योग्य आणि अयोग्य यात तुम्हाला भेद करता येतो का?
“मी स्वतः २५ लोकांना ठार मारलं. . . . रात्रंदिवस ते चित्र डोळ्यांपुढून काही केल्या सरत नाही. मला नको नको करून सोडलंय. . . . मी कुठंतरी गेलो की असा एक न एक चेहरा दिसतोच की जो पाहून मला त्या ठार मारलेल्यांची आठवण येते. ते दृश्य मी कधीच विसरणार नाही; आजच, आताच घडल्यासारखं एकूणएक क्षण आठवतो. . . . मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही.”—व्ही.एस. “मला तिथं जाऊन शत्रूंना ठार मारायचा आदेश दिला होता. . . . पुरुष आहेत की स्त्रिया आहेत की लेकरं आहेत असा काहीएक विचार मी केला नाही. . . . मला आदेश मिळाला तसं मी केलं; तेव्हा पण तसंच वाटलं होतं आणि आता सुद्धा तेच वाटतं. म्हणून माझं चुकलं असं मला मुळीच वाटत नाही.”—डब्ल्यू.सी.
मार्च १६, १९६८. नंतर एका भयंकर युद्धकालीन गुन्ह्याच्या रूपात कुप्रसिद्ध झालेली घटना या दिवशी घडली. वरील उद्गार काढणारे दोघेही या गुन्ह्यात सामील होते. हे दोघे आणि इतर काही सैनिक, व्हिएटनाम येथील एका लहानशा गावात शिरले आणि त्यांनी कितीतरी लोकांची कत्तल केली—स्त्रिया, लेकरं, वृद्ध अशी कोणाचीच गय केली नाही. परंतु, या दोन सैनिकांच्या विरोधात्मक प्रतिक्रिया लक्षात घ्या. पहिल्या सैनिकाचे मन त्याला किती खात होते. पण दुसऱ्याला वाटते की, त्याने जे काही केले ते योग्यच होते. दोघाजणांचा एकच अनुभव पण इतक्या विभिन्न प्रतिक्रिया कशा?
या उत्तराचा संबंध सदसद्विवेकाशी आहे—ही देवाने दिलेली एक क्षमता आहे जी स्वतःचे प्रामाणिक परीक्षण करायला आणि आपली कार्ये व हेतू कसे आहेत ते ठरवायला मदत करते. सदसद्विवेक म्हणजे योग्यायोग्याची आतंरिक बुद्धी.
निर्णय घेताना, काहीजण ही जुनी म्हण धरून चालतात, की “विवेकाला आपला मार्गदर्शक बनवा.” परंतु, खेदाची गोष्ट अशी की, विवेकावर नेहमीच अवलंबून राहता येत नाही. कित्येकांनी अघोर कृत्ये खपवून घेतली आहेत; इतकेच नव्हे तर, केली देखील आहेत आणि तरीही त्यांचा विवेक त्यांना मुळीच बोचत नाही. (योहान १६:२; प्रेषितांची कृत्ये ८:१) सॅम्युएल बटलर या इंग्रजी कादंबरीकाराने असे एक निरीक्षण केले, विवेकाचे “म्हणणे ऐकले नाही, तर तो लवकरच आपल्याशी बोलायचे सोडून देतो.”
तुमचा विवेक विश्वसनीय आहे का? पुढील लेख दाखवून देईल त्याप्रमाणे, त्याला कसे प्रशिक्षित केले जाते यावर हे बऱ्याचशा प्रमाणात अवलंबून आहे.
[Picture Credit Line on page 3]
वरील युद्धाचे दृश्य: U.S. Signal Corps photo