यहोवा आपला भरवसा होवो
“यहोवा तुझा भरवसा होईल.”—नीतिसूत्रे ३:२६, पं.र.भा.
१. पुष्कळ लोक देवावर भरवसा असल्याचा दावा करत असले तरी, ते नेहमीच असे करीत नाहीत हे काय सूचित करते?
“भरवसा आमचा देवावर,” हे ब्रीदवाक्य अमेरिकेच्या संयुक्त संस्थानाच्या पैशावर लिहिले आहे. परंतु, हा पैसा बाळगणारे त्या राष्ट्रातील किंवा इतरत्र राहणारे लोक खरोखरच देवावर भरवसा करतात का? की, ते त्या पैशावर अधिक भरवसा ठेवतात? त्या राष्ट्रातील किंवा इतर कोणत्याही राष्ट्रातील लोकांचा पैशावरील भरवसा आणि प्रीतीचा सर्वसमर्थ देव याच्यावरील भरवसा यांच्यामध्ये केव्हाही मेळ घालता येणार नाही; कारण देव आपल्या शक्तीचा कधीच गैरवापर करीत नाही व तो कोणत्याही बाबतीत लोभ बाळगत नाही. खरे तर, तो लोभाचा साफसाफ धिक्कार करतो.—इफिसकर ५:५.
२. पैशाच्या शक्तीविषयी खऱ्या ख्रिश्चनांची कोणती मनोवृत्ती आहे?
२ खरे ख्रिस्ती, ‘मोहात पाडण्याची शक्ती’ असलेल्या पैशावर नव्हे तर देवावर भरवसा ठेवतात. (मत्तय १३:२२) पैशामध्ये, सौख्यानंद वाढवण्याची व जीवन टिकवण्याची अगदीच मर्यादित शक्ती आहे हे त्यांनी जाणले आहे. परंतु सर्वसमर्थ देवाच्या शक्तीबाबत असे नाही. (सफन्या १:१८) यास्तव, “तुमची वागणूक द्रव्यलोभावाचून असावी; जवळ आहे तेवढ्यात तुम्ही तृप्त असावे; कारण त्याने स्वतः म्हटले आहे, ‘मी तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणार नाही,’” हा सल्ला किती सुज्ञ आहे!—इब्री लोकांस १३:५.
३. अनुवाद ३१:६ चा संदर्भ, पौलाने ज्या वचनाचा उल्लेख केला त्यावर प्रकाशझोत कसा टाकतो?
३ इब्री ख्रिश्चनांना वरीलप्रमाणे लिहिताना प्रेषित पौलाने, मोशेने आपल्या मृत्यूच्या थोड्या काळाआधी इस्राएल लोकांना दिलेल्या सूचनांचा उल्लेख केला: “खंबीर हो, हिंमत धर, त्यांना भिऊ नको, त्यांना घाबरू नको; कारण तुझ्याबरोबर चालणारा तुझा देव परमेश्वर हा आहे; तो तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणारहि नाही.” (अनुवाद ३१:६) संदर्भ दाखवून देतो, की मोशेने जेव्हा लोकांना देवावर भरवसा ठेवावयास सांगितले तेव्हा त्याचा अर्थ त्यांच्या भौतिक गरजा पुरवण्याइतकाच त्याच्यावर भाव ठेवणे नव्हे तर त्याच्यापेक्षा काहीतरी अधिक होते. ते कसे?
४. देवाने इस्राएल लोकांना हे कसे शाबीत करून दाखवले की ते त्याच्यावर भरवसा ठेवू शकत होते?
