वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w98 ८/१५ पृ. १५-२०
  • यहोवाच्या धार्मिकतेवरील आपला भरवसा भक्कम करणे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यहोवाच्या धार्मिकतेवरील आपला भरवसा भक्कम करणे
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • विनाकारण त्रास सहन केल्याच्या भावना
  • योनाकडून शिकणे
  • आपला भरवसा भक्कम करण्याची ही वेळ आहे!
  • यहोवाचे न्यायदंड धार्मिक असतील
  • यहोवा आपला भरवसा होवो
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • भरवसा पुन्हा मिळवता येतो!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • तो दया दाखवण्यास शिकला
    त्यांच्या विश्‍वासाचं अनुकरण करा
  • तो दया दाखवण्यास शिकला
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००९
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
w98 ८/१५ पृ. १५-२०

यहोवाच्या धार्मिकतेवरील आपला भरवसा भक्कम करणे

‘यहोवावर तुझा भरवसा असावा म्हणून मी तुला ज्ञान कळवले आहे.’—नीतिसूत्रे २२:१९.

१, २. (अ) यहोवाचे साक्षीदार यहोवावर भरवसा का ठेवतात? (नीतिसूत्रे २२:१९) (ब) काहींना यहोवावरील आपला भरवसा आणखी भक्कम करण्याची गरज आहे हे कशावरून सूचित होते?

यहोवा आणि त्याच्या उद्देशांचे अचूक ज्ञान मिळाल्याने खरे ख्रिस्ती आशीर्वादित आहेत. ‘विश्‍वासू व बुद्धिमान दास,’ प्रेमळपणे त्यांना “यथाकाळी” आध्यात्मिक अन्‍न पुरवतो. (मत्तय २४:४५) त्यांनी प्राप्त केलेले ज्ञान त्यांना देवावर भरवसा दाखवण्यास भक्कम आधार पुरवते. म्हणूनच गट या नात्याने, यहोवाचे साक्षीदार यहोवावर आणि त्याच्या धार्मिकतेवर उल्लेखनीय भरवसा दाखवतात.

२ परंतु, असे दिसते, की काही साक्षीदार व्यक्‍तींना असा भरवसा भक्कम करण्याची आवश्‍यकता आहे. संस्थेच्या प्रकाशनांमधील स्पष्टीकरणाविषयी अनिश्‍चितता व्यक्‍त करणारी पत्रे संस्थेला अधूनमधून मिळत आहेत. या शंका कदाचित, समजेमध्ये झालेल्या फेरबदलाबद्दलच्या प्रतिक्रिया असू शकतात किंवा कदाचित एखादा विषय चौकशी करणाऱ्‍याला भावनिकरीत्या चाटून गेला असेल.—पडताळा योहान ६:६०, ६१.

३. यहोवाच्या विश्‍वासू असलेल्या सेवकांच्या बाबतीत देखील काय घडू शकते व का?

३ यहोवाचे खरे सेवक देखील उपदेशक ९:११ मधील सत्यता अनुभवतात; त्यात लिहिले आहे: “मी फिरून सूर्याच्या खालती असे पाहिले की वेगवंतांस धाव व बलवानास युद्ध साधत नाही, आणि ज्ञान्यांस अन्‍न व बुद्धिमंतांस धन आणि निपुणांस अनुग्रह प्राप्त होत नाही, परंतु समय व प्रसंग हे सर्वांना घडतात.” (पं.र.भा.) हे एका विस्तारित किंवा आध्यात्मिक अर्थाने कसे काय खरे ठरू शकते? बायबल सल्ला लागलीच लागू केला, सत्याचे समर्थन केले, बायबल तत्त्वे सुज्ञपणे लागू केले व अचूक ज्ञान मिळण्यासाठी आवेश दाखवला असे ख्रिश्‍चन आपल्या माहितीत असतील. तरी, ‘समय व प्रसंगामुळे’ आणि एखाद्या अपघातामुळे किंवा वाढत्या वयामुळे काहीजणांना वाटेल आपण पूर्वी जसे करीत होतो तसे आता जमत नाही. ते कदाचित असा विचार करतील, की आपण देवाच्या नवीन जगात प्रवेश करेपर्यंत जिवंत राहू की नाही.

४, ५. ख्रिश्‍चनांना यहोवाच्या धार्मिकतेवरील भरवसा गमावण्याचे काहीएक कारण का नाही?

