भरवसा पुन्हा मिळवता येतो!
सध्याचे बेभरवशाचे युग ‘शेवटल्या काळाचे’ चिन्ह असले, तरी हा बेभरवसा हजारो वर्षांआधी देखील दिसून आला होता. (२ तीमथ्य ३:१) सर्वात अकल्पनीय ठिकाणी त्याची सुरवात झाली—आनंदीआनंद असलेल्या प्रथम बागेत. त्या ठिकाणाविषयी बायबल आपल्याला असे सांगते: “परमेश्वर देवाने पूर्वेस एदेनात बाग लाविली आणि तीत आपण घडिलेल्या मनुष्याला ठेविले. परमेश्वर देवाने दिसण्यात सुंदर व अन्नासाठी उपयोगी अशी सर्व जातीची झाडे, बागेच्या मध्यभागी जीवनाचे झाड, आणि बऱ्यावाइटाचे ज्ञान करून देणारे झाड ही जमिनीतून उगवविली.”—उत्पत्ति २:८, ९.
परंतु, आधुनिक काळातल्या बेभरवशाचा याच्याशी काय संबंध आहे हे पुढील वचनांतून दिसून येते. पुढे असे म्हटले आहे: “तेव्हा परमेश्वर देवाने आदामाला अशी आज्ञा दिली की बागेतील वाटेल त्या झाडाचे फळ यथेच्छ खा; पण बऱ्यावाइटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडाचे फळ खाऊ नको; कारण ज्या दिवशी त्याचे फळ तू खाशील त्या दिवशी तू खास मरशील.” (उत्पत्ति २:१६, १७) यहोवाने जे सांगितले होते त्याविषयी आदामाला शंका बाळगण्याचे काही कारण होते का?
आपल्याला पुढे असे वाचायला मिळते: “परमेश्वर देवाने केलेल्या सर्व वनचरात सर्प फार धूर्त होता. तो स्त्रीला म्हणाला, तुम्ही बागेतल्या कोणत्याहि झाडाचे फळ खाऊ नये असे देवाने तुम्हास सांगितले हे खरे काय? स्त्रीने सर्पास म्हटले, बागेतल्या झाडांची फळे खाण्याची आम्हाला मोकळीक आहे पण बागेच्या मध्यभागी असलेल्या झाडाच्या फळाविषयी देवाने सांगितले आहे की ते खाऊ नका; त्याला स्पर्शहि करू नका, कराल तर मराल. सर्प स्त्रीला म्हणाला, तुम्ही खरोखर मरणार नाही; कारण देवाला हे ठाऊक आहे की तुम्ही त्याचे फळ खाल त्याच दिवशी तुमचे डोळे उघडतील, आणि तुम्ही देवासारखे बरेवाईट जाणणारे व्हाल. त्या झाडाचे फळ खाण्यास चांगले, दिसण्यास मनोहर आणि शहाणे करण्यास इष्ट आहे असे त्या स्त्रीला दिसून आले; तेव्हा तिने त्याचे फळ काढून खाल्ले व आपल्याबरोबर आपल्या पतीसहि ते दिले; व त्याने ते खाल्ले.”—उत्पत्ति ३:१-६.
देवाने स्पष्ट शब्दांत दिलेल्या ताकिदीकडे दुर्लक्ष करून आदाम आणि हव्वेने यहोवावर आपला भरवसा नाही हे दाखवून दिले. उलट, देवाचा शत्रू सैतान, जो खरोखरच्या सर्पाद्वारे हव्वेसोबत बोलला त्याचे गुण त्यांनी दाखवले. राज्य करण्याच्या यहोवाच्या पद्धतीवर सैतानाचा भरवसा नव्हता. या कारणामुळे, शिवाय घमंडी आणि महत्त्वाकांक्षी अंतःकरणामुळे, त्याने देवाविरुद्ध बंड केले आणि मानवांनाही तेच करायला लावले. देवावर भरवसा करता येत नाही असा विचार त्याने त्यांच्या डोक्यात घातला.
परिणाम? नातेसंबंध बिनसले
जे लोक इतरांवर भरवसा ठेवत नाहीत अशांची कोणासोबतही मैत्री टिकत नसते हे निरीक्षण तुम्ही केलेच असणार. पूब्लीयुस स्यूरुस, या सा. यु. पू. पहिल्या शतकातल्या लॅटिन लेखकाने लिहिले: “भरवसा हेच मित्रत्वाचे बंधन आहे.” बंडखोरी करून आदाम आणि हव्वेने दाखवले की त्यांचा देवावर भरवसा नाही. यास्तव, देवालाही त्यांच्यावर विश्वास करण्याचे काहीच कारण नव्हते. देवावरचा विश्वास किंवा भरवसा आता उडाल्याने पहिल्या मानवांची देवासोबतची मैत्री तुटली. बंडखोरी केल्यामुळे त्यांना शिक्षा दिल्यानंतर, यहोवा त्यांच्याशी पुन्हा कधी बोलला असा कोणताही संकेत नाही.
आदाम आणि हव्वा यांच्यातला संबंधही बिघडला. यहोवाने हव्वेला ताकीद दिली: “तू क्लेशाने लेकरे प्रसवशील; तरी तुझा ओढा नवऱ्याकडे राहील आणि तो तुझ्यावर स्वामित्व चालविल.” (तिरपे वळण आमचे.) (उत्पत्ति ३:१६) मराठी कॉमन लँग्वेज बायबल म्हणते: “तो तुझ्यावर अधिकार गाजवील.” देवाची इच्छा होती त्याप्रमाणे, आपल्या पत्नीवर प्रेमाने मस्तकपद चालवण्याऐवजी आदाम आता तिचा स्वामी बनला, तो तिच्यावर अधिकार गाजवू लागला.
त्यांनी पाप केल्यावर, आदामाने हव्वेवर दोष ढकलण्याचा प्रयत्न केला. त्याच्या मते, तिच्यामुळेच त्यांना एका परिपूर्ण बागेतून बाहेर काढण्यात आले होते आणि अर्धवट अशा पृथ्वीवर, प्रतिकूल परिस्थितींमध्ये मरेपर्यंत राबावे लागणार होते. (उत्पत्ति ३:१७-१९) या कारणावरून त्या दोघांमध्ये बाचाबाची होत असावी याची आपण कल्पना करू शकतो. आदामाचा पारा चढला असेल, आणि येथून पुढे आपण हव्वेचे काहीएक ऐकणार नाही असे देखील तो म्हणाला असेल. जणू तो म्हणत होता: ‘आतापासून मी म्हणेन तेच खरं!’; आणि असे तिला सांगताना आपण अगदी बरोबरची गोष्ट करत आहोत असे त्याला वाटले असावे. दुसऱ्या बाजूला पाहता, कुटुंबाचा मस्तक या नात्याने आदाम आपली भूमिका पार पाडण्यात उणा पडला हे हव्वेने पाहिले असेल आणि त्याच्यावरचा तिचा भरवसा उडाला असेल. थोडक्यात सांगायचे म्हणजे, देवावरील भरवशाच्या अभावामुळे मानवांची त्याच्यासोबत मैत्री तुटली आणि आपापसांतले नातेसंबंधही बिनसले.
आपण कोणावर भरवसा ठेवू शकतो?
आदाम आणि हव्वेच्या उदाहरणावरून दिसते त्याप्रमाणे, सर्वांवरच भरवसा ठेवता येत नाही. तर मग, कोणावर भरवसा ठेवावा आणि कोणावर ठेवू नये हे आपल्याला कसे ठाऊक होणार?
स्तोत्र १४६:३ आपल्याला सल्ला देते: “अधिपतींवर भरवसा ठेवू नका; मनुष्यावर भरवसा ठेवू नका; त्याच्याकडून साहाय्य मिळणे शक्य नाही.” आणि यिर्मया १७:५-७ येथे आपल्याला असे वाचायला मिळते: “जो इसम मनुष्यावर भिस्त ठेवितो, मानवाला आपला बाहू करितो व ज्याचे अंतःकरण परमेश्वरापासून फिरले आहे तो शापित आहे.” तर दुसऱ्या बाजूला, “जो पुरुष परमेश्वरावर भाव ठेवितो, ज्याचा भावविषय परमेश्वर आहे तो धन्य.”
अर्थात, मानवांवर भरवसा करणे नेहमीच चुकीचे नसते. त्या शास्त्रवचनांचा मुद्दा इतकाच आहे की, देवावर भरवसा ठेवल्याने कधीही निराशा होत नाही परंतु, अपरिपूर्ण मानवांवर भरवसा ठेवल्याने काही वेळा विनाशकारी परिणाम घडू शकतात. उदाहरणार्थ, केवळ देवालाच शक्य असणाऱ्या म्हणजे उद्धार करणे आणि संपूर्ण शांती व सुरक्षितता आणणे, अशा गोष्टी साध्य करण्यासाठी जे लोक मानवांवर भरवसा करतात त्यांच्या वाट्याला निराशाच येत असते.—स्तोत्र ४६:९; १ थेस्सलनीकाकर ५:३.
जोपर्यंत मानव आणि मानवी संघटना देवाच्या उद्देशांच्या अनुरूप कार्य करतात आणि ईश्वरी तत्त्वे प्रदर्शित करतात तोपर्यंतच त्यांच्यावर भरवसा ठेवला जाऊ शकतो. म्हणून, इतरांनी आपल्यावर भरवसा ठेवावा असे आपल्याला वाटत असेल, तर आपण सत्य बोलले पाहिजे आणि इमानदार व विश्वसनीय असले पाहिजे. (नीतिसूत्रे १२:१९; इफिसकर ४:२५; इब्री लोकांस १३:१८) बायबल तत्त्वांच्या अनुषंगाने वागल्यानेच, इतरजण आपल्यावर जो भरवसा ठेवतील तो योग्य ठरेल आणि त्यामुळे परस्परांची उभारणी होईल आणि उत्तेजन मिळेल.
भरवसा पुन्हा मिळवणे
देवावर भरवसा ठेवायला आणि इतरांनाही तसे उत्तेजन द्यायला यहोवाच्या साक्षीदारांकडे एक भक्कम आधार आहे. यहोवा विश्वासू आणि निष्ठावान आहे; त्याने जे काही सांगितले त्यानुसार तो जरूर करेल अशी आपण खात्री बाळगू शकतो कारण “खोटे बोलणे देवाला अशक्य आहे.” प्रेममय देवावर भरवसा ठेवल्याने कधीही निराशा पदरी पडणार नाही.—इब्री लोकांस ६:१८; स्तोत्र ९४:१४; यशया ४६:९-११; १ योहान ४:८.
यहोवावर भरवसा ठेवण्यात आणि त्याच्या तत्त्वांनुरूप जीवन जगण्यात एकमत असलेले लोक एकमेकांवरही भरवसा ठेवायला प्रवृत्त होतात. बेभरवशाच्या जगात, विश्वसनीय लोक भेटणे ही केवढ्या आनंदाची गोष्ट! दुसरे लोक जे सांगतात आणि करतात यावर आपल्याला पूर्ण भरवसा ठेवता आला असता, तर हे जग किती वेगळे असते याची जरा कल्पना करा! देवाच्या येणाऱ्या नवीन जगात अगदी अशीच परिस्थिती असेल. पुन्हा कधीच बेभरवसा असणार नाही!
अशा परिस्थितीत जगायला तुम्हाला आवडेल का? तर मग, जीवनासाठी देवाच्या काय अपेक्षा आहेत यांविषयी अधिक शिकून देवावरील आणि त्याच्या अभिवचनांवरील भरवसा दृढ करण्यास यहोवाचे साक्षीदार तुमचे स्वागत करतात. देव अस्तित्वात आहे, मानवजातीच्या हिताची त्याला चिंता आहे आणि लवकरच आपल्या राज्याकरवी तो जगाच्या समस्यांचे निरसन करण्यासाठी पावले उचलील यांचा पुरावा तुम्हाला बायबलच्या अभ्यासाद्वारे मिळेल. लाखो लोक, देवावर आणि त्याच्या वचनावर अर्थात बायबलवर भरवसा ठेवू लागले आहेत. बायबलचा मोफत अभ्यास देण्याची ही जनसेवा कशी केली जाते हे यहोवाचे साक्षीदार तुम्हाला आनंदाने दाखवून देतील. किंवा अधिक माहितीसाठी या नियतकालिकाच्या प्रकाशकांना पत्र लिहा.
[५ पानांवरील संक्षिप्त आशय]
देवावरील भरवशाच्या अभावाने मानवांमधील आपापसांतील संबंध बिनसतात
[६ पानांवरील संक्षिप्त आशय]
जोपर्यंत मानव देवाच्या उद्देशांच्या अनुरूप कार्य करतात तोपर्यंतच त्यांच्यावर भरवसा ठेवला जाऊ शकतो