४ इस्राएलला रानावनात ४० वर्षे भटकंती करावी लागली तेव्हा देवाने नित्यनियमाने त्यांना जीवनावश्यक गोष्टी पुरवल्या. (अनुवाद २:७; २९:५) त्याने त्यांना मार्गदर्शनही दिले. याचे एक उदाहरण द्यायचे तर, “दुधामधाचे प्रवाह जेथे वाहत आहेत अशा देशात,” त्यांना घेऊन जाण्याकरता दिवसा एका मेघाद्वारे व रात्री अग्नीद्वारे त्याने त्यांना मार्गदर्शन दिले. (निर्गम ३:८; ४०:३६-३८) आणि वचनयुक्त देशात पदार्पण करण्याचा समय आला तेव्हा यहोवाने मोशेचा उत्तराधिकारी म्हणून यहोशवाला निवडले. त्या देशात आधीपासूनच राहणाऱ्या लोकांकडून विरोध येणे अपेक्षित होते. पण यहोवा शतकांपासून आपल्या लोकांबरोबर असल्यामुळे त्यांना घाबरण्याचे काहीएक कारण नव्हते. यहोवा भरवसालायक देव होता हे जाणण्याकरता इस्राएल लोकांकडे सबळ कारण होते!
५. आजच्या ख्रिश्चनांची परिस्थिती आणि वाग्दत्त देशात प्रवेश करण्याआधी इस्राएल लोकांची परिस्थिती यांत सारखेपणा कसा आहे?
५ ख्रिस्ती जन आज, देवाच्या नवीन जगापर्यंत जाण्याकरता सद्य जगाच्या रानावनातून प्रवास करीत आहेत. त्यांतील काहीजण ४० पेक्षा अधिक वर्षांपासून हा प्रवास करीत आहेत. आज ते जणू देवाच्या नवीन जगाच्या उंबरठ्यावर उभे आहेत. पण आजही, दुधामधाच्या प्राचीन वचनयुक्त देशापेक्षा कितीतरी पटीने अधिक भव्य असलेल्या जगात प्रवेश करण्यास अटकाव करण्याच्या हेतूने शत्रू तयार आहेत. यास्तव, आजच्या ख्रिश्चनांकरता पौलाने पुनः उच्चारलेले मोशेचे शब्द किती उचित आहेत: “मी तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणार नाही!” दृढ आणि धैर्यशील राहणाऱ्यांना व संपूर्ण विश्वासाने यहोवावर भरवसा ठेवणाऱ्यांना प्रतिफळ जरूर मिळेल!
ज्ञान आणि मैत्रीवर आधारित भरवसा
६, ७. (अ) यहोवावरील अब्राहामाच्या भरवशाची परीक्षा कशी झाली? (ब) इसहाकाला जेथे अर्पण करायचे होते त्या ठिकाणी पोहंचेपर्यंत अब्राहामाला कसे वाटले असावे?
६ एके प्रसंगी, इस्राएल लोकांचा पूर्वज अब्राहाम याला, आपला पुत्र इसहाक याचे होमार्पण करण्याची आज्ञा देण्यात आली. (उत्पत्ति २२:२) कोणत्या गोष्टीने या प्रेमळ पित्याला यहोवावर इतका अढळ भरवसा ठेवण्यास साह्य केले की तो आज्ञा मानण्यास लागलीच तयार झाला? इब्री लोकांस ११:१७-१९ याचे उत्तर देते; ते म्हणते: “अब्राहामाने आपली परीक्षा होत असता विश्वासाने इसहाकाचे अर्पण केले; ज्याने वचने स्वीकारली होती तो आपल्या एकुलत्या एकाचे अर्पण करीत होता; त्याला असे सांगितले होते की, ‘इसहाकाच्या वंशाला तुझे संतान म्हणतील.’ तेव्हा मेलेल्यातून देखील उठवावयास देव समर्थ आहे, हे त्याने मानले आणि त्या स्थितीतून लाक्षणिक अर्थाने तो त्याला परत मिळाला.”
७ अब्राहाम आणि इसहाक यांना, जेथे अर्पण करावयाचे होते तेथे पोहंचण्यासाठी तीन दिवस लागले याची आठवण ठेवा. (उत्पत्ति २२:४) अब्राहामाला जे करावयास सांगण्यात आले होते त्याचा पुनःविचार करण्याकरता त्याच्याकडे भरपूर वेळ होता. आपण त्याच्या भावनांची कल्पना करू शकतो का? त्यांच्या संसारवेलीवर उमलेल्या एका कळीमुळे अर्थात इसहाकाच्या जन्मामुळे त्यांच्या जीवनाला अचानक बहर आला होता. या ईश्वरी हस्तक्षेपाच्या पुराव्याने, अब्राहाम आणि त्याची आधी वांझ असलेली बायको सारा यांची देवासोबत असलेली जवळीक अधिकच दाट बनली होती. आणि त्यानंतर, इसहाक आणि त्याची संतती यांच्या भवितव्यात जे राखून ठेवले होते त्याच्याकडे आपले लक्ष लावणे त्यांच्या जीवनाचा उद्देश बनला होता. पण आता देवाने त्यांच्याकडून जे मागितले त्यामुळे त्यांना असे वाटले असावे का, की त्यांची सर्व स्वप्नं आता धुळीस मिळाली?
८. देव इसहाकाचे पुनरुत्थान करू शकतो केवळ इतक्याच विश्वासावर अब्राहामाचा देवावरील भरवसा सीमित कसा नव्हता?
८ पण, सख्या मित्रांमध्ये असतो तसा अब्राहामाचा भरवसा व्यक्तिगत ज्ञानावर आधारित होता. अब्राहामाने, “देवाचा मित्र” या नात्याने ‘देवावर विश्वास ठेवला आणि त्यामुळे त्याला नीतिमान असे गणण्यात आले.’ (याकोब २:२३) अब्राहामाचा यहोवावरील भरवसा, देव इसहाकाला पुनरुत्थित करू शकतो केवळ असा विश्वास करण्यापर्यंतच मर्यादित नव्हता. अब्राहामाला सर्वच वस्तुस्थितीची माहिती नसली तरी त्याला खात्री होती, की यहोवा त्याच्याकडून जे काही मागत होता ते उचितच होते. यहोवाची ही मागणी धार्मिकतेला धरून होती याबाबत शंका बाळगण्याचे त्याच्याजवळ काहीएक कारण नव्हते. मग, यहोवाच्या देवदूताने अब्राहामाला इसहाकाचा वध करण्यापासून रोखले तेव्हा त्याचा भरवसा आणखी बळकट झाला.—उत्पत्ति २२:९-१४.
९, १०. (अ) अब्राहामाने पूर्वी एकदा यहोवावर भरवसा केव्हा दाखवला होता? (ब) अब्राहामापासून आपण कोणता धडा शिकू शकतो?
९ अब्राहामाने यहोवाच्या धार्मिकतेवर अशाच प्रकारचा भरवसा २५ वर्षांआधी दाखवला होता. सदोम आणि गमोराचा नाश होणार असा इशारा मिळाल्यानंतर त्याला साहजिकच, तेथे राहणाऱ्या धार्मिक लोकांची आणि त्याचा पुतण्या लोट याची चिंता लागली. अब्राहामाने देवाला अशाप्रकारे विनंती केली: “या प्रकारची कृति तुजपासून दूर राहो. नीतिमानाची आणि दुष्टाची सारखीच गत होईल असा दुर्जनाबरोबर नीतिमानांचा वध करणे तुजपासून दूर राहो; सर्व जगाचा न्यायाधीश योग्य न्याय करणार नाही काय?”—उत्पत्ति १८:२५.
१० यहोवा कोणतीही अधार्मिक गोष्ट करीत नाही याची कुलपित्या अब्राहामाला खात्री पटली होती. स्तोत्रकर्त्याने नंतर गायिले: “परमेश्वर आपल्या सर्व मार्गांत न्यायी आहे, तो आपल्या सर्व कृत्यांत दयाळू [एकनिष्ठ] आहे.” (स्तोत्र १४५:१७) आपण स्वतःला असे विचारले तर बरे होईल: ‘यहोवाच्या धार्मिकतेवर कोणतीही शंका न बाळगता तो मला जे काही सहन करण्याची अनुमती देतो ते मी स्वीकारतो का? यामुळे माझे आणि इतरांचे भलेच होईल अशी माझी खात्री पटली आहे का?’ या प्रश्नांचे आपले उत्तर होय असे आहे याचा अर्थ आपण अब्राहामापासून एक महत्त्वपूर्ण धडा शिकलो आहोत.
यहोवाने निवडलेल्यांवर भरवसा दाखवणे
११, १२. (अ) देवाच्या सेवकांना आणखी कोणता भरवसा आवश्यक आहे? (ब) आपल्या सर्वांसमोर कधीकधी कोणती समस्या येऊ शकते?
११ यहोवाला आपला भरवसा मानणारे, त्याचे उद्देश पूर्ण करण्याकरता तो ज्यांचा उपयोग करून घेतो त्या निवडलेल्या मनुष्यांवर ते भरवसा दाखवतात. इस्राएल लोकांकरता याचा अर्थ, मोशेवर आणि त्याचा उत्तराधिकारी यहोशवा याच्यावर भरवसा दाखवणे होता. प्रारंभिक ख्रिश्चनांकरता याचा अर्थ, प्रेषितांवर आणि जेरुसलेम मंडळीतील वडिलांवर भरवसा दाखवणे होता. आज आपल्याकरता याचा अर्थ, आपल्याला ‘यथाकाळी आध्यात्मिक अन्न’ देण्याकरता नेमलेल्या ‘विश्वासू व बुद्धिमान दासावर’ तसेच त्यांच्यापैकी जे नियमन मंडळात आहेत त्यांच्यावर भरवसा दाखवणे होतो.—मत्तय २४:४५.
१२ खरे तर, ख्रिस्ती मंडळीत पुढाकार घेणाऱ्यांवर भरवसा ठेवल्याने आपलाच फायदा होतो. आपल्याला सांगण्यात आले आहे: “आपल्या अधिकाऱ्यांच्या आज्ञेत राहा व त्यांच्या अधीन असा; कारण आपणास हिशेब द्यावयाचा आहे हे समजून ते तुमच्या जिवांची राखण करितात; ते त्यांना आनंदाने करता यावे, कण्हत नव्हे; तसे झाल्यास ते तुमच्या हिताचे होणार नाही.”—इब्री लोकांस १३:१७.
यहोवाने निवडलेल्यांवर शंका घेण्याचे टाळा
१३. पुढाकार घेण्याकरता नियुक्त केलेल्यांवर आपण भरवसा का दाखवला पाहिजे?
१३ यहोवाच्या लोकांमध्ये पुढाकार घेणाऱ्यांवर भरवसा ठेवण्यात समतोल राखण्यास बायबल आपली मदत करते. आपण स्वतःला विचारू शकतो: ‘मोशेने कधी चुका केल्या होत्या का? येशूच्या इच्छेनुसार प्रेषितांनी नेहमीच ख्रिस्तासारखी मनोवृत्ती दाखवली का?’ उत्तरे स्पष्टच आहेत. यहोवाने आपल्या लोकांना मार्गदर्शन पुरवण्याकरता एकनिष्ठ व भक्तिमान लोकांना निवडले आहे; हे लोक अपरिपूर्ण आहेत तरीसुद्धा. तसेच, आज वडील अपरिपूर्ण असले तरी, आपण त्यांना ते ‘देवाच्या कळपाचे पालन करण्याकरता पवित्र आत्म्याने अध्यक्ष’ करण्यात आले आहेत असेच ओळखावे. ते आपला पाठिंबा आणि आदर मिळण्याच्या पात्र आहेत.—प्रेषितांची कृत्ये २०:२८.
१४. यहोवाने अहरोन किंवा मिर्याम यांच्याऐवजी मोशेला नेता म्हणून निवडण्यात उल्लेखनीय अशी गोष्ट कोणती आहे?
१४ अहरोन मोशेपेक्षा तीन वर्षांनी वडील असला तरी, दोघेही त्यांची बहीण मिर्याम हिच्यापेक्षा लहान होते. (निर्गम २:३, ४; ७:७) शिवाय, अहरोन मोशेपेक्षा अस्खलितपणे बोलू शकत असला तरी, त्याला आपल्या भावाचा प्रवक्ता म्हणून नियुक्त करण्यात आले होते. (निर्गम ६:२९–७:२) तरीसुद्धा, इस्राएलांचे नेतृत्व करण्याकरता यहोवाने सर्वात ज्येष्ठ असलेल्या मिर्यामला किंवा अस्खलितपणे बोलणाऱ्या अहरोनाला निवडले नाही. समयाच्या सर्व वस्तुस्थितींची व गरजांची पूर्णपणे जाणीव ठेवूनच त्याने मोशेला निवडले होते. एकदा जेव्हा अहरोन आणि मिर्याम यांनी हे स्पष्टपणे समजून घेतले नाही तेव्हा त्यांनी अशाप्रकारे कुरकूर केली: “परमेश्वर केवळ मोशेशीच बोलला आहे काय? आमच्याशी पण नाही का बोलला?” चिथावणीखोरीमध्ये कदाचित पुढे असलेल्या मिर्यामला यहोवाच्या निवडीबद्दल अशी अनादरणीय मनोवृत्ती दाखवल्याबद्दल शिक्षा देण्यात आली; तिने व अहरोनाने खरे तर, “भूतलावरील सर्व मनुष्यांपेक्षा नम्र” असलेल्या मनुष्याला ओळखायला हवे होते.—गणना १२:१-३, ९-१५.
१५, १६. आपला यहोवावर भरवसा आहे हे कालेबने कसे प्रदर्शित केले?
१५ वाग्दत्त देश हेरण्यासाठी १२ हेरांना पाठवण्यात आले तेव्हा त्यांच्यातील १० जणांनी नकारात्मक बातमी आणली. कनानी लोक “मोठे धिप्पाड आहेत” असे त्यांच्याविषयी सांगून त्यांनी इस्राएल लोकांच्या मनात भीती घातली. यामुळे इस्राएल लोक “मोशे आणि अहरोन ह्यांच्याविरुद्ध कुरकुर करू लागले.” परंतु, सर्वच हेरांनी मोशे आणि यहोवावर अविश्वास दाखवला नाही. आपण वाचतो: “तेव्हा मोशेच्या समोर लोकांना शांत करून कालेब म्हणाला, आपण त्या देशावर आताच्या आता हिम्मत धरून चढाई करून जाऊ आणि तो घेऊ; कारण तो जिंकण्यास आपण पूर्णपणे समर्थ आहो.” (गणना १३:२, २५-३३; १४:२) कालेबचा हेरगिरीमधील साथीदार यहोशवा यानेही त्याच्या दृढ भूमिकेला दुजोरा दिला. यहोवाला त्यांनी आपला भरवसा बनवला आहे हे त्यांच्या ह्या बोलण्यावरून दिसून येते: “परमेश्वर आमच्यावर प्रसन्न असला तर तो त्या दुधामधाचे प्रवाह वाहणाऱ्या देशात आम्हाला नेईल आणि तो देश आम्हाला देईल. तुम्ही . . . मात्र . . . त्या देशाच्या लोकांची भीति बाळगू नका कारण . . . आमच्याबरोबर परमेश्वर आहे; त्यांची भीति बाळगू नका.” (गणना १४:६-९) त्यांच्या या भरवशाचे त्यांना प्रतिफळ मिळाले. त्या काळी जिवंत असलेल्या प्रौढ पिढीपैकी, फक्त कालेब, यहोशवा आणि काही लेवी यांना वाग्दत्त देशात प्रवेश करण्याचा सुहक्क मिळाला.
१६ काही वर्षांनंतर कालेब म्हणाला: “पण मी मात्र आपला देव परमेश्वर ह्याच्या इच्छेप्रमाणे निष्ठापूर्वक वागलो. . . . इस्राएल रानात प्रवास करीत असताना परमेश्वराने मोशेला हे सांगितले तेव्हापासून पाहा आज पंचेचाळीस वर्षे परमेश्वराने आपल्या म्हणण्याप्रमाणे मला जिवंत ठेवले आहे; आज बघ मी पंचाऐंशी वर्षांचा आहे. मोशेने मला पाठविले त्या दिवशी मी जितका समर्थ होतो [जितकी] ताकद माझ्यात त्या वेळी होती तेवढीच आजहि आहे.” (यहोशवा १४:६-११) कालेबची सकारात्मक मनोवृत्ती, त्याचा विश्वासूपणा आणि त्याची शारीरिक क्षमता याकडे पाहा. तरीसुद्धा, मोशेचा उत्तराधिकारी होण्याकरता यहोवाने कालेबची निवड केली नव्हती. हा सुहक्क यहोशवाला देण्यात आला होता. अशी निवड करण्याकरता यहोवाकडे कारणे होती व ती निवड सर्वोत्तम होती असा आपण विश्वास बाळगू शकतो.
१७. पेत्र जबाबदारीकरता अपात्र आहे हे कदाचित कशामुळे भासले असावे?
१७ प्रेषित पेत्राने आपल्या धन्याला त्रिवार नाकारले. एके प्रसंगी त्याने उतावीळपणे कायदा आपल्या हातात घेऊन महायाजकाच्या दासाचा कान कापला. (मत्तय २६:४७-५५, ६९-७५; योहान १८:१०, ११) काहीजण म्हणतील, की पेत्र भित्रट, गरम डोक्याचा, खास सुहक्क मिळण्यास अपात्र असा मनुष्य होता. तरी, देव-राज्याच्या किल्या देऊन, तीन गटांसाठी स्वर्गीय बोलावण्याचा मार्ग खुला करण्याचा सुहक्क कोणास देण्यात आला होता? पेत्राला.—प्रेषितांची कृत्ये २:१-४१; ८:१४-१७; १०:१-४८.
१८. यहूदाने उल्लेखल्याप्रमाणे कोणती चूक आपण टाळली पाहिजे?
१८ बाह्यस्वरूप पाहून न्याय करण्याविषयी आपण सावधगिरी बाळगावी हे या उदाहरणांवरून आपल्याला दिसून येते. आपण यहोवावर भरवसा ठेवल्यास, त्याच्या निवडीबाबत शंका घेणार नाही. त्याच्या पृथ्वीवरील मंडळीत अपरिपूर्ण माणसे आहेत; आमच्याकडून चुका होणारच नाहीत असा त्यांचा दावा नाही; पण तरीसुद्धा यहोवा मोठ्या अद्भुतप्रकारे त्यांचा उपयोग करून घेत आहे. येशूचा सावत्र भाऊ, यहूदा याने पहिल्या शतकातील ख्रिश्चनांना, ‘प्रभुत्व तुच्छ लेखणाऱ्या व थोरांची निंदा करणाऱ्या’ लोकांपासून सावध राहण्यास सांगितले. (यहूदा ८-१०) आपण त्यांच्याप्रमाणे कधीही होता कामा नये.
१९. आपण यहोवाच्या निवडलेल्यांबाबत शंका घेण्याचे काहीएक कारण का नाही?
१९ आपल्या लोकांनी एका विशिष्ट समयी आपल्या इच्छेनुसार जावे म्हणून त्यांचे मार्गदर्शन करण्याकरता विशिष्ट गुण असलेल्या लोकांना विशिष्ट जबाबदारीकरता यहोवा निवडतो. देवाच्या निवडीबाबत शंका न घेता आपण हे सत्य ओळखण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे, आणि यहोवाने आपल्याला जे स्थान दिले आहे त्यात समाधानी राहून नम्रपणे त्याची सेवा केली पाहिजे. अशाप्रकारे आपण दाखवतो, की यहोवावर आपला भरवसा आहे.—इफिसकर ४:११-१६; फिलिप्पैकर २:३.
यहोवाच्या धार्मिकतेवर भरवसा दाखवणे
२०, २१. यहोवाने मोशेशी केलेल्या व्यवहारातून कदाचित आपण काय शिकू शकतो?
२० कधीकधी, स्वतःवर जास्त भरवसा ठेवून यहोवावर कमी भरवसा ठेवण्याकडे आपला कल जाऊ शकतो तेव्हा आपण मोशेच्या उदाहरणातून काही शिकू शकतो. तो ४० वर्षांचा झाला तेव्हा, इजिप्शियन बंदिवासातून इस्राएल लोकांची सुटका करण्याकरता तो स्वतः होऊनच निघाला. यात काही शंका नाही की त्याचे प्रयत्न सद्हेतुपूर्वक होते पण त्यामुळे इस्राएल लोकांची लागलीच सुटका झाली नाही, किंवा त्याची स्वतःची परिस्थिती देखील सुधरली नाही. उलट त्यालाच आपला जीव मुठीत धरून तेथून पळ काढावा लागला. एका विदेशी देशात ४० वर्षांपर्यंत कष्टप्रद प्रशिक्षण घेतल्यानंतरच कुठे तो, आधी त्याला जे करायचे होते ते करण्यासाठी निवडले जाण्यास पात्र ठरला. आणि आता तो हा विश्वास बाळगू शकत होता, की त्याला यहोवाचा आधार आहे, कारण आता सर्वकाही यहोवाच्या वेळेनुसार व त्याच्या पद्धतीनुसार घडत होते.—निर्गम २:११–३:१०.
२१ आपण प्रत्येकजण स्वतःला असे विचारू शकतो: ‘मी कधीकधी, सर्व काही त्वरित व्हावे म्हणून किंवा माझ्या पद्धतीनुसार काही गोष्टी व्हाव्यात म्हणून यहोवाच्या आणि मंडळीतील नियुक्त वडिलांच्या पुढे पुढे पळतो का? विशिष्ट विशेषाधिकारांसाठी माझ्याकडे दुर्लक्ष केले जात आहे असा विचार करण्याऐवजी, माझ्या चालू प्रशिक्षणाचा समय मी आनंदाने स्वीकारतो का?’ सर्वात महत्त्वाचे म्हणजे, आपण मोशेकडून एक महत्त्वाचा धडा शिकलो आहोत का?
२२. मोशेने इतका मोठा सुहक्क गमावला होता तरीसुद्धा त्याला यहोवाविषयी कसे वाटले?
२२ याशिवाय, आपण मोशेकडून आणखी एक धडा शिकू शकतो. मोशेने एक अशी चूक केली होती जी त्याला अतिशय भारी पडली; याविषयी गणना २०:७-१३ आपल्याला सांगते. वाग्दत्त देशात इस्राएल लोकांचे नेतृत्व करण्याचा सुहक्क त्याने गमावला. यहोवाने घेतलेला निर्णय न्यायी नव्हता अशी त्याने प्रतिक्रिया दाखवली का? देव त्याच्याशी अन्यायीपणे वागला म्हणून तो जणू एका कोपऱ्यात रूसून बसला का? मोशेचा यहोवाच्या धार्मिकतेवरील भरवसा आता संपला होता का? स्वतः मोशेने आपल्या मृत्यूपूर्वी इस्राएल लोकांना जे सांगितले त्यातच आपल्याला या प्रश्नांची उत्तरे मिळतील. यहोवाविषयी तो म्हणाला: “त्याची कृति परिपूर्ण आहे; त्याचे सर्व मार्ग न्यायाचे आहेत; तो विश्वसनीय देव आहे; त्याच्या ठायी अनीति नाही; तो न्यायी व सरळ आहे.” (अनुवाद ३२:४) मोशेने निश्चितच शेवटपर्यंत यहोवावर भरवसा ठेवला. आणि आपण? आपण प्रत्येकजण यहोवा आणि त्याची धार्मिकता यांवरील आपला भरवसा दृढ करण्याकरता पावले उचलत आहोत का? ते आपण कसे करू शकतो? पुढे पाहू या.
तुम्ही कसे उत्तर द्याल?
◻ यहोवावर भरवसा ठेवण्याकरता इस्राएल लोकांकडे कोणती कारणे होती?
◻ भरवशाच्या बाबतीत अब्राहामाकडून काय शिकता येते?
◻ यहोवाच्या निवडलेल्यांबाबत शंका घेण्याचे आपण का टाळले पाहिजे?
[१३ पानांवरील चित्र]
यहोवावर भरवसा ठेवण्यात मंडळीत पुढाकार घेणाऱ्यांचा आदर करणे समाविष्ट आहे