४ एक ख्रिस्ती आपला विवाह सोबती गमावतो तेव्हाचे दुःख आणि विरहभावना अतिशय कटू असते. दोघांनी एकत्र मिळून यहोवाची अनेक वर्षांपर्यंत किंवा दशकांपर्यंत सेवा केली असेल. जिवंत राहिलेल्या सोबत्याला ठाऊक आहे की मृत्यूमुळे त्यांचे वैवाहिक बंध संपुष्टात येतात.a (१ करिंथकर ७:३९) आणि आता स्वतःचा भरवसा कमी होऊ नये म्हणून त्याने आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवले पाहिजे.

५ एखाद्या सोबत्याचा, पालकाचा, मुलाचा किंवा जवळच्या ख्रिस्ती मित्राचा मृत्यू होतो तेव्हा, ही संधी यहोवाच्या धार्मिकतेवर भरवसा दाखवण्याची संधी आहे असे समजणे किती सुज्ञपणाचे आहे! आपली व्यक्‍तिगत हानी होते तेव्हा देखील, यहोवा अधार्मिक नाही असा आपण भरवसा बाळगू शकतो. सार्वकालिक जीवन प्राप्त करणारे सर्व—बचावाद्वारे असो किंवा पुनरुत्थानाद्वारे असो—आनंदी असतील असा आपण भरवसा बाळगू शकतो. देवाविषयी स्तोत्रकर्ता म्हणाला: “तू आपली मूठ उघडून प्राणिमात्राची इच्छा पुरी करितोस. परमेश्‍वर आपल्या सर्व मार्गांत न्यायी आहे, तो आपल्या सर्व कृत्यात दयाळू आहे. जे कोणी त्याचा धावा करितात, जे खऱ्‍या भावाने त्याचा धावा करितात, त्या सर्वांना परमेश्‍वर जवळ आहे. तो आपले भय धरणाऱ्‍यांची इच्छा पुरवितो; व त्यांची आरोळी ऐकून त्यांना तारितो.”—स्तोत्र १४५:१६-१९.

विनाकारण त्रास सहन केल्याच्या भावना

६, ७. (अ) गत काळात त्रास सहन केलेल्या काही साक्षीदारांची आता वेगळी समज का असू शकते? (ब) गत काळात यहोवाने त्यांना त्रास सहन करू दिला यामुळे तो अधार्मिक आहे असे का म्हणता येणार नाही?

६ गत काळात काही साक्षीदारांनी, अशा कार्यात भाग न घेतल्यामुळे त्रास सहन केला जी कार्ये करण्यास कदाचित त्यांचा विवेक आता त्यांना अनुमती देईल. जसे की, विशिष्ट प्रकारच्या नागरी सेवांबद्दल त्यांची अशी निवड असेल. परंतु आता एखाद्या बांधवाला वाटेल, की सद्य व्यवस्थीकरणाच्या संबंधाने आपल्या ख्रिस्ती तटस्थतेची पायरी न ओलांडता मी हे काम विचारपूर्वकपणे करू शकतो.

७ आता कसलेही विपरीत परिणाम न भोगता त्याला सहज करता येऊ शकणारे काम करण्यास त्याने आधी नाकारल्यामुळे त्याला झालेला त्रास सहन करू दिला यावरून यहोवा अधार्मिकपणे वागला का? ज्यांनी अनुभव घेतला आहे ते असा विचार करणार नाहीत. उलट, विश्‍वाच्या सार्वभौमत्वाच्या वादविषयावर दृढ राहण्याकरता त्यांना जाहीरपणे व स्पष्टपणे संधी मिळाल्याबद्दल ते आनंद मानतात. (पडताळा ईयोब २७:५.) यहोवासाठी दृढ भूमिका घेण्याकरता आपल्या विवेकाचे अनुसरण केल्याबद्दल एखादा पस्तावा का करील? त्यांच्या समजेनुसार त्यांनी ख्रिस्ती तत्त्वांना एकनिष्ठपणे उंचावण्याद्वारे किंवा विवेकाच्या प्रेरणेला प्रतिसाद देण्याद्वारे ते यहोवाचे मित्रत्व प्राप्त करण्याच्या पात्र झाले आहेत. निश्‍चितच, एखाद्याने आपल्या विवेकाविरुद्ध किंवा कदाचित इतरांना अडखळण होईल असे कार्य करण्याचे टाळणे सुज्ञपणाचे ठरेल. याबाबतीत आपण प्रेषित पौलाने मांडलेल्या उदाहरणाचा विचार करू शकतो.—१ करिंथकर ८:१२, १३; १०:३१-३३.

