वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w98 ७/१५ पृ. २९-३१
  • तुमचे “ऐकणारे अंतःकरण” आहे का?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तुमचे “ऐकणारे अंतःकरण” आहे का?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • त्यांचे ऐकणारे अंतःकरण होते
  • अर्धवट आज्ञाधारकता पुरेशी नाही
  • तुमची आज्ञाधारकता कितपत पूर्ण आहे?
  • ऐकणाऱ्‍या अंतःकरणामुळे आशीर्वाद
  • तुमच्या आज्ञापालनाने यहोवाला आनंद वाटतो
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००७
  • “मनापासून” आज्ञाधारक बनण्यास इतरांना मदत करा
    आमची राज्य सेवा—२००५
  • येशू “आज्ञाधारकपणा शिकला”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२५
  • “हीच देवावरची प्रीती आहे”
    देवाच्या प्रेमात टिकून राहा
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
w98 ७/१५ पृ. २९-३१

तुमचे “ऐकणारे अंतःकरण” आहे का?

शलमोन प्राचीन इस्राएल राष्ट्राचा राजा बनला तेव्हा आपण अपात्र आहोत असे त्याला वाटले. म्हणून त्याने देवाकडे बुद्धी व ज्ञान मागितले. (२ इतिहास १:१०) “तुझ्या लोकांचा न्याय करायला मला ऐकणारे अंतःकरण दे,” अशीही प्रार्थना शलमोनाने केली. (१ राजे ३:९, पं.र.भा तळटीप.) शलमोनाचे “ऐकणारे अंतःकरण” असते तर त्याने ईश्‍वरी नियम व तत्त्व अनुसरले असते व यहोवाचे आशीर्वाद प्राप्त केले असते.

ऐकणारे अंतःकरण एक ओझे नसून आनंदाचा स्रोत आहे. प्रेषित योहानाने लिहिले: “देवावर प्रीति करणे म्हणजे त्याच्या आज्ञा पाळणे होय; आणि त्याच्या आज्ञा कठीण नाहीत.” (१ योहान ५:३) निश्‍चितच मग, आपण देवाची आज्ञा पाळली पाहिजे. कारण सरतेशेवटी यहोवा आपला महान निर्माणकर्ता आहे. पृथ्वी आणि तिच्यावरील सर्व गोष्टी, सोनेरूपे देखील त्याच्या मालकीच्या आहेत. म्हणून, देवाठायी असलेले प्रेम व्यक्‍त करण्याकरता आपल्याजवळ असलेल्या पैशाचा उपयोग करण्यास तो अनुमती देत असला तरी, भौतिकरीत्या आपण त्याला खरे म्हणजे काहीच देऊ शकत नाही. (१ इतिहास २९:१४) आपण यहोवावर प्रीती करावी आणि त्याची इच्छा पूर्ण करीत नम्रपणे त्याच्याबरोबर चालत राहावे अशी तो आपल्याकडून अपेक्षा करतो.—मीखा ६:८.

नियमशास्त्रातील सर्वात मोठी आज्ञा कोणती असे येशू ख्रिस्ताला विचारले असता, तो म्हणाला: “तू आपला देव परमेश्‍वर [“यहोवा,” NW] ह्‍याच्यावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जिवाने व पूर्ण मनाने प्रीति कर. हीच मोठी व पहिली आज्ञा आहे.” (मत्तय २२:३६-३८) ती प्रीती व्यक्‍त करण्याचा एक मार्ग म्हणजे देवाची आज्ञा पाळणे होय. यास्तव, यहोवाने आपल्याला ऐकणारे अंतःकरण द्यावे अशी आपण सर्वांनी त्याला विनंती केली पाहिजे.

त्यांचे ऐकणारे अंतःकरण होते

बायबलमध्ये ऐकणारे अंतःकरण असलेल्या लोकांची कैक उदाहरणे आहेत. उदाहरणार्थ, लोकांना वाचवण्याकरता यहोवाने नोहाला एक भले मोठे तारू बांधावयास सांगितले. हा एक अवाढव्य प्रकल्प होता; त्याला पूर्ण करावयास सुमारे ४० किंवा ५० वर्षे लागली. आता उपलब्ध असलेल्या सर्व आधुनिक शक्‍तिशाली उपकरणांचा आणि इतर साधनांचा उपयोग करूनही, तरंगणारे इतके विशाल जहाज बांधणे म्हणजे एक अभियांत्रिकी पराक्रमच ठरेल! शिवाय, नोहाने लोकांना इशारा दिला आणि त्यांनी त्याची थट्टामस्करी केलीच. पण, त्याने काटेकोरपणे सर्व काही पाळले. बायबल म्हणते: “नोहाने तसे केले.” (उत्पत्ति ६:९, २२; २ पेत्र २:५) कित्येक वर्षे विश्‍वासूपणे यहोवाच्या आज्ञेत राहून नोहाने आपली प्रीती व्यक्‍त केली. आपल्यापुढे किती हे उत्तम उदाहरण!

कुलपिता अब्राहामाचे देखील उदाहरण घ्या. देवाने त्याला खास्द्यांचा समृद्ध ऊर सोडून एका अज्ञात देशी जाण्यास सांगितले. अब्राहामाने काहीही शंका न बाळगता आज्ञा पाळली. (इब्री लोकांस ११:८) त्याने व त्याच्या कुटुंबाने उरलेले आयुष्य तंबूत राहून काढले. त्या देशात अनेक वर्षांपर्यंत परदेशी म्हणून राहिल्यानंतर, यहोवाने त्याला व त्याची पत्नी सारा हिला, इसहाक नामक पुत्र देऊन आशीर्वादित केले. शंभर वर्षीय अब्राहामाने त्याच्या वृद्धपणी झालेल्या या पुत्रावर किती प्रेम केले असेल! काही वर्षांनंतर, यहोवाने अब्राहामास इसहाकाचे होमार्पण करण्यास सांगितले. (उत्पत्ति २२:१, २) केवळ या विचारानेच अब्राहामाचे अंतःकरण किती कळवळले असावे! तरीसुद्धा, त्याने आज्ञा पाळण्यास सुरवात केली कारण तो यहोवावर प्रीती करीत होता आणि त्याला हा विश्‍वास होता, की वचनयुक्‍त संतान इसहाकाद्वारेच येणार होते, मग त्यासाठी देवाला त्याला मृतांतून उठवावे लागले तरीही. (इब्री लोकांस ११:१७-१९) पण, अब्राहाम आपल्या पुत्राचा वध करणार इतक्यात यहोवाने त्याला थांबवले आणि त्याला म्हटले: “तू आपल्या मुलास, आपल्या एकुलत्या एक मुलासहि माझ्यापासून राखून ठेविले नाही, यावरून तू देवाला भिऊन चालणारा आहेस हे मला कळले.” (उत्पत्ति २२:१२) त्याच्या आज्ञाधारकपणामुळे देव-भीरू अब्राहाम “देवाचा मित्र” म्हणून ज्ञात झाला.—याकोब २:२३.

येशू ख्रिस्त आज्ञाधारकतेचे अत्युत्तम उदाहरण आहे. मानवप्रकृती पूर्वीच्या अस्तित्वादरम्यान, त्याला स्वर्गामध्ये आपल्या पित्याच्या आज्ञेत राहून त्याची सेवा करण्यात अत्यानंद वाटत होता. (नीतिसूत्रे ८:२२-३१) मनुष्य या नात्याने, येशूने हर बाबतीत यहोवाची आज्ञा पाळली, त्याची इच्छा पूर्ण करण्यात त्याला आनंद वाटला. (स्तोत्र ४०:८; इब्री लोकांस १०:९) म्हणूनच, येशू अगदी खरेपणाने असे म्हणू शकला: “मी आपण होऊन काही करीत नाही तर मला पित्याने शिकविल्याप्रमाणे मी ह्‍या गोष्टी बोलतो. ज्याने मला पाठविले तो माझ्याबरोबर आहे; त्याने मला एकटे सोडिले नाही, कारण जे त्याला आवडते ते मी सर्वदा करितो.” (योहान ८:२८, २९) शेवटी, यहोवाच्या सार्वभौमत्वाचे दोषनिवारण करण्याकरता व आज्ञाधारक मानवजातीची सुटका करण्याकरता सर्वात अपमानास्पद व यातनामय मरण सहन करून येशूने आपणहून आपले जीवन अर्पण केले. होय, “मनुष्यप्रकृतीचे असे प्रगट होऊन त्याने मरण, आणि तेहि वधस्तंभावरचे मरण सोसले; येथपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केले.” (फिलिप्पैकर २:८) ऐकणारे अंतःकरण प्रदर्शित करण्याचे किती सुरेख उदाहरण!

अर्धवट आज्ञाधारकता पुरेशी नाही

देवाच्या आज्ञेत असल्याचा दावा करणारे सर्वच त्याच्या आज्ञेत राहिले नाहीत. प्राचीन इस्राएलच्या शौल राजाचे उदाहरण घ्या. सर्व दुष्ट अमालेकींचा संहार करण्यास देवाने त्याला सांगितले. (१ शमुवेल १५:१-३) शौलाने राष्ट्र या नात्याने त्यांचा नाश केला असला तरी, त्याने त्यांचा राजा आणि त्यांची काही मेंढरे आणि गुरे जिवंत राखले. शमुवेलाने त्यास विचारले: “तू परमेश्‍वराचा शब्द का ऐकला नाही?” त्यावर शौलाने उत्तर दिले: “मी तर परमेश्‍वराचा शब्द पाळिला आहे; . . . ज्या लुटीचा नाश करावयाचा होता तीतून [इस्राएल] लोकांनी उत्तम उत्तम वस्तु म्हणजे मेंढरे व गुरे ही . . . परमेश्‍वर यास . . . यज्ञ करण्यासाठी राखून ठेविली आहेत.” पूर्ण आज्ञाधारकतेच्या आवश्‍यकतेवर जोर देत शमुवेल त्यास म्हणाला: “परमेश्‍वराचा शब्द पाळिल्याने जसा त्याला संतोष होतो तसा होमांनी व यज्ञांनी होतो काय? पाहा, यज्ञापेक्षा आज्ञा पाळणे बरे; एडक्यांच्या वपेपेक्षा वचन ऐकणे बरे. अवज्ञा जादुगिरीच्या पातकासमान आहे, आणि हट्ट हा मूर्तिपूजा व कुलदेवतार्चन यासारखा आहे; तू परमेश्‍वराचा शब्द मोडिला आहे म्हणून त्यानेहि तुला राज्यपदावरून झुगारून दिले आहे.” (१ शमुवेल १५:१७-२३) ऐकणारे अंतःकरण नसल्यामुळे शौलाने किती काय काय गमावले!

ऐकणारे अंतःकरण द्यावे अशी प्रार्थना करणाऱ्‍या सुज्ञ राजा शलमोनाने देखील शेवटपर्यंत देवाची आज्ञा पाळली नाही. ईश्‍वरी इच्छेविरुद्ध जाऊन त्याने विदेशी स्त्रियांशी विवाह केला व यांनी त्याला देवाविरुद्ध पाप करण्यास प्रवृत्त केले. (नहेम्या १३:२३, २६) आता शलमोनाचे ऐकणारे अंतःकरण नसल्यामुळे त्याच्यावरून ईश्‍वरी कृपा काढून घेण्यात आली. आपल्यासाठी किती चांगला इशारा!

याचा अर्थ यहोवा त्याच्या मानवी सेवकांकडून परिपूर्णतेची अपेक्षा करतो असे नाही. “आम्ही केवळ माती आहो हे तो आठवितो.” (स्तोत्र १०३:१४) वेळोवेळी आपण चुका करीतच राहू, पण यहोवाला संतुष्ट करण्याची आपली मनापासून इच्छा आहे की नाही हे देव पाहू शकतो. (२ इतिहास १६:९) मानवी अपरिपूर्णतेमुळे आपण चुका करतो पण पश्‍चात्ताप करतो तेव्हा, ख्रिस्ताच्या खंडणी बलिदानाच्या आधारावर आपण क्षमा मागू शकतो व यहोवा आपल्याला “भरपूर क्षमा करील” असा भरवसा आपण बाळगू शकतो. (यशया ५५:७; १ योहान २:१, २) आध्यात्मिकरीत्या बरे होण्याकरता, सुदृढ विश्‍वास व ऐकणारे अंतःकरण प्राप्त करण्याकरता आपल्याला कदाचित प्रेमळ ख्रिस्ती वडिलांच्या मदतीची आवश्‍यकताही भासेल.—तीत २:२; याकोब ५:१३-१५.

तुमची आज्ञाधारकता कितपत पूर्ण आहे?

यहोवाचे सेवक या नात्याने, आपले ऐकणारे अंतःकरण आहे असे आपल्यातील बहुतेकांना पक्के वाटते. आपण कदाचित म्हणू, मी राज्य प्रचार कार्यात भाग घेत नाही का? तटस्थता यासारखे मोठे विषय निघतात तेव्हा मी दृढ उभा राहत नाही का? शिवाय, प्रेषित पौलाने आर्जवल्याप्रमाणे मी नियमितरीत्या ख्रिस्ती सभांना उपस्थित राहत नाही का? (मत्तय २४:१४; २८:१९, २०; योहान १७:१६; इब्री लोकांस १०:२४, २५) होय, सर्वसाधारणतः यहोवाचे लोक अशा महत्त्वपूर्ण बाबींविषयी मनापासून आज्ञाधारकता दाखवतात.

पण आपल्या दैनंदिन कार्यात, कदाचित लहानसहान वाटणाऱ्‍या गोष्टीत आपले आचरण कसे असते? येशू म्हणाला होता: “जो अगदी थोडक्याविषयी विश्‍वासू तो पुष्काळाविषयीहि विश्‍वासू आहे; आणि जो अगदी थोडक्याविषयी अन्यायी तो पुष्कळाविषयीहि अन्यायी आहे.” (लूक १६:१०) यास्तव, आपल्यातील प्रत्येकाने स्वतःस असे विचारणे उत्तम ठरेल की, लहानसहान गोष्टींचा किंवा इतरांना माहीतही नसतात अशा बाबींचा प्रश्‍न येतो तेव्हा देखील माझे ऐकणारे अंतःकरण असते का?

स्तोत्रकर्ता दाखवून देतो, की तो आपल्या घरात असताना, इतर त्याला पाहू शकत नव्हते अशा ठिकाणी सुद्धा तो, ‘सरळ अंतःकरणाने वागला.’ (स्तोत्र १०१:२) घरात असताना तुम्ही कदाचित टीव्ही लावता आणि एखादा चित्रपट पाहू लागता. तेथेच तुमच्या आज्ञाधारकतेला कसोटीस लावता येऊ शकते. चित्रपटात अनैतिकता दाखवली जाते. तुम्ही तो चित्रपट बघतच राहाल का, आजकाल तर अशाच प्रकारचे चित्रपट चालतात अशी कारणमीमांसा द्याल का? की, तुमचे ऐकणारे अंतःकरण तुम्हाला, ‘जारकर्म, सर्व प्रकारची अशुद्धता ह्‍यांचे तुमच्यामध्ये नावसुद्धा निघू नये,’ या शास्त्रवचनीय ताकिदीकडे कान देण्यास प्रवृत्त करील? (इफिसकर ५:३-५) चित्रपटाची कहाणी कितीही रंजक असली तरी तुम्ही टीव्ही बंद कराल का? नाहीतर, एखाद्या कार्यक्रमात हिंसा दाखवली जाते तेव्हा तुम्ही चॅनल बदलाल का? “स्वतः यहोवा नीतिमानाला आणि दुर्जनाला कसास लावतो व हिंसेची आवड धरणाऱ्‍यांचा तो द्वेष करतो,” असे स्तोत्रकर्त्याने गायिले.—स्तोत्र ११:५, NW.

ऐकणाऱ्‍या अंतःकरणामुळे आशीर्वाद

अर्थातच, आपल्या जीवनात असे अनेक क्षेत्र आहेत जेथे आपण खरोखरच अगदी हृदयापासून देवाची आज्ञा पाळतो का हे पाहण्यासाठी आपला फायदा होईल अशाप्रकारे आत्मपरीक्षण करू शकतो. यहोवाला संतुष्ट करण्यास व त्याचे वचन बायबल यांतून तो जे काही सांगतो तदनुसार वागण्यास यहोवाबद्दलच्या प्रीतीने आपल्याला प्रवृत्त करणे आवश्‍यक आहे. ऐकणाऱ्‍या अंतःकरणामुळे यहोवाबरोबर आपण एक चांगला नातेसंबंध ठेवू शकतो. होय, आपण पूर्णपणे आज्ञाधारक असल्यास, ‘आपल्या तोंडचे शब्द व आपल्या मनचे विचार यहोवाला मान्य’ होतील.—स्तोत्र १९:१४.

यहोवाचे आपल्यावर प्रेम असल्यामुळेच तो आपल्या भल्यासाठी आपल्याला आज्ञाधारक असण्यास शिकवतो. आणि ईश्‍वरी शिक्षणाकडे पूर्ण हृदयाने लक्ष देण्याद्वारे आपण स्वतःचाच खूप फायदा करून घेत असतो. (यशया ४८:१७, १८) तेव्हा, आपला स्वर्गीय पिता त्याचे वचन, त्याचा आत्मा आणि त्याची संघटना यांद्वारे पुरवत असलेल्या मदतीचा आपण खुषीखुषी स्वीकार करू या. आपल्याला इतक्या उत्तमप्रकारे शिकवले जाते जणू आपल्यामागून आपल्याला एक आवाज ऐकू येतो: “हाच मार्ग आहे; याने चला.” (यशया ३०:२१) बायबल, ख्रिस्ती प्रकाशने आणि मंडळीच्या सभा यांद्वारे यहोवा आपल्याला शिकवतो तेव्हा आपण त्याकडे लक्ष देऊ, जे शिकतो ते लागू करू व “सर्व बाबतीत आज्ञापालन” करू या.—२ करिंथकर २:९.

ऐकणाऱ्‍या अंतःकरणाची परिणती अत्यानंद व बहुत आशीर्वाद यांत होईल. त्याने आपल्याला मनाची शांती मिळेल, कारण आपण यहोवा देवाला संतोषवित आहोत आणि त्याचे मन आनंदित करत आहोत हे आपल्याला माहीत असेल. (स्तोत्र २७:११) चूक करण्याचा मोह होतो तेव्हा ऐकणारे अंतःकरण आपले संरक्षण करील. तेव्हा, आपण आपल्या स्वर्गीय पित्याचे ऐकू या व प्रार्थना करू या: ‘तुझ्या सेवकाला ऐकणारे अंतःकरण दे.’

[२९ पानांवरील चित्राचे श्रेय]

किंग जेम्स आणि रिव्हाईज्ड आवृत्त्या असलेल्या सेल्फ-प्रोनाऊनसिंग एडिशन ऑफ द होली बायबल यांतून

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा