बेभरवशाचे युग का?
‘आजकाल कोणावर भरवसा ठेवता येतो का?’ कंटाळून गेलेल्या कोणा व्यक्तीच्या तोंडून हा प्रश्न तुम्ही कदाचित ऐकला असेल. किंवा स्वतःच्या जीवनातील काही घडामोडींमुळे अस्वस्थ होऊन तुम्ही हा प्रश्न स्वतःलाच विचारला असेल.
सबंध जगभरात, संस्थांवर काय किंवा लोकांवर काय सर्वांवरचाच भरवसा कमी होत चालल्याचे आढळते. बहुतेकवेळा हा बेभरवसा अनाठायी नसतो. राजकारणातील पुढारी, निवडणुकीच्या वेळी जी वचने देतात ती पूर्ण केली जातील अशी अपेक्षा कोणी खरोखर करतो का? जर्मनीत, १९९० साली घेतलेल्या १,००० विद्यार्थ्यांच्या एका सर्वेक्षणानुसार, १६.५ टक्के विद्यार्थ्यांना, राजकीय पुढारी जगाच्या समस्यांचे निरसन करू शकतात अशी खात्री वाटत होती, तरीपण त्यापेक्षा दुप्पट विद्यार्थ्यांनी त्याबद्दल दाट शंका व्यक्त केली. शिवाय, बहुतेकांनी असे म्हटले की, राजकीय पुढाऱ्यांना समस्यांचे निरसन करण्याचे सामर्थ्य आहे याचा त्यांना भरवसा तर वाटतच नव्हता पण त्यांना तशी इच्छा आहे की नाही याची देखील शंका वाटत होती.
श्टुटगार्टर नाखरीख्टन या वृत्तपत्राने अशी तक्रार मांडली: “जवळजवळ सगळ्या राज्यकर्त्यांना आधी स्वतःचे हित साधायचे असते आणि मग जमलेच तर त्यांच्या मतदारांचे.” इतर देशांच्या लोकांचेही यावर सहमत आहे. द युरोपियन या वृत्तपत्राने एका विशिष्ट देशाविषयी असे म्हटले: “राजकीय पुढाऱ्यांबद्दल युवकांना वाटणारा बेभरवसा निश्चितच अनाठायी नाही, वडिलधारी लोकांचेही तेच मत आहे.” ‘या देशातील मतदाते पुनःपुन्हा राजकीय पक्षांना सत्तेवरून खाली उतरवत असतात’ असे ते म्हणाले. पुढे त्या वृत्तपत्राने असे म्हटले: “[तेथील] युवकांचा कोणावर भरवसा राहिलेला नाही आणि आता आपल्या पाठीशी कोणी नाही अशी त्यांची भावना त्यांच्या बोलण्यावरून चटकन लक्षात येते.” तथापि, जनतेलाच भरवसा राहिला नाही, तर लोकशाही सरकार फारसे साध्य करू शकत नाही. अमेरिकेचे माजी पंतप्रधान जॉन एफ. केनेडी यांनी एकदा असे म्हटले होते: “जनतेचा भरवसा हाच प्रभावकारी सरकाराचा पाया आहे.”
अर्थव्यवस्थेवरील भरवशाच्या बाबतीत पाहू जाता, अर्थव्यवस्था अचानक कोसळल्यानंतर आणि झट-की-पट श्रीमंत बनण्याच्या योजना अयशस्वी ठरल्यानंतर अनेकजण त्यात गुंतण्यास कचरू लागले. ऑक्टोबर १९९७ साली, आंतरराष्ट्रीय स्टॉक मार्केटमध्ये अवाढव्य चढउतार झाले तेव्हा, “भयंकरच नव्हे तर अवाजवी बेभरवसा” आणि “बेभरवशाची फैलणारी प्रवृत्ती” असे एका वृत्तपत्रिकेने म्हटले होते. त्यात असेही म्हटले होते की, “[एका आशियाई देशात] लोकांचा भरवसा इतपत उडाला होता की, सरकार तग धरू शकेल की नाही . . . अशी भीती वाटत होती.” थोडक्यात, त्यांनी वस्तुस्थिती मांडली: “अर्थव्यवस्था भरवशावर आधारलेल्या असतात.”
आता लोकांचा धर्मावरील भरवसा देखील कमी होत चालला आहे. क्रायस्ट इन डे गेगनवार्ट या नावाची एक जर्मन धार्मिक पत्रिका खेदाने असे म्हणते: “आता लोकांचा चर्चवरचा विश्वास उडत चालला आहे.” सन १९८६ ते १९९२ दरम्यान, चर्चवर पुष्कळ किंवा बऱ्यापैकी भरवसा असलेले ४० टक्के जर्मन लोक होते ते ३३ टक्के झाले. भूतपूर्व पूर्व जर्मनीत तर २० टक्क्यांहूनही कमी झाले. त्याउलट, भूतपूर्व पश्चिम जर्मनीत चर्चवर फार कमी किंवा मुळीच भरवसा नसलेले ५६ टक्के लोक होते ते ६६ टक्के आणि भूतपूर्व पूर्व जर्मनीत ७१ टक्के झाले.
मानवी समाजाचे तीन आधारस्तंभ—राजकारण, अर्थव्यवस्था आणि धर्म यांशिवाय इतर क्षेत्रांवरही भरवसा कमी होत चालला आहे हे स्पष्ट दिसले आहे. याचे आणखी एक उदाहरण म्हणजे कायद्याची अंमलबजावणी. गुन्हाविरोधी कायद्यांमधील चोरमार्ग, योग्य तऱ्हेने कायद्याची अंमलबजावणी करण्यातील अडचणी आणि शंकेला वाव देणारे कोर्ट निर्णय या सर्वांमुळे लोकांच्या विश्वासाला जबरदस्त तडा गेला आहे. टाईम पत्रिकेनुसार, “भयानक गुन्हेगारांना खुशाल मोकळे सोडून देणाऱ्या न्याययंत्रणेमुळे नागरिक आणि पोलिसांची इतकी निराशा झाली आहे की भरवसा ठेवताच येत नाही अशी गत झाली आहे.” पोलिसांच्या भ्रष्टाचाराच्या आणि अत्याचाराच्या प्रकरणांमुळे पोलिस खात्यावरचाही विश्वास नाहीसा होत आहे.
देशोदेशीच्या राजकारणाविषयी सांगायचे झाल्यास, फोल ठरलेले शांती करार आणि शांती तह न पाळल्याने बेभरवसा दिसून येतो. बिल रिचर्डसन, संयुक्त राष्ट्रांचे राजदूत, यांनी मध्य पूर्वेत शांती आणण्यात सर्वात मोठा अडथळा कोणता याविषयी केवळ एवढेच म्हटले: “कुठेच भरवसा राहिलेला नाही.”
परंतु, व्यक्ती-व्यक्तींमधील संबंध पाहिले तर, समस्या उद्भवल्यावर आपल्याला समजून घेण्यासाठी आणि सांत्वन मिळवण्यासाठी ज्यांच्याकडे सहसा आपण वळतो ते अगदी जवळचे नातेवाईक आणि मित्रमैत्रिणी यांच्यावरही कित्येकांचा भरवसा उरलेला नाही. हिब्रू संदेष्टा मीखा याने सांगितल्यासारखीच ही गत आहे: “सोबत्याचा भरवसा धरू नको, जिवलग मित्रावर अवलंबून राहू नको, तुझ्या उराजवळ निजणाऱ्या तुझ्या पत्नीपासून आपले तोंड आवरून धर.”—मीखा ७:५.
काळाचे चिन्ह
अलीकडेच जर्मन मानसशास्त्रज्ञ आर्थर फिशर यांचे बोल उद्धृत करण्यात आले: “सर्व क्षेत्रांमध्ये, समाजाच्या विकासावरचा आणि स्वतःच्या वैयक्तिक भवितव्यावरचा भरवसा फारच कमी झाला आहे. समाजातील संस्था आपली मदत करतील याची तरुणांना शंकाच वाटते. त्यांना कोणावरही आणि कशावरही भरवसा राहिलेला नाही, मग ती राजकारणी, धार्मिक किंवा इतर कोणतीही संघटना असो.” म्हणूनच, दीर्घ काळापासून असलेले अधिकारी, संघटना आणि तज्ज्ञ यांच्यावर “भरवसा न ठेवणारा समाज” निर्माण झालाय, अशा शब्दांत समाजशास्त्रज्ञ उल्रीक बेक त्याचे वर्णन करतात.
अशा समाजात, लोकांची आत्मकेंद्री बनण्याची, कसल्याही प्रकारचा अधिकार न मानण्याची आणि स्वतःच्या आदर्शांनुसार वागण्याची, इतरांकडून कोणताही सल्ला किंवा मार्गदर्शन न घेता स्वतंत्रपणे निर्णय घेण्याची प्रवृत्ती असते. आपल्याला अमुक व्यक्तीवर भरवसा करता येत नाही असे वाटताच काहीजण त्यांच्या प्रत्येक गोष्टीवर शंका करू लागतात, काहीवेळा त्यांच्याशी अविचारीपणे देखील वागतात. या मनोवृत्तीमुळे हितकर वातावरण राहत नाही; बायबलमध्ये याचे असे वर्णन दिले आहे: “शेवटल्या काळी कठीण दिवस येतील हे समजून घे. कारण माणसे स्वार्थी, धनलोभी, बढाईखोर, गर्विष्ठ, निंदक, आईबापास न मानणारी, उपकार न स्मरणारी, अपवित्र, ममताहीन, शांतताद्वेषी, चहाडखोर, असंयमी, क्रूर, चांगल्याबद्दल प्रेम न बाळगणारी, विश्वासघातकी, हूड, गर्वाने फुगलेली, देवावर प्रेम करण्याऐवजी सुखविलासाची आवड धरणारी, सुभक्तीचे केवळ बाह्य रूप दाखवून तिचे सामर्थ्य नाकारणारी अशी ती होतील.” (२ तीमथ्य ३:१-५; नीतिसूत्रे १८:१) खरोखर, आजचे बेभरवशाचे युग हे काळाचे चिन्ह, ‘शेवटल्या काळाचे’ चिन्ह आहे.
बेभरवसा असलेल्या आणि वर सांगितले आहे अशा लोकांनी भरलेल्या या जगात जीवनाचा पुरेपूर आनंद लुटणे शक्य नाही. पण यात बदल होईल असा विचार करणे वास्तविक आहे का? आजचे हे बेभरवशाचे युग बदलले जाऊ शकते का? जर होय तर, कसे आणि केव्हा?