८. पूर्वी नियमशास्त्राचे पालन करणाऱ्‍या यहूदी ख्रिश्‍चनांकडे यहोवाच्या धार्मिकतेवर शंका घेण्याचे कारण का नव्हते?

८ यहोवाला संतुष्ट करण्याकरता यहुद्यांनी दहा आज्ञा व सुमारे ६०० विविध नियमांची एक विस्तृत नियमावली पाळावी अशी त्यांच्याकडून अपेक्षा होती. नंतर, ख्रिस्ती व्यवस्थेखाली, यहोवाची सेवा करण्याकरता अशा नियमांचे पालन जरूरीचे राहिले नाही; ही व्यवस्था शारीरिक यहुद्यांसाठी देखील लागू झाली. सुंता, शब्बाथाचे पालन, प्राण्यांची अर्पणे आणि विशिष्ट अन्‍नविषयक प्रतिबंध यासारखे नियम देखील रद्द झाले. (१ करिंथकर ७:१९; १०:२५; कलस्सैकर २:१६, १७; इब्री लोकांस १०:१, ११-१४) ख्रिस्ती बनलेल्या यहुद्यांना, ज्यात प्रेषितांचा देखील समावेश होतो, नियमशास्त्र कराराखाली असताना जे नियम पाळावयाची अपेक्षा होती त्यातून मुक्‍त करण्यात आले. आता अनावश्‍यक असलेल्या गोष्टी आधी उगाच आमच्याकडून पाळून घेतल्या असे म्हणून त्यांनी देवाची व्यवस्था अधार्मिक आहे अशी तक्रार केली का? नाही, यहोवाचे उद्देश आणखी स्पष्टपणे समजू लागल्यामुळे त्यांनी आनंद केला.—प्रेषितांची कृत्ये १६:४, ५.

९. काही साक्षीदारांच्याबाबतीत काय घडले, पण त्यांना पस्तावा करण्याचे काही कारण का नाही?

९ आधुनिक काळात, असे काही साक्षीदार आहेत ज्यांनी, स्वतःला अगदीच कडक ठेवले होते. या कारणास्तव त्यांना इतरांपेक्षा अधिक सहन करावे लागले. नंतर, प्रगत ज्ञानाने त्यांना आपल्या दृष्टिकोनाची क्षितिजे विस्तारण्यास साहाय्य केले. परंतु आधी आपल्या विवेकाच्या एकमतात त्यांनी केलेल्या कार्यावर, ज्यामुळे त्यांना जास्त सहन करावे लागले होते तरीसुद्धा त्यांना पस्तावा करण्याचे काही कारण नाही. “सर्व काही सुवार्तेकरिता” विश्‍वासूपणे यहोवासाठी सहन करण्याची त्यांची तयारी दर्शवणे खरोखरच प्रशंसनीय आहे. अशा भक्‍तिमान प्रवृत्तीबद्दल यहोवा आशीर्वाद देतो. (१ करिंथकर ९:२३; इब्री लोकांस ६:१०) प्रेषित पेत्राने सूक्ष्मदृष्टी बाळगून असे लिहिले: “चांगले केल्याबद्दल दुःख भोगणे व ते निमूटपणे सहन करणे हे देवाच्या दृष्टीने उचित आहे.”—१ पेत्र २:२०.

योनाकडून शिकणे

१०, ११. (अ) निनवेला जाण्याची नेमणूक मिळाली तेव्हा आणि (ब) देवाने निनवेकरांचा नाश केला नाही तेव्हा या दोन गोष्टींत यहोवावर भरवसा दाखवण्यात योना कसा उणा पडला?

१० निनवेला जाण्याचा आदेश मिळाल्यावर, यहोवा आपल्यावर भरवसा ठेवत आहे या गोष्टीची योनाने कदर बाळगली नाही. अवज्ञेमुळे त्याच्यावर गुजरलेल्या एका भयंकर अनुभवानंतर योना ताळ्यावर आला, त्याने आपली चूक ओळखली, आपली विदेशी नेमणूक स्वीकारली आणि निनवेकरांना येणाऱ्‍या नाशाची ताकीद दिली. पण घडले उलटेच: निनवेकरांच्या पश्‍चात्तापी मनोवृत्तीमुळे यहोवाने त्यांचा नाश करण्याची कल्पना सोडून दिली.—योना १:१–३:१०.

११ यावर योनाची प्रतिक्रिया? नाराज होऊन त्याने देवाला प्रार्थनेत तक्रार केली. त्याच्या नाराजीचे सार हे होते: ‘मला वाटलंच होतं हे असंच होईल. म्हणून आधीच मी निनवेला जात नव्हतो. आणि आता तिकडे गेलो, वाटेत मी किती घाबरलो, एका मोठ्या माशानं मला गिळलं त्यामुळे झालेला माझा अपमान, शिवाय, निनवेकरांना येणाऱ्‍या नाशाची ताकीद देण्याकरता मी किती कष्ट घेतले आणि शेवटी हे असं! माझं सर्व काम आणि कष्ट पाण्यातच गेलं म्हणायचं! त्यापेक्षा मी मेलो असतो तर बरं झालं असतं.’—योना ४:१-३.

१२. आपण योनाच्या अनुभवावरून काय शिकू शकतो?

१२ तक्रार करण्याजोगे सबळ कारण योनाकडे होते का? पश्‍चातापी पातक्यांना दया दाखवण्याद्वारे यहोवा अधार्मिक झाला होता का? खरे तर, योनाने आनंद करायला हवा होता: हजारोहजार लोक नाशापासून वाचले होते! (योना ४:११) परंतु त्याच्या अनादरणीय, तक्रारी मनोवृत्तीतून, तो यहोवाच्या धार्मिकतेवर गाढ भरवसा दाखवत नसल्याचे स्पष्ट दिसले. इतरांऐवजी तो स्वतःबद्दलच जास्त विचार करीत होता. योनाकडून आपण धडा शिकू या: व्यक्‍तिगत भावनांना दुय्यम स्थान देणे. यहोवाची आज्ञा पाळणे, त्याच्या संघटनेद्वारे पुरवले जाणारे मार्गदर्शन अनुसरणे व त्याचे निर्णय स्वीकारणे उचित आहे याची आधी आपण स्वतः खात्री करून घेऊ या. “देवाचे भय बाळगणारे जे त्यास भिऊन वागतात त्यांचे कल्याणच होईल” अशी आपल्याला खात्री पटली आहे.—उपदेशक ८:१२.

आपला भरवसा भक्कम करण्याची ही वेळ आहे!

१३. आपण सर्वजण यहोवावरील आपला भरवसा भक्कम कसा करू शकतो?

१३ यहोवावरील आपला भरवसा भक्कम करणे सुज्ञपणाचे आहे. (नीतिसूत्रे ३:५-८) अर्थातच, आपण आणखी भरवसा दाखवावा अशी केवळ यहोवाजवळ प्रार्थना करणे पुरेसे नाही. भरवसा हा अचूक ज्ञानाच्या आधारावर वाढत असल्यामुळे, व्यक्‍तिगत बायबल अभ्यास, बायबल आणि बायबलचे स्पष्टीकरण देणारी प्रकाशने या दोहोंचे वाचन आपला नित्यक्रम झाला पाहिजे. ख्रिस्ती सभांना नियमित उपस्थिती जशी महत्त्वाची आहे तशीच उत्तम तयारी आणि होता होईल तितका सभांमध्ये सहभाग देखील. इतरांना बायबलमधील सत्य सांगण्याची सवय केल्याने, आक्षेपांना कौशल्यपूर्ण रीतीने उत्तर दिल्याने सुद्धा यहोवा आणि त्याच्या वचनावरील आपला भरवसा वाढतो. अशाप्रकारे आपण दररोज त्याच्या आणखी समीप येतो.

१४. पूर्वी कधीही झाले नव्हते तसे लवकरच देवाच्या लोकांना त्यांचा भरवसा प्रदर्शित का करावा लागेल?

१४ नजीकच्या भवितव्यात, मानवजातीवर कोसळणाऱ्‍या सर्वात मोठ्या संकटाची सुरवात अचानक होईल. (मत्तय २४:२१) असे झाल्यावर, देवाच्या सेवकांना यहोवाच्या धार्मिकतेवर आणि त्याची संघटना पुरवत असलेल्या मार्गदर्शनावर पूर्वीपेक्षा अधिक भरवसा दाखवण्याची आवश्‍यकता भासेल. एका लाक्षणिक मार्गाने ते मग देवाची ही आज्ञा भरवशाने पाळतील: “चला, माझ्या लोकांनो, आपआपल्या खोल्यात जा, दारे लावून घ्या; क्रोधाचा झपाटा निघून जाईपर्यंत थोडा वेळ लपून राहा.” (यशया २६:२०) आधीच त्यांनी २३२ राष्ट्रांतील ८५,००० पेक्षा अधिक मंडळ्यांच्या संरक्षक वातावरणात प्रवेश केला आहे. “आपआपल्या खोल्यात जा,” या आज्ञेत आणखी कितीही आज्ञा समाविष्ट असोत, आपण मात्र हा भरवसा बाळगू शकतो, की यहोवा आपल्याला ही आज्ञा पाळावयास मदत करील.

१५. सन १९९८ दरम्यान भरवशाच्या विषयावर कशाप्रकारे जोर देण्यात येत आहे व हे उचित का आहे?

१५ आपण आपला भरवसा आता भक्कम करणे निकडीचे आहे. आपल्या ख्रिस्ती बांधवांवर, यहोवाच्या संघटनेवर आणि सर्वात अधिक म्हणजे, स्वतः यहोवावर आपला भरवसा नसल्यास आपला बचाव अशक्य आहे. तेव्हा, अगदी यथायोग्यपणे १९९८ च्या वर्षादरम्यान, संपूर्ण जगभरातील यहोवाच्या साक्षीदारांना त्यांच्या वार्षिक वचनाद्वारे वारंवार आठवण करून दिली जाते, की “जो कोणी यहोवाचे नाव घेऊन त्याचा धावा करील त्याचे तारण होईल!” (रोमकर १०:१३, NW) आणि यावर आपण नेहमी भरवसा बाळगला पाहिजे. असा भरवसा बाळगण्यात आपण किंचित कमी पडत आहोत अशी जराजरी कुणकुण आपल्याला लागल्यास आपण आता, होय आजच त्यात सुधार करण्यास कार्य करू या.

यहोवाचे न्यायदंड धार्मिक असतील

१६. भरवसा विकसित करण्यात आला नाही तर काय घडू शकते व असे होण्याचे आपण कसे टाळू शकतो?

१६ “जर आपण आपला आरंभीचा भरवसा शेवटपर्यंत दृढ धरिला तरच आपण ख्रिस्ताचे भागीदार झालो आहो” असा इशारा अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना इब्री लोकांस ३:१४ येथे देण्यात आला आहे. तत्त्वतः, हे शब्द पार्थिव आशा असलेल्या ख्रिश्‍चनांना देखील लागू होतात. सुरवातीपासूनच भरवसा विकसित केला नाही तर तो हळूहळू नाहीसा होऊ शकतो. यास्तव, आपण अचूक ज्ञान घेण्याचे चालू ठेवणे किती महत्त्वाचे आहे; याद्वारे आपला भरवसा ज्यावर आधारित आहे तो पाया आणखी भक्कम करू शकतो!

१७. बचावाच्या बाबतीत येशू उचितपणे न्याय करील असा आपण भरवसा का बाळगू शकतो?

१७ सर्व राष्ट्रांचे लवकरच ख्रिस्ताद्वारे परीक्षण होणार आहे जेणेकरून, तो “जसे मेंढपाळ शेरडांपासून मेंढरे वेगळी करितो तसे तो त्यास एकमेकांपासून वेगळे” करू शकेल. (मत्तय २५:३१-३३) बचावाच्या पात्र असलेल्यांचा न्याय करण्यात ख्रिस्त धार्मिकपणा दाखवेल हा भरवसा आपण बाळगू शकतो. “जगाचा न्यायनिवाडा नीतिमत्त्वाने” करण्याकरता यहोवाने त्याला बुद्धी, समज आणि इतर आवश्‍यक गुण दिले आहेत. (प्रेषितांची कृत्ये १७:३०, ३१) अब्राहामाप्रमाणे आपणही ही खात्री बाळगू या; तो म्हणाला: “या प्रकारची कृति तुजपासून दूर राहो. नीतिमानाची आणि दुष्टाची सारखीच गत होईल असा दुर्जनाबरोबर नीतिमानांचा वध करणे तुजपासून दूर राहो; सर्व जगाचा न्यायाधीश योग्य न्याय करणार नाही काय?”—उत्पत्ति १८:२५.

१८. आपल्याला आता ज्या गोष्टी माहीत नाहीत त्यांच्याविषयी फाजील काळजी करण्याचे कारण का नाही?

१८ यहोवाच्या धार्मिकतेवर पूर्ण भरवसा ठेवल्यावर, ‘बाळांचा आणि लहान मुलांचा न्याय कसा होईल बरे? हर्मगिदोन येईल तेव्हा पुष्कळ लोकांपर्यंत सुवार्ता अद्याप पोहंचलेली नसेल असे कदाचित होईल का? मनोरुग्णांचे काय? . . . . बद्दल काय?’ अशा प्रश्‍नांना उत्तरे शोधण्याची आपण काळजी करण्याची गरज नाही. कबूल आहे की या प्रश्‍नांना यहोवा कसा सोडवील हे आपल्याला आता तरी माहीत नाही. परंतु तो ते एका धार्मिक आणि दयाळू मार्गाने जरूर करील. त्याबद्दल आपण शंका घेता कामा नये. खरे तर, आपण विचारसुद्धा केला नाही अशा मार्गाने तो या प्रश्‍नांना सोडवेल हे पाहून कदाचित आपण आश्‍चर्यचकीत व आनंदी होऊ!—पडताळा ईयोब ४२:३; स्तोत्र ७८:११-१६; १३६:४-९; मत्तय १५:३१; लूक २:४७.

१९, २०. (अ) तर्कशुद्ध प्रश्‍न विचारणे चुकीचे का नाही? (ब) यहोवा आवश्‍यक ती उत्तरे केव्हा देईल?

१९ काही विरोधक चुकीने दावा करतात त्याप्रमाणे यहोवाची संघटना प्रांजळ, समयोचित प्रश्‍न विचारण्यास मनाई करीत नाही. (१ पेत्र १:१०-१२) परंतु, बायबल आपल्याला सल्ला देते की आपण मूर्ख, अव्यवहारिक प्रश्‍न विचारू नयेत. (तीत ३:९) तर्कशुद्ध प्रश्‍न विचारल्याने व शास्त्रवचनीय उत्तरे मिळण्याकरता देवाच्या वचनात तसेच ख्रिस्ती प्रकाशनांमध्ये संशोधन केल्याने आपलेच अचूक ज्ञान वाढू शकेल व याद्वारे यहोवावरील आपला भरवसा आणखी भक्कम होऊ शकेल. संघटना येशूच्या उदाहरणाचे अनुसरण करते. त्याने अशा प्रश्‍नांची उत्तरे देण्याचे टाळले ज्यांची अजून उचित वेळ आली नव्हती. तो म्हणाला: “मला अद्याप तुम्हाला पुष्कळ गोष्टी सांगावयाच्या आहेत, परंतु आताच तुमच्याने त्या सोसवणार नाहीत.” (योहान १६:१२) त्याने हेही कबूल केले, की काही गोष्टी त्याप्रसंगी त्यालासुद्धा माहीत नव्हत्या.—मत्तय २४:३६.

२० यहोवाला पुष्कळ गोष्टी प्रकट करायच्या आहेत. तोपर्यंत थांबून राहणे किती सुज्ञपणाचे आहे; आणि आपण असाही भरवसा बाळगला पाहिजे, तो जेव्हा या गोष्टी प्रकट करील तेव्हा त्या प्रकट करण्याचा उचित समय असेल. यहोवाचा नियुक्‍त समय आल्यावर त्याच्या मार्गांबद्दलची जादा समज प्राप्त करण्याचा आनंद आपल्याला मिळेल हा भरवसा आपण ठेवू शकतो. होय पण, यहोवावर आणि तो ज्या संघटनेचा उपयोग करीत आहे तिजवर पूर्ण भरवसा ठेवल्यावरच आपल्याला प्रतिफळ मिळेल. नीतिसूत्रे १४:२६ आपल्याला अशी खात्री देते: “परमेश्‍वराचे भय धरिल्याने श्रद्धा [भरवसा] दृढ होते; आणि ज्यांच्या ठायी श्रद्धा असते त्यांच्या मुलांस ती आश्रयस्थान होते.”

[तळटीपा]

a टेहळणी बुरूज (इंग्रजी) ऑक्टोबर १५, १९६७, पृष्ठ ६३८; जून १, १९८७, पृष्ठ ३० पाहा.

तुम्हाला काय वाटते?

◻ आपल्या भावनांना यहोवावरील आपला भरवसा कमी करू देणे मूर्खपण का आहे?

◻ योनाच्या अनुभवावरून आपण काय शिकू शकतो?

◻ बायबल अभ्यास आणि सभांना उपस्थिती इतकी महत्त्वाची का आहे?

[१६ पानांवरील चित्र]

आपली व्यक्‍तिगत हानी होते तेव्हा देखील, यहोवा अधार्मिक नाही असा आपण भरवसा बाळगू शकतो

[१८ पानांवरील चित्र]

यहोवावर तुमचा भरवसा आहे याबद्दल तुम्हाला खात्री आहे का?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा