवळ एखादी चुंबकीय वस्तू ठेवली तर काय होते? त्या वेळी मात्र उत्तर दिशेला स्थिर होण्याऐवजी काटा चुंबकाकडे खेचला जातो. आता तो विश्‍वसनीय मार्गदर्शक ठरत नाही.

मानवी विवेकाच्या बाबतीतही अशीच गोष्ट घडू शकते. एक विश्‍वसनीय मार्गदर्शक म्हणून देवाने आपल्यामध्ये ही क्षमता घातली. आपल्याला देवाच्या प्रतिरूपात निर्माण केले असल्याने, काही निर्णय घ्यायचे असतात, तेव्हा आपल्या विवेकाने नेहमीच योग्य दिशा दाखवली पाहिजे. त्याने देवाचे नैतिक दर्जे प्रतिबिंबित करण्यास आपल्याला प्रेरित केले पाहिजे. (उत्पत्ति १:२७) बहुधा असेच घडते. उदाहरणार्थ, ख्रिस्ती प्रेषित पौलाने लिहिले की, देवाचे प्रकट झालेले नियमशास्त्र ज्यांना नाही असे लोक देखील “नियमशास्त्रात जे आहे ते स्वभावतः करीत असतात.” ते का? कारण “त्यांच्याबरोबर त्यांची सद्‌सद्विवेकबुद्धिहि त्यांना साक्ष देते.”—रोमकर २:१४, १५.

तथापि, ज्या वेळी विवेकाने बोलून दाखवायला हवे त्या वेळी तो असे करीलच असे नाही. मानवी अपरिपूर्णतेमुळे, चुकीच्या गोष्टी ठाऊक असतानाही त्या करण्याची आपली वृत्ती असते. “माझा अंतरात्मा देवाच्या नियमशास्त्रामुळे हर्ष करितो,” असे पौलाने मान्य केले, “तरी माझ्या अवयवात मला निराळाच नियम दिसतो; तो माझ्या मनातल्या नियमाबरोबर लढतो आणि मला कैद करून माझ्या अवयवातील पापाच्या नियमाच्या स्वाधीन करितो.” (रोमकर ७:२२, २३) आपण नेहमी नेहमीच जर चुकीच्या प्रवृत्तींना बळी पडलो, तर हळूहळू आपला विवेक मंदावेल आणि कालांतराने आपली वर्तणूक चुकीची आहे असे तो सांगणार देखील नाही.

पण, अपरिपूर्ण असूनही आपण आपला विवेक देवाच्या दर्जांच्या एकवाक्यतेत आणू शकतो. किंबहुना, असे करणे अगत्याचे आहे. शुद्ध, योग्य प्रशिक्षण दिलेल्या विवेकामुळे केवळ देवासोबत उबदार, व्यक्‍तिगत नातेसंबंधच निर्माण होत नाही, तर असा हा विवेक आपल्या तारणासाठी देखील आवश्‍यक आहे. (इब्री लोकांस १०:२२; १ पेत्र १:१५, १६) शिवाय, चांगला विवेक आपल्या जीवनात सुज्ञ निर्णय घेण्यास मदत करील ज्यामुळे आपल्याला शांती आणि आनंद लाभेल. असा विवेक असणाऱ्‍या व्यक्‍तीविषयी स्तोत्रकर्ता म्हणाला: “त्याच्या देवाचे नियमशास्त्र त्याच्या हृदयात असते; त्याचे पाय घसरणार नाहीत.”—स्तोत्र ३७:३१.

विवेक प्रशिक्षित करणे

विवेक प्रशिक्षित करायचा म्हणजे फक्‍त अनंत नियम पाठ करणे आणि त्यांचे काटेकोरपणे पालन करणे एवढेच नव्हे. येशूच्या दिवसांतील परुशांनी अगदी असेच केले. त्या धार्मिक पुढाऱ्‍यांना नियमशास्त्राचे ज्ञान होते आणि त्यांनी लहान-सहान नियमांची परंपराच केली होती—लोकांनी नियमशास्त्राचे उल्लंघन करू नये म्हणून त्यांची मदत करण्यासाठी! यास्तव, येशूच्या शिष्यांनी शब्बाथ दिवशी कणसे मोडून खाल्ली तेव्हा त्यांनी लागलीच विरोध केला. शिवाय, शब्बाथ दिवशी येशूने एका माणसाचा वाळलेला हात बरा केला तेव्हा त्यांनी आक्षेप घेतला. (मत्तय १२:१, २, ९, १०) परुशांच्या परंपरेनुसार, या दोन्ही घटनांमुळे चवथ्या आज्ञेचे उल्लंघन झाले होते.—निर्गम २०:८-११.

परुशांचा नियमशास्त्राचा अभ्यास होता हे स्पष्टच आहे. पण त्यांचे विवेक देवाच्या दर्जांच्या एकवाक्यतेत होते का? मुळीच नाही! शब्बाथ नियमाचे अक्षम्य उल्लंघन झाले आहे अशी टीका केल्यानंतर लागलीच त्यांनी काय करावे? चक्क “त्याचा घात कसा करावा” अशी येशूविरुद्ध ते मसलत करू लागले. (मत्तय १२:१४) हेच ते स्वतःला फार नीतिमान समजणारे धार्मिक पुढारी, शब्बाथ दिवशी कणसे मोडून खाल्ली आणि बरे करण्याचे काम केले म्हणून रागाने लालबुंद झाले होते; पण येशूचा घात करण्याचा कट रचताना मात्र त्यांना किंचितही खटकले नाही!

मुख्य याजकांचीही अशीच वाकडी विचारपद्धत होती. यहुदाला येशूचा विश्‍वासघात करण्यासाठी मंदिरातल्या दानकोशातून ३० चांदीचे तुकडे देताना या भ्रष्ट माणसांना जरा सुद्धा बोचले नाही. पण यहुदा अनपेक्षितपणे मंदिरात पैसे टाकून गेला, तेव्हा मात्र त्यांना नियम आठवले आणि त्यांचा विवेक कात्रीत सापडला. ते म्हणाले, “हे [रुपये] दानकोशात टाकणे सशास्त्र नाही, कारण हे रक्‍ताचे मोल आहे.” (मत्तय २७:३-६) यहुदाचे पैसे आता अशुद्ध होते अशी त्यांना काळजी वाटू लागली, नाही का? (पडताळा अनुवाद २३:१८.) पण, देवाच्या पुत्राचा विश्‍वासघात करण्यासाठी या पैशांचा उपयोग करण्यात याच लोकांना काहीच गैर वाटले नव्हते!

देवाच्या विचारपद्धतीशी जुळवून घेणे

वरील उदाहरणांवरून हे दिसून येते, की मनात नुसते नियमच नियम भरल्याने विवेक प्रशिक्षित होत नाही. अर्थात, देवाच्या नियमांचे ज्ञान असणे आवश्‍यक आहे आणि त्यांचे पालन करणे तारणासाठी अगत्याचे आहे हे निश्‍चित. (स्तोत्र १९:७-११) तथापि, देवाच्या नियमांचे ज्ञान करून घेण्याव्यतिरिक्‍त देवाच्या विचारपद्धतीशी एकरूप असणारे अंतःकरण आपण निर्माण केले पाहिजे. तेव्हा यशयाद्वारे केलेली यहोवाची भविष्यवाणी कशी पूर्ण होते याचा अनुभव आपल्याला होऊ शकेल; तेथे असे म्हटले आहे: “तुझ्या डोळ्यांना तुझे शिक्षक दिसतील. हाच मार्ग आहे; याने चला, अशी वाणी तुमच्या मागून कानी पडेल; मग तुम्हाला उजवीकडे जावयाचे असो किंवा डावीकडे जावयाचे असो.”—यशया ३०:२०, २१; ४८:१७.

अर्थात, आपल्यासमोर एखादा महत्त्वाचा निर्णय असला, म्हणजे खरोखरची वाणी होईल आणि आपण काय करावे ते सांगेल असा याचा अर्थ होत नाही. परंतु, वेगवेगळ्या बाबींमध्ये देवाच्या विचारपद्धतीसारखी आपली विचारपद्धत असल्यास, त्याला संतुष्ट करणारे निर्णय घेण्यास आपला विवेक अधिक समर्थ असेल.—नीतिसूत्रे २७:११.

सा.यु.पू. १८ व्या शतकादरम्यान हयात असलेल्या योसेफालाच पाहा ना. पोटीफरच्या पत्नीने तिच्यासोबत व्यभिचार करायला त्याला गळ घातली तेव्हा योसेफाने साफ नकार देऊन म्हटले: “एवढी मोठी वाईट गोष्ट करून मी देवाच्या विरुद्ध पाप कसे करू?” (उत्पत्ति ३९:९) योसेफाच्या दिवसात, व्यभिचार चुकीचा आहे असे सांगणारा लेखी रूपात देवाचा कोणताही नियम नव्हता. शिवाय, योसेफ तर इजिप्तमध्ये राहत होता; तिथे शिस्त द्यायला काही त्याचे पालक नव्हते किंवा कुलपित्यांनी केलेले नियमही नव्हते. तर मग, योसेफ हा मोह कसा टाळू शकला? सोप्या शब्दांत सांगायचे झाल्यास, त्याच्या प्रशिक्षित विवेकामुळे. पती आणि पत्नीने “एकदेह” असावे हा देवाचा दृष्टिकोन योसेफाने स्वीकारला. (उत्पत्ति २:२४) म्हणून परपुरुषाची बायको घेणे हे चुकीचे असेल ते त्याने जाणले. या बाबतीत, योसेफाची विचारपद्धत देवाच्या विचारपद्धतीसारखी होती. व्यभिचार त्याच्या नैतिक बुद्धीच्या विरोधात होता.

आज, योसेफासारखे लोक फार क्वचित आढळतात. लैंगिक अनैतिकता बोकाळली आहे; नैतिकरित्या शुद्ध राहण्यासाठी आपण देवाला किंवा स्वतःला किंवा आपल्या पती अथवा पत्नीला जबाबदार आहोत अशी जाणीव अनेकांना राहिलेली नाही. यिर्मयाच्या पुस्तकात वर्णिल्यासारखीच आजची ही गत आहे: “मी काय केले आहे? असे म्हणून कोणीहि आपल्या दुष्टपणाचा पश्‍चात्ताप करीत नाही; जसा घोडा लढाईत वेगाने धावतो तसे ते सर्व आपापल्या धावेकडे फिरत आहेत.” (यिर्मया ८:६, पं.र.भा.) म्हणून, देवाच्या विचारपद्धतीशी स्वतःला जुळवून घेण्याची आता पूर्वीपेक्षा अधिक गरज आहे. आपल्याला असे करायला मदत करण्यासाठी एक अत्युत्तम व्यवस्था आहे.

विवेक प्रशिक्षित करण्यात एक सहायक

प्रेरित बायबल, “सद्‌बोध, दोष दाखविणे, सुधारणूक, नीतिशिक्षण ह्‍याकरिता उपयोगी आहे. ह्‍यासाठी की, देवाचा भक्‍त पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज व्हावा.” (२ तीमथ्य ३:१६, १७) बायबल ज्यांना आपली ‘ज्ञानेंद्रिये’ म्हणते त्यांना योग्यायोग्यात भेद करण्यासाठी प्रशिक्षित करण्यास बायबलचा अभ्यास आपली मदत करील. (इब्री लोकांस ५:१४) हे करण्यामुळे, देवाला ज्या गोष्टी आवडतात त्यांची आवड धरण्यास आणि त्याला ज्या गोष्टींचा द्वेष वाटतो त्यांचा वीट मानण्यास आपण समर्थ होऊ.—स्तोत्र ९७:१०; १३९:२१.

याचाच अर्थ, फक्‍त खडा न खडा माहिती मिळवण्याऐवजी सत्याचा खरा अर्थ आणि व्यावहारिक महत्त्व जाणून घेणे हा बायबल अभ्यासाचा हेतू आहे. सप्टेंबर १, १९७६ च्या टेहळणी बुरूज (इंग्रजी) अंकात असे म्हटले होते: “शास्त्रवचनांचा अभ्यास करताना, देवाचा न्याय, त्याचे प्रेम आणि नीतीमत्त्व यांचा अर्थ समजून घेण्याचा आपण प्रयत्न करावा आणि आपल्या अंतःकरणांमध्ये इतक्या खोलवर ते रुजवावेत की खाणे आणि श्‍वास घेणे जसे अत्यावश्‍यक आहेत त्याप्रमाणे ते आपला एक भाग होतील. योग्यायोग्याची पूर्ण जाणीव राखून आपली एक नैतिक जबाबदारी आहे याविषयी आपण अधिक दक्ष असण्याचा प्रयत्न करावा. त्याचप्रमाणे, परिपूर्ण नियंता आणि न्यायाधीश याच्याप्रती आपण जबाबदार आहोत अशी आपल्या विवेकाला वारंवार आठवण करून दिली पाहिजे. (यशया ३३:२२) म्हणून, देवाविषयी काही शिकताना आपण जीवनाच्या प्रत्येक पैलूत त्याचे अनुकरण करण्याचा यत्न केला पाहिजे.”

“ख्रिस्ताचे मन” धारण करणे

बायबलचा अभ्यास केल्याने “ख्रिस्ताचे मन” अर्थात येशूने दाखवलेली आज्ञाधारकतेची आणि नम्रतेची मनोवृत्ती धारण करण्यासही आपल्याला मदत होईल. (१ करिंथकर २:१६) आपल्या पित्याच्या इच्छेनुसार वागणे हा त्याच्यासाठी सवयीनुसार आपोआप घडणारा नित्यक्रम नव्हता तर ते करण्यात त्याला आनंद वाटे. स्तोत्रकर्त्या दावीदाने भविष्यसूचकपणे त्याच्या मनोवृत्तीचे वर्णन केले होते; त्याने असे लिहिले: “हे माझ्या देवा, तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यात मला आनंद आहे, तुझे शास्त्र माझ्या अंतर्यामी आहे.”a—स्तोत्र ४०:८.

“ख्रिस्ताचे मन” धारण करणे विवेकाला प्रशिक्षित करण्यासाठी आवश्‍यक आहे. पृथ्वीवर परिपूर्ण मनुष्यरूपात असताना, मानवी मर्यादा असतानाही त्याने आपल्या पित्याचे गुण आणि व्यक्‍तिमत्त्व आपल्या परीने होता होईल तितके स्वतःच्या व्यक्‍तिमत्त्वात चितारले. म्हणून तो असे म्हणू शकला: “ज्याने मला पाहिले आहे त्याने पित्याला पाहिले आहे.” (योहान १४:९) पृथ्वीवर असताना त्याच्यासमोर आलेल्या प्रत्येक परिस्थितीत त्याने अगदी आपल्या पित्याच्या इच्छेनुसार केले. यास्तव, आपण येशूच्या जीवनाचा अभ्यास करतो तेव्हा, यहोवा देव नेमका कसा आहे हे आपल्याला आणखी स्पष्ट होत जाते.

यहोवा “दयाळू व कृपाळू . . . मंदक्रोध, दयेचा व सत्याचा सागर” आहे असे आपल्याला वाचायला मिळते. (निर्गम ३४:६) आपल्या शिष्यांसोबतच्या वागणुकीत येशूने पुनः-पुन्हा हे गुण दाखवले. आपल्यामध्ये श्रेष्ठ कोण यावरच त्यांच्यामध्ये उठल्यासुटल्या वाद चालू असताना, येशूने धीराने, “जो कोणी तुम्हामध्ये श्रेष्ठ होऊ पाहतो तो तुमचा सेवक होईल, आणि जो कोणी तुम्हामध्ये पहिला होऊ पाहतो तो तुमचा दास होईल” हे त्यांना समजावून आणि उदाहरणानिशी शिकवले. (मत्तय २०:२६, २७) येशूच्या जीवनपद्धतीचा विचार केल्यास, देवाच्या विचारपद्धतीशी आपण जुळवून घेऊ शकतो हे दाखवणारे हे केवळ एकच उदाहरण आहे.

आपण येशूविषयी जितके अधिक शिकू तितकेच अधिक आपला स्वर्गीय पिता यहोवा याचे अनुकरण करायला सज्ज होऊ. (इफिसकर ५:१, २) देवाच्या विचारपद्धतीशी जुळलेला विवेक आपल्याला योग्य दिशेत हाकारील. यहोवावर भरवसा करणाऱ्‍यांना तो असे आश्‍वासन देतो: “मी तुला बोध करीन; ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्याचे शिक्षण तुला देईन; मी आपली दृष्टि तुझ्यावर ठेवून तुला बुद्धिवाद सांगेन.”—स्तोत्र ३२:८.

प्रशिक्षित विवेकाचा फायदा उचलणे

अपरिपूर्ण मानवांचे पावलोपावली भरकटणे लक्षात घेता, मोशेने इस्राएली लोकांना ताकीद दिली: “ज्या गोष्टी आज मी तुम्हाला साक्षीदाखल सांगत आहे त्या सर्व लक्षात ठेवा; ह्‍या नियमशास्त्रातील सर्व गोष्टी काळजीपूर्वक पाळण्याची तुम्ही आपल्या मुलांना आज्ञा करा.” (अनुवाद ३२:४६) आपण देखील देवाचा नियम आपल्या अंतःकरणांवर कोरला पाहिजे. आपण असे केल्यास, आपला विवेक आपले मार्गदर्शन करील आणि योग्य निर्णय घेण्यास मदत करील अशी अधिक शक्यता आहे.

अर्थात, आपण दक्ष असावे. बायबलमधील नीतीसूत्र म्हणते: “मनुष्याला एक सरळ मार्ग दिसतो, पण त्याच्या शेवटास मृत्युपथ फुटतात.” (नीतिसूत्रे १४:१२) असे बहुतेकवेळा का घडते बरे? बायबल सांगते त्यानुसार त्याचे कारण हे आहे की: “हृदय सर्वात कपटी आहे; ते असाध्य रोगाने ग्रस्त आहे, त्याचा भेद कोणास समजतो?” (यिर्मया १७:९) म्हणून आपल्यातील प्रत्येकाने नीतिसूत्रे ३:५, ६ येथील सल्ला अनुसरावा हे अगत्याचे आहे; तेथे असे म्हटले आहे: “तू आपल्या अगदी मनापासून परमेश्‍वरावर भाव ठेव, आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको; तू आपल्या सर्व मार्गांत त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल.”

[तळटीपा]

a आपल्या इब्री लोकांस पत्रात, प्रेषित पौलाने ४० व्या स्तोत्रातील शब्द येशू ख्रिस्ताला लागू केले.—इब्री लोकांस १०:५-१०.

[७ पानांवरील चित्र]

होकायंत्राप्रमाणे, बायबल-प्रशिक्षित विवेक आपल्याला योग्य दिशा दाखवू शकतो

[Credit Line]

होकायंत्र: Courtesy, Peabody Essex Museum, Salem, Mass.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा