देवाच्या संघटनेचे भाग राहून सुरक्षिततेत राहा
“परमेश्वराचे [“यहोवाचे,” NW] नाव बळकट दुर्ग आहे, त्यात धार्मिक धावत जाऊन निर्भय राहतो.”—नीतिसूत्रे १८:१०.
१. येशूच्या प्रार्थनेनुसार, ख्रिस्ती कोणत्या कठीण परिस्थितींमध्ये आहेत?
येशूने, मृत्यूच्या काही काळाआधी त्याच्या अनुयायांकरता स्वर्गीय पित्याकडे प्रार्थना केली. त्याने मोठ्या कळकळीने असे म्हटले: “मी त्यांना तुझे वचन दिले आहे; जगाने त्यांचा द्वेष केला, कारण जसा मी जगाचा नाही तसे तेहि जगाचे नाहीत. तू त्यांना जगातून काढून घ्यावे अशी विनंती मी करीत नाही, तर तू त्यांना वाईटापासून राखावे अशी विनंती करितो.” (योहान १७: १४, १५) या जगापासून ख्रिश्चनांना धोका असल्याची येशूला पुरेपूर कल्पना होती. ख्रिश्चनांविरुद्ध खोटे आरोप लावण्याद्वारे आणि त्यांचा छळ करण्याद्वारे हे जग त्यांचा द्वेष करील. (मत्तय ५:११, १२; १०:१६, १७) या जगातूनच नीतिभ्रष्टतेचीही सुरवात होईल.—२ तीमथ्य ४:१०; १ योहान २:१५, १६.
२. ख्रिश्चनांना आध्यात्मिक सुरक्षितता कोठे मिळू शकते?
२ ख्रिश्चनांचा द्वेष करणारे जग अशा लोकांचे आहे जे देवापासून दुरावलेले असून सैतानाच्या नियंत्रणाखाली आहेत. (१ योहान ५:१९) ख्रिस्ती मंडळीच्या तुलनेत हे जग फारच विशाल आहे आणि स्वतः सैतान इतर कोणत्याही मनुष्यापेक्षा फार शक्तिमान आहे. त्यामुळे या जगापासून संभवणारा धोका काही साधासुधा नाही. येशूच्या अनुयायांना आध्यात्मिक सुरक्षितता कोठे लाभू शकेल? डिसेंबर १, १९२२ या (इंग्रजी) टेहळणी बुरूज अंकात या प्रश्नाचे उत्तर देण्यात आले होते: “आपण सध्या बिकट परिस्थितीत जगत आहोत. सैतानाची संघटना आणि देवाची संघटना यांमध्ये अविरत असा अतिशय भयानक संघर्ष चालू आहे.” या संघर्षामध्ये, आध्यात्मिक सुरक्षितता मिळवायची असल्यास ती केवळ देवाच्या संघटनेमध्येच मिळेल. “संघटना” या शब्दाचा बायबलमध्ये कोठेही उल्लेख आढळत नसल्यामुळे सन १९२० च्या दशकामध्ये “देवाची संघटना” ही अभिव्यक्ती सर्वांकरता नवीन होती. तर मग, ही संघटना म्हणजे नक्की काय? शिवाय, त्यामध्ये आपल्याला सुरक्षितता कशाप्रकारे मिळू शकेल?
यहोवाची संघटना
३, ४. (अ) एका शब्दकोशानुसार आणि टेहळणी बुरूज अंकानुसार संघटना म्हणजे नक्की काय? (ब) यहोवाच्या आंतरराष्ट्रीय मंडळीला कोणत्या अर्थाने संघटना म्हणता येऊ शकते?
३ कन्साईस ऑक्सफर्ड डिक्शनरीनुसार संघटना म्हणजे “एक संघटित गट.” हा अर्थ लक्षात ठेवल्यास आपल्याला समजते, की जेरुसलेममध्ये नियमन मंडळाच्या अधीन प्रेषितांनी पहिल्या शतकातील ख्रिस्ती लोकांना स्थानिक मंडळ्यांमध्ये संघटित केले होते, त्यामुळे त्या ‘बंधुवर्गाच्या’ संदर्भात संघटना हा शब्दप्रयोग उपयोगात आणणे योग्य आहे. (१ पेत्र २:१७) आज यहोवाच्या साक्षीदारांची अशाचप्रकारची संघटनात्मक संरचना आहे. पहिल्या शतकातील गटाचे ऐक्य “मानवांतील देणग्यांमुळे” मजबूत झाले होते. “मेंढपाळ आणि शिक्षक” या मानवांतील काही देणग्या होत्या. यांपैकी काहींनी ठिकठिकाणी जाऊन मंडळ्यांना भेटी दिल्या, तर इतर जण स्थानिक मंडळ्यांमध्ये वडील म्हणून काम पाहत होते. (इफिसकर ४:८, ११, १२ NW; प्रेषितांची कृत्ये २०:२८) आज अशाचप्रकारच्या “देणग्या” यहोवाच्या साक्षीदारांचे ऐक्य बळकट करत आहेत.
४ नोव्हेंबर १, १९२२ या (इंग्रजी) टेहळणी बुरूज अंकाने “संघटना” या शब्दाविषयी असे म्हटले: “एखादा निश्चित उद्देश लक्षात ठेवून एकत्र मिळून कार्य करणारे लोक म्हणजेच संघटना.” याच टेहळणी बुरूज अंकाने पुढे असेही म्हटले, की यहोवाच्या साक्षीदारांना एक संघटना म्हणणे हे “पंथ हा शब्द ज्या अर्थाने वापरण्यात येतो त्या अर्थाने नव्हे, तर असे म्हणण्याचा निव्वळ अर्थ असा होतो, की बायबल विद्यार्थी [यहोवाचे साक्षीदार] देवाचे उद्देश पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात आणि प्रभूप्रमाणेच तेही सर्वकाही व्यवस्थितपणे पार पाडतात.” (१ करिंथकर १४:३३) प्रेषित पौलाने हे दाखवून दिले, की त्याच्या काळातील ख्रिश्चनांनी व्यवस्थितरीत्या कार्य पार पाडले. त्याने अभिषिक्त ख्रिश्चनांच्या मंडळीची तुलना मानवी शरीरासोबत केली. मानवी शरीराचे विविध अंग असून ते आपआपले कार्यभाग पार पाडतात जेणेकरून संपूर्ण शरीर व्यवस्थितपणे कार्य करते. (१ करिंथकर १२:१२-२६) संघटना म्हणजे काय हे दाखवण्याचे हे किती उत्तम उदाहरण! हे ख्रिस्ती संघटित का होते? “देवाचे उद्देश,” अर्थात यहोवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी.
५. देवाची दृश्य संघटना म्हणजे काय?
५ खरे ख्रिस्ती आज एकत्रित होतील व त्या सर्वांना एका ‘देशात’ आणि एका ‘राष्ट्रात’ एकत्र करण्यात येईल आणि तेथे ते ‘ज्योतीसारखे जगात दिसतील’ असे बायबलमध्ये आधीच भाकीत करण्यात आले होते. (यशया ६६:८; फिलिप्पैकर २:१५) या संघटित ‘राष्ट्रात’ ५५ लाखांपेक्षा अधिक लोकांचा समावेश आहे. (यशया ६०:८-१०, २२) तथापि, देवाच्या संघटनेमध्ये केवळ त्यांचाच समावेश होतो असे नाही. देवदूतांचा देखील त्या संघटनेमध्ये समावेश होतो.
६. सर्वसाधारणपणे सांगायचे झाल्यास, देवाची संघटना कोणाची मिळून बनली आहे?
६ देवदूतांनी देवाच्या मानवी सेवकांसोबत काम केल्याच्या कित्येक घटना आहेत. (उत्पत्ति २८:१२; दानीएल १०:१२-१४; १२:१; इब्री लोकांस १:१३, १४; प्रकटीकरण १४:१४-१६) यास्तव, मे १५, १९२५ या (इंग्रजी) टेहळणी बुरूज अंकाने असे म्हटले: “सर्व पवित्र देवदूत देवाच्या संघटनेचे भाग आहेत.” याशिवाय या अंकाने असे म्हटले: “देवाच्या संघटनेचा सर्वाधिकार प्रभू येशू ख्रिस्ताकडे आहे.” (मत्तय २८:१८) यास्तव, सर्वसाधारणपणे सांगायचे झाल्यास, स्वर्गातील आणि पृथ्वीवरील जे कोणी देवाच्या इच्छेची पूर्ती करण्यासाठी एकत्रित कार्य करतात अशांची मिळून देवाची संघटना बनली आहे. (पेटी पाहा.) या संघटनेचा भाग असणे म्हणजे किती महान विशेषाधिकार! स्वर्गातील आणि पृथ्वीवरील सर्व जिवंत प्राणी ऐक्याने यहोवाची स्तुती करण्याकरता संघटित होतील तेव्हा ते किती आनंदाचे असेल! (प्रकटीकरण ५:१३, १४) तथापि, देवाच्या संघटनेमुळे आज कोणत्या प्रकारचे संरक्षण प्राप्त होते?
देवाच्या संघटनेमध्ये सुरक्षित—कसे?
७. देवाची संघटना कोणत्या प्रकारे आपले संरक्षण करते?
७ सैतानापासून आणि त्याच्या मोहपाशापासून आपले रक्षण करण्यासाठी यहोवा देवाची संघटना आपली मदत करू शकते. (इफिसकर ६:११) सैतान यहोवाच्या उपासकांवर दबाव आणतो, त्यांचा छळ करतो आणि त्यांच्यासमोर मोहपाश आणतो. हे सर्व करण्यामागे त्याचा एकच हेतू असतो आणि तो म्हणजे ‘त्यांनी ज्या मार्गाने गेले पाहिजे त्या मार्गापासून’ त्यांना विचलित करणे. (यशया ४८:१७; पडताळा मत्तय ४:१-११.) या हल्ल्यांना सध्याच्या व्यवस्थीकरणामध्ये पूर्णपणे टाळणे आपल्याला केव्हाही शक्य होणार नाही. तथापि, देवाला आणि त्याच्या संघटनेला जडून राहिल्यामुळे सामर्थ्य मिळते आणि आपले रक्षण होते; तसेच ‘ज्या मार्गाने गेले पाहिजे त्या मार्गात’ राहण्यासाठी आपल्याला मदत मिळते. त्यामुळे आपली आशा दृष्टिआड होत नाही.
८. यहोवाची दृश्य संघटना कशा प्रकारे त्याच्या पृथ्वीवरील सेवकांना पाठबळ पुरवते?
८ देवाची संघटना हे संरक्षण कसे पुरवते? पहिली गोष्ट म्हणजे, यहोवाच्या आत्मिक सेवकांचे आपल्याला पाठबळ असते. जेव्हा येशू अतिशय दबावाखाली होता तेव्हा एका देवदूताने त्याची मदत केली. (लूक २२:४३) तसेच, पेत्राचा जीव धोक्यात असताना चमत्कारिकरित्या देवदूताने त्याला वाचवले. (प्रेषितांची कृत्ये १२:६-११) अशाप्रकारचे चमत्कार आज होत नसले, तरी यहोवाच्या लोकांना त्यांच्या प्रचार कार्यामध्ये देवदूतांच्या मदतीचे अभिवचन देण्यात आले आहे. (प्रकटीकरण १४:६, ७) कठीण परिस्थितींना तोंड देत असताना त्यांना बहुतेक वेळा पराकोटीच्या सामर्थ्याची प्रचिती मिळते. (२ करिंथकर ४:७) याशिवाय, त्यांना हेही जाणवते, की “परमेश्वराचा दूत त्यांचे भय धरणाऱ्यांसभोवती छावणी देतो आणि त्यांचे संरक्षण करितो.”—स्तोत्र ३४:७.
९, १०. ‘यहोवाचे नाम बळकट दुर्ग आहे,’ हे कसे म्हटले जाऊ शकते आणि देवाच्या संपूर्ण संघटनेला हे तत्त्व कशाप्रकारे लागू होते?
९ यहोवाच्या दृश्य संघटनेमध्येही संरक्षण मिळते. कसे? नीतिसूत्रे १८:१० येथे आपण वाचतो: “परमेश्वराचे [यहोवाचे] नाम बळकट दुर्ग आहे, त्यात धार्मिक धावत जाऊन निर्भय राहतो.” देवाच्या नावाचा जप केल्याने आपल्याला संरक्षण मिळेल, असा याचा अर्थ होत नाही. तर आपण देवाच्या नावात आश्रय घेतो म्हणजे आपण यहोवावर भरवसा ठेवतो. (स्तोत्र २०:१; १२२:४) याचा असा अर्थ होतो, की त्याच्या सार्वभौमत्वाचे समर्थन करणे त्याच्या नियमांना आणि तत्त्वांना उचलून धरणे तसेच त्याच्या अभिवचनांवर विश्वास ठेवणे. (स्तोत्र ८:१-९; यशया ५०:१०; इब्री लोकांस ११:६) यहोवावर भरवसा ठेवणे यात एकनिष्ठ भक्ती देण्याचाही समावेश होतो. केवळ अशाप्रकारे यहोवाची उपासना करणाऱ्या लोकांना स्तोत्रकर्त्याप्रमाणे म्हणता येईल: “त्याच्याठायी [यहोवाठायी] आमच्या हृदयाला आनंद आहे, कारण त्याच्या पवित्र नावावर आमची श्रद्धा [भरवसा] आहे.”—स्तोत्र ३३:२१; १२४:८.
१० आता देवाच्या दृश्य संघटनेतील सर्व लोक मीखासोबत असे म्हणतात: “पण आम्ही परमेश्वर [यहोवा] आमचा देव याच्या नावाने सदासर्वकाळ चालू.” (मीखा ४:५) आधुनिक दिवसातील संघटना ‘देवाच्या इस्राएलाभोवती’ गोळा झाली आहे. या देवाच्या इस्राएलास बायबलमध्ये ‘त्याच्या नावाचे लोक’ असे संबोधण्यात आले आहे. (गलतीकर ६:१६; प्रेषितांची कृत्ये १५:१४; यशया ४३:६, ७; १ पेत्र २:१७) यास्तव, देवाच्या नावाचा शोध घेणारे, ते जाणून घेणारे तसेच त्यात संरक्षण प्राप्त करणारे यांपैकी असणे म्हणजेच यहोवाच्या संघटनेचा भाग असणे होय.
११. यहोवाची संघटना तिचे भाग असणाऱ्यांकरता कोणत्या विशिष्ट प्रकारे संरक्षण पुरवते?
११ याशिवाय, देवाची दृश्य संघटना विश्वासू लोकांचा समाज अर्थात समविश्वासू लोकांचा गट आहे. हे लोक एकमेकांची उभारणी करतात आणि एकमेकांना प्रोत्साहन देतात. (नीतिसूत्रे १३:२०; रोमकर १:१२) हे असे ठिकाण आहे जेथे ख्रिस्ती मेंढपाळ मेंढराची काळजी घेतात, आजारी आणि निराश लोकांना उत्तेजन देतात आणि ज्यांची दिशाभूल झाली आहे अशांना परत आणण्याचा आटोकाट प्रयत्न करतात. (यशया ३२:१, २; १ पेत्र ५:२-४) या संघटनेद्वारे ‘विश्वासू आणि बुद्धिमान दासवर्ग यथाकाळी खावयास’ देतो. (मत्तय २४:४५) अभिषिक्त ख्रिश्चनांनी मिळून बनलेला हा ‘दास’ आध्यात्मिकरीत्या अत्युत्तम गोष्टी पुरवत आहे—बायबल आधारित अचूक ज्ञान ज्यामुळे सार्वकालिक जीवन प्राप्त होऊ शकते. (योहान १७:३) या ‘दासाच्या’ मार्गदर्शनामुळे ख्रिश्चनांना उच्च नैतिक दर्जांना जडून राहण्यास आणि या धोकेदायक जगात “सापांसारखे चतुर व कबुतरासारखे निरुपद्रवी” होण्यास मदत होते. (मत्तय १०:१६) तसेच “प्रभूच्या कामात सर्वदा अधिकाधिक” करण्यासही त्यांना मदत मिळते आणि हेच एक फार मोठे संरक्षण असते.—१ करिंथकर १५:५८.
देवाच्या संघटनेचे भाग कोण?
१२. देवाच्या स्वर्गीय संघटनेचे भाग कोण आहेत?
१२ देवाच्या संघटनेचे भाग असणाऱ्यांनाच संरक्षण प्राप्त होते तर मग त्या संघटनेमध्ये कोणाचा समावेश होतो? स्वर्गीय संघटनेच्या बाबतीत पाहू जाता या प्रश्नाचे उत्तर अगदी स्पष्ट आहे. सैतान आणि त्याचे दूत आता स्वर्गात नाहीत. परंतु विश्वासू देवदूत अद्यापही तेथे अर्थात ‘मंडळीमध्ये’ आहेत. शेवटल्या दिवसांदरम्यान “कोकरा,” करूब (“चार प्राणी”) आणि ‘अनेक देवदूत’ देवाच्या राजासनाच्या अगदी जवळ असल्याचे प्रेषित योहानाने पाहिले. त्यांच्यासोबत २४ वडील होते—ज्यांना स्वर्गीय वारसा आधीच मिळाला आहे अशा अभिषिक्त ख्रिश्चनांचे ते प्रतिनिधित्व करत होते. (इब्री लोकांस १२:२२; २३; प्रकटीकरण ५:६, ११; १२:७-१२) ते सर्व स्पष्टपणे यहोवाच्या संघटनेचे भाग आहेत. परंतु मानवांच्या बाबतीत हे इतके स्पष्ट नाही.
१३. देवाच्या संघटनेचे भाग कोण आहेत आणि कोण नाहीत, हे येशूने कसे दाखवून दिले?
१३ आपले अनुकरण करत असल्याचा दावा करणाऱ्या काहीजणांच्या बाबतीत येशूने म्हटले: “त्यादिवशी पुष्कळ जण मला म्हणतील, प्रभो, प्रभो, आम्ही तुझ्या नावाने संदेश दिला, तुझ्या नावाने भुते घालविली, व तुझ्या नावाने पुष्कळ महत्कृत्ये केली नाहीत काय? तेव्हा मी त्यांना स्पष्ट सांगेन की, मला तुमची कधीच ओळख नव्हती; अहो अनाचार करणाऱ्यांनो, माझ्यापुढून निघून जा.” (मत्तय ७:२२, २३) अनाचार करणारी व्यक्ती देवाच्या संघटनेचा भाग होऊच शकत नाही. मग तिचा काहीही दावा असेल किंवा ती उपासनेसाठी कोठेही जात असेल त्यामुळे कोणताही फरक पडत नाही. देवाच्या संघटनेचा कोण भाग आहे हे कसे ओळखावे याबद्दल येशूने स्पष्ट केले. त्याने म्हटले: “मला प्रभुजी, प्रभुजी, असे म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही; तर जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो त्याचा होईल.”—मत्तय ७:२१.
१४. देवाच्या संघटनेचे भाग असणाऱ्यांकडून देव कशाची अपेक्षा करतो?
१४ यास्तव, एखाद्याला देवाच्या संघटनेचा भाग होण्याकरता—ज्यामध्ये ‘स्वर्गीय राज्य’ केंद्रस्थानी आहे—देवाच्या इच्छेप्रमाणे चालण्याची गरज आहे. त्याची इच्छा काय आहे? त्याच्या इच्छेच्या एका महत्त्वपूर्ण पैलूविषयी पौलाने म्हटले: “त्याची [देवाची] अशी इच्छा आहे की, सर्व माणसांचे तारण व्हावे व त्यांनी सत्याच्या परिपूर्ण ज्ञानाप्रत पोहंचावे.” (१ तीमथ्य २:४) एखादी व्यक्ती बायबलमधील अचूक ज्ञानाचा मनःपूर्वक शोध घेत असल्यास, स्वतःच्या जीवनात त्या ज्ञानाचा अवलंब करत असल्यास आणि ते ज्ञान ‘सर्व माणसांमध्ये’ पसरवत असल्यास ती देवाच्या इच्छेप्रमाणे चालत असते. (मत्तय २८:१९, २०; रोमकर १०:१३-१५) आपल्या मेंढराचे पालनपोषण व्हावे आणि त्याची काळजी घेतली जावी, अशीही यहोवाची इच्छा आहे. (योहान २१:१५-१७) याबाबतीत ख्रिस्ती सभा महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडतात. अशा सभांना उपस्थित राहणे शक्य असतानाही जो त्यांकडे दुर्लक्ष करतो, त्याला देवाच्या संघटनेमधील आपल्या स्थानाची कदर नसते.—इब्री लोकांस १०:२३-२५.
जगासोबत मैत्री
१५. याकोबाने त्यांच्या दिवसांतील मंडळ्यांना कोणता इशारा दिला?
१५ येशूच्या मृत्यूनंतर सुमारे ३० वर्षांनी त्याचा सावत्र भाऊ याकोब याने अशा काही गोष्टींविषयी माहिती दिली ज्यांमुळे देवाच्या संघटनेमधील एखाद्याच्या स्थानाला धोका पोहंचू शकतो. त्याने लिहिले: “अहो अविश्वासू लोकांनो, जगाची मैत्री ही देवाबरोबर वैर आहे, हे तुम्हास ठाऊक नाही काय? जो कोणी जगाचा मित्र होऊ पाहतो तो देवाचा वैरी ठरला आहे.” (याकोब ४:४) देवाचा वैरी निश्चितच त्याच्या संघटनेचा भाग होऊ शकत नाही. जगासोबत मैत्री म्हणजे काय? यापूर्वी स्पष्ट करण्यात आल्याप्रमाणे याचे वेगवेगळे प्रकार आहेत. उदाहरणार्थ, कुसंगतीत वाहवत जाणे. शिवाय, याकोबाचा एका विशिष्ट गोष्टीवर रोख होता; अर्थात, अयोग्य वर्तणुकीत परिणीत होणारी चुकीची मनोवृत्ती.
१६. जगाशी मैत्री ही देवासोबत वैर आहे, असे याकोबाने कोणत्या संदर्भात म्हटले?
१६ याकोब ४:१-३ येथे आपल्याला वाचायला मिळते: “तुम्हामध्ये लढाया व भांडणे कशातून उत्पन्न होतात? तुमच्या अवयवांत ज्या वासना लढाई करितात त्यांतून की नाही? तुम्ही इच्छा धरता तरी तुम्हास प्राप्त होत नाही; तुम्ही घात व हेवा करिता तरी हवे ते मिळविण्यास तुम्ही समर्थ नाही; तुम्ही भांडता व लढता; तुम्ही मागत नाही; म्हणून तुम्हाला प्राप्त होत नाही. तुम्ही मागता परंतु तुम्हास मिळत नाही; कारण तुम्ही अयोग्य प्रकारे मागता, म्हणजे आपल्या चैनीकरिता खर्चावे म्हणून मागता.” हे सर्व लिहिल्यानंतर याकोबाने जगासोबत मैत्री करण्याविरुद्ध इशारा दिला.
१७. पहिल्या शतकातील ख्रिस्ती मंडळीमध्ये कोणत्याप्रकारच्या “लढाया” आणि “भांडणे” होती?
१७ याकोबाच्या मृत्यूनंतर शेकडो वर्षांनी खोट्या ख्रिश्चनांनी अक्षरशः एकमेकांसोबत लढाया केल्या, एकमेकांचा घात केला. तथापि, याकोब पहिल्या शतकातील ‘देवाच्या इस्राएलाच्या’ सदस्यांना अर्थात भवितव्यातील स्वर्गीय ‘याजकांना आणि राजांना’ उद्देशून लिहीत होता. (प्रकटीकरण २०:६) त्यांनी वास्तविक लढायांमध्ये एकमेकांचा घात केला नाही किंवा एकमेकांना ठार मारले नाही. तर मग, ख्रिश्चनांमध्ये अशा गोष्टींचा उल्लेख करण्यामागचे याकोबाचे कारण काय? आपल्या बांधवाचा द्वेष करणाऱ्या मनुष्याला प्रेषित योहान नरहिंसक असे संबोधतो. व्यक्तिमत्त्वातील मतभेद आणि मंडळ्यांतील शत्रूत्व यांस पौलाने “कलह” आणि “भांडणे” असे म्हटले. (तीत ३:९; २ तीमथ्य २:१४; १ योहान ३:१५-१७) त्याच अनुषंगाने, याकोबाच्याही मनात सहख्रिश्चनावर प्रेम न करणे हा विचार होता. जगातले लोक ज्याप्रमाणे एकमेकांशी वागतात त्याप्रमाणे ख्रिस्ती लोक आपसांत वागत होते.
१८. ख्रिश्चनांमध्ये, प्रेमाचा अभाव असलेली कृत्ये आणि भावना यांस कोणती गोष्ट कारणीभूत ठरू शकते?
१८ ख्रिस्ती मंडळ्यांमध्ये अशाप्रकारच्या गोष्टी का घडल्या? चुकीच्या मनोवृत्ती हे त्याचे कारण आहे. उदाहरणार्थ, लोभ आणि “वासना.” अहंकार, द्वेष, मोठे होण्याची हाव या गोष्टींमुळेही मंडळीतील ख्रिस्ती लोकांमधील प्रेम कमी होऊ शकते. (याकोब ३:६, १४) अशाप्रकारच्या मनोवृत्तींमुळे एखादा जगाचा मित्र बनतो आणि देवाचा शत्रू ठरतो. अशा मनोवृत्तींना मनात घर करू दिल्यावरही आपण देवाच्या संघटनेचा भाग राहू अशी कोणीही अपेक्षा करू शकत नाही.
१९. (अ) आपल्या मनात वाईट विचार घोळत असल्यास त्यास प्रामुख्याने कोण जबाबदार असतो? (ब) वाईट विचारावर ख्रिस्ती व्यक्ती कशाप्रकारे मात करू शकते?
१९ आपल्या मनात वाईट विचार घोळत असल्यास त्याचा दोष कोणावर लावता येईल? सैतानावर? काहीप्रमाणात, परंतु पूर्णपणे नाही. तो या जगाच्या “अंतरिक्षातील राज्याचा अधिपति” असल्यामुळे अशाप्रकारच्या मनोवृत्ती या जगात बोकाळलेल्या आहेत. (इफिसकर २:१, २; तीत २:१२) पण सहसा, वाईट विचार मनात येण्याचे कारण आपला अपरिपूर्ण देहच असतो. जगाची मैत्री न करण्याचा इशारा दिल्यानंतर याकोबाने लिहिले: “जो आत्मा आपल्याठायी वस्ती करितो त्याला आपल्याविषयी ईर्ष्या वाटते हे शास्त्राचे म्हणणे व्यर्थ आहे असे तुम्हास वाटते काय?” (याकोब ४:५) चूक करणे, ही आपल्या सर्वांची जन्मजात प्रवृत्ती आहे. (उत्पत्ति ८:२१; रोमकर ७:१८-२०) परंतु, आपण आपल्या चुका मान्य केल्यास आणि त्यांना टाळण्याकरता यहोवाची मदत घेतल्यास आपण त्या प्रवृत्तीवर मात करू शकतो. याकोब म्हणतो: “[देव] [हेवा करण्याच्या जन्मजात प्रवृत्तीपेक्षा] अधिक कृपा करितो.” (याकोब ४:६) देवाच्या पवित्र आत्म्याची मदत आणि विश्वासू ख्रिस्ती बांधवांचे पाठबळ तसेच येशूचे खंडणी बलिदान या सर्व गोष्टींमुळे विश्वासू ख्रिश्चनांवर त्यांच्या देहातील कमतरता मात करू शकत नाहीत. (रोमकर ७:२४, २५) ते देवाच्या संघटनेत सुरक्षित आहेत, त्यांचे जगाशी नव्हे, तर देवाशी मैत्र आहे.
२०. देवाच्या संघटनेचे भाग असणारे कोणत्या महान आशीर्वादांचा अनुभव घेत आहेत?
२० बायबल अभिवचन देते: “परमेश्वर आपल्या लोकांस सामर्थ्य देईल, परमेश्वर आपल्या लोकांस शांतीचे वरदान देईल.” (स्तोत्र २९:११) आपण यहोवाच्या आधुनिक दिवसांतील ‘राष्ट्राचे’ खरोखर भाग असल्यास त्याचे सामर्थ्य आपल्याला प्राप्त होईल तसेच तो त्याच्या लोकांना देत असलेले शांतीचे वरदान आपल्यालाही मिळेल. हे खरे आहे, की यहोवाच्या दृश्य संघटनेपेक्षा सैतानाचे जग मोठे आहे आणि सैतान आपल्यापेक्षा फार प्रबळ आहे. परंतु यहोवा सर्वसमर्थ आहे. त्याची कार्यकारी शक्ती अजिंक्य आहे. देवाची सेवा करण्यात त्याचे शक्तिशाली देवदूत आपल्यासोबत आहेत. यामुळे, आपला द्वेष होत असला तरी आपण दृढ राहू शकतो. येशूप्रमाणे आपणही जगावर जय मिळवू शकतो.—योहान १६:३३; १ योहान ४:४.
तुम्हाला सांगता येईल का?
◻ देवाची दृश्य संघटना म्हणजे नक्की काय?
◻ देवाची संघटना कोणत्या प्रकारे संरक्षण पुरवते?
◻ देवाच्या संघटनेचे भाग कोण आहेत?
◻ आपण जगाची मैत्री कशाप्रकारे टाळू शकतो?
[९ पानांवरील चौकट]
देवाची संघटना म्हणजे काय?
यहोवाच्या साक्षीदारांच्या साहित्यामध्ये “देवाची संघटना” या अभिव्यक्तीचा तीन प्रकारे उपयोग केला जातो.
१ विश्वासू आत्मिक प्राण्यांनी बनलेली यहोवाची स्वर्गीय, अदृश्य संघटना. तिला “वर असलेली यरुशलेम” असे बायबलमध्ये संबोधण्यात आले आहे.—गलतीकर ४:२६.
२ यहोवाची मानवी दृश्य संघटना. आज, तिच्यामध्ये अभिषिक्त शेष आणि मोठा लोकसमुदाय आहे.
३ यहोवाची सार्वत्रिक संघटना. आज, या संघटनेमध्ये यहोवाच्या स्वर्गीय संघटनेसोबत आत्मिक आशा असणारे त्याचे पृथ्वीवरील अभिषिक्त, दत्तक पुत्र आहेत ज्यांना आत्मिक आशा आहे. कालांतराने, तिच्यामध्ये पृथ्वीवरील परिपूर्ण मानवांचाही समावेश होईल.
[१० पानांवरील चित्र]
यहोवाच्या संघटनेद्वारे अत्युत्तम आध्यात्मिक अन्न पुरवले